द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)
श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं.