मागील भाग ... http://www.misalpav.com/node/18881
भाग पंधरा
विले पार्ले, सांताक्रूझ, बांद्रा आणि माहिम मागे पडले तशी करणच्या हृदयाला गाडीचीच गती सापडली असावी. गूज़बम्प्स कशाला म्हणतात त्याचे प्रत्यंतर आज येत होते. ट्रॅफिक नसूनही फक्त थोड्या वेळेसाठी सिग्नल लागला तरी "डॅम ट्रॅफिक" असा शेरा करण मारत होता. एवढा नर्व्हसनेस्स तर पूजाशी बोलतानाही नसावा.
"ऍड्रेस्स काय म्हणालास?", रूडॉल्फ अंकलनी पुढे लागणाऱ्या चौकचा अंदाज घेत म्हटले. करणने खिशातली ऍड्रेस्स लिहून घेतलेली एक चीट अंकलच्या हातात सरकावली. ती घेताना थंड चटका लागावा तसा अंकलना करणच्या हाताच्या स्पर्श लागला.
"इजी माय बॉय.", अंकल थोडं करणकडे बघत अन थोडं ऍड्रेस वाचत म्हणाले, "एवढं नर्व्हस होऊन चालणार नाही. उद्या कॉलेजात गेल्यावर मुलींशी कसा बोलशील? तिकडेच तर खरा कस लागतो." अंकलनी ताण निवळावा म्हणून विनोद केला तसं करण कृत्रिम हसला. ते ऎकून मागच्या सीटवर बसलेल्या सॅवियोने मिश्किलीत "प्प...प्प...पू..प्पू" असं पूजाचं नाव घेतानाचा करणचा प्रारंभप्रयास त्याला चिडवून दाखवला. त्यावर करण चिडला खरा पण त्याला ओशाळून गप्प बसावे लागले. रूडॉल्फ अंकलच्या समोर सॅवियोला फटका हाणणं बरं दिसत नव्हतं.
"मी आज तुम्हाला डायरेक्ट सोनीटिव्हीच्या ऑफिसातच सोडतो. आज अर्धा तास लेट जाईन ऑफिसला.", अंकल करणच्या तणावग्रस्त चेहेऱ्याकडे बघून म्हणाले, "पुन्हा तुम्हाला बांद्य्रावरून ह्या ऑफिस टाईमावर सगळ्या भरलेल्या बसेस मिळतील. चढायला जमणार नाही. त्यापेक्षा मीच सोडलेलं बरं."
अंकलच्या ह्या आश्वासनाने तरी करणचा मूड ठिक व्हायला हवा होता. पण करण मख्खच. सॅवियोने पाठून "थॅन्क्स डॅड" म्हटले आणि करणला थोडा धक्का मारत काहीतरी सुचवलं.
"ओह! थॅन्स!", करण भानावर येऊन म्हणाला, "काय म्हणालात तुम्ही?"
सॅवियोने कपाळावर हात मारला.
अंकल हसले. "नेव्हर माईण्ड!" असं म्हणाले अन त्यानी गाडी तिसऱ्या गिअर मध्ये टाकली. वेळेचा पत्ता लागेस्तोवर वरळी कधी आलं ते कळलंच नाही. साडे नऊ झालेले.
"मुकुल आनंद स्टूडियो कुठे आहे?", रस्त्याच्या बाजूला उभ्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारले तसं दिशा दर्शवून त्याने ‘दोन मिनिटावरच आहे’ असे उत्तर दिले. गाडीने तेवढाच वेळ घेतला आणि एक जुनाट गेट मधून ते आत शिरले.
"व्हॉट!!! शऽऽऽट आप!", सॅवियो बिल्डींगकडे पाहत म्हणाला. त्याचा पूर्ण भ्रमनिरास झाला होता.
"मला वाटलं हा स्टुडियो म्हणजे फिल्मी स्टुडियो असेल. पण हा तर गाळा आहे. आपली शाळा ह्यापेक्षा बरी. इट्स सो टॅकी!", सॅवियोने नाकवर हात ठेवला. वरच्या सहा मजल्यांवरच्या एसींनी वर्षानुवर्षे पाडलेल्या पाण्याने आवारत चांगलंच शेवाळ साचलं होतं. त्याचा कुबट वास येत होता. तसं म्हणावं तर करणचाही थोडा भ्रमनिरास झाला होताच. ते नक्की सोनीटिव्हीचे ऑफिस असं कुठूनही वाटत नव्हतं. शेवटी लॉबीचं दार दिसलं अन त्यावर हिरव्या निळ्या लोगोतला एस दिसला आणि खात्री पटली. सगळी बिल्डींग सोनी टिव्हीचीच होती.
"ओके बॉईज. टेक केयर. जाताना नीट जा. सरळ टॅक्सी पकडली तरी चालेल. उगीच ट्रेन अन बसचे धक्के कशाला खायचे?", अंकल असं बोलून सॅवियोकडे वळले.
"पैसे आहेत ना?"
सॅवियो काहीतरी आठवून म्हणाला, "ओह नो! मम्मीने देण्याच्या आधीच मी बाहेर पडलो.", त्याचा चेहेरा तुरट झाला.
"सॉरी डॅड!"
अंकलनी डॊळे फिरवले अन शंभरच्या तीन नोटा काढून सॅवियोला दिल्या, "आता हे तरी नीट ठेव."
सॅवियोने सोज्वळपणे ते घेतले अन सकाळी मम्मीकडून न विसरता घेतलेल्या, पाकिटात नीट लपवलेल्या, आधीच्या पाचशे रूपयांच्या सोबतीत गुपचूप ठेवून दिले. डॅडींना गंडवून अन एवढी चतुर कमाई करूनही "तीनशे रूपयांचा फायदा झाला" असं न म्हणता "डॅडी किती कंजूष आहेत. तीनशेच दिले." असं सॅवियोच्या मनात चाललं असावं. त्याचा तुरट चेहेरा तसाच होता.
अंकल गाडीत बसले. सॅवियो सिक्युरीटी काऊण्टरकडे धावला अन आपली अपॉईण्टमेण्ट पडताळून पाहू लागला. करण गेटपाशी उभा होता. अंकलनी गाडी रीव्हर्स घेत ती करणच्या थोड्या समोर थांबवली आणि ते करणला गुपचूप म्हणाले, "करण!", अंकलनी करणला जवळ यायची खूण केली अन सॅवियोकडे पाहिलं. तॊ दूरच होता. करण गाडीपाशी गेला.
"यू नो... ", अंकल थोडे लाजून बोलू लागले. त्यांचा आवाज तुटका झाला होता. "... अम्म … डोन्ट टेल धिस टू सॅवियो बट … यू नो... मेनकाकडून ह्या माझ्या ऑफिसच्या विझीटींग कार्डावर ऑटोग्राफ घे.... ‘लव रूडॉल्फ’ असं लिहायला सांग ...", अंकलनी गुपचूप सॅवियोकडे पाहिलं.
"आणि सॅवियोला दाखवू नकोस प्लीज. इट्स अ सिक्रेट! कॅन यू डू दॅट फॉर मी?"
ह्यावर करणने मजेत अंकल कडे बघितलं. पण अंकल तर सिरियस वाटत होते. करणने गुपचूप होकारार्थी मान डोलावली. अंकलनी करणच्या हातात स्वतःचं विझीटींग कार्ड व एक शंभर रूपयाची नोट सरकावली अन ते करणला डॊळा मिचकावून निघून गेले.
आधीच मेनकाला भेटायचं म्हणून नर्व्हस ब्रेकडाऊन होण्याच्या मार्गावर असलेल्या करणने ह्या नव्या जबाबदारीचं ओझं काहीही न बोलता स्वीकारलं नसतं तर नवलच. तो थोडा गोंधळलेल्या स्थितीत तिथे उभा राहिलेला होता. सिक्युरीटी काऊण्टरवरून परतणाऱ्या सॅवियोला पाहून तो ध्यानावर आला अन त्याने ते कार्ड अन पैसे खिशात लपवले.
"सिक्थ फ्लोर! आय होप धिस चॉल हॅज अ लिफ्ट!", खोचकपणे सॅवियो करणला म्हणाला अन दोघे बिल्डींगमध्ये शिरले.
लिफ्टने वर जाताना पोटात कालवाकालव झालेली करणला जाणवू लागली. हा इनर्शियाचा नियम की मेनकाला भेटायची हूरहूर? त्याच धुंदीत लिफ्टचं दार उघडलं अन समोरचं दृष्य पाहून करण अन दोन मिनिटं सॅवियो हरखून गेले.
शंभर फूटांपेक्षा जास्त लांबी रूंदीचा एक प्रशस्त स्टुडियो समोर पसरलेला होता. डावीकडच्या दालनात गोलाकार पायऱ्यांच्या स्वरूपात मांडलेली ऑडीटोरिअम टाईप आसनव्यवस्था होती. त्यावर ऎसपैस वीस पचंवीस प्रेक्षक बसलेले होते. त्याच्या समोरच मध्यभागी फ्लॅशलाइट्सनी उजाडलेला गोलकार मंच होता. त्यात एक उंच बॅक सपोर्ट असलेला हिरवा कोच दिसत होता. पाठमोरा असल्याने त्यावर कोण बसलंय ह्याचा पत्ता लागत नव्हता. त्याच्या समोरचा कोच मात्र पाठमोरा नव्हता. त्या खुर्चीवर बसलेला होता फेमस एमटिव्ही व्हीजे सागर. सागरने काहीतरी जोक मारला असावा कारण सगळी ऑडियन्स खिदळत हसत होती.
‘म्हणजे इकडे एमटिव्हीची शूटींग चालू आहे तर…’ करणने अंदाज बांधला. त्या मंचाला गोलाकार ट्रॅक्स होते ज्यावरून दोन कॅमेरामॅन शूट करत होते. त्या पाठमोऱ्या कोचावरच्या व्यक्तिच्या जवळ जाऊन एक कॅमरामन त्या गेस्टचा क्लोजप घेत असावा अन दुसरा स्टेज अन ऑडियन्सच्या मधल्या ट्रॅकवर उभा सागर आणि त्या गेस्टची वाईड ऍंगल शूटींग करत असावा.
"तो बघ दॅट्स व्हीजे सागर!", सॅवियोने बोट दर्शावून करणचा खांदा हालवला. करण मात्र मेनका शोधण्यात दंग झाला होता.
"मे आय हेल्प यू?", पाठून आवाज आला. सॅवियो अन करणने वळून बघितलं. एक चाळीशीतली बाई त्यांच्याकडे तिच्या वायरफ्रेम चश्म्यातून बघत होती, "हू लेट यू इन हियर?" तिनं इंग्रजीतच विचारलं. तिची भिरभिरती नजर चश्माआडून कधी सॅवियो तर कधी करणकडे बघत होती. चश्मा फ्रेन्च वर्साशे असावा. कारण हुक्सच्या बाजूने हिऱ्यांची रांग दिसत होती.
"मॅम वी आर हियर ऑन ऍन अपॉण्टमेन्ट", सॅवियोने म्हटले अन आपला बॉलिवूडब्लॉग्सचा इन्व्हिटेशन ईमेलचा प्रिन्टाऊट दाखवला.
त्या बाईने संशयित नजरेन तो वाचला अन "हूज करन हियर?" असं विचारलं.
करणने शाळॆत प्रश्नोत्तराच्या तासाला हात करतात तसा हात उंचावला.
"आय ऍम नॉट टेकींग युअर अटेन्डन्स. पूट दॅट हॅण्ड डाऊन...", तिनं अकडू स्वरात म्हटलं, "... ईफ यू आर करन देन हू आर यू?" असं म्हणत तिने चश्मा थोडा नाकावर सरकावून सॅवियोकडे बघत कडवट स्वरात प्रश्न केला.
"धिस इज माय फ्रेण्ड. सॅवियो रूडॉल्फ. ही इज हीयर विथ मी.", करणने ओळख करवून दिली तसं ती बाई ‘हू केयर्स?’ अशा आवेशात चालू लागली. करण अन सॅवियो दोन मिनिटं तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अन एकमेकांच्या कन्फ्युज्ड चेहेऱ्यांकडे बघत ऊभे राहिले. ती बाई मागे वळली. "डीण्ड आय टेल यू टू फॉलो मी?"
तिनं असं विचारता दोघे लगबगीत तिच्या मागेमागे चालू लागले. सॅवियो तिचा चेहेरा पाहण्याचा प्रयत्न करत असावा. सोलंकी मिसच्या सोबत अकडू वाटणारी ही बया एक चांगलं कॅरीकेचर म्हणून त्याच्या वहीत सहज खपली असती. दोघांना एका क्षणाचीही उसंत न देता ती एका कॉरीडॉरमध्ये शिरली अन एक मागून करण अन सॅवियो तिला फॉलो करू लागले.
"मोना प्लीज टेल मि. सिन्हा टू पोस्पोन द फारूख दारूवाला शो.... जास्मिन टेक धिस ऍण्ड थ्रो इट इन द ड्स्ट्बिन... ऍन अटरली रबिश रीपोर्ट... अर्णव स्टॉप बटरींग लता कपूर... शी मे बी द सोप क्वीन बट आय ऍम द मिडीय़ा एंप्रेस्स ... गॉट इट??"
ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला हातातल्या फायली अन तोंडातले इन्स्ट्रक्शन्स फेकून मारत होती. सगळे निमूटपणे तिला खपवून घेत होते. कॉरीडॉरमधलं हे वादळ शमलं अन एका प्रशस्त केबिनमध्ये बॉस असं लिहिलेल्या एका खुर्चीवर येऊन थांबलं.
"सिट़्ट", तिनं फर्मावलं तसं सॅवियो अन करण भेदरून समोरच्या खुर्च्यांवर बसले.
"आय ऍम सिमा शार्दूल. स्पेशल एक्जेक्युटीव्ह प्रोड्युसर ऑफ सोनी सेट इंडिया मुंबई.", तिनं तिचा चश्मा गळ्यात अडकवला अन दिमाखात ह्या दोघांकडे पाहिलं. फक्त पॅरीसच्या ल्युऎं श्योटीडोन मध्ये मिळणारा तिचा प्लॅटीनम फ्रेम वर्साशे चश्मा अन येताना सगळ्यांवर दाखवलेला तो कॉरीडॉरमधला बॉसी मिजास आता पटत होता.
"ओके", सॅवियो उसनं हसू आणून म्हणाला अन तिचा चेहेरा निरखून पाहू लागला.
नंतर थोडा वेळ शांतताच होती. सगळे एकमेकांची नुसती तोंडंच बघत होते. ‘तुम्ही आमच्या शाळॆतल्या मिसेस शांती सोलंकी ना ओळखता का?’ सॅवियोला हा प्रश्न राहून राहून तिला विचारावासा वाटत होता. कारण सिमा शार्दूलच्या कपाळावरही तेवढ्याच आठ्या पडलेल्या होत्या. तिची चश्म्याआड बघायची स्टईलही तशीच होती.
"अंऽऽऽ", करणने धीर केलाच, "आम्हाला मेनकाला कधी भेटायला मिळेल?", त्याच्या चेहेऱ्यावर अधीरता होती.
