पूर्वेच्या समुद्रात - १८

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 8:26 pm

पूर्वेच्या समुद्रात - १७
अधिक समानता
विशाखापटणमच्या कल्याणी या रुग्णालयात काम करीत असताना एक दिवस आर्मीचा सुभेदार सोनोग्राफीसाठी आला होता. त्याला(रुग्णाला) कोणताही त्रास नव्हता पण तपासणीत त्याच्या पित्ताशयात खडे निघाले. सुभेदार साहेब राजस्थानात बाडमेरच्या जवळ नियुक्तीवर होते. त्याना मी त्यांच्या तपासणीचा अहवाल दिला. काय आहे ते समजावून सांगितले. त्यावर ते म्हणाले सर मी तर याच्या अगोदर सियाचेनला होतो आणी मला कोणताही त्रास नाही. या खड्यांच्यामुळे मला बढती मिळायला काही अडचण येईल का? मी त्यांना म्हणालो हे खडे काही वर्षापासून असतील आणी ते अजूनहि काही वर्षे तसेच राहतील जेंव्हा त्रास होईल तेंव्हा पाहू. माझ्या मते तुम्हाला याची काही अडचण येणार नाही.
लष्करात माणसे पूर्ण निरोगी असणे आवश्यक असते त्यामुळे त्यांची वार्षिक वैद्यकीय तपासणी होते. चाळीस नंतर पंचवार्षिक (पंचे चाळीस, पन्नास , पंचावन) या वर्षी अधिक खोलात जाऊन( एकस रे, ई सी जी, सोनोग्राफी, स्ट्रेस टेस्ट ई) सुद्धा होतात. शिवाय बढ्ती पुर्वी सुद्धा एक वैद्यकीय तपासणी होते. त्याप्रमाणे त्यांना श्रेणी दिली जाते.
निरोगी माणसाला A श्रेणी असते.ज्याला सियाचेन राजस्थान नागा प्रदेश अशा कोणत्याही कठीण ठिकाणी जाता येते
ज्यांन काही गंभीर नसलेले आजार असतील (उदा. दमा, रक्तदाब, मधुमेह) तर अशा लोकांना B श्रेणी असते आणी अशा लोकांची नियुक्ती अशाच युनिट मध्ये होते जेथे डॉक्टरची नियुक्ती आहे. या लोकांची बढती होण्यासाठी तीन डॉक्टर असलेला एक वैद्यकीय आयोग त्यांची पूर्ण तपासणी करतो आणी तो बढती साठी योग्य आहे कि नाही याचा सल्ला देतो. साधारणपणे एक बढती तरी दिली जाते. यांची सुरुवातीला दर सहा महिन्यांनी तपासणी होते आणी नंतर दर वर्षी तपासणी होते.
C श्रेणी मधील लोक हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा कर्करोगातून बाहेर पडत आहे किंवा असे काही गंभीर आजार आहेत अशा लोकांना दिली जाते या श्रेणीच्या लोकांची दर सहा महिन्यांनी तपासणी होते आणी यांना बढती दिली जात नाही. परंतु यांना निवृत्तीनंतर जर त्यांचा आजार लष्करी नोकरीमुळे झाला/ वाढला असेल तर त्यांना निवृत्तिवेतनात वाढ मिळते आणी हे अतिरक्त पैसे करमुक्त असतात.
D श्रेणी हि हंगामी अपात्र लोकांसाठी आहे. उदा ज्यांची नुकतीच शल्यक्रिया झाली आहे आणी त्यांना वैद्यकीय रजेवर पाठविले आहे. ई .
आणी E श्रेणी हि जे लोक नोकरी करण्यासाठी अपात्र आहेत म्हणजे युद्धात हात किंवा पाय डोळे गमावलेले किंवा असे मनोरुग्ण जे नोकरी करण्यासाठी अपात्र आहे.
अजून काही सोनोग्राफी झाल्यावर मी चहा पिण्यासाठी डॉक्टरांच्या चहापानगृहात गेलो तेंव्हा तेथे नौदलाच्या पूर्व कमांडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी (COMMAND MEDICAL OFFICER --CMO) आलेले होते. चहा पीत असताना मी त्यांना असा प्रश्न केला कि आताच माझ्या कडे एक सुभेदार साहेब आले होते. त्यांना कोणताही त्रास नाही पण सोनोग्राफी मध्ये त्यांच्या पित्ताशयात खडे(ASYMPTOMATIC GALLSTONES) असल्याचे निदान झाले आहे. अशा माणसाला आपण कोणती श्रेणी देणार?
