बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे एक महत्वाचे विशेष म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये उत्तर अमेरिकेतील कलाकारांना आपली कला लोकांपुढे सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते. अधिवेशन समितीने आलेल्या प्रवेशिकातून अनेक दर्जेदार कार्यक्रम निवडले आहेत. नाट्य रसिकांसाठी यावेळी विशेष मेजवानी आहे. ’मी आणि माझा ओझे (Jose)’ हे विनोदी नाटक न्यू जर्सीच्या कलाकारांकडून यावेळी सादर होणार आहे. ह्युस्टनचे कलाकार यावेळी ‘दुर्गा झाली गौरी’ हे सुप्रसिद्ध नाटक सादर करणार आहेत. न्यू जर्सीच्या कलाकरांकडून उदकशांत नावाचे नाटकही सादर होणार आहे. त्याशिवाय सॅन फ्रान्सिस्को बे एरीआच्या कलाकारांकडून तीन पैशांचा तमाशा हे नाटक या अधिवेशनता सादर होणार आहे. आणि या सर्व नाटकांव्यतिरीक्त मराठी रंगभूमीवर सध्या गाजत असलेले गोष्ट तशी गमतीची हे नाटक भारतातील गाजलेल्या कलाकारांकडून सादर होणार ते वेगळेच! नाटकांव्यतिरीक्तही अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल या अधिवेशनात असणार आहे. शिकोगोतील कलाकारांडून ‘पडल्यावर प्रेमात’ हा कार्यक्रम तर सॅन फ्रान्सिस्कोतील कलाकरांकडून ‘मराठी चित्रपटाची १०० वर्षे’ हा मराठी चित्रपटाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर कार्यक्रम सादर होणार आहे. लॉस एंजलिसच्या कलाकारांकडून ‘राग तरंग’ हा संगीताचा कार्यक्रम तर मागील अधिवेशनात गाजलेला ‘उभ्या उभ्या विनोद’ हा कार्यक्रमही या अधिवेशनात सादर होणार आहे.
मनोरंजनाच्या कार्यक्रमांव्यतिरिक्तही अनेक या अधिवेशनात मागील अधिवेशनांप्रमाणेच एक दिवसाचा व्यवसाय मार्गदर्शनाचा कार्यक्रमही होणार आहे. आपला व्यवसाय कसा वाढवायचा यावर या कार्यक्रमात परिसंवादही होणार आहे. या वर्षीच्या अधिवेशनात ५५+ लोकांसाठी उत्तररंग ही खास परिषद होणार आहे. या वयोगटातील समस्या आणि त्यांचे निराकरण यावर या परिषदेत अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. हे दोन्ही कार्यक्रम अधिवेशनाच्या आदल्या दिवशी म्हणजे २ जुलैला असणार आहेत. हे कार्यक्रमाला तुम्हाला जायचे असेल तर नावनोंदणी करताना त्या ऑप्शनवर चेक करायला विसरु नका. या व्यतिरीक्त युवा पिढीतील लोकांसाठी - विशेषत: १८ ते ३५ वयोगटातील लोकांसाठी यावेळी क्रूझ नाईट, क्लब नाईट आणि स्पीड डेटीगं (स्नेहबंधन) अशा तीन खास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच या अधिवेशनात मानसिक आरोग्यावरही एक विशेष कार्यक्रम होणार आहे.
जे लोक क्रिकेटचे शौकीन आहेत त्यांना हर्ष भोगले हे नाव नवीन नाही. प्रतिष्ठीत इंडीयन इन्सिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मधून शिक्षण घेतलेले हर्ष भोगले गेले कित्येक वर्षापासून क्रिकेट कॉमेंटरी करत आहेत. अधिवेशनाच्या अादल्या दिवशी आयोजित केलेल्या बिझनेस सेमिनार मध्ये हर्ष भोगले यांना प्रमुख वक्ते म्हणून बोलवण्यात आले आहे. याच दिवशी - २ तारखेला बिझनेस सेमिनार व्यतिरीक्त डॉक्टरांसाठी कंटीन्युईंग मेडीकल एज्युकेशन, ५५+ लोकांसाठी उत्तररंग आणि संध्याकाळी बँक्वेटचेही आयोजन करण्यात आले आहे. ज्या लोकांना या कार्यक्रमांना जायचे आहे त्यांनी अधिवेशनाची नोंदणी करण्याच्या फॉर्ममध्ये या कार्यक्रमांना निवडणे आवश्यक आहे. उत्तर अमेरिकेतील मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिवेशनात बिझनेस प्लान स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेविषयीची अधिक माहिती आपल्याला अधिवेशनाच्या वेबसाइटवर मिळू शकेल.लॉस एंजलिस हे हॉलिवूडचे माहेरघर. इथल्या अधिवेशनात सिनेमा उद्योगासाठी काही नसेल तरच नवल. सिनेमा उद्योगातील लोकांच्यासाठीही अशाच प्रकारचे ‘एल ए सिनेमा’ हे नेटवर्कींग सत्र २ जुलैला दुपारी १.३० ते ४.३० च्या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहे.
