आपलेच दात.....

मका म्हणे's picture
मका म्हणे in जे न देखे रवी...
20 Feb 2021 - 10:00 pm

लहानपणी दुधाचे दात पडून
त्या जागी नवीन यायचे.
वाईट वाटायचं एखादा दात
पडून गेला की काही वेळ

कधी कधी तर, असा पडलेला
दात, आठवण म्हणून जपून
ठेवायचो दिवसेंदिवस

सवयीने जीभ तिथं जायची
आणि मग आता तिथे काहीच नाही
हे लक्षात आल्यावर परत यायची

काही दिवस तर तो एक चाळाच
होऊन बसला होता मनाला

मग पुन्हा त्या जागी एक नवीन
दात दिसायला लागायचा हळुहळु..
हा दात इतर आधीच असलेल्या
दातांमध्ये स्वतःला सामावून घ्यायचा

याचा आकार, ठेवण निराळी असायची
हा अधिक तजेलदार, बळकट आणि
सशक्त असायचा, इतरांच्या तुलनेत

आरशात स्वतःला पाहताना या
नवीन दातामुळे चेहऱ्याला आलेल्या
वेगळेपणाकडे लक्ष जायचं...

काही नवे, काही जुनेच असे घेऊन जगलो कितीक वर्ष आनंदाने....

अनेक कडू गोड गोष्टी चघळल्या एकत्रच
चुकून दातांखाली आल्या काही जखमा घाईत, ठुसठुसत राहिल्या बराच वेळ...

अपमान गिळले, निराशा चाखली चवीने
अगदी एकमेकांना सुद्धा खाल्लं रागात

इतकं होऊनही आपले कोण आणि बाहेरच्यांना दाखवायचे कोणते हे
भान जपलं....

आता बालपणीचे दात पडायचं वय
निघून गेलंय आणि आहेत ते
पडायला अवधी आहे अजून

पण तरीही काही जागा रिकाम्या
का वाटताहेत आतून ?
सवयीने मनाच टोक जाऊन शोधून
येतंय कुणाला तरी अकारण

पूर्वीसारखी चव नाही लागत आहे
आता त्याच पदार्थांची,
सगळे दात शाबूत असूनही...

हे काहीतरी अवेळी घडून गेलंय,
कोणीतरी पडून गेलंय एका एकसंध ओळीतून

त्या रिकाम्या जागी जाऊन शोधांवस
वाटतंय काहीतरी....

या अधल्या मधल्या रिकाम्या जागा
अस्वस्थ करतात मनाला .....

अशीच अजून काही वर्षे जातील, अन
मग हळूहळू सगळेच दात पडून जातील,
जगलो ज्यांच्यासोबत इतका काळ...

काहींना तर उपटून काढावंच लागेल....

मग एक भयाण पोकळी तयार होणार
काही काळ

आणि मग आयुष्यात येईल कसलेच लागेबांधे नसलेल्या दातांची एक
साचेबद्ध रांग कवळीच्या रूपात....

या कवळीच्या दातांखाली नाही चावले
जात म्हणे आपलेच ओठ.....

कविता

प्रतिक्रिया

रंगीला रतन's picture

27 Apr 2021 - 4:08 pm | रंगीला रतन

या कवळीच्या दातांखाली नाही चावले
जात म्हणे आपलेच ओठ.....

सहीच!