न्यू यॉर्क : ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
2 Sep 2016 - 10:54 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

याशिवाय, बराच मोकळा वेळ असल्याने, माझा आवडता छंद म्हणजे "प्रसिद्ध, मुख्य ठिकाणांना सोडून जरा दोन चार गल्ल्या आतले शहर पाहणे" हे सुद्धा आपण करणार आहोत. असे केल्याने खर्‍या शहराची जवळून ओळख होते आणि कधीमधी अचानक, सुखद, आश्चर्यकारक अनुभव येतात... जे नेहमीच्या पर्यटनात सहसा शक्य नसते.
चला तर मग, पुढच्या भागापासून न्यू यॉर्क शहर आणि परिसराची भटकंती करायला तयार व्हा !

न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटाच्या पश्चिमेकडून वाहणार्‍या हडसनमाईच्या पल्याडच्या तटावर जर्सी सिटी नावाचे एक आटपाट नगर आहे. हे शहर शेजारच्या न्यू जर्सी राज्यात असले तरी न्यू यॉर्क शहर व जवळच्या परिसरात दोनतीन आठवड्यांपेक्षा जास्त वस्ती करून राहणार्‍या भारतीयांना अमेरिकेत पोचल्या पोचल्या या तीर्थक्षेत्राला भेट देणे अत्यावश्यक असते. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे तेथे असलेली भारतीय खाद्यपदार्थ, भाज्या, फळे आणि कपड्यांची दुकाने. दुकानांची नावेही भारतात असावी अशीच असतात. शनिवार-रविवारी तर तेथे भारतीय उपखंडातील लोकांची आठवड्याचा भाजीपाला आणि वाणसामानाच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली असते.

न्यू यॉर्क प्रमाणेच या शहरालाही जगाच्या सर्व खंडातील लोकांनी घर बनवले आहे. २०१० सालच्या जनगणनेनुसार येथील १०% पेक्षा जास्त लोक भारतीय वंशाचे आहेत. हे प्रमाण पश्चिम गोलार्धातल्या शहरांमध्ये सर्वाधिक आहे आणि ते सतत वाढत आहे. इथला भारतीय बहुल प्रभाग "इंडिया स्क्वेअर" किंवा "लिटिल इंडिया" किंवा "लिटिल बॉम्बे" या नावांनी ओळखला जातो. या ठिकाणी राहणारे भारतीय नवरात्री, होळी, इत्यादी सण सार्वजनिकरीत्या साजरे करतात आणि त्याला स्थानिक माध्यमांत बरीचशी प्रसिद्धीही मिळते.

जेटलॅग घालविण्यासाठी दोन दिवस आराम करून आलेल्या पहिल्या आठवडी सुट्टीत महिन्याचे वाणसामान भरण्यासाठी जर्सी सिटीला जायचा बेत ठरवला.

चिरंजीवाने घर मोक्याच्या जागी घेतले होते. अल्याडच्या बेनेट अव्हेन्यूवर सबवेचा A हा वेगवान (एक्सप्रेस) मार्ग होता तर पल्याडच्या ब्रॉडवेवर १ हा दर स्टेशनवर थांबणार्‍या (लोकल) गाड्यांचा मार्ग होता. हे दोन्ही रूट्स मॅनहॅटन बेटामध्ये दक्षिणोत्तर आहेत. दक्षिणेत असलेल्या मध्य मॅनहॅटनमध्ये व डाऊनटाऊनच्या काँक्रिट जंगलात पोचल्यावर A ला इंग्लिश अल्फाबेटमधील अक्षरांची नावे असलेले B, C, D,... Z असे आणि १ ला २, ३, ४, इत्यादी आकड्यांची नावे असलेले नवीन मार्ग येऊन मिळतात किंवा फाटे फुटतात. अनेक मोठ्या सबवे स्टेशनवर (उदा ४२ स्ट्रीट स्टेशन) समान स्तरावर असलेल्या मार्गावरचे थांबे बोगद्यांनी जोडलेले आहेत आणि/किंवा एकमेकाच्या वरखाली असलेल्या मार्गावरचे थांबे जिने व लिफ्ट्सनी जोडलेले आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा जमिनीखाली गेलात की कितीही गाड्या बदलल्या तरी शेवटचा थांबा येईपर्यंत परत जमिनीवर यायची सहसा गरज भासत नाही. अर्थातच तुमचे एकदा स्वाईप केलेले स्मार्टकार्ड शेवटापर्यंत काम करते. जमिनीवर आल्यावर त्याच दिशेने जाणारी बस पकडली तर बसमध्ये स्मार्टकार्ड स्वाईप करावे लागते पण बसचा प्रवास २ तासाच्या आत सुरू केला असला तर पैसे कापले जात नाहीत.