"शी इज बिझी नाऊ! इट डिपेण्ड्स ऑन हर इण्टरव्ह्यू. यू हॅव टू वेट", सिमा चेहेऱ्यावरची माशीही हलू न देत म्हणाली.
करण हिरमुसला अन "ओके" बोलून पुन्हा गप्प झाला. सॅवियोचं चेहेरावाचन सुरू होतंच.
सिमा शार्दूलने करणच्या चेहेऱ्यावरची उत्सुकता जाणली होती. पुन्हा तिच्याकडे डॊळे फाडून बघणाऱ्या सॅवियोचा तिला ऊबगही आला होता. शेवटी इरीटेट होऊन तिनं कपिल नावाच्या एका माणसाला फोनवरून बोलावलं. एक बुटका ढापण्या खोलीत शिरला. नुसताच मानवी सांगाड्यावर देवानं उसनं मांस लावून बनवली असेल अशी त्याची जेमतेम शरीरयष्टी होती.
"कपिल दीज बॉयज आर बॉलिवूडब्लॉग विनर्स. दे आर हियर टू मिट मिस मेनका.... व्हाईल शी इस बिझी विथ आवर प्रोग्रॅम, यू टेक देम टू द ऑडियन्स. मेक देम सीट ऑन द बॅक सीट्स. दॅट विल कीप देम बिझी ..." असं म्हणून तिनं कपिलकडे टीपिकल बॉसच्या नजरेनं बघितलं. त्या कपिल नावाच्या दिनदुबळ्यावर ह्या दोघांची जबाबदारी आली होती. तिनं दिलेल्या सूचना नंदी बैलासरख्या मानत ते तिघे जायला तयार झाले. जाता जाता ती पुन्हा सॅवियोकडे थोडे डॊळे वटारतच म्हणाली, "ऍण्ड डोण्ट लेट देम टच एनिथिंग. लास्ट थिंग आय वॉण्ट इज देम टू बी द रीजन फॉर अ ब्रोकन वायर ऑर अ ब्रोकन फायर!!!"
तिच्या ह्या यमकावर कपिल फिदीपिदी हसला अन स्टुडियोच्या दिशेन निघाला. "बॉलिवूडब्लॉग.कॉमची लोकं नुसती कुणाकुणाला बोलवून कामात व्यत्यत आणत असतात. ही साईट बंद केली पाहिजे", कपिल त्रासिक चेहेऱ्याने असं चक्क करण अन सॅवियो च्या समोरच इतरांना सांगत होता. नंतर त्या दोघांना कळले की वेबसाईटकडून कुणीही इथे येणार नव्हतं. ह्या कपिललाच त्यांना मेनकाशी भेट करवून द्यायची होती. म्हणजे ह्या कपिल नावाच्या सांगाड्याशी आता अदबीनं वागावं लागणार होतं. करण अन सॅवियो साळसूदपणे त्याने दाखवलेल्या ऑडियन्समधल्या बॅकसीटवर जाऊन बसले. आता इतक्या मागून समोरचा स्टेज अन त्यावर बसलेली व्यक्ती कोण हे नीट दिसायचा मार्गच नव्हता. शिवाय कॅमेरामन मध्येच ऊभा असल्याने त्या गेस्टचा चेहेराही दिसत नव्हता. करणने कंटाळत डोकं खाजवलं, "आय होप वी मिट मेनका सून.", असं तो सॅवियोकडे बघून म्हणाला. पण सॅवियोकडून काहीच रीप्लाय आला नाही. सॅवियो फक्त तोंड उघडं करून अचंबित भावाने समोरचं दृश्य पाहत होता. त्याने थोडक्यातच करणकडे पाहिलं.
"मेनका!"
