आधीचा भाग ... http://www.misalpav.com/node/18862
भाग नऊ
"... आता हा कोड कॉपी कर आणि इथे पेस्ट कर... मग ही यूआरएल इथे टाक... अरे तिथे नाही इथे... अं आत्ता ... इथे लिही ‘टाईमलेस मेनका’ ... टी कॅपिटल अन एम पण... ही इमेज इथे एंबेड्ड कर..."
करणच्या गायडन्स खाली समीर मेनकाची साईट अपडेट करत होता. त्यासाठी समीरने ऑफिसला चार दिवस सुट़्टीही घेतली होती.
"आता इथे काय लिहायचं...", करण विचार करू लागला तसं समीरने चुकचुकत करणला करंगळी दाखवली. करणने भुवया उडवल्या...
"आत्ताच जायचंय?"
"हो १० मिनिट ब्रेक दे ना?"
करण थोडा हिरमुसून ओके म्हणाला. तसं समीरचा कॉम्युटरवर हात चांगला होता त्यामुळे हे काम वेळात होईल असं करणला मनातल्या मनात ठाऊक होतंच. समीर! आणि मेनकाची साईट अपडेट करतोय? हा विचारच करणला मनातल्या मनात गुदगुल्या लावून जात होता. समीर गेला अन त्याच थोड्या वेळासाठी करण केलेल्या तयार झालेल्या वेबसाईटचा प्रिव्ह्यू बघू लागला.
अजून मेनकाची फिल्मफेयरची मुलाखत (तो सॅड भाग सोडून), तिचे एक्स्टर्नल लिंक्स, तिचा कव्हरपेज अन आर्टिकलमधले फोटो हे स्कॅन करून टाकायचं होतं. हे दोन दिवसाचं काम बाकी होतं. पुन्हा मेनकाचा फ्लॅश स्लाईडशो आणि तिची क्विझ अपडेट करायची होती. मेनकाच बर्थडे म्हणजे २ सप्टेंबर. त्याच्या आधी एक दिवस साईट अपलोड करायची होती. हे टॅक्टीक्स करणने नीट विचार करून आखले होते. महिन्याच्या पहिल्या तारखेला नवं फिल्मफेयर बाजारात आलेलं असलं तरी त्यातले इण्टरह्यू अन फोटो कुठल्याही इतर फॅनसाईट्वर नसणार होते. करणचीच ही एकच अशी अद्ययावत साईट असणार होती. त्याच नाविन्याच्या आधारे बाकी फॅनसाईट्सपेक्षा आपल्यालाच हीट्स जास्त मिळतील अशी करणला आशा होती. बॉलिवूडब्लॉग.कॉमच्या सर्व्हरवर आपल्या वेबसाईटची आरएसेस फीड अपलोड केल्यावर मग तो सर्व्हरच बेस्ट फॅनसाईट स्वतः मॉनिटर करणार होता. मग काय एकदा लोकांच्या पसंतीला उतरली की मोस्ट इन्हॉवेटीव्ह फॅनसाईटची ट्रोफी आपली! ह्या कल्पनेनीच करण भारावून गेला होता.
समीर मात्र जितकं लवकर हे काम आटपेल तितकं बरं अशा विचारात करणला मदत करत होता. मेनकाविषयी समीरचा द्वेष तसा तसूभरही कमी झालेला नव्हता. हे सारं तो फक्त करणच्या आनंदापायी करत होता. इकडे समीर नसताना करणचा मोबाईल वाजला अन वेबसाईटचा प्रिव्ह्यू बघत डाव्या हाताने काम करणाऱ्या करणने तो कसाबसा उचलला.
"हॅलो? करण?", समोरून कुणीतरी विचारलं.
"हॅलो", करणने हा आवाज ओळखला होता, "हाय पूजा. कशी आहेस?"
"मी ठिक. तू कसा आहेस?"
"मीही ठिक."
"सॉरी रे मी दोन दिवस भेटू शकले नाही तुला. खूप काम होतं घरी. "
"नो प्रॉब्लेम.", करणने नेहेमीचे दोनच शब्द म्हटले.
"सॅवियोला मी तुझ्याबद्दल विचारलेलं काल. पण त्याने नीट उत्तर दिलंच नाही..."
सॅवियोवरून करणला आठवलं, त्याचं सॅवियोशी झालेलं भांडण. परवाचं. करणचं अंतःकरण पुन्हा जड झालं.
"... इज एवरीथींग फाईन?", पूजाने पुढे विचारले, "म्हणजे सॅवियो म्हणाला की तोही तुला दोन दिवस भेटला नाहीये... म्हणून विचारलं मी."
"नाही गं. काही प्रॉब्लेम नाहीये."
"मग त्याने मला तुझी तब्येत का विचारायला सांगितली. स्ट्रेंज!!", पूजाने पलिकडून प्रश्न केला. ते ऎकून करण गप्प बसला. सॅवियोने आपली पृच्छा केल्याचं करणला जाणवलं अन तो ओशाळला. इकडे दोन दिवस आपण सॅवियोची आठवणच काढली नाही म्हणून करणला स्वतःचाच राग येऊ लागला होता.
"इट्स ओके. सॅवियोला सांग की मी ठीक आहे म्हणून ", करण पूजाला म्हणाला.
त्यावर पूजा म्हणाली, "तूच का त्याला सांगत नाही हे. एक मिनिट मागेच आहे तो. तुझ्या बाकीच्या ग्रुपमध्ये."
"...नो वेट...", करणचं पूर्ण न ऎकताच पूजाने, "सॅवियो!", अशी हाक मारून, "करणला बोलायचंय तुझ्याशी.", असं म्हणून फोन त्याच्याकडे दिला. शाळा सुटली होती कदाचित. पूजा अन सॅवियो दोघे परतीच्या मार्गावर असावेत.
सॅवियोचा मुळूमुळू आवाज पलिकडून आला, "हॅलो?"
"हाय!", करणने थोड्या जड आवाजात म्हटले.
"कसा आहेस?"
"मी बराय.", करणने थोडक्यात म्हटले अन तो गप्प बसला. सॅवियोही गप्पच होता.
"अरे बोल ना पुढे...", पूजा मागून प्रॉम्ट करत असावी.
"हॅलो!", सॅवियोचा आवाज आला पलिकडून, "आज मागल्या महिन्यात झालेल्या टेस्टचे पेपर्स मिळलेत. मॅथ्सचे."
"ओके."
"तुला आऊट ऑफ आहेत. पूजाला पण. मला ग्रेस मिळालेत."
"कॉन्ग्रॅट्स!", करण अनावधानाने बोलून गेला. एरवी करणला पूर्ण मार्क्स असूनही तोच सॅवियोला पास होण्याचं अभिनंदन नेहमी प्रथम करत असे. आजचा दिवसही काही वेगळा नव्हता.
"थॅन्स!", सॅवियोने पलिकडून म्हटले. त्याने स्मित केल्याचं करणला कसंतरी फोनवरच कळलंच.
"सॅवियो!", करणचा आवाज मुळूमुळू झाला, "यार सॉरी", सॅवियो गप्प होता, "उगीच भांडलो मी तुझ्याशी. आय ऍम सो स्टुपिड.", करण पुढे म्हणाला.
सॅवियो थोडावेळ गप्पच होता, "येस यू आर स्टुपिड!", त्याने हलक्या आवाजात म्हटलं, "बट आय एम सुपरस्टुपिड. मला तर नीट सॉरी पण बोलता येत नाही.", सॅवियोने समोरून ओशाळत म्हटले.
"जाऊदे! मी बोललो ना सॉरी! आज संध्याकाळी भेटशील नं तेव्हा मला तू मला सॉरी बोल. नाहीतरी कितीतरी दिवसांचा होमवर्क बाकी असेल तुझा. मी हेल्प करायला नाहीये म्हटल्यावर.", करणने फोनवरच स्माईल दिली.
"हो! बाकी आहे. मॅथ्स, सायन्स, जिओग्राफी आणि मराठी. सगळे टेक्स्ट बुक्स घेऊन मी येतोय सहा वाजता. तयार रहा. सी यू!", सॅवियोने मुक्तपणे हसून पूजाला फोन दिला.
"काय मग? झालं मेल बॉण्डींग? बराच लवकर विरघळतोस तू? समीरदादाशीही रिजॉल्व्ह केलंस ना?", पूजाने विचारले.
"म्हणजे? तुला कसं कळलं समीरदादा अन माझं भांडण सुटलं ते?", करणने चमकून विचारलं.
"मला आधीपासूनच ठाऊक होतं", पूजा दिमाखात म्हणाली, "सॅवियोला विचार. मी सांगितलेलं की करण जास्तीत जास्त चार दिवस रागावेल. पण सॅवियो उगीच म्हणत होता. बरंच सिरियस आहे. सेट व्हायला वेळ लागेल म्हणून. मग मी बेट़्ट लावली सॅवियोशी. एक मॅकबर्गर! ऍण्ड गेस्स व्हॉट कालच तुझ्या आईकडून कळलं की तुमचं पटलंय ते. जिंकले मी बेट़्ट! आणि काय रे? समीरदादाशी चार अन सॅवियोशी फक्त दोन दिवस ? छ्या! हे काय भांडण झालं? मुलींचं बघ. वर्षानुवर्षे एकमेकींशी बोलत नाहीत. शिवाय बिचींग करतात ते वेगळंच..."
“दॅट्स ट्रू. बट पूजा यू नो व्हॉट … यू आर अ बीट्ट नोझी…”, करण हसला अन त्याने पूजाच्या बोलण्याला दुजोरा दिला. सॅवियो अन तिला शेवटचं बाय बोलून करणने फोन ठेवला. पूजाशी आता करणचं चांगलंच रुळलं होतं. हळूहळू करणच्या बेस्ट फ्रेण्ड्स्च्या यादीत सॅवियोच्या सोबतीस आता पूजाही सामील झाली होती. करण तिच्या कल्पनेनेच गालातल्या गालात हसत होता. त्यात समोर समीर येऊन बसल्याचे त्याला कळले पण नाही.
"हॅलो! शुकशुक. कसला विचार करतोस रामण्णा?", समीरने रेडियोवरच्या जुन्या जाहिरातीतला डायलॉग मारला.
"काही नाही."
"हम्म्मं! काही नाही? तुझ्या चेहेऱ्यावर पूजाला बघितल्यासारखी लाली चढलीय ती?", समीरने एक भुवयी उंचावली्च.
"गेट लॉस्ट.", करण हुरळून म्हणाला, "उगीच बाता करू नकोस.", करणने कॉम्युटरस्क्रीनवर लक्ष केंद्रीत केलं, "चल काम पूर्ण करायचंय." असं म्हणून दोघांनी पुन्हा मेनकात तोंड घातलं...
... दुपार मेनकासाधनेत तशीच गेली.
संध्याकाळी सॅवियो अन पूजा आले होते. समीर त्याच्या मित्रांना भेटायला गेला होता. पण जाण्याधी आठवाजेपर्यंत येईन अन आज फ्लॅश स्लाईडशोचं काम पूर्ण करूच असं प्रॉमिस करणला द्यायला मात्र तो विसरला नाही. सॅवियो अन पूजा करणला शाळेतल्या गमती सांगत होते.
"अरे करण! मी दिलेला आल्बम वापरून झाला का?", पूजाने काहीतरी आठवत टॉपिक मध्येच तोडत विचारलं.
"ओह नो!", करणला अचानक काहीतरी आठवलं अन तो म्हणाला, "विसरलोच गं. मी अजून बॅगेतून काढलाच नाही तो."
"ठिक आहे आल्बम काढ मग आता. मला प्रत्येक फोटोची हिस्ट्री अंकलकडून कळली आहे. सांगते मी तुला."
करणने आल्बम काढला. त्यात वीसेक फोटो असावेत.
"हा फोटो जेव्हा गौतम अंकल आणि मेनका डीप्लोमा ग्रॅजुएट झाले बडोद्यात. त्यांच्या कोन्वोकेशनचा. नंतर मेडीकललाही ते एकत्रच गेले."
करण मेनकाकडे बघत होता. मुसमुसलेल्या तारुण्याने भरलेली मेनका त्या साध्या पंजाबी ड्रेसमध्येही जणू पृथ्वीतलावरची अप्सराच वाटत होती. गौतम अंकल अन तिची जोडी अगदी खुलून दिसत होती.
"हा जेव्हा तिला इंटरकॉलेज कथ्थक कॉम्पिटीशनमध्ये फर्स्ट प्राईझ मिळालेलं तेव्हाचा."
करण हुरळला, सो टॅलेण्टेड राईट फ्रॉम द कॉलेज डेज! ... आतापर्यंत चित्रपटात पाहिलेली, पूजाकडून कळलेली, मॅगझीनमध्ये वाचलेली मेनका ह्या साऱ्या फोटॊंत बरीच वेगळी वाटत होती. कसलीच चिंता नाही, दुःख नाही. सारं कसं मोकळं अन निरागस वाटत होतं. तिच्या जीवनातला हा विरोधाभास जाणवून करण थोडा अस्वथ झाला होताच पण ते जुने फोटो बघण्यात एक वेगळच समाधानही मिळत होतं त्याला. त्याने पुढचा फोटो उघडला. त्यात मेनका प्लास्टर मध्ये होती.
"ह्यात तिचा हात मोडलेला म्हणून सगळ्या मेडिकल कॉलेजच्या फ्रेण्ड्स्नी तिला विशेस दिलेल्या...". पूजा असं म्हणाली तसं सॅवियो आणि पूजाने करणकडे मौजेने पाहिलं, "जसा स्टार तसा फॅन म्हणायला हवं आता.", सॅवियोने मिश्किलीत म्हटले. हसत हसत त्यानी पुढचं पान उलटलं. हा फोटो एकट्या मेनकाचा होता.
