मागील भाग ... http://www.misalpav.com/node/18896
भाग अठ्ठावीस
"आई", समीरने हाक मारली तसं आई दिवाणखान्यात आली.
"काय?"
"डिनर करायचा प्लान करतोय. फॅमिली गेट टुगेदर... शनिवारच्या आदल्या रात्री!", समीर म्हणाला.
आई थोडी गप्प झाली.
"तोच एक शुक्रवार आहे हाती.", समीर हताशपणे म्हणाला.
आईच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तिनं असहायतेनं कोचवर बसकण मारली.
"राहावून राहावून तेच तेच विचार मनी येतात रे समीर. कसं निभावेल सगळं?"
समीरच्या चेहेऱ्यावरचा डिनरचा आनंद आईच्या चिंतेने मावळला. त्यालाही हा शनिवार उजाडू नये असेच वाटत होते. म्हणून तोही हतबल होता. पण त्यालाही माहित होतं की ह्या सत्याग्नीचा पोळ सर्वांना सोसावाच लागणार होता. किंबहुना करणला सर्वात जास्त. त्याला खरं काय ते सांगायची वेळ केवळ दोन दिवसांवर होती.
"कधीचा करतोयस प्लान मग?", आईने डोळ्यांच्या कडा टिपत विचारलं.
"उद्या संध्याकाळी आठ" असं थोडक्यात उत्तर समीरने दिलं.
"ठिक आहे. कुठे जायचंय?"
"जुहूला ‘ऑलिव्हर्स ट्विस्ट’ मध्ये.", समीरने फोन हाती घेतला, "करणचा आवडता कॉन्टीनेन्टल शेफ्फ कॉर्नर आहे ना तो."
"ठिक आहे.", आई खिन्नपणे म्हणाली, "जाऊ आपण. कुणास ठाऊक पुन्हा करण सोबत तिथे जायला मिळेल ... नाही मिळेल ...", आईने अगतिकतेने म्हटले आणि अर्धवट ओल्या डोळ्यांनी ती तिच्या रूममध्ये पुन्हा निघून गेली.
समीरने जड मनाने फोन करून तिघांचं बुकींग केलं. हॉटेलचा हेड शेफ्फ हर्मित वर्मा हा समीरचा जिगरी दोस्त. दोघे शाळेपासूनचे मित्र. त्यामुळे ‘ऑलिव्हर ट्विस्ट’ मध्ये रूपवते कुटूंबाला कधीही बुकींग मिळे. करणलाही तिकडचे मेक्सिकन रोल्स, इटालियन राईस आणि स्पॅनिश फाहिताज भरपूर आवडत. समीर मोरोक्कन मागावयाचा. तर आई चायनिज वर भागावयाची.
इथे करण त्याच्या रूममध्येच होता. कित्येक दिवसापासून त्याची नवी ‘इधर उधर’ची साइट अपलोड करत होता. मेनकाचा हा नवा चित्रपट पुढच्याच आठवड्याच्या शुक्रवारी प्रदर्शित होणार होता. ‘इधर उधर’ ही जासिम खान ह्या डायरेक्टरची नवी पेशकश. मेनका आणि मालविका ह्यांना प्रथमच एकत्र साईन करू शकणारा हा एकमेव दिग्दर्शक. मेनकाच्या सुरूवातीच्या तूफान, ममता, बेवफा अन त्यानंतर डझनवारी हिट चित्रपटांचा हाच दिग्दर्शक. मेनका ही जासिमची म्यूज म्हणूनच मानली जायची. मेनकाशिवाय जासिम खानचे पानही हलत नसे. कित्येकदा तर त्या दोघांना एकमेकांच्या अफेयर मध्येही गुंतवण्यात आलं होतं. पण मेनकाचा फॅन असल्याने करणला ते अफेयर मान्य नव्हतं. त्याला ती त्यांच्यातली व्यावसायिक बांधिलकी वाटायची. पण यंदा मेनका ही तिची रायवल मालविका सोबत काम करायला कशी तयार झाली ह्याचंच करणला अप्रूप वाटत होतं. जासिम खानला हे जमलं कसं हा प्रश्न एकट्या करणलाच नव्हे, तर साऱ्या सिनेबिझला पडला होता. तसं जासिम खानचे अंडरवर्ल्डशी असलेले पण साबित न झालेले संबंध आधीच बातमीपत्रांत चर्चेचा विषय झाले होते. त्यामुळे मेनका अन मालविकाला अंडरवर्ल्डच्या धाकाने आपल्या चित्रपटात एकत्र काम करवण्यास जासिमने जबरदस्ती केल्याची चर्चाही यंदा जोरात होती. ह्याच कारणामुळे कदाचित मेनकाने त्याचा नवा ‘लव इन लंडन’ नाकारला होता असे पापराझी म्हणत होते. जासिम खान ह्यामुळेच नाराज झाल्याची आणखीन एक बातमीही त्यासोबत प्रकाशित होत होती. काही पापराझ्झींनी तर ब्लॅकवल्चर ऊर्फ गुंजी सिंग हा जासिम खानचा प्राईव्हेट गार्ड असल्याची बातमीही पसरवली होती.
करणला ह्या अर्धवट अफवांशी काहीही देणघेणं नव्हतं. गौतम अंकल पासून ब्लॅकवल्चरपर्यंत यंदा मेनकाविषयी छापून आलेले सगळेच पेपरातले रकाने फोल ठरले होते. हळूहळू पुराव्याअभावी गुंजी सिंग हाच ब्लॅकवल्चर असल्याचे करणने मनाशी मानून टाकले होते. बाकी सगळ्या टेपा ह्या साऱ्या फिल्म प्रदर्शनाधीचा पब्लिसिटी स्टण्ट आहे हे मात्र करण पूर्णपणे मानून होता. ह्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने का होईना, पण करणचं ब्लॅक्वल्चर आणि घरच्या लोकांवरून लक्ष ढळलं होतं. किंबहुना त्यांना विसरून नव्या ऊर्मीने तो हे सारं करत होता. वेबसाईट बनता बनता तीन तास लोटले आणि किचनमधून आईची जेवणासाठी हाक ऎकू आली. टेबलावर समीर आणि आई आधीच हजर होते. करण आला तसं त्यांनी करणकडे थोडं हसून दाखवलं. करणच्या चेहेऱ्यावर मात्र कसलाच भाव आला नाही.
"अं..", समीरने संभाषण सुरू करायच्या उद्देशाने अंकार केला तसं करण त्याच्याकडे बघू लागला, "मी आणि आईने उद्या डीनरचा प्लान केलाय, ऑलिव्हर ट्विस्टमध्ये."
करण गप्प.
"तू आलास तर आम्हाला बरं वाटेल."
करणने पळीतलं वरण भातावर ओतलं... "मला होमवर्क आहे उद्या."
"पण उद्यातर शुक्रवार आहे ना. होमवर्क सन्डेलाही करू शकतोस."
"मला होमवर्क आणि सेल्फ स्टडिचा बॅकलॉग भरून काढायचाय. शिवाय शनिवारी आपल्याला मामांकडे जायचंय. त्यामुळे उद्या मी नाही येऊ शकत."
"पण डिनर ऑलिव्हर ट्विस्ट मध्ये आहे, तुझं फेवरीट?", समीर अजीजीनं म्हणाला.
"देयर आर लॉट्स ऑफ थिंग्स विच आर माय फेवरीट! बट यू डोण्ट अप्रूव ऑन देम. डू यु?", करण रागात म्हणाला. त्यावर समीर उदास झाला. तो डिनर प्लान करणसाठी नसला तरी समीर आणि आईसाठी खचितच महत्त्वाचा होता. समीरचं औदासिन्य आईच्या लक्षात आलं.
"आम्ही हे डिनर बाबांच्या आठवणीखातीर ठेवलंय. परवा माझा अन बाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे.", आई म्हणाली.
समीरने चमकून आईकडे पाहिलं. खरं तर हे समीरही विसरलाच होता. बाबा गेल्यांपासून चौदा वर्षे आईने कधीही त्यांची ऍनिव्हर्सरी सेलिब्रेट केली नव्हती. पण आज करणसाठी तिने तिची प्रथा मोडली होती. करण थोडा बावरला पण काही बोलला नाही. पाच मिनिटांत जेवण आटपून तो उठला आणि ताट सरकवत आईला म्हणाला, "आपण रात्री दहाच्या आधी यायचंय" आणि बेडरूममध्ये परत निघून गेला.
समीर आणि आईने एकमेकांकडे स्मित केलं आणि समीर आईला "थॅक्स" म्हणून उठला. आई मात्र समीरच्या वडिलांच्या फोटोकडे बघत, तो दुर्दैवी लग्नाचा वाढदिवस आठवून सलत होती ... समीरचे बाबा गेल्यानंतरचा …
... चौदा वर्षांपूर्वीचा तो काटेरी दिवस ...
आज अचानक तिला दारावर टक टक ऎकू आलेली ... समीरच्या बाबांना जाऊन महिनाच झालेला पण दारावर ती व्यक्ती आईचं आयुष्य पुन्हा ढवळायला आलेली... तिच जिने रूपवते कुटूंबात हे दुःखाचं बीज रोवलेलं... तिच जिच्यामुळे आज पंधरा वर्षांनी करणसहीत साऱ्या रूपवते खानदानाचं भवितव्य अंधारलं होतं... आणि एवढं असूनही ती केवळ आपल्या कृत्यांची स्पष्टीकरण देण्याच्या बहाण्याने सुलभाचा मोडका संसार बघायला तिथं आली असावी... तेही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी … तिने सांगितलेली सत्यासत्य आजही सुलभाला अस्वस्थ करवून जात... तीच असत्य जी सुलभाच्या मते तिच्या वैधव्याची कारण ठरली होती ...
