८६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चिपळूण : एक पांगलेला वृत्तांत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
14 Jan 2013 - 4:36 pm

उद्या साहित्य संमेलनाला निघायचं आहे, तयार राहा आम्ही सकाळी पाच वाजेला तुझ्याकडे पोहचतो असा माझ्या लहरी प्राध्यापक मित्रांचा फोन आला आणि ठरल्याप्रमाणे प्रा.डॉ.सर्जेराव जिगे-पाटील, प्रतिष्ठाण महाविद्यालय, पैठण. प्रा.डॉ. महेश खरात, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद, माझ्याकडे पोहचले. सकाळच्या गुलाबी थंडीत आम्ही पुण्याकडे प्रयाण केले. सकाळचा सूर्य झकास दिसत होता. 2013-01-10-002उगवतीचे रंग दहा वाजेच्या सुमारास नाष्ट्याची आठवण झाली आणि मिसळपाव नेहमीप्रमाणे आडवी आली. यथेच्छ ताव मारला. पोटाचं काही होणार तर नाही ना, अशी पुसट शंका आम्ही पुसून टाकली. पुण्याला अगोदर पोहचलेल्या मित्राला प्रा.डॉ.सुधाकर जाधव, परतुर.जि.जालना यांनाही सोबत घेतले आणि सातारा रोड पकडायचा तर आमच्या ड्रायव्हरनं सोलापूरचा रस्ता पकडला होता. गुगल नकाशा सुरु करुन करुन चिपळूण रस्त्याला लागलो. उंब्रज सोडलं आणि कोकण सुरु झालं याची पुरेपुर खात्री पटत चालली. अरुण इंगवले हा चिपळूणचा कवी म्हणतो-
माझ्या तांबड्या मातीत, आंब्या फणसाच्या वास नमन, जाखडी, दशावतार गोम-संकासूर नाव.
येथे खळाखळत्या नद्या,टच्च फुगलेल्या खाड्या पडाव,गलबत मचवे,कुठे शेलाटश्या होड्या
असं कवितेतील कौतुक वास्तवात दिसायला लागलं. आंबे, पोफळी, साग, नारळ, 2013-01-12-044चिपळूणचो रस्तो अशा दाटीवाटीतून रस्ता चिपळूणला चालला होता. घाट ओलांडत एकदाचे चिपळूणला पोहचलो. चिपळूणला चौकाचौकात परशुरामाच्या भूमीत स्वागत आहे, अशा भाऊ दादांच्या आणि गल्ली बोळातल्या एका दिवसात नेता झालेल्यांचे होर्डींग्ज लक्ष वेधून घेत होते. संमेलन स्थळी पोहचलो तेव्हा सायंकाळचे साडेपाच झालेले होते. वातावरणात प्रचंड दमटपणा वाटत होता. मैदानावर (यशवंतराव चव्हाण नगरीत) धूळही अधिकची दिसत होती. मुख्य व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले, केंद्रीय कृषिमंत्री. मा.श्री. शरद पवार, उषा तांबे, सुनिल तटकरे कौतिकराव ठाले, दादा गोरे, कुंडलिक अतकरे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे विविध पदाधिकारी दिसत होते. अशा या भव्य व्यासपीठावर भव्य स्क्रीनही लावलेला होता. आणि यशवंतराव चव्हाण नगरी साहित्यप्रेमींनी तशी फूलूनच गेली होती. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला पंधरा ते वीस हजार लोक असावेत, असे मला वाटते.

मा.सुनिल तटकरे यांचं स्वागताध्याक्षाचं भाषण चालू होतं. वादापलिकडे जाऊन साहित्यसंमेलनाचा आनंद घ्यावा, असे आग्रहानं नमुद करुन चुकभुल पदरात घ्यावी, असे म्हणून झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या की महामंडळाच्या वतीने चिपळूनच्या साहित्य संमेलनाचा आनंद वाचकांनी, साहित्यप्रेमींनी सामान्य नागरिकांनी याचा घ्यावा म्हणत. विश्व साहित्य संमेलन काही कारणाने घेऊ शकलो नाही, परंतु साहित्य महामंडळाचे विविध उपक्रम चालू आहेत, त्याची माहिती सांगितली. लोक 2013-01-11-007यशवंतराव च्व्हाण नगरी विनाकारण वाद करत असतात अगदी निमंत्रण पत्रिकेत राजकीय नेत्यांची नावं खूप दिसतात इथपासून ते संमेलन उधळून लावू या सर्व गोष्टींचा उहापोह त्यांनी प्रशासकीय पदाधिकारी आणि महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून केला.