मॅनहॅटनमधल्या दक्षिणोत्तर जाणार्‍या रस्त्याला अव्हेन्यू म्हणतात तर पूर्वपश्चिम जाणार्‍या रस्त्यांना स्ट्रीट म्हणतात. बेटाच्या पार दक्षिण टोकाला आणि इतरत्र क्वचित अपवादात्मक रस्त्यांना व्यक्तींची नावे दिली आहेत. इतर सर्व रस्त्यांना त्यांच्या क्रमांकांनी ओळखले जातात. उदाहरणार्थ, ५वा अव्हेन्यू, ४२वा स्ट्रीट, इत्यादी. त्यामुळे, मॅनहॅटनचा नकाशा म्हणजे अव्हेन्यू आणि स्ट्रीट मिळून काढलेली चौकडीची नक्षी दिसते !

सबवे आणि बसच्या थांब्यांची नावे ते कोणत्या अव्हेन्यू/स्ट्रीटवर आहेत त्यावरून दिलेली आहेत. जागांचे पत्तेही "इमारत क्रमांक + अव्हेन्यू / स्ट्रीट क्रमांक" असे असतात. त्यामुळे, गंतव्याचा पत्ता माहीत असला तर कोणत्या सबवे/बसमधून जाऊन कोणत्या थांब्यावर उतरायचे हे वेगळे विचारायची गरज नसते. एकंदरीत संपूर्ण पत्ता माहीत असला तर न्यू यॉर्कमध्ये कोणालाही न विचारता जागा शोधणे फारसे कठीण नाही.

सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था "सबवे+बसच्या सेवेच्या आताच्या व भविष्यातल्या वेळा, थांब्यांच्या जागा, थांब्यांपर्यंत चालत जाण्याकरिता लागणारा वेळ, सर्व मार्गाचा मधल्या थांब्यांसह नकाशा, इत्यादीसह" गुगलमॅपवर पाहता येते. बहुतेक सर्व मार्गांवरील सबवे सेवा दर ३ ते १० मिनिटांनी असते आणि खूप भरवशाची असते. बस दर १० ते १५ मिनिटांनी असते पण रस्त्यावरच्या गर्दीमुळे बससेवेच्या वेळा बेभरंवशाच्या असू शकतात. सबवे इतकी सोयीची आहे की तीन महिन्यांत न्यू यॉर्कच्या एका भागातून दुसर्‍या भागातल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी; गंतव्यस्थानाच्या जवळपर्यंत सबवे जात नसेल अश्या मोजक्या ठिकाणी जाण्यासाठी किंवा केवळ न्यू यॉर्क शहरातील रस्ते व वस्ती पाहायला मिळावी यासाठी मुद्दाम केलेल्या प्रवासासाठीच आम्ही बस सेवा वापरली. टॅक्सी तर विमानतळ व घर यामधले जाण्यायेण्याचे दोन प्रवास सोडून एकदाही वापरली नाही.

तर, जर्सी सिटी या भारतीयांच्या अनेक आशाआकांक्षाइच्छांची पूर्ती करणार्‍या क्षेत्राला जाण्यासाठी सकाळी न्याहारी करून आम्ही सज्ज झालो. घरातून निघण्यापूर्वी "कसा प्रवास करू म्हणजे तो सुगम होईल रे बाबा ?" असे गुगलबाबाला साकडे घातले. त्याने, सबवेचा A मार्ग पकडून डाऊनटाऊनमधील चेंबर स्ट्रीट थांब्यावर उतरा आणि तेथून चालत जवळच असलेल्या PATH या सेवेची सबवे पकडून जर्सी सिटीतल्या जर्नल स्क्वेअर या थांब्यावर उतरा" असा सल्ला दिला. PATH हे The Port Authority of NY & NJ संस्थेच्या न्यू यॉर्क शहराला न्यू जर्सी राज्यातील जर्सी सिटी व न्यूअर्क या शहरांना जोडणार्‍या सार्वजनिक वाहतूक सेवेचे संक्षिप्त रूप आहे.


गुगलबाबाचा सल्ला

गुगलबाबा प्रमाण असे म्हणत आम्ही घराबाहेर पडून बेनेट अव्हेन्यूवर आलो...


बेनेट अव्हेन्यू

बेनेट अव्हेन्यूच्या शेवटच्या भागाच्या एका बाजूला बर्‍यापैकी उंच टेकडी तर दुसर्‍या बाजूला रहिवासी वस्ती आहे. इमारतीतून बाहेर पडून उजवीकडे वळून पायी दोन मिनिटे चालल्यावर त्या टेकडीच्या उभ्या कड्यात असलेले A मार्गावरच्या "१९० स्ट्रीट" नावाच्या थांब्याचे प्रवेशव्दार दिसते...


बेनेट अव्हेन्यू आणि १९० स्ट्रीट सबवे थांब्याचे प्रवेशद्वार

या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक लांबच लांब बोगदा लागतो. तो टेकडीच्या पोटात असलेल्या सबवे थांब्यावर घेऊन जातो...