... सुलभाने संतापून तिच्या कानाखाली मारलेली...
"चांडाळे आता काय घ्यायला आली आहेस इकडे? माझ्या कुटुंबाचा सत्यानाश तर केलास मग अजून काय हवंय तुला? माझ्या पतीचा जीव घेऊन अजून तहान शमली नाही तुझी?", सुलभाच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती.
लज्जेने ठार कोळलेली मेनका दारात ओलावलेले डोळे घेऊन घुटमळत उभी होती.
"मी ... मी तुम्हालाच भेटायला...", मेनका कशीबशी म्हणाली. तिच्या गालावर सुलभाच्या हाताचे ठसे लालबुंद उमटले होते, "सुधाकरजी गेल्याचं कळून मलाही मोठा धक्काच बसला सुलभाताई ..."
"माझं नाव घेऊ नकोस!", सुलभा तणतणली, "आणि हे मगरीचे अश्रू माझ्या समोर गाळू नकोस. तुझी ही नाटकं सिनेमात दाखव, इथे नाही. अगं कृतघ्नतेची एक सीमा असते, पण तू तीही पार केलीस. काय केलं नाही माझ्या पतीने तुझ्यासाठी? ... बोल ... तुझं मॉडलिंग करीयर वळणावर आणून दिलं ... तुला चित्रपटात संधी मिळवून दिली … तुला घरच्यांसारखं वागवलं... पण तू काय केलेस? श्शी! आपलं चारित्र्य विकून खाल्लंस? अगं वेश्याही आधी किंमत घेऊन मग शरीर विकते. पण तुझ्या लालसेची किंमत आम्ही अजूनही मोजतोय ... आणि तू म्हणतेयस तुला धक्का बसलाय?"
"नको सुलभाताई असं नका म्हणू... मी खरंच कुणाला धोका दिला नाही... सुधाकरजी..."
“नाव नको घेऊन माझ्या पतीचं तुझ्या तोंडून. माझ्या पतीला गुरू म्हणायचीस तू… गुरू … आणि त्याच गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासलास! का? का हाच तुझा धंदा आहे तुझा वडिलधाऱ्या माणसाकडून कूस उजवायचा ..."
मेनकाने शरमेने डोळे मिटले… आसवांची एक धार तिच्या गालांवरून ओघळली... सुलभा मनातली सारी गरळ ओकत होती आणि मेनका तिथंच थिजलेली कानांवर पडणारे विखारी शब्द मूकपणे झेलत होती...
"... आम्हाला तुझ्याशी काहीही देणघेणं नाही. निघून जा इथून ... मला तुझा चेहेराही बघायचा नाही..." सुलभाचं मनातलं सारं सुनावून झालं होतं. मेनका मात्र अजूनही गप्पच होती.
"गेट लॉस्ट!"... सुलभाने दार वाळलं.
"सुलभाताई!", मेनकाने धीर केरून दार मध्येच धरलं, "मी आज खरं काय ते सांगायला आले होते ..."
"मला काहीएक ऎकायचं नाहीय तुझ्या तोंडून ...", सुलभाने कळवळीने हात जोडले, "खरं खोट्याच्या केव्हाच पार गेल्यात साऱ्या गोष्टी ... माझ्यावर कृपा कर आणि इथून निघून जा... आता तरी माझ्या कुटूंबाचा पिच्छा सोड!" ... आईच्या रागाने लालबुंद झालेल्या डोळ्यात एक असहाय्य विनवणीची झाक होती ... मेनका परत वळली... तिने घराच्या फाटकाबाहेरचा रस्ता पकडला होता ... आणि जाताजाता अंगणातल्या रातराणीच्या कोमेजलेल्या कळ्यांचा सडा नकळत आपल्या पायदळी तुडवला होता...
... तीच रातराणी जी सुलभाला त्यानंतर अंगणी फुललेली कधी दिसलीच नाही ...
*****************
भाग एकोणतीस
"व्हॉट डू यू सी?", एक करडा आवाज घुमला अन त्याच्या आधिपत्याखाली असंलेलं तिचं मन चौदा वर्षं मागे गेलं ... अलगद.
"मला दिसतंय दिसतंय तेच... मलबार हिलचं जुनं घर, त्याच्या अंगणातली जाई, रातराणीची आठवण आजही श्वास गंधवून जाते... घरापासून दूर घरच्यांचं प्रेम तिथेच मिळालं होतं ... एवढं प्रेम ... एवढी आपुलकी ... ती घट़्ट मैत्री ... पण ... पण त्याचा बट़्ट्याबोळ केला ... मीच केला तो ... ", मेनका म्हणत होती, "सुलभाबाईंच्या घृणिक नजरेत मी वस्त्रहीन झालेले होते ... त्यांच्या धारदार शब्दांनी माझ्या अब्रूचे धिंडवडे काढले होते ... त्याचा घराच्या दाराशी... माझ्या तोंडावर ताईंनी दार लावलं होतं पण आतून तो आवाज आलाच, तान्हा आवाज... बाळ ... माझं बाळ ... एका वर्षाचं झालं असेल ... रांगत असेल की दुडूदुडू पळत असेल? ... अचानक माझा ऊर भरून आला ... परत जावसं वाटत होतं ... ते दार लोटून आतल्या माझ्या बाळाला माझ्या ऊराशी धरावसं वाटत होतं ... जीव भरेस्तोवर पापे घ्यावेसे वाटत होते ... पण सारी दारं बंद होती ... मी फक्त सोसू शकत होते ... लोकांच्या शिव्या ... त्यांचे श्राप ... माझ्या पोटच्या गोळ्याचा टाहो ... जो त्याच्या खऱ्या आईसाठी होता ... माझ्यासाठी होता.. पण त्याला ‘ओ’ कुणीतरी वेगळंच देत होतं ... मी हतबल कुंपणाच्या बाहेर होते ... असहाय्य ... अतृप्त... अन माझं बाळ पलिकडे होतं ... माझं बाळ... माझं पोर ... आह्ह! ... "
... आणि एवढंच बोलून ती शांत झाली. दोन मिनिटांसाठी रूममध्ये कुणी काहीच बोल्लं नाही. डॉ. सहानींनी बाजूलाच उभ्या गौतम अंकलकडे पाहिलं आणि समोरच्या ग्लासातून पाण्याचा एक घोट घेतला. आजची थेरेपी तब्बल चार तास चालली होती.
"डॉ., मग काय म्हणणं आहे तुमचं?", गौत्तम अंकलनी डॉ. प्रश्न केला. मेनका अजूनही ग्लानीतच होती.
"इट वॉज ओके. आपल्या बाळाला मिस्स करणारी आई आज ठळकपणे समोर आलीच.", डॉ.नी गौतम अंकलकडे पाहिलं, "पण तेवढं पुरेसं नाही. मूळ मुद्दा मात्र तोच राहतो. मेनकाचा मुलगा. वी आर स्टक ऍट द सेम डॅम्न थिंग ... मेनकाचा मुलगाच तिच्या ह्या अवस्थेत तिला मदत करू देऊ शकतो गौतम ... इज देयर एनी प्रोग्रेस्स अबाऊट हिम?"
"या काईण्ड ऑफ.", अंकल अर्धवट निराशा आणि उत्साह एकत्र कोळून बोलले, "ह्या शनिवारी काय ते नीट कळेल. टिल देन होप फॉर द बेस्ट ...", खरंच प्रार्थनेशिवाय दुसरा काहीच उपाय दिसत नव्हता.
"इट हॅज टू गो वेल", डॉ. सहानी म्हणाले, "अदरवाईज वी विल लूज हर ... फॉरएव्हर!", त्यानी बेशुद्ध मेनकाकडे असहायतेने पाहिलं आणि सांत्वनाखातर गौतम अंकलच्या खांद्यावर हात ठेवून डॉ. सहानी खोलीतून निघून गेले.
गौतम अंकल चिडून खोलीत इतस्तः बघत होते ... असहाय्यपणे ...
टिक्कू! ... दॅट ब्लडी रॅट! ... त्या हरामी टिक्कूने मेनकाची ही हालत कित्येक वर्षं साऱ्या दुनियेपासून लपवून ठेवली होती ... "अशी रोगी स्त्री स्टार कशी होणार?", त्याने विचार केलेला, "मग माझी नोकरी टांगणीला लागेल" ... असा विचार करून झोपेच्या गोळ्या, अफगाणी अफूचे डोस देऊन कसंबसं तिला सावरायचा त्याचा अनिष्ट प्रयत्न ... अन त्यातून होरपळून निघाली ती विचारहीन मेनका ... योग्य उपचारांअभावी शेवटी ती अशी झाली ... अन हे सर्वं झालं त्या तिच्या लबाड सेक्रेटरीच्या हातून ... गौतम अंकल त्वेषात आपली मुठी वाळत होते ... त्या कपटी टिक्कूवरचा राग जाता जात नव्हता... गौतमनी केव्हाच त्याला नोकरीवरून हाकललं होतं... पण तो गेल्यानंतर उलट मेनकाची परिस्थिती जास्तच हाताबाहेर गेली ... तो अफगाणी अफू तिला चव लावून गेला... त्याच्या अभावी ती ठार कोसळली ... हतबल ... गौतमपेक्षाही जास्त...