अध्यक्षपदाची सूत्रं बहाल करतांना वसंत आबाजी डहाके म्हणाले, साहित्य माणसाला जोडण्याचे काम करते, तोडण्याचे नव्हे. अध्यक्षपदाची सूत्र देणे हा एक भाग असेल परंतु सूत्र म्हणजे बांधिलकी आणि या सामाजिक बांधिलकीचे हस्तांतरण म्हणजे सूत्र बहाल करणे. आणि पुढे साहित्य, साहित्य संमेलने, भाषा, वाचक, अशी सहज मांडणी करत शब्द वापरणे हे जोखमीचे काम आहे त्याचा योग्य वापर केला पाहिजे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभा बद्दल बोलतांना दैनिकांतील पत्रकारांना विधानांचा आणि विषयांचा विपर्यास करण्याची एक वाईट सवय लागली आहे, त्यामुळे समाजात द्वेषाचं वातावरण निर्माण होते, सामाजिक ऐक्याला तडे जातात तेव्हा पत्रकारांनी समाजाला जोडण्याचे काम करावे, असे ते म्हणाले. अतिशय सहजपणे सर्वांना भावेल असे हे भाषण झालं. त्यानंतर ’रत्नप्रभा’ या स्मरणिकेचं प्रकाशन साहित्य संमेलनाचे उद्घाटक कृषिमंत्री मा.श्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मा.श्री शरदपवार यांच्या उद्घाटनीय भाषणाला सुरुवात झाली. राजकारणी आणि साहित्यिक यांचा संबंधाच्या निमित्ताने लेखनात सर्व प्रकारचे लेखन असते तेव्हा साहित्य संमेलनाच्या ठिकाणी राजकीय व्यक्तिच्या उपस्थितीबाबत आक्षेप घेतला जातो तो योग्य नाही. 2013-01-11-014भव्य व्यासपीठ राजकीय लोक साहित्य संमेलनात दिसले तर वाद घातला जातो परंतु राजकारणात साहित्यिक आले तर आम्ही वाद घालत नाहीत असे म्हणून प्र.के अत्रे, ना.धो.महानोर, आणि इतर साहित्यिकांचा दाखला देत विधानसभा-विधानपरिषद गाजवलेल्या दाखला दिला. राजकारणी चूकत असतील तर त्यांना योग्य दिशा साहित्यिकांनी सुचवली पाहिजे. मुख्य व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिल्याने वाद झाला म्हणे परंतु बाळासाहेब एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते, वादग्रस्त असले तरी त्यांची व्यंगचित्रे, पत्रकारिता, हे योगदान विसरता येणार नाही, असा उल्लेख झाल्याबरोबर प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. साहित्य सर्वसमावेशक व्हावे, हे सांगून मराठी साहित्याचा मराठीच्या अधिव्याख्यात्यांना लाजवेल असे त्यांचे भाषण पुढे सरकत गेले. स्त्रियांचे सक्षमीकरण, स्त्रीवाद, आणि यापुढेही अधिकाधिक स्त्रिया संमेलनाच्या व्यासपीठावर दिसाव्यात असेही मत त्यांनी मांडले. मराठी साहित्य आणि त्याचे विषय इतर भाषेत पोहचले पाहिजेत. राष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा, असे लेखन पुढे येत नाही, त्याचा विचार व्हायला हवा. गाव तेथे ग्रंथालय होऊन वाचक समृद्ध व्हावा. त्याचबरोबर वास्तवाचे आकलन करुन लेखकांनी दमदारपणे तो विचार साहित्यातून मांडला पाहिजे अशी भूमिका मांडली. साहित्य लेखन अधिक समाजाभिमुख व्हावं असा विचार मांडून नवीन लेखक, नव्या लेखकांची पुस्तके, कादंबरी, ग्रामीण लेखक, संत साहित्य, आधुनिक साहित्य, भाषा,जागतिकीकरण त्याचा प्रभाव, प्रभावावरचे लेखन-लेखक, 2013-01-11-008उद्घाटन समारंभ असा लांब बसून ऐकला यांची नावे घेत त्यांनी कल्पना दुधाळ यांच्या दोन कविता वाचून आपल्या भाषणाचा समारोप केला. पाच वाजून बत्तीस मिनिटाला सुरु झालेले भाषण सहा वाजून एकविस मिनिटे चालले जवळ-जवळ तासभर. मराठी विषयाच्या प्राध्यापकाप्रमाणे त्यांनी मराठी विषयाचा रसिकांचा तासच घेतला. शेवटी शेवटी रसिक चुळबुळत असल्याचे जाणवले. साहेबांचे भाषण संपल्यावर राकॉचे कार्यकर्ते हळुहळु आपल्या खुर्ची सोडतांनाही दिसले.

एक अवांतर, आठवण होत आहे. कल्पना दुधाळ या एक कवयित्री आहे. ‘सिझर कर म्हणतेय माती’ या काव्यसंग्रहाने प्रकाशझोतात आलेल्या कल्पना दुधाळ या पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बोरीभडक या गावातील रहिवासी असून त्या स्वत: शेती करतात. शेतीची सर्व कामे करतात, म्हणजे शेतकरीच. पण, कविता अतिशय सुंदर आहेत. अशा या कवयित्री औरंगाबादला मसापच्या कार्यक्रमाला आपल्या कुटुंबासहित हजर होत्या. त्यांच्या कवितेवर भाष्य करायला काही समीक्षकांना बोलावलेले होते. समीक्षकांनी या काव्यसंग्रहातील कविता कशा सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोगी एकही कविता नाही, वगैरे मांडले होते आणि या कवयित्रीच्या डोळ्यातून सारखे पाणी वाहात होते . पुढे याच काव्यसंग्रहाने त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत, काल कल्पना दुधाळ यांच्या दोन कविता शरद पवार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठांवरून वाचून दाखवत आहे, हा प्रसंग कवयित्रीला आज किती आनंद देत असेल, हा विचार सारखा येत होता. व्यक्तिगत मलाही त्याचा आनंद वाटत होता. 2013-01-11-039परिसंवादाची तयारी

८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले हे आमचे थेट एम.ए.मराठी प्रथम वर्गाचे शिक्षक. आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत म्हणून असे म्हणत नाही. सर, पुढे कुलगुरुही आमच्या विद्यापीठात झाले. युजीसीच्या 'जागतिकिकरण आणि मराठी साहित्यावर त्याचे परिणाम' या सिसर्च प्रोजेक्टच्या वेळी सर आणि डॉ.यशवंत मनोहर हे मला विषय तज्ञ होते, पुढे हा प्रोजेक्टही मला मिळालाही होता. मिपावर माझ्या काही मित्रांनी मला संशोधनासाठी एक प्रश्नावलीही भरुन दिली होती. असे आमचे गुरुजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांना आनंद होणारच, नाही का...!

2013-01-11-038व्यासपीठासमोरील रांगोळी सरांचे अध्यक्षीय भाषण सुरु झाले ''अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्याचा आणि भाषेचा सर्वोच्च सोहळा आहे. साहित्यासाठी दर वर्षी अतिशय निष्ठेने संमेलनाला पदरमोड करुन ह्जारो रसिक येतात. इथे झडणा-या चर्चांमधे सहभागी होतात, ही अचंबित करणारी घटना आहे. मराठी साहित्य आणि भाषेबद्दलचे प्रेम जागविणारी गोष्ट आहे. या व्यासपीठावरुन साहित्याबदल काही चिंतन व्हावे, मराठी भाषा आणि साहित्य यांना अस्वस्थ करणाया प्रश्नांची चर्चा व्हावी, जमल्यास त्यातून मार्ग निघावा, निदान त्या दिशेने काही वाटचाल व्हावी, अशी रसिक जनांची अपेक्षा असते. अशा वेगवेगळ्या अपेक्षा घेऊन अवतरणारे हे संमेलन या वर्षी चिपळूण येथे लो. टिळक स्मारक मंदिर या ग्रंथालयाच्या वतीने होत आहे. मला तर येथील निसर्गसंपन्नतेने भारावून टाकलेले आहे. मी मराठवाड्यातून आलेलो आहे. माझ्या प्रदेशाचा यासाठी उल्लेख केला की, तेथे वर्षा दोन वर्षांनी दुष्काळ पडतो. पिण्याच्या पाण्याचेही प्रश्न निर्माण झालेले असतात. ज्याला पाणी पहावयास मिळत नाही, समृद्ध निसर्ग पहावयास मिळत नाही त्या माझ्यासारख्या माणसाला आपण स्वर्गात तर नाही ना ? असे वाटले तर नवल नाही.'' 2013-01-11-014कवी संमेलन सर्व कवी मंडळी.

सरांनी आपलेल्या लिहिलेल्या भाषणावरुन नजर हटवली आणि व्यासपीठावरील नेते मंडळीकडे पाहून म्हणाले आमच्या मराठवाड्यात पाणी टंचाई आहे, लक्ष घालावे. पाणीच नसेल तर माणूस बोलण्यासाठी उभा कसा राहील, असे म्हणत दाद मिळवली. माझ्या अठ्ठेचाळीस पानाच्या भाषणावर तिनशे पानांची चर्चा व्हावी, असे म्हणत चिपळूनचे निसर्ग सौंदर्य, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर,कवी कुलगुरु तुकाराम, साहित्य आणि जीवन, म.फुले, म.विठ्ठल रामजी शिंदे, डॉ.आंबेडकर, करंदीकर, सूर्वे, यांच्या साहित्य-समाज जीवनाची चर्चा करत मराठी भाषेचे संवर्धन, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर भाषा विकासाची साधनं आणि माध्यमं, वाचन संस्कृती, आणि काही प्रश्न उपस्थित करुन भाषणाचा समारोप केला.

सरांचे भाषण दमदार झाले असे वाटले नाही, एकतर कारण पवार साहेबांनी घेतलेला वेळ, रसिकांची एकाच जाग्यावर बसण्याची क्यापिसिटी, आणि परस्परविरोधी अघळ-पघळ अशी विधानं यामुळे मांडणीत नेमकेपणा नव्हता असे वाटत होते. अध्यक्षीय भाषणाकडून काही अपेक्षा असतात त्या पूर्ण झाल्या नाहीत, असे जे म्हणल्या जात आहे, ते थोडं पटण्यासारखं वाटलं. पण,एवढं तेवढं चालायचंचं.

उद्घाटनीय कार्यक्रम संपला. हात पाय मोकळे करावेत म्हणून काही चहा-पाणी करुन यावं म्हणून बाहेर पडलो. लगेच निमंत्रितांचं कवीसंम्मेलन सुरु होणार होतं. भव्य मंडपातून बाहेर पडू लागलो आणि अचानक आपल्या कवयत्रि मिपाकर क्रांती सडेकरांची भेट झाली. निमंत्रितांमधे त्यांची कविता आहे, हे मला कार्यक्रमपत्रिकेवरुन कळलेच होते परंतु भेट होईल अशी गर्दीत खात्री नव्हती परंतू भेट झाली आणि मिपाकरांना मिपाकर भेटल्यावर जो आनंद होतो तो मलाही झाला.

2013-01-11-013सन्मानचिन्ह स्वीकारतांना क्रांती सडेकर चहा पाणी घेऊन आलो. उद्घाटनाच्या वेळी पब्लिकमधे लांब बसून कार्यक्रम बघावा आणि ऐकावा लागला होता. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम मला मागे बसून बघायचा लैच कंटाळा. सतत पुढे असलं पाहिजे हा आमचा बाणा. महाविद्यालयाचे ओळखपत्र घरी विसरलो त्यामुळे नोंदणी केली नाही. नियोजन न करता आले की हाल होतात, ते हाल आमचे होणारच होते. मग, पुढे तर बसायचे तेव्हा आमच्यापैकी दोघांना तुम्ही मागून या असे सांगून आमदार, खासदार, आणि विशेष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवेश दारात पोहचलो. साहेबांबरोबर आलेलो आहोत असे पोलिसांना अंदाजपंचे ठोकून कोणा नेत्याच्या पाठीमागे दमदार पावलं टाकत महत्त्वाच्या पाहुण्यांमधे अगदी व्यासपीठासमोरची जागा बळकावली. पण, जिथे बसलो तिथेही मला समाधान वाटेना. तेथून उठलो आणि पत्रकार कक्षाची जागा निवडली. पत्रकारांसाठी असलेलं बिसलरीतलं पाणी आम्हाला मिळालं. अधाशासारखं घटाघटा पाणी पिऊन टाकलं आणि एक बिसलरी सोबतही ठेवली. च्यायला, एवढं करेपर्यंत क्रांतीची सडेकरांची कविता वाचून झालेली होती. ल्यापटॉपवर [उर्ध्वपट] थेट वृत्तांत मिपावर टाकावं तर ल्यापटॉपनं मान टाकली. गाडीच्या डिक्कित असलेल्या ब्यागेत ल्यापटॉपला घाटातून बहुतेक भोवळ आली असावी. ल्यापटॉप चालूच होईना. कवींच्या कविता सुरु झालेल्याच होत्या. 2013-01-11-005छ.शिवाजी महाराज यांची प्रतिकृती

इंद्रजित भालेराव यांच्या अध्यक्षेतेखाली शेख साहेबांची गझल सुरु झालेली होती. शेख साहेब म्हणाले-
''तु मला भेटू नको, नाराज असल्यासारखी
तु अशी वागू नको, प्रेमात नसल्यासारखी''

मला अशी प्रेमाची कविता ऐकायला मिळाली की मी आठवणींनी मोहरुन जातो. माझा मी चालू वर्तमान काळातून भूतकाळाच्या आठवणींवर डहाळीसारखा झुलु लागतो.मला शेख साहेबांची गझल आवडली. गझल संपल्यावर कवींचे सन्मानचिन्ह देऊन इंद्रजित भालेराव यांच्या हस्त सत्कार केल्या जात होता. प्रत्येक कवीला असं कविता वाचून झाल्यावर अशा प्रकारे सन्मानित करण्यात येतं होतं. पर्सनली मला ते काही आवडलं नाही. त्यामुळे काव्यमैफिलिचा बेरंग होत होता. सूत्र संचलन करणारा तर नक्कीच वशिल्याचा तट्टू होता. अतिशय सुमार सूत्रसंचलन या काव्य मैफिलीचं सुरु होतं. संतोश शेरेची कविता 'हम्म' होती.

''मला एक मूलगी दिसते, गच्चीवर,स्टेशनवर, बागेत,
एक मुलगी दिसते, चालतांना, खातांना, कुत्र्याशी खेळतांना
......
मुलगी दिसते सदान कदा सेलवर (मोबाईलवर) ''

बबलु वडारच्या कवितेला मात्र चांगली दाद मिळाली. आपण संगणकावर वावरणा-यांना संगणकीय 2013-01-11-040काव्य कट्ट्यावर कोणाही रसिकाला कविता वाचण्याची संधी होती. शब्दांचे नवल वाटत नाही. तसे अनेकदा अशा कविता डोळ्याखालून गेलेल्या असल्यामुळे लोकांना भावलेली आणि या साहित्य संमेलनाचं एक नवं फाइंडिंग म्हणून या कवीचा उल्लेख केला गेला, तेव्हा लोकांच्या अभिरुचीत आणि आपल्या अभिरुचीत फरक आहे असे मला वाटले. कविता साधारणतः अशी होती-

''आऊटडेटेड झालंय आयुष्य, आणि स्वप्नही डाऊनलोड होत नाही.
.................
घर आतां शांत असते, मोबाईलला रेंज नसल्यासारखे
..........................
फाटली मन साधणारा इंटरनेटवर धागा नाही.
..................................
ही पिढी भलतीच क्यूट कॊंटेक्ट लिष्ट मोठी आणि संवाद झालाय म्यूट''

