विद्रोही साहित्य संमेलन, एक सोडून दोन दोन झाली होती तेव्हा, "च्यामारी, काय आचरटपणा आहे हा", असाच विचार मनात आला होता. खरं म्हणाल तर ही नेमकी भानगड काय आहे तेच कळली नव्हती.
शोषित समाजातील काही उच्चविद्याविभूषित लोकांनी लिहिण्याचा प्रयत्न केला. त्या लिखाणातून त्यांनी त्यांचे विश्व जे, बहुसंख्य जनतेचे होते, ते उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला. ते तसे करताना त्यांनी साहित्याची जनमान्य भाषा न वापरता त्या विश्वातील दैनंदिन भाषा, लहेजा, वाक्प्रचार, शिवराळपणा सहजपणे वापरला. तो पर्यंतच्या साहित्यात असे काही नव्हते, त्यामुळे एक आगळा प्रयोग म्हणून त्याकडे नजरा वळणे साहजिकच होते. त्यामुळे त्या लिखाणाला मान्यता मिळाली आणि बरेच जण पुढे होऊन धीटपणे त्या प्रकारचे लेखन करू लागले.
इथं पर्यंत ठीक होते. एक वाचक म्हणून वाचकाला प्रस्थापित साहित्याबरोबरच एक आगळा साहित्यप्रकार अनुभवायला मिळून त्याचे अनुभवविश्व समृद्ध होण्याचा एक मार्ग खुला झाला होता. पण पुढे त्याला लागू नये ते वळण लागले. ते मुख्यत्वे राजकीय छापाचे आहे. त्या नंतर तो गट प्रबळ होत गेला. खरेतर हे साहित्य समृद्धतेचे आणि प्रगतीचे लक्षण असायला हवे होते. पण वाचकांच्या दुर्दैवाने तसे न होता 'एकाने गाय मारली तर दुसर्याने लगेच वासरू मारावे'अशा मार्गाने तो गट एका चळवळीचे रुपडे घेऊन पुढे आला. पुढे ते त्यांना विद्रोही असे म्हणवून घेऊ लागले.
पण मुळात विद्रोही म्हणजे काय? आणि विद्रोही साहित्य म्हणजे काय? ह्यावर त्या गटातच एकवाक्यता नाही असे मला वाटत होते कारण मलाही हे विद्रोही साहित्य म्हणजे शोषित समाजातील लेखकांनी लिहिलेले साहित्य असेच वाटायचे. म्हणजे त्याची व्याप्ती तेवढीच मर्यादित होते होती. त्यामुळे ह्या वर्षी एक सोडून दोन विद्रोही साहित्य संमेलन होणार म्हटल्यावर हसूच आले होते. अरे, प्रस्थापितांविरुद्ध विद्रोह करून परिवर्तन आणायचे आहे ना? मग निदान चूल तरी एक मांडा अशा मताचा मी होतो. त्यामुळे एक आचरटपणा ह्यापलीकडे त्याकडे लक्ष द्यावे असे मला कधीही वाटले नाही. कारण चिपळूणच्या संमेलनाच्या 'परशू' वरून झालेला गोंधळ आणि नंतर विद्रोही साहित्य संमेलनातील मान्यवरांनी तोडलेले तारे ह्यामुळे हा सगळा फार्स आहे असेच मला वाटते.
खरेतर कोणतेही साहित्य संमेलन का? हाच मूलभूत प्रश्न मला छळतो. ह्या संमेलनामुळे रसिकांचे आणि वाचकांचे काय भले होते हेच मला कळलेले नाही. पण त्यामुळे हे प्रस्थापित आणि विद्रोही ह्यांच्या मत-मतांतराच्या भुलभुलैयात न फसण्याचे मी माझ्यापुरते ठरवले होते.
पण आज एका मित्राने खालील चित्रफीत पाठवली आणि वैचारिक गोंधळ काहीसा कमी होण्यास मदत झाली. भालचंद्र नेमाड्यांना मिळालेल्या जन्मस्थान पुरस्काराच्या सोहळ्यात त्यांनी केलेले हे भाषण आहे. त्यात त्यांनी व्यवस्था म्हणजे काय आणि त्यात कसे परिवर्तन अपेक्षित आहे हे अतिशय सुंदर समजावून सांगितले आहे.
ह्या भाषणात त्यांनी भारतातील सर्व वर्गातील स्त्रियांनी राम मंदिराला विरोध करायला हवा असे म्हटले आहे. ते तसे का? तेही त्यांनी त्या भाषणात मांडले आहे. ते ऐकल्यावर मला एकदम डॅन ब्राउनची दा-विंची-कोड ही कादंबरी आठवली. त्यात त्याने मांडलेली थियरी आठवली. त्याने मांडलेली ती थियरी प्रस्थापित चर्चच्या मतांशी द्रोह जरी असला तरीही तो त्याच्या मतांनी विद्रोही ठरतो कारण तो प्रस्थापित चर्चव्यवस्थेच्या वेगळे होऊन काही मांडू इच्छितो.
ह्या भाषणाने, विद्रोही आणि विद्रोही साहित्य म्हणजे नेमके काय असायला हवे, ह्याबद्दल माझ्या मनात एक नक्कीच वेगळी विचारधारा सुरू व्हायला मदत झाली आहे.
प्रतिक्रिया
10 Mar 2013 - 3:54 pm | कवितानागेश
:)
स्वगत: जागतेऽऽऽऽ रहोऽऽऽऽऽ .........
10 Mar 2013 - 4:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विद्रोही साहित्य संमेलने एकाचवेळी एकच नव्हे तर एकाच वेळी दहा जरी झाली तरी एक साहित्याचा वाचक म्हणून त्यात काही 'आचरटपणा' आहे, असे व्यक्तिगत मला वाटत नाही. परिवर्तनाशी बांधिलकी माननारा विचार विद्रोही साहित्याने दिला. साहित्यातील एक संकुचितपणा तोडून सामान्य माणसाशी नाते जोडणारे साहित्य दिले.मराठी भाषेला समृद्धी दिली. मराठी शब्द-कोशात नसलेले असंख्य शब्द,शब्दप्रयोग, साहित्यकृतीतून आले. समग्र जीवनाचे भान देण्याचे काम विद्रोही साहित्याने दिले. देव्,ऋषि,पुराण-पुरुष, यांच्यापेक्षाही माणसाच्या सुख दु:खाचा विचार मांडायचे भान विद्रोही साहित्याने दिले माणूस साहित्याचा केंद्रबिंदु मानला. विषमता,अन्याय,माणसाचे शोषण याविरुद्धचा विचार विद्रोही साहित्यात दिसून येतो. एक विचार अनेक विचारपीठावरुन येत असेल तर त्यात काही वावगे नाही.
बाकी, भालचंद्र नेमाडे मोठं व्यक्तिमत्त्व आहे. रामाने सितेला छळलं म्हणून स्त्रियांनी राममंदिराला विरोध केला पाहिजे. साहित्य संमेलनातून साहित्यिकांना येऊ देऊ नये, हिंदु संस्कृतीतीतील अनिष्ठ रुढींविरुद्ध बंड केले तरच हिंदु संस्कृती टीकेल. देशीवाद, मौखिक साहित्यातील देशीवाद अशा कितीतरी त्यांच्या बोलण्यातल्या आवडीच्या गोष्टी आहेत, तेव्हा त्यांना त्यांच्या जागेवरुन विचार मांडतांना रसिक म्हणून काही वेगळे वाटत नाही.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2013 - 6:56 pm | चौकटराजा
कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो व संघटित नसतो. या तिन्ही दुर्गुणांचे प्रॉडक्ट जेवढे त्याच्या बाबतीत तेवढा तो अधिक शोषित राहतो.
निरबुद्धाला उपद्रव मुल्य नसते. आळशालाही उपद्रव मुल्य नसते ( कारण उपदद्रव मुल्य हे उपयुक्ततेतून येते )व असंघटिताला तर नसतेच नसते. "शिका ,संघर्ष करा, संघटित व्हा " याचा अर्थ हा असा आहे.
10 Mar 2013 - 9:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> कोणताही माणूस( त्यात स्त्री ही आली, त्यात सीता आली द्रौपदी ही आली ) शोषित का असतो. शिंपल .न्रिर्बुद्ध असतो, आळशी असतो...
छ्या...!
-दिलीप बिरुटे
10 Mar 2013 - 10:20 pm | पैसा
राम मंदिर वगैरे नंतर बघू. विद्रोही साहित्य म्हणजे काय? चालत आलेल्या व्यवस्थेपेक्षा वेगळा काही विचार करणारं ते विद्रोही साहित्य म्हणायला हरकत नाही. फक्त साहित्यातून सामाजिक परिवर्तन वगैरे होतं का? वादाचा मुद्दा आहे.