"हा तिला तिचं पहिलं बेस्ट सपोर्टींग ऍक्ट्रेस्सचं अवॉर्ड मिळालेलं, तूफान साठी. त्याचदिवशी गौतम अंकलनी काढलेला. शी वॉज ऑन सम क्रूझशिप देन. त्याच संध्याकाळी तिच्या नेक्स्ट फिल्मसाठी सगळं युनिट मलेशियाला जाणार होतं. त्याच क्रूझ ने."
"हो बेवफाचा दिसतोय.", करणने मलेशियात शूटींग झालेला तिचा हा चित्रपट ओळखला, "कित्ती सुंदर दिसतेय इथे ती. इन अ सिंटिलेटिंग टील ड्रेस्स. जस्ट लाईक अ प्रिंसेस!"
पूजा शांत झाली, "हो!", अन उदास आवाजात म्हणाली, "ह्या दिवशी गौतम अंकलही बरेच खूष होते. त्यांनी ह्या फोटोनंतरच तिला क्रूझवर प्रपोझ केलेलं..."
"ओह! यू मिन .."
"येस! हाच तो दिवस. तिनं नाही म्हटलं अन अंकल मलाक्काला उतरून निघून गेले. ही वॉज ऑल हार्ट ब्रोकन फॉर मेनी मंथ्स आफ्टर दॅट! मग मेनकानेच त्यांना तब्बल एका वर्षाने फोन केला आणि घरी बोलावलं."
तिघे गप्प झाले. गौतम अंकलविषयी करणला पुन्हा उमाळा दाटून आला होता.
"मी हा फोटो साईटवर टाकला तर चालेल?", करणला त्यातली मेनका खूपच आवडून गेली होती.
"ओके. ऍज यू विश!"
पूजाने संमती दर्शवल्यावर करणने लगेच तो फोटो आलबम मधून काढून स्कॅन करून कॉम्प्युटरवर टाकलाही. उरलेली संध्याकाळ मग बाकी फोटो बघण्यातच गेली. आणखी काही आवडलेल्या फोटोंच्या कॉपीज करणने बनवल्या अन जाण्याआधी पूजाला आल्बम परत करून थॅन्क्स म्हटले.
"यू वोन्ट बी वेलकम फॉर धिस ऍल्बम नेक्स्टटाईम!"
"का?", करण गोंधळला...
पूजा हसून म्हणाली, "अरे गौतम अंकल उद्या निघणारेत पॅरिसला आणि नंतर न्यूयॉर्क. म्हणून हा ऍल्बम पुन्हा मिळणार नाही. नेक्स्ट टाईम ह्या आलबमचं फेवर मागितलंस तर यू विल्ल नॉट बी वेलकम", पूजाने डॊळे मिचकावले.
"ओके! पुन्हा नाही मागणार.", करणने पूजाला आश्वासन दिले, "ऍण्ड बाय द वे! गौतम अंकलना माझा बाय सांग. सांग की इट वॅज अ ग्रेट हेल्प!"
"श्युर.", मेनका म्हणाली, "निघते मी आता.", असं म्हणून पूजा अन सॅवियोने करणचा निरोप घेतला.
करण पुन्हा टाईमपासकरीत त्याच्या मेनकाप्रोजेक्टमध्ये घुसला. कॉम्प्युटर वर पुन्हा पुन्हा तो टील ड्रेसमधला मेनकाचा फोटॊ बघत करण हरखून गेला होता. समीर येईपर्यंत बेसिक स्लाईड्शोचं टेम्प्लेट करून ठेवावं म्हणून त्याने फ्लॅश मध्ये हा अन इतर काही निवडक फोटो जमवून ठेवले होते. आता फकत समीर यायचा अवकाश होता. वेबसाईट आपल्या मनासारखी बनतेय हे पाहून करण पुन्हा त्याच्या सप्तरंगी स्वप्नांत रंगून गेला नसता तर नवलच...
पण केवळ नियतीस ठाऊक होते की हीच वेबसाईट पुढे करणच्या आयुष्यात घडणाऱ्या अनपेक्षित घटनांची नांदी ठरणार होती.
***************************
भाग दहा.
"नंबर फिफ्टी सेवेन. करण रूपवते!", क्लासटीचर भट्टाचार्य मिसनी विचारलं अन "यस मॅम!" असा आवाज पलिकडून आला.
"ओह! करण यू आर प्रेझेन्ट टूडे?", मिसनी करणकडे स्मित देत पाहिलं, "हाऊ इज युअर हॅण्ड? लूक्स लाईक द प्लास्टर इज रीमूव्ड!"
"येस मॅम. इट वॉज टेकन ऑफ यस्टरडे." करण म्हणाला.
"ओके. गुड! वेलकम बॅक. नाऊ टेक केयर विथ युअर हॅण्ड्स फॉर फ्यू डेज. सिट डाऊन ऍण्ड बी कंफर्टेबल."
करण बसला. हा एक आठवडा त्याने घरी कसाबसा घालवला होता. सतत शाळेची आठवण येत होती. आज करण शाळेत आल्याचा जास्त आनंद त्याच्या मित्रांना करणपेक्षा जास्त असावा. पूजा सॅवियो अन करण हे तिघे लेक्चर चालू असताना मागल्या बाकावर बसून बडबड करत होते. पूजाने सलोनी सिंगच्या शेवटच्या बाकावर करणच्या बेंचच्या लगतच आज जागा घेतलेली. सलोनीची मैत्रिण आस्था आज आली नव्हती. भट़्टाचार्य मिस इंग्लिश शिकवत होत्या. मागे बसून बडबड करायला हाच तास परफेक्ट असे. कारण भट़्टाचार्य मिसना सोडावॉटरचा चश्मा होता आणि त्यांचे ऎकायचेही थोडे वांधे होते. त्यामुळे मागल्या बेंचला त्यांच्या लेक्चरच्या वेळी बराच भाव येई. मुलं एकमेकांना लाच देऊन जागा बदलत असत. करण अन सॅवियोने बॅकबेंचर दानिश अन कुंजन शाह ह्या क्लासमेट्स्ना आपल्या डब्यातला पुलाव राईस अन रोजकेक दिला होता. तिकडे पूजाने आपलं सायन्स जर्नल सलोनीला दिलं होतं.
"काय मग? झालं काम?", पूजाने दबक्या आवाजात विचारले.
"वेबसाईटच नं? हो. एकदम मस्त. कालच अपलोड केली.", करण म्हणाला.
"वॉव्व! आम्ही कधी बघू?", पूजा एक्साईट होऊन म्हणाली.
"अजून नाही. आज संध्याकाळी ते रिजल्ट डिल्केयर करतील. टॉप ३ वेबसाईट्सचा. तेव्हा बघा."
"ओके. श्युर. बाकी समीरदादा कसा आहे?", सॅवियोने विचारलं, “त्याला सोडलयंस की नाही तुझ्या तुरूंगातून?", सॅवियोने डॊळे मिचकावत प्रश्न केला.
"पूर्ण पाच दिवस त्याला माझ्या रूममधून जाऊ दिलं नाही मी.", करण दिमाखात म्हणाला.
"बिचारा समीरदादा", पूजा म्हणाली.