सॅवियोच्या तोंडून शब्द पडायचा अवकाश आणि करणने लगेच समोर मान वळवली अन त्या स्टेजवरच्या त्या व्यक्तीसमोरचा कॅमेरामन दूर झाला… करणच्या नयनावनीवर अवतीर्ण झाली ... ती स्वर्गिय अप्सरा ... करणची ड्रिमगर्ल.... येस! मेनका! हो ती मेनकाच होती ... साक्षात मेनका ...
करणची मेनका...
********************
भाग सोळा
चेहेऱ्यावरची नेहेमीची मादकता, बोलता बोलता सौम्य हसण्याची अदा, शक्यतो संभाषण डॊळ्यांनी आटपावं अशी नेत्रसुलभता अन प्रथमच प्रत्यक्षात ऎकण्यात आलेला तिचा लाइव्ह आवाज. तिचा आवाज ऎकून करणच्या कानाला गुदगुल्या होऊ लागल्या. मेनकाचा आवाज करणला काही नवीन नव्हता पण तिचा आजचा असा आवाज वेगळाच भासत होता. कुठल्याही रेकॉर्डींग डिव्हाईसमधून न आलेला... तिचा गोड नैसर्गिक आवाज... त्या आवाजात काहीतरी गूढ असं होतं.... नॉस्टॅल्जिया सारखं... पण ते काय ह्याचा उलगडा होऊ शकला नाही. तोवर टाळ्यांच्या आवाजाने करण भानावर आला आणि पुन्हा त्या मूर्तिमंत सौंदर्याकडे बघत गुंग झाला. कर्ली बटांनी सजवलेले डार्क तांबट केस, किरमीजी रंगाची शिफॉन साडी अन त्यालाच मॅचिंग क्वाटर स्लीव ब्लाउज, हातात ब्लडरेड अर्मानी बॅग अन गळ्यात व्हाइट गोल्डचा डायमन्ड नेकलेस. कानात त्यालाच मॅचिंग इयरींग्स.... सारं स्टायलिंग सतीश मल्होत्राचं वाटत होतं. ह्या सजावटीने सजलेली एक यक्षिकाच जणू त्या हिरव्या कोचवर बसली असावी...
इंग्रजीत म्हणावं तर ‘एंजल’....
डॊळ्यांची बाहुली जेवढी फाकवता येईल तेवढं फाकवून करणने ते रूप आपल्या डॊळ्यांत अन मनात साठवून ठेवलं. घड्याळ्याचे काटे क्षणभर तरी थांबावे अन आपण अधाशासारखा हा आनंद आणखीन पिऊन घ्यावा असं त्याला वाटत होतं. पण बाजूलाच बसलेल्या सॅवियोच्या शिट्यांनी आणि टाळ्य़ांनी त्याची तंद्री भंग पावली.
"डिड यू सी हर देयर. दॅट्स मेनका!", सॅवियोने करणला शिळी माहिती पुरवली.
"येस आय सी हर.... ऍण्ड ओन्ली हर! ...”, भारावलेल्या अवस्थेत करण पुटपुटला…
“मेनका ... माय गॉडेस्स.... तिचा आवाज... इट्स सो मॅजिकल...", तिचा हवाहवासा वाटणारा तो आवाज मात्र करणला जास्त वेळ ऎकता आला नाही. व्हीजे सागरने स्वतःची चपडचपड सुरू केली. करणला पटकन त्याचा रागच आला.
"सो टेल मी मेनका एवढी मोठी आयकॉन आहेस ... कसं वाटतं?", सागर.
"इट्स टू फ्लॅटरींग! अगदी स्वप्नासारखं वाटतं...", मेनका.
"बट हाऊ डू यू कोप विथ सच ऍन अडमायरेशन? जेव्हा घरी जातेस आणि पुन्हा मेनका जोशी होतेस ... फक्त स्वतःची मेनका... तेव्हा कसं वाटतं?", सागर.
"वेगळंच... स्वप्नातून सत्यात आल्यासारखं... म्हणजे रीयालिटी चेक असतो तो... जसं मी लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करेन का? ... त्यांचं प्रेम असंच मिळत राहील का? एक्सेट्रा... ", मेनका.