त्यावर तेथे असलेल्या बर्याच लोकांनी सांगितले कि या सैनिकाला "आजार" आहे तेंव्हा त्याची श्रेणी A च्या पेक्षा खालची असली पाहिजे. मी त्यावर परत म्हणालो परंतु हे सुभेदार साहेब तर सियाचेन ला जाऊन आले आहेत आणी आता पण बाडमेरच्या वाळवंटात नियुक्त आहेत त्यांना आपली कामगिरी करण्यात कोणताही अडथळा आलेला नाही इतकेच नव्हे तर त्यांना आपल्याला असे खडे आहेत हे माहितही नाही.असे असताना त्याला खालची श्रेणी का द्यायची. त्यावर मुख्य आणी उपमुख्य वैद्यकीय अधिकारी ठासून म्हणाले कि या सैनिकाला आजार आहे तर त्याला खालची वैद्यकीय श्रेणी(LOW MEDICAL CATEGORY) दिलीच पाहिजे. हि चर्चा त्यानंतर थांबली आणी आम्ही आपापल्या कामाला लागलो.
दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता रुग्णालयात माझा पहिला रुग्ण श्री पी एस दास, व्हाईस एडमिरल, कमांडर इन चीफ पूर्वीय नौदल कमांड( Flag Officer C in C) हे पोटात दुखत आहे म्हणून आपल्या लव्याजम्यासह अवतीर्ण झाले त्यात तेच मुख्य वैद्यकीय अधिकारी (COMMAND MEDICAL OFFICER --CMO) हे पण होते. मी त्यांची सोनोग्राफी केली तर त्यांचे पित्ताशय पण खड्यानी भरलेले होते. आणि पित्ताशयाला सूज आलेली होती मी सोनोग्राफी केली. त्यांना आणि त्यांच्या सौ. ना काय आहे तो अहवाल सांगितला. त्यानंतर या CMO नि त्यांना आपण "सेकंड ओपिनियन" घेऊ म्हणून सांगितले. ("ते ओपिनियन त्याच दिवशी सायंकाळी विशाखा पटणम च्या सेव्हन हिल्स या पंचतारांकित रुग्णालयात घेतले गेले आणी त्याचा अहवाल शब्दशः माझ्या अहवालासारखाच होता.)
हा लवाजमा गेला त्यानंतर साडे दहा वाजता मी चहा प्यायला गेलो असताना मुख्य वैद्यकीय अधिकारी (COMMAND MEDICAL OFFICER --CMO) चहाच्या खोलीत बाकी सर्व डॉक्टर बरोबर चहा पीत होते. मी त्यांना प्रश्न विचारला कि सर आता या कमांडर इन चीफ ना कोणती खालची श्रेणी देणार? त्यावर त्यांनी ओशाळवाणे हसत म्हणाले अरे म्हणजे काय आहे कि ते आपले या कमांडर इन चीफ आहेत ना?
यावर मी त्यांना म्हणालो म्हणजे लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक "जास्त" समान असतात असेच ना?
(जॉर्ज ऑरवेल च्या The Animal Farm या कादंबरीत असलेले वाक्य ALL ANIMALS ARE EQUAL, BUT SOME ANIMALS ARE MORE EQUAL THAN OTHERS.)
यावर ते चिडून म्हणाले अर्थातच ते आपले कमांडर इन चीफ आहेत ते जास्त समान आहेत.
मी त्यांना शांतपणे म्हणालो कि सर तुम्ही आम्हाला प्राध्यापक होतात. सर्व रुग्ण समान असतात हे तुम्हीच आम्हाला शिकवले आहे. इथे पण आपण केस पेपर वर प्रथम नाव पी एस दास लिहितो आणि नंतर त्याचा हुद्दा लिहितो. म्हणजे रुग्ण प्रथम आणि त्याचा हुद्दा नंतर आला पाहिजे.
काल एक सुभेदार साहेब आले होते त्यांना आपण निम्न श्रेणी देण्याबद्दल आग्रही होतात कारण ते द्वितीय श्रेणी अधिकारी आहेत म्हणून? आणि आज मात्र आपण उच्च पदस्थाला निम्न श्रेणी देण्याबाबत मत बदलत आहात. न्याय हा सर्वाना एकच असला पाहिजे. एकाच आजाराला एकच उपाय असला पाहिजे आणी तो रुग्णाच्या सामाजिक किंवा आर्थिक परिस्थिती किंवा सत्तेतील स्थानाप्रमाणे बदलले जाऊ नये.
यावर त्यांनी तू अजून अननुभवी आणी अपरिपक्व(IMMATURE)आहेस असा शेरा मारून तेथून प्रयाण केले.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

अगम्य's picture

30 Mar 2016 - 8:32 pm | अगम्य

मी पयल्यान्दाच पयला :-)
नोकरशाही शेवटी सारखीच.

