मिशन काश्मीर - भाग ३ - श्रीनगर

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
16 May 2011 - 1:38 pm

मिशन काश्मीर : भाग १ - http://www.misalpav.com/node/17957

मिशन काश्मीर : भाग २ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/17973

मिशन कश्मीर : भाग ३ - श्रीनगर - http://www.misalpav.com/node/18019

मिशन काश्मीर : भाग ४ - बर्फ - http://www.misalpav.com/node/18061

मिशन काश्मीर : भाग ५ - अवंतिपुरा, पहलगाम - http://www.misalpav.com/node/18085

मिशन काश्मीर : भाग ६ - पहलगाम - पोशवान पार्क - http://www.misalpav.com/node/18104

मिशन काश्मीर : भाग ७ - पहलगाम - http://www.misalpav.com/node/18162

मिशन काश्मीर : केवळ छायाचित्रे - http://www.misalpav.com/node/22309

**************************************************************

काश्मीर आज भारतीयांसाठी सुद्धा एक दंतकथा झाली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात काश्मीर म्हणजे दहशतवाद असे एक समीकरण झाले आहे. पण एकेकाळी ही देवांची भूमी होती. साक्षात शंकराने इथे साधना केल्याचे मानले जाते. कश्यपाच्या या भूमीत हजारो वर्षे हिंदु राजांनी राज्य केले. त्याच्या अनुषंगाने बरीच मंदिरे देखील बांधली गेली. आज कडव्या धर्मांधांच्या तडाख्यातुन त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच शिल्लक राहिली आहेत. शंकराचार्य मंदिर हे त्यातीलच एक.

शंकराचार्य मंदिर म्हणजे आदि शंकाराचार्यांचे मंदिर असा बर्‍याच जणांचा समज आहे. तसे नाही आहे. हे शंकराचे मंदिर आहे. शंकराचार्य मंदिर भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असावे. असे म्हणतात इसवीसनापुर्वी २५०० वर्षे हे मंदिर बांधले गेले आणि वेळोवेळी त्याचा जीर्णोद्धार झाला. एक आख्यायिका अशीही आहे की भीमाने हे मंदिर बांधले. काही लोकांच्या मते हे मंदिर इसवीसनापुर्वी ५०० वर्षे बांधले गेले. खरेखोटे तो शंभुनाथ जाणे. पुर्वी हे मंदिर ज्येष्ठेष्वराचे मंदिर म्हणुन प्रसिद्ध होते. नंतर आदि शंकराचार्यांनी इथेच तपस्या केली आणि त्यांना शंकराने दृष्टांत दिला म्हणुन हे मंदिर शंकराचार्य मंदिर म्हणुन प्रसिद्ध झाले.

शंकराचे मूळ लिंग आणि आजूबाजूच्या ३०० हुन आधिक देवी देवतांच्या मुर्ती एका धर्मांध मुस्लिम शासकाने १४ व्या शतकात ध्वस्त केले. १५ व्या शतकात दुसर्‍या एका मुस्लिम शासकाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. काश्मीरात हिंदु जनतेचे आणि मुस्लिम शासकांचे हे असे विळ्या भोपळ्याचे सख्य होते. एक यायचा जिझीया लादायचा, पंडितांना हाकलुन द्यायचा, मंदिरे फोडायचा, दुसरा यायचा पंडितांना अभय द्यायचा, मंदिरांचा जीर्णोद्धार करायचा. अर्थात झैन उल अबिदीनसारखे सहिष्णु मुस्लिम शासक थोडेच होते.

मंदिर प्रसन्न आहे यात काही वाद नाही. यात आजुबाजुच्या वातावरणाचा जबरदस्त हातभार लागतो. समोर पसरलेले दल लेक, झुळ्झुळ वाहणारी झेलम, तळ्यात फिरणारे शिकारे, चहुबाजुला पसरलेले रम्य श्रीनगर आणि या सर्वांना खेळवणारा बारोमाही थंड वारा. मंदिर प्रसन्न वाटलेच पाहिजे. मुर्तीत देव असतो की नाही हा प्रश्न इथे पडणारच नाही. असाही मुर्तीत देव असो किंवा नसो मनात श्रद्धा असले म्हणजे कर आपोआप जुळतात. मंदिराच्या आवारातच शंकराचार्यांनी जिथे तपस्या केली ती गुहा देखील आहे. मंदिराच्या २८० पायर्‍या चढण्याची इच्छा आणि सामर्थ्य असेल तर इथे एकदा जरुर यावे. देवावर श्रद्धा नसेल तर निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी यावे.

शंकराचार्य मंदिराबाबत अजुन एक आख्यायिका आहे की या मंदिराला येशुनेही भेट दिली आहे आणि बुद्धानेही. बौद्ध धर्मीयांसाठीही हे मंदिर पवित्र आहे. ख्रिश्चनांचा एक गट आणि काही मुस्लिम असे मानतात की येशु क्रुसावर चढलाच नाही. तो तिथुन निसटला, ३ दिवसांनी प्रकटला आणि मग अफगाणिस्थान मार्गे काश्मीर मध्ये पोचला. त्यावेळेस त्याने म्हणे शंकराचार्य मंदिराला भेट दिली. याहीबाबतीत खरे खोटे तो शंभुनाथ जाणे. एकुण हे मंदिर अनेक शतकांच्या प्रहाराला समर्थपणे तोंड देउन उभी असलेली एक खरीखुरी आख्यायिका आहे :)

शंकराचार्याच्या मंदिराप्रमाणेच काश्मीरमधली दुसरी खरीखुरी आख्यायिका म्हणजे हजरतबल दर्गा. शंकराचार्य आणि हजरतबल हे कॉम्बिनेशन मनात पक्के झाले ते ह्रितिक रोशन च्या मिशन काश्मीर मुळे. यात अतिरेकी ही दोन्ही पवित्र स्थळे एकाचवेळी उडवुन हाहाकार माजवण्याच्या प्रयत्नात असतात. प्रत्यक्षात हे इतके सोप्पे आहे असे वाटत नाही कारण दोन्ही ठिकाणी कडेकोट बंदोबस्त आहे.

हजरतबलाचे महात्म्य हे की इथे साक्षात प्रेषित मोहम्मदाचा एक केस ठेवण्यात आला आहे. मोहम्मदाचे एक अनुयायी मदिना सोडुन भारतात वास्तव्यास आले. नंतर त्यांच्या वंशजांनी हा केस ख्वाजा नुर उद्दिन ला चक्क विकला. त्याच ख्वाज्याच्या बायकोने नंतर हा दर्गा बांधला आणि इथे मोहम्मदाचा केस जतन करुन ठेवला. हा केस विकल्याबद्दल मूळ मालकाला आणि विकत घेतल्याबद्दल ख्वाजाला औरंगजेबाने चक्क कैदेत टाकले होते. इतका मुल्यवान तो केस अर्थातच कडेकोट बंदोबस्तात ठेवला होता. पण त्यातुनही तो कोणीतरी चोरला आणि आख्खे काश्मीर पेटले. नंतर ३ दिवसांनी तो केस परत मिळाला आणि काश्मीर पुर्ववत झाले. हजरत मोहम्मदांचीच कृपा म्हणायचीं. तो केस मूळ केसच आहे हे कसे ठरवले हा प्रश्न मी मनातच ठेवला.

दर्ग्याच्या आजूबाजूला कडेकोट बंदोबस्त आहे. तरीही एकदोन ठिकाणी भिंतीवर "गो बॅक इंडिया" रंगवलेले दिसले. लष्कराचे सैनिक आताश्या या अश्या रंगरंगोटीकडे दुर्लक्ष करता बहुधा कारण लाल चौकात तर हे जागोजागी रंगवलेले आहे म्हणे. असेही लष्कराला ही रंगरंगोटी साफ करण्याऐवजी दर शुक्रवारी होणारी दगडफेक थांबवण्यात रस असणार. दर शुक्रवारी नमाज अदा करुन झाला की हजरतबलच्या परिसरात, लाल चौकात आणि सरकारी इमारतींच्या आसपास खच्चुन दगडफेक होते. हिंदुस्तानी मिडीया अपप्रचार करते तो असा. आपण या बातम्या कधीकधीच ऐकतो की काश्मीरी युवकांनी दगडफेक केली मग लष्कराने अश्रुधुराचा वापर केला वगैरे. प्रत्यक्षात जे दर शुक्रवारे घडते. दगड फेकण्यासाठी युवकांना चक्क पैसे दिले जातात. दुर्दैवाने आम्ही गेलो तो मंगळवार होता. त्यामुळे सुट्टीच्या दिवसात थोडी कमाई करण्याचा चान्स हुकला. ;)

