पूर्वेच्या समुद्रात --१६

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
10 Feb 2016 - 11:47 am

पूर्वेच्या समुद्रात -- १५

अंदमानमध्ये असताना एक गोष्ट लिहायची राहून गेली ती येथे लिहीत आहे.
पोर्ट ब्लेअर च्या आसपास गस्त घालत असताना आमच्या जहाजाच्या हेलीकॉप्टरची माणसे/ सामान वर खेचायची मोटर आणि कप्पी याची चाचणी करायची होती.म्हणून पायलट आणि इंजिनियर यांची चर्चा चालू होती. त्यासाठी त्यांना ज्याला चांगले पोहता येत होते असा कोणी तरी सडपातळ माणूस हवा होता .
मी तेथेच उभा होतो आणि म्हणालो,"चला मीच येतो." त्यावर दोघे पायलट म्हणाले, "सर, तुम्ही"?
मी म्हणालो कि तुम्हाला पाहिजे "तसा" माणूस मी आहेच आणि या जहाजात सर्वात बिनकामाचा माणूस माझ्या शिवाय दुसरा कोण आहे?
त्यांनी घाबरत घाबरत कॅप्टनला विचारले कि आम्ही डॉक्टरना चाचणी साठी घेऊ का? त्यावर कॅप्टन त्यांना ओरडला कि डॉक्टर बराच वरिष्ठ अधिकारी आहे त्याला अशा फालतू चाचणीसाठी तुम्ही विचारलेच कसे? त्यावर मी कॅप्टन ला म्हणाल, "सर, मीच येथे आपण होऊन म्हणालो आहे. त्यांची काहीच चूक नाही". कॅप्टन म्हणाले डॉक्टर तुला काही अपघात झाला तर लोक मला शिव्या घालतील. मी त्यांना हसत म्हणालो सर, नाहीतरी मी येथे काहीच काम करीत नाही त्यापेक्षा "काही तरी उपयुक्त" करतो आहे. आणि अपघात झालाच तर पोर्ट ब्लेअर च्या रुग्णालयात भरती व्हायला मला आवडेल. तेथील सगळेच डॉक्टर माझे मित्र आहेत.आरामात पाहुणचारही घेईन. हो ना करता हसत हसत त्यांनी परवानगी दिली.
आम्ही पोर्ट ब्लेअर च्या आजूबाजूलाच फिरत होतो आणि जहाज बंदरात जाण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत होते. तेंव्हा बंदराच्या आजू बाजूच्या खाडीत आम्ही फिरत होतो. आता ते दोघे पायलट हेलीकॉप्टर घेऊन उडाले. तेवढ्या वेळात माझ्या छाती भोवती संरक्षक दोर बांधला आणि मी क्वार्टर डेक वर हेलीकॉप्टरने उचलण्यासाठी सज्ज झालो. हेलीकॉप्टर माझ्या डोक्यावर आले त्यांनी त्या मोटर वरून दोर खाली सरकवली. ती मोटर हेलीकॉप्टरच्या दाराच्या वरच्या भागावर चढवलेली असते. म्हणजे जेंव्हा तुम्ही दोरी खेचून घेता तेंव्हा त्याला बांधलेला माणूस दाराच्या पातळी ला येतो म्हणजे त्याला सरळ आत घेता येते.
तो दोर क्वार्टर डेक पर्यंत आला त्याचे शेवटचे टोक माझ्या छाती भोवती बांधलेल्या संरक्षक दोराला घट्ट बांधला गेला . या वेळे पर्यंत जहाजाला बंदरात प्रवेश करण्याची अनुमती मिळाली होती त्यामुळे जहाज आता बंदराच्या दिशेने कूच करू लागले होते. खालच्या अधिकार्याने हेलीकॉप्टरला आता दोर खेचण्यास सांगितले. इंजिनियर प्रयत्न करीत होता तर ती मोटर अडकली होती. ती काही केल्या चालू होईना आणि जहाज अजूनच बंदराच्या जवळ येऊ लागले. हेलीकॉप्टरमध्ये पायलट तेथे असलेल्या आमच्या इंजिनियरला घाई करायला लागले. कारण इतका वेळ हलत्या जहाजाबरोबर हेलीकॉप्टर तरंगत /चालवत होते तेच कठीण होते आणि आता बंदर जवळ येत चालले होते. तेथे असलेल्या विजेचे मनोरे आणि तारा, लिफ्ट, क्रेन यात कुठेतरी हेलीकॉप्टर अडकेल हि भीती त्या पायलटना वाटत होती. शेवटी त्यांनी हेलीकॉप्टर वर उडवले आणि मी त्या दोराबरोबर लटकत पोर्ट ब्लेअरच्या खाडीवरून उडत होतो. मी हेलीकॉप्टरच्या खाली २० एक फुट अंतरावर लटकत होतो.