"इट्स ओके नाऊ! तो माझ्या पाहाऱ्याखाली नाहीये. मी सोडल्यावर त्याने मित्रांसोबत पार्टी केली त्याच्या."
"लॉन्ग अवेटेड फ्रीडम! कुणीही अत्यानंदातच असणार."
"तोच काय? आय ऍम हॅप्पी टू. केवळ माझी बेवसाईट बनलीय म्हणून नाही तर आज मेनकाचा बर्थडे पण आहे!!"
"काय?", पूजाने चकित होऊन डेट चेक केली. आज २ सप्टेंबरचा दिवस होता.
"सही आहे. मेनकाच्या बर्थडेच्या दिवशी छान गिफ्ट दिलंस तिला. तिची नवी वेबसाईट. शी विल बी हॅप्पी.", सॅवियोने म्हटले.
करण हुरळला. मेनकाला आपल्या साईटविषयी कळलं तर किती बरं होईल असं त्याला वाटून गेलं. निदान त्या निमित्ताने ती थोडी आनंदित तरी होईल अशा विचारात करण वहीच्या शेवटच्या पानावर काळ्या निळ्या पेन्सनी मेनकाच्या नावाची ग्राफीटी काढू लागला. भट़्टाचार्य आणि समान्था मिसचं इंग्लिश अन हिस्टरीचं लेक्चर संपलं अन मॅथ्सची सोलंकी मिस आली. करणच्या वहीचं मागलं पान एव्हाना मेनकाच्या नावांनी भरलं गेलं होतं. म्हणून करण त्याच्या आदल्या पानावर पेनानं अजून नवी ग्राफिटी आखत होता.
"सो करण! यू आर बॅक!", सोलंकी मिसने चश्मा ऍडजस्ट केला.
करण उभा राहिला, "येस मॅम."
"हाऊ आर यू फिलिंग?"
"फाईन मॅम"
"आय हर्ड यू वेयर फॉलॉईंग समवन ऑन युअर बाईक बिफोर यु गॉट क्रॅश्ड?"
ह्यावर सोलंकी मिसनं पूजाकडे पाहिलं. पूजा अन करण दोघे ओशाळले.
"नो मॅम. आय वॉज नॉट!"
"ओके! मे बी अ रूमर देन. आय वॉज सो क्युरियस... आय मिन वर्रीड!", सोलंकी मिसने झटदिशी शब्द बदलले, "बी केयरफूल नेक्स्ट टाईम. करण यू आर अ ब्राईट स्टूडण्ड. डॊण्ट ड्राईव्ह सो फास्ट. स्टॉप गेटींग सो इन्फ्ल्युएण्स्ड बाय युअर फ्रेण्ड्स!", अन असं म्हणून तिनं एक थंड नजर सॅवियोवर फिरवली अन करणला बसायला सांगितलं.
सॅवियोने आ वासला होता.
"शी मिन्स की माझ्यामुळे तू तुझी बाईक फास्ट चालवत होतास?"
करण काहीही बोल्ला नाही. सोलंकी मिसच्या क्युरियस कमेण्टमुळे तो ओशाळलाच होता.
"मला वाटलेलं की सोलंकी मिस माझ्याशी चांगलं वागायला लागलीय. बट शी इज सच अ हिप्पोक्रीट.", सॅवियो चिडून म्हणाला, "व्हॉट अ काऊ!"
असं म्हणून सॅवियोचं रागात सोलंकी कार्टून काढणं सुरू झालं. आता त्या मागल्या बेन्चवर ते दोघे वहीचं मागलं पान आपापल्या पेनानी कोरत होते.
आजचा शालेय दिवस त्यातच संपला. करण घरी परतला आणि त्याने बेल वाजवली तसं आईने दरवाजा उघडला. समीर आज लवकर ऑफिसातून आला होता. दिवाणखान्यात बसून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. आईचे डॊळे मलूल होते.
"काय झालं आई?", करणने घरातला बदलेला मूड ओळखला.
"अरे करण मनोहरमामांना हार्ट अटॅक आलाय. त्यांच्या पुण्याच्या घरी. हॉस्पिटलात नेलंय कान्हेफाट्याच्या."
"ओह माय गॉड! मग अजून काही कळलं?", करण चिंतीत झाला.
"काहीच नाही. आम्हाला काही कळतंच नाहीये...", आईने असं म्हणून डॊळ्यांना पदर लावला.
करणने गुपचुप जाऊन बॅग खोलीत ठेवली अन दिवाणखान्यात पुढची खबरबात काय कळतेय हे पाहण्यासाठी समीरच्या बाजूस येऊन बसला. फोनवर पलिकडे कुसुममामी होती. तिचा हडबडलेला आवाज समीरच्या मोबाईलवरून आई अन करण दोघांना स्पष्ट ऎकू येत होता. समीरने मामीला कसंबसं समजावत फोन ठेवला.
"काय झालं? मामा कसा आहे? मामीचं काय?", करण अन आईच्या चेहेऱ्यावर हजारेक प्रश्न साफ दिसत होते.
"मला जायला लागेल. मामी एकटीच आहे. मामाची कंडीशन क्रिटीकल आहे.", समीर अत्यंत गंभीर झाला होता. आईला रडू कोसळलं. मनोहर मामा आईचे चुलत असले तरी एकटेच जवळचे नातलग होते.
"अरे पण कुसुमच्या सोबत कुणीतरी बाईमाणूस हवं ना... मी ही आले असते.. पण करणचा हात...", आई सैरभैर झाली होती. समीर आईला समजावत म्हणाला, "मी करेन ना हॅण्डल. तुला काहीही काळजी करायची गरज नाहीये. आई खरंच."
पण आई ऎकत नव्हती. दोन तीन चार असे किती दिवस पुण्याला राहायला लागेल हेही माहित नव्हतं. करणच मग म्हणाला, "तुम्ही माझी काळजी करू नका. मी सॅवियोबरोबर राहीन. तो येईल इकडे माझ्यासोबत रात्री. जेवणाचं काय हॉटेलातून मागवेन."
"नको रे तुला एकटं... तुझा हात..", आई म्हणाली तसं करणने तिला मध्येच तोडलं, "आई खरंच. मी ठिक आहे. बघ आज शाळेत पण जाऊन आलोच ना. सॅवियो आहे. त्याचे मम्मी पप्पा आहेत. मी मॅनेज करेन. समीरदादा तूच सांग न आईला."
समीरलाही काय करावे कळत नव्हते. पण अशा अवस्थेत आईचं मन इथे लागलंच नसतं. शंका कुशंकानी तिचा जीव बेजार झाला असता. तिकडे कुसुममामीला आई असेल तर जास्त बरे वाटेल म्हणून तिला नेणं समीरला संयुक्तिक वाटत होतं. बराच वेळ समजावल्यावर समीरच्या सांगण्यावरून मग आई तयार झाली. दुपारी तीनपर्यंत समीर अन आई पुण्याला निघाले. तरी जाता जाता आईने करणला नीट राहण्याच्या शंभरेक सूचना दिल्या असतील. सॅवियोच्या आई वडिलांशीही तिचं तीनदा बोलणं झालं होतं. त्यांनी करणच्या टीफिन अन जेवण्याची स्वतःच सोय केली होती. म्हणून आईचा जीव थोडा भांड्यात पडला होता.