तुम्ही ठामपणे सत्य प्रतिपादन करायला कचरला नाहीत याचे कौतुक आणि सैन्यातही असले प्रकार चालतात याचे वैषम्य!

पुभाप्र.

सुबोध खरे's picture

31 Mar 2016 - 9:52 am | सुबोध खरे

सैन्यात मुलकी संस्थांपेक्षा जास्त लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे( जरी कागदोपत्री उलट असायला पाहिजे). आपले मत ऐकून घेतले जाते त्यावर कार्यवाही होईलच असे नाही.
"लष्करी शिस्तीला पण एक शिस्त आहे". उगाच कोणी वरिष्ठ आहे म्हणून वाटेल तशी शिक्षा दिली जाते असे नाही.
राहिली गोष्ट "सैन्यातही" असले प्रकार चालतात
सैन्यातही तीच "माणसे" आहेत. स्वार्थ,हाव,लांगुलचालन, भेकडपणा हे सर्व "मानवी" गुण सैन्यातही दिसतातच. फरक एवढाच असतो कि "एखादा अद्ययावत(sophisticated) माणूस जसा सफाईदार पणे -शर्करावगुंठीत- वागतो आणि ग्राम्य माणूस ओबड धोबड( crude) पणे" तसाच फरक येथे दिसेल.पण वृत्ती तीच राहते.

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2016 - 8:40 pm | श्रीरंग_जोशी

सत्तेपुढे शहाणपण चालत नाही हेच खरे :-( .

होबासराव's picture

30 Mar 2016 - 8:50 pm | होबासराव

लोकशाहीत सर्व लोक समान असतात पण काही लोक "जास्त" समान असतात
खरय.
डॉक लेख नेहमिप्रमाणेच छान.

सुबोध खरे's picture

30 Mar 2016 - 8:51 pm | सुबोध खरे

या चर्चेचा पुढील भाग लिहायचा राहिला.
सुदैवाने अशीच चर्चा मी नंतर ए एफ एम सी ला नियुक्तीवर गेलो असताना तेथे झाली आणी माझ्यासारख्या विचाराचे इतर डॉक्टर तेथे होते.यात लष्कराच्या वैद्यकीय सेवेचे महानिदेशक सुद्धा होते. त्या चर्चेचे फलस्वरूप म्हणजे पुढे जाऊन अशा पित्ताशयातील खडे असणार्या रुग्णांना जर काही त्रास नसेल तर त्रास होईपर्यंत कोणतीही निम्न श्रेणी देऊ नये आणी त्यांना आपल्या लायकीप्रमाणे बढती देण्यात आडकाठी असू नये असा निर्णय लष्कराच्या वैद्यकीय सेवेचे महानिदेशक (DIRECTOR GENERAL) यांनी घेतला.

श्रीरंग_जोशी's picture

30 Mar 2016 - 8:54 pm | श्रीरंग_जोशी

या कार्यासाठी अभिनंदन!!

बोका-ए-आझम's picture

31 Mar 2016 - 12:14 am | बोका-ए-आझम

अभिनंदन!

ज्जे बात.अभिनंदन आणि सॅल्यूट.

राघवेंद्र's picture

31 Mar 2016 - 2:25 am | राघवेंद्र

अभिनंदन आणि पु. भा. प्र.

अत्रन्गि पाउस's picture

31 Mar 2016 - 11:28 am | अत्रन्गि पाउस

हे मात्र खरोखरच कौतुकास्पद ...हे असे आपले मुद्दे मांडणे आणि तळमळीने त्याचा पाठ पुरावा करणे व तडीस नेणे सोपे नाही
आपली नैतिक मूल्ये खरोखरच रुजलेली आहेत ...
झरा तो मूळचाच खरा आणि तेथे पाहिजे जातीचे ते येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ....ह्या दोन ओळी क्षणार्धात मनात तरळून गेल्या ...

हि त्यांची अपरिहार्यता म्हणावी कि अनुभव कि स्वभाव??

मीता's picture

31 Mar 2016 - 2:35 pm | मीता

अभिनंदन!

Nitin Palkar's picture

5 Sep 2017 - 6:08 pm | Nitin Palkar

भाग १ ते १८ नॉन स्टोप वाचले. वेगळी प्रतिक्रिया काय लिहिणार?