६ ऑक्टोबर २०११ला आयुक्ष्यात पहिलयांदा सेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजीपार्कावर हजेरी लावली. तीही बायकोसोबत. बाळासाहेबांची जादू नेमकी काय ते याचि देही याचि डोळां बघणं आवश्यक होतं. माध्यमांवर यांबाबतीत अवलंबून रहाता येतच नाही. पाहिलं तर खरंच, दुसऱ्या दिवशी ‘अण्णा हजाऱ्यांबद्दल ठाकरे असं असं म्हणाले' अशी एक खोडसाळ बातमी पेपरवाल्यांनी सर्व-संगनमताने दिलेलीच होती. मग एका दिवसासाठी व्यवस्थित ठाकरे-हजारे कुस्ती रंगली. वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते. मैदानावरचा प्रत्यक्षदर्शी म्हणून हे मी खात्रीपूर्वक सांगतो. आणखी हेही की बाळासाहेब ठाकरे ही एक जादू आहे. जमलेल्या अलोट गर्दीतला प्रत्येक जण त्यांना नि त्यांनाच जीवाचा कान करून ऐकायला आला होता. आणि ही अशीच गर्दी याच ओढीने गेली ४६ वर्षे शिवाजीपार्कवर लोटत आहे.
समान नागरी कायद्याची अस्खलितपणे मागणी करणारा, राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवरून उमर अब्दुल्ला, सोनिया, मनमोहन, चिदंबरम् यांचा मुद्देसूद समाचार घेणारा, 'पाकव्याप्त काश्मीरात चीनी सैन्य घुसलंय. त्यांच्यातला एकही सैनिक जीवंत परत जाता नये' हे समोरच्या मराठी गर्दीला ठासून सांगणारा नि भर सभेत पोलिसांना नि पत्रकारांना उद्देशून 'बाबांनो, तुमची कामं नीट करा. आम्ही चुकलो तर आम्हांलाही सोडू नका. पण भ्रष्ट होउ नका रे' असं अधिकारवाणीनं सांगणारा कुठला प्रांतीय नेता आज भारतात उरलाय? चंद्राबाबू, मुल्लामुलायम, दीदी, अम्मा, करुणानिधी - कोणीतरी हे करील काय? ते हे बोलायला गेले तर त्यांचे लोक त्यांचे ऐकतील काय? प्रांतीयच काय, कुठल्याही राष्ट्रीय नेत्याकडेही ही धमक, कुमक, कुवत आणि इज्जत शिल्लक आहे का हा प्रश्नच आहे.
थेट संवाद साधल्यासारखं वक्तृत्व! पल्लेदार वाक्यं नाहीत, अभिनिवेश नाही, आक्रस्ताळे हावभाव - हातवारे नाहीत ... पण एक एक शब्द खणखणित. वयाच्या नव्वदीतही आवाजातली धग आणि जरब जबरदस्त. ठाकरी विनोदाची फ़ोडणी जागोजागी. अजीत पवारांची खिल्ली उडवताना म्हणाले, 'अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता? राष्ट्रवादी नाव बदलून परराष्ट्रवादी तरी ठेवा'! बाळासाहेबांशी मतभेद असू शकतात, पण शैलीला दाद द्यायला कसली लाज? "आजकाल काय तर म्हणे सगळं फ़्री आहे. समलिंगी संबंधही अलाउड. हे अलाउ करणारे तुम्ही कोण? तुम्ही याला अलाउ केलंत तर तुम्हाला कसं माहिती हे चालतं? तुम्हाला कसं कळलं?" त्यांच्या डरकाळीत शिवराळ भाषा, अश्लील संदर्भ नि आता डेसिबल्स शोधत बसणाऱ्यांना त्यांचा सोवळेपणा लखलाभ. वाघाला त्याची परवा असण्याचं कारण नाही.
बाळासाहेबांच्या भाषणातले काही परिणामकारक हातोडे सोडले तर खुद्द त्यांच्या भाषणासकट पूर्ण सभा काहीशी विस्कळितच झाली. मुंबई म.न.पा. निवडणुकीवर कोणी बोलावे, अधिक व्यापक विषय कुणी घ्यावेत, रिपब्लिकन युतीविषयी कुणी नि काय बोलावे, राष्ट्रीय मुद्दे कुणी उचलावेत अशी वाटणी जर करून घेतली असती तर टीम-सेना अधिक कणखर भासली असती. महापौर श्रद्धा जाधव, प्रिं. जोशीसर यांची भाषणं निव्वळ सो सो! कुठलाही विचार नाही, मुद्दा नाही, संदेश नाही ... नुसता टाईमपास. रामदास कदमांचं भाषण आवेशपूर्ण खरंच, पण त्यालाही खोली नाही. ते बहुदा नाऱ्याचा फ़ोटो समोर ठेवून त्यामुळे आपोआप उफ़ाळून येणारा आवेश भाषणात वापरत असावेत! ९ कोटींच्या महाराष्ट्र राज्याच्या विरोधीपक्षनेत्यात असावी ती व्युत्पन्नता त्यांच्यात जाणवत नाही. उद्धव ठाकऱ्यांनी स्वतःचा नेतृत्वगुण एव्हाना सिद्ध केलेला आहे पण बाळासाहेबांच्या छायेखाली राहून त्यांना सतत तुलनेचे धनी व्हावे लागते त्याला ते तरी बिचारे काय करणार? त्यांच्या भाषणात जाणवतो तो कामाच्या झपाट्यातून आलेला आत्मविश्वास. ठसठशीत मुद्दे. नुसतं मुंबईपुरतंच बोलणं नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या इतिहास भूगोलाचं आणि प्रश्नांचं समर्पक ज्ञान. बाळासाहेबांप्रमाणेच त्यांना परिणामकारक आवाजाची देणगी मिळालेली आहे, पण त्याचबरोबर संयत नि शहाणपणाची भाषा हा त्यांचा स्थायीभाव नि बलस्थान आहे. त्यांना धरूनच त्यांनी पुढे जायला हवं. विनाकारण बाळासाहेबांची सहीसही नक्कल करण्याचा 'राजरोस' मोह असलाच तर टाळायला हवा.
