बर्याचवेळा त्याने अगदी ठळक चुका केल्याही आहेत पण फार क्वचित. चीनला जाताना त्याने क्वाला (आता म्यानमारमधे) नावाच्या बंदराचे वर्णन केले आहे. इथे हत्ती खूपच संख्येने आहेत. ते त्यावरुन सफर करतात आणि त्यांच्याकडून काम करुन घेतात. चीनमधे पण असेच आहे हे चूक आहे, हे इब्न बतूतला कळायला पाहिजे होते.चीनची इतर वर्णने मात्र बरोबर आणि मनोरंजक आहेत. चीनमधील कागदी चलनाविषयी तो आश्चर्याने लिहितो "जर बाजारात कोणी चांदीचा दीनार किंवा दिर्हाम घेऊन गेला, तर तो स्विकारला जात नाही. त्याचे बालिश्तमधे (कागदी चलन) रुपांतर करुन ते वापरावे लागतात." चीनीमातीची उत्कृष्ट भांडी हिंदुस्थानातील मातीच्या भांड्यांपेक्षा स्वस्त मिळत होती असे त्याने नमूद केले आहे. सगळ्यात चांगली भांडी ही सिन्-कलान येथून यायची. त्यावरुन त्या मातीचे नाव केओलीन असे पडले आहे.
"चीनी लोक चित्रे काढण्यात फार पटाईत आहेत. मी जेव्हा जेव्हा एखाद्या गावात परतत असे तेव्हा तेव्हा माझी आणि माझ्या सहकार्यांची चित्रे बाजारात सर्रास लावलेली दिसायची. मला असे सांगण्यात आले की हे सुलतानाच्या आज्ञेने केले गेले आहे. आम्ही जेव्हा राजवाड्यात गेलो होतो तेव्हा चित्रकाराला बोलावून आमची चित्रे गुपचुपपणे काढण्यात आली होती. जर त्या माणसांनी काही गुन्हा केला तर ही चित्रे दूरदूरवर पाठवली जायची. मग त्याच्या शोधात या चित्रांचा उपयोग केला जायचा. नवीन माणसांच्या बाबतीत तर हे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी केलेच जायचे. त्या चित्रात (आणि जर तो गुन्हेगार असला तर) असलेल्या माणसाशी साम्य असले तरी त्या माणसांना पकडले जायचे आणि त्याची चौकशी केली जायची."
त्याने चीनी लोकांवर टीकाही केली आहे. गलबतं तपासायच्यावेळी ते कसा त्रास देत हे सांगताना तो म्हणतो –
"ते गलबताच्या कप्तानाला त्यांच्या गलबतावर काय काय आहे याची यादी जाहीर करायला सांगत. ते झाल्यावर मग सगळ्यांना गलबतावरुन खाली उतरायला सांगत. त्या यादीखेरीज जर दुसरे काही गलबतावर आढळले तर जहाज आणि त्यावरचे सर्व सामान जप्त करुन सरकारजमा करण्यात येई. या प्रकारची सरकारी लूट मी कुठेच बघितली नाही."
पण एकंदरीत इब्न बतूत चीनवर खूष होता असे म्हटले तरी चालेल. जरी चीनी कलाकौशल्यात फार पुढे होते, आणि ते निर्दोषपणे करण्यात त्यांचा हातखंडा होता, जरी चीन प्रवासासाठी सगळ्यात सुरक्षित होता, तरी त्याची नाराजी या शब्दात प्रकट झाली आहे.
"चीन, कितीही भव्य असला तरी मला काही आवडला नाही.....
मी माझ्या राहत्या घरातून बाहेर पडल्यावर माझ्या दृष्टीस इतक्या भयंकर गोष्टी पडायच्या की मी घराबाहेर पडायचेच बंद केले. पण कोणी मुसलमान दिसला की मात्र मला कोणीतरी घरचेच भेटल्याचा आनंद व्हायचा."
