राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

वडापाव's picture
वडापाव in जनातलं, मनातलं
6 Feb 2017 - 1:31 am

मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत. निरीश्वरवाद हा विवेकवादाच्या धर्तीवर आलेला निष्क़र्ष असायला हवा, आणि स्वत:ला निरीश्वरवादी म्हणवणारे विवेकाहून कोसो दूर आहेत. एखाद्या संप्रदायाचा भाव वाढावा, त्यातील वाईट/चुकीच्या पद्धती/विचारसरणींवर पडदा पडावा आणि लोकांना त्यातील सांप्रदायिक भावना चांगली वाटावी यासाठी कित्येक चांगल्या रुढी/प्रथा संप्रदायाच्या चौकटीत आणल्या जातातच. सांप्रदायिकतेवर चिकित्सा करताना या ब-यावाईट गोष्टींचं नीट वर्गीकरण करून नंतर मग फक्त वाईटावर टिकेची झोड उठवायला हवी. तसं न करता सरसकट सगळ्या संप्रदायालाच नावं ठेवून मोकळं व्हायचं हे काही बरोबर नाही. असा पवित्रा ठेवला तर संवाद अशक्य आहे.

संवाद घडवून आणण्यासाठी पूर्वपक्ष आणि उत्तरपक्ष करणं, चर्चा-वादांतील शिष्टाचार पाळणं हे आवश्यक असतं. दुर्दैवाने आपल्या टीव्हीवर दिसणा-या कोणत्याही चर्चांमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग होताना दिसत नाही. एकमेकांवर कुरघोडी करून स्वत:ची लोकप्रियता वाढवायची यातच सगळ्या बाजूचे विचारवंत रमलेले असतात. यात माझ्या स्वत:च्या आवडीचे विचारवंतही येतातच.

राजीव मल्होत्रांचे विचार कोणाला पटोत ना पटोत (मला बहुतेक पटतात), ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात - हे मान्य करायलाच हवं. सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणं हे काही सोपं काम नसतं. आणि तरीही कोणी वाकड्यात शिरलाच, तर मुद्दा मांडूनच त्याला उभा आडवा करायला ते अजिबात कचरत नाहीत. आपला मुद्दा योग्य असेल तर बाकी चाळे करायची गरज नाही, ही त्यांची भूमिका त्यांच्या आचरणातून दिसून येते. या कारणासाठी मला राजीव मल्होत्रा हे व्यक्तिमत्त्व अतिशय आदरणीय वाटतं.

हिंदूफोबियावरला त्यांचा हा व्हिडिओ पाहा.

त्यांचे इतर अनेक व्हिडिओज्‌ तुम्हाला त्यांच्या यूट्युब वाहिनीवर पाहायला मिळतील. तिथेच त्यांनी केलेल्या कार्याची आणि लिहीलेल्या पुस्तकांचीही माहिती मिळेल.

अशा माणसांना प्रसारमाध्यमांत प्रामुख्याने स्थान मिळायला हवं. पण प्रसारमाध्यमं तसं करत नसल्याने हे काम आपण करायला हवं. तुमची त्यांच्या विचारांबद्दलची आणि खुद्द त्यांच्याबद्दलची मतं प्रतिक्रियांमधून कळवा. जर तुम्हाला त्यांचं म्हणणं पटलं, तर व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, लिंक्ड.इन, ट्विटर, टेलिग्राम, गुगल प्लस, तुमचे स्वत:चे ब्लॉग्ज, मिसळपाव.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम, मनोगत.कॉम, मायबोली.कॉम आणि इतर जितकी सामाजिक प्रसारमाध्यमं आहेत, त्या सर्वांवर तुमच्या वैयक्तिक पातळीवर प्रचार करा आणि लोकांनाही प्रचार करण्यास उद्युक्त करा.