सभेची शिस्त मुद्दाम नोंद करावी अशी. ४६ वर्षांचा शिरस्ता असल्याने असेल, पण लोक आपोआप येत होते, बसत होते, सरकून घेत होते, जागा देत होते, हसून खेळून बोलत होते - सगळं कसं शिस्तीत! वाहतुक पोलिसांची व्यवस्थाही चोख. मला माझी बुलेट ठेवायला मैदानाच्या अगदी समोर जागा मिळेल असं वाटलंच नव्हतं.
पण अजूनही फ़क्त बाळासाहेब म्हणजेच सेना असंच चित्र आहे. त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. भाषण संपण्याची वाट पाहणं नाही की राष्ट्रगीतासाठी थांबणं. अशा सर्व सैनिकांना फ़क्त सेनेशीच जोडण्याचं काम उद्धवना करायचं आहे. भारताचा आजवरचा इतिहास पाहता ते किती कठीण आहे हे स्पष्टच आहे. पण काहीही झालं तरी सेनेचं अस्तित्व किती आवश्यक आहे हे काँग्रेस भाजपासकट सगळेच जाणतात. त्यामुळे उद्धवना या भगीरथ कामासाठी शुभेच्छापूर्वक 'जय हिंद, जय महाराष्ट्र'!
प्रतिक्रिया
11 Oct 2011 - 8:58 am | सुहास..
नोंद घेण्याजोगे !
11 Oct 2011 - 10:05 am | मन१
This keeps happening in India.
संदर्भः- झेंडा चित्रपटाचा शेवट.
ते तसेच डरकाळ्या अन् शिवराळ सॉरी ठाकरीपणा करणार. तुम्ही तसेच समर्थन वगैरे करणार. आम्ही पब्लिक तसेच बघत बसणार.
11 Oct 2011 - 10:42 am | गवि
पण अजूनही फ़क्त बाळासाहेब म्हणजेच सेना असंच चित्र आहे. त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले.
मनोरंजन म्हणून लोक येतात झालं. इतर गुळमुळीत लोकांच्यामधे केवळ लोकांच्या मनातलं बोलणारा वक्ता म्हणून उठून दिसणारे बाळासाहेब लोकप्रिय आहेत. त्यांच्याशिवाय जगात शिवसेनेला एक विचारप्रवाह / फिलॉसॉफी म्हणून काय जागा आहे?
11 Oct 2011 - 11:09 am | कौन्तेय
फ़िलॉसॉफ़ी, विचारप्रवाह यांबाबतीत म्हणालात ते. पण शिक्का मारलेल्या फ़िलॉसॉफ़ीपेक्षाही कृती महत्वाची. बाळासाहेबांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा वारसा उद्धवला जर दिला (अजून औपचारिक युतीची घोषणा व्हायचीए) नि सेना-भाजपला दीर्घकाळ टिकणारा मित्र मिळाला तर त्यात सत्ता परिवर्तनासोबतच समाज परिवर्तनाचीही नांदी मजसारखे भाबडे लोक बघू पहात आहेत. गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद नि हिंदुत्व या सगळ्या शिक्का मारलेल्या विचारधारांनी तरी देशाचं आज काय केलंय?
11 Oct 2011 - 11:14 am | गवि
गांधीवाद, समाजवाद, साम्यवाद नि हिंदुत्व या सगळ्या शिक्का मारलेल्या विचारधारांनी तरी देशाचं आज काय केलंय?
१००% खरे.
त्यांनीही काही केलंय असं मुळीच नाही किंवा ते शिवसेनेपेक्षा अधिक काही आहेत असं नव्हे.
किमान रचना फक्त अस्तित्वात आहे (चौकट) बाकी एकूणच देश आपापत: चाललेला आहे असाच भास होतो.
11 Oct 2011 - 10:58 am | गणपा
(शिवसेना) उणे (बाळासाहेब ठाकरे) बाकी शुन्य.
11 Oct 2011 - 11:05 am | मराठी_माणूस
वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते.
त्यांनी अण्णांच्या आंदोलनाबद्दल काढलेले उद्गर खचीतच प्रशंसनीय नव्हते
11 Oct 2011 - 11:39 am | प्रभाकर पेठकर
अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते.
बाळासाहेबांचे शब्द..'काय तर म्हणे गणपतीला 'मी अण्णा हजारे' अशी टोपी घातली. .....मी 'उंदराला' 'मी अण्णा हजारे' अशी टोपी घातली.'
कमीत॑ कमी वेळात राष्ट्रीयस्तरावर एवढी प्रसिद्धी आणि त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना समाजाकडून मिळालेली स्विकृती पाहता श्री. अण्णा हजारेंना एक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा नेत्याचे कौतुक करण्याऐवजी त्याला 'उंदराची' उपमा देणे हा त्यांचा उपमर्द आहे.
'पाकव्याप्त काश्मीरात चीनी सैन्य घुसलंय. त्यांच्यातला एकही सैनिक जीवंत परत जाता नये' हे समोरच्या मराठी गर्दीला ठासून सांगणारा
हे सांगण्यात कुठली मर्दुमकी गाजवली. कोणीही सांगू शकेल्.(अगदी मी सुद्धा).
'बाबांनो, तुमची कामं नीट करा. आम्ही चुकलो तर आम्हांलाही सोडू नका. पण भ्रष्ट होउ नका रे'
'पोलीसखात्यातील भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही.' हे वाक्य अनेकदा मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस कमिश्नर ह्यांच्या तोंडून ऐकलेले आहे. 'भ्रष्ट होऊ नका रे' हे सांगण्याचा नैतिक अधिकार शिवसेना नेत्यांसहित कुठल्या राजकिय पक्षाच्या नेत्यांना आहे का?