करणने त्यांना गुडबाय केलं. रात्रीचं जेवण घेऊन सॅवियो आला होता. त्याची रात्रीची झोपायची व्यवस्था करणकडेच होती. मनोहरमामा करणचे एकमेव मामा होते त्यामुळे करणलाही काळजी लागून राहिली होतीच. समीरच्या फोनची वाट पाहत करण कसाबसा वेळ घालवत होता...
"काय कळली तुझ्या मामाची तब्येत?", सॅवियोने करणला विचारलं.
"अजून फोन नाही आला. दोन तासांपूर्वी एक्सप्रेस हायवेला गाडी लागली होती. काही वेळात पोहोचतीलच.", करणने टि.व्ही. चॅनल सर्फ करत म्हटले. त्याची काळजी त्याच्या सततच्या हलणाऱ्या तळपायांनी साफ दिसत होती.
"ओके." सॅवियोने मोजकेच शब्द बोलून संभाषण संपवलं.
टिव्हीवर कुठल्यातरी चॅनलवर मेनकाची बर्थडेची न्यूज फ्लॅश होत होती ती पाहताच करणला आठवली. आजची कॉंपिटीशन.
"अरे मी विसरलोच. आजची कॉम्पिटीशन!", करण उठला अन तडक बेडरूमध्ये पळाला.
सॅवियोही त्याच्या मागोमाग गेला, "काय झालं?"
"अरे आजचा वेबसाईट कॉम्पिटीशनचा रीजल्ट...", असं म्हणून करणने इण्टरनेट चालू केले अन बॉलिवूडब्लॉग्स.कॉम वर लॉगिन केलं. वेबसाईट लोड व्हायला वेळ घेत होती.
"इण्टरनेट स्लो आहे.", सॅवियो पाच मिनिटं वाट बघून कंटाळून म्हणाला.
"आज भरपूर हिट्स मिळाल्या असतील म्हणून सर्वर वर लोड आला असेल.", करणनं प्रॉब्लेमचं विश्लेषण केलं.
अन ती दहा मिनिटांची साधना फळीस मिळालीच....
मार्वलिशियस-मेनका.कॉम दुसरी आलेली होती!
पहिली प्रिंसअनुज.नेट अन तिसरी मालविका-द-डॉल.कॉम दिसत होती.
"यिप्पी!", करणने आनंदात टाळ्या पिटल्या. सॅवियोही हर्षभरीत झाला होता, मालविकाची साईटही जिंकली होती म्हणून थोडा जास्तच.
"कॉन्ग्रॅट्स! नाईस जॉब!", सॅवियोने करणला लाडात पंच मारला तसं करणला दुखलं.
"उप्प्स! सॉरी!", सॅवियोने हात उडवले.
पण करणला कसलीही दुखण्या बिखण्याची फिकर नव्हती. त्याची एवढ्या दिवसांची मेहेनत सफल झाली होती. मोडलेल्या हाताने का होईना पण केवळ समीर दादा च्या मदतीने अन स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हा मेनकाच्या फॅनशिपमधला मैलाचा दगड करणने पार केला होता.
बॉलिवूडब्लॉग्स.कॉमने विनर्सना एक एक्सबॉक्स ३६० अन एक सरप्राईझ गिफ्ट अनाऊन्स केलं होतं. सरप्राईज गिफ्टची अनाऊण्समेण्ट करणच्या ईमेल वर लवकरच होणार होती. तोवर एक्स्बॉक्सवर समाधान मानायचं होतं.
"वॉव्व! न्यू एक्सबॉक्स ३६०! म्हणजे आता आपण तुझ्या एलीडी टिव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर एनेफेस कार्बन खेळू शकतो...", सॅवियो उत्साहाच्या भरात म्हणाला, "म्हणजे तुला खेळायला कुणी नसेल तर मी येत जाईन. तू सांगशील तेव्हा.", त्याने आपला बाज झटकन बदलला. उगीच डेस्परेट वाटायला नको म्हणून. पण करणला कुठल्याही गिफ्टपेक्षा आपली अचीव्हमेण्ट जास्त मौलाची वाटत होती. तो त्यानेच हुरळला होता. त्याच उत्साहाच्या भरात त्याने आपली मेनकाची वेबसाईट उघडली. साईटवरचा ब्लॉग विझीटर कमेन्ट्सनी भरून वाहत होता. एका दिवसात ५ हजार हिट्स. हा तर नवा रेकॉर्ड होता.
करणने काही मोजके मेसेजेस उघडले अन तो वाचू लागला...
मेनकाचे फॅन्स तिची ही अद्ययावत साईट बघून हरखून गेले होते. कुणाला मेनकाची फिल्मफेयरची मुलाखत आवडली होती. कुणाला तिचं फ्रण्टकव्हर. कुणाला तिची क्विझ पटली होती तर कुणाला तिचे नवे फोटॊ. जवळजवळ साऱ्यांनाच फ्लॅश प्रेझेन्टेशन आवडलं होतं. तिचा टील ड्रेस फिमेल फॅन्समध्ये फेमस झाला होता. साऱ्या मुलींनी (ज्या नावाने मुलींसारख्या भासत होत्या त्या सगळ्यांनी) त्या ड्रेसविषयी पृच्छा केली होती. करणने त्याच उल्हासाच्या भरात त्याच्या मेसेजबोर्डावरचं चौथं पाचवं पान उघडलं अन त्या पेजवर त्याला दिसलं एक अनपेक्षित नाव...
ब्लॅकवल्चर!
आणि त्याचा खाली मेसेज होता ...
"मेनकाच्या जीवनातील आणखी एक मैलाचा दगड. ही तिची वेबसाइट ... एवढे फॅन्स अन गमावलेलं यूटेरस.. ही साईट बघून वांझोटीला तेवढाच दिलासा तरी मिळेल ..."
करणला धक्का लागला होता. त्याचा मनातला आनंद क्षणात रागात बदलला...
"हाऊ डेयर ही? मेनका, गौतम अंकल, मी आणि पूजा आपल्या चौघांत असलेलं हे गुपित ब्लॅकेवल्चरला कसं काय ठाऊक?" त्याला रागात काहीच कळेनासं झालं. बाजूला बसलेला सॅवियोही ते मेसेजेस वाचत होता म्हणून करणने प्रसंगावधान राखून साईट मिनिमाईज केली.
"सॅवियो कॅन यू डु मी अ फेवर? आज थंडी सारखं वाटतंय थोडं. तू समीरदादाच्या बेडरूममध्ये त्याच्या बेडच्या ड्रॉवरमध्ये असलेली रजई आणून देशील? मला ह्या हाताने काढता येणं शक्य नाही ना, म्हणून. प्लीज?"