तेवढ्यात ड्राईव्हर गंगाधर खोलीत शिरला, "साहेब मी बाईंना आणलंय."
गौतम अंकलनी राग काबूत आणला, "गुड! आणि बाकीचे?"
"नाही.", गंगाधर गप्प झाला आणि कसंबसं म्हणाला, "ते म्हणाले मेनका त्यांच्यासाठी मेली ..."
अंकलनी डोळे मिटले. आज मेनकाच्या फेवर मध्ये काहीच घडत नव्हतं.
"ठिक आहे. पाठव आत.", ते नाईलाजाने म्हणाले.
दोन मिनिटांनी एक सोलापुरी लुगडं नेसलेली पन्नाशीतली ठेंगंणी बाई आत आली. निपचित पडलेल्या मेनकाकडे दुःखानं आणि करूणनेनं बघत तिचे डोळे डबडबले.
"माझी मनू!" तिनं एकच टाहो फोडला आणि ती मेनकाच्या कुशीकडे जाऊन बसली, "काय झालं साहेब?"
"गीताबाई!" , गौतम अंकल जड अंतःकरणाने म्हणाले, "तुमची मनू ... आपली मनू मरणाच्या उंबरठ्यावर आहे हो."
गीताबाई अविश्वासाने गौतम अंकलकडे पाहिलं.
"आश्शी गोड पोर माझी .... कुटं हरवली खंडोबास ठाऊक ... कुनाची तरी दृष्ट लागली हो माझ्या पोरीला.", गीताबाई सतत मेनकाच्या चेहेऱ्यावर हात फिरवत बोटं मोडत होत्या. त्यांच्या डोळ्यातल्या आसवांना आता वाट मिळाली होती, "पन साहेब हे झालं कशापायी?"
"त्याच तिच्या पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणी... तिचं दुरावलेलं मूल... तेच तिच्याविरुद्ध जीवानिशी उठलंय...", अंकलनी उसासा टाकला.
गीताबाई सुन्न झाल्या, "पन इतकी वरस काहीच जालं नाय आन आता असं समदं अचानक?"
"अचानक!! ह्ह! काय काय झालंय आणि कसं ते मी काय सांगणार गीताबाई? एकामागे एक दुष्टचक्र फिरलं आणि हे सगळं घडलं. कुणाच्या हातात काहीच नव्हतं. मेनका स्वतःला सांभाळू नाही शकली ..."
गौतम अंकलचं बोलणं संपतं न संपतं तोच मेनका कळवळू लागली.
"आह! गीताबाई मला नाही जमत ... आह! आई ग्ग! खूप दुखतंय ... "
गीताबाई घाबरल्या... गौतम अंकल बावरले... "साहेब काय ... काय झालं मनूला?"
"डॉ. नर्स ... डॉ.", अंकल ओरडू लागले, त्यांनी इमरजन्सी कॉलचं बटन दाबलं. दोन नर्स आणि डॉ. साहनी खोलीत धावत शिरले ...
"गीताबाई ... मी मरतेय ... आह! आअम्म! नाही होणार ... नाही माझ्याने हे ... खूप वेदना होतायत ... मी काय करू ...", मेनकाच्या कपाळावर घाम जमला ... ती अजूनही ग्लानीतच होती ...
"साहेब ... हे काय? ... ही ... ही मला बोलावतीय... त्याच दिशीसारखं...", गीताबाई डोळे विस्फारून पाहत होत्या. ही तिच मेनका होती. गीताबाईंना हाक मारणारी. बाळाला जन्म देताना वेदनेने तडपणारी ... तडफडणारी मेनका ...
"नर्स क्विक! ऍडमिनिस्टर अ कॅटामाईन ... प्लीज जरा बाजूला व्हा ...", डॉ. नी गीताबाईंना दूर सारलं.
"पन ती मला बोलावतीय डाक्टरसाहेब ... ", गीताबाई भांबावलेल्या अवस्थेत डॉ.ना म्हणाल्या.
डॉ. नी गौतम अंकलकडे प्रश्नार्थक चेहेऱ्याने पाहिलं.
"ह्याच गीताबाई.", गौतम अंकलनी डॉ.ना इशारा केला.
"व्हॉट़्ट ... ओह!", डॉ. चमकले, "या या पुढे या ... तिचा हात धरा ..."
गीताबाईंना काहीच कळण्याच्या आधी डॉ. नी त्यांना मेनकाच्या बाजूस बसवलं आणि तिचा हात गीताबाईंच्या हातात दिला.
"आह! मी काय करू गीताबाई ... नाही सहन होत ... आईईई गग्ग!", मेनका अजूनही कळवळत होती.
"तिचं सांत्वन करा ... पंधरा वर्षांआधी केलेलत तसंच ...", डॉ. लगबगीत गीताबाईंना म्हणाले, "कमॉन ... क्विक!".
गीताबाई अजूनही प्रश्नार्थक चेहेऱ्याने डॉ. कडे आणि गौतम अंकलकडे बघत होत्या.
"गीताबाई!! गीताबाई!! कुठे गेलात तुम्ही ... आह ... मी काय करू ... मला नाही जमत ... खरंच नाही जमत ... माझा जीव जातोय ..."
"बोल!! बोला!! तिच्याशी बोला ... तिला धीर द्या ... ", डॉ.नी पुन्हा गीताबाईंना म्हटले. गीताबाईंनी पुन्हा गौतम अंकलकडे बघितलं. गौतम अंकलनी मान डोलावून गीताबाईंना डॉ. जसं सांगताहेत तसं करण्यास सांगितलं.
"होय माझी पोर ... मी हाय इकडं ...", गीताबाईनी तिच्याकडे कळवळून पाहिलं. डॉ. गीताबाईंना मूकपणे प्रोत्साहन देत होते.
"बोला ... बोला ... कॅरी ऑन!"
"हा अजून एक हिस्का दे ... बस एकच ... येतंय ते बाहर ... एक वीत ... बस उघडलंय ..."
"नाही ... मला नाही जमत ..."
"तुझ्या आयुष्याचा सवाल आहे पोरी ... हे मूल त्याच्या वडिलांकडे जायलाच पायजे ... तुला ह्याला जन्म द्यायलाच पायजे ..."
"खूप दुःखतंय ... मी कसं करू ..."
"बस अजून एकदा मोठा जोर लाव ... लक्षात ठेव ये तुजं पोर न्हायी ... रूपवते खानदानाचं वारस हाये ह्यो ... ह्याला त्यांच्याकडे परत न्हायलाच हवं ... "
गौतम अंकल भारावलेल्या स्थितीत गीताबाईंकडे बघत होते. पंधरा वर्षांपूर्वीचा, फक्त त्याच दोघींच्या हजेरीत घडलला, बारा जुलैचा तो काळा प्रसंग आज पुन्हा त्यांच्या समक्ष साकारत होता ... मुंबईतल्या हॉस्पिटलात ... एवढ्या लोकांच्या समोर ...
... मेनका अशा अवस्थेतून गेलीय ह्याचं सोयरसुतकही कुणाला नव्हतं ...
"अ अम्म्म, ऍआह्ह्ह!", मेनकाने शेवटचा हिसका लावला आणि ती बेशुद्ध पडली.
डॉ. आणि गौतम अंकल कातरलेच. ते पुढचा भागाच्या अपेक्षेत होते. तीन चार मिनिटं गेली. पण मेनका अजूनही बेशुद्धच होती. तिनं काहीच हालचाल केली नाही.
"धिस इज अ मिरॅकल ...", डॉ. उत्साहित स्वरात म्हणाले, "शी डीड नॉट सफर द पोस्ट अटॅक हीस्टेरीया ... दॅट्स वण्डरफूल!! ...", डॉ. चा मूड अगदी पालटलाच.
"सी! तिच्या आपल्यांकडून सपोर्ट मिळाला की तिला किती फायदा होतो ते ... धिस इज द बेस्ट ट्रीटमेन्ट! डीड्न्ट आय टेल यू?"
गौतम अंकलही आनंदीत झाले, त्यांनी रिलीव्ड मूडमध्ये गीताबाईंकडे पाहिलं. त्या अजूनही गोंधळलेल्याच होत्या. डॉ.नी उरलेली ट्रीटमेण्ट देण्यासाठी सगळ्यांना रूमच्या बाहेर जायला सांगितले. तिथेच गौतम अंकलनी मेनकाच्या सिकनेस, तिच्यावर झालेल्या हल्ल्यांविषयी आणि करण, ब्लॅकवल्चर आणि सुलभा व समीरविषयी अधिक समजावून सांगितलं.
अर्थातच हे सर्व गीताबाईंना जास्त धक्का देऊन गेलं होतं.
*****************
भाग तीस
"मग करण आज काय प्लान्स?", पूजाने करणला विचारलं. क्लास मध्ये येऊन दोन तीनच मिनिटं झाली असतील त्याना.
"काही नाही. होमवर्कचा बॅकलॉग भरायचाय. सन्डे पर्यंत संपवायचंय.", करण म्हणाला. गेल्या काही दिवसांपासून करणचा मूड ऑफ नसला तरी खास चियरफुलही नव्हताच.
"सो व्हॉट्स द प्रॉब्लेम? दोन दिवस आहेत ना हातात ... ", सॅवियोने कार्टून काढायची वही काढत म्हटले.
"दोन नाही एकच. सन्डेचा. उद्या मामांकडे जायचंय. लोणावळ्याला."
