न्यू यॉर्क : ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in भटकंती
24 Aug 2016 - 9:58 pm

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

न्यू यॉर्क हे अमेरिकेच्या पूर्व किनार्‍यावरचे एक शहर. जगप्रसिद्ध शहरांच्या यादीत नाव असलेल्या या शहराच्या नावाभोवती एक वेगळेच वलय आहे, हे नि:संशय. त्याला विविध कारणे आहेत आणि त्यातल्या एक किंवा अनेक कारणांनी हे शहर पर्यटकांच्या यादीत बर्‍याच वर, किंबहुना पहिल्या स्थानावर असते. अश्या शहराची काहीशी दीर्घ भेट आटपून नुकताच परतलो आहे. अर्थातच त्या भेटीत न्यू यॉर्कमध्ये बरीच भटकंती झाली, त्या शहराचा भरपूर आनंद उपभोगला, थोडक्यात "जीवाचे न्यू यॉर्क केले !" तो अनुभव वाचकांबरोबर वाटून त्या आठवणींचा आनंद परत अनुभवण्याचा मोह आवरला नाही यात आश्चर्य ते काय ? असो.

अमेरिकेला जायचे नक्की झाले आणि अर्थातच इतर तयारीबरोबर काय काय पहायचे याचा विचार सुरू होणे अपरिहार्य होता. पूर्वी एकदा अमेरिकासफर झाली होती. तेव्हा पूर्व किनारा ते पश्चिम किनारा चवीने बघून झाले होते. शिवाय या सफरीचा मुख्य हेतू आमच्या युवराजांना भेटणे आणि त्यांच्या सोबत काळ व्यतीत करणे हाच होता. त्यामुळे, भेट देण्याच्या जागांची फार मोठी यादी नव्हती. अमरिकेच्या उत्तर-पश्चिम भागात असलेल्या राष्ट्रीय उद्यानांची १५ दिवसांची एक सहल करण्याची माझी इच्छा होती. पण ते नक्की करेपर्यंत त्या सहलींतल्या ऑक्टोबरपर्यंतच्या जागा संपून गेल्या. उगाच हट्टाने फिरायला जायचेच म्हणून कोठेतरी भटकंती करण्यात माझा रस नव्हता. त्यामुळे, "न्यू यॉर्क न्यू यॉर्क म्हणजे आहे तरी काय, हे संपूर्ण शहर पिंजून काढून पाहूया." असा विचार पक्का झाला. अर्थात असे केल्याने भेटीचा सर्व वेळ मुलाबरोबर राहता येईल हा गुप्त स्वार्थ होताच !

अमेरिकेला जायचे तर व्हिसा काढणे आलेच. या बाबतीत साधारणपणे जरा धडकी भरेल अश्या कहाण्या सांगितल्या जातात. मात्र या प्रकरणाची जनमानसात जी हवा आहे त्यापेक्षा ते खूपच सरळ आणि सोपे असल्याचा अनुभव आला. अमेरिकन दूतावासाच्या संस्थळावरील अर्ज भरा, संस्थळावरच किंवा त्यांनी दिलेल्या यादीतील एका बँकेत व्हिसा प्रोसेसिंग फी भरा आणि संस्थळावरून अनुमती आली की आपल्याला सोयीच्या जागेवरील काउंसलेटमध्ये मुलाखतीची वेळ घ्या, बस्स. मुंबईमधल्या काउंसलेटमध्ये १५ दिवसांच्या आतली मुलाखतीची वेळ मिळाली.

मुलाखतीच्या दिवसाच्या कमीत कमी एक दिवस अगोदरची वेळ घेऊन VFS या वकिलातीच्या मान्यताप्राप्त एजंट कंपनीच्या मुंबईतील कार्यालयात बोटांचे ठसे देणे व फोटो काढून घेणे करावे लागते, तेही सोपस्कार पूर्ण केले.

दुसर्‍या दिवशी, मुलाखतीला आलेल्या लोकांची काऊंसलेटबाहेरची मारुतीच्या शेपटीसारखी लांबच लांब रांग पाहून "आता दिवसभर इथेच जाईल" असे वाटले. मध्ये मध्ये थांबत थांबत, पण तरीही फार मोठे थांबे न घेता न घेता रांग पुढे पुढे जात राहिली आणि थोड्याच वेळात काऊंसलेटच्या अंतर्भागात पोहोचलो. तेथे रांग थांबली असताना बसायची व्यवस्थाही होती, हे पाहून बरे वाटले. फार खोळंबा न होता एकून अर्ध्या-पाऊण तासातच मुलाखतीच्या दालनात पोहोचलो. तेथे रांगेत उभे असताना आमच्या पुढे असलेल्या तरुणीच्या चाललेल्या मुलाखतीतील संभाषण ऐकू येत होते. अमेरिकेत शिकत असलेल्या मुलाशी तिचे दोन-तीन महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. ती मोठ्या कळकळीने सगळी माहिती अधिकार्‍याला सांगत होती. पण, "शिकत असलेला तिचा नवरा त्या दोघांचा आर्थिक भार कसा उचलेल ?" याबाबत अधिकार्‍याची समजूत पटवून देण्यात ती अयशस्वी ठरली. अधिकार्‍याने "सॉरी मॅडम, मी तुम्हाला व्हिसा देऊ शकत नाही" असे म्हणत पासपोर्ट परत करून तिची बोळवण केली. हे सगळे कान देऊन ऐकत असलेल्या आमच्या गृहमंत्र्यांवर त्याचा प्रभाव पडलाच ! "आता असं झालं तर काय?" अश्या प्रश्नाला "तिची आणि आपली परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. तेव्हा उगाच काळजी करू नको" असे म्हणत आम्ही मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍यासमोर गेलो.

"(अ) आपल्या देशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा (आ) आपल्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा (इ) आपल्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" ही काळजी घेणे हे वकिलातीतील व्हिसा अधिकार्‍यांचे मुख्य काम असते, हे माहीत होते. शिवाय, अगोदरच्या अमेरिका भेटीच्या वेळच्या मुलाखतीचा आणि त्या वेळेस मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍याशी झालेल्या किंचित बाचाबाचीचा अनुभव होता. ;) त्यामुळे मी बर्‍यापैकी निर्धास्त होतो. मात्र, त्याच बरोबर, तो अनुभव वेगळ्या देशातील वकिलातीतील होता आणि "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे सुद्धा पुरेपूर माहीत होते. त्यामुळे, अनावश्यक अतीआत्मविश्वासही नव्हता.

वकिलातीचे सर्व अमेरिकन अधिकारी खूपच विनयशीलपणे वागताना दिसले. स्मितहास्यपूर्वक 'गुड मॉर्निंग' ने स्वागत झाले. मुलाखतीचे सोपस्कार आटपताना एखादा टोकदार प्रश्नही सौम्य शब्दांत आणि 'सर' वगैरे संबोधने सढळपणे वापरून केला गेला. एकंदरीत वरिष्ठतेचा किंवा तुच्छतेचा आविर्भाव चुकूनही दिसला नाही. याविरुद्ध, काऊंसलेटमधल्या भारतीय सुरक्षाकर्मचार्‍यांची वागणूक बर्‍यापैकी उद्धट आणि काही वेळेस चीड आणणारी होती. अमेरिकन काऊंसलेटमध्ये आपण व्हिसा घ्यायला आलो आहोत या कारणाने लोक त्यांची वागणूक नाईलाजाने शांतपणे सहन करत होते.

पाचेक मिनिटांची मुलाखत संपल्यावर "तुम्हाला व्हिसा दिला आहे, पाच दिवसांत पासपोर्ट ताब्यात मिळेल" हे आश्वासन मिळाले. काम संपवून "अरे वा ! हे प्रकरण तर खूपच सोपे आहे" असा विचार करत इमारतींबाहेर पडलो. त्याच वेळेस अजून एक गोष्ट ध्यानात आली की, "अरेच्च्या, मुलाखतीत भरभक्कम पुरावे असावे म्हणून आणलेली बर्‍यापैकी जाड फाइल तर सर्व वेळ बॅगेतच होती." आठवडाभर परिश्रमाने तयार केलेल्या कागदपत्रांना पाहणे तर दूरच, पण मुलाखतीत त्याबद्दल काही प्रश्न किंवा त्यांचा साधा उल्लेखही होऊ नये ?! काय हे !! ;) पण, व्हिसा मिळाल्याच्या आनंदात ही गोष्ट विसरायला फार वेळ लागला नाही.

व्हिसाचा अर्ज करताना संस्थळावर असलेल्या यादीतील आपल्याला सोयीच्या ठिकाणाची "पासपोर्ट परत ताब्यात घेण्याचे ठिकाण (पासपोर्ट कलेक्शन सेंटर)" अशी निवड आपण करू शकतो. पुण्यातल्या सोहराब हॉल (पुणे स्टेशन) येथील VFS चे कार्यालय असे एक कलेक्शन सेंटर आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरातील लोकांची एक मुंबई फेरी वाचते. व्हिसासह पासपोर्ट तेथे पोहोचला की नाही हे आपल्याला वकिलातीच्या संस्थळावर पाहता येते.

मुलाखत शुक्रवारी असल्याचा फायदा घेत शनिवार-रविवार ठाण्यातील नातेवाइकांचा पाहुणचार घेऊन सोमवारी दुपारी पुण्यात घरी पोचलो. सोमवार म्हणजे मुलाखतीनंतरचा कामाचा पहिलाच दिवस होता. तरी साधारणपणे दुपारी दोन वाजता घरी पोहोचल्यावर वकिलातीच्या संस्थळावर डोकावण्याचा मोह झालाच ! अहो आश्चर्यम्, तेथे "पासपोर्ट पुण्याला पोहोचला आहे आणि तो घेऊन जाऊ शकता" अशी सूचना होती ! पासपोर्ट हातात आल्यावर पाहिले तर व्हिसावरची तारीख मुलाखतीच्या दिवसाचीच होती.

थोडक्यात, लोकहो, "परदेशात जाणारी व्यक्ती तेथे अवैधरीत्या राहणार नाही आणि/किंवा त्या देशाच्या हितसंबंधांना धोका पोहोचविणार नाही आणि/किंवा त्या देशावर आर्थिक भार ठरणार नाही" हे तुमच्या बाबतीत खरे असले आणि मुलाखत घेणार्‍या अधिकार्‍याला ते आपल्या बोलण्याने व कागदपत्रांनी पटवू शकलात तर अमेरिकनच काय पण कुठल्याच देशाच्या व्हिसाचा फार धसका घेण्याची गरज नाही. मात्र, "कोणतेही कारण न देता कोणालाही व्हिसा नाकारण्याचे अधिकार सर्वच देशांच्या वकिलातींना असतात", हे तत्त्व लक्षात ठेवून अनावश्यक अतीआत्मविश्वासही टाळणे जरूर आहे. असो.

व्हिसा हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यावर तुलनेने सहजपणे होणार्‍या इतर गोष्टी पुर्‍या करणे आले. त्यातल्या मुख्य गोष्टी म्हणजे...

१. विमानाचे रिटर्न तिकीट : हे हल्ली घरबसल्या आंतरजालावरूनही मिळते. दोनतीन महिने अगोदर जालावर थोडे संशोधन केले तर आपल्या आवडीची विमान कंपनी व सोयीचा प्रवासाचा दिवस आणि तिकिटाची किंमत यांचे चांगले नियोजन करता येते. माझ्यासारखा सतत विमानाच्या खिडकीबाहेर डोकावयाचा नाद असला तर मोक्याची खिडकीजवळची जागाही पटकावता येते !

२. पर्यटन वैद्यकीय विमा : हा प्रत्येक परदेशी सहलीचा महत्त्वाचा भाग असतो. बहुतेक सर्व पाश्चिमात्य देशांत व्हिसासाठी अर्ज करताना पर्यटन वैद्यकीय विम्याची पॉलिसी जोडणे आवश्यक असते. अमेरिकन व्हिसासाठी असे करावे लागले नाही. तरीही, अमेरिकेतल्या वैद्यकीय सेवांचे गगनाला भिडणारे दर पाहिले तर अमेरिकेत वैद्यकीय विम्याविना जाणे हा वेडेपणा समजायला हरकत नाही.

३. परकीय चलन : आजकाल ही फार मोठी समस्या राहिलेली नाही. अनेक बँकांमध्ये आणि नॉन-बँकिंग संस्थांमध्ये परकीय चलन मिळू शकते. यासाठी "ट्रॅव्हल कार्ड" ची सोयही आहे. पाच-दहा डॉलर्सचाही व्यवहार कार्डाने होणार्‍या अमेरिकेसारख्या देशामध्ये असे कार्ड फार सोयीचे व सुरक्षिततेचे आहे. परदेशात फिरताना जालावर (ऑनलाईन) स्थानिक सहल, शोचे तिकिट, इ खरेदी करायची असेल तर मात्र असे कार्ड नीट चौकशी करून घ्यावे. सर्व कार्डे प्रत्यक्ष खरेदीच्या जागी (पॉइंट ऑफ सेल) स्वाईप करता येतात. परंतू, काही कार्डांची ऑनलाईन खरेदी करू शकू अश्या संस्थळांची यादी बरीच मर्यादित असते.