हेलीकॉप्टर पुढे आणि कोनात मागे २० फुटावर लटकत मी अशी वरात चालली होती.
त्या परिस्थितीत दिसणारे दृश्य मात्र विहंगम होते. आपण दोन हात जमिनीला समांतर करून उचललेल्या स्थितीत निळ्याशार पाण्यावरून उडतो आहोत. आजूबाजूला पाचूची हिरवीगार बेटे दिसत आहेत.फक्त वीस फुट वर असलेले हेलीकॉप्टर सोडले तर चारी बाजूचे कोणताही अडथला नसलेले असे त्रिमित दृश्य एखाद दोन मिनिट चालू होतं.
एकदम माझ्या मनात विचार आला कि जर या दोराचं काही झालं आणि आपल्याला जलसमाधी मिळाली तर आपल्या कुटुंबाचं काय होईल. विम्याचे २० लाख रुपये मिळतील पण बायको डॉक्टर असली तरीही ५ वर्षाची मुलगी आणि २ वर्षांचा मुलगा यांना कसं वाढवेल?.
असाच मी १९९० साली गोव्याला हेलीकॉप्टरमध्ये बसलो आणि ते लगेच उडाले होते तेंव्हा तेथील सीट बेल्ट लावेपर्यंत हेलीकॉप्टरने पल्लेदार वळण घेतले आणि मी तेथे असलेल्या बेंचवर एकदम दारापर्यंत सरकलो होतो. तेंव्हा माझी मनात असाच विचार आला होता कि आपलयाला जलसमाधी मिळाली तर काय होईल? पण तेंव्हा मी विचार केला होता आपल्याला एक भाऊ आहे आणि तो कमावता आहे आपण मेल्यावर आईवडिलांना अतीव दुःख होईल पण आपल्यावर कोणाचीच जबाबदारी नाही.
आताची परिस्थिती पार वेगळी होती. माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी होती. भितीची एक लहर माझ्या पाठीच्या कण्यातून जात आहे असे वाटले.
एवढ्यात वरची मोटर चालू झाली आणि मी हळूहळू वर खेचला जाऊ लागलो. अर्ध्या मिनिटात मी हेलीकॉप्टरच्या दाराशी पोहोचलो. हेलीकॉप्टरचे दार मी पकडले तेथे असलेल्या आमच्या इंजिनियरने मला आत येण्यास मदत केली आणि मी आत तो संरक्षक दोर काढून स्थानापन्न झालो. काही मिनिटातच आम्ही पोर्ट ब्लेअरच्या विमानतळावर उतरलो. तेथे आमची जीप घेऊन आम्ही तेथील दवाखान्यात गेलो. त्या दवाखान्यात माझा मित्र डॉक्टर होता. त्याच्या बरोबर चहापाणी झाले आणि आम्ही जीपने जहाजावर परत गेलो.
विशाखा पटणमला परत आल्यावर हा प्रसंग मी बायकोला सांगितला तेंव्हा तिने रागावून सांगितले कि एक तर अशा गोष्टी करत जाऊ नकोस आणि तरी तुला करायच्या असतील तर निदान मला सांगत जाऊ नको.
नारकोंडमची हकीकत सांगितल्यावरही ती हेच म्हणाली होती.
आजही हा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर लख्ख पणे उभा आहे. लग्न न झालेला तरुण किती निर्धास्त असतो आणि मुलं बाळं असेला माणूस जबाबदारीमुळे कसा "सद्गृहस्थ" होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे.
क्रमशः