अभिनिवेश नाही, आक्रस्ताळे हावभाव - हातवारे नाहीत ...
फक्त चेष्टा, आवाजांच्या नकला आणि हिणकस शेरेबाजी.
समलिंगी संबंधही अलाउड. हे अलाउ करणारे तुम्ही कोण? तुम्ही याला अलाउ केलंत तर तुम्हाला कसं माहिती हे चालतं? तुम्हाला कसं कळलं?"
तुम्हाला कसं माहिती हे चालत???? म्हणजे जे तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना माहिती आहे ते बाळासाहेबांना माहित नव्हत? ज्यांना ज्यांना समलींगी संबंधाबद्दल माहिती आहे ते ते सर्वजणं असे संबंध ठेवणारे असतात?
कुठलाही विचार नाही, मुद्दा नाही, संदेश नाही ... नुसता टाईमपास.
हेच संपूर्ण सभेचे सार आहे.
उद्धव ठाकऱ्यांनी स्वतःचा नेतृत्वगुण एव्हाना सिद्ध केलेला आहे
म्हणूनच दसरा मेळावा ते एकहाती घेऊ शकत नाहीत. अजून बाळासाहेबांच्या 'शिवराळ भाषणांची' कुबडी घेऊन चालावे लागते आहे.
विनाकारण बाळासाहेबांची सहीसही नक्कल करण्याचा 'राजरोस' मोह असलाच तर टाळायला हवा.
अवतरण चिन्हातील शब्दच राज ठाकरे ह्यांचे वाढते महत्व आणि शिवसेनेची होणारी कोंडी अधोरेखित करतो आहे.
सभेची शिस्त मुद्दाम नोंद करावी अशी........... सगळं कसं शिस्तीत!................
..... त्यांचं भाषण संपत येतं आहे हे लक्षात येताच लोक मागच्यामागे उठून जाऊ लागले. भाषण संपण्याची वाट पाहणं नाही की राष्ट्रगीतासाठी थांबणं.
उतार्याती सुरुवातीच्या वाक्यांना उतार्याच्या शेवटास लेखकाने स्वतःच हरताळ फासला आहे. त्यामुळे नक्की काय म्हणायचे आहे हे कळत नाही.
सर्व सैनिकांना फ़क्त सेनेशीच जोडण्याचं काम उद्धवना करायचं आहे. भारताचा आजवरचा इतिहास पाहता ते किती कठीण आहे
लेखकाने उद्धव ठाकरे ह्यांनी त्यांचे नेतृत्वगुण आधीच सिद्ध केल्याचे म्हंटले आहे त्या पार्श्वभूमीवर वरील विधान विपरीत वाटते.
शिवसेनेबद्दल मलाही भरपूर प्रेम आहे ते त्यांच्या, एकेकाळी असणर्या, मराठीप्रेमामुळे. पण काळाच्या ओघात त्यातील फोलपणा उघड झाला आहे. सार्वजनिक व्यासपिठावरून मुसलमानांना 'मुसलमान' असेच संबोधून सर्वात प्रथम टिका करणारे, राज्य सरकारला खडे बोल सुनविणारे बाळासाहेब पहिले राजकिय नेता होते/आहेत. 'अल्प संख्यांक', 'विशिष्ठ धर्माचे लोकं' अशी गुळमट भाषा वापरली नाही कधी. मर्यादीत प्रमाणात शिवसैनिकांनी केलेली दादागिरीही समर्थनिय म्हणावी लागेल. ह्या सगळ्याला भुलून आम जनता शिवसेनेच्या पंखाखाली जमा झाली. पण भविष्यात बहुतेकांचा भ्रमनिरास झाला. गर्दी वरून लोकप्रियता ठरवायची तर राजकिय नेते गर्दी कशी जमवतात हे मी वेगळे सांगायला हवे असे नाही.
बाळासाहेबांकडून अपेक्षा होती शिवसेनेला 'मार्ग'दर्शन करण्याची, राज्यातील विविध प्रश्नांना हात घालून त्या त्या समस्यांवर उपाय सुचविण्याची, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लोकप्रबोधन करण्याची, (जमल्यास) मराठी भाषेच्या संवर्धनाच्या उपाययोजना सुचविण्याची. पण, बाळासाहेबांना फक्त जहाल आदेश देण्याची सवय आहे. काय तर म्हणे, 'सागरीसेतूला राजीव गांधींचे नांव दिले आहे तो फलक तोडा.', हिणकस शेरेबाजी करण्याची. आर.आर. पाटलांना 'चार्ली चॅप्लीन' संबोधण्याची, सोनिया गांधी, मनमोहन सींग ह्याच्या आवाजाची नक्कल करण्याची.
श्री. शंकरशेठ ह्यांच्या महानते विषयी एकदम पुळका येऊन बाळासाहेब म्हणाले, 'शंकरशेठांनी एवढे कार्य केले आहे त्याला काँग्रेस विसरली. त्यांचे नांव का नाही देत एखाद्या स्थळाला.' शिवसेना-भाजपाची राज्यात सत्ता असताना शिवसेनेने किती स्थळांना श्री. शंकरशेठांचे नांव दिले? त्यांनी नाट्यगृहाला 'प्रबोधनकारांचे' नांव दिले. अनेक स्थळांना 'मीनाताई ठाकरे' ह्यांचे नांव दिले.
भ्रष्टाचारा विरुद्ध जनजागृती करण्या ऐवजी हा जबाबदार नेता म्हणतो, 'भ्रष्टाचार कधीच जाणार नाही तो असाच राहणार'. मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांवर भाष्य करण्याऐवजी बाळासाहेब विचारतात, 'फक्त मुंबईतच खड्डे आहेत का? इतर राज्यात नाहीत का?' म्हणजे इतर राज्यातही आहेत म्हणून मुंबईतल्या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करा?. भ्रष्टाचार कधीच जाणार नाही मग काय त्याला स्विकारायला शिका?
दसरा मेळाव्याने आणि माननिय बाळासाहेबांच्या भाषणाने व्यक्तिशः माझी तरी निराशाच झाली.
11 Oct 2011 - 11:47 am | मन१
सहम्त.
अगदि असच काहिसं लिहायचं होतं, नेमकं जमलं नाही.
11 Oct 2011 - 12:03 pm | कौन्तेय
‘- सिलेक्शन ऑफ़ लेसर एव्हिल’ का काय म्हणतात ते.
समोर आहेत त्यांतला ग्राह्यांश तेवढा घ्यावा हेच आपल्या हाती.
हरताळाची पूड राखाडी रंगाची असावी. कारण राजकीय सभांच्या शिस्तीच्या कथांत थेट पांढरे - काळे कसे बसवणार? तिथे काही ग्रे-एरिया (राखाडी) असणारच. सेनेच्या सभेला लोकांनी अरेरावीची सीमा गाठून एकमेकांना मारहाण केली नाही ही शिस्तबद्धताच की!
11 Oct 2011 - 1:47 pm | सन्जोप राव
शिवसेनेबद्दल मलाही भरपूर प्रेम आहे ते त्यांच्या, एकेकाळी असणर्या, मराठीप्रेमामुळे.
हे एक वाक्य सोडले तर शब्दाशब्दाशी सहमत.
11 Oct 2011 - 9:19 pm | अप्पा जोगळेकर
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत आहे.
थोडी वाट पाहा. महापालिका निवडणुका झाल्या की उरलेसुरले दातसुद्धा पडून जातील. रोज कणाकणाने,झिजून झिजून शिवसेना मरते आहे याचा आनंद वाटतो.
11 Oct 2011 - 9:43 pm | मराठी_माणूस
मतभेद व्यक्त करणे वेगळे , पण खालील विधान विकृत वाटते
रोज कणाकणाने,झिजून झिजून शिवसेना मरते आहे याचा आनंद वाटतो.
कदाचीत , तुम्हाला मुंबईच्या दंगली बद्दल माहीती नसावी. ज्या लोकानी तो अनुभव घेतला असेल , भले तो शिवसेनेचा विरोधक असो , त्याने शिवसेनेच्या मुंबईतल्या अस्तित्वाबद्दल सकारात्मक मत व्य्क्त केलेले आहे.
काही लांडगे तर टपलेलेच आहेत मुंबईला वेगळे करण्यासाठी आणि ते लांडगे ही संघटना कधी नामशेष होईल ह्याच दिवसाची वाट पहात आहेत.
11 Oct 2011 - 11:53 pm | निनाद मुक्काम प...
''मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे वाक्य पंत फार आधी बोलून गेले आहे .
त्यामुळे मुंबई महाराष्ट्रापासून कधीच तुटली आहे . सर्व नाड्या परप्रांतीय लोकांच्या हाती त्यानी कर्तुत्वाने ताब्यात घेतल्या आहेत .
बाकी दंगली बाबत म्हणाल दोन भूमिपुत्र मुस्लीम व मराठी माणूस ( दोन्ही मोठ्या संख्येने कधीकाळी कोकणातून आलेले ) आपसात दंगलीत भिडले पर्यायाने त्यांचा आवाज शीण झाला .
आता मुंबई बिल्डरांना मोकळी आहे .
ह्यांना अणु उर्जेला विरोध करता येतो .पण पर्याय देता येत नाही .
सत्तेवर आल्यावर विकास कामे नक्की काय करणार ह्याबाबत ठोस घोषणा किंवा धोरण नाही ( किमान झुणका भाकर सारखी एखादी .......)
मुळात सत्तेवर येऊ ह्याबाबत आत्मविश्वास नाही .
खरे तर सेनेने विरोधी पक्ष भाजपकडे द्यावेत त्यांच्याकडे फडणीस .तावडे असे अनेक योग्य उमेदवार आहेत .
बाकी मी सेनेंचा विरोधक अथवा समर्थक नाही .
डोंबिवली मधून मुंबईत १९९६ ते २००२ वास्तव्य केले .मुंबईतील अनेक भागात मी मराठीचा एक चकार शब्द कानावर पडायचा नाही . परप्रांतीय अल्प संख्य समूहासाठी राखीव कोटे असलेल्या त्यांच्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांची मानसिकता पहिली .त्यांच्यामते ज्या राजकीय पार्टीकडून तुमचे काम निघते तिचा नारा द्यावा .
आणि सर्व पार्ट्या अश्या श्रीमंत व्यापारी लोकांशी चांगले संबंध ठेवून असतात
.आपण मराठी लोक आंतरजालावर तत्व ,निष्ठा ,मुल्ये ,विचार ,ह्या मुद्यावरून एका पक्षाचे वृथा समर्थन अथवा कडवा विरोध करतो .
कुणा निंदू नये वा वंदू नये
मला सर्व राजकीय नेते आवडतात .कोणाकडून कसली मदत कोणत्या क्षणी होईल हे सांगता येत नाही .
सर्व पर्याय खुले असलेले बरे .
12 Oct 2011 - 1:23 am | प्रभाकर पेठकर
'मुंबई महाराष्ट्रात आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही हे वाक्य पंत फार आधी बोलून गेले आहे .
मनाची पकड घेणारी वाक्ये फेकायची आणि आपला स्वार्थ साधत राहायचा असेच सर्व राजकिय पक्ष वागत आले आहेत. वरील वाक्य फेकणार्या पंताच्या शिवसेनेने भाजप पक्षाशी युती केली आणि त्यांची उत्तरप्रदेशी जनते विरोधी धार बोथट झाली. तेंव्हा पंतांचे शिवसेनेत चांगलेच महत्त्व होते. पण त्यांनी ह्या बदलाकडे राजकिय स्वार्थातून दुर्लक्ष केले.
12 Oct 2011 - 10:52 am | प्रदीप
कुठली? पहिली (६८ सालची) की दुसरी (९३ सालची?) पहिली सेनेच्याच कर्तुत्वामुळे सुरू झाली. नंतर ती सेनेच्या नेतृत्वाच्या आटोक्याबाहेर गेली. सरकारने ती आग विझवली.
बाय द वे, अडीअडचणीच्या वेळी काँग्रेसला महाराष्ट्रात सेनेपेक्षा दुसरे कुणी जवळचे नसावे. सेनेच्या स्थापनेपासूनच ह्या जवळिकीची सुरूवात झाली. तेव्हा कम्युनिस्टांचे वर्चस्व तोडून काढ्ण्यात वसंतरावांनी सेनेस वापरले. आता अण्णांपासून काँग्रेसचा थोडाबहुत बचाव सेनाच करणार आहे असे दिसू लागले आहे.
12 Oct 2011 - 11:04 am | सुनील
बाय द वे, अडीअडचणीच्या वेळी काँग्रेसला महाराष्ट्रात सेनेपेक्षा दुसरे कुणी जवळचे नसावे. सेनेच्या स्थापनेपासूनच ह्या जवळिकीची सुरूवात झाली. तेव्हा कम्युनिस्टांचे वर्चस्व तोडून काढ्ण्यात वसंतरावांनी सेनेस वापरले.
शिवसेनेला वसंतसेना उगाच म्हणत नव्हते!
आणिबाणीतही सेनेची भूमिका काँग्रेसधर्जिणीच होती.
12 Oct 2011 - 6:54 pm | निनाद मुक्काम प...
पुढे शरद पवार व विलासराव असे दोन गट त्या पक्षात झाले .
मुंबईतील कार्यकारणी पूर्वीपासून परप्रांतीयांची असायची व त्यांचे संधान थेट दिल्लीत असायचे . तेव्हा शरद पवार ह्यांनी सेनेचा वापर मुंबईत एक संरक्षक ढाल म्हणून केला .अर्थात ह्यात दोन नेत्यांचे चातुर्य दिसून येते .
एका गोष्टीचे नवल वाटते .घराणेशाहीच्या नावाने आरोळ्या ठोकणारे जेव्हा ...........
उद्धव ठाकर्यांना सर्व शिवसैनिकांनी एकमुखाने नेता निवडले हे वाक्य रिमोट कंट्रोल असणार्या पक्षात विसंगत वाटते .
मात्र आम्ही काय ते मावळे बाकी सर्व गनीम असेच लिहायचे व बोलायचे ठरवले तर पुढे बोलणे खुंटले .
12 Oct 2011 - 11:49 pm | विलासराव
>>>>>>>पुढे शरद पवार व विलासराव
मी नाय ओ मी नाय.
निनादराव जगु द्या की सुखाने.
17 Oct 2011 - 3:42 pm | मदनबाण
काकाश्रींशी सहमत... :)
11 Oct 2011 - 12:05 pm | अविनाशकुलकर्णी
वास्तविक अण्णांना अवमानकारक असं काहीही बाळासाहेब बोललेलेच नव्हते.
अण्णा आता पुढचे राष्ट्रपति आहेत...
11 Oct 2011 - 1:32 pm | गणेशा
शरद पवार .. बाळासाहेब ठाकरे आणि आता राज ठाकरे .. हे माझे महराष्ट्रातील तीन आवडते राजकारणी नेते आहेत.
बाळासाहेब यांच्या एकहाती लीडरशिप बद्दल नेहमीच आदर होता.
परंतु कौंतेय जी, जर तुम्ही त्यांच्या समर्थनार्थ राज ठाकरें बद्दल विनाकारण नक्कल करणारा ' राजरोस' मोह जे लिहिले आहे ते योग्य नाहिच.
कुठल्याही नेत्याच्या उद्दात्तकरणासाठी इतर नेत्यांना टारगेट करत असाल तर ते त्या नेत्याच्या कार्याविषयी शंका असल्यासारखेच वाटते.
बाकी शिस्त म्हणजे अरेरावी करुन सभेत भांडण न करणे असेल तर सभा सिस्थीत झाली म्हणण्यास हरकत नाहिच.
आणि एक 'समान नागरी कायदा' या एकाच मुद्द्यावरुन भाजपा सहित शिवसेना केंद्रात आणि राज्यात निवडुन आल्या होत्या.. पण मग तेंव्हा काय प्रॉब्लेम झाले ?.. या प्रश्नाला का बगल मिळाली .. ? का हा कायदा आला नाही. असे सभेत अश्वासन देणारे सत्यात ते का उतरवु शकले नाहित ? आणि
हे जर सभेत जमनारा माणुस नेत्यांना विचारु शकत नाहित तर अश्या प्रश्नांचा अभिमान बाळगण्याचा तरी काय उपयोग आहे ...
काँग्रेस, या वेळेस सपशेल अपयशी ठरले आहे, अनेक भ्रष्टाचार उघडकीस आले आहेत, त्यामुळॅ भाजपा-शिवसेना आणि इतर मित्र पक्षांना यावेळेस संधी आहे. आणि त्याचा ही आनंद आहे..
मी स्वता ही काँग्रेस ला मत देणार नाहिये.. पण याचा अर्थ दूसर्यांवर डोळे झाकुन विश्वास ठेवावा असे नाही ...
आणि एक पत्रकारांना जे बोलले त्यावर तुम्ही २-३ ओळी लिहिल्या आहेत अधिकारवानीच्या ..
मला सांगा निखिल वागळे यांच्यावर झालेला हल्ला .. त्या नंतरची मगृरी .. आणि काय हो कोणाअला अटक शिक्षा पण झाली नाही वाटते त्या प्रकरणात मग आपण ठरवायचे बोलण्याकडे भुलायचे का कार्याकडे पहायचे ..
असो .. लिहिणार नव्हतोच ,पण बाळासाहेबांबद्दल आदर होता.. पण राजरोस ह्या शब्दामुळे लिहायला लागले..
आणि एक जाता जाता ..
बाळासाहेबांनी त्याम्च्या लेवलच्या माणसांबद्दल.. कार्याबद्दल बोलावे असे मला वाटते, त्यांनी शरद पवार, देशमुख, चव्हाण यांच्या बद्दल बोलावे ते शोभुन दिसेल..
राज ठाकरे, अजित पवार या दूसर्या पिढीसाठी तुम्ही म्हणता तसे सक्षम नेतृत्व शिवसेने कडे आहे तर त्यांनीच फक्त ही जबाबदारी संभाळावी असे वाटते..
शिवसेने च्या बर्याच (सर्व नाही) गोष्टींसाठी आदर आहेच, पण स्व विचार आणि आचार यात तफावत मात्र व्होवु नये असे मनापासुन वाटते.
12 Oct 2011 - 11:11 am | श्रीरंग
माननीय श्री शरच्चंद्ररावजी पवार साहेब काही लोकांचे कोणत्या कारणांमुळे आवडते असू शकतात याबद्दल प्रचंड कुतुहल वाटते.
12 Oct 2011 - 12:24 pm | मराठी_माणूस
अगदी अगदी
12 Oct 2011 - 12:57 pm | गणेशा
श्रीरंग जी,
मला माहिती आहे, महाराष्ट्रातील बरेचसे लोक शरद पवारांचा द्वेष करतात, आणि त्याला कारणे ही तितकीच आहेत.
परंतु मी बारामतीचा असल्याने, आणि त्यांच्यामुळे मला.. माझ्या गावाला, शेतीला, व्यवसायाला आणि गावातील लोकांच्या नोकरीला, तसेच शिक्षणाला खुप फायदा झाला असल्याने मला ते आवडतात आणि इतर ही कारणे आहेतच.
त्यात विरोधक ही ज्यांना 'साहेब' बोलतात ह्यातच सर्वकाही आहे..
यावर प्लीज अशी प्रतिक्रिया देवु नये की तुम्ही फक्त बारामतीचाच विचार करता, मराठी माणुस हा जसा भावनिकतेचा भाग असतो, तसेच गाव, रोजगार, तेथील शेती पाणी हा सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो...
शरद पवार - दूरद्रूष्टी ( ज्यांना 'साहेब' आवडत नाहीत हे त्यांना नाही वाटत हा गुण)
बाळासाहेब ठाकरे - एकहाती लिडरशिप, सर्व लोकांना आपल्या शब्दाच्या जरबीवर तोलणाअरा माणुस, सध्याच्या काळात हे अवघड आहे.. पहिल्यांदा राजे लोक असे असायचे..
राज ठाकरे - अभ्यासपुर्ण वाटचाल ... स्वैर वागण्याला ही तितकेच ठोस कारणे..
वरती ३ च नावे घेतली होती चौथे नाव घ्यायचे झाल्यास उद्धव ठाकरे असेल कदाचीत. त्यांची कार्यपद्धती ही धडादीची नसली तरी नेत्यांची उत्कृष्ट साथ मिळाली तर नक्कीच शेतकर्यांप्रती उल्लेखनिय काम करण्याची ताकद यआंच्यात आहे असे वाटते.
अवांतर :
जाउद्या मुद्दा शरद पवारांचा नाहिहे श्रीरंग जी ...
मला तर हिटलर आणि गांधी दोघे ही आवडतात .. म्हणुन हिटलरच्या सांहारक वृत्तीचा मी जसा पुरस्कर्ता नाही.. तसेच शरद पवारांच्या पैश्याच्या राजकारणाचा ही मी चाहता नाही ..
असो.. पण यावेळेस निवडनुकीला ' म. न. से' आमदार आमच्या येथे उमेदवार असतील तर ९९ % मी त्यांना मत देणार आहे .. नेते आवडतात म्हण्जे त्यांचे सर्व कार्य आवडते असे नसते.. असे डोके गहान ठेवुन जर कोणी कोणाच्या मागे लागले तर काय उपयोग असे माझे मत आहे..
होप मी काय म्हणतोय ते कळाले असेन
12 Oct 2011 - 1:58 pm | शाहिर
बाकी शरद पवार यांना दूरद्रूष्टी आहे हे मान्य करावे लागेल.
काहि माणसे पायाळू असतात ..तसे पवार पैसाळू आहेत ..
कुठे पैसे मिळेल हे त्यांना बरोबर दिसते ..उदा : आय पी एल , लवासा..
12 Oct 2011 - 2:14 pm | श्रीरंग
गणेशा जी,
विनाकारण आक्रमकता टाळून आपण प्रांजळपणे मतप्रदर्शन केलेले बघून खूप बरे वाटले. या धाग्याचा विषय शरद पवार नसल्याने, हा विषय तूर्तास येथेच थांबवतो. :)
12 Oct 2011 - 2:08 pm | मैत्र
हे काल लिहावंसं वाटलं होतं... आपण योग्य शब्दात विचारल्याबद्दल आभार :)
11 Oct 2011 - 3:18 pm | पिंगू
दसरा मेळावा कितीही गर्दीने ओसंडून वाहो.. पण त्या मेळाव्यात फक्त आणि फक्त शेरेबाजी होते. बाकी मुंबईची बकाल अवस्था होण्यामागे शिवसेना आणि इतर पक्ष तितकेच जबाबदार आहेत.
- (मुंबईकर) पिंगू
11 Oct 2011 - 6:15 pm | रेवती
मी बाळासाहेब ठाकर्यांचे भाषण पाच मिनिटे एकदाच टिव्हीवर पाहिले होते. सडेतोड बोलणे की कायसे करताना भाषा इकडे तिकडे होते. पण तसे न बोलून तरी चालेल का? भ्रष्टाचारावर कोणत्याही पक्षाने बोलू नये. लोक मात्र त्यांच्या भाषणासाठी जिवाचा कान करून बसलेले असतात. पूर्वी म्हणे ट्रक भरून अन्नपदार्थ लोकांना वाटायला आणत आणि त्यामुळे गरीब जनतेचा भरणा अधिक असे. माझी एक मुंबईकर मैत्रिण टाईमपास म्हणून तूनळीवर बाळासाहेबांची भाषणे ऐकत/बघत बसलेली असते हे समजल्यावर विचित्र वाटले.