सर्वसाधारणपणे व्हिसा मिळाला की त्या देशातला प्रवेश गृहित धरायला हरकत नसते. मात्र पासपोर्टवरचा अमेरिकन व्हिसा ही केवळ "अमेरिकेच्या दिशेने प्रवास करण्याची परवानगी" असते. अमेरिकेच्या प्रवेशव्दारावर असलेल्या आगमन-निर्गमन अधिकार्‍याला (एंट्री पॉइंट इमिग्रेशन ऑफिसरला) प्रवाश्याची फेरतपासणी करून अमेरिकेत प्रवेश नाकारता येतो. या संदर्भात वरच्या तीन गोष्टी आपल्या बाजूने भरभक्कम असणे फायद्याचे ठरते.

सर्व तयारी झाली. या फेरीत, नेहमीच्या भटकंतीप्रमाणे सतत फिरत न राहता, फक्त न्यू यॉर्कमध्येच ठिय्या मारून राहायचे असल्याने इतर बर्‍याच गोष्टींचे महत्त्व तुलनेने कमी होते. आम्ही येतोय म्हणून लेकाने मॅनहॅटनमध्येच एक फ्लॅट भाड्याने घेतला अशी खबर दिली आणि सगळे टिक् मार्क्स पुरे झाले. आता निघण्याच्या दिवसाची वाट पाहणे सुरू झाले.

******

आला एकदाचा प्रवासाचा दिवस आणि आम्ही मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दोन क्रमांकाच्या स्थानकाककडे (टर्मिनल २) निघालो. मुंबईतील गर्दीचा सामना करत करत स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर येताच हे स्थानक खरोखर आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे याची चुणूक दिसायला सुरुवात झाली...

जसजसे पुढे गेलो तसतसे ती समजूत पक्की होत गेली...

या स्थानकाची माध्यमांत जी तारीफ केली गेली ती खरी असल्याचे दिसून आले आणि उड्डाण करण्याअगोदरच भारताच्या भूमीवरच विकसित देशातल्या व्यवस्थेचा अनुभव आल्याने उर अभिमानाने भरून आला...

विमानतळावरची व्यवस्था गेल्या चारपाच वर्षांत बरीच सुधारलयाचा अनुभव होताच. पण या नवीन स्थानकावरची व्यवस्था अजून चांगल्या प्रतीची असल्याचा अनुभव आला. त्यामुळे सगळे सोपस्कार संपवून शिवाय आरामात कॉफीपानाचा आनंद घेऊन बरोबर वेळेवर निर्गमनद्वाराजवळ पोहोचलो आणि काही वेळातच विमानात स्थानापन्न झालो. यावेळीही नेहमीप्रमाणेच खिडकीजवळची जागा राखून ठेवली होती हे सांगायला नकोच !...

खिडकीतून थोडेसे आजूबाजूचे निरीक्षण होते न होते तोच विमानाने बरोबर ठरलेल्या वेळी आकाशात झेप घेतली आणि आम्ही न्यू यॉर्कच्या दिशेने मार्गस्थ झालो. विमानाचा नकाश्यावरील मार्ग भारतातील महाराष्ट्र व गुजरातवरून उड्डाणाची सुरुवात करत नंतर पाकिस्तान-अफगाणिस्तान-तुर्कमेनिस्तान-रशिया-स्वीडन-नॉर्वे असा उत्तरपश्चिमेकडे जात जात नॉर्वेजियन समुद्रावर पोहोचल्यावर दिशा बदलून बदलून दक्षिणपश्चिमेला वळून कॅनडा व नंतर अमेरिका असा होता...

रात्री ११:२० ला प्रवास सुरू होऊन दुसर्‍या दिवशी पहाटे ५:४० न्यू यॉर्कला पोहोचलो. या जवळ जवळ १६ तासांत विमान सूर्याच्या पुढे पुढे पळत राहिल्याने सतत अंधारातच प्रवास झाला. स्वीडनवरून उडताना मागच्या बाजूने थोडेसे झुंजूमुंजू झालेले दिसले...