एक वर्षाच्या आतच, खरे महिने किती माहीत नाही, एका बंडामुळे त्याला तेथील गाशा गुंडाळायला आयतेच कारण मिळाले. हिंदुस्थानला जाणार्या एका मित्राच्या गलबतावर तो चढला आणि हिंदुस्थानला निघाला. अर्थात त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की त्याला घरी जायला मिळणार आहे.
"माझ्या मातृभूमीच्या आठवणीने माझे मन व्याकूळ झाले. माझ्या मित्रमंडळीचे प्रेम, देशप्रेम या सगळ्यांनी माझे मन व्यापून टाकले......(१३४९ च्या वसंतऋतूत) मी एका छोट्या कुरकुर्यात बसून ट्युनिशीयाला निघालो.....मी टाझाला पोहोचलो तेथे मला कळले की माझ्या आईचा प्लेगने मृत्यू झाला आहे.....परमेश्वर तिच्या मृतात्म्याला शांती देवो. मी मग टॅंजिएला जाऊन तिच्या थडग्याचे दर्शन घेतले. इब्न बतूत यावेळी ४५ वर्षाचा होता आणि जरी २५ वर्षांनंतर प्रथमच त्याच्या गावी होता तरी तो तेथे थांबला नाही. तो लगेचच जिहादसाठी स्पेनला गेला."
हिंदुस्थानला पोहोचल्यावर त्याला भेटला तो फक्त त्याचा भूतकाळ ! "मला दिल्लीला जायचे होते पण मी ते धाडस नाही करु शकलो" मग त्याने सरळ ओमानला जाणारे गलबत पकडले.
यानंतर बहुदा इब्न बतूतला जुझ्झीला ते सगळे परत सांगायचा कंटाळा आला असावा किंवा कहाणी संपत आल्यावर जसा एक प्रकारचा अलिप्तपणा येओ तसा त्याला आला असावा. कारण चीन-बगदाद-दमास्कस-कैरो-मक्का (चौथ्यावेळी हाज) हे वर्णन त्याने फार थोड्या पानात उरकले आहे.
याच थोड्या पानात रिहालामधील काही अंगावर काटा आणणारी भयंकर वर्णने आहेत.(भारतात स्वाईन फ्ल्यूने २७ माणसे मेल्यावर जो गोंधळ माजला त्याच्या पार्श्वभूमीवर तेव्हा काय झाले असेल याची कल्पना येते.) तो काळ अलेप्पीतील १३४८ च्या वसंत ऋतूचा शेवट होता. तेथे त्याला गाझामधे प्लेगची लागण झाली आहे ही बातमी कळली आणि दररोज १००० माणसे मरत होती.प्लेगची तीव्रता ही रोज किती माणसे मरत होती यावर मोजली जाण्याचे ते दिवस होते. त्या प्लेगचे ऑंखो देखा हाल त्याच्या शब्दात –
"मी हॉर्नला पोहोचलो त्याच दिवशी तेथे ३०० माणसे मेली.....मी दमास्कसला गेलो तेथे दर दिवशी २४०० माणसे मरत होती......मग मी गाझाला गेलो तर ते गाव ओसाड पडले होते......माणसांनी गाव सोडले म्हणून......तेथील क्वादीने मला सांगितले ८० क्वादींपैकी आता फक्त २० एक शिल्लक असतील....तेथे रोज ११०० माणसे मरत होती......मग मी कैरोला गेलो.....तेथे मला सांगण्यात आले रोज २१००० माणसे मरत आहेत. मला जेवढे शेख माहीत होते ते सर्व मरण पावले होते. परमेश्र्वर त्यांच्या मृतात्म्याला शांती देवो."