१९० स्ट्रीट सबवे थांब्याकडे जाणारा बोगदा

बहुतेक सर्व सबवे थांब्यांवर पोहोचायला एकदोन जिने उतरून जावे लागते. पण, १९० स्ट्रीटसारखे काही थांबे असे आहेत की जे एकदोन ब्लॉक्स (१ ब्लॉक = साधारण १०० ते ३०० मीटर्स) अलीकडे-पलीकडे असलेल्या रस्त्यांनी बोगद्यांनी जोडलेले आहेत. १९० स्ट्रीट थांब्याच्या पलीकडच्या बाजूचा रस्ता टेकडीवर बर्‍याच वरच्या स्तरावर आहे. बोगद्याच्या थांब्याजवळच्या टोकापासून तेथे जायला तीन मोठे लिफ्ट्स आहेत. सबवेने प्रवास न करणारे लोकही या बोगद्यांचा व लिफ्ट्सचा शॉर्टकटसारखा वापर करून इकडून तिकडे जाऊन वेळ व श्रम वाचवू शकतात. लोकांना प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी असलेल्या स्वायपिंग मशीन्स चुकवून जाता येईल असा एक वेगळा मार्ग ठेवलेला असतो. थोडक्यात, लोक त्या सेवेचा गैरफायदा घेत नसून ती प्रशासनाने नागरिकांसाठी केलेली सोय आहे. घराच्या जवळ असलेल्या पार्क आणि बगिच्यामध्ये संध्याकाळचा फेरफटका मारायला जाण्यासाठी या सोयीचा आम्हाला पुरेपूर उपयोग झाला.

"कायद्यावर बोट ठेवून सेवा" या तत्त्वाला घट्ट धरून न बसता, "सर्वच नागरिकांच्या सोयीसाठी सुविधा" असा विचार करणार्‍या प्रशासनाचे कौतुक वाटल्याशिवाय राहिले नाही ! अश्या छोट्या छोट्या गोष्टींतूनच विकसित देशातले जीवन जास्त सुसह्य होते आणि जीवनस्तर आपोआप उंचावतो.


१९० स्ट्रीट सबवे थांबा

न्यू यॉर्कच्या सबवेचे थांबे युरोपमधल्या मेट्रो/अंडरग्राउंड सारखे चकचकीत दिसत नाहीत. याची महत्त्वाची कारणे म्हणजे ही जगातली सर्वात जुनी आणि सर्वात अजस्त्र भूमीगत वाहतूक सेवा आहे. त्यातच, २०१२ साली आलेल्या सँडी नावाच्या चक्रीवादळात तिचे अपरिमित नुकसान झाले. हा नुकसानाचा आकडा $३२ बिलियन (सुमारे २ लाख १५ हजार कोटी रुपये) इतका मोठा होता. अर्थातच सद्याच्या आर्थिक तंगीच्या काळात या सेवेला सुंदर बनविण्यापेक्षा ती लोकांसाठी सुलभ, सोयीची आणि वेगवान बनविण्याकडे जास्त लक्ष दिले जात आहे. बर्‍याच थांब्याचे नूतनीकरण केले गेलेले आहे, काहींचे चालू असलेले आपल्याला प्रवास करताना दिसते आणि उरलेल्या इतरांचे भविष्यात केले जाणार आहे. सबवेच्या एखाद्या भागातले थांबे दुरुस्तीसाठी बंद असले तर त्याच्या एका टोकाच्या थांब्यापासून दुसर्‍या टोकाच्या थांब्यापर्यंत दोन्ही दिशांनी मोफत बस धावत असतात आणि प्रवाश्यांचा कमीत कमी खोळंबा होईल याची काळजी घेत असतात. मला हे आश्चर्यकारकरित्या सुखद वाटले. पण वाहतूक कर्मचारी आणि प्रवासी ते सर्व गृहीत धरून वागत असल्याचे दिसत होते.

सबवेचा प्रवास, गर्दीच्या वेळांतही, सुलभ आणि सुखद असतो. पण, माझ्यासारख्या केवळ काही काळासाठी तेथे राहणार्‍या आणि नवीन जागेचे जरा जास्तच कुतूहल असलेल्यांसाठी त्यात एक तोटा असतो. तो म्हणजे "सबवे मार्गाच्या वर असलेल्या जमिनीवरचे शहर कसे आहे, ते दिसत नाही", ही चुटपूट सतत लागून राहते !

हा हा म्हणता चेंबर्स स्ट्रीट सबवे थांबा आलासुद्धा. दोन मजले चढून जमिनीवर आलो आणि मॅनहॅटनच्या डाऊनटाऊनच्या काँक्रिटच्या गगनचुंबी जंगलात पाय ठेवला...

 ...
मॅनहॅटन डाऊनटाऊन

तेथून पायी पाचएक मिनिटांवर असलेला "पाथ"चा जर्सी सिटीच्या दिशेने नेणारा थांबा आम्हाला गाठायचा होता. मे महिना असला तरी अमेरिकन उन्हाळा नीटसा सुरू झालेला नव्हता. सकाळच्या हवेत बर्‍यापैकी सुखद गारवा होता.