पण जमिनीवरचे स्वच्छ दिसेल इतका उजेड नव्हता. त्यामुळे खिडकीजवळ बसूनही रशिया आणि स्कॅडेनेव्हिया यांच्या भूभागांचे हवाई सर्वेक्षण करण्याचा मनसुबा धुळीला मिळाला. शिवाय तेथे ढगांचे इतके दाट आवरण होते की बाल्टीक समुद्रातली काही अस्पष्ट बेटे...

आणि एका ठिकाणी नॉर्वेचा बर्फाळ भूभाग इतकेच काय ते दिसले...

कॅनडाचा सर्व भूभाग ढगांची जाड गोधडी पांघरून गाढ झोपी गेला होता. त्यामुळे त्याचेही दर्शन झाले नाही. बरेच दक्षिणेकडे येऊन विमान अमेरिकेवरून उडू लागले तेव्हा कोठे जमिनीवरचे लुकलुकते दिवे दिसू लागले...

न्यू यॉर्क जवळ आले, विमानाने उंची कमी केली आणि पहाटेच्या अंधुक उजेडात खालच्या शहरातल्या दिव्यांची रोषणाई पाहत असताना न्यूअर्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केव्हा उतरलो ते घ्यानातच आले नाही. हा विमानतळ न्यू यॉर्क राज्याला लागून असलेल्या न्यू जर्सी या राज्यात आहे. परंतु तो न्यू यॉर्क शहराच्या इतका जवळ आहे की न्यू यॉर्क शहरातले दोन (जे एफ के आणि ला ग्वार्दिया) व हा एक असे तीन आंतरराष्ट्रीय विमानतळ दळणवळणाच्या दृष्टीने न्यू यॉर्कचेच विमानतळ गणले जातात ! या विमानतळाचे व्यवस्थापनही Port Authority of New York and New Jersey ही संस्था पाहते.

आगमनाचे सर्व सोपस्कार आटपून बाहेर पडेपर्यंत तासभर लागला. मुलगा विमानतळाबाहेर वाट पाहत असल्याचा फोन आला होताच. त्यामुळे बाहेर पडताच रुंद गुळगुळीत रस्त्यांवरून हिरवाईने भरलेल्या न्यू जर्सीतून प्रवास सुरू झाला...

मधूनच एखादी वस्ती लागत होती...

अर्ध्या एक तासात जॉर्ज वॉशिग्टन पूल ओलांडून आम्ही न्यू यॉर्क शहरातील मॅनहॅटन बेटावर पोहोचलो...

थोड्याच वेळात ब्रॉडवेवर आलो...

...आणि दहा एक मिनिटांत बेनेट अव्हेन्युवरच्या घरी पोहोचलो. पुढच्या तीन महिन्यांत न्यू यॉर्क शहर व परिसरांवर करायच्या चढायांसाठीची ही आमची मुख्य छावणी होती.

(क्रमश :)

===============================================================================

न्यू यॉर्क: ०१ : पूर्वतयारी आणि प्रस्थान... ०२ : शहराची तोंडओळख... ०३ : जर्सी सिटीचा फेरफटका...
              ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर... ०५ : टाईम्स स्क्वेअर... ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधील पदविदान समारंभ...
              ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-१... ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-२... ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन-३...
              १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा... ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-१...
              १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय-२... १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क... १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय...
              १५ : हेदर गार्डन... १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'... १७ : सेंट्रल पार्क-१...
              १८ : सेंट्रल पार्क-२... १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा... २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास...
              २१ : वेस्ट हेवन... २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापीठे... २३ : नॅशनल म्युझियम ऑफ अमेरिकन इंडियन...
              २४ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-१... २५ : ब्राँक्समधिल न्यू यॉर्क बोटॅनिकल गार्डन-२...
              २६ : ब्राँक्स प्राणिसंग्रहालय... २७ : रॉकंफेलर सेंटर... २८ : रॉबिन्सव्हिलचे स्वामिनारायण अक्षरधाम मंदिर...
              २९ : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-१... ३० : अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी-२...
              ३१ : सेंट बार्टचे चर्च... ३२ : न्यू यॉर्क ट्रांझिट म्युझियम... ३३ : सेंट पॅट्रिकचे कॅथेड्रल...
              ३४ : काँक्रिटच्या आधुनिक जंगलात दोन शतकांपेक्षा अधिक काळ जपून ठेवलेले डिक्मान फार्महाउस...

