कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer)
एखादी संज्ञा (term, name) पकडून तिचे व्यापारीकरण करणे हे काही नवीन किंवा विरळ नक्कीच नाही. एखाद्या संज्ञेची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करून मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो असे लक्षात आले की मग त्या संज्ञेभोवती जाणीवपूर्वक इतके मोठे वलय निर्माण केले जाते की, त्या संज्ञेचा अर्थ समजला जातो तसाच आहे की ती अपसंज्ञा आहे, इकडे लक्ष न देता तिचा उदो उदो केला जातो. अश्या परिस्थितीला "पूर्वग्रहदोष (cognitive bias)" असे म्हटले जाते आणि शब्दाच्या आशयाशी प्रामाणिक नसलेल्या संज्ञेला "अपसंज्ञा (misnomer)" असे म्हणतात. कालव्यवस्थापन ही अशीच अनेक दशलक्ष डॉलर उद्योगाला जन्म देणारी अपसंज्ञा आहे.