वाटेत चिरंजीवाची अल्मा माटर पेस युनिव्हर्सिटी लागली. तिला नंतर एका खास समारंभासाठी भेट द्यायची होती, त्यामुळे दरवाज्यातच फोटोचा एक हॅलो म्हणून पुढे निघालो...


पेस विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार

थोडे पुढे गेल्यावर नष्ट झालेल्या जागतिक व्यापार केंद्राच्या (WTC) जुळ्या टॉवर्सच्या जागी बांधलेल्या नव्या वन वर्ल्ड सेंटरने उंच इमारतींच्या घोळक्यातून आणि उंच वृक्षांच्या शेंड्यांवरून मान वर करून खुणावले...


वन वर्ल्ड सेंटर

पण त्यालाही, "आता जरा घाईत आहे. नंतर आरामात बराच मोकळा वेळ काढून भेटायला येऊ." असे सांगून पाथच्या दिशेने मोर्चा वळवला. पाथ थांब्याजवळ WTC Transportation Hub च्या इमारतीची प्रचंड आकाराच्या सळयांनी बनवलेली एक रचना दिसते. "आकाशात भरारी घेणारा पक्षी" हा त्याचा अर्थ आहे हे सांगितल्याशिवाय कळणे जरासे कठीण आहे. याशिवाय, त्याचे डिझाइन बनवताना काहीतरी गडबड झाली. ती रचना जागेवर बसवताना एका बाजूचे पंख जवळच्या इमारतीत घुसतील असे दिसून आले ! ते छाटून त्यांचा आकार कमी करावा लागल्याने रचनेच्या दोन बाजूंत समानता राहिली नाही. मात्र, आजूबाजूला असलेल्या इमारतींच्या गर्दीत ते सहजपणे दिसून येत नाही. WTC Transportation Hub पूर्ण बांधून होईल तेव्हा ते जागतिक कीर्तीचे संकुल होईल असा दावा केला जातो. मात्र, त्याच्या पूर्णत्वाची ठरवलेली तारीख पाच पाच वर्षांनी पुढे गेली आहे आणि मूळ ठरवलेला खर्च $२ बिलियनवरून $४ बिलियन इतका म्हणजे दुप्पट झाला आहे..


पाथच्या WTC Transportation Hub ची इमारत

पाथचा WTC थांबा मात्र एकदम आधुनिक, आकर्षक आणि भव्य आहे. प्रथमदर्शनीच त्याची आपल्यावर छाप पडल्याशिवाय राहत नाही...


पाथचा WTC थांबा ०१


पाथचा WTC थांबा ०२


पाथचा WTC थांबा ०३

नवीन प्रकल्प असल्याने पाथच्या गाड्यांचे डबे व त्यांच्या आतली व्यवस्था आधुनिक आहे. पाथचा मार्ग हडसन नदीच्या खालून न्यू जर्सी राज्यात जातो. जर्सी सिटीमधला जर्नल स्क्वेअर थांबा आला आणि आम्ही परत जमिनीवर आलो...


जर्सी सिटी ०१

चिरंजीवाचे काही काम असल्याने शहरात थोडासा फेरफटका झाला. हे एक मध्यम आकाराचे शहर आहे. मुख्य बाजारपेठ सोडल्यावर लगेच रहिवासी विभागातील एकमेकाला खेटून असलेली अमेरिकन टाऊनहाऊसेस सुरू झाली...


जर्सी सिटी ०२

नंतर अर्थातच भारतीय वाणसामान आणि मेथी, मुळा, गवार, तोंडली इत्यादी खास भारतीय भाज्यांच्या खरेदीसाठी "लिटिल इंडिया" कडे मोर्चा वळवला. या भागाच्या दुकानांचा भारतीय लहेजा, त्यांची भारतीय नावे आणि त्यात काम करणारे कर्मचारी इंग्लिशबरोबरच सहजपणे वापरत असलेल्या हिंदी आणि गुजराती भाषांमुळे, "येऊन दोन दिवस नाही झाले तेव्हाच लगेच भारतात परतलो की काय ?" असा गमतीदार विचार मनात तरळून जातो आणि आपल्या चेहर्‍यावर आपसूक आश्चर्ययुक्त स्मितहास्य उमलते.

चला तर मनसोक्त भटकूया अमेरिकेतल्या लिटिल इंडियामध्ये..


लिटिल इंडिया ०१


लिटिल इंडिया ०२


लिटिल इंडिया ०३


लिटिल इंडिया ०४


लिटिल इंडिया ०५


लिटिल इंडिया ०६


लिटिल इंडिया ०७


लिटिल इंडिया ०८


लिटिल इंडिया ०९

येथे राजरोस पानाचे दुकान टाकून पान विकले जाते...


