वेटिंग फॉर गोदो
भाऊ हा शिस्तीचा पक्का होता. सकाळी सहा वाजता उठणार म्हणजे उठणार. आजही तो बरोबर सहा वाजता उठला. सकाळी महत्वाचे काम म्हणजे बागेला पाणी द्यायचे. पाणी दिले नाही तर झाडे कोमेजून जाउन माना टाकायची, त्याच्याकडे आशेने बघत रहायची. त्याला मग त्यांची दया यायची.
बंगल्याच्या आजूबाजूची ही आटोपशीर बाग छोट्या मालकांनी स्वतःच्या हातांनी लावलेली होती. त्याबागेत काय नव्हते? डबल मोगरा, अबोली, जाई जुई, निरनिराळ्या जातीचे गुलाब. आणि हो एकाच वेलीवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले देणारी बोगनवेल! जशी फुलझाडे होती तशी रानटी झाडे पण होती. भाऊ एकदा रान साफ करायला गेला. तर छोट्या मालकांनी त्याला आडवल.