पाहू गेल्यास वेदांचा आणि भगवद्गीतेचा अर्थ प्राकृत मर्हाटीत सांगणारे तुकोबा आणि ज्ञानश्वर हे पहिले विद्रोही म्हटले पाहिजेत. त्यांच्या साहित्यातून आणि वागण्यामुळे काही प्रमाणात तरी समाज परिवर्तन व्हायला मदत झाली. नंतरच्या काळात केशवसुत हे पण विद्रोही म्हटले पाहिजेत.
अलिकडच्या काळात विद्रोही साहित्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली. त्यातही मराठी लोकांच्या खास स्वभावाप्रमाणे गट पडणे वगैरे प्रकार झाले. चालायचंच. फक्त हे विद्रोही साहित्य एका साच्यात अडकत आहे का? तसे झाल्यास तोही प्रस्थापित साहित्याचा प्रकार होणार नाही का? त्याला 'विद्रोही' हे लेबल आणखी किती दिवस लावता येईल?
11 Mar 2013 - 11:44 pm | आजानुकर्ण
नेमाड्यांचे भाषण अत्यंत झकास. शिवाजीसंदर्भातील टिप्पणी विशेष आवडली. मदारी मेहतर, काझी हैदर, नूरखान बेग,
इब्राहिमखान गारदी वगैरे शिवाजीच्या अत्यंत विश्वासातील आणि महत्त्वाच्या पदांवरील, स्वराज्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या मुसलमानांची प्रेरणा घेऊन सध्याच्या मुसलमानांनी शिवाजीची आयडेंटिटी क्लेम करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे शिवाजीनेच बांधलेल्या अफजलखानाच्या कबरीचे वादही मिटवता येतील. रामाबाबतचे 'कृष्ण हा एक मामुली डायवर होता वगैरे' पठडीतील वक्तव्य हे खास नेमाडे स्टाईल. भाषणाचा दुवा दिल्याबद्दल सोत्रि यांचे खास आभार.
12 Mar 2013 - 12:07 am | दादा कोंडके
सहमत. भाषण अतिशय आवडलं. लिंकेसाठी सोत्रींचे आभार.
15 Mar 2013 - 9:24 am | नाना चेंगट
श्री. नेमाडे हे विचारवंत आहेत.
15 Mar 2013 - 10:40 am | पिंपातला उंदीर
नेमाडे ते नेमाडेच. बाकीच्यांचा तो सखाराम पन्ति भाषेचा फूलोरा. मजा आली भाषण बघून : )
16 Mar 2013 - 1:12 am | विकास
नेमाड्यांच्या भाषणाचा दुवा आवडला. त्यात वादग्रस्त असे काही वाटले नाही. बोलण्याची पद्धत देखील आवडली. पंचविशीला सिटीझनशिपचे शिक्षण मिळायला लागते मग वंदेमातरम वगैरे म्हणायला लागायला लागते, हे वाक्य जरा बुचकळ्यात टाकणारे आहे.
त्याव्यतिरीक्त पुढील मुद्दा जरा अडगळीपेक्षा समृद्ध वाटला: ते पातंजली आणि एकाग्रतेबद्दल बोलतात, त्यातून ते दिवसाकाठी एकदातरी समाधीत जाणे महत्वाचे आहे. त्याचे महत्व सांगताना ते त्याला खास हिंदू शोध म्हणतात. आणि मग (साधारण २८ व्या मिनिटाला) हिंदू म्हणजे काय म्हणताना हिमालयाच्या पुढे अगदी अटकेपार गांधारापर्यंत पसरलेला सांस्कृतिक समाज म्हणजे हिंदू असे म्हणतात. अर्थात त्यांच्या दृष्टीने तरी देखील हिंदूत्व हे ते म्हणत असलेल्या हिंदू पेक्षा वेगळे आहे .. असो.
16 Mar 2013 - 1:26 am | अर्धवटराव
एखादा जीवन कोळुन प्यालेला आजोबा प्रेमळ शब्दात, मिश्कीलपणे नातवांना संस्कृतीचे महत्व सांगतोय असं वाटलं क्लीप बघुन.
अर्धवटराव
16 Mar 2013 - 1:44 am | दादा कोंडके
पाण्याची बाटली उपडी धरताना थरथरणारा हात बघून उगीच वाईट वाटलं. गरज असलेली लोकं इतक्या लवकर म्हातारी होउ नयेत असं वाटलं. :(
16 Mar 2013 - 2:30 am | अर्धवटराव
म्हातारी व्हावीत (खास करुन त्या झोकदार पांढर्या मिशा... त्यामुळे खराखुरा आजोबा फील येतो ) पण तब्बेतीने कमजोर होऊ नये :)
अर्धवटराव