लिटिल इंडिया १०

खरेदी केलेल्या सामानाच्या हातातल्या बॅगा सांभाळत जर्नल स्क्वेअर थांब्यावर परतलो. तेथे वर्णभेद तोडून मानाच्या अमेरिकन बेसबॉल लीगमध्ये धडक मारणारा जर्सी सिटीचा लाडका खेळाडू जॅक रुझवेल्ट रॉबिन्सन हात उंचावून स्वागत करताना दिसला. त्याला थोडा मान दिल्याशिवाय तसेच पुढे जाणे कसे बरे दिसेल ?...


जॅक रुझवेल्ट रॉबिन्सनच्या पुतळ्यासोबत

थांब्यावर पाथची परतीची गाडी आमची वाट पाहत होती...


पाथचा जर्नल स्क्वेअर थांबा आणि गाडी

परतताना १ मार्गावरील गाड्या जास्त सोयीच्या आहेत असे गुगलबाबाने सांगितले. त्या मार्गावरचा "१९१ स्ट्रीट" थांबा घराला जवळचा होता. त्याचा ब्रॉडवेला जोडणारा बोगदा जवळ जवळ ८०० मीटर लांबीचा आहे. हा बोगदा आपले खास वैशिष्ट्य राखून आहे. त्यातून चालत घरापर्यंत जाईपर्यंत तो "मिजाज रंगीन बनाता है"...


"१९१ स्ट्रीट" थांब्याचा बोगदा ०१


"१९१ स्ट्रीट" थांब्याचा बोगदा ०२

"१९० स्ट्रीट"चा बोगदा एकदम "प्लेन जेन", एकरंगी आणि साधा पण नेहमी स्वच्छ व नीटनेटका असे; तर "१९१ स्ट्रीट"चा बोगदा सुंदर रंगीबेरंगी ग्राफितीने भरलेल्या भिंती, त्यावर मधूनच कोणीतरी स्प्रे पेंटने काढलेले फराटे व नावे, आणि बर्‍याचदा काहीसा अस्वच्छ असा असे. एकमेकापासून जेमतेम दोन-तीनशे मीटरवर असणार्‍या या सबवेच्या दोन बोगद्यांतील फरक न्यू यॉर्क शहरात एकत्र नांदणारी विविधता अधोरेखीत करताना दिसतो.

(क्रमश :)

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

2 Sep 2016 - 11:10 pm | खटपट्या

अहाहा, अगदी घरी आल्यासारखे वाटले. नॉस्टाल्जीक का काय म्हणतात ते झालो. ती पानटपरी आहे तीथे पान खाउन लोक तीथल्या पींपात्/पींपाच्या बाहेर राजरोसपणे थुंकतात देखील...अगदी भारतासारखे.

खटपट्या's picture

2 Sep 2016 - 11:10 pm | खटपट्या

मी पयला

हा भागही आवडला.लिटिल इंडियाची ओळख आवडली.

संदीप डांगे's picture

2 Sep 2016 - 11:24 pm | संदीप डांगे

फर्मास आणि फर्राटेदार!

ट्रेड मार्क's picture

3 Sep 2016 - 12:23 am | ट्रेड मार्क

न्यू यॉर्क, WTC, पाथ, JSQ, न्यूअर्क अव्हेन्यू, पटेल ब्रदर्स ई चे दर्शन परत झाले. मलाही अगदी घरी आल्यासारखे वाटले.

सुपर स्टाईल सलूनमध्ये मी जायचो, फक्त $८ मध्ये केस कापून मिळायचे. गेले ते दिवस. आता मी आहे तिथे $१५ द्यायला लागतात.

राजभोग तिरंग्यात छान रंगवलंय.

एक्सचेंज प्लेस, न्यूपोर्ट ला नाही गेलात का?

ट्रेड मार्क's picture

3 Sep 2016 - 1:37 am | ट्रेड मार्क

जूनमध्ये भारतभेटीवर असल्याने हा धागा मिसलाच. न्यूपोर्ट मॉलचं दर्शन घडवल्याबद्दल परत धन्यवाद.

पद्मावति's picture

3 Sep 2016 - 12:30 am | पद्मावति

खूप छान. लिटल इंडिया पण मस्तं दिसतोय.

प्रभाकर पेठकर's picture

3 Sep 2016 - 2:14 am | प्रभाकर पेठकर

व्वा! अमेरिका पर्यटन छान फुलत चाललेले आहे. चढत्या श्रेणीने आनंदानुभव येणार आणि पुन्हा एकदा डॉक्टरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिका पर्यटनाची योजना आखावी लागणार असे संकेत मिळत आहेत.

चित्रगुप्त's picture

3 Sep 2016 - 2:21 am | चित्रगुप्त

वाहवा. खुमासदार वर्णन आणि प्रत्येक टप्प्यावरील फोटोंची बहार. एका दुकानावरला 'नाडी' हा बोर्ड बघून दचकलो. वाटले तिकडे विंग कमांडरांनी नाडी केंद्र उघडलेय कि काय ?
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2016 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

एका दुकानावरला 'नाडी' हा बोर्ड बघून दचकलो.