सॅवियोने तो मेसेज वाचला नसावा कारण तो कसलेही आढेवेढे न घेता पटकन "ओके" म्हणून समीरच्या खोलीत निघून गेला. मग सॅवियोच्या नकळत करणने वेबसाईट ऍडमिन म्हणून ब्लॅकवल्चरचा मेसेज डीलीट केला. डीलीट करण्याधी मात्र ब्लॅकवल्चरचा क्लायण्ट आय.पी. आणि ईमेल सेव्ह करायला तो विसरला नाही. ह्या ब्लॅकवल्चरचा पाठपुरावा आता करायलाच हवा होता. ह्या ब्लॅकवल्चरमुळे पुन्हा एकदा करणच्या उत्साहाला गालबोट लागलं होतं.
"हा ब्लॅकवल्चर कोण आहे? ह्याला का मेनकाशी एवढा खुन्नस आहे? खरंच तो मेनकाचा मुलगा तर नाही? ... नाही... तसं नसणार. नाहीतर गौतम अंकलना काही तरी आयडीया आली असतीच. ते मेनकाला आधीपासून ओळखतात... शिवाय मेनकाचा कॅन्सर... तिला तर मूल कधीच होऊ शकणार नाही... म्हणजे हा नक्कीच कुणीतरी ब्लॅकमेलर किंवा स्पॅमर असावा... आई म्हणते तसा गॉसिपपाल.... पण त्याला तिची मेडीकल कंडीशन कशी ठाऊक? हाउ कॅन ही नो ऑल दॅट...", करणच्या मनात वृत्तविचारांचा कल्लॊळ माजला होता. करणच्या पायांची हालचाल वेगावली होती. रजईसकट परतलेल्या सॅवियोने करण नर्व्हस झाल्याचं ओळखलं.
"काय झालं यार? एवढा कसला विचार करतोयस..."
करण हडबडला, "अं हं! काहीच नाही... असंच... अजून आई समीरचा फोन आला नाही म्हणून..."
अन तेवढ्यातच फोनची रींग वाजली.
हा समीरच होता.
"काय झालं?", करणने अधीरतेने विचारलं, "मनोहर मामा..", करणने वाक्य पूर्ण करायच्या आधीच समीर उदास स्वरात म्हणाला, "मामा आयसीयू मध्ये आहेत. कंडिशन क्रिटिकल आहे. हार्ट अटॅक आला तेव्हा मेंदूचा रक्तपुरवठा थांबला गेला. म्हणूनच ते बेशुद्ध झाले आहेत.", समीर थांबला तसा मागे आईचे अन कुसुममामीचे हुंदके ऎकू येत होते, "रात्र वैराची आहे. ही रात्र तेवढी निघाली तर स्कोप आहे."
आज चांगल्या बातम्यांसोबत वाईट बातम्यांचंही जणू पेव फुटलं होतं. करणने दुःखी मनाने फोन खाली ठेवला. ह्या कौटुंबिक दुःप्रसंगात आपण जिंकलेली ही आजची कॉम्पिटीशन करणला थोटकी वाटू लागली होती...
... मामांच्या बातमीमुळे त्याच्या आनंदावर आता पूर्णपणे विरजण पडलं होतं...
*********************
भाग अकरा
जरा खिन्न मनानेच करणने त्याच्या परीक्षानळीतलं सल्फ्युरीक ऍसिड झिंकच्या खड्यांवर ओतलं. खाली तयार होणारे झिंक सल्फाईड आणि फ्लासकच्या तोटीवर हायड्रोजनची जळणारी छोटी वात तो शून्यात गेलेल्या डॊळ्यांनी बघू लागला. दोन बाकं सोडून पूजा तिचं प्रॅक्टीकल करीत उभी होती. अन करणच्या नजीकच्या बाकावर सॅवियो होता. त्याने चुकून कॉन्सेनट्रेटेड ऍसिड घेतल्याने त्याची हायड्रोजनची वात दोन फूट वरपर्यंत पोहोचून तडतडत जळत होती. सगळी बॅच सॅवियोची दिवाळी लांबूनच पाहत होती.
लॅबच्या प्रभा मॅडम सॅवियोला येऊन ओरडल्या...
"मी कित्ती वेळा संगितलंय.. नो कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड इन माय प्रॅक्टीकल्स. यू बॉयीज थिंक इट वुड बी फन. नाऊ लूक व्हॉट यू हॅव डन. द होल अपॅरेटस इज ब्लोन..."
सॅवियो शरमला. त्याच्या ह्या चुकीला मुद्दामून केलेला लॅबस्टण्ट म्हणून पाहिलं जात होतं. सॅवियोला येथेच्छ ओरडून घेतल्यावर प्रभा मिस पूजाच्या निळ्या हायड्रोजन वातीला कॉम्प्लिमेण्ट देऊन दानिशला त्याच्या न होणाऱ्या रिऍक्शन मध्ये मदत करू लागल्या. इतरजणांचे मनोरंजन झाले असले तरी सॅवियोचे लॅबमधले मिसहॅप्स नेहेमीचे झाल्याने करणला विशेष काही वाटत नव्हतं. उलट मनोहर मामांच्या तब्येतीची काळजी लागल्याने करण मूडमध्ये नव्हता.
सॅवियोच्या ‘शुक! शुक!’ मुळे तो भानावर आला, "करण! आज हिचं पण कार्टून काढायला लागणार वाटतं...", सॅवियोने प्रभा मिसच्या नावाने नाक मुरडलं तसं करण ओढल्यासारखं हसला. आज करणचा मूड नेहेमीचा नाहीये हे कळलं अन सॅवियोही गप्प बसला. पूजा लांबून हे सर्व पाहत होती. प्रॅक्टीकल चे रीजल्ट्स लिहून ते प्रभा मॅडमकडून साईन करून घेतल्यावर करण अन पूजा एकत्रच लॅबच्या बाहेर पडले. बाकीची बॅच बाहेर यायची होती. सॅवियोने लवकर लिहायच्या धांदलीत पेपरावर पिवळं आयोडीन सांडलं होतं आणि त्याधी रीसेसमध्ये खालेल्या मसाला डोस्याच्या बटाट्याच्या भाजीचे मार्क्स बोटांवर असल्याने जेव्हा त्याने तो पेपर हाताळला तेव्हा साऱ्या पेपरावर बोटांचे निळे ठसे उमटले गेले होते. सुपर हायड्रोजन स्टोव्ह अन आयोडीन स्टार्च डिसॅस्टर अशा आजच्या सॅवियोच्या दोन इन्डायरेक्ट केमिस्ट्री एक्स्परीमेण्ट्स झालेल्या असल्या तरी त्यामुळे प्रभा मिसचं इंप्रेस व्हायचं काहीच कारण नव्हतं. उलट प्रभा मिसने सॅवियोला पनिशमेन्ट म्हणून पुन्हा सगळी हायड्रोजन एक्सपरीमेण्ट अन कोऱ्या पेपरावर ऑब्सर्वेशन्स आणि आणि रीजल्ट्स नव्याने लिहायला सांगितले होते. त्यामुळे सॅवियोला आणखी अर्धा तास लागणार होता. चिडून सॅवियोने आणखीन दोन मूठ झिंक फ्लास्कमध्ये टाकलेलं होतं...
