प्रवासी
ती पहाट निरागस होती, क्षितिजावर होती लाली
नादातुन निर्मित झाली, अनंत अगम्य भूपाळी
भोवताल न्याहळत होतो, अमृत प्राशन करताना
अमरत्व ओढुनी आलो, होतो मी कोणे काळी
असंख्य मनोहर स्वप्ने, ते लांब गहिरे श्वास
अतर्क्य, अबाधित होता, विचार-कृती सहवास
आनंद सोहळ्यामध्ये, मी भिजलो अनंत काळी
अद्वैत भोगले होते, मी काही वेळ सकाळी
दिवसा चित्र पालटले, मयसभा संपली आता
सत्य उलगडत गेले, मज प्रारब्धाची गाथा
जीव तोडून जोडून पळलो, दिवसा मी रानोमाळी
दिवसाचा जोशच न्यारा, दिवसाची नशा निराळी