अशी कविता दाद मिळवून गेली आणि या कवीला वन्स मोअर ची मागणीही झाली आणि त्यांनी ती मोजक्या ओळी म्हणून पूर्णही केली. संजिवनी तळेगावकर आमच्या मराठवाड्यातल्या कवयत्रि. दोन काव्य संग्रह प्रकाशित झाले आहेत. 'काट्यानेच काटा काढता आला असता तर आयुष्यात चालता आले असते' असा एक शेर म्हणून कविता गायला सुरुवात केली. ओ माय गॉड, कविता गायन हा प्रकार कधी जमला नाही तर ते काव्यवाचन कसं फसतं आणि ऐकणा-यांचे कसे हाल होतात, त्याचा हा उत्तम नमुना होता, असे मला वाटते. ही कविता ऐकतांना माझे थोडे हालच झाले. रसिकांनी कविता संपल्यावर दाद दिली. हल्ली दाद कशालाही मिळते, असे वाटून गेले.

योगिराज माने आपल्या बाप माझ्या कवितेत म्हणतो-2013-01-11-035खुल्या गप्पा. अशोक नायगावरकर, रामदास फुटाणे

''किति पुरविले लेकरांचे लाड
सावलीचे झाड बाप माझा.
वरुन कठोर काळजात लोणी
माय-बाप दोनही माझा.
दुष्काळी प्रश्नाला कष्टाचे उत्तर
घामाचे अत्तर बाप माझा.
गरिबीची नाही केली ..........
[च्यायला, इथला शब्द मीच लिहून मलाच तो शब्द आता वाचता येईना]
श्रीमंत मनाचा बाप माझा.
भजनात दंग मुखी हरिनाम
जानकीचा राम बाप माझा.
जन्मभर पंढरीची केली वारी
भोळा वारकरी बाप माझा.
.............................
ईश्वराची छाया बाप माझा.''

मला ही कविता आवडली होती. पण लिहिण्याचा धावपळीत काही शब्द गळाले तर काही गळाला लागले. एक एक ओळ कवींनी पुन्हा पुन्हा म्हणायला हवी. अनिल निगुडकराची 'वृद्धाश्रम' नावाची कविता होती. भोपाळमधून आलेले हे कवी महाराज होते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन कवींच्या कविता निवडून निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले पाहिजे. असा विचार माझ्या मनात आला. 'आज आई-वडीलांना भेटायला जायचे आहे’ अशी 'ट ला ट' परंपरेतील ही कविता होती. एक कविता तर अशी होती आता कवीचं नाव लिहायचं विसरलो. सर्व चिन्ह त्या कवितेत भरलेली होती. जसे-

''काळा पैसा. पूर्णविराम.
बलत्कार, स्वल्पविराम.
फरारी, प्रश्नचिन्ह''

अशी काही तरी कविता होती. वंदना केळेकर यांची 'मायमराठी' विलास कुवलेकर यांची 'माय' आणि नंतर इंद्रजीत भालेराव यांनी आपल्या काही कविता वाचून दाखवल्या. इंद्रजित भालेराव 'आणखी एक' कवितेत म्हणतात दोन ओळी -

''काट्या कुट्याचा तुडवित रस्ता
माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता''

2013-01-11-034निमंत्रण पत्रिका (शिल्लक राहीलेल्या. काही बदलल्या होत्या) आणि गावाकडे शेतीची काय अवस्था आहे, शेतक-याचं जीवन कसं आहे, त्यावर असलेलं ही कविता होती. ती कविता झाल्यानंतर रसिकांकडून 'जलम’ कवितेचा आग्रह झाला. 'जलम' कवितेलाही मी कंटाळलेलो आहे. पण त्याऐवजी त्यांनी दुसरी कविता म्हटली.

''शीक बाबा शिक लढायला शिक
कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक''
............................................
''घेतलेली कर्ज बुडवायला शिक''

अशी एक कविता त्यांनी गायली रसिकांची भरपूर आणि मनापासून दाद या कवितेला मिळालेली दिसली. आता रात्रीचे अकरा वाजत आलेले होते. चहा-पाण्याचा कार्यक्रम करुन आलो तर...मराठी गीत गायनाचा कार्यक्रम सुरु झालेला होता. अतिशय सुरेख असा कार्यक्रम. मंगला खाडिलकर यांचं सुंदर सुत्रसंचलन. सुत्रसंचलनासाठी अभ्यास असावा लागतो, हे शिकवणारं सूत्रसंचलन. रविंद्र साठे, मंदार आपटे, मृदुला-दाढे जोशी यांच्या बहारदार गीत गायनाने अप्रतिम आनंद दिला. एकोनाविसशे तीस पासूनच्या काही सुंदर कविता ज्याचं गाणं झालं आहे, ते ऐकायला मिळालं.

दुसरा दिवस... 2013-01-11-026मराठी गीत गायन

दुसर्‍या दिवशी सकाळी अशोक नायगावकर, रामदास फुटाणे, प्रकाश देशपांडे यांनी खुल्या गप्पांमधून मजा आणली. ''जो पर्यंत अशोक नायगावकरांची कविता आहे तोपर्यंत आकाशात सूर्य तारे फिरत राहतील'' असे म्हणत रसिकांच्या चेह-यावर हसु फुलवले. रामदास फुटाणे वीज भारनियमनाचे ओझे नुसते सामान्य माणसाला नाहीतर विजेच्या खांबानांही आहे, असे म्हणाले. खांब नुसते उभे आहे त्यांचेही एक दु:ख आहे. गळ्यात तारेचे ओझे वागवावे लागते. ''व्याकुळ पोल म्हणाला ती हल्ली कुठे दिसत नाही, लोंबकळत तार म्हणाली, हल्ली तिने नवं घर केलं आहे, इन्व्हर्टर आल्यापासून ती आता कोणाला भेटत नाही” असे म्हणत खुल्या गप्पांमधे रंग भरला.

राजकारण-समाज-आणि साहित्य यावरची रंगलेलेली ही जुगलबंदी खासच झाली. पहिल्यांदाच कार्यक्रम बघणाणा-यांना या गप्पा दिलखुलास हसवतात. ''कविता ही कशी आतून आली पाहिजे, ढेकरही आतून येतो म्हणजे ती कविता होत नाही'' ''माणूस लग्न कशासाठी करतो तर एकमेकांना कामे सांगण्यासाठी, रस्त्यावर भेटलेल्या बाईला आपण काम सांगु का ?'' असे म्हणत नेहमीप्रमाणे मजा आणली. ' हे काय चालले आहे' शीर्षकाच्या कवितेतून स्त्रीया कशा क्रर असतात. स्वयंपाक घरात काम करतांना स्त्रीया भाज्या कापतांना किती क्रुरपणे वागतात त्याची ती मिश्किल कविता.

रामदास फुटाणे यांची 'हिमोग्लोबीन' आणि 'दोन मिनिटे' नावाची कविता अनेकांनी ऐकली असेल. हिमोग्लोबीनच्या ओळी.

दादा म्हणाला-
'वर्गणी काढा'
भाई म्हणाला-
'खंडणी काढा'
डॉक्टर म्हणाले-
'कपडे काढा'
रिपोर्ट म्हणाला-
''हिमोग्लोबिन कुठे आहे ?''
हिमोग्लोबिन हरवल्याची तक्रार घेऊन
मी पोलिस स्टेशनवर गेलो.
तर तिथे एक महात्त्मा उभा
चरखा हरवल्याची तक्रार घेऊन
पोलिस पावती विचारत होते
चरखा खरेदी केल्याची
एक हवालदार जवळ आला
म्हणाला-
हिमोग्लोबिनचा तपास कसा लागेल ?
प्रथम रक्त होतं
हे सिद्ध करावं लागेल.

2013-01-11-017 सरांसोबत सरांचे विद्यार्थी खुल्या गप्पानंतर 'यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि आजचा महाराष्ट्र' या परिसंवादात दीपक पवार, न.म.जोशीसर,शेषराव मोहिते, आणि उल्हासदादा पवार यांनी यशवंतरावांच्या विचारांनी सभामंडप भारावून टाकला. अध्यक्षीय समारोप निशिकांत जोशी यांनी केला. दुपारच्या सत्रात रामदास आठवले, उद्धव ठाकरे, हेही परिसंवादात होते. आम्ही सायंकाळी दोन दिवसांच्या उपस्थितीनंतर काही पुस्तकांची खरेदी केली. अ.भा.साहित्य संमेलनाच्य अध्यक्ष यांची अचानक समोरासमोर भेट झाल्यावर सरांचे अभिनंदन केले. एवढ्या गडबडीतही त्यांच्या चेहर्‍यावर ओळख आहे, असे भाव दिसले. 'अरे वा , औरंगाबादहुन कोण कोण आलं' असं विचारल्यामुळे आमचं येणं सार्थकी लागलं त्याच आनंदात आम्ही औरंगाबादला परत फिरलो.

संस्कृतीकलानाट्यवाङ्मयकवितासाहित्यिकप्रवासविचारप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादमाध्यमवेधमतप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

14 Jan 2013 - 4:51 pm | दादा कोंडके

इतके दिवस नुसत्याच चर्चा आणि बातम्या वाचत होतो. कुणितरी प्रत्यक्ष जाउन केलेलं वार्तांकन वाचलं.
बाकी तुम्हाला श्वार्ट ह्यांड येतं का? मी तिथं जाउन आलो असतो तर मला याच्या निम्मपण लिहिता आलं नसतं. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2013 - 5:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्वॉर्ट ह्यांड येत नाही. पण, भरभर नोट्स काढायची सवय कामाला येते. हं आता भरभर लिहिण्याच्या नादात मला माझेच लिहिलेले शब्द कधीकधी ओळखू येत नाही, तो भाग वेगळा. चिठ्ठ्या-चपाट्या, पावत्या,पॉम्पलेट्स, टोल नाक्याच्या पावत्या, यावर हे सर्व साहित्य संमेलन पार पडले आहे. आपल्यासाठी ते सर्व दस्तऐवज सवडीने आपल्या खरडवहीत डकवेन म्हणतो :)

श्वॉर्ट ह्यांड यायलाच पाहिजे. श्वॉर्ट ह्यांड शिकण्याचा माझा उत्साह अशा वेळी उसळी मारतो.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

15 Jan 2013 - 11:41 pm | दादा कोंडके

हं आता भरभर लिहिण्याच्या नादात मला माझेच लिहिलेले शब्द कधीकधी ओळखू येत नाही, तो भाग वेगळा.

म्हणून मग मी फोनमधलं रेकॉर्डर अ‍ॅप वापरून नंतर सवडीनं लिहून काढतो. पण आजुबाजूच्यांचं फुकाट मनोरंजन होतं. :)

आपल्यासाठी ते सर्व दस्तऐवज सवडीने आपल्या खरडवहीत डकवेन म्हणतो

नक्कीच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2013 - 12:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> म्हणून मग मी फोनमधलं रेकॉर्डर अ‍ॅप वापरून नंतर सवडीनं लिहून काढतो.

फोनमधील रेकॉर्डर वापरून पहिले मराठी विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.गंगाधर पानतावणे यांची मुलाखत मिपावर टाकली होती. सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी मात्र अशी रेकॉर्डिंग करतांना तुम्ही म्हणता तसं पब्लिक आपल्याकडे लै बावळटासारखे पाहात असते. आपल्याला लै संकोचल्यासारखे होते, ही गोष्ट मात्र खरी आहे. मी शक्यतो अशा लोकांकडे दुर्लक्ष करतो.

-दिलीप बिरुटे

समारोपाविषयीही लिहिणार का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2013 - 5:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो. त्यामुळे त्याविषयी माझ्याकडे काहीही माहिती नाही.

-दिलीप बिरुटे

मालोजीराव's picture

14 Jan 2013 - 5:40 pm | मालोजीराव

वादग्रस्त संमेलनाचा साधा सरळ सुंदर वृत्तांत ...सादर केल्याबद्दल धन्यवाद सर

मदनबाण's picture

14 Jan 2013 - 6:09 pm | मदनबाण

वॄतांत आवडला ! :)
बाकी नविन मराठी पिढीसाठी मराठी साहित्य संमेलन = फालतु राजकारण + राजकिय हस्तक्षेप + विनाकारण वादावादी !

मृगनयनी's picture

14 Jan 2013 - 7:56 pm | मृगनयनी

वृत्तान्त छान आहे.... बाकी मदनबाणा'शी सहमत!

फालतू लोकांच्या धमक्यांना घाबरून परशुरामाचे चित्र असलेली निमन्त्रणपत्रिका बदलली नसती.. तर आनन्द वाटला असता. किमान या प्रकाराबद्दल मा. शरद पवार काही बोलले असते( पक्षी: उघडपणे या प्रकाराची दखल घेतली असती..) तर बरे वाटले असते..

असो. सर्व जाती-जमातीतील हजारो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवान परशुरामाचे चित्र सम्मेलनाच्या तिसर्‍या दिवशी ग्रामस्थांनी पुन्हा सन्मानपूर्वक स्टेजवर आणले.. त्याबद्दल अभिनन्दन!!!!

मला वाटते की निमंत्रण पत्रिका बदलली गेली नाही. समारोपाची भाषणे ऐकली त्यावरुन मला असे वाटले. संयोजक श्री. जोशी आणि संमेलनाध्यक्ष श्री. कोतापल्ले ह्या दोघांची भाषणे दूरदर्शनकृपेने ऐकली आणि दोघांनीही सडेतोड भाषणे केली ह्याबद्दल दोघांचेही मनापासून अभिनंदन!