"ग्रेट! वीकेन्ड धमाल इन लोनावला. लकी यू.", सॅवियो हिरमुसून म्हणाला, "काश मै भी तेरे साथ आ सकता..."
"हॅलो!", करणने सॅवियोकडे डोळे फिरवत पाहिलं, "मी तिथे ट्रिप साठी जात नाहीये. मामांचा ऍक्सिडण्ट झाल्यापासून त्याना भेटलो नाहीये मी. म्हणून जायचंय."
"ओह!", सॅवियो शरमला, "गिव माय ‘गेट वेल सून’ विशेस टू हिम", आणि असं म्हणून त्याने कार्टून काढायचं शेवटचं पान उघडलं.
"लोणावळ्याला? स्ट्रेंज! यू नो गौतम अंकलही काल लोणावळ्याला गेलेले.", पूजाने माहिती पुरवली तसं करण थोडा चकित झाला.
"कशासाठी?"
"त्यांच्या कुठल्यातरी जुन्या मित्राला भेटायला गेलेले. रात्री दहा वाजता परत आले. जाताना तसा मूड ऑफ होता पण आले तेव्हा बऱ्या मूड मध्ये होते.", पूजाने बॅग उघडत म्हटलं, "सोबत येताना एका बाईलाही आणलंय."
"बाई! यू मिन अ वुमन!",सॅवियोने भुवयी उंचावली, "हे काय नवीन लफडं? व्हॉट्स कुकींग हं?".
"सॅवियो यू आर इंपॉसिबल!", पूजा इरीटेट झाली, "तिचं नाव गीताबाई आहे. मेनकाची केयर टेकर. मेनकाला सांभाळायला सतत अंकलना जावं लागतं ना हॉस्पिटलात म्हणून त्यासाठी तिला आणलंय त्यांनी इकडे. नाशिकवरून."
पण सॅवियोची भुवयी अजूनही उंचावलेलीच होती.
"साठ वर्षांची म्हातारी आहे. ओल्ड लेडी. गॉट इट?", पूजाने सॅवियोला उद्देशून माहिती पुरवलीच.
"ओह!", सॅवियो पुन्हा शरमला, "देन नथिंग इज कुकींग!"
"ग्लॅड यू बिलीव्ह दॅट! सस्पिशियस ओथेल्लो.", पूजा उपरोधाने म्हणाली.
"ओह बाय द वे करण, मेरे जिगरी दोस्त ...", सॅवियोने मस्क्याच्या मूडमध्ये विचारलं, "आपल्याला एकत्र स्टडी करायची होती ना, ह्या वीकेन्डला. मग त्याचं काय होणार? उद्या तू नाहीस. परवा माझं कमोशन आहे. चर्चमध्ये एक्स्ट्रा मास दुपारपर्यन्त आणि मग संध्याकाळी क्रिस्टलची बर्थडे पार्टी ... ओह ... आय फरगॉट ... यू हॅव टू कम टू हर बर्थडे पार्टी, बोथ ऑफ यू ... ओके?"
"सॅवियो! तू नक्की माझ्याकडे होमवर्कचं फेवर मागतोयस की क्रिस्टलच्या बर्थ डे पार्टीचं इन्विटेशन देतोयस?"
"अम्मं ... दोन्ही!", सॅवियो म्हणाला, "प्लीज डोण्ट से नो."
"ठिक आहे येईन मी पार्टीला ..."
"नॉट दॅट ‘नो’ ... द अदर वन... ", सॅवियोने त्याचे डोळे आणखी काहीतरी ऎकायच्या स्थितीत तसेच फाकवलेले होते.
"... वेल ओक्के. यू कॅन टेक माय होमवर्क टू!", करण नाईलाजाने म्हणाला.
"दॅट्स माय बेस्ट फ्रेन्ड! मी आज संध्याकाळी येतोय, तयार रहा."
तोच करणला चमकला, "ओह नो! यार सॅवियो आज संध्याकाळी नाही जमणार. माझं फॅमिली डिनर आहे."
"काय!", सॅवियोचा मस्तीचा नूर पालटला, "व्हॉट डू यू मिन तुझं डिनर आहे. व्हॉट अबाऊट माय होमवर्क. यू हॅव टू कॅन्सल इट! ते डिनर सन्डेला नाही होऊ शकणार?"
"नो आय कान्ट. इट्स स्पेशल."
"नथिंग इस मोअर स्पेशल दॅन सोलंकी मॅम्स होमवर्क करण", सॅवियो विनंतीवजा ऑर्डर देत करणला म्हणाला, "यू हॅव टू कॅन्सल डीनर प्लान्स ..."
"नाही मी कॅन्सल नाही करू शकत! इट्स माय पेरेन्ट्स वेडींग ऍनिव्हर्सरी!", करणने हतबलतेने म्हटले.
"ओह!", सॅवियो मुकाटपणे गप्प बसला. आता करण हा पूर्ण वीकेन्ड अवेलेबल नाहीये हे ऎकून तर त्याची पाचावर धारण पूर्ण बसली होती. सॅवियो ऑप्शन्स शोधू लागला. साहाजिकच त्याचं लक्ष पूजाकडे गेलं.
"पूजा!", सॅवियो लाडात म्हणाला, "यू लूक ग्रेट टुडे!"
"फर्गेट इट सॅवियो. नो फ्री होमवर्क!"
"ओह प्लीज पूजा. आय बेग यू!"
"यू नो सॅवियो, फ्री होमवर्कसाठी माझी आणि करणची मनधरणी करण्यात जितका तू जीव लावतोस ना तितका जीव लावून तू जर सोलंकी मिसचं लेक्चर ऎकलंस तर तुझा अर्धा होमवर्क तिथेच संपेल.", पूजाने सॅवियोला लेक्चर झाडलं.
सॅवियोने जांभयी दिली तसं पूजा पुन्हा इरीटेट झाली.
"सोलंकी मिसच्या क्लास मध्ये जीव लावून काय मला जीव द्यायचाय? जीव लावायचा तर टेनिस मध्ये लावा, क्रिकेटमध्ये लावा, मालविका मध्ये लावा. इन यम्मी मालविका.", सॅवियो म्हणाला.
पूजाने डोळे फिरवले, "बॉईज आर सो स्टुपिड! काय ह्या फिल्मी नट्यांमध्ये असतं देवजाणे. इकडे मेनका मागे करण तर तिकडे मालविका मागे तू!"
"ओह प्लीज पूजा. मालविका इज नॉट दॅट बॅड ओके. तू मला होमवर्क देणार आहेस की नाही?"
"नो.", पूजाने स्पष्ट नाकारलं, "मी काही करण नाहीये होमवर्क फ्री वाटायला."
"फाईन! एक डील करूयात! हे बघ पुढचा पूर्ण एक वीक तुला आणि करणला मी बॅक बेंचवर एकटं बसू देईन. अगदी प्रॉमिस! बोथ ऑफ यू टुगेदर .... अलोन ऑन लास्ट बेंच ... फॉर फाईव्ह होल डेज ... नो कबाब मे हड्डी सॅवियो ... नाऊ व्हॉट डु यू से? अं? "
सॅवियोच्या ह्या लाचेपुढे करण आणि पूजा लाजत गप्प झाले नसतेच तर नवल.
"शट आप सॅवियो!", करण ओरडला आणि त्याने पूजाकडे, "ही इज मॅड" अश्या आविर्भावात बघितलं. तसं त्याच्याही मनात कुठेतरी पिसे स्पर्शून गेलीच.
"ऑलराईट!", पूजा कशीबशी हास्य लपवत म्हणाली, "ह्या शनिवारी घरी ये. कुठला होमवर्क हवाय तुला, मॅथ्स की सायन्स चा?".
"इज दॅट अ क्वेश्चन? कसला काय विचारतेस? दोन्हीचा, शिवाय अ बिट़्ट ऑफ मराठी ऍण्ड हिस्टरी टू!", सॅवियोने पूर्ण लिबर्टी घेतली.
"फाईन फाईन! यू कॅन कम ऍण्ड हॉग ऑल द होमवर्क यू वॉन्ट."
"हुर्रे! लॉन्ग लिव्ह पूजा!", सॅवियोने टाळ्या पिटल्या आणि पुन्हा तो त्याच्या कार्टून मेकींग मध्ये गुंतला.
साहाजिकच त्यानंतर ऑकवर्डनेस वाटल्याने करण पूजाशी रीसेसपर्यंत काहीच बोलला नाही. दुपारी सोलंकी मिसच्या सायन्स क्लास मध्ये मिसने जोड्या बनवून प्रत्येकाला टेक्स्टबुकमधले कुठलेही पाच प्रश्न लिहायला सांगितले आणि नोटबुकची अदलाबदल करवून आपल्या जोडीदाराच्या नोटबुकमधल्या लिहिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायला सांगितली. करण अन पूजाला जेव्हा मॅमनी एकत्र जोड्यात निवडलं तेव्हा दोघांनाही थोडं ऍम्बॅरेसिंग वाटलं. त्यामुळे ते कांकू करू लागले. शेवटी नाईलाजाने मग मॅमनी पूजाची आस्थाशी आणि दानिशची करणशी अशा दोन वेगळ्या जोड्या जमवल्या. करणच्या जोडीत आपल्याला घ्यावं म्हणून सॅवियोने त्याचा हात कितीही वर केला असता तरी तो व्यर्थ जाणार होताच.
