जाडजूड ग्रंथांद्वारा विषबाधा !
पंधराव्या शतकात कागदावरील छपाईचा महत्त्वपूर्ण शोध लागला. त्यानंतर कालौघात छापील पुस्तके बाजारात अवतरली. खूप मोठ्या आकाराची पुस्तके तयार करताना त्यांची बांधणी करण्याची विविध तंत्रे विकसित झाली. सुरुवातीला त्यासाठी जनावरांचे चामडे वापरले जायचे परंतु कालांतराने त्याच्या जागी जाडपुठ्ठा वापरात आला. सन 1840 मध्ये अशा बांधणी केलेल्या पुस्तकांचा कणा आकर्षक व चकाकता दिसण्यासाठी बांधणीदरम्यान त्यात पॅरिस ग्रीन या रंगद्रव्याचा देखील वापर होऊ लागला. पुस्तकांच्या सौंदर्यवर्धनाबरोबरच या रंगद्रव्याचा अजूनही एक लाभ होता तो म्हणजे, पुस्तकांचे कृमी व कीटकांपासून संरक्षण.