मला वाटते की निमंत्रण पत्रिका बदलली गेली नाही.

यशोधरा ताई...दूरदर्शनव्यतिरिक्त इतर सर्व मराठी चॅनेलवरती भगवान परशुरामाचे चित्र, त्यांच्या परशुला दिलेले लेखणीचे स्वरूप आणि त्याबद्दल सम्भाजी ब्रिगेड' या एका अतिरेकी सन्घटनेने सम्मेलन उधळण्याची दिलेली धमकी..आणि केलेले आन्दोलन ...या सर्व गोष्टी वारंवार दाखवण्यात होत्या.
सम्मेलनाच्या आधी १ दिवस ही निमन्त्रणपत्रिका बदलून भगवा झेन्डा असलेली नवीन निमंत्रण पत्रिका छापली गेली. व त्यानन्तर सं.ब्रि. ने आपले आन्दोलन मागे घेतले.
सर्व वृत्तपत्रांमध्ये देखील ही बातमी प्रसारित झालेली होती.

असो!.. यशोधरा ताई.... फक्त दूरदर्शनवर विसम्बून नका हो रहात जाऊ !!!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2013 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

परशुरामा बघतोयस ना...! माझ्या धाग्यावर काय चाललंय ते....! :)

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

16 Jan 2013 - 12:56 am | धन्या

चिरंजीव आहे परशूराम. :)

विटेकर's picture

14 Jan 2013 - 6:17 pm | विटेकर

खरे म्हणजे इतके आनि इतकेच चर्वित चर्वण व्हावे .. तरच मजा आहे ..रतिब घातला की कंटाळा येतो.
बिरुटे सर .. धन्स !

प्रत्यक्षदर्शी वार्तांकन आवडेश!

पैसा's picture

14 Jan 2013 - 8:20 pm | पैसा

वार्तांकनासाठी धन्यवाद! तुमच्या लॅपटॉपने राम म्हटला नसता तर अजून मजा आली असती!

क्रांतीचे अभिनंदन! (तिचे फोटो फेसबुकावर उपलब्ध आहेत.)

यशोधरा's picture

16 Jan 2013 - 4:34 pm | यशोधरा

राम की परशुराम? :D

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2013 - 12:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसादासाठी जागा राखून ठेवतो.... :)

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

17 Jan 2013 - 5:44 pm | यशोधरा

वक्के :)

पैसा's picture

17 Jan 2013 - 7:05 pm | पैसा

परशुरामा, बघतोयस ना! :D

बघून बघून वैतागून परशूला धार लावायलाही घेतली असेल! ;)

५० फक्त's picture

15 Jan 2013 - 10:17 pm | ५० फक्त

मस्त झालंय ओ सर वृत्तांकन, धन्यवाद.

वर्तमानपत्रातून साहित्यबाह्य वादांशिवाय इतर बातम्याच नव्हत्या.
तुमच्या प्रत्यक्षदर्शी वृत्तांतामुळे संमेलनातील साहित्याविषयीच्याही घडामोडी समजल्या.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

16 Jan 2013 - 12:16 am | निनाद मुक्काम प...

वृत्तांत आवडला ,
कोणतही वृत्तपत्रात ह्या विषयी ह्याहून सकस सशक्त वृत्तात वाचायला मिळायचे आठवत हे आवर्जून सांगतो.

धन्या's picture

16 Jan 2013 - 12:55 am | धन्या

मस्त लिहिला आहे वृत्तांत सर.

कुंदन's picture

16 Jan 2013 - 1:05 am | कुंदन

बिरुटे सर ,
वृत्तांत आवडला हो.

पिवळा डांबिस's picture

16 Jan 2013 - 2:07 am | पिवळा डांबिस

वृत्तांत आवडला हो प्राडॉ!
संमेलन आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल धन्यवाद!

नंदन's picture

16 Jan 2013 - 5:43 am | नंदन

वृत्तांत आवडला हो प्राडॉ!
संमेलन आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्द्ल धन्यवाद!

असेच म्हणतो.

आशु जोग's picture

16 Jan 2013 - 2:41 am | आशु जोग

आता स्पष्टच विचारतो
अध्यक्ष कोतापल्ले कसे वाटले, कितपत प्रभावी ?

आणि एक खाजगी प्रश्न (हळू आवाजात)
असे साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला तुम्हा प्रा लोकांना कॉलेज आर्थिक पाठबळ पुरवते का !

तुमचा वृत्तांत तुमचे लिखाण चांगले वाटले

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2013 - 12:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> अध्यक्ष कोतापल्ले कसे वाटले, कितपत प्रभावी ?
कोणाच्या तुलनेत ? प्रभावी वाटण्यासाठी कोणाशी तरी तुलना करावी लागेल....!
बाकी, व्यक्तिमत्त्व-लेखन-अध्यक्षीय भाषण याबाबतीत प्रत्येकाचं आपलं एक मोजमाप आहे, त्यावरुन असलेला प्रभावाबद्दल व्यक्तिसापेक्ष अशी चर्चा करता येईल असे वाटते.

>>>असे साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला तुम्हा प्रा लोकांना कॉलेज आर्थिक पाठबळ पुरवते का

अगं माय गं....काय छातीत कळ आनणारा विषय काढला. साहित्य विषयक कार्यक्रम कव्हर करायला महाविद्यालय कोणतेही आर्थिक पाठबळ देत नाही. अशा कार्यक्रमात साहित्य आणि भाषेविषयीच्या प्राध्यापकांनी सहभाग घेतला पाहिजे,अशी अपेक्षा असते. यात जवळ जवळ हौसेचा भाग जास्तच असतो. दुसरा मुद्दा असा की असा काही फंड सहभागी होण्यासाठी असतो का, तर असतो. विद्यापीठ अनुदान आयोग प्राध्यापकांनी आपलं ज्ञान अद्यावत करण्यासाठी विविध चर्चासत्रात, विभागीय, राष्ट्रीय आंतरराष्टीय,अशी जी काही स्थळं असतील तिथे प्राध्यापकांनी सहभाग घेतला पाहिजे त्यासाठी काही अनुदानही देत असते. महाविद्यालयाच्या जवळ जवळ 'मनावर' असतं की हे अनुदान प्राध्यापकांना द्यायचं किंवा नाही. काही महाविद्यालये असा फंड देत असते, काही देत नाही. प्राध्यापकांना सहभागी होण्यासाठीचे शुल्क, राहण्याची व्यवस्था, जेवण-खावण यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे. मला अशी कोणतीही मदत मिळाली नाही. मी तसा अर्ज-बिर्जही केला नव्हता.