दल लेक, शंकराचार्य आणि हजरतबल या व्यतिरिक्त श्रीनगरचे अजुन एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या बागा. आधीच काश्मीर सुंदर, पाणी मुबलक, वातावरण फळाफुलांना आणि वृक्षांना पोषक. त्यामुळे मुगलांनी इथे भरपुर बागा बांधल्या. शहाजहान तर वर्षातले चार महिने म्हणे या बागांमध्येच असायचा. शिवाजीराजांनी जेव्हा शाइस्तेखानाची बोटे कापली तेव्हा औरंगजेब इथेच होता. त्याने मामांना परस्पर बंगालमध्ये पाठवुन दिले.

वास्तविक बागा बघण्यातला माझा इंटरेस्ट ट्युलिप्स बघण्यापुरता मर्यादित होता. एरवी बागांमध्ये प्रेमी युगुलांनी, सिनीयर सिटीझन्सनी नाहीतर पोराटोरांना घेउन संसारी माणसांनी जावे हे माझे स्पष्ट मत. सगळ्या बागा इथुन तिथुन सारख्याच. नाही म्हणायला ऊटीचे बॉटेनिकल गार्डन मला जबरदस्त आवडले होते. त्यामुळे ट्युलिप गार्डन बघुन इतर बागांमध्ये गेल्यावर एखाद्या चिनाराला पकडुन त्याच्या सावलीत मस्तपैकी ताणुन द्यायचा माझा विचार पक्का होता. दुर्दैवाने आम्ही गेलो त्या दिवसापासुन ट्युलिप गार्डन बंद झाले होते. ट्युलिपचा मौसम बर्‍यापैकी संपत आल्यामुळे. त्यामुळे आम्ही तडक मुघल गार्डनचा रस्ता धरला.

मुघल गार्डन्स मुख्यतः ३: चष्मेशाही, शालिमार आणि निशात. तिन्ही विस्तीर्ण आणि रम्य.

चश्मेशाहीचा आणि शाही चष्म्याचा काहीतरी संबंध असावा अशी मला राहुनराहुन शंका होती. प्रत्यक्षात चश्मा म्हणजे झरा. चश्मेशाही म्हणजे शाही झरा. याचे पाणी बिस्लेरीहुन शुद्ध असे आमचा ड्रायवर म्हणाला. पंडित नेहरु काश्मीरमध्ये वास्तव्यास असायचे तेव्हा त्यांचे पिण्याचे पाणी इथुनच जायचे म्हणे. प्रत्य्क्षात पाणी प्यायलो तेव्हा ड्रायवर म्हणाला होता ते खरे आहे हे पटले. पाणे थेट सिंहगडाच्या देव टाक्यातल्या पाण्याएवढे गार आणि गोड.

चष्मेशाही, शालिमार आणि निशात तिन्हीलाही आज मुघल गार्डन्स म्हणत असले तरी शालिमार मुळचे एका हिंदु राजाने निर्माण केले होते. प्रवरसेना त्याचे नाव. दुसर्‍या शतकात तयार केलेली ही बाग शालिमार म्हणजे प्रेमाचे आलय म्हणुन त्यानेच प्रसिद्ध केली. कालौघात ही बाग नष्टही झाली. नंतर जहांगीर बादशहाने त्याच जागेवर नव्याने बाग बांधली. आपल्या राण्यांच्या स्मरणार्थ त्याने या बागांना विविध नावे दिली पण आजाही ही बाग शालिमार म्हणुनच प्रसिद्ध आहे.