आता ही फ्लेम नक्कीच सिलिंगपर्यंत पोहोचणार होती.
इकडे लॅबमधून लवकर निघाल्याने इतरांची वाट बघत पूजा अन करण शाळेच्या आवारात बसले होते.
"सॅवियोकडून कळलं तुझ्या मामांबद्दल. आय ऍम सॉरी!", पूजा थोड्या दुःखी स्वरात म्हणाली.
"इट्स ओके.", करण पायांशी असलेलं गवत खरवडत म्हणाला, "इट वॉज अनफॉर्च्युनेट. आता फक्त वाट बघायचीय. रात्र काढलीय त्यांनी, तोच एक दिलासा. पण अजूनपर्यंत शुद्धीवर आले नाहीयेत..."
"कालची रात्र काढलीय ना. मग पुढे पण होईल चांगलं सगळं. माझं मन सांगतंय. बघ तू कालची कॉम्पिटीशनपण जिंकलास ना. सो लक विल फेवर यू.", पूजाने करणला धीर दिला तसं करणने तिच्याकडे समाधानाने पाहिलं. पण करणचं मन एका वेगळ्याच प्रश्नाने साशंकित होतं...
"ब्लॅकवल्चर!”, करण म्हणाला तसं पूजा गोंधळली.
"काय!"
"ब्लॅकवल्चर! तुला ह्या नावाविषयी काही माहिती आहे का?"
"ब्लॅकवल्चर?? नाही. पण काय आहे हे?", तिच्या चेहेऱ्यावर गोंधळल्याचे भाव होते.
"हंम्म्म!", करणने एक दीर्घ उसासा घेतला अन अथ पासून इति पर्यंत ब्लॅकवल्चरची पूर्ण कहाणी तिला ऎकवली.
पूजा दोन मिनिटं स्तिमित होती.
"तू मला मागल्या खेपेस म्हणालेलीस की मेनकाच्या कॅन्सर अन कॅस्ट्रेशनची माहिती तिच्याशिवाय फक्त गौतम अंकल, तुला अन मलाच आहे. पण मग ब्लॅकवल्चरला ते कसं कळलं असेल?"
पूजा दोन मिनिटं गप्प होती. काहीच म्हणाली नाही.
करण पुढे म्हणाला, "मी तुझ्यावर किंवा गौतम अंकलवर संशय घेत नाहीये फक्त तुझ्या कानी ही माहिती घालावी म्हणून..."
पूजाने शांतपणे करणकडे पाहिलं, "मला माहितीये तू काय म्हणतोयस ते. माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर मी गेले तीन दिवस पीसी वापरला नाहीये. घरी रिन्होवेशनचं काम चालू आहे. माझे इमेल्स पण पेंडींग असतील एवढ्या दिवसांचे."
करण ओशाळला.
त्याच्याकडे न बघत पूजा पुढे म्हणाली, "... आणि गौतम अंकलना असं काही करायचं असतं तर त्यानी ते कित्येक वर्षांआधीच केलं असतं. शिवाय तू जसं म्हणतोस तसं त्या दिवशीचा ब्लॅकवल्चरचा मेसेज त्यानी पाठवणं शक्य नाही कारण ते तेव्हा पॅरिसला जाण्याच्या गडबडीत होते. माझे पप्पाही त्यांच्या सोबतच होते. तो पूर्ण दिवस. ऑन द एयर्पोर्ट टिल द इमिग्रेशन. त्यांनी त्यादरम्यान कुठेही इंटरनेट वापरल्याचं मला लक्षात नाही. घरी रीन्होवेशन्चं काम त्याच दिवशी सुरू झालेलं नं."
पूजाने शंकानिरसन केलं तसं करण चुकचुकत उठला. "सॉरी पूजा फॉर ऑल धिस! तू सांगतेयस त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. बट आय होप यू विल अण्डरस्टॅण्ड."
एवढं बोलून तो केमिस्ट्री लॅबच्या बाहेर पडलेल्या सॅवियोला पाहून त्याच्या दिशेने चालू लागला. पूजा तिच्या इतर मैत्रिणींची वाट बघत दोन मिनिटं तिथंच बसली होती. आता झालेलं हे संभाषण पूजाला थोडं दुखावून गेलं होतं. दिवसभर मग पूजा अन करण एकमेकांशी बोलले नव्हते. सॅवियोने हे जाणलं अन तोही काही बोलला नाही. संध्याकाळी करण घरी एकटाच परतला. सॅवियो जेवण घेऊन काही तासात येणार होता. तोवर आईच्या किचनमधल्या अस्तिवाची अन समीरच्या म्युझिक आणि फोनाफोनीची आज घरात असलेली वानवा करणला बोचत होती. हातपाय धुवून थोड वेळ टिव्ही बघत करण होमवर्क करत होता. नेहेमीचे सोलंकी मिसचे मॅथ्सचे सम्स. पुन्हा तिचेच सायन्सचे अठरा क्वेच्शन्स, जोशी मिसच्या मराठीच्या दोन कविता अन मिश्रासरांचा हिंदीचा एक पाठ असा भरमसाठ होमवर्क होता. प्रायोरीटी प्रमाणे मॅथ्स आणि सायन्स करणने प्रथम आटोपलं. तेवढ्यात सॅवियो आला.
"काय करतोयस?"
"होमवर्क."
"किती झाला? सोलंकी मिसला संपवलंस?"
"हो सायन्स आणि मॅथ्स झालंय."
"गुड! दे मी छापतो."
असं म्हणून सॅवियोने करणने लिहिलेलं सगळं डिट़्टो उतरवण्यास सुरूवात केली. करणने तोवर थोडा ब्रेक घेतला. कॉम्प्युटरवर इण्टरनेट लावणार तोच फोन वाजला. ही आई होती.
"करण बाळा कसा आहेस?"
आईचा आवाज चियरफुल नव्हता. ’मामा अजून तसेच आहेत वाटतं...’ करणने ताडले.
"मी बरा आहे. पण मामा?"
"अजून बेशुद्धच आहे रे. शुद्धीवर कधी येईल सांगता येत नाही."
"ओके. कुसुममामीला सांभाळ. सांग तिला मीही इकडे चिंतेत आहे ते... छोटी श्रिया कशी आहे? आणि समीरदादा? कुसुममामीचा भाऊ भूपेशदादा येणार होता ना."
"हो उद्या परवापर्यंत येईल तो. दिल्लीला गेलाय. सगळे तसे बरेत. समीर औषधं आणायला गेलाय मामासाठी. डॉक्टरांनी अजून दोन दिवसांचा वेळ दिलाय. बघू काय होतंय ते."
"पण मग तुम्ही राहताय कुठे?"
"मनोहरच्या घरी येऊन जाऊन असतो. आळीपाळीने."
"अगं मग दगदग होत असेल.."
"पण इलाज नाही. इकडे बाजूला लॉंज्स भरल्यात सगळ्या. पावसाळा ना. बाजूच्या घाटात टुरीस्ट आलेत भरपूर. बरं ते जाऊ दे. तुझं कसं चाल्लयं? हात काय म्हणतोय?