-दिलीप बिरुटे

स्पंदना's picture

16 Jan 2013 - 3:46 am | स्पंदना

तासभर शरद पवार साहित्यावर बोलले? तसा माणुस हुषार आहे, पण त्यान आमचा गळा कापल्याने(आमचा म्हणजे शेतकर्‍यांचा) थोडा राग आहे त्याच्याबद्दल. असो.

साराच वृतांत आवडला. अगदी रोख ठोक जस होत तस मांडणी आवडली.

चौकटराजा's picture

16 Jan 2013 - 7:04 am | चौकटराजा

तर आमच्या ड्रायव्हरनं सोलापूरचा रस्ता पकडला होता.
आ. म.- काही फारसे बिघडले नसते. सोलापूरला अभिजित मी नाही यांच्याकडे मस्त पाहुणचार झाला असता. थोडेफार फोटोशोप शिकता आले असते. सरावाने त्यावरही पुढे पेचडी करता आली असती व प्रा डो. च्या जागी प्रा. डॉ स्क्वेअर अशी एक्पोनंट पदवी आली असती.

राजकीय लोक साहित्य संमेलनात दिसले तर वाद घातला जातो परंतु राजकारणात साहित्यिक आले तर आम्ही वाद घालत नाहीत
आ.म. - दोन तीन उधारनं दिली म्हणजी झालं का काय ? राजकारण्यांची घुसखोरी मोजा नि साहित्येकांची मंग ड्येबिट ब्यालन्स कुटं येतो बघा !

शेख साहेब म्हणाले-
''तु मला भेटू नको, नाराज असल्यासारखी
तु अशी वागू नको, प्रेमात नसल्यासारखी
''

आमची चौकशी- हे एके शेख मुंबईचे तर नव्हेत ? असतील तर बातच नाही. आस्वाद व प्रतिभा यांचा कोणताही मजहब असत नाही असे मी त्याना म्हणालो होतो.

अगदी व्यासपीठासमोरची जागा बळकावली. पण, जिथे बसलो तिथेही मला समाधान वाटेना. तेथून उठलो
आ. म. क्या बात है प्रा डा साहेब ! आता पुढची स्वारी दिल्लीवर ! अहो , मन्मोहन यांची गच्छंती नक्की आहे व भाजप कडे नेताच नाही. पहा अशी संधी वारंवार येत नाही. पावर साहेबांची काही हरकत नसणारच साहित्यिकांच्या घुसखोरीला ! कसं ?

आपला वात्रट चौ रा .

श्रीरंग_जोशी's picture

16 Jan 2013 - 8:30 am | श्रीरंग_जोशी

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा हा लेखाजोखा वाचून व छायाचित्रे बघून प्रत्यक्ष संमेलनाला हजेरी लावल्यासारखे वाटले. याबद्दल दिलीपरावांना कितीही धन्यवाद दिले तरी कमीच.

कौतिकरावांचे नाव वाचूनही बरे वाटले कारण गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांचे नाव साहित्य संमेलनांशी संबंधीत बातम्यांमध्ये येतच नव्हते. खरंच चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते.

अवांतर - यशवंत मनोहर यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले आहे हे वाचून आनंद जाहला.

रुमानी's picture

16 Jan 2013 - 10:09 am | रुमानी

सर ,मस्त ........!
पांगलेला वृत्तांताची गोळा-बेरीज फोटोसहित अतिशय अचुक जमलीये.
वृत्तांत आवडला .

चिरोटा's picture

16 Jan 2013 - 11:10 am | चिरोटा

वृत्तांत आवडला.

विसुनाना's picture

16 Jan 2013 - 12:07 pm | विसुनाना

साहित्य संमेलनाचा वृत्तान्त आवडला.'ऑंखो देखा हाल' म्हणजे डोळ्यांनी पाहिलेले हाल असे लहानपणी (रेडिओवर कॉमँटरी ऐकत असताना) वाटत असल्याने यालाही तसेच म्हणावे की नको? ;)
थोड्या काड्या घालतो-
१. संमेलनाचे 'ठाकरे व्यासपीठ' चीनच्या लाल रंगात रंगल्यासारखे दिसत आहे. मागे कुठे सोनेरी ड्रॅगन दिसतो का ते पाहिले पाहिजे.
२. 'मराठी साहित्याच्यामराठीच्या अधिव्याख्यात्यांना लाजवेल असे त्यांचे(साहेबांचे) भाषण'(!) - बिरुटे सर, तुम्हीसुद्धा!?
३. 'समीक्षकांनी या (कल्पना दुधाळ यांच्या) काव्यसंग्रहातील कविता कशा सुमार दर्जाच्या आहेत, दखल घेण्याजोगी एकही कविता नाही, वगैरे मांडले होते...पुढे याच काव्यसंग्रहाने त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार, कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत' ----- पुढे तुम्हीच म्हणता'हल्ली दाद कशालाही मिळते' ;)

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Jan 2013 - 5:30 pm | भीमाईचा पिपळ्या.

धन्यवाद्!डॉसाहेब. साहित्यसंमेलनाला हजेरी लाउन आम्हाला एक संतुलीत रिपोर्ट वाचायला दिल्याबद्दल.
मा. शरद पवार साहेबांचे ह्या संमेलनातले भाषण म्हणजे एक अविस्मरनीय पर्वणी होती.
सविस्तर सवड काढून लिहतो....

दादा कोंडके's picture

17 Jan 2013 - 5:51 pm | दादा कोंडके

वाट बघतोय.

ताकः प्रतिसाद माझ्या खवतसुद्धा पेस्टाल का? नै म्हणजे उडाला तर रेफरन्ससाठी बरा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Jan 2013 - 6:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मा. शरद पवार साहेबांचे ह्या संमेलनातले भाषण म्हणजे एक अविस्मरनीय पर्वणी होती. सविस्तर सवड काढून लिहतो....

उपरोध लक्षात आलाय, तरीही आपल्या लेखनाची वाट पाहतो.

-दिलीप बिरुटे

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Jan 2013 - 9:44 pm | भीमाईचा पिपळ्या.

उपरोध लक्षात आलाय, तरीही आपल्या लेखनाची वाट पाहतो.

उपरोध नाही. खरे आहे तेच म्हणतोय.

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Jan 2013 - 10:01 pm | भीमाईचा पिपळ्या.

उपरोध लक्षात आलाय, तरीही आपल्या लेखनाची वाट पाहतो.

उपरोध नाही. खरे आहे तेच म्हणतोय.

>>> उपरोध नाही. खरे आहे तेच म्हणतोय.
बरं.....!

आणि स्वाक्षरीही वाचली आहे.

-दिलीप बिरुटे

भीमाईचा पिपळ्या.'s picture

17 Jan 2013 - 10:32 pm | भीमाईचा पिपळ्या.

आणि स्वाक्षरीही वाचली आहे.