मीही दचकलोच होतो. पण खालचे "हलाल मीट" वगैरे वाचून हे वेगळेच प्रकरण आहे हे ध्यानात आले =))

संदीप डांगे's picture

4 Sep 2016 - 1:33 pm | संदीप डांगे

नाडी म्हणजे काय? हलाल मिट शी संबंधित?

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Sep 2016 - 6:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतिय नाडी "भविष्याशी" किंवा "आयुर्वेदाशी" किंवा "पायजम्याशी" ( ;) ) संबधित असते. चित्रगुप्तसाहेबांना "नाडी भविष्याची" आठवण येऊन ते दचकले :)

भारतिय नाडी वायली, चित्रातली वायली ;) चित्रातील नाडीचा संदर्भ माहीत नाही.

तर "अरेच्चा... असं आहे होय माझं शहर" म्हणुन तो अचंबीत होईल.
खास डॉ. म्हात्रे स्पेशल डिश :)

चौकटराजा's picture

3 Sep 2016 - 6:11 am | चौकटराजा

नेहमी प्रमाणेच नेमके व भारतीय माणसाची इथे भेट देण्याची उत्सुकता वाढवणारे दर्शन. आपले पिंची कधी होणार असे..? असा विचार मनात येतो.. तरीही आपण भारतीय त्या मार्गावर आहोत हे ही अनुभवास मिळते आहे. याही लेखांकाबद्द्ल मनापासून धन्यवाद !

आदूबाळ's picture

3 Sep 2016 - 7:37 am | आदूबाळ

एकच नंबर!

उदय's picture

3 Sep 2016 - 8:18 am | उदय

अमेरिकेत आलो त्या पहिल्याच दिवशी कंपनीने ५ व्या का ८ व्या स्ट्रीटवर एका काँडोमध्ये राहायची सोय केली होती. ते दिवस आठवले. तिथून न्यूपोर्ट पव्होनिया मॉल अगदी चालत जाता येण्यासारखा होता. सुरुवातीला बेंचवर होतो तेव्हा मॉलमध्ये घालवलेले दिवस आठवले. का कोण जाणे, लिटल इंडिया आणि एडिसन हा भाग कधीच आवडला नाही. मित्राकडे जायचो तेव्हा साउथ न्यूजर्सी जास्त आवडले, गार्डन स्टेटला साजेसे वाटले.

कैलासवासी सोन्याबापु's picture

3 Sep 2016 - 8:30 am | कैलासवासी सोन्याबापु

खल्लास सुरु आहे काका लैच मजा येते आहे वाचायला!!

मजा येतेय तुमच्याबरोबर न्यूयॉर्क हिंडायला!
पुभाप्र

भाते's picture

3 Sep 2016 - 5:37 pm | भाते

फोटो आणि सविस्तर माहिती आवडली. पुढल्या भागांत वन वर्ल्ड सेंटरची सविस्तर सचित्र माहिती येईलच!
पुभाप्र.

अभ्या..'s picture

3 Sep 2016 - 6:03 pm | अभ्या..

भारीच की,
एक्काकाका तो ग्राफीटीचा प्रकार काय असतो? कुणीही जाऊन काहीही कसेही रंगवू शकतो का? का काही भिंती ठेवलेल्याच असतात? ती स्टाइल पण बरीचशी ओळखीची झालीय. त्यामध्ये पण प्रयोग, स्पर्धा वगैरे चालतात का?

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 8:44 pm | संदीप डांगे

ग्राफिती म्हणजे हुल्लडबाजी, अनेक स्थानिक प्रशासन संस्था कावलेल्या आहेत ह्या ग्राफितीला, आपले frustation काढण्याचा बहुतांशवेळा काळ्या तरुणांचा हा एक मार्ग आहे, दुसरं अगदी जंगली कायदा- आपली हद्द आपल्या ग्रुपची हद्द अधिरेखित करायचा, लाखो डॉलर दरवर्षी खर्च होतात हे स्वच्छ करायला,

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2016 - 9:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

ग्राफितीच्या बाबतीत अनेक मतमतांतरे आहेत... हे कृत्य विध्वंसक (vandalism), समाजविघातक (antisocial) आहे यापासून ते तो सुंदर कलाविष्कार (artistic expression) आहे इथपर्यंत. काही ग्राफितीचा उद्द्येश केवळ नेत्रसुखद चित्रकला असा असतो तर काही राजकिय किंवा सामाजिक संदेश देतात. काही ठिकाणची ग्राफिती इतकी सुंदर असते की ते खर्‍या कलाकाराचे काम आहे हे सांगायची गरज नसते, तर काही ठिकाणी स्प्रे पेंटचा डबा बाजारात सहजपणे विकत मिळतो म्हणून केलेली मस्ती असते, तर काही ठिकाणी सरळ सरळ विद्धंसक चित्रे आणि मजकूर असतो. अनेक पाश्च्यात्य शहरांत ग्राफितीच्या स्पर्धाही असतात.