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मोदक's picture

10 Feb 2016 - 11:59 am | मोदक

हे असले काहीतरी करायची जबरदस्त इच्छा आहे. तुम्ही भाग्यवान आहात.

सहज एक शंका - असे प्रकार करताना पिच्चरमधले हिरो लोक्स एक ओपन फेस हेल्मेट आणि बहुदा त्यालाच जोडलेला भलामोठा गॉगल घालतात. तुम्हीही तसे काही परिधान केले होते का?

सुबोध खरे's picture

10 Feb 2016 - 12:02 pm | सुबोध खरे

काहीही नाही
मी फक्त गणवेश आणि बूट घातलेले होते.

अगम्य's picture

10 Feb 2016 - 12:06 pm | अगम्य

शेवटी सैनिक सुद्धा कुटुंबवत्सल माणसेच असतात आणि तरीही ते आपला जीव देशासाठी धोक्यात घालतात ह्याचं प्रत्यंतर ह्या लेखाने आलं. सैनिकी पेशा बद्दलचा आदर दुणावला.

बोका-ए-आझम's picture

10 Feb 2016 - 1:23 pm | बोका-ए-आझम

.

सौंदाळा's picture

10 Feb 2016 - 1:52 pm | सौंदाळा

खतरों के खिलाडी - डॉ. खरे
मस्त चालु आहे सागर सफर

प्रमोद देर्देकर's picture

10 Feb 2016 - 2:05 pm | प्रमोद देर्देकर

+१
खतरों के खिलाडी आहात तुम्ही डॉ.
पण मुळात ही चाचणी करण्याआधी ती हेलीकॉप्टरची मोटर आधी नुसती (हेलीकॉप्टर जमिनीवर असताना) तरी फिरते आहे की नाही हे पहायला हवे होते.

नाखु's picture

10 Feb 2016 - 2:09 pm | नाखु

सफरीतला हा एक सफर

सुबोध खरे's picture

10 Feb 2016 - 2:46 pm | सुबोध खरे

मोटरची अर्थातच जहाजाच्या कार्यशाळेत आणि हेलीकॉप्टरला लावून चाचणी झालेली होती.पण प्रत्यक्ष चाचणी माणसावर आवश्यक असते आणि ती वेळ आल्यावर नव्हे तर अगोदर करणेही आवश्यक असते.

मन१'s picture

10 Feb 2016 - 3:11 pm | मन१

शेवटी त्यांनी हेलीकॉप्टर वर उडवले आणि मी त्या दोराबरोबर लटकत पोर्ट ब्लेअरच्या खाडीवरून उडत होतो. मी हेलीकॉप्टरच्या खाली २० एक फुट अंतरावर लटकत होतो.हेलीकॉप्टर पुढे आणि कोनात मागे २० फुटावर लटकत मी अशी वरात चालली होती.

अमिताभच्या "हम" चे चाहते आहात का आपण ?

.
.
.
बादवे, ह्यानंतर पायलट, इंजिनिअर आणि कॅप्टनसाहेबांची प्रतिक्रिया काय होती हे जाणून घ्यायला उत्सुक आहे.

त्यांची प्रतीक्रिया काय असणार?
असे एखाद्याला दोराला धरून उचलणे आणी पुढे जाणे हे पाण्यातून होतच असते. जेंव्हा तुम्ही चार लोकांना उचलायचे असते तेंव्हा हेलीकॉप्टर च्या वार्याचा पाण्यातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून एका माणसाला उचलल्यावर लगेच हेलीकॉप्टर वर आणी पुढे नेतात आणी माणूस आत आला कि परत आपल्या जागी जातात. त्यात चूक असे काहीच नाही. हवेत लटकण्याचा माझा मात्र पहिलाच प्रसंग होता त्याबद्दल मी लिहिले आहे एवढेच. मी काही जेम्स बॉन्ड वगैरे सारखे केलेले नाही. फक्त माझ्यासारख्या मुळात साहसी नसलेल्या माणसाला लष्करात आपोआप अशा प्रसंगाला सामोरे जावे लागते एवढेच.

अत्रन्गि पाउस's picture

10 Feb 2016 - 3:17 pm | अत्रन्गि पाउस

तुस्सी ग्रेट हो ...

सुमीत भातखंडे's picture

10 Feb 2016 - 6:36 pm | सुमीत भातखंडे

थरारक अनुभव.

डॉक तुमचे मनाला भावणारे असे अनुभव कथन वाचत आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

मुक्त विहारि's picture

10 Feb 2016 - 9:25 pm | मुक्त विहारि

"लग्न न झालेला तरुण निर्धास्त असतो आणि मुलं बाळं असेला माणूस जबाबदारीमुळे कसा "सद्गृहस्थ" होतो."

+१ ....

प्रचंड सहमत