"बट इट सीम्स यू आर डूईंग सो वेल. तुझा मागला चित्रपट ‘प्यार का साथ’च बघ. इट्स अ ब्लॉकबस्टर! आता ‘इधर उधर’ची धूम आहे सगळीकडे. सी यू आर डूईंग सो ग्रेट. देन व्हाय सो स्केयर्ड?", सागर.
"इट्स जस्ट अ लिट़्टल फियर यू हॅव इन अ कॉर्नर ऑफ युअर माईण्ड. शेवटी माणूसच आहे ना मी... इन्सिक्युरीटीज सर्वांनाच असतात...", मेनका.
"वी ऑल नो यू विल कंटिन्यू टू रॉक! आस्क युअर फॅन्स.", असं म्हणून सागरने लोकांकडे होकारर्थी नजर फिरवली अन सगळे "येऽऽए" म्हणून चियर करू लागले, त्यांच्याकडून आलेल्या चियर्सनी आनंदित सागरने "वी फॅन्स वॉन्ट टू एंजॉय मोअर ऑफ युअर फिल्म्स... मोअर ऑफ युअर डांसेस... मोअर ऑफ युअर फिगर...", असं म्हटलं अन तोंडभर हसत ऑडियन्सकडे पाहिलं. स्टेजच्या वर लाईमलाइटच्या आडून असलेली एक टिव्ही स्क्रीन ‘अप्लॉज’ च्या मोठ्या अक्षरांनी झळकली.
सगळे टाळ्य़ा वाजवू लागले. करणला मात्र अशा इन्डिसेन्ट कॉम्लिमेण्टला टाळ्य़ा का वाजवायच्या हा प्रश्न पडला. तो थोड्या रागवलेल्या चेहेऱ्याने सागरकडे बघत होता. मेनकाच्या चेहेऱ्यावरही तसेच कडू भाव असावते. फक्त तिने शिष्टाचारपायी राग गिळून टाकला होता.
मग रॅपिड फायर सुरू झालं...
"तुझा फेवरीट कलर", सागर
"ब्लॅक!", करण मेनकाच्या आधीच पुटपुटला. मेनकाकडूनही ‘ब्लॅक’ हेच उत्तर आलं अन सॅवियोने कौतुकाने करणकडे पाहिले.
"युअर फेवरिट पेट?",
"पॅर्रट!", करण
"युअर फेवरिट पासटाईम"
"पेंटींग!", करणच
"युअर स्टॅन्ड ऑन इनफिडलिटी!", सागरच्या ह्या प्रश्नावर करण थोडा चुकचुकला. पण ‘प्यार का साथ’ ला अनुसुरूनच हा प्रश्न असावा. त्यातल्या स्टोरीनुसार अनुजकुमार अन मालविका अफेयर करतात अन साध्याभोळ्या मेनकाला फसवतात. पण शेवटी मेनकाच्या सच्च्या प्रेमापुढे अनुजकुमार हार पत्करतो. अन मालविका त्यांच्या आयुष्यातून निघून जाते. पण शेवटी कुलदीपसिंग सगळ्यांवर गोळ्या झाडतो. अन दोघे मरतात....
इथं करणने डॊळे टिपले होते...
"प्रत्येकाचा स्टॅन्ड वेगळा असू शकतो.", मेनकाने थोडक्यात उत्तर दिले.
"बट विल यू अण्डरस्टॅण्ड इफ समवन यू लव्ह चीट्स ऑन यू?", सागर ने थोडं आणखीन खोदलं.
मेनकाने पॉज घेतला. करणला झटकन कुठेतरी मनात ब्लॅकवल्चर अन त्याची स्टोरी आठवली पण आली तशीच करणने ती मनातून झाडून टाकली. अशा आनंदाच्या क्षणी ब्लॅकवल्चरला त्याच्या मनात काहीच स्थान नव्हतं. करण उत्सुकतेने मेनकाच्या उत्तराची वाट पाहू लागला.