स्वा. बद्दल खुलासा
माझा दि १२/१२/२०१२ रोजीचा मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तचा लेखाला कात्री लावण्यात आली होती. त्यांतरच्या लेखालाही कात्री लावण्यात आली होती. त्यासंदर्भात ही स्वाक्षरी आहे. डॉ.साहेब तुमच्याकडे रोख नव्हता.
खुलासा संपला.
मा. साहेबांच्या भाषणाबद्दल सविस्तर सवडीने...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2013 - 7:22 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपला रोख माझ्याकडे नव्हता, धन्स पण सं.जवाबदारीही आहे 'रोखाबद्दल' थोडं खरडतो. आपला जाणता राजाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हा धागा अप्रकाशित विभागात पाहिला. ''आज दि १२/१२/२०१२ रोजी मा. शरद पवार साहेबांचा ७२ वा वाढदिवस आहे. साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. साहेबांना दीर्घायुष्य लाभो हीच आई भवानीच्या चरणी प्रार्थना'' हा नुसत्या दोन ओळींचा लेख कसा होऊ शकतो बरं ? अहो, आपल्या 'जाणत्या राजाबद्दल' खणखणीत लेख आला पाहिजे. संपादक दोन ओळींचा धागा, चार ओळींचा धागा अप्रकाशित करतात. कधी एखादे दोन धागे सुटलेही असतील. महापुरुषांच्या जयंत्या,मयंत्या, श्रद्धांजली, विशेष क्षेत्रातील मान्यवरांचे वाढदिवस, वगैरेंसाठी दोन ओळींपेक्षा उत्तमातला उत्तम लेख लिहून त्या लेखनाबरोबर त्या व्यक्तिचे अधिकाधिक कर्तृत्व, माहिती, वाचकांपर्यंत पोहचली पाहिजे, असं लेखन असलं पाहिजे. असं व्यक्तिगत मला वाटतं. बाकी, आपली स्वाक्षरी व्यक्तिगत मला अजिबात पटली नाही. आपण मला जिवाभावाचे वाटले म्हणून आपल्या आणि मिपाप्रेमापोटी हा खुलासा.

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

17 Jan 2013 - 7:02 pm | नाना चेंगट

अरे वा ! लिहिता येतं की तुम्हाला ! उगा नाटकं करत असता !!
आवडला वृत्तांत.

अध्यक्षीय भाषण सुमार होते.

विकास's picture

17 Jan 2013 - 10:17 pm | विकास

सविस्तर वृत्तांताबद्दल आभार! कल्पना दुधाळांचा किस्सा भावला. टिकाकारांना भाष्य विचारायची गरज असते का हा मला पडलेला प्रश्न आहे. क्रांतीताईंच्या कविता (जर येथे नवीन असतील तर) त्यांनी येथे टाकाव्यात ही विनंती!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2013 - 7:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तिची विरामचिन्हं

नेहमीच
तिच्या बोलक्या डोळ्यांत उद्गारचिन्हं
भाव भिन्न भिन्न
नवलाई, आनंद, कौतूक, खट्याळपणा
भीती, वेदना, त्रागा, खेद, विषाद
सगळं काही उच्चाराविना उद्गारणारी
उद्गारचिन्हं !!!

तिच्या बंद ओठांवरच्या अवतरणचिन्हांत
कायमच वसलेलं गूढसं मौन
आणि तिचे शब्द त्या भक्कम कवाडाच्या आत अडकलेले
जन्मठेपेचे कैदी
" "

चुकून एखादा शब्द ओठांबाहेर आलाच
तर त्याच्यापुढे अपरिहार्यपणे धावणारं
अपसरणचिन्ह ...................................
तिचं अपुरेपण सिद्ध करायला सिद्ध............

अर्ध ; स्वल्प , अपूर्ण :
विरामांना तिच्या आयुष्यात स्थानच नाही
हवाय कशाला तिला विराम?
विरेल तेव्हा पाहू ; , :

हो, पूर्णविराम मात्र आहे
भाळावरच्या गोंदणटिकलीत.
'बस, सगळं संपलं इथे, सुरू होण्याआधीच.'
ही नियतीच्या लेखाची इतिश्री दाखवणारा पूर्णविराम.

संयोगचिन्हं -
तिला ठाउकच नाहीत
संयोग नामक काही संकल्पना अस्तित्वात तरी आहे?
यदाकदाचित असलीच, तर भ्रामक असावी - बहुधा नसावीच.

आता उरलं काय?
अरे हो, प्रश्नचिन्ह राहिलंच ना ...........
ते तर तिच्या पाचवीच्याही बरंच आधी पुजलेलं
थेट तिच्या गर्भातल्या अस्तित्वापासून
तिची सोबत करणारं
खरंय की नाही?????????????

विकास's picture

18 Jan 2013 - 10:35 am | विकास

आता वृतांत परीपूर्ण झाला. :-)

क्रान्ति's picture

17 Jan 2013 - 11:07 pm | क्रान्ति

अगदी परिपुर्ण झाला आहे वृत्तांत. 'आमच्या रेषा बोलतात भाषा' हा परिसंवाद सुद्धा चांगला झाला.

मृत्युन्जय's picture

18 Jan 2013 - 12:49 pm | मृत्युन्जय

चांगला वृत्तांत आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2013 - 10:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल कल्पना दुधाळांचा फोन आला होता. मिसळपाववरील साहित्य संमेलनाचा वृत्तांत आवडला म्हणाल्या. मुंबईचे मिपाकर वाचक (नाव विसरलो) त्यांनी वृत्तांताबद्दल त्यांना सांगितलं. मस्त गप्पा झाल्या. अतिशय साधेपणा-सहजपणा बोलण्यात होता. 'कवितेच्या कोणत्याही मानदंडाची मला ओळख नाही, मी आपलं लिहित जाते' असं त्या म्हणाल्या. औरंगाबादचीही आठवण झाली. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन जेव्हा त्यांच्या कवितेचे वाचन चाललेलं तेव्हा कोणी तरी त्यांना सांगितलं, टीव्ही लावला तेव्हा दुसरी कविता वाचन सुरु होतं, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय आनंद झाला. आम्ही वाचक आपल्या पाठीशी आहोत उत्तमोत्तम लिहिण्यासाठी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छाही दिल्या.

इंटरनेटाशी त्यांची तितकीशी ओळख नाही. प्रयत्न करत आहेत, शिकताहेत. ब्लॉग लिहा. सार्वजनिक संकेतस्थळावर लिहा, असेही म्हणालो पण त्यांना या जगात वावरायला कितपत आवडेल आत्ता तरी मला ते माहिती नाही.

मुंबईच्या मिपाकर वाचकमित्राचे मनःपूर्वक आभार. आपल्यामुळे मला कवयित्री शी गप्पा करता आल्या. धन्स.

-दिलीप बिरुटे

-