मागील भाग ... http://www.misalpav.com/node/18884
भाग अठरा
"सॅवियो! सॅवियो!", करण सॅवियोच्या बाल्कनीखालून हाका मारत होता. मेनकाच्या मर्डरच्या धमकीचं हे कार्ड सॅवियोला कधी दाखवतोय असं करणला झालं होतं. त्याने आणखीन एकदा हाक मारली तोच क्रिस्टल खिडकीकडे आलेली करणला दिसली...
हातात गुलाबी टेडी बेअर अन दोन पोनी बांधलेली क्युट लिट़्टल क्रिस्टल जरा स्वतःतच मग्न होती. तिने गाल फुगवून करणकडे पाहिलं.
"क्रिस्टल! स्वीटी सॅवियोला बोलावशील?", करणने क्रिस्टलकडे हसून दाखवले.
"सॅवियो? ही इज अ बॅड बॉय! बी ए डी... बी ओ वाय....", क्रिस्टल स्पेलिंगा करत म्हणाली.
करण गोंधळला. "क्रिस्टल प्लीज कॉल सॅवियो .. व्हॉट इज ही डूईंग?"
मग क्रिस्टल हळूच काहीतरी पुटपुटली. मोठ्यांच्या कानात लहान मुलं सिक्रेट सांगायच्या नावाने हळूच अर्थहीन बडबडतात तसलंच काहीतरी. तळमजल्यावरील करणला अर्थातच वर दुसऱ्या मजल्यावरील क्रिस्टलचे बोलणे कळले नाही. करणने त्रासिक चेहेऱ्याने पुन्हा "सॅवियोला बोलाव" असे खुणॆने तिला म्हटले. तिनं टेडीबेअरच्या डोक्यावर एक फटका मारून "बॅड टेडी" असं म्हणून घरात चालेल्या प्रसंगाचा आढावा खूणेनेच करणला पुरवला.
"उप्स! लूक्स लाईक सॅवियो इज इन ट्रबल टुडे.", करणने ताडले... गेल्या दोन महिन्यातला सॅवियोचा आज पहिलाच मार खायचा दिवस.
"काय कारण असेल?’ करण हे मनातल्या मनात पुसत होता, "क्लास टेस्ट? की होमवर्क? क्लास टेस्ट नसेल... कारण क्लास टेस्टचे रीजल्ट्स तर पुढच्या आठवड्यात मिळणार आहेत... शिवाय होमवर्क तर तो नेहेमीच बुडवतो...", करणने कारणं जोडली. तेवढ्या वेळात करणला क्रिस्टलने टेडी बेअरवर आणखी फटके हाणत सॅवियोला लागत असलेला मार साभिनयाने टेडी बेअरच्या अंगावरील जागांसहित दाखवला.
ते बघून सॅवियॊची चांगलीच खरडपट़्टी झालीय हे करणच्या ध्यानात आलं. सॅवियो मार खाल्यावर कधीच घरी थांबत नसे. आत तो लवकरच बाहेर येईल हे करणला कळले अन करण तिथेच बिल्डींगच्या गेटपाशी सॅवियोची वाट पाहत उभा राहिला. काही मिनिटांनी सॅवियो बाहेर आलाच. रागात धुसमुसलेल्या त्याने करणला पाहिलं अन आपले भाव बदलले. मनातला राग अन अंगावरचा मार तो लपवण्याचा प्रयत्न करत असावा. क्रिस्टल ने सारी कथा सायलेण्टली अभिनय करून आधीच करणला दाखवलीय हे त्याला कळले नसावे.
"हाय! कधी आलास?", सॅवियोने काहीही न झाल्याच्या आविर्भावात करणला विचारले.
"दोन मिनिटांपूर्वीच."
"ओके. मग घरी नाही आलास तो?"
"का? तुझी स्मॅकींग बघायला?"
सॅवियो शरमला, "तुला कसं कळलं?"
"क्रिस्टलने ऍक्टींग करून दाखवली."
"च्च! तिचं आजकल तेच चाल्लंय. घरातल्यांची नक्कल करते. टेडीबेअरशी खेळत.", सॅवियोने मुळूमुळू म्हटले, "इट इज सो एम्बॅरसिंग. इट्स रीयली सिरीयस. मी तुझ्या घरी फोन केला. तुझ्याशी बोलायचं होतं. पण तू घरी नव्हतास. मग तुझ्या आईलाच विचारलं. "
"म्हणजे तुमच्यात बोलणं झालं वाटतं?"
"हो. आपण अशा माणसाला शोधायलाच हवं. क्राईम हॅज टू स्टॉप!", सॅवियोने आवेश बदलला. आतापर्यंत मार खाल्लेल्या गाढवाने संतापून हवेत लाथा झाडाव्यात तसे सॅवियोचे शब्द वाटत होते.
"यू आर राईट! मी पण तोच विचार करत होतो. हाऊ कॅन समवन डू धिस...", करण म्हणाला. पण चटकन त्याला काहीतरी कळले नाही, "... पण तुला तुझे पॅरेण्ट्स का मारत होते? ह्यात तुझा काय दोष?"
"बघ ना! मी पण त्यांना तेच म्हणत होतो.", सॅवियोने ढुंगण चोळत म्हटले, "पण ते म्हणतात मी लक्ष ठेवायला पाहिजे होतं... म्हणतात की ही माझी मिस्टेक आहे."
"व्हॉट़्ट?", करणने आठ्या पाडल्या, "हाऊ कुड यू स्टॉप इट? नाहीतरी तुला कसं कळलं असतं? आपण त्याला कधी पाहिलंच नाहीये."
"हो रे! बट वी कुड हॅव बीन मोअर केयरफुल! यू नो! गर्दी असली तरी थोडा क्ल्यू मिळतोच ना, आजूबाजूला कोण आहे ते."
"हो पण दॅट चान्स इज गॉन. वेगळ्या पद्धतीने शोधता आलं तर पॉसिबल आहे. माझ्याकडे त्याचा आय.पी. आणि ईमेल आहे."
"काय म्हणालास? ईमेल?", सॅवियो चकितच झाला. वेबसाइटच्या इनॉगरेशनच्या दिवशी ब्लॅकवल्चरने मेनकाला दिलेल्या शिव्या करण अजूनही विसरला नव्हता. सॅवियोच्या नकळत त्याने ब्लॅकवल्चरचा मेसेज डीलीट करण्याधी त्याचा आय.पी. आणि ईमेल ऍड्रेस्स कॉपी करून ठेवला होता.
"मला मिळालं कसंतरी. ते सोड.", करण फार तपशिलात शिरला नाही, "आपण काहीतरी करायलाच पाहिजे. त्या क्रिमिनलला शोधायलाच पाहिजे. उद्या खरंच मर्डर वर्डर झाला तर? वी हॅव टू अलर्ट द पुलिस.", करणने असे म्हटले तसा सॅवियो त्याच्याकडे संशयाने बघायला लागला.
"मला नाही वाटत ही कॅन कमिट अ मर्डर. इट्स जस्ट टू सिरीयस. डोन्ट यू थिंक सो?", सॅवियोने विचारत म्हटले.
"पण आज झालेल्या प्रकाराने तुला काय वाटतं की तो बोलबच्चन करून थांबेल? ही नोज माय ऍड्रेस्स. आज धमकीचं कार्ड असलेला बुके पाठवला. ही कॅन डू एनिथिंग!", करण.