पूजा अन करण मधला हा ऑकवर्डनेस वर्गातल्या बाकी चाणाक्ष मंडळीना तोवर जाणवला नसता तर नवलंच. शेवटी करण अन पूजाचं लक्ष नसताना सलोनी, विनोद आणि हेतनने सॅवियोला एकटं गाठून त्यांच्यातल्या थंडपणाविषयी विचारलं. सुरूवातीला सॅवियोने आढेवेढे घेतले. पण सोलंकी मिसने करणला सेमिस्टरएक्झाम मध्ये फेल करण्याचा विचार त्याच्या आईला बोलून दाखवल्याबद्दलचं अर्धसत्य त्यांना ऎकवलंच. सॅवियो एवढंच सांगून जरी निघून गेला असला, तरी ‘करण एक्झाम मध्ये फेल होणार आहे हे कळल्याने पूजाने त्याच्याशी संग तोडला’ हा निष्कर्ष निघायला वेळ लागणार नव्हताच. लेट दुपारी शाळा सुटली आणि तोपर्यंत हे गॉस्सिप साऱ्या वर्गात पसरलं. घरी परतताना मात्र सॅवियो, पूजा एकत्र होते. करण मागून मागून चालत होता. पूजाचं घर सर्वप्रथम आलं. बाहेर होंडा सिविक थांबलेली दिसत होती.
"गौतम अंकल घरीच आहेत वाटतं", करणने मनातल्या मनात ताडलं. खूप दिवसांपासून त्यांच्याशी मेनकाविषयी बोलणं झालं नव्हतं पण केवळ त्यासाठीच पूजाच्या घरी जायचं जरा आगाऊ वाटत होतं. म्हणून करण गप्प होता.
"तुम्हाला घरी येऊन अंकलना भेटायचं आहे का? आज आईने पनीरची भजी केली असेल. शुक्रवारच्या उपासाचा बेत.", पूजा म्हणाली तसं करण आणि सॅवियो दोघे आनंदित झाले. सॅवियो थोडा जास्तच. घरात शिरल्या शिरल्या पनीरच्या भजीचा खमंग वास आला अन तिघांची भूक चाळवली गेली.
"आई!", पूजा एका क्षणाचीही उसंत न घेता, कोचवर बॅग टाकत म्हणाली, "करण आणि सॅवियोलाही आणलंय. पटकन भजी वाढ!".
करण अन सॅवियोने आसावरी आण्टीना "हाय" केलं. काकूंना आपले बनवलेले पदार्थ इतरांना खायला घालायला आवडे. करण आणि सॅवियो तर त्यांचे खास कस्टमर. म्हणून आण्टींनी त्यांना बसायला सांगितले आणि त्या आत निघून गेल्या. करण गौतम अंकलना शोधत असावा.
"पूजा, गौतम अंकल कुठे दिसत नाहीत ते...?"
"आहेत. येतीलच स्नॅक्स खायला. थांब मी बोलावूनच आणते.", असं म्हणून पूजा आत पळाली.
थोड्याच वेळात एक साठीतली म्हातारी बाई भजीचा ट्रे घेऊन दिवाणखान्यात आली.
"गीताबाई, अहो तुम्ही कशाला आणलत. मी आणलं असत ना.", पूजाच्या आई त्या म्हातारीला म्हणत होत्या.
"असूद्या बाई, मला काम कराची आदत हाय!", असं म्हणून तिने तो ट्रे टिपॉयवर ठेवला.
त्यांची जिज्ञासू नजर करण अन सॅवियोवर लागून राहिली होती. दोघेही गीताबाईंना बघून हसले. गीताबाईंनीही स्मित केलं. त्या करणकडे जरा जास्तच कुतूहलाने बघत होत्या.
"हे आले गौतम अंकल...", पूजा मागून म्हणाली.
गौतम अंकल पूजाच्या सोबत दिवाणखान्यात शिरले आणि करणला बघून तिथेच घुटमळले. मधूनच त्यांची नजर तिथेच उभ्या गीताबाईंकडे जात होती.
"अरे बघताय काय", पूजाने कोचवर ऊडी मारली, "खा ना!"
ह्याखेपेस सॅवियो सोडणार नव्हता. त्याने दोन भजे उचलले आणि आपल्या तोंडात कोंबले. कोवळं पनीर जसं तोंडात विरघळायला लागलं तसं रसतृप्तीचा अतुल्य अनुभव सॅवियोला येऊ लागला. त्याने डोळे मिटले अन "उम्म!" असा चविष्ट भाव हुंकारला.
"करण!", गौतम अंकल पूजाच्या सोबतीस येऊन बसले, "आज इकडे, व्हॉट अ प्लेजण्ट सप्राईझ!"
गौतम अंकलनी गीताबाईंकडे पाहिलं. त्या अजूनही पाण्याचे ग्लासच मांडत होत्या. त्यानी करणला नोटीस केलं नसावं.
"गीताबाई! हे पूजाचे क्लासमेट्स. हा सॅवियो रूडॉल्फ आणि हा ‘करण सुधाकर रूपवते’ आणि ह्या ..."
"...मेनकाच्या केयरटेकर गीताबाई." , करणने वाक्य पूर्ण केलं, "मला पूजाने सांगितलं सकाळी.... नमस्ते!", त्याने गीताबाईंना हात जोडले.
गीताबाई भेदरलेल्या भावाने करणकडे बघू लागल्या... करण सुधाकर रूपवते! करणला बघताच पंधरा वर्षांपूर्वीची ‘ती’ सारी क्षणचित्रं निमिषात गीताबाईंच्या डॊळ्यांसमोरून सरसर एकामागे एक झळकली... आपण बाळंत केलेलं ते कोवळं पोर ... हेच? त्यांच्या विश्वास बसत नव्हता... त्याच धक्क्यात गीताबाईंच्या हातातला ग्लास खाली पडला आणि त्याचा आवाज दिवाणखाना चाळवला गेला.
"गीताबाई, करण नमस्ते करतोय!", अंकलनी गीताबाईंना भानावर आणलं
"नम... नमस्ते!", गीताबाई त्याच आवाजात म्हणाल्या आणि तश्याच आत निघून गेल्या.
करण गोंधळला आणि गौतम अंकलकडे पाहू लागला. गौतम अंकलनी एक भजी उचलली आणि, "आता वय झालंय ना म्हणून...", असं सांगून वेळ मारून नेली.
करण तेवढ्यापुरता आश्वस्त झाला असला तरी गीताबाईंना कसं आश्वस्त करायचं हेच गौतम अंकलना लागून राहिलं होतं. सॅवियोला ग्लास पडल्याचं की गीताबाई घाबरल्याचं काहीही सोयरसुतक नव्हतं. त्याचं लक्ष उरलेल्या भज्यांकडे लागलेलं होतं.
"मग करण घरी सगळे कसे आहेत?", अंकलनी विचारलं.
"ठिक आहेत.", करण म्हणाला.
थोडावेळ इकडचे तिकडचे प्रश्न झाल्यावर करणने कसंबसं अवसान आणलं आणि विचारलंच.
"अंकल... मेनका कशी आहे आता?"
अंकल थोडे गंभीर झाले, "म्हणजे फिजिकली ठिकाय पण मेंटली त्या धक्क्यातून सावरली नाहीय. तिला बरं व्हायला थोडा अजून वेळ जाऊ शकतो.", असं म्हणून अंकलनी करणकडे पाहिलं, "उपाय तसा सापडलाय. पण अजून तो हातात आला नाहीय. उद्यापर्यंत नीट काय ते कळेल..." गौतम अंकल करणकडेच बघत होते, "एकदा तो उपाय हातात आला की मग सगळं सुरळीत होईल."
करणला अर्थाच ते कोड्यातलं बोलणं कळलं नाही. तो, "होप्प सो", एवढंच म्हणून पाणी प्यायला.
थोडा वेळ सगळं शांत शांतच होतं. पूजाही खाण्यात बिझी होती आणि सॅवियोनेही आणखी दोन भजे तोंडात कोंबले होते, त्यामुळे त्याचीही बोलायची भ्रांतच होती.
काही वेळात भजे संपले आणि पुन्हा थोड्या गप्पा झाल्या. पाहता पाहता पाच कधी वाजले ते कळलंच नाही.
"ओह!", करण घड्याळाकडे पाहून म्हणाला, "लेट झाला. निघायला हवं." आणि तो आणि सॅवियो, प्रधान आण्टीना भजीसाठी थॅन्क्स बोलून निघाले.
दोघे दाराशी पोचले तोच "करण!", अशी गौतम अंकलची हाक मागून आली. करणने वळून पाहिले.
"तुमचं लोणावळ्याला फार्म हाऊस आहे ना, ‘सावली’ नावाचं?"
"हो!", करण चकित झाला, "तुम्हाला कसं माहित?"
"कळलं कसंतरी. मग जातोस का कधी तिथे?", अंकलनी विचारले तसं करण थोडा प्रश्नांकित झाला.
"हो कधीकधीच. इन फॅक्ट उद्याच जाणार आहे."
"ओह. ग्रेट! यु शुड गो. सी यू देन.", अंकल म्हणाले.
"ओके."
करणने विचारातच खांदे उडवले आणि तो परत जायला वळला. वळताना डोळ्यांतल्या कोपऱ्यात किचनच्या दाराशी ऊभ्या गीताबाई त्याच्याकडेच बघत असल्याचे त्याला जाणवले. त्याने थेट बघताच मात्र त्या भांबावल्या आणि पटकन किचनमध्ये गायब झाल्या. करण विशेष लक्ष न देत त्याच धांदलीत घरी परतला.