"आय वुड फर्गिव हिम.", मेनकाने उत्तर दिलं.
लोकं थोडी कुजबुजली. समोरचा इन्स्ट्रक्श्न टिव्ही ‘सायलेन्स!’च्या अक्षरांनी झळकला. सगळे गप्प बसले. हे उत्तर जरा कृत्रिम वाटत होतं. थोडा ऑकवर्डनेस वाटल्याने मग सागरने आणखीन काही लल्लू प्रश्न विचारले अन रॅपिड फायर संपवला. नंतरच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं करणला ठाऊक होती.
आत्ता ऑडियन्सची बारी होती. प्रेक्षकांमधल्या १० जणांना अवसर देण्यात येणार होता. सगळ्या पंचवीस लोकांनी हात वर केले. करणनेही सोलंकी मिसच्या विचारलेल्या प्रश्नाला इतरांपेक्षा उंचावून करतात तसा हात वर केला. सॅवियोनेही हात वर केला होता पण तो उगीचच.
एका मागून एक हात टिपले जात होते अन लोकं प्रश्न विचारत होते. करणच्या दृष्टीने बरेचसे प्रश्न स्टुपिड होते. एका मुलीने तर ‘अनुजच्या बम्ब्सवर खरंच तीळ आहे का?’ असा ऑब्सीन प्रश्नही विचारला. आता हा प्रश्न प्रोग्रॅमच्या टेलिकास्टमधून नक्कीच गाळण्यात येणार होता पण त्या प्रश्नाने मेनकाची अन इतरांची करमणूक झाली तेवढीच.
दहाव्या माणसासाठी सागर उठून सिटिंग ऍलीत आला. त्याने एक हात पाहिला अन त्या व्यक्तीकडे बोट केलं. प्लॅशलाइट फाकली गेली अन करणचे डोळे दिपले. एक क्षण त्याने मागे वळून पाहिलं.... पण तो तर सर्वात शेवटच्या बॅकसीट वर होता ...
"म्हणजे मी???"
... आपण मेनकाशी बोलणार हा विचारच बोबडी वळवणारा होता... आपण सिलेक्ट झालोय हे ओळखण्यातच करणला काही सेकंद गेले. मेनकाशी थेट बोलायची ही आयुष्यातली पहिली संधी. पाय लटपटू लागले होते. तरी करण कसाबसा सावरून उठला. त्याने स्पॉटलाईट्ने दिपलेल्या त्याच्या डॊळ्यांवर हात करून मेनकाला कसंतरी अवसान आणून ‘हाय’ केलं. समोर माईक असल्याने त्याचा मुळूमुळू आवाज मेनकापर्यंत पोहोचला. तिनेही मग ‘हाय’ केलं.
"युअर क्वेश्चन प्लीज!", सागर करणला म्हणाला.
करणने धीर एकवटवून विचारले, "मी ह्या फिल्मफेयर मध्ये वाचलेलं की तुम्हाला एवढी मोठी स्टार झाल्याचे रीग्रेटस आहे... इज इट ट्रू?"
करणच्या ह्या प्रश्नावर मेनका थोडी बावरली. तिनं दोन मिनिटं करणला नीट निरखून पाहिलं. करणनेही तिच्या डॊळ्यात डॊळे घालून पाहिलं अन दोघांची क्षणिक नजरभेट झाली.
"रीग्रेट्स? नो. ऍबसोल्यूटली नॉट? आणि तू कुठल्या फिल्मफेयर मध्ये वाचलंस?", पलिकडून उत्तर आलं.
"ते यंदाच्या फिल्मफेयरमध्ये?", करण बावरून बोलला... त्याने असंच वाचलं होतं... त्याच्या लख्ख स्मरणात होतं