"त्याने तुला धमकी दिली? मारण्याची?"
"मला नाही रे. मेनकाला!"
"मेनकाला? हाऊ इज दॅट पॉसिबल? त्याचा अन तिचा काय संबंध?"
"सॅवियो डम्बो! अरे असाकसा विसरलास तू? ही क्लेम्स टू बी हर रीजेक्टेड सन ना. "
"यू मिन मेनका हॅज सेकण्ड सन? आर यू सिरीयस?", सॅवियोने आ वासला होता.
"अरे सेकण्ड सन कुठला? मी ब्लॅक्वल्चर विषयीच बोलतोय?"
"म्हणजे ब्लॅकवल्चरने माझं पॉकेट मारलं?", सॅवियोच्या चेहेऱ्यावर गोंधळाचे सगळे भाव एकदमात प्रकटले.
"अरे कुठल्या पाकीटाविषयी बोलतोयस तू? मी तर मेनकाच्या मर्डरचं धमकीचं कार्ड आलंय, ब्लॅकवल्चर कडून, त्याविषयी बोलतोय."
"कुठलं कार्ड? कसला मर्डर?", सॅवियोच्या चेहेऱ्यावर आठ्या पडल्या. सॅवियोने हा प्रश्न विचारला अन दोघे दोन मिनिटं प्रश्नांकित नजरेने एकमेकांचा चेहेऱ्यात उत्तरं शोधत बसले. काहीतरी अचानक आठवून शेवटी दोघांनी कपाळावर हात मारला.
"तुझं पॉकीट कधी मारलं?" ...
"तुला मेनकाच्या मर्डरची धमकी कधी आली?"...
दोघांनी एकदमच प्रश्न केला.
सॅवियोने मग करणला बोलायला सांगितले. करणची मर्डरची गोष्ट सॅवियोचा खिसा कापणाऱ्यापेक्षा जास्त इण्टरेस्टींग होती. करणने सारी कहाणी अथ पासून इति पर्यंत सॅवियोला सांगितली. पण शेवटी कार्ड पाहिल्यावरच प्रसंगाचं गांभिर्य सॅवियो ओळखलं. तो घाबरला.
"ओह माय गॉड. तो तिथं होता... तो ... तो ब्लॅकवल्चर! त्याच ऑडियन्स मध्ये? जस्ट नेक्स्ट टू अस?"
करणने मूक मान हलवली. सॅवियोचे पाय लटपटू लागले.
"इट्स टू मच क्राईम. फर्स्ट आय वॉज सिटींग नियर अ मर्डरर ऍण्ड देन ऍन एन्काउन्टर विथ अ थिफ. जिजस ख्राईस्ट! यू सेव्ड मी. ह्या संडेला मी नक्कीच चर्चमध्ये येईन. प्रॉमिस!"...
ईस्टरनंतरचा एकही संडे सॅवियो चर्चला गेला नव्हता. त्याचा आज त्याला अचानक पश्चाताप होऊ लागला. तेवढ्या वेळात त्याने गळ्यातल्या क्रॉसला चार पाच वेळा किस्स केलं. सॅवियोची गळालेली उर्मी पाहून करणला आपण सॅवियोला उगीच सगळं सांगितलं असं वाटू लागलं.
"मग पोलिसांकडे जायचं?", करणने सॅवियोला विचारले.
सॅवियोने आवंढा गिळला. मर्डर आणि पोलिस हे कॉम्बिनेशन किती डॆडली असते ह्याची सॅवियोला कल्पना होती. तो चार पाच वर्षाचा असताना सॅवियोच्या घरी एक म्हातारी मोलकरीण बाथरूममध्ये घसरून पडली आणि मेली तेव्हा पोलिसांनी सॅवियोच्या घरात इन्वेस्टीगेशन केलेलं. सॅवियोची आई पोटेन्शियल सस्पेक्ट म्हणून तिचं इंटरॉगेशन पोलिसांनी केलेलं. तेव्हा घरात रीयल बंदुका घालून आलेले पोलिस पाहून आणि मम्मी डॅडींची त्यांच्यापुढे पाचावर धारण बसलेली पाहून सॅवियोने अगदी लहानपणापासून पोलिसांची धास्ती घेतलेली. तेव्हापासून लहान असताना ‘पोलिसांना बोलवू?’ असं मम्मी ओरडाताच सॅवियो शहाण्यासारखा वागायचा.
"पोलिसांकडे जायला पाहिजेच का?", सॅवियोने कसाबसा प्रश्न केला.
"हो मग.", करणने म्हटले, "आता धमकी दिलीय. उद्या खरंच त्याने मर्डर अटेंप्ट केला तर?", मग करणने त्याला मस्का लावला, "अरे तू तुझे सातशे रूपये कसे विसरतोस? त्याचीही कंप्लेण्ट पोलिसांना करावी लागणारच. आपल्या दोघांकडे मोटीव्ह आहे. कंप्लेण्ट करायचा."
"म्हणजे?", सॅवियोला कळले नाही.
"म्हणजे मेनकाला धमकी देणाऱ्या ब्लॅकवल्चरने मला इण्टरनेटवर केलेलं अब्युज तुला माहितिये. शिवाय मेनकाने हे ‘नो रीग्रेट्स’ चे वर्ड्स त्या इण्टरव्यूत म्हटलेले तुही ऎकलेस. म्हणजे तू माझ्या कंप्लेन्टचा विटनेस आणि तुझ्या पाकिटात सातशे रूपये होते मलाही माहित होतं म्हणजे मी तुझा विटनेस."
तरीही सॅवियो कन्विन्स्ड नसावा. थोडा वेळ एकमेकांची मनधरणी करण्यातच गेली. शेवटी मग सॅवियो तयार झालाच. दोघे सायकल वरून पोलिस स्टेशनाकडे निघाले….
डी एन नगर पोलिस ठाणे हे पश्चिम उपनगरातले सर्वात मोठे आणि गजबजलेले पोलिस स्टेशन. इथे खतरनाक क्रिमिनल्सपासून साध्याभोळ्या सिटीझन्सपर्यंत सगळ्या वर्णाची, स्टेटसची आणि वळणाची माणसं येत. एकीकडे तडीपार गुंड हजेरी लावायला, दुसरीकडे बीएम्डब्ल्यू मध्ये दिसणारे सेलिब्रिटीज सगळे आपापल्या कर्माचे दाखले द्यायला इथं येत. आज या कोलाहलात करण आणि सॅवियोचे दोन बावरलेले नवे चेहेरे दिसत होते.
"एक्स्यूज मी. आम्हाला कंप्लेण्ट लिहायची आहे.", करणने एका उभ्या हवालदाराला विचारले. त्याच्या हातात तो वायरलेस होता की रेडियो हे करणला कळले नाही. वायरलेस असेल तर तो आपल्या सिनियर्सचे इंस्ट्रकश्न्स किंवा रेडियो असेल तर मग नक्कीच मॅच स्कोर ऎकत तल्लीन उभा असावा. त्याने काहीच रीस्पॉन्स दिला नाही. मग एका टेबलावर बसलेल्या पोलिसी वेशात नसलेल्या माणसाकडे जाऊन करणने पुन्हा तोच प्रश्न केला.
त्या माणसाने करण अन सॅवियोकडे अतिथंड नजरेने पाहिले, "इथे सगळेच कंप्लेन्ट करायला येतात."