निशात बाग म्हणजे आनंदाचे आलय ही देखील मुघल बाग म्हणुन ओळखली जाते. पण या बागेचा जनक कोणी मुघल बादशाह नव्हता तर मुघल बादशाहा जहांगीर याच्या सासर्‍याने ही बाग तयार करुन घेतली. ही बाग पुर्ण झाल्यावर याच्या सौंदर्यावर जहांगीर सासर्‍याच्या मुलीवर भाळला होता त्याहुन जास्त भाळला. सासर्‍याने हे बाग आपल्याला आंदणा द्यावी म्हणुन जहांगीराने त्याची वारेमाप स्तुती केली. परंतु सासरेबुवा बधले नाहीत. हे बघुन जहांगीराने निशात बागेतल्या झर्‍याचे पाणी अडवले. तरीही सासरेबुवा बधले नाहीत. दु:खी मात्र झाले. विषण्णावस्थेत एकदा ते बागेत बसलेले असताना त्यांच्या नौकराला त्यांचे दु:ख बघवले नाही आणि मुघल बादशहाच्या आदेशाचे उल्लंघन करुन त्याने पाण्याचा प्रवाह परत सुरु केला. हा औद्धत्याबद्दल वास्तविक त्याचा शिरच्छेदच व्हायचा पण त्याच्या स्वामोनिष्ठेवर खुष होउन जहांगीराने त्याला माफ केले आणि पाण्याचा स्त्रोत पुर्ववत सुरु केला.

निशात बाग आम्हाला लक्षात राहिली कारण अस्मादिकांनी त्या बागेत पाऊल ठेवल्यावर ओसामा बिन लादेनला अमेरिकेने उडवल्याची गोड बातमी कळाली. पाठोपाठ काश्मीरमध्ये हाय अ‍ॅलर्ट जाहीर झाल्याने आपली ट्रिप गंडतेय की काय अशी शंका उभी राहिली. परंतु सुदैवाने काश्मीर शांत राहिले. काही मशिदींमधुन दुखवटे पाळले गेले, ओसामाला श्रद्धांजली वाहिली गेली, लोक धाय मोकलुन रडले, लाल चौकात दुकाने बंद झाली ते वेगळे. पण किमान कुठे हिंसाचार नाही झाला.

बाकी या मुघल गार्डन्सचे एक अपृप आमच्यासाठी असे की इथेच पहिल्यांदा (विमानात बघितलेली सोडुन) हिमशिखरे दिसली. मन त्रुप्त झाले:

बाकी कुठल्याही बागेत दिसली तशी बरीच फुले या बागांमधुनही होती. खासकरुन मंकी फ्लॉवर्सः

आणि आजच्या भागाचा शेवट करण्यापुर्वी काश्मीरची शान असलेल्या चिनाराच्या पानाची ही मोट्ठी प्रतिकृती :) :

त्रास क्रमशः चालु

तळाटीपः हजरतबलची दोन्ही आणि शंकराचार्याचे हिमाच्छादित छायाचित्र जालावरुन साभार
**************************************************************

http://misalpav.com/node/17957 - मिशन काश्मीर - भाग १

http://misalpav.com/node/17973 - मिशन काश्मीर - भाग २

**************************************************************

संस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानप्रवासभूगोलमौजमजाप्रकटनविचारलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

17 May 2011 - 5:17 am | अभिज्ञ

फोटो व माहिती झकास.

उत्तम लेखमालिका.

अभिज्ञ.

इशा१२३'s picture

13 May 2015 - 11:43 pm | इशा१२३

अप्रतिम फोटो ....काश्मिर आठवले

श्रीरंग_जोशी's picture

14 May 2015 - 5:10 am | श्रीरंग_जोशी

धन्यवाद इशा. हा धागा वर आणल्याबद्दल. या धाग्यावर केवळ एक प्रतिसाद होता हे पाहून आश्चर्य वाटले.

२०१२ च्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आम्ही पण काश्मीर सहल केली होती. धाग्यात लिहिल्याप्रमाणे भारताविषयी नकारात्मक खुणा कुठे दिसल्या नाहीत.

आमच्या सहलीच्या अगोदरच्या आठवडयातच श्रीनगरच्या नव्या ट्युलिप गार्डनचे उद्घाटन झाले होते. त्यावेळी काढलेला हा एक फोटो.

Tulip Garden Srinagar

स्रुजा's picture

14 May 2015 - 4:43 am | स्रुजा

वाह ! सुंदर सफर आणि फार छान शैली. या धाग्यावर खरंच एक च प्रतिसाद कसा काय? इशा, बरं केलंस धागा वर काढलास.