===============================================================================

प्रतिक्रिया

क्या बात क्या बात !! तुमच्या भटकंती सीरिज वाचणं हा एक अनुभव असतो .. न्यु यॉर्क ला जाऊन आले आहे पण तुमच्या नजरेतुन वाचायला उत्सुक आहे. पुढच्या ट्रिप मध्ये एखादा तरी तुमच्या लेखातला स्पॉट नव्याने बघेन :)

ट्रेड मार्क's picture

26 Aug 2016 - 11:57 pm | ट्रेड मार्क

न्यूयॉर्क मध्ये ३ वर्ष काम केलं आहे त्यामुळे बऱ्याच जागा माहिती आहेत. पण तुमच्या नजरेतून परत एकदा बघायला मिळेल ही पर्वणीच आहे. जमल्यास कधीतरी माझे अनुभव लिहिण्याचा विचार आहे.

प्रचंड विविधता आणि तेवढेच विविध अनुभव देणारं महानगर आहे ते. वेगवेगळे ऋतू - स्प्रिंग, फॉल, स्नोफॉल आणि त्यात येणारी स्टॉर्म व टोर्नेडो व त्यात स्थानिक लोक आणि सरकार कसं म्यानेज करतात हे पण अनुभवण्यासारखं असतं.

उडन खटोला's picture

27 Aug 2016 - 7:40 am | उडन खटोला

एयर इंडिया ची फ्लाइट पोचली पण.... काका येऊ द्या लौकर लौकर.
(लोकांनादेखील धान्दरट पणा, गोंधळ, गॉसिप, दुसऱ्याला श्या देणं आवडतं तर एकंदर ;), हलकं घ्या नका घेऊ कसंही)

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2016 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

दुसरा भाग लिहायला सुरुवात केली आहे. टाकतो लवकरच.

सिरुसेरि's picture

27 Aug 2016 - 11:01 am | सिरुसेरि

छान प्रवास माहिती . "कोलंबस कोलंबस छुट्टी है आयी ..आओ कोई नया मुल्क धुंडे चलके भाई" असे गाणे आठवले .

अभ्या..'s picture

27 Aug 2016 - 11:46 am | अभ्या..

भारीच की एक्काकाका,
ह्या फोटोतले निम्मे तर स्वतः पाह्यलेले आहेत. ;)
उरलेल्या निम्म्यासाठि थोडे वाट पाहणे आले.

स्वाती दिनेश's picture

27 Aug 2016 - 5:11 pm | स्वाती दिनेश

सुरूवात छानच! वाचते आहे.
स्वाती

तेजस आठवले's picture

27 Aug 2016 - 5:43 pm | तेजस आठवले

तुमच्या नजरेतून नायगाराचे वर्णन येऊ द्या. मला न्यूयॉर्क फारसे आवडले नाही परंतु नायगाराचे विशाल रूप बघून आपल्या थिटेपणाची जाणीव होते. cave of the winds अजिबात चुकवू नका. त्या विशाल धबधब्याचे पाणी अंगावर घेणे हा एक सुखद अनुभव आहे. अक्षरशः धप्प धप्प करत ते पाणी आपल्या अंगावर पडते. नक्की लिहा.
अजून एक, जर शक्य असेल तर रात्री साडेनऊ/ दहा नंतर परत एकदा पार्क मध्ये जा. अमेरिका आणि कॅनडा दोन्ही बाजूनी विविधरंगी प्रकाशझोत सोडलेले असतात. अतिशय छान दिसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Aug 2016 - 9:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

धन्यवाद !

नायागारा रात्रीच्या रोषणाईसह मागच्या फेरीत पाहिला होता. त्यामुळे यावेळेस तिथे गेलो नाही. किंबहुना लेखात लिहिल्याप्रमाणे या वेळेस न्यू यॉर्क शहर सोडून आजूबाजूच्या फक्त दोन तीन ठिकाणांनाच भेट दिली.

कैलासवासी सोन्याबापु's picture

27 Aug 2016 - 9:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

100!!

पैसा's picture

3 Sep 2016 - 10:15 am | पैसा

झकास!