उत्तर अमेरिकेत जन्म झालेली, वाढलेल्या तरुण पिढीचे मराठी संस्कृतीशी असलेले नाते अधिक घट्ट व्हावे या हेतूने या अधिवेशनात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. इथे वाढलेल्या पिढीच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणूनही विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती लवकर अधिवेशनाच्या वेबसाइटवर उपलब्ध होईल. उत्तर अमेरिकेतील मराठी तरुण तरुणींना मराठी जोडीदार निवडण्यासाठी यावेळी प्रथमच आम्ही एका खास वेबसाइटची निर्मिती केली आहे. जे लोक जोडीदाराच्या शोधात आहेत ते www.MingleMangal.com या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात. त्यांना या वेबसाइटवरून इतर तरुण तरुणींना शोधता येईल व त्यांच्याशी संपर्क साधता येईल. या व्यतिरीक्त तरुण पिढीला एकमेकांना भेटता यावं म्हणून या अधिवेशनतात क्रूझ सोशल मिक्सर, क्लब नाइट, बॉलिवूड/हॉलिवूड डान्स, स्पीड डेटींग (स्नेहबंधन), कुकींग स्पर्धा आणि व्हरायटी शो अशा तब्बल सहा कार्यक्रमांची रेलचेल आहे.
या अधिवेशनातील अजून एक अभिनव उपक्रम म्हणजे - नमन (NAMAN) - नॉर्थ अमेरिकन मराठी ऑथर्स नेटवर्क. आपल्यापैकी अनेकांना लिहीयला आवडते. काही लोकांचे लिखाण प्रसिद्धही झाले असेल. उत्तर अमेरिकेतील लेखनाची आवड असणाऱ्या सर्व लेखकांना जोडणारे नेटवर्क नमनच्या निमित्ताने तयार होणार आहे. अधिवेशनात यासाठी एक खास सत्र राखून ठेवण्यात आले आहे. या सत्रात भाग घेण्यासाठी आणि नमनचा हिस्सा बनण्यासाठी आपण आमच्याशी namansachiv@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.
अधिवेशनाच्या स्मरणिका समितीने यावेळी एक नविन प्रकारचे प्रायोजकत्व जाहिर केले आहे. आपल्याला स्मरणिकेच्या एका पानाचे प्रायोजक बनता येईल. या प्रयोजकाचे नाम त्या पानावर खाली त्यांच्या एका छोट्या संदेशाबरोबर घातले जाईल. ज्यांना असे प्रायोजकत्व घेण्याची इच्छा आहे त्यांनी स्मरणिका समितीला smaranika@bmm2015.org या इमेलवर संपर्क करावा.
या अधिवेशनामध्ये भारतातून येणाऱ्या कलाकारांकडून दर्जेदार कार्यक्रम सादर होणार आहेत. बालगंधर्वांच्या गाण्यांचा ‘गंधर्व’ नावाचा एक खास कार्यक्रम राष्ट्रीय पुरस्कार विजेते आनंद गंधर्व (भाटे) आणि आदित्य ओक सादर करतील. ‘गोष्ट तशी गमतीची’ हे ओंकार दादरकर दिग्दर्शीत सुप्रसिद्ध नाटकही अधिवेशनात सादर होणार आहे. या नाटकामध्ये आपल्याला ‘होणार सून मी या घरची’ फेम शशांक केतकर आणि सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक मंगेश कदम आणि लीना भागवत यांचा अभिनय पहाण्याची संधी मिळणार आहे. या व्यतिरीक्त ’लग्न पहावे करून’ हा भारतातील स्टार कलाकारांचा एक खास कार्यक्रमही या अधिवेशनात सादर होणार आहे. या कार्यक्रमात ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी, ‘चला हवा येऊ द्या’ फेम भालचंद्र कदम, सागर कारंडे, भरत गणेशपुरे अशा अनेक ताऱ्यांना आपल्याला पहायला मिळणार आहे.
हे सर्व वाचल्यावर तुम्हाला नावनोंदणी करावीशी वाटली नाही तरच नवल! चांगल्या सीट अजूनही शिल्लक आहेत. लवकरात लवकर नोदंणी करून या सीटवर आपला हक्क प्रस्थापित करा. अधिवेशनाची नावनोंदणी www.bmm2015.org या अधिवेशनाच्या वेबसाइटवरून करता येईल. अधिवेशनाबाबत कुठल्याही प्रश्नाची उत्तरे आपल्याला info@bmm2015.org या इमेलवर अथवा ३१० ७७६ ५५९३ या फोनवर मिळू शकेल.
प्रतिक्रिया
26 Feb 2015 - 8:15 am | माईसाहेब कुरसूंदीकर
छान रे बी.एम.एम्या.साता समुद्रापार मराठी संस्क्रुती रुजवण्यासाठी करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
26 Feb 2015 - 8:31 am | श्रीरंग_जोशी
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या १७ व्या अधिवेशनाच्या आयोजकांना मनःपूर्वक शुभेच्छा!!
अधिवेशनाची एकंदर आखणी बहुआयामी दिसत आहे.
दर्दैवाने याही अधिवेशनाला आमचे येणे शक्य होणार नाही. येथील काही स्थानिक मंडळी हजेरी लावणार आहेत.
त्यांच्याकडून व या अधिवेशनाला उपस्थित राहणार्या मिपाकरांकडून अधिवेशनातील गमतीजमती ऐकण्याची उत्सुकता राहील.
26 Feb 2015 - 4:24 pm | सूड
कार्यक्रमाची माहिती दिलीत तसा वृत्तांतही वाचायला आवडेल.
26 Feb 2015 - 5:10 pm | मदनबाण
हेच म्हणतो.
मागील अधिवेशनात गाजलेला ‘उभ्या उभ्या विनोद’ हा कार्यक्रमही या अधिवेशनात सादर होणार आहे.
ह्याचे इडियो आहेत काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Swine flu: India's Ahmedabad limits public gatherings
26 Feb 2015 - 4:42 pm | अत्रन्गि पाउस
ओंकार कि अद्वैत दादरकर ...कारण ओंकार गाण्यात आणि अद्वैत दिग्दर्शनात आहेत
26 Feb 2015 - 8:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रशंसनिय उपक्रम !
हार्दीक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा !!