कविता

देव

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
5 May 2021 - 3:01 pm

देव म्हणजे हवा, नाही अगरबत्तीचा सुगंध
तो अन्नात आहे, उपवासात नाही.
देव दानशूर मोठा, लाचार नाही
न्यायी आहे देव, नवसाचा व्यापारी नाही.

देव आहे सदाचारात, अन्यायाचा शत्रू
देव मुहूर्त नाही, अनंत काळ आहे.
देवही भक्त आहे, भावाचा भुकेला
देव नाही खजिनदार-पुजारी.

देव देवळात नाही फक्त, आहे सगळीकडे
देव दाढीत नाही, शेंडीतही नाही.
जीवन देव आहे, मृत्यूही तोच
प्रचारात देव नाही, तो प्रकांड आहे.

देव म्हणजे गंभीर गोष्ट
माणूस त्याची गंमत करतो.
गुलाबजाम जणू पाकातला
हलवायाची व्याख्या करतो.

अव्यक्तजाणिवभक्ति गीतमुक्त कविताश्रीगणेशधर्मकवितासाहित्यिक

......अजूनही !

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
4 May 2021 - 8:21 am

......अजूनही !

आसमंत व्यापून टाकलेल्या त्या मखमली ढगांमधून
वीज चर्र्कन धरणीमध्ये निघून जावी ....
------असेच त्यांचे ते शेवटचे शब्द ....
सगळं काही भेदून
विस्कळीत करून टाकणारे..... अगदी क्षणार्धात !

स्वप्नांनी तुडुंब भरलेल्या आपल्या मनाला .....
अगदी रिक्त करून डोहाच्या तळाशी नेऊन ठेवल्यासारखे !

आता सगळं अगदी रिकामं झालंय .....

जे ते जिथल्या तिथल्या किनाऱ्यावर सोडून
खळाळत निमूटपणे वाहणाऱ्या नदीसारखी ....
मीही वाहत आहे आता ...... एकटीच !

कविता

जपून ठेव!

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
1 May 2021 - 12:08 am

मी जरा बाहेर जातोय
माझे शब्द जपून ठेव.

काही तुला आवडलेले
काही मुद्दाम न वाचलेले.
रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले
बोललेले आणि अबोल राहिलेले.

अर्थाच्या शोधात पडू नको
तो मलाही लागत नाही.
आता शब्दही तुझेच आहेत
माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय.

अलगद हाताळ या शब्दांना
मुलायम असले तरी घावही घालतात.
दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर
अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा.

अव्यक्तआयुष्यजीवनकविता

सवय

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
30 Apr 2021 - 8:43 pm

साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून
हाकारणार्‍या अनघड कल्पनांची
वास्तवाच्या धगीत
कापूरवाफ होताना बघण्याची
आता सवय करून घेतोय

मास्कावगुंठित श्वासात
अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध
ऊरफोड भरून
पाऊसगाणे गाण्याची
आता सवय करून घेतोय

हताशेच्या महासाथीची "न"वी लाट
सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने
नेस्तनाबूत होईलच
हे स्वत:ला वारंवार पटविण्याची
आता सवय करून घेतोय

मुक्त कविताकवितामुक्तक

चक्कर

अनुस्वार's picture
अनुस्वार in जे न देखे रवी...
29 Apr 2021 - 2:23 pm

प्रश्न आयुष्याचा असतो
उत्तर असते आयुष्याचे.
आपण निव्वळ कोरे कागद
नशीब छपाईच्या कामाचे.

शब्दांना का कळतो अर्थ
लिहिणाऱ्याच्या मनातला?
अर्थ कोणता जीवनाला मग
जन्म देत असे अज्ञातातला.

मृत्यू म्हणजे शेवट कसला?
पितरांच्या शांतीत काकही फसला.
अनुभवाचे गाठोडे सोडून
वर्तमानावर भूतकाळ हसला.

विश्वाचे मुळ गूढ भयंकर
सोबत नाही एकही शंकर.
अंधाराला शोधीत भास्कर
पृथ्वीस सांगे, "मारत राहा चक्कर"!

आयुष्यदृष्टीकोनमुक्त कविताकविता

कवितेनंतर

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Apr 2021 - 8:37 pm

कवितेनंतर बाकी उरल्या
शब्दांचे विभ्रम मी बघतो
ऐकून आहे ठिणगीचाही
बघता बघता वणवा होतो

वळीव कोसळता वणव्यावर
राखेची रांगोळी होते
अगणित थेंबांतिल थोड्याश्या
थेंबांची पागोळी होते

सोसून पागोळ्यांचा मारा,
तरारून अंकुर जो फुटतो
वृक्ष होऊनी त्याचा, अनघड
शब्दांनी तो डवरून जातो

पाठशिवणीचा नाद लावुनी
शब्द बीज वळचणीत रुजते
कधीतरी त्यातून अचानक
ओळ नवी कवितेची फुलते

- पण ओळीच्या पैलतिरावर
अनाघ्रातसे काही उरते

कविता माझीकवितामुक्तक

..बहुतेक रेशमी होते!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
18 Apr 2021 - 12:32 am

आकार घडीव घडले..
[पण] आघात अनावर होते!

डोळ्यांशी डोळे भिडती..
संवाद कोवळे होते!

स्वत्वाची ओळख नाही..
[प्रतिबिंब सोवळे होते!]

अंधार असु देत जरासा..
तेजाचीच सवय होते!

आयुष्य क्षणांतून घडते..
अन् क्षण, मोजके होते!

--

निसटून जातसे काही..
बहुतेक रेशमी होते!

राघव

कविता

अध्यात्माची भूमिती

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
14 Apr 2021 - 5:04 pm

अनादिच्या अलिकडचा
"अ" हा नि:संग असा एक बिंदू घेतला.
मग
अनंताला स्पर्श करू धजणारा,
ज्ञानगम्य असा,
"ज्ञ" हा दुसरा बिंदू घेतला.

"अ" ला "ज्ञ"शी जोडणारी
"अज्ञ" ही रेषा आखली.

ह्या रेषेवर
माझ्याच जवळपास
कायम घोटाळणारा
"हम्" हा बिंदू निवडला.

"अज्ञ" या रेषेशी
लंबरूप,
फटकून असणारे,
"सोs" हे प्रतल
असे निवडले
की ते "अज्ञ" रेषेला
"हम्" बिंदूत छेदेल.

गणितकवितामुक्तकमौजमजा

चैत्री पाडवा....

Jayagandha Bhatkhande's picture
Jayagandha Bhat... in जे न देखे रवी...
11 Apr 2021 - 6:39 pm

चैत्री पाडवा....

नवी पालवी चैत्राची ती,
रंग तिचा हिरवा..
पारंब्यांवर झोके घेई,
एक वेडा पारवा...

पानोपानी फुलली जाई,
दरवळे अंगणी मरवा..
मुदित सृष्टी बहरून जाई,
वसंत ऋतु हा बरवा..

मंदिरातला मृदुंग बोले,
सुमधुर तो केरवा..
संध्यासमयी कानी येई,
दूर कुठे मारवा..

सजतील सदने, गुढ्या तोरणे,
पाडवा आहे परवा..
नववर्षाची नवीन स्वप्ने,
संकल्प मनी ठरवा.....!

जयगंधा..
११-४-२०२१.

कविता