गुंतण
आणि अचानक तो बिलोरी आरसा हाती लागला
पुरातन पण जादुई, अगदी परीकथेतल्या सारखा
यौवनाच्या मंतरलेल्या दिवसात स्वप्नात भेटलेला
आज माझ्या हातात हसत अलगद विसावलेला
थरथरत्या हातानी, साशंक मनानी समोर धरला
आणि माझच एक आगळं रूपडं आलं भेटीला
अगदी नितळ, प्रफुल्लित, अन् आकंठ तृप्तता
धडधडत्या उराशी त्याला गच्च कवटाळला
हळूहळू त्यावरही काळाची काळी पुट चढू लागली
तर पारा उडू नये म्हणून इकडे माझी वेडी काळजी
त्यातल्या रुपड्यात कुठेशी उदासीची छटा दिसली
तर माझीच नजर अंधूक, अशी समजूत काढली