त्याच्या पोलिसी खाक्याने करण अन सॅवियो थोडे वरमले. सॅवियो थोडा जास्तच. तो तिथून पळायच्या बेतात असावा पण करणने सॅवियोला दंडाशी पकडून नीट आपल्या पायावर उभे ठेवले होते. दोन मिनिटं तो दोघांना निरखत होता अन दोघे अपराधीपणाने त्याच्याकडे आणि एकमेकांकडे बघत होते.
"बसा", त्याने आवाजात जरब आणून म्हटले. करण अन सॅवियो बसले.
"इकडे माझी ड्युटी संपलीय आहे पण तुमच्याकडे बघून दिसतंय की तुम्हाला माझ्यापेक्षा घरी जायची घाई जास्त असावी... काय बरोबर ना?", असं म्हणून त्याने करणकडे पाहिलं अन तुसडेपणाने सॅवियोकडे एक नजर फिरवली. सॅवियोने आवंढा गिळला.
"मी इन्स्पेक्टर विवेक काळे. बोला काय कंप्लेन्ट आहे?", त्याने पेन हातात घेतलं अन एका पेपरावर तो लिहू लागला... दोन सेकंदानी, "बोला आता! का स्पेशल इन्व्हिटेशन देऊ?", असं त्याने पुन्हा तुसडलं. करणने तोंड उघडलं, "मी करण रूपवते. आणि हा माझा मित्र सॅवियो रूडॉल्फ."
सॅवियोने चेहेऱ्यावर उसनं हसू आणलं. इन्स्पेक्टरच्या चेहेऱ्यावरील माशीही हलली नाही.
"राहणार?"
"मी ‘रजनीगंधा’ आणि सॅवियो ‘कुक्कूज नेस्ट’ सोसायटी, सात बंगला इकडे राहतो."
"हं. काय कंप्लेन्ट आहे?"
करणने पॉज घेतला, "ऍक्ट्रेस्स मेनकाचा जीव धोक्यात आहे. कुणीतरी तिला मारायच्या तयारीत आहे”, एवढंच बोलून तो थांबला …
इन्स्पेक्टर विवेक काळेच्या हातातलं पेन गडबडलं. त्याने एक अविश्वासाचा भाव करणला दिला. सॅवियोच्या चेहेऱ्यावरचं उसनं हसू पळालं. इन्स्पेक्टर आपल्याला पोलिस स्टेशनमधून निघून जायला सांगेल असं सॅवियोला वाटलं म्हणून तो उठून ऊभा राहिला. पण तसं काहीच झालं नाही. इन्स्पेक्टर पुन्हा खाली बघून लिहू लागला. करणने सॅवियोला बसायची खूण केली.
"तुम्हाला हे कसं कळलं?", इन्स्पेक्टरने पुढचा प्रश्न केला.
"मला धमकीचं कार्ड आलं आहे. हे बघा.", असं म्हणून करणने ते कार्ड इन्स्पेक्टरच्या हवाली केलं. इन्स्पेक्टरने ते हातात घेतलं अन तो त्याच अविश्वासाच्या भावात ते वाचू लागले.
"ह्यात मेनकाचं नाव कुठे दिसत नाही!"
"हो पण तिला मारण्याचीच धमकी आहे ही… तिने म्हटलेले शब्द रीपिट केलेत ह्यात...", करणने इन्स्पेक्टरचं बोलणं पूर्ण होऊ न देत म्हटलं, "‘नो रीग्रेट्स’ असं ती तिच्या आज रेकॉर्ड झालेल्या एमटिव्हीच्या इण्टरव्ह्यूत म्हणालेली. आम्ही तिथेच होतो ऑडियन्समध्ये. मला आज तिच्या हस्ते बक्षिस मिळणार होतं… सॅवियो सुद्धा होता माझ्या सोबत... हो की नाही सॅवियो?", करणने सॅवियोकडे होकारार्थी बघितले... सॅवियोने ‘हं’ असं मुळूमुळू म्हटलं... आता हे पूर्णविराम असलेलं ‘हं’ होतं की प्रश्नचिन्ह असलेला ‘हं?’ ... बोध कुणालाच झाला नाही.
"मग ही धमकी सरळ मेनकाला न पाठवता तुम्हाला पाठवयचं कारण?"
इन्स्पेक्टर विवेक काळेंच्या ह्या प्रश्नावर करणने त्याची मेनकाची फॅनशीप, इण्टरनेटवर झालेला ब्लॅकवल्चरचा आजवरचा संवाद, आजचा प्राईझ सेरेमनी, मेनकाची मुलाखत, त्यात करणच्या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर, आजचा घरी आलेला तो बुके हे सगळं सगळं सांगितलं. हे सांगताच आपल्या मनातला भार एकदम हलका झालेला करणला वाटला. आई, समीर, सॅवियो आणि पूजा ह्या चौघांपैकी कुणीही करणला इतकं मदत करणार नव्हतं जितकं इन्स्पेक्टर काळे करू शकत होते. करणची स्टोरी संपेपर्यंत तब्बल पंधरा वीस मिनिटं गेली. त्यादरम्यान इन्स्पेक्टरनी वेळ, काळ, पत्ता आणि करण अन सॅवियोचा इतर पर्सनल तपशील विचारला अन बाजूच्या हवालदारला एक कागद दिला आणि त्याला काहीतरी कुजबुजत सांगितले. आणखी दहा पंधरा मिनिटं अशीच गेली.
शेवटी पेन टोपणात घालून इन्स्पेकटरनी खुर्चीवर पाठ टेकवली अन ते रीलॅक्स्ड मूडमध्ये करण अन सॅवियोकडे बघू लागले. सॅवियो आणि करण शाळेच्या युनिफॉर्ममध्येच होते. ह्या साऱ्या गडबडीत दोघांना चेंज करायचा वेळच मिळाला नव्हता.
"तुमचं दोघांचं वय काय म्हणलात?"
"पंधरा."
"शाळा?"
"सेन्ट जॉर्ज कॉन्वेन्ट"
"घरी कोण कोण आहे?"
"माझ्या घरी आई, आणि मोठा भाऊ.", हा सगळा तपशील आधीच विचारून झालेला होता म्हणून करण जरा कंटाळूनच म्हणाला, "आणि सॅवियोच्या घरी त्याचे आई वडील आणि लहान बहीण."
"हो माझ्या घरी आई आहे आणि ती इनोसण्ट आहे..." सॅवियो अगतिक होऊन म्हणाला.
इन्स्पेक्टरनी थोडक्यात गोंधळून होऊन सॅवियोकडे पाहिलं. सॅवियो कवचात कासव आकसतं तसा खांद्यात आकसला. आपण ऊगीचच बोल्ल्याची त्याला जाणीव झाली. चार पाच वर्षांचा असताना लागलेलं पोलिसी भूत त्याच्या मनातून अजून सुटलं नव्हतं. इन्स्पेक्टर खुर्चीवरून उठले आणि करण अन सॅवियोच्या पुढ्यात टेबलावर बूड टेकून हातांची घडी घालून उभे राहिले.
"लूक बॉय्ज", इन्स्पेक्टरनी म्हटलं, "मर्डर इज अ सिरीयस क्राईम. आय गेस यू नो दॅट?"
"येस", करण अन सॅवियोने म्हटले.
"मर्डरची धमकी देणंही मोठा गुन्हा आहे. गुन्हेगाराला दोन वर्षांपर्यंत सजा होऊ शकते. माहितिये?"
करण अन सॅवियोने मान डोलावली. होकारार्थी की नकारार्थी हे अलाहिदा!
"पण खोट्या धमक्या, रूमर्स किंवा तुम्ही यंगस्टर्स ज्याला ‘प्रॅन्क्स’ असं गोंडस नाव देता त्यालाही कायद्याने गुन्हा मानलं आहे. त्याची काय सजा आहे माहितिये?"
करण अन सॅवियो एकेमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले.
"दोन दिवस जेल!"
सॅवियोने आवंढा गिळला.
"पुन्हा पोलिसांकडे येऊन टाईमपास केल्याची काय सजा आहे माहितिये?"… करणने आठ्या पाडल्या … "आणखी दोन दिवस कोठडी...", इन्स्पेक्टर म्हणाले, "...त्याशिवाय मोठ्या सेलेब्रिटींना इन्व्हॉल्व करणे... त्यांना सतवणे... फेक अब्युज ह्याचे होतात तीन दिवस... म्हणजे एकूण एक आठवडा कोठडी."
करणला अजून कळलं नव्हतं. ह्या सगळ्याचं त्याच्या कंप्लेन्ट्शी काहीच देणघेणं नव्हतं.
"बट इन्स्पेक्टर काळे", करण म्हणाला, "मला कळत नाही तुम्ही काय म्हणताय ते!"
इन्स्पेक्टरनी हाताची घडी मोडली अन ते करणच्या मागे जाऊन उभे राहिले. अचानक त्यांनी मागूनच करणच्या चेहेऱ्यासमोर बेड्या लटकावून सोडल्या.
"धिस इज व्हॉट आय ऍम टॉकिंग अबाउट!"
बेड्या पाहूनच सॅवियोची पाचावर धारण बसली. त्याने बारीक आवाजात भितीची उचकी दिली आणि त्याच्या कपाळावरून घामाची धार वाहिली. ती पुसायचं भानही त्याला राहिलं नसावं. करणही बावरला...
"बट इन्स्पेक्टर..." , करण त्याचं बोलणं संपवणार तोच इन्स्पेक्टर मागून गरजले.
"तुम्ही टीनेजर्स समजता काय? ह्या भाकडकथांना आम्ही पोलिस भाव देऊ म्हणून? ... एकशेछप्पन्न मर्डर केसेस सॉल्व्ह केल्यात मी ... त्यातले वीस एन्काउण्टर माझ्याच हातून झालेत... दोनशे रॉबरीज, रीयल एक्स्टॉर्शन्स एकशेचाळीस आणि एकशेदहा रेप हॅंडल केलेत मी... पण फेक एक्स्टॉर्शन्स किती पाहिलेत माहितियेत? ... चारशे ऎंशी! तुमच्यसारखी फेमवल्चर्स सतराशे साठ येतात ह्या ठाण्यात ... आपल्या आवडत्या स्टारला भेटायचंय किंवा जवळीक वाढवायचीय? करा खोट्या धमक्यांचे कॉल्स... बनवा खोट्यानाट्या कहाण्या... पण जेव्हा आठवडाभर रहावं लागतं खऱ्या मर्डरर्स, रॉबर्स, रेपिस्टच्या संगतीत, तेव्हा कळतं गुन्ह्याची वाट किती कठीण असते ते... फेम लस्टी मोरॉन्स.. ऑल ऑफ यू!"
ठाण्यात एकच शांतता पसरली. सगळे करण, सॅवियो अन इन्स्पेक्टर काळेंकडे निरखून बघत होते. सॅवियोला आपण फासावर चढतोय असं वाटू लागलं होतं. करणही बावरलेलाच होता. पण तरीही करणने हिम्मत करून विचारलंच... "पण इन्स्पेक्टर आम्ही खोटं नाही बोलत आहोत... इट इजण्ट फेक... ते कार्ड ... शिवाय आमची कंप्लेण्ट... सॅवियोची साक्ष..."
"... तुमची कंप्लेण्ट? तुमचे एविडन्सेस?...", इन्स्पेक्टर तुसडेपणाने हसले, "ही आहे तुमची कंप्लेण्ट...", अन त्यांनी एक कोरा कागद, करण आणि सॅवियोच्या पुढ्यात फेकला... त्यावर फक्त दोन फोन नंबर लिहिलेले दिसत होते... करण अन सॅवियोच्या घरचे...
करण अन सॅवियो रीऍक्ट करणार तोच एक हवालदार हळूच इन्स्पेक्टर काळेंच्या बाजूस येऊन त्यांच्या कानात पुटपुटला, "साहेब ते आलेत."
"ह्म्म्म्म", काळे हुंकाराने म्हणाले, "उठा. गेट अप. लूक बॅक."
करण आणि सॅवियोने निमूटपणे उठून मागे वळून पाहिलं अन त्यांचं उरलेलं अवसान गळालं…
... रूडॉल्फ अंकल, सोफिया आण्टी, आई आणि समीर तिथेच पोलिस स्टेशनच्या दाराशी उभे होते...
... त्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर भयंकर राग दाटला होता ...
*******************
भाग एकोणीस
आकाशात मळभ साठलं होतं. रस्ते मलूल पडू लागले. वारा वाहायचा थांबला होता. ढगांत जोरदार पावसाची मांदियाळी दिसून येत होती. हे सुनसान वातावरण करणला अस्वस्थ करून जात होतं. बाहेरच्या वादळापूर्वीची ही शांतता करणही गाडीच्या आत स्वतः अनुभवत होता. समीर आणि आई दोघे मघापासून त्याच्याशी काहीच बोलले नव्हते. सगळं कसं सुनंसुनं होतं. त्यांच्या चेहेऱ्यावरील राग घरी पोहोचेस्तोवर तसूभरही कमी झाला नव्हता.
समीरने लॅच उघडला तसा निमूटपणे करण घतात शिरला. पाठून आई समीरही आत आले आणि त्यांनी दार लावून घेतलं. करण पाठमोराच उभा होता. दोन मिनिटं कुणी काहीच बोल्लं नाही. करणने त्याच्या बेडरूमची दिशा पकडली.
"वेट!", पाठून समीरचा आवाज आला. करण थांबला...
... विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला होता...
"रक्त सांडलंस, हात मोडलास, धमक्या खाल्यास आणि आता पोलिस... ", समीरने आवाज उग्र केला, "पुढे काय करायचा विचार आहे? रॉबरी, किडनॅपिंग की मर्डर? ... टेल मी करण. व्हॉट नेक्स्ट?"
करण अपराध्यापणे मागे वळला.
"आय ऍम सॉर..."
"... ऑफकोर्स यू आर सॉरी. घरच्यांना दिवसरात्र तुझ्या काळजीत टाकून यू फिल सॉरी... एका फिल्म ऍक्ट्रेस्सच्या मागे वेडावून उलटेसुलटे धंदे करून यू फिल सॉरी... इण्टरनेटवर भांडून शत्रू बनवून त्यांच्याकडून धमकीचे कॉल येतात म्हणून तू सॉरी... व्हाय डोण्ट यू रीयली मीन इट व्हेन यू से सॉरी ... व्हाय डोन्ट यू ऍक्चुअली फिल रिस्पॉन्सिबल फॉर युअर ऍक्शन्स? व्हाय डोण्ट यू फिल सॉरी फॉर बिइंग सो ऑब्सिनेट ऍण्ड सो अनरीजनेबल करण!"
करणने मान खाली घातली.
"आम्ही वेड्यासारखे तुला हवं नको ते बघून, तुझ्या अभ्यासाची काळजी घेऊन, तुझ्या अननेसेसरी हॉबीजना एनकरेज करून, तुला हवं तसं करण्याचं फ्रिडम देतो ते काय ह्याच्यासाठी? दगड खाण्यासाठी, स्वतःचा ऍक्सिडेन्ट करवण्यासाठी, तुझ्यावाटच्या धमक्या खाण्यासाठी की पोलिसांशी प्रॅन्क्स खेळण्यासाठी? हां?"
करण गप्प.
"तिथे आम्ही घरापासून दूर हातातलं काम टाकून मामांच्या काळजीत, इकडे तू एकटा कसा राहत असशील ह्या तुझ्या काळजीत. सात दिवसांनी घरी थकून भागून येतो ते काय हे सगळं पाहण्यासाठी? आमच्या कुलदिपकाने काय दिवे लावलेत ते बघण्यासाठी?"
करणने पुन्हा काहीतरी बोलायला तोंड उघडले.
"डोन्ट से अ वर्ड!", समीरने करणला गप्प राहण्याची ताकिद दिली. त्याच्या डोळ्यात रागाने आता लाल रंग पकडला होता. करणने पुन्हा मान खाली घातली. समीर खरंच खूप अपसेट होता.
"… आणि सगळ्यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा तुझं सो कॉल्ड पॅशन त्या फिल्थी बाईसाठी ऊतू जातं तेव्हा तेव्हा तूच सफर कर्तोस, संकटात पडतोस… डोन्ट यू सी धिस सिंपल थिंग? ऑर आर यू कंप्लिटली ब्लाइण्डेड बाय हर फॉल्स ब्युटी?...", समीरने नेहेमीप्रमाणे मेनकाची निंदा सुरू केली.
"तिच्यात काय एवढं विशेष आहे करण? सांगशील का आम्हाला? म्हणजे जिला भेटायला तुला आमच्या परवानगीची गरज लागत नाही, तिच्यात काहीतरी वेगळं असेलच. व्हॉट इज ईट दॅट ड्राईव्हज यू सो क्रेझी? तिचं कृत्रिम सौदर्य? तिचे टुकार पिक्चर्स? की तिचे चीप पब्लिसिटी स्टण्ट्स? जुना बॉयफ्रेन्ड, नवा मुलगा? काय? सांगना..."
करणने समीरकडे थोडं गुश्श्यातच पाहिलं. मेनकाच्या शिव्या एकून घेणं करणला जड जात होतं. पण तो काही बोलणार ह्याच्या आधीच समीर फुटला. समीर आज जास्तच ईरेला पेटला होता.
"तिकडे त्या जीवघेण्या प्रसंगातून आम्ही सगळे जात असताना तुला फक्त तिला भेटण्याचीच चिंता असेल नाही का? आई दादा गेलेत मामांकडे व्हाय शुड आय केयर? मामा मरतायत मरू देत. काय? मेनकाशी भेट प्रथम. आई, भाऊ, मामा किंवा त्यांची परवानगी घेणं गेलं खड्ड्यात... "
ह्यावर करणने गोंधळून आईकडे पाहिलं. त्याला विश्वास बसत नव्हता तो हे कसं काय ऎकतोय. करणने लगेच समीरला तोडलं, "... पण मी विचारलेलं. आय स्वेयर. आईला माहितिये.".
आईने गोंधळून समीरकडे पाहिलं. तिनं करणच्या बोलण्यास दुजोरा देण्यास असमर्थता दर्शवली. समीर ओरडला, "हाऊ डेयर यू लाय टू अस? आता त्या नटीच्या नादात तू खोटं पण बोलू लागलायस? ... ग्रेट ... हेच आम्हाला पाहायचं बाकी होतं. बघितलंस आई ... तुझ्या लाडांचे परिणाम? गुंड मवाली होण्यात आता काय उरलंय? एका थर्डग्रेड बाईसाठी रक्तबंबाळ व्हायचं, तिच्यासाठी वाया गेलेल्या पोरांशी इंटरनेटवर भांडायचं, त्यांच्याकडून खूनाच्या धमक्या खायच्या आणि वर तोंड उगारून खोटं बोलायचं. आता फक्त शाळा सोडून सिगरेटी फुंकत नाक्यावर उभा रहा म्हणजे रूपवते कुटूंबाचं नाव उज्ज्वल करशील..."
समीरच्या डॊळ्यातली आग आत त्याच्या शब्दांत उतारू आली होती. समीरचं बोलणं करणला आत लागत होतं. मेनकाची निंदा, खोटं बोलत नसतानाही त्याच्यावर केलेले बिनबुडाचे आरोप ... धिस वॉज टू मच!
".. पण मी खोटं बोलत नाहीये. खरंच. माझ्याकडे एसेमेस आहे. आईने जायची परवानगी दिलेली..."
"... डोन्ट यू डेयर लाय टू मी. आई कशाला खोटं बोलेल? तिला ह्याविषयी काहीच कल्पना नाही. आता एवढं सगळं झाल्यावर आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवू तरी कसा? टेल अस करण. कॅन वी स्टील ट्रस्ट यू?"
"बट आय ऍम टेलिंग द ट्रुथ. आईने हो म्हटलेलं. मला तिचा आज सकाळीच मेसेज आला. इफ यू डोन्ट बिलीव्ह मी देन अटलीस्ट सी धिस..."
करणने मेसेज उघडून समीर अन आईला दाखवला...
... दोन मिनिटं आई आणि समीर तो मेसेज आणि एकमेकांचे चेहेरेच बघत होते... आईला अजिबात विश्वास बसत नव्हता...
"पण मी हा मेसेज केला नाहीये.", आईने गोंधळलेल्या स्वरात म्हटले, "पण मला कुठलाही मेसेजचा अलर्ट पाहिलेला आठवत नाही. मी कशी हो म्हणेन?", आईने तिने स्वतः परवानगी दिल्याची शक्यता तिथंच फेटाळली. तिनं आपला मोबाईल चेक केला अन त्यात करणचा मेसेज आल्याचे तिला दिसत होते पण सेन्ट आयटम्समध्ये कुठलाही रीप्लाय केलेला दिसत नव्हता. आईला मुळातच करणचा मेसेज आल्याची माहिती नव्हती. त्यात पुन्हा नव्या मेसेजचा कसलही अलर्ट आलेला तिला जाणवला नाही. म्हणूनच तर तिने इनबॉक्सही चेक केला नव्हता. काहीतरी मोठी गडबड होत होती....
समीर मात्र करणकडे असलेला तो रिप्लाय वाचून कन्विन्स्ड झाला नव्हता... नाराजीत समीरने इन्बॉक्स बंद केला अन मोबाईलचा वॉलपेपर झळकला ... मेनकाच्या हातून प्राईझ घेणाऱ्या करणचा... मेनकाला पाहताच समीरच्या तळपायची आग मस्तकात गेली....
"हाऊ कॅन यू से धिस इस नॉट फेक करण?", समीरने तुसडेपणाने करणकडे पाहिलं, "... खुद्द मेनकाला भेटायला मिळतंय म्हटल्यावर तू कसातरी गोलमाल करून हा मेसेज स्वतः कंपोज केला नसल्याची काय ग्यारण्टी? आजकल सुटेबल टेक्नोलॉजी वापरून काहीही करता येणं शक्य आहे... नाही का?"
करणच्या तोंडून शब्द फुटत नव्हते... त्याला विश्वास बसत नव्ह्ता... साऱ्या प्रसंगाचं खापर त्याच्यावर फोडलं जात होतं... द विक्टिम वॉज अक्युस्ड ऑफ द क्राईम!
"पण मी असं काहीच केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा... ट्रस्ट मी...", करण ओरडत होता... पण त्याचे शब्द बंद कानांवर पडत होते... समीर आणि आई रागात, अविश्वासात अन दुखावलेल्या नजरेनं करणकडे बघत होते. त्यांनी एकमताने करणला दोषी मानून टाकले होते... दिवाणखान्यात एकट्या उभ्या करणच्या डोळ्यांतल्या आसवांना आता फक्त बाहेर गरजत कोसळणाऱ्या पावसाचीच साथ होती...
दिवस मावळला. पण करणचं मन अजूनही आतल्या आत झगडत होतं. डोळे दु:खाने पाझरत होते. आज अतीव आनंदाने सुरू झालेला हा दिवस असा आत्यंतिक क्रूर निघेल ह्याची करणला सुतरामही कल्पना नव्हती. ‘मी काय बिघडवलं? मी आईला विचारलेलं तरी आईने नाही असं का म्हटलं? मी ब्लॅकवल्चरचं काय बिघडवलं होतं की त्याने मला घरी धमकीचं पत्र पाठवलं? मला मेनकाची पर्वा आहे, ती का आहे हे मी कसं सांगू? जे मलाच ठाऊक नाही, ते मी इतरांना कसं स्पष्ट करू? का मीच दोषी मानला जातो दरवेळी?’ करणचे प्रश्न साचत होते पण उत्तरांना मोकळी वाट नव्हती. मनात भावनांचा कल्लोळ माजला होता. करण समीरवर नाराज नव्हता... आईवरही नव्हता. आई खोट कधीच बोलत नाही, हे करणला ठाऊक होतं. किंबहुना ती खोटं बोलूच शकणार नाही. तिने नेहेमीच मला सपोर्ट केलाय. पण असं असतनाही मग तिने नकार का दिला असावा? ह्या साऱ्या प्रश्नांच्या उत्तरांची अपेक्षा करणं व्यर्थ होतं. कुठूनही मार्ग दिसत नव्हता. मनातल्या मनात कढतच ही रात्र काढावी लागणार होती...
... नंतरची सकाळ एकदम मळलेली होती. आजचा दिवसही कालच्या रात्रीचाच पाठलाग करत असावा. तोच पाऊस आजही संततधार पडत होता. आई आणि समीर करणशी काहीही न बोलता निमूटपणे ऑफिसात निघून गेलेले होते. करण उठला अन त्याने तोंड धुवून नाश्ता केला. एक ब्रेड बळेबळे गळ्याखाली उतरवला. अन्नाची वासना केव्हाच निघून गेलेली होती. मूड ठिक व्हावा म्हणून करण दूधाचा ग्लास हातात घेऊन टिव्ही समोर बसला आणि भराभर चॅनेल फिरवत करणने रीमोटची सगळी बटणं दाबून पाहिली. त्याच्या भिरभिरत्या मनाची ती ग्वाही देत असावीत...
शेवटी एके ठिकाणी करण रेंगाळलाच. मेनकाचा फोटॊ टिव्हीवर फ्लॅश होत होता. अन खाली बातमी होती.
... "मेनकावर जीवानिशी हल्ला! गळा कापण्यात यश! लीलावतीत भरती!!" ...
... करणच्या हातातला दूधाचा ग्लास खाली खळकन पडून फुटला होता अन दूध रक्तासारखं पसरलं होतं..
********************
भाग वीस
"फिल्म ऍक्ट्रेस मेनका की जान अभीभी खतरे में.... लीलावतीमें फिल्म स्टार्स की भीड ... मेनकाके करीबी दोस्त फिल्मस्टार अनुजकुमार चिंतीत ... फिल्म ‘इधर उधर’ के डायरेक्टर जासिमखान पहुंचे अस्पताल में ... मालविकानेभी की डॉक्टरोंसे फोन पर बात ... मनिष भट़्ट को टिक्कूजीने गेटपरही रोका..."
ना ना लोकं ... ना ना प्रकार... ह्यांपैकी कुणीही कदाचित मेनकासाठी तेवढं कढत नव्हतं जेवढं करणने त्या काही मिनिटांत सोसलेलं... ह्या बातमीमुळे भेदरलेला करण आज शाळेत गेला नव्हता... सारा दिवस टिव्हीसमोर सुन्न बसून तो मेनकावर गुदरलेल्या ह्या भयानक प्रसंगाचं कव्हरेज पाहत होता... कधी आज तक तर कधी झी न्यूज, आयबीएन, एनडीटीव्ही... दूरदर्शनच्या बातम्याही पाहून झाल्या ... मेनकाला आयसीयूत भरती केलं आहे एवढंच काय ते कळलं होतं... तिच्या प्रकृतिपेक्षा मेनकाला पाहण्यासाठी आलेल्या पेज थ्री सेलेब्रिटिंजच वलय त्या मूळबातमीस जास्त लाभलं होतं... मेनकाचं नाव, उल्लेख, फोटॊ किंवा विडीयोची क्षुल्लकशी झलकही टिव्हीवर येताच करणचे डॊळे भिरभिरायचे ... काहीतरी शोधू लागायचे... कालच्या दिवशीची स्टुडियोतली लाईव्हली मेनका अन आज रूग्णशय्येवर पडलेली होती … अगदी मरणासन्न ... हे एखादं नाईटमेअर असावं ... पण नाही हे खरं होतं... टीव्हीवरील बातम्या ओरडून ओरडून हे सांगत होत्या ... मेनकाच्या ह्या अवस्थेचं खापर करण सतत स्वतःवर फोडत होता ... तिच्यावरच्या हल्ल्याची माहिती हाती असूनही तो काहीही करू शकला नाही... आपल्या दैवताला वाचवण्यात तो पूर्णतः अपयशी ठरला होता ... पश्चतापदग्ध होऊन तोही तिच्या सोबत तीळतीळ मरत होता ... हतबलतेने, दुःखाने, रागाने... हळूहळू तिच्या जखमा, तिला लागलेला मार, तिचा अडकणारा श्वास करणला स्वतःहून जाणवू लागला ... त्याच्या डॊळ्यांसमोर धूसरता दाटू लागली ... त्या धुक्याने मेनकाचा चेहेरा व्यापून टाकलेला होता... तोही जणू मेनकासोबत तिच्या मृत्युच्या छायेत हरवत होता....
... संध्याकाळी आई आणि समीर घरी आले तेव्हा त्यांनी करणला टिव्हीसमोर मख्ख बसलेलं पाहिलं... त्याचे डॊळे उघडे होते पण त्यात भावहीनता होती... करणची शुद्ध हरपून कित्येक तास लोटले होते ... डॉ. श्रिनीवासाना पाचारण करण्यात आलं...
"त्याला ऍक्युट शॉक लागलाय.", डॉक्टर श्रिनीवास म्हणाले, "थॅन्कफुली इमोशनल ब्रेकडाऊन नाहीये. हा डोस जो मी इंजेक्ट केलाय त्याने त्याचा मेंटल शॉक कमी होईल आणि तो शुद्धीवर येईल. पण त्यात काही तास जातील. फक्त अंग गरम लागायला लागलं तर मात्र मला इमर्जंसी फोन करा. ह्या अवस्थेत ताप यायला नको."
आई आणि समीर अपराध्यासारखे हो म्हणाले. समीरनं डॉक्टरांना दारापर्यंत सोडलं. डॉ. दाराबाहेर पडले.
"मिस्टर रूपवते", डॉ. परत फिरले, "मला तुमच्याशी काही बोलायचंय..." असं म्हणत त्यांनी समीरशी हळू आवाजात संवाद सुरू केला, "... करणचं वय लक्षात घेता मला असं दिसतं की तो बराच हळवा झालाय.. विशेषतः मेनकाच्या बाबतीत... ही इज अ टीनेजर... ह्या वयात हॉर्मोन्स इमोशन्स ड्राईव्ह करतात … ह्या हॉर्मोनल रशमुळे इमोशन्स वादळासारखे येऊ शकतात आणि सर्व विस्कटवून जाऊ शकतात ... यू नो व्हॉट आय मिन..."
"हं.", समीरने मान खाली घालूनच दुजोरा दिला.
"... त्याच्या पॅशनचं ऑब्सेशन होणं ठिक नाही... म्हणजे वुन्ड्स, फ्रॅक्चर अन आता इमोशनल ब्रेकडाऊन होता होता राहणं.. लक दर वेळी फेवर करेलच असं नाही."
"डॉक्टर ...", समीर अगतिक होऊन म्हणाला, "त्याने मेनकाचं वेड सोडावं असं आम्हालाही वाटतं... पण काय करावं तेच कळत नाही... ह्यावरून जेव्हा जेव्हा मी किंवा आई त्याला बोलतो तेव्हा तेव्हा त्याचे कॉन्सिक्वेन्सेस असेच काहीतरी भयानक होतात..."
"मला कळतंय मिस्टर रूपवते...", डॉक्टरांनी मान डोलावत म्हटले, "पण कुठेतरी लाईन ही आखावीच लागणार... इट शुड गेट ओवर... वन्स ऍण्ड फॉर ऑल... आणि हे फॅमिली म्हणून फक्त तुम्हीच करू शकता."
डॉक्टरांनी हताशपणे त्याच्याकडे पाहिलं आणि ते निघून गेले. आज घराबाहेरच्या व्यक्तीने करणविषयी चिंता व्यक्त केली होती. उद्या करण तसंच काही उलटसुलट करून बसला तर? समीर विचारात पडला. त्याच संभ्रमात तो करणच्या रूममध्ये पोचला. तिथे आई करणच्या ऊशीशीच बसली होती. सेकंदागणिक करणचं कपाळ चाचपून पाहत होती. ‘ह्या अवस्थेत ताप यायला नको!’ ही ताकिद तिच्या मनात घर करुन गेलेली.
"मी तिला कधीही माफ करणार नाही", समीर रडवेल्या स्वरात म्हणाला... आईने कोड्यात समीरकडे पाहिलं, "आधीच ती करणचं आयुष्य अधांतरी टाकून गेली. अन आता स्वतः सोबत हे सगळं करणच्याही नशीबी मारतेय ...", समीरने त्वेषात आईकडे पाहिलं, "... मरून का जात नाही ती एकदाची!"
आई घाबरली, "श्शश्श! समीर वेडा झालायस का तू?" आईने दबक्या स्वरात समीरला खेचलं अन ती समीरला दिवाणखान्यात घेऊन आली.
"डोकं ठिकाणावर आहे का तुझं समीर? करणच्या समोर हे शब्द बोलतोयस.", आईने करणच्या खोलीचं दार बंद आहे का नाही ते चोरून पाहिलं, "करणची शुद्ध हरपली असली तरी हे शब्द त्याच्या कानांवर पडतीलच ना. पंधरा वर्ष आपण जीवापाड लपवलेलं हे गुपित त्याच्या समोर अशा अवस्थेत बोलायचं?"
"मग किती दिवस लपवायची ही गोष्ट? कळून जाऊदे त्याला.", समीरने हतबलतेने आईकडे म्हटले... "सोक्षमोक्ष लागून जाऊदेत एकदाचा."
"का? खरं काय ते कळल्यावर माझ्या बाळाने त्याचा उरलेला जीव देण्यासाठी?", आईचे डॊळे चटकन पाण्याने ओथंबले, "एवढसं ते पोर माझ्या हातात आणून टाकलेलं मला आजही लख्ख आठवतंय, समीर. गेल्या पंधरा वर्षात पडलेल्या पावसाचा एकनएक थेंब मला आजही त्या दिवशीची साक्ष देऊन जातो. एका आईचं गमावलेलं मातृत्व मी कसं काय कमावलंय ते मलाच माहित आहे. आठवडाभर त्या चिमुकल्या जीवाने माझ्या हातून दूधही घेतलं नव्हतं. शेवटी नळी पोटात ढकलून त्यातून पाजलेलं डॉक्टरांनी. आठवतंय ना? तेव्हाच कळलेलं आपल्याला करणचा जुजबीपणा... त्याचा हट़्टीपणा... पुन्हा अशा अवस्थेत काय काय सांगायचं त्याला? कसं? आणि सांगायचं ते कशासाठी? माझ्या पोराला असं तीळतीळ तुटत चाल्लेला पाहण्यासाठी? दुसऱ्यांच्या चुकीचं फळ ह्या निष्पापाने का भोगावं?", आईने डोळ्यांना पदर लावला. तिच्या ह्या प्रश्नाचे उत्तर समीरकडेही नव्हते. त्याचे रडवेले डॊळे बाबांच्या फोटोकडे वळले...
"पण असं हे किती दिवस चालायचं आई?", समीर हताशपणे म्हणाला, "आता सहन नाही होत गं. करणच्या जन्माची कहाणी त्याच्यापासून अशी किती दिवस गुप्त ठेवायची आपण? थिंग्ज आर गेटींग टू कॉम्प्लिकेटेड! .... ", समीरने पॉज घेतला, त्याच्या आवाजात थरथर आलेली होती, "उद्या कुठून दुसरीकडून करणला कळलं की मेनकाच त्याची जन्म देणारी आई आहे तर?"
... अचानक पावसाची संततधार शांत झाली ...
आईचे हुंदके स्पष्ट ऎकू येऊ लागले. समीर म्हणाला, "मला माहितीये आपण नियतीला सामोर जायचं सोडून पळवाटा शोधतोय. पण आई केव्हातरी ह्या चोरवाटा नशिबाला सामोऱ्या जातीलच ना? तो आत्ताच आपल्याला जुमानत नाही. कोण्या दुसऱ्याने त्याला ह्याविषयी कल्पना दिली तर त्याच्यावर केवढं मोठं आभाळ कोसळेल. त्याधी आपणच काहीतरी करायला नको का? सांग ना... आई?"