आई आणि समीर आज घरी लवकर आलेले. करणने उरलेल्या वेळात अभ्यास संपवला आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ते ‘ऑलिव्हर्स ट्विस्ट’ मध्ये पोहोचले.
"आय विल हॅव अ मोरोक्कन लॅम्ब ऍन्ड शेर्मोला.", असं म्हणून समीरने आईकडे पाहिलं, "आई तुला..."
"मी वेज फ्राईड राईस आणि चिकन डम्प्लिंग्स घेईन", आई म्हणाली.
"करण...", समीरने करणला विचारले, "तुझी ऑर्डर!"
"तेच रूटीन... इटालियन राईस, मेस्किकन रोल्स आणि फाहिताज!"
नेहेमीच्या पूलसाईड, स्काय-ओपन टेबलावर सुलभा रूपवते, समीर रूपवते आणि करण रूपवते यांच्या नावाने रीजर्व केलेली जागा त्याना मिळाली होती. आज कित्येक दिवसांनी रिपरिप पाऊस आटोपला होता त्यामुळे आकाश थोडं निरभ्र होतं. चांदण्या दिसत होत्या. म्हणूनच समीरनं ओपन टेबल बुक केलं होतं.
"वेरी वेल सर", अटेडन्ट मेनू लिहून निघून गेला.
स्टार्टर्स ची वाट बघत तिघे आपापल्या अवसानात रमले. करण होमवर्कविषयी चिंतीत असला तरी आई आणि समीरची चिंता करणपेक्षा कित्येक पटींनी जास्त होती. राहून राहून उद्या विषयी आठवून ते मनातल्या मनात कढत होते. त्या विचारांत त्याना भूक लागणेही शक्य नव्हते.
"करण! मला तुला एक विचारायचं होतं... तुझं सेजेशन हवं होतं.", समीर म्हणाला.
"काय?", करणने विचारले.
"माझ्या एका सरांना एक मुलगा आहे... तुझ्या एवढा असेल वयाने...". समीर म्हणाला. असं म्हणून त्याने आईकडेही पाहिलं. आईही समीरकडे थोड्या प्रश्नार्थक चेहेऱ्याने बघू लागली. तिला समीरच्या बोलण्याचा रोख कळला नव्हता.
"त्याच्या जन्माविषयीचं एक रहस्य त्याच्या आई वडिलांना त्याला सांगायचंय.", समीर म्हणाला. हयावर आई थोडी भांबावली.
"रहस्य! कसलं रहस्य?", करणने भुवया उंचावल्या.
"रहस्य म्हणजे अ ट्रुथ. अबाउट हिज बर्थ."
करणने कान टवकारलेले होतेच.
"ऍक्चुअली त्याचा जन्म एका सरोगेट आईकडे झालाय. पण ती सरोगेट असल्याने तिला त्या मुलाला सोडावं लागलं आणि माझ्या सरांना सोपवावं लागलं. तेव्हापासून सर आणि त्यांच्या वाईफ त्याचा आपल्या मुलाप्रमाणेच सांभाळ करत आहेत ... पण ..."
"पण काय?", करणला उत्सुकता लागलेली दिसली.
"वेल ...", समीरला पुढचा भाग वळत नव्हता. त्याने आईकडे थोड्याशा हताशपणेच पाहिलं. आईने नजर चोरलेली.
"त्या मुलाला अजून ह्याविषयी काहीच माहित नाहीये आणि आता सर आणि त्यांच्या वाईफना वाटतेय की वेळ निघून जाण्याआधी त्याच्या जन्माचं रहस्य त्याला सांगून टाकावं. इट्स बेटर टू बी अर्ली दॅन लेट. म्हणून आता ते ह्याच विचारात पडलेत की हे सगळं त्यानी सांगावं कसं?"
करण संशयित चेहेऱ्याने समीरकडे पाहू लागला, "पण तू हे मला का विचारतोयस?"
समीर सावध झाला. त्याने पटकन उत्तर दिले, "कारण त्यांचा मुलगा तुझ्या वयाचा आहे... म्हणून "
"माझ्या वयाचा आहे म्हणून काय झालं?"
"म्हणजे तोही टीनेजर आहे आणि ...", समीर थोडा अडखळला, "यू नो अ टीनेजर्स आर अ बिट इंपल्सिव. ह्या वयात सगळे थोडे इमोशनल असतात ... म्हणून ...".
करणच्या चेहेऱ्यावर अजूनही प्रश्न साचलेले होतेच. समीरने पटकन म्हटले, "... सरांना भीती आहे की खरं काय ते कळल्यावर तो त्याना सोडून निघून गेला तर? किंवा त्याने स्वतःला काही बरं वाईट करून घेतलं तर..."
करण ह्या वाक्यावर गप्प बसला. आता स्वतः टीनेजर असल्याने आई आणि समीर त्याला इम्पल्सिव समजतात हे त्याने साहाजिकच ताडले.
"तुला काय वाटते? त्यानी कसं समजावं त्याला?"
"माहित नाही.", करण म्हणाला अन तोच स्टार्टर्स आले. समोरचे मेक्सिकन रोल्स आणि चायनिज चिली चिकन हे करणला त्या प्रश्नापेक्षा अर्थातच जास्त टेम्टींग वाटत होते. करणने आपली डीश मांडली. समीर आणि आई करणच्या ह्या अलिप्तपणामुळे थोडे निराश झाले.
"देयर इज वन वे.", करणचा बोलता झाला, "म्हणजे अगदीच त्याच्या समोर सांगणं त्याना डीफिकल्ट वाटत असेल तर त्यानी त्याला लिहून द्यावं, इन अ लेटर ऑर समथिंग ...", करण सांगत होता, "पण एकदा त्याला सांगून झालं की त्याला थोडी स्पेस द्यावी. थोडा वेळ द्यावा ..." करण म्हणाला, "द थिंग दॅट इरीटेट्स अस ... आय मिन टिनेजर्स लाईक मी इज पॅरेन्ट्स हू थिंक दे होल्ड द डिसिजीव्ह पावर. ह्य केसमध्ये डिसीजन त्यांच्या मुलाला घेऊ द्यावं ... यू नो ... कसलंही प्रेशर न टाकता ... ऍज आय सेड स्पेस ... दॅट्स इम्पॉर्टंट." आणि असं सांगत करणने स्टार्टर्स खाणं सुरू केलं, "ही विल हॅव टू अंडरस्टॅन्ड! इट्स द ट्रुथ ऑफ हिज लाईफ ... ही हॅज टू अडमिट इट ... समडे ऑर द अदर ... बेटर टुडे दॅन टुमॉरो."
समीर आणि आई भान सोडून करणचं बोलणं ऎकत होते. आज एवढ्या दिवसात करण स्वतःहून आपल्या मनातलं बोलला होता. अगदी मोठ्यांसारखं. आणि विशेष म्हणजे त्याच्या बोलण्यातला एक अन एक शब्द आई अन समीरलाही समजवून जात होता ... इट ऑल लूक्ट सो सिंपल नाऊ ...
जेवण आटोपत होतं आणि त्याच्या मागचा समीरचा बेत सिद्धीस मिळत होता. टप्प्याटप्प्यावर करणशी होणारं बोलणं आज आई अन समीरला सुखावून जात होतं. बाबांच्या गोष्टी निघाल्या, समीरच्या देशपांडे सरांच्या गोष्टी झाल्या, आईने आपल्या ऑफिसातल्या बाता शेयर केल्या. हे फॅमिली गेट टुगेदर करणच्या उत्स्फूर्त सहभागामुळे खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झालं होतं. रात्री "नॅचरल्स" चं आईस्क्रीम खात पायीच घरी येताना, बऱ्याच दिवसांनी मुंबईची दमट उबदार हवा रात्रीच्या कोरड्या थंडीत गायब झालेली त्याना जाणवत होती. मोकळ्या आकाशाखाली, लुकलुकणाऱ्या चांदण्यांच्या प्रकाशात, चाल्लेला हा काही मिनिटांचा वॉक, आई आणि समीरला संपूच नये असा वाटत होता.
त्याना असं वाटणं साहाजिकच होतं ... कारण उद्याचा दिवस कुणासाठीच एवढा चांगला नसणार होता...
****************
भाग एकतीस
सकाळपासून पावसाने जोर धरलेला. रूपवते फॅमिली लोणावळ्याला निघण्यासाठी तयार होत होती. आईला रात्रभर नीट झोप लागली नसावी. तिचा चेहेरा निस्तेज होता. समीर तर कालची रात्र निरूत्सापणे जागला होता. मनातलं सगळं पत्रात उतरवायला त्याला पूर्ण रात्र लागली होती.
"आई", समीरने सकाळी सकाळी आईच्या हाती एक कागद दिला. सहाचे टोले पहाटेची चाहूल देत होते.
"हे वाच. करणने काल सांगितल्याप्रमाणे मी सगळं ह्यात लिहिलं आहे.", समीरने आईकडे बघितलं, "मला नाही वाटत आपल्यापैकी कुणीही बोलून करणला समजावू शकेल. म्हणून निदान ह्या पत्राद्वारे तरी ..."
आईने ते पत्र थरथरत्या हातानी उघडलं अन तिथेच साश्रुनयनी वाचून काढलं. प्रत्येक ओळी मागे तिच्या डॊळ्यांतला ओलावा वाढत होता... शेवटी भावनाविवश होऊन तिचे पाय गळले. ती खाली बसली.