काही ठिकाणी ग्राफितीला कलेचा प्रकार मानून, तिचा सकारात्मक उपयोग करून, एखादी जागा सुंदर करायचा प्रयत्न केला जातो... जसा १९१ स्ट्रीट थांब्याच्या बोगद्यात केला आहे. पण त्यावर काही जणांनी काहीबाही स्प्रे करून विध्वंसक प्रवृत्ती दाखली आहेच.

मात्र, वैध प्रकारे एखादी भिंत रंगवणे वेगळे आणि हातात रंगाचा डबा आहे म्हणून परवानगीशिवाय कोणत्याही सार्वजनिक किंवा खाजगी जागेवर तो वापरणे, यांच्यातला फरक समजणे सर्व जणांना जमतेच असे नाही. त्याची ही काही उदाहरणे...

 ..

 ..

लोकसहभागातून मुंबईतली रेल्वे स्टेशन्स रंगवून त्यांना सुशोभित करण्याचा जो प्रयत्न झाला/होत आहे, हे सकारात्मक ग्राफितीचे उदाहरण म्हणता येईल.

संदीप डांगे's picture

3 Sep 2016 - 9:21 pm | संदीप डांगे

सहमत!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Sep 2016 - 9:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

ग्राफिती हा काही आधुनिक कलाप्रकार नाही. प्राचीन मानवही या कलेत तरबेज होता, आणि त्यानी खरडलेली कला जपायचे आज आपण जीवापाड प्रयत्न करतो आहोतच ना ?! :) ...

(या व वरच्या प्रतिसादातील सर्व चित्रे जालावरून साभार)

प्रचेतस's picture

3 Sep 2016 - 6:27 pm | प्रचेतस

नेहमीच्या ख़ास ख़ास जागा दाखवणाऱ्या प्रवासवर्णनांपेक्षा खऱ्या अर्थाने शहर दाखवणारा वृत्तांत.

सुरेख मालिका सुरु आहे. पुभाप्र.

यशोधरा's picture

3 Sep 2016 - 9:24 pm | यशोधरा

मस्त!

मुक्त विहारि's picture

4 Sep 2016 - 7:58 am | मुक्त विहारि

पुभाप्र

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2016 - 1:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद !

माहितीपूर्ण लेखन.
खूपच छान!

इल्यूमिनाटस's picture

4 Sep 2016 - 10:30 pm | इल्यूमिनाटस

रस्त्यांना त्यांची नावे द्यायची पद्धत आवडली
आपणही त्याचे अनुकरण करायला हवे
पुभालटा

संत घोडेकर's picture

5 Sep 2016 - 6:41 pm | संत घोडेकर

छान लेखमाला, पुभाप्र.

सुहास बांदल's picture

6 Sep 2016 - 7:33 pm | सुहास बांदल

मस्त वाटले वाचून. भारतात असल्याचा फील आला काही फोटो पाहून. पुढच्या भागाची प्रतिक्षा.

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2016 - 8:02 pm | पिलीयन रायडर

हा ही लेख मस्तच.. जर्सी म्हणजे भारतच!

मी पण इथल्या ग्राफिटीचे फोटो काढते आणि टाकते. फार सुंदर असतात काही काही.

संदीप डांगे's picture

6 Sep 2016 - 8:27 pm | संदीप डांगे

ओ तै, तिकडे गेलात तर त्या नाडीवाल्याला विचारा त्या दुकानाच्या नावाचा, 'नाडी'चा काय संदर्भ ते, फार उत्सुकता लागून राहिलीये.. ;)

पिलीयन रायडर's picture

6 Sep 2016 - 8:42 pm | पिलीयन रायडर

नेहमीच जाते. नक्की विचारेन! ;)

छान लिहिताय डाॅक्टर, मी व बायको 5 आॅगस्ट ला गेलो होतो...

कनेटीकट हून पियू व अॅलीस्टरचा निरोप घेऊन न्यूयाॅर्कला आलो.
प्रचंड  ट्रॅफिकमुळे  साडेचार तास लागले .
56th street वर हाॅटेल होते.

संध्याकाळी फिरायला गेलो. आधी Broadway show ची माहीती काढली. लंडनला आॅपेरा पहायचा राहून गेला होता.आता Broadwayshow बद्दल खूप ऐकले होते. पता चला 49th street वर च्या थिएटरवर chicago शो आहे. बजेटचा पण प्रश्न होता पुढच्या रांगेतली तिकीटं obviously महंगी होती $139 वगैरे, (आधी काढली तर स्वस्त मिळतात म्हणून 3 महिन्यापासून intnet वरुन लक्ष ठेऊन होतो...) नशीबाने दुस-या दिवशी दुपारचा शो $49.5 ला मागची तिकीटं ला मिळतात हे दिसलं, लगेच दोन तीकिटं घेतली. (बाटा सारखे हे रेट आॅड का ठेवतात 139 व 49.5 ते कळले नाही)

तिथून empire state building पहायला निघालो. well defined रस्ते असल्याने पत्ता शोधणे फारचं सोपे होते.
mobile वर GPS map वर  सहज कळतं होतं.34th street वर esb साठी निघालो...