समीर वळला अन दोन्ही हातांनी त्याने आईचे खांदे धरले. "नको तो प्रसंग" आज आला होता. मनातली भिती प्रत्यक्षात उतरली होती. समीरने मन खंबीर करून आईला म्हटले, "आपण हे करायलाच हवं...
… करणसाठी!"
समीर नियतीला सामोरं जाण्यास तयार होता. आईकडेही त्याच आशेनं बघत होता. त्याची पकड त्याच्या खंबीर मनाची ग्वाही देत असावी....
आईने डॊळे पुसले, "खरंय!", कसलातरी निर्धार करून तीही म्हणाली, "आपण पुढच्या शनिवारीच मनोहर कडे जाऊ. तोवर तोही बिछान्यावरून उठलेला असेल. तिथे आपल्या फार्महाऊसवर सगळं स्पष्ट होईल. करणला खरं काय ते लवकरात लवकर कळलंच पाहिजे."
समीरने आईकडे पाहिलं अन तिच्या बोलण्याला मूक दुजोरा दिला.
"तू नक्की तयार आहेस?", आईने विचारले तसे समीर बाबांच्या फोटोकडे पाहत "हं" एवढंच बोलला. आईने आपले अश्रू पुसले अन ती तिच्या खोलीत निघून गेली. दिवाणखान्यात बाबांच्या फोटोकडे पाहत समीर त्यांच्या प्रसन्न चेहेऱ्यात काहीतरी शोधू लागला... कदाचित पंधरा वर्षांपूर्वीची तीच रात्र शोधत असावा ... १२ जुलैची ...
... आज समीरचा अठरावा वाढदिवस. पावसाने चांगलाच जोर धरला होता. बाबांनी समीरला अठरा वर्षाचा झाल्याचे गिफ्ट म्हणून लोणावळ्यात ‘सावली’ नावाचं नवं फार्म हाऊस दिलं होतं. तिथेच आज छॊटीखानी प्राईवेट पार्टीही होती. समीरशिवाय बाबा, आई, आजोबा अन नुकतेच लग्न झालेले मनोहर मामा आणि कुसुम मामी, एवढेच मोजके लोक पार्टीत हजर होते. समीरच्या चेहेऱ्यावरून उत्साह ओसांडून वाहत होता. १८ वर्षांचा झाल्याने मनोहर मामांची एन्फिल्ड चालवायचे लायसन्स पण त्याला आजच मिळाले होते. तसं लायसन्स शिवाय समीरने बऱ्याच ‘आऊटींग’ अगोदरच केल्या होत्या... पण आजच्या पार्टीनंतर ऑफिशियली त्याच एन्फिल्डवर आपल्या मुंबईतल्या गर्लफ्रेण्ड्स्ना बसवून लोणावळ्यात ‘सावली’ गाठायचे मनसुबे समीर मनातल्या मनात रचत होता. संध्याकाळी ओली पार्टी झाली. समीरनेही काही पेग घेतले होतेच. त्याच धुंदीत गार्मेण्ट्सचा एक्स्पोर्ट किती टक्यांनी वधारला हे सांगणारे बाबा आणि त्यावर टॅक्सेशनचे नवे फंडे कसे लागणार हे सांगणारे मनोहर मामा असे भाषिक द्वंद्व चालू होतं.
"दोघे अगदी ध्येयवादी!", आई म्हणाली तसं कुसुममामीने डोळे मिचकावले, " ... आणि प्येयवादी सुद्धा!!"
आई आणि कुसुम मामीने त्यांच्या नवऱ्यांच्या त्या ड्रन्क डिस्क्शनवर टोमणे मारत जेवण वाढलेलं... आजोबा समीरला अठरा वर्षाचा झाल्याने मतदान आणि वाहतुकीचे नियम आणि हेल्मेटची सुरक्षितता याबद्दल उपदेश करत होते... त्यामुळे समीर थोडा पकलेला होता ... पण एकंदरीत ते सारं आठवून समीरला आपल्या आयुष्यातल्या त्या शेवटच्या अत्यानंदित क्षणाची चाहूल लागली अन तो क्षणभर विहरलाच ... पण तोच ढगांनी केलेल्या गडगडाने त्याची मती पुन्हा गुंग झाली ... मन ‘सावलीत’ पळालं... तिथेही अशाच ढगाच्या गडगडाटासोबत दारावरची टकटक ऎकू येऊ आलेली ... आईने मनोहर मामांनी मारलेल्या जोकवर हसत दार उघडलेलं ... दारासमोर प्रकट झाला एक ओळखीचा चेहेरा ...
गीताबाई! ... एका हातात छत्री अन दुसऱ्या हातात कवेत ते निष्पाप शैशव घेऊन ...
"मेनकाबाईंनी हे तुमच्यासाठी सोडलंय.", गीताबाई बाबांकडे गेल्या. बाबांच्या चेहेऱ्यावर भयंकर राग अन भिती दाटली होती.... "बाईंनी आणखी कुणालाच सांगितलेलं नाही. पण तुमच्या वंशाचा सोक्षमोक्ष तुम्हीच लावलेला बरा...", असं म्हणून तो कोवळा जीव बाबांकडे सुपूर्द करून निघून गेल्या. जाता जाता त्यांनी समीरकडे पाहिलेलं. त्यांच्या डॊळ्यांत एका दाईने आपण प्रसवलेल्या बाळाला सोडताना चाललेला जो भावनिक कलह समीरला दिसला तो आजही समीरला हेलावून जाई. समीर पुन्हा अस्वस्थ झाला होता... बाबांकडून खरं काय ते कळल्यावर तर आणखीनच... १५ वर्षं लोटली … पण बाबांशिवाय.... आज सगळं तसंच असतं जर ती निर्दयी स्त्री आपल्या सर्वांच्या आयुष्यांत आली नसती... विशेषतः बाबांच्या... आज मृत्युशय्येवर पडलेल्या मेनकाविषयी समीरला बरंच समाधान वाटत होतं ...
... अगदी सूड घेतल्यासारखं ...
********************
(पुढील भाग ... http://www.misalpav.com/node/18891)
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 4:18 pm | इरसाल
बाप रे !!
19 Aug 2011 - 5:03 pm | धनुअमिता
मनात हिच शंका होती कि करन हा मेनकाचा मुलगा असेल म्हणुन. आणि शंका खरी निघाली.
हा हि भाग ऊत्तम.
पुढिल भाग लवकर येऊ द्या.
19 Aug 2011 - 7:10 pm | sagarparadkar
पूर्णपणे सहमत ...
मला तर 'ब्लॅकव्हल्चर' म्हणजे स्वतः मेनकाच असावी असं वाटतंय ... तिचा 'गिल्टी कॉन्शस'नेस असा कुठेतरी प्रकट होत असावा .....
19 Aug 2011 - 5:02 pm | गणेशा
पुन्हा अप्रतिम भाग ....
आणि करण समिर चा सख्खा भावु नाहिये हे जेंव्हा कळाले होते तेंव्हाच करण हा मेनकाचाच मुलगा असेन असे अंधुक वाटले होते, आणि तेच आज वाचल्याने छान वाटले.
बाकी कथेबद्दल म्हणाल तर अप्रतिम लिहिता राव तुम्ही.. हा एक सिनेमा होउ शकतो..
19 Aug 2011 - 5:22 pm | किसन शिंदे
कहानीमे एकदम ट्विस्ट..
जबरदस्तच..!!