"हे सगळं वाचून माझ्या बाळाची काय हालत होईल रे समीर ... तो कसा हे सगळं सहन करेल ... नाही ... मी हे करू शकत नाही ...", आई स्वतःशीच बोलू लागली, "उगीच नको त्या गोष्टी करणला सांगून काही साध्य होणार नाही ... आपण आपला प्लान कॅन्सल करूया ... हो समीर ... लेट्स कॅन्सल इट ..."
आईच्या अचानक खचण्याने समीर गोरामोरा झाला.
"आई अगं काय करतेस तू?", समीरही आईच्या कुशीस बसला, "आपण दोघांनी ठरवून जमवलंय हे सगळं आणि अशा वेळीस तू खचतेयस? आई अगं आठव, आपण हे सगळं का केलं होतं ..."
"हो माहितिये आपण हे का केललं ते ... पण तेव्हा करणची तब्येत नाजूक होती ... तो इमोशनली अन्स्टेबल होता ... पण आता तसं नाहिये. काल पाहिलंस किती चांगला वागला तो ... आपल्यासोबत किती छान राहिला तो ... म्हणून मी म्हणतेय ... हे आता करायची काहीच गरज नाहीये ... आपण ऊगीच घाई करतोय, समीर ..."
"च्च! आई अगं करण आता सावरलाय म्हणजे नेहेमीच तो असाच वागेल का? आठवतंय ना त्याने मेनकाच्या मागे काय काय केलंय? रक्त सांडलं, हात मोडला, आपल्याशी खोटं बोलून तो तिला भेटायला गेला ... एवढंच नाही तर इमोशनल ब्रेकडाऊन होत होता राहिला त्याचा ... हे सगळं पुन्हा होणार नाही ह्याची काय खात्री? हं? आणि करणच्या जन्माचं सत्य करणला लवकरात लवकर कळेल तितकच बरं नाही का? खरं काय ते समजवल्यावर निदान त्या नटीच्या मागे मागे तरी तो करणार नाही ..."
"हो रे पण तो आपल्यावर रागावला तर ... रूसला तर? आपल्याला सोडून निघून गेला तर? आपल्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर?", आईच्या प्रश्नांचे जथ्थे साचले होते, "आपण त्याला कसं सामोरं जाणार?"
"पण तो तसं नंतर करणार नाही ह्याची काय ग्यारण्टी? एक साधा विचार कर आई. तो आता आपल्यावर अवलंबून आहे. आपणच त्याचं सख्खं कुटूंब आहोत. कुठेही गेला तरी शेवटी त्याला आपल्याकडेच परत यावं लागणार. तो इन्डिपेडन्ट होईपर्यंत आपणच त्याला सांभाळणार आहोत. मग तोपर्यंत सगळं हळूहळू ठिक होईलच ... " , समीरने आईचे अश्रू पुसत म्हटले, "बिलीव्ह मी... इट विल बी टफ बट इट बी ओके... आई अगं बाबा गेलेले तेव्हाही आपण ह्याच द्वंद्वात फसलेलो ना... पण त्यावेळीस जर तू असे पाय गाळले असतेस तर आपण इथवर कसे आलो असतो आई ... तूच तर माझा आधार आहेस ... तू खचलीस तर मी काय करू शकेन? ... मला एकट्याला हे सगळं नाही जमणार ... आय नीड यू आई... मला खरंच तुझी गरज आहे ... करणला तुझी गरज आहे ... "
समीरचा आवाज जड झाला. तो आईला बिलगला अन त्याने मनसोक्त रडून घेतलं. बराच वेळ समीर आपली बाजू आईला हतबलतेने पटवत होता. त्याच्य मते हे सगळं अटळ होतं. समीरने दिलेला धीर आणि अपरिहार्य कारणांमुळे आईने अवसान आणलं. तिचे अश्रू तेवढ्यापुरता मावळले. थोड्या वेळात करणही उठला आणि सातला त्यांनी एकत्र घर सोडलं.
नागमोड्या वळणाचा घाटातला रस्ता करणला सुखावून जात होती. हिरवी गर्द वनराई, एसी चालू नसूनही हुडहुडी भरायला लावणारी घाटातली थंड हवा, खिडकीतून आत उडणारे पावसाचे गार शिंतोडे मन शहारून जात होते. कारनं उतावरून आता चांगलाच वेग पकडला होता. आईने तेवढ्यात समीरला हळू चालवायचा सल्ला दिलाच. पण समीर रॅश ड्रायव्हर आहे हे सगळ्यांनाच माहित होतं. तरी ही सिदान असल्याने आणि वळणावळणाचा घाट असल्याने समीरने वेग तसा नियंत्रणात ठेवलेला. नाहीतर तरूणपणी मोटरबाईक्सचं भयंकर वेड असणारा समीर शंभरच्या खालच्या स्पीडने तर कधीच कुठलं वाहन चालवत नसे. करणने मेनकामागे केलेल्या उपद्व्यापांसाठी त्याला ओरडणारा समीर हा त्याने स्वतः मोटरबाईकवर केलेल्या प्रतापांसाठी नेहेमी बाबांकडून ओरडा खायचा. वयानुसारही ही रॅश ड्रायव्हिंगची समीरची सवय अजूनही गेली नव्हती. फरक एकच पडला होता. टूव्हिलर सोडून फोरव्हिलर हातात आली होती.
थोड्याचवेळात घाट ओलांडला आणि अकरा वाजेपर्यंत ‘सावली’ आलंही. करणने सर्वात आधी उतरून दार ठोठावलं. कुसुममामीने उघडलं.
"हाय कुसुम मामी कशी आहेस?", करणने तिला मिठी मारली, "तुम्ही आधीच आलात हे बेस्ट केलंत."
"हो आधीच येऊन बसलो. तुमची वाट बघत. आणि आम्ही ठिक आहोत. तुझं काय? हात कसाय? बरा दिसतोय.", कुसुममामीने करणची विचारपूस केली, "आणि काय रे तुला आमची आठवण पण येत नाही वाटतं आजकल. फोन पण करत नाहीस तो.", कुसुममामी लटक्या रागात बोलल्या.
"तसं नाही गं... खूप अभ्यास आहे म्हणून बिझी झालो...", करण म्हणाला आणि त्याचे लक्ष श्रियाकडे गेले, "... वेल वेल ही चिंटुकली कोण?"
श्रिया लाजून मामांच्या मागे लपली.
"अगं जा ना करणदादा कडे. लाजतेस काय...", कुसुममामी म्हणाल्या, "आता तर म्हणत होती मी करणदादाकडून शंभर चॉकोलेट्स घेणार म्हणून."
"काय तुझ्याशी बोलत होती. माझ्याशी तर अजून बोलत नाही.", समीर म्हणाला.
"बोलेल बोलेल. आम्हा सगळ्यांशी बोलेल.", मागून आई आत येत म्हणाली, "आणि करण नक्की देईल हो तो तुला चॉकोलेट्स. तू मुंबईला आल्यावर शंभर काय हजार चॉकोलेट्स देईल तुला. मनोहर तर कामानिमित्त येतच असतो. दर चार पाच दिवसांनी. तुम्ही मात्र कुणीच येत नाही."
"येऊ ना ताई, नक्की येऊ. श्रियाची शाळा आणि माझं ऑफिस नसतं तर चांगले एक दोन आठवडे रहायला आलो असतो ... हे पूर्ण बरे झाले की सिद्दीविनायक करायचाय तेव्हा काही दिवस रहायलाच येऊ." कुसुममामीनी सगळ्याना चहा देत म्हटले, "आज कोल्ड ड्रींक नाही. पाऊस पडतोय छान मग गरमागरम चहा आणि कांदेपोहे केलेत."
"व्वा!", समीर म्हणाला, "कांदेपोहे माझे फेवरेट!"
"हो कांदेपोहे ... बाईक्स ... आणि अजूनही बरंच काही, काय?", मनोहर मामांनी डॊळा मिचकावला. समीर हुरळला.
"त्या कॉलेज डेजच्या गोष्टी मामा. आता कसलं बोलताय तुम्ही."
"म्हणजे मला भूपेश ... सॉरी ... बॉब म्हणता न तुम्ही त्याला. म्हणाला लोणावळ्यालाही येऊन गेल्यात तुझ्या फेवरीट्स. तुझ्या बाईकवरून".
समीर थोडा लाजत अवघडला.
"त्याच्या गर्लफ्रेन्ड्स ना? ठाऊक आहे मला", आईच जरा रागातच म्हणाली, "निदान एकीशी तरी सिरीयस राहिला असता तर एवढ्यात लग्न होऊन पोरं झाली असती ... ".
आईच्या ह्या बोलण्यावर करणने मिश्किलीत समीर कडे पाहिलं. "पण मामा", करणने विचारले, "भूपेशदादाला हे कसं ठाऊक?"
"तो इथेच शिकला ना. कॉलेजात. समीरचा समवयस्क तो. समीर यायचा इथे तेव्हा भूपेशलाही पार्टीत बोलवायचा."
"हो ... समीर अन त्याच्या पार्ट्या ... पार्ट्या करण्यासाठीच तर त्याने हे घर वापरलं ...", आई म्हणाली, "समीरने इकडे इतक्या पार्ट्या केल्यात की त्याच्या अठराव्या बर्थडेला आम्ही त्याच्या नावेच करून टाकलं हे घर ... पुढे कटकटच नको ..."
सगळे हसले पण समीरचा तो बर्थडे आठवला आणि सगळ्यांचे चेहेरे कटू आठवणींनी काळवंडले. समीरने आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.