जेवतोस ना नीट?"
"हो ग मी ठिक आहे. जेवण येतं सॅवियोकडून. तो इथेच झोपतो रात्री."
"ठिक आहे त्यात तुझ्या हाताचा बॅण्ड दोन तीन दिवसात काढायचा आहे. मी समीरला पाठवीन कसंतरी करून घरी."
"अगं नको नको. समीर नसताना तुला एकटीला कसं जमेल तिकडचं काम? हवं तर मी सॅवियोच्या पप्पांना, रूडॉल्फ-अंकलना घेऊन जाईन डॉक्टरकडे. शिवाय आता जास्त दुखतही नाही. एक्सरसाईज करतानाही नाही. आय थिंक इट्स गेटींग बेटर."
"खरंच! जाशील ना डॉक्टरकडे सॅवियोच्या बाबांसोबत? अजून सायकल चालवायची नाहीय. कळलं ना? पावसात नीट रहा. इथे तर नुसता कोसळतोय."
"इथे अजिबत नाहीय."
असंच थोडं इकडच्या तिकडच्या गोष्टी करून मग आईने संभाषण संपवलं. करणने कॉम्पिटीशनच्या रीजल्टबद्दल आईला मुद्दामून सांगितलं नाही. ह्या प्रसंगात ते सांगणं करणला बरोबर वाटत नव्हतं. फोन झाल्यावर करणने इण्टरनेट लावलं अन तो त्याचे ईमेल चेक करू लागला. त्यात एक ईमेल बॉलिवूडब्लॉग्सचा होता. सब्जेक्ट होता...
"अ सरप्राईझ इन्साईड!!"...
करणला एकदम आठवले की कालच्या बक्षिसांत एक सरप्राईझही होते. ज्याबद्दल ईमेलने कळणार होते. करणने कुतुहलाने तो मेसेज उघडला.
डियर मि. करण,
आमची बॉलिवूडब्लॉगची सुपरफॅनसाईट ऑफ द इयर ही कॉम्पिटीशन रनर अप म्हणून जिंकाल्याने तुमचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेचे विजेते म्हणून तुम्हाला आमच्याकडून एक एक्सबॉक्स ३६० भेट देण्यात येत आहे. नाऊ गेमिंग विल बी सो मच फन!...
बॉलिवूडब्लॉग नेहेमी आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी एक्साइटींग करत आलीय. ह्याही खेपेस ती अपवाद नाही. एक्सबॉक्स ३६० च्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला एक सरप्राईझही देणार आहोत ... आणि ते म्हणजे
... तुमच्या आवडत्या स्टारशी भेट! ...
... येस! यू हर्ड इट राईट! साक्षात हृदयसम्राज्ञी मेनकाच्या हस्ते तुम्हाला मिळणार आहे तुमचा एक्सबॉक्स...
... सो बी रेडी टू ड्वेल्व इन द स्काय विथ युअर हेवनली स्टार्स. अ चान्स ऑफ अ लाईफटाईम! वेट फॉर अवर नेक्स्ट ईमेल फॉर फर्दर डिटेल्स ....
....
....
तुमच्या आवडत्या स्टारशी भेट! येस! यू हर्ड इट राईट! साक्षात हृदयसम्राज्ञी मेनकाच्या हस्ते तुम्हाला मिळणार आहे तुमचा एक्सबॉक्स .....
....
....
आवडत्या स्टारशी भेट! येस! यू हर्ड इट राईट! साक्षात हृदयसम्राज्ञी मेनकाच्या हस्ते .....
....
....
तुमच्या स्टारशी भेट! साक्षात मेनकाच्या हस्ते ....
....
....
करणच्या काळजाचा ठोका केव्हाच चुकला होता... हृदयाने वेगळीच ताल पकडली होती... दृष्टी, श्रवण अन वाचा जणू कुठेतरी हरवल्या गेल्या होत्या... पायातली शक्तीही गळाल्याचं जाणवत होतं... करण बसल्या बसल्या गोठला होता... बोटं आखडली होती... स्वतःला पिंच करायचं भानही त्याला राहिलं नसावं. मेंदूनं काम करणं काही वेळासाठी बंद केलं होतं... डोळे सतत एकच ओळ वाचत होते... मनात केवळ एकच वाक्य घुमत होतं ... तुमच्या आवडत्या स्टारशी भेट! ... साक्षात हृदयसम्राज्ञी मेनकाच्या हस्ते ...माझं इंग्लिश चुकत तर नाहीये ना? मी स्वप्नात तर नाहीये ना? हा माझाच अकाउण्ट आहे ना? मी करणच आहे ना? करण रूपवते? क्षणागणिक स्वतःला कित्येक प्रश्न पुसले जात होते. त्यांची उत्तरं पटत नव्हती. मेनकाला प्रत्यक्ष पाहण्याचं तर सोडाच पण तिच्या हातून गिफ्ट घ्यायचं, तिच्याशी बोलायला मिळायचं अन तिच्या सोबत उभं राहायचं? धिस मस्ट बी अ जोक! आपलं भाग्य कधीपासून एवढं उजळलं? ... बधिर डोक्याने करणला काय करावे हेच सुचत नव्हते. त्या धक्क्यातून सावरत तो एकच गोष्ट कशीबशी करू शकला
... "सॅवियो!" ...
मागे स्टडी टेबलवर बसलेल्या सॅवियोने वहीत डोकं घालूनच म्हटलं ... "काय?"
भेदरलेल्या आवाजात करणने जरा ऊशीराच प्रश्न केला....
... "मी नक्की जिवंत आहे ना?" ....
***************************
(पुढचा भाग ... http://www.misalpav.com/node/18881)
प्रतिक्रिया
18 Aug 2011 - 10:28 pm | गणेशा
अप्रतिम ..
सविस्तर रिप्लाय उद्या देतो. (ऑफिसमधुन निघताना थ्रेड पाहिला अआणि पटापट वाचला.)
19 Aug 2011 - 6:48 am | पिंगू
मस्त चालले आहे. पुढील भाग लवकरच पोस्ट करा..
- पिंगू
19 Aug 2011 - 9:43 am | किसन शिंदे
मस्त चाललीय कादंबरी..पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन..
19 Aug 2011 - 11:07 am | विनीत संखे
धन्यवाद मित्रांनो...
19 Aug 2011 - 11:50 am | धनुअमिता
खुप छान.
पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन.
orkut var kashi vachata yeil hi kadambari.
Pls answer it.
19 Aug 2011 - 12:02 pm | विनीत संखे
ऑर्कुटवर 'मराठी साहित्य' ही कम्युनिटी जॉईन कराल तर त्यात तुम्हाला माझं लिखाण सापडेल. पण मी मिपावर ह्या कादंबरीचं सुसंपादित रूप टाकतोय. तेव्हा मिपावरच्या रूपांतरणात काही चुका टाळल्यात. :-)
19 Aug 2011 - 12:36 pm | धनुअमिता
धन्यवाद.