जिहादमधे परत एकदा इब्न बतूत वाचला. त्याची पलटण ख्रिश्र्चनांच्या तावडीत सापडली पण त्यातून सुटून तो ग्रॅनॅडामधे येऊन पोहोचला. त्यावेळी त्या राष्ट्राची स्वत:चे राजकीय आणि सांस्कृतिक अस्तित्व वाचविण्याची धडपड चालू होती. त्याचा राजा युसूफ पहिला. याने मोठमोठ्या कमानी बांधायला घेतल्या होत्या. इब्न बतूत त्या राजाला कसलातरी आजार असल्यामुळे भेटला नाही. "पण त्याच्या आईने मला काही सोन्याचे दीनार पाठवले ज्याचा मी चांगल्या कामासाठी उपयोग केला.
हे वर्णन त्याने ज्या मूठभर शहरांना भेट दिली त्याचे आहे. ती साथ त्यावेळी युरोपमधेही पसरली होती. चीनमधे या साथीला रोखण्याचे काहीच प्रयत्न केले गेले नाहीत. चीनमधे प्लेग हा आयात केलेल्या धान्यांमधून पसरला. माणसे अचानक मोठ्या प्रमाणावर मरायला लागल्यावर हा देवाचा कोप आहे आणि त्यामुळे युआन राजवट कोसळणार असे भाकीत केले जाऊ लागले. अर्थात ती कोसळली, पण १४ वर्षानंतर.
दमास्कसमधे त्याला त्याच्या १२ वर्षापूर्वी त्याने ज्याला जन्म दिला होता त्याच्या मृत्यूची बातमी कळली. १५ वर्षांपूर्वीच त्याचे वडील पण वारले होते. त्याचवेळी त्याला कळले की त्याची आई मात्र जिवंत होती. तिला भेटायचा त्याने निश्चय केला पण त्याने अगोदर त्याची चौथी हाजयात्रा पूर्ण करायची ठरवली. मक्केमधे त्याने तीन महिने काढले त्याबद्दल त्याच्याकडे बहुदा विशेष काही नसावे. कैरोच्या सुलतानाची (मामुल्क सुलतान अल् नासीर मुहम्मद क्वालाऊन जो त्याच्या बांध्कामासाठी प्रसिध्द होता) नऊ वर्षापूर्वीच एका बंडात हकालपट्टी झाली होती आणि नव्या राजवटीत सगळ्या प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे कोसळल्या होत्या.
दूर पश्चिमेला इफ्रिक्वीयाच्या जमातींनी परत एकदा ट्युनिसला वेढा घातला होता. त्या प्रदेशातील ताकदवान सुलतान अबू अल् हसनने मध्य माघ्रीबवर ताबा मिळवला आणि जिब्राल्टरवर सैन्य पाठवले. त्यात मिळालेल्या विजयानंतर त्याने स्पेनवर स्वारी केली आणि ख्रिश्चन नाईट्सना कास्टिलमधून हुसकावण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याचा दारुण पराभव झाला आणि त्याचे सर्व सैन्य रिओ सलाडोच्या युध्दात नष्ट झाले. त्याबरोबरच इस्लामचे पश्चिम-दक्षिण स्पेन आणि पोर्तुगालमधील अस्तित्व जवळ जवळ संपल्यातच जमा झाले.
इब्न बतूत त्याच्या या सर्व यशाबद्दल विशेष काही लिहीत नाही पण त्याच्या मनात अभिमानाची भावना निश्चितच असणार. त्याच भावनेने त्याला आता त्याच्या आईला भेटायची उत्सुकता लागली होती. पण दुर्दैवाने टाझामधेच त्याला त्याच्या आईच्या मृत्यूची बातमी कळली. ज्या प्लेगमधून तो सुटला त्यानेच त्याच्या आईचा बळी घेतला होता.
आता त्याला घराचे वेध लागले होते........................
भाग १० समाप्त
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू................
प्रतिक्रिया
11 Oct 2010 - 7:41 pm | विलासराव
प्रवास केला या इब्न बतुताने.
इब्नचे प्रवासवर्णन आवडले.
11 Oct 2010 - 11:30 pm | प्राजु
छान आहे..