"अरे भूपेश कसा आहेस?", आतून हात पाय धवून बाहेर आलेल्या भूपेशला समीरने विचारले. कुसुममामीने त्याला पोह्याची डिश दिली तसा भूपेश कोचवर बसला, "मी ठिक. पुण्याला मित्रांकडे गेलेलो. आत्ताच आलो पाच मिनिटांपूर्वी. तू कसा आहेस?"
"ग्रेट! अरे एवढा मित्रांकडे फिरतोस, आमच्याही ये कधी घरी.", समीरने हात पुढे केला..
"हो डेफिनेटली!", शूपेशनेही मग हॅण्ड शेक केला.
एका तासात नाश्ता करून झाला अन हात पाय धुवून फ्रेश होऊन सगळे दिवाणखान्यात बसले. करण श्रियाशी सापशिडी खेळत होता.
"च्यायला. पुन्हा तेच.", भूपेश त्रस्त होऊन म्हणाला.
"काय झालं?", समीरने विचारले.
"अरे माझ्या मित्रांचे एसेमेसेस येतायेत. मला न विचारता पार्टी अरेंज केली अन म्हणतात की मी हो म्हणालो म्हणून."
"व्हॉट! असं कसं?"
"म्हणतायत त्यांच्या एसेमेसला मी "हो" म्हणून रीप्लाय दिलाय. टेकन फॉर ग्रान्टेड घ्यायची सवय लागलीय आजकलच्या मित्रांना. अरे त्यांचा एसेमेसचा अलर्ट पण मला कळला नाही. त्यात त्यांना रीप्लाय करायची सुद्धा मला फुरसत नव्हती.", भूपेशने आठ्या पाडल्या, "फरगेट इट! जाईन जर वेळ असेल तर.", भूपेश म्हणाला अन त्याने मोबाईल खिशात ठेवला.
करण थोडा चिकित्सकपणे भूपेशची ही कंप्लेण्ट ऎकत होता. समीरच्या हे लक्षात आलं. आईच्या एसेमेससारखा हा गोंधळ वाटत होता.
"ओके ड्युड चिल्ल! आपण जरा राऊण्ड मारून येऊ चल." समीर म्हणाला आणि ते दोघे इतरांच्या नकळत घरातून सटकले. समीरच्या सुपरफास्ट ऑक्टावियाने भूपेशला ‘लिकर डिलाईट्स’ मध्ये पंधरा मिनिटांत पोचवले.
"सो हाऊज लाईफ?", भूपेशने विचारलं.
"लाईफ इज लॉन्ग ... अनफेयर ऍज युज्वल.", समीरने ‘कार्ल्स्बर्ग’ च्या बियरचा एक पेग गळ्यात उतरवला आणि भुवई उडवत म्हटले.
"अनफेयर?", भूपेश म्हणाला, "कोणामुळे?"
"अजून कोण?", समीरचा उपहास गेला नव्हता.
"यू मिन मेनका?"
तिचं सरळ नाव घेतल्यामुळे समीरने थोड्या नाराजीतच भूपेशकडे पाहिलं.
"सॉरी!", भूपेश म्हणाला, "मला माहित आहे मेनकाचं नाव घेणं तुला आवडत नाही. पण जे झालं ते ... "
समीर भूपेशकडे बघत म्हणाला, "लूक! आय डोण्ट केयर अबाऊट हर. ऑल आय केयर अबाऊट इज माय फॅमिली."
"फाईन. मी तर केवळ ह्यासाठी म्हणत होतो करणला हे सगळं सांगयचं ... म्हणजे मेनकाच्या फॅमिली इन्व्हॉलमेण्टविषयी ... "
"दॅट्स इररेलवन्ट!", समीरने भूपेशचा प्रश्न झिडकारला, "उगीच नस्ती थडगी का उरकायची?"
समीरच्या ह्या उत्तरावर भूपेश काहीच बोलला नाही. पण त्यानंतर ती बियर गप्प पणेच संपली. दुपारी दिड पर्यंत दोघे जेवायला घरी परत आले. कुसुममामीच्या हातच्या वऱ्हाडी मटणाचा बेत होता. हसत खेळत जेवण संपत होतं. श्रियाने करणला मोबाईलमध्ये ब्रिक्सच्या खेळात तीनदा हरवलं होतं. म्हणून तिच्या ताटातले बटाटे त्याने खायचे, अशी शिक्षा त्याला मिळाली होती. करण ती आनंदात पूर्ण करत होता. श्रियाच्या बाबतीत समीरपेक्षा करणच जास्त हळवा होता. कारण मनातली माया टाकण्यासाठी तीच करणची एकमेव छोटी बहीण होती. श्रिया इतरांशी जास्त बोलत नसे. आई, शूपेश आणी समीरशी तर नाहीच. पण कुसुममामीशी आणि करणशी मात्र मोकळेपणाने बोलायची. करणला म्हणूनच तिचा लळा लागला होता.
जेवण आटोपलं अन सगळे दिवाणखान्यात थांबले. कुसुममामीही भांडी आटोपून दिवाणखान्यात येऊन बसली. श्रिया बाजूला मोबाईलवर तिचे गेम खेळत होती. भूपेशही समीरच्या सोबतीस होता. गेल्या काही मिनिटांपासून टिव्हीकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. सगळे क्षणागणिक करणकडे आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. त्यांच्यासाठी घटका जवळ आली होती. करणला त्यांच्यातला हा ताण जाणवला.
"काय झालंय तुम्ही सगळे माझ्याकडे असे का बघताय?"
करणच्या ह्या प्रश्नाने सगळे सावध झाले. मामांनी टिव्ही बंद केला.
"करण!", मामा म्हणाले, "तुला माहितिये आज आपण इथे का जमलोय?"
"हो! म्हणजे तुम्हाला भेटण्यासाठीच ना.", करण गोंधळून म्हणाला
"नाही.", असं म्हणून मामांनी आईकडे पाहिलं, "आपलं एकत्र यायचं कारण काही औरच आहे..."
"काय कारण?"
"करण तू ...", समीर काहीतरी बोलायच्या आवेगात होता पण मध्येच अडखळला, "म्हणजे मी... आई... तुला ... आम्हाला तुला..." पण ह्यापुढे बोलायची त्याची ताकदच होत नव्हती. मामांनी समीरची तळमळ जाणली.
"करण ..", मामांनी संभाषणाचा धागा पकडला, "तुला ठाऊक आहे तुझा वाढदिवस कधी आहे ते?", मामा म्हणाले.
"हो. हा काय प्रश्न झाला? १ जून."
"नाही मी तुझा खरा वाढदिवस विचारतोय?", मामा म्हणाले.
"खरा? म्हणजे मला कळले नाही.", करणच्या चेहेऱ्यावर प्रश्न साचले.
"१ जून तुझा खरा वाढदिवस नाही. तुझा खरा वाढदिवस आहे ... १२ जुलै."
करण आई आणि समीरकडे पाहू लागला. त्यानी आधीच डोकी पायात घातलेली.
"व्हॉट? १२ जुलै? पण तो तर समीर दादाचा वाढदिवस ना? माझा तर १ जूनला ..."
"तो मुद्दामून बदललेला वाढदिवस आहे तुझा. १२ जुलैच तुझा वाढदिवस आहे. समीरदादाच्याच दिवशीचा. त्या दिवशी घडलेल्या कडू आठवणी लक्षात राहू नयेत म्हणून आम्ही सुरूवातीपासूनच तो बदलला होता."
"कडू आठवणी? कसल्या आठवणी?", करण पूर्ण गोंधळला होता. त्याने सगळ्यांकडे प्रश्नार्थक चेहेऱ्याने पाहिलं. "सांगाना कसल्या आठवणी?", करण उभा राहिला, "आई मला काहीच कळत नाहीये.", करण आईकडे वळला, "काय झालंय सांगना...", करण अस्वस्थ झाला होता.
आईने आधीच डोळे बंद केलेले. तिला करणच्या डोळ्यात नजर घालाविशी वाटत नव्हती. समीरही मान खाली घालून होता. भूपेश आणि कुसुममामी गोऱ्यामोऱ्या चेहेऱ्याने करणकडे बघत होते.
"आय थिंक यू शुड रिड धिस.... ", मामा म्हणाले आणि त्याने एक चिठ्ठी करणकडे सरकावली.
करणने ति चिठ्ठी घेतली अन तो उभाच ती वाचू लागला... त्याच्या डोळ्यांत त्यातली एकेक ओळ सरताना दिसत होती... दुसरं पानही संपलं होतं ...
... अन शेवटचा एक क्षण तो एकटक त्या पत्राकडे बघत होता...
… शून्यात ...
... पण बाकी सगळ्यांसाठी त्या क्षणाचं विभाजन जणू त्याच शून्याने झालेलं होतं ...
****************
(क्रमशः)
प्रतिक्रिया
20 Aug 2011 - 1:43 pm | धनुअमिता
हा ही भाग अपेक्षेप्रमाणे उत्तम.
पु. भा. ल.ये.द्या.
20 Aug 2011 - 4:04 pm | प्रीत-मोहर
ह्याच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्शेत
20 Aug 2011 - 4:04 pm | प्रीत-मोहर
ह्याच्या पुढच्या भागाच्या प्रतिक्शेत
20 Aug 2011 - 5:30 pm | विनीत संखे
पुढील भाग ... http://www.misalpav.com/node/18907
20 Aug 2011 - 5:49 pm | गणेशा
पुन्हा अप्रतिम ...
निशब्द