11 Oct 2011 - 6:47 pm | शाहिर
वाद नाही .. शुद्ध लेखना मधे नक्की काय म्हणायचा एवढीच उत्सुकता आहे .
11 Oct 2011 - 7:06 pm | रेवती
त्याचं काये की हे मान्यवर असल्याने ठाकरेंचे भाषण म्हणणे योग्य दिसेल पण देशपांडेंचे भाषण/ घर याऐवजी देशपांड्यांचे भाषण/घर वगैरे. कुलकर्ण्यांचे घर हे सहज म्हटले जाते. बाकी तुम्ही सूज्ञ आहातच.
12 Oct 2011 - 1:56 am | प्रभाकर पेठकर
मान्यवर असल्याने ठाकरेंचे भाषण म्हणणे योग्य दिसेल पण देशपांडेंचे भाषण/ घर याऐवजी देशपांड्यांचे भाषण/घर वगैरे. कुलकर्ण्यांचे घर हे सहज म्हटले जाते
नुसते मान्यवर आहे म्हणून नाही तर, आदर व्यक्त करतानाही, बाळासाहेब किंवा उद्धव अशा कोणा एकाच्या भाषणाचा संदर्भ असेल तर 'ठाकरेंचे' भाषण असे म्हणावे. अनेकवचनातील (म्हणजे बाळासाहेब आणि उद्धव दोघांचे भाषण, असे) संदर्भ असेल तर 'ठाकर्यांचे' भाषण असे म्हणावे.
'देशपांड्यांचे घर' असे आपण म्हणतो तेंव्हा त्या घरात एकापेक्षा अधिक देशपांडे राहात असतात. देशपांडे नावाचे एकटे गृहस्थ राहात असतील तर 'देशपांडेंचे घर' असे म्हणावे लागेल.
11 Oct 2011 - 9:21 pm | अप्पा जोगळेकर
तो अनुस्वार काढून टाकला तरी चालेल.
12 Oct 2011 - 12:35 am | रेवती
कृपया वाद सुरु होतील अशी विधाने टाळावीत.
11 Oct 2011 - 7:19 pm | तिमा
अजुनही काही लोकांना त्यांच्या भाषणाचे आकर्षण वाटते याचे आश्चर्य वाटले.
मला पुढील गोष्टी पटल्या नाहीत.
मुंबईतल्या खड्ड्यांचे लटके समर्थन.
पूर्वी इंदिरा गांघीही म्हणायच्या की जगात भ्रष्टाचार सगळीकडे आहे तर भारताबद्दल का ओरडता ? तसेच हे म्हणाले की खड्डे काय फक्त मुंबईत पडले आहेत का ? सत्ता तुमच्या हातात आहे ना इतकी वर्षं, मग चांगले रस्ते करता येत नाहीत ?
मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणे हा मुद्दा.
नवीन मुद्दे, कर्तृत्व हे काहीच नसल्यामुळे काल्पनिक गोष्टींची लोकांना भीति का दाखवायची ?
कोळी, भंडारी यांचा अचानक पुळका आला तर मग आग्री का आठवले नाहीत ? तेही मुंबईचे मुळचे रहिवासी आहेत.
संपूर्ण भाषणावर एकच कॉमेंट : कडकलक्ष्मीची भीति फक्त लहान मुलांनाच वाटते.
11 Oct 2011 - 9:02 pm | कुंदन
मुंबई महापालिकेत सेनेची सत्ता असतानाही इतके भय्ये अनधिकृत फेरीवाले म्हणुन धंदा करतातच ना.
बाकी र्हाउ द्या , आधी मुंबई सांभाळा.
12 Oct 2011 - 1:44 am | आशु जोग
उद्धव हा एक बालिश माणूस आहे हे त्याच्या भाषणावरून कुणालाही कळेल
आणि बाळासाहेब हे भंपक व्यक्ती.
बोलताना कितीही सिंहगर्जना करीत असले तरी, अति भित्रा माणूस
पूर्वी काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीच्या कडेवर बसून राजकारण करतो.
म्हणूनच पंतप्रधानपदासाठी शरद पवार यांना पाठिंबा दिला होता
आणि राष्ट्रपतिपदासाठी प्रतिभा पाटील यांना
राष्ट्रवादी वा काँग्रेस कोणीच वर्ज्य नाही
12 Oct 2011 - 11:13 am | गवि
बादवे..
अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता?
आँ???????
मर्दांनी बाईच्या नादी लागू नये.. बाईच्या नादी लागणे मर्दांना शोभत नाही..?
की
मर्दांनी "परक्या" बाईच्या नादी लागू नये.. (स्वकीय चालेल)
की
मुळात मर्दांनीच राज्य करावे "बाईने" नव्हेच ?
की या सगळ्यापेक्षा:
नेता म्हणून बुवा असो वा बाई कोणीच कोणाच्या "नादी" लागून (आहारी जाऊन) राजकारण करु नये.. ?
काय म्हणायला हवं होतं आणि काय म्हटलंय? काय सुचवलं जातंय ?
"अरे तुम्ही मर्दासारखे मर्द त्या परक्या बाईच्या नादी लागता"" - ही शब्दरचना आपल्या मासेसना (मॉबला म्हणावं का?) अपील होते म्हटल्यावर काय बोलणार..
12 Oct 2011 - 12:35 pm | सुनील
देशातील अन्य प्रादेशिक पक्षांशी शिवसेनेची तुलना केली तर काय चित्र दिसते?