रस्स्ता खूपचं happening होता.वातावरण bubbling उत्त्साहाने charged झाले होते.आम्ही चक्क न्युयाॅर्कमध्ये फिरतोय म्हणून खूपचं exited होतो .आजुबाजूला सगळेच tourst फिरत होते काही रस्त्यावरच खात होते मुलाबाळांबरोबर फिरत होते. road shows व तरुणाई ला उधाण आले होते. अर्ध्या चड्डीत फिरत होती.सोय म्हणून अस्मादीकांनीही अर्धी कार्गो  परीधान केली होती! अॅडव्हांस डिग्री ला सुधारीत बाईमाणसं quarter चड्डी व त्याही पेक्षा सुधारलेल्या काहीजणी half-quarter चड्डी धारण करुन फिरत होत्या.
"सुधारणा = inversely proportionl कपडे "
असा काही formula असावा का आणि असल्ल्यास त्यात c square (k कपडे,c प्रकाशाचा वेग!) टाकून

सुधारणा = 1 / kc2
k          = 1 / सुधारणा x c square
मग अतिसुधारणा (>>सुधारणा) म्हणजे k ~= शून्य !

अतिसुधारणा म्हणजे nearlyविवस्त्र चअवस्था (?!) अशा theotical conclusion ला आम्ही पोहचत असतांनाच
आम्ही टाईम्स स्क्वेअर जवळ आलो,समोर तिघीजणी दिसल्या....topless !! tops रंगवलेले होते ....कमरेला इतरांचा मान राखण्यासाठी एव्हढीशी झालर लावली होती , तिचा चेहरा अतिशय आनंद झाला असल्यासारखा फूलला होता .
दुस-या दोघींच्या छातीवर artist रंगवत होता.

आमच्या formula चा proof इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते.आम्ही धन्य  जाहलो !!
(Times square ला चाललेल्या अनेक road shows पैकी हा हि एक प्रकार, असे राहून मग डाॅलर घेऊन फोटो काढू देणे हा एक बिन(धास)कष्टाचा व्यवसाय (?))

जो जे वांछील,
तो ते लाहो,प्राणीजात !

या ओळींच्या अर्थाचा नवीन साक्षात्कार झाला...!

तिथं रेगाळून चालणार नव्हते, 34th street ला Empire State building ला जायचे होते.आम्ही चालत सुटलो.
(भीषण चालणं झालं त्या दिवशी....16,000 steps हाॅटेल ला परतलो तेव्हा as per pedometer !)

34th street वरुन चालत 56th street वर आलो, solid भूक लागली होती,

 बनारस रेस्टाॅॅरेंंट दिसले,गेलो,बसलो, समोर एका painting ने लक्ष वेधून घेतले होते.

मॅॅनेजर आला, मी विचारले beer कोणती आहे, पता चला, किंग्ज

 फिशर पासून ब-याच काही. म्हटले हे बरे आहे, भारतापासून दूर आल्यावर होमसीक वाटले तर किंग्ज
बरी आहे.मी मेक्सीकन ट्राय केली.
       मॅॅनेजर म्हणाला, आधी पाहिले नाही तुम्हाला.
मी, अरे बाबा tourist आहोत... अच्छा, वो पेंंटिंंग के बारे मे बताओ, बहोत interesting है.
त्या painting मध्ये fusion करुन एका बाजूला...बनारस चे घाट, मंंदिरे,गंंगानदी, अर्ध्य वाहणारे साधुमहाराज आणि skyline ला Newyork च्या tall buildings अशी fantacy दाखवली होती !!

मॅॅनेजरने जोक मारला,
"पता है पंंडीतजी(साधूमहाराज) क्या मांंग रहे है ? वो कह रहे है, किसी तरहा अमेरिका का विजा दिलवा दो,भगवान"

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Sep 2016 - 1:00 am | डॉ सुहास म्हात्रे

मस्तंच ! जोरात झालीय तुमची न्यू यॉर्क सहल !!

डाऊनटाऊन, विशेषतः टाईम्स स्क्वेअर आणि ब्रॉडवेचा थिएटर डिस्ट्रिक्ट असाच अनुभवायचा असतो !

टवाळ कार्टा's picture

1 Oct 2016 - 6:53 pm | टवाळ कार्टा

फोटो??? ;)

सुधीर कांदळकर's picture

14 Sep 2016 - 7:40 am | सुधीर कांदळकर

लिटल् इंडिया ०१ मधले स्ट्रीट लाईट्स आवडले. बोगद्यातली रंगचित्रे लाजबाब. आपल्या रसिक नजरेला पुन्हा दाद देतो.

धन्यवाद.

पैसा's picture

30 Sep 2016 - 6:00 pm | पैसा

वाचते आहे