मलाहि आश्चर्य वाटल.सुंदर फोटो असलेला धागा अन एकच प्रतिसाद.
@श्रीरंग जोशी:छान फोटो ट्युलिप गार्डनचा.आम्ही काश्मीरला गेलो त्यावेळेस ट्युलिप गार्डन नुकतच बंद झाल होत.थोडीफार फूल इतर बागेतुन दिसली तीहि फार सुंदर होती.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 May 2015 - 6:17 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

हा धागा कसा काय दुर्ल़क्षित राहिला? फोटो खुप सुंदर आहेत.

अरे, हे लिहिले तरी कधी? मस्त!

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 10:45 am | मृत्युन्जय

मिशन काश्मीरला उर्जितावस्था आली हे बघुन बरे वाटले :)

खोदकाम केल्याबद्दल इशातैंचे आभार आणि प्रतिसादाबद्दल (या धाग्यावर आणि इतर धाग्यांवरदेखील) सर्वांचे आभार. मिशन काश्मीरचे ७ भाग आहेत. दुर्दैवाने मला त्याकाळी लिंका देता येत नसत त्यामुळे सगळे धागे जोडलेले नाहित.

विशाल कुलकर्णी's picture

14 May 2015 - 10:58 am | विशाल कुलकर्णी

सुरेख फोटो आणि माहितीपूर्ण मालिका !

मदनबाण's picture

14 May 2015 - 12:05 pm | मदनबाण

सुरेख लेखन ! :)
तो केस मूळ केसच आहे हे कसे ठरवले हा प्रश्न मी मनातच ठेवला.
हे वाचल्यावर मी मनातल्या मनात "बालाजी" ला नमस्कार केला ! ;)

तरीही एकदोन ठिकाणी भिंतीवर "गो बॅक इंडिया" रंगवलेले दिसले. लष्कराचे सैनिक आताश्या या अश्या रंगरंगोटीकडे दुर्लक्ष करता बहुधा कारण लाल चौकात तर हे जागोजागी रंगवलेले आहे म्हणे. असेही लष्कराला ही रंगरंगोटी साफ करण्याऐवजी दर शुक्रवारी होणारी दगडफेक थांबवण्यात रस असणार. दर शुक्रवारी नमाज अदा करुन झाला की हजरतबलच्या परिसरात, लाल चौकात आणि सरकारी इमारतींच्या आसपास खच्चुन दगडफेक होते. हिंदुस्तानी मिडीया अपप्रचार करते तो असा. आपण या बातम्या कधीकधीच ऐकतो की काश्मीरी युवकांनी दगडफेक केली मग लष्कराने अश्रुधुराचा वापर केला वगैरे. प्रत्यक्षात जे दर शुक्रवारे घडते. दगड फेकण्यासाठी युवकांना चक्क पैसे दिले जातात.
पाकडे अतिरेकी यांच्या बायकांवर अत्याचार करतात तरी हिंदूस्थानला विरोध करणार्‍या काश्मिरी लांड्यांची मस्ती काय कमी होत नाही ! देशद्रोही साले !
ऊटीचे बॉटेनिकल गार्डन मला जबरदस्त आवडले होते.
आह्ह... इथे मी खुप वेळ फिरलो आहे ! :) फुलांचे जे फोटो दिले आहेत तशीच फुले तिथेही पहावयास मिळतात. :) कधी सवड मिळाल्यास बॉटेनिकल गार्डनचा धागा विणीन इथे ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व
Why on earth is Narendra Modi going to Mongolia?
Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China
Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li
India’s foreign policy must continue to move past the parochial
Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery guns

मृत्युन्जय's picture

14 May 2015 - 12:37 pm | मृत्युन्जय

मैसूर - ऊटी वर देखील एक मालिका लिहिली आहे. पुर्ण नाही झाली. पण ३ भाग आहेत इथे:

मैसूर -

मैसूर - उटी - भाग २

उटी - कुन्नूर

मदनबाण's picture

14 May 2015 - 1:22 pm | मदनबाण
बॅटमॅन's picture

14 May 2015 - 12:54 pm | बॅटमॅन

नजरेतून सुटलाच हा भाग. लै जबरी!!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 May 2015 - 1:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त आहे हा भाग ! आता अर्थातच इतर भागही नक्कीच वाचले जातील !!