अन्य प्रादेशिक पक्ष (तेलगु देशम, द्रमुक इ.) स्थापनेनंतर थोड्याच काळात आपापल्या राज्यात सर्वदूर पसरले आणि स्वबळावर सत्तादेखिल मिळवू शकले. याउलट शिवसेना वयाची चाळीशी ओलांडूनही राज्यात सर्वत्र पोचली नाही. स्वबळावर सत्ता तर दूरच!
हे शिवसेनेचे अपयशच नाही काय?
12 Oct 2011 - 12:41 pm | मराठी_माणूस
हे शिवसेनेचे अपयशच नाही काय?
निश्चितच अपयश आहे . त्याचे कारण म्हणजे मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राची दखलच घेतलि जात नाही.
12 Oct 2011 - 2:30 pm | प्रभाकर पेठकर
मुंबई सोडुन उर्वरीत महाराष्ट्राची दखलच घेतलि जात नाही.
कारण मुंबईत पैसा आहे.
किंवा मुंबई आमची आणि उर्वरित महाराष्ट्र तुमचा अशी श्री. शरद पवारांबरोबर राजकिय वाटणी झाली असावी.
12 Oct 2011 - 3:11 pm | daredevils99
मूळात शेणेचा जन्म मुंबईतील मराठी माणसांचे रक्षण करण्यासाठी झाला असल्यामुळे त्यांनी मुंबईबाहेर जायची गरज हे का? आता ते रक्षण करतात की भक्षण करतात हा वेगळा प्रश्न हे.
14 Oct 2011 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाकी, वृत्तांत आणि त्यासोबत आपापली मतं व्यक्त करणारे प्रतिसादही मस्तच.
-दिलीप बिरुटे
15 Oct 2011 - 11:47 pm | कौन्तेय
माझा हा ‘मी पाहिलेला दसरा मेळावा’ असा निबंध होता. त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!). त्यामुळेच काथ्याकूट सदरात न घालता जनातलं-मनातलंमधे तो ठेवला. मी शिवसेनेचा मतदार / पूर्ण पाठीराखा कधीच नव्हतो. कुणा एका पक्षाचं सगळंच मला आवडू शकेल असं मला वाटत नाही. बाळासाहेब हयात असताना एकदा दसरा मेळावा बघून यावा म्हणून हजेरी लावली नि त्यातलं जे नोंद घेण्यासारखं वाटलं ते सर्वांसमोर ठेवलं. पण ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रीया / टिप्पण्या दिल्या त्यांचा आभारी आहे.
16 Oct 2011 - 4:58 pm | प्रभाकर पेठकर
त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!).
अहो! मग लेखाच्या तळाशी तशी टिप टाकायचीSS....!
केवढे श्रम वाचले असते इतर सदस्यांचे. तसे न करता येतील तितके प्रतिसाद येऊ दिलेत. आणि आता प्रतिसाद यायचे बंद झाल्यावर म्हणता, 'मला अशी चर्चा अभिप्रेत नव्हती'??
हे म्हणजे प्रतिसाद देताना, जे काही वैचारिक श्रम आम्ही घेतले त्यांना मोरीत टाकून वर दोन तांब्ये पाणी ओतलेत की.
असो. पुढच्यावेळी काळजी घ्या. 'चर्चा अभिप्रेत नाही' अशी छोटीशी पाटी लावलीत लेखाच्या तळाशी की, आम्ही कष्टदायी चर्चा टाळू.
17 Oct 2011 - 5:16 pm | कौन्तेय
प्रभाकर गुरू, सगळ्यात कळकळून तुम्हीच लिहिलं होतंत. त्यामुळे तुमचा राग समजण्यासारखा आहे (अन बाकीच्यांचाही हो). तस्मात् आमाला क्षमस्वाची कृपया करावी -
17 Oct 2011 - 7:17 pm | निनाद मुक्काम प...
कौन्तेय साहेब वाईट वाटून घेऊ नका .
.
आपल्याला अपेक्षित असे जगात प्रत्येक वेळी घडतेच असे नाही .
काही दिवसापूर्वी सामन्यातील एका अग्रलेखाचा मथळा असा होता .
'' संघ ,गडकरी .मोदी ह्यांनी नागपुरात चूर्ण .... नी मग फुसकुली .
जरा काहीकाळ पाठी गेलो तर महाजन ,मुंडे ,ठाकरे व मातोश्री मध्ये चूर्ण तयार झाले. त्यावर हिंदुत्वाचा वर्ख चढवण्यात आला . .........
पुढचा इतिहास सगळ्यांना ठाऊक आहे .
मंदीर प्रकरण मग दंगल व त्यातून मग १३ स्फोट अशी साखळी निर्माण झाली .
17 Oct 2011 - 8:16 pm | वेताळ
हे २०१४ ला लोकांना पटवुन द्यावे लागणार बहुधा.
18 Oct 2011 - 1:48 am | प्रभाकर पेठकर
श्री. कौन्तेय,
त्यामुळे तुमचा राग समजण्यासारखा आहे.
राग अजिबात नाही. उद्विग्नता जरूर आहे.
राग आला असता तर, 'तुम्ही असे का केले?' असा जाब मी विचारला असता. तसे न करता मिपा सदस्यांचे श्रम वाचविण्यासाठी जेंव्हा जेंव्हा तुम्हाला चर्चा अपेक्षित नसते तेंव्हा तेंव्हा तशी सूचना लेखाच्या तळाशी द्यावी असा सल्ला मी दिला आहे.
जे झाले ते झाले. निदान पुढच्या वेळी काळजी घ्यावी असेही मी सुचविले आहे. ह्यात तुम्हाला राग कुठे दिसला?
त्यावर कडाडून चर्चा मला अभिप्रेतच नव्हती (तात्विक / वैचारिक ?!?!).
ह्या तुमच्या, इतक्या उशीराने आलेल्या, विधानाने विरस झाला. 'खोदा पहाड निकला चुहा' अशी भावना झाली. हे समजून घेऊन स्वतःची चुक स्विकारण्याऐवजी मला 'राग आल्याचा' अपप्रचार आपण करता आहात. कृपया असे करू नका.