- कौस्तुभ अनिल पेंढारकर.
5 फेब्रुवारी 2017

धोरणमांडणीसंस्कृतीधर्मइतिहाससमाजजीवनमानशिक्षणविचारप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधलेखमतशिफारस

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

6 Feb 2017 - 9:16 am | जयन्त बा शिम्पि

पहिल्यांदाच हे नाव ऐकत आहे. त्यांच्याशी थोडा परिचय करुन घेतो आणि नंतर प्रतिक्रिया देतो. अर्थातच पहिल्या परिच्छेदातील मतांशी मीही सहमत आहेच.

इरसाल कार्टं's picture

6 Feb 2017 - 10:18 am | इरसाल कार्टं

घरी जाऊन व्यवस्थित बघतो आणि लिहितो.

संदीप डांगे's picture

6 Feb 2017 - 11:32 am | संदीप डांगे

राजीव मल्होत्रा, अभ्यासपूर्ण विचार मांडतात, बरेचसे पटतात..
त्यांची धर्मांची डायजेशन थेरी विशेषकरून आवडली होती... दम आहे त्यात.

गामा पैलवान's picture

7 Feb 2017 - 12:19 am | गामा पैलवान

वडापाव,

सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढण्यावरून हे चलचित्र आठवलं : https://www.youtube.com/watch?v=hNwPD0I5Tms

एन्जॉय.

आ.न.,
-गा.पै.

संदीप डांगे's picture

7 Feb 2017 - 12:49 am | संदीप डांगे

बिन्डोकपणाचा कळस आहे तो सुहेल सेठ... डिस्गस्टींग.
करिम्स् आणि रेल्वे साठी परदेशी आक्रमणातून झालेले अत्याचार जस्टीफाय करतो...

अनरँडम's picture

7 Feb 2017 - 10:03 pm | अनरँडम

भाषण पाहीले. काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत पण वस्तुस्थिती पडताळून पाहील्याशिवाय या व्यक्तिविषयी काही मत बनवणे कठीण आहे.

ते चर्चा-वादाचे शिष्टाचार पाळून संवाद साधतात, समोरच्याची संपूर्ण बाजू ऐकून घेतात, आणि मगच बोलतात

तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

मिहिर's picture

8 Feb 2017 - 4:35 am | मिहिर

तसे काही वाटले नाही. एक अमेरिकन माणूस त्यांना थोडेसे पेचात टाकणारे प्रश्न विचारत होता (साहित्यचोरीचा आरोप, शेल्डन पोलॉक या नामवंत संशोधकावर त्यांनी केलेले आरोप यासंबंधी.) तेव्हा श्री मल्होत्रा चवताळल्यासारखे बोलू लागले. त्या इसमास तो अ‍ॅडजंक्ट प्रोफेसर आहे, फक्त टेन्युअर नसल्याने टेन्युअर मिळवण्याकरता आरोप करत आहे, तो 'बी ग्रेडचा' मनुष्य आहे अशी विधाने (खरी की खोटी देव जाणे) करतांना श्री मल्होत्रा 'सभ्य शब्दांत समोरच्याची चड्डी काढणारे' न वाटता आक्रस्ताळेपणे प्रश्न विचारणार्‍या व्यक्तिचा अपमान करणारे वाटले. सिम्पथेटिक ऑडियन्स असल्याने धकून गेले असावे.

सहमत आहे. व्हिडिओतल्या भाषणावेळी मी तिथे प्रत्यक्ष उपस्थित होतो.
काही मुद्दे विचार करण्यासारखे वाटले, म्हणून राजीव मल्होत्रांचे इतर व्हिडिओ पाहिले आणि फेसबुक पानही काही काळासाठी फॉलो केले, तर प्रकरण तितकेही निरुपद्रवी नसल्याचे लक्षात आले. हिंदू धर्मावर टीका करणारे सरकसट हिंदूफोबिक, 'चार्वाक' किंवा पाश्चात्य ख्रिश्चन संस्कृतीने भारतीय हिंदू संस्कृती नष्ट करायचे जे षड्यंत्र रचले आहे त्याचे 'सेपॉय' ठरतात! चार्वाक हा शब्द शिवीसारखा वापरलेला मी पहिल्यांदाच पाहिला. मूळ चार्वाक जशी वेदांवर टीका करे, तसे हे आजचे चार्वाक (मल्होत्रांच्या उच्चारात चार्वक) मूळच्या चार्वाकाचे व्हर्जन क्र. २, पण पाश्चात्य लोकांचा पाठिंबा असलेले, त्यामुळे त्यांचा प्रतिकार केला पाहिजे वगैरे ..

इतकेच न थांबता, कुंभमेळे अजून मोठे झाले पाहिजेत, गुरूबिरू लोकांना सिद्धी प्राप्त झालेल्या असतात व त्यांना खरोखरीचे चमत्कार करता येतात वगैरेही सुरू होते. उदाहरणादाखल हे पाहा: https://www.facebook.com/RajivMalhotra.Official/videos/660957954057545/

हो. या सर्व बाबतींत मी नक्कीच असहमत आहे त्यांच्याशी.

पण, त्यांनी सुरु केलेला स्वदेशी इंडोलाॅजी परिषद हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे.

दुसरं असं, की शेल्डन पोलाॅकवर ते वैयक्तिक आरोप करत नाहीत. ते त्याच्या अभ्यासावर आणि अभ्यासामागच्या हेतुवर टीका करतात. वैयक्तिक ते त्याचं विद्वान माणूस म्हणून कौतुकच करतात. मी दिलेल्या व्हिडीओत तो मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला म्हणून राजीव मल्होत्राही तापले. इतर व्हिडीओत त्यांच्या विरोधी मतांच्या माणसांसोबतचं त्यांचं एकूण वर्तन पाहिलं तर ते कमालीचं सभ्य आहे असं दिसून येईल. उलट विरोधी मताच्या माणसांना आपल्या घरी बोलवून ते त्याच्यासोबत चर्चा करतात. उदा. मार्क टली.

दुसरं असं की जिथे जिथे पाश्चिमात्त्यांकडून atrocity literature च्या समर्थनार्थ काहीतरी "संशोधनात्मक उपक्रम" घेण्यात आलेले आहेत, तिथे तिथे ते हिरिरीने भारतीय बाजू चांगली दाखवायचा प्रयत्न करतात. त्यांचं सगळंच म्हणणं पटायला ते काही देव नाहीत - असते तर माझा त्यांच्यावर बिलकुल विश्वास बसला नसता. पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं आणि चर्चेचा विषय व्हावं असं वाटतं.

अनरँडम's picture

8 Feb 2017 - 7:25 pm | अनरँडम

मार्क्सिस्टवादी प्रोफेसर चढला

'चढला'! (तुम्ही तरी शब्द जरा जपून वापरू शकता) असे काही वाटले नाही. मिहिर यांनी प्रत्यक्षच्क्ष्ह तो प्रकार पाहीला असल्याने आणखी काही स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.

पण या माणसाचं भारतीयांच्या identity crisis आणि complex बाबतचं म्हणणं जास्तीत जास्त लोकांसमोर यायला हवं

शेल्डन पोलॉक हे फिलॉलॉजिस्ट आहेत. गेली कित्तेक वर्षं ते भारतातल्या धनाढ्य राजघराण्यांकडून काही महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यासाठी श्री मलहोत्रांसारखे लोक त्यांना मदत करत असल्याचे ऐकिवात नाही. तेही असो. पण 'भारतीयांचा identity crisis आणि complex' (हे विषय मला वाटतं अनिवासी भारतीयांच्या दुसर्‍या पिढीतल्या लोकांसाठी attractive product आहे) या विषयावर ते तोंडी लावल्यासारखे पूसट काहीतरी बोलतात. जरा स्पष्ट करून तुम्हीतरी सांगा त्यांचं काय मत आहे या विषयावर.

अनरँडम's picture

8 Feb 2017 - 7:27 pm | अनरँडम

बाय द वे तो प्रोफेश्वर 'मार्क्सिस्ट' (मार्क्सिस्ट किंवा मार्क्सवादी पण 'मार्क्सिस्टवादी' नाही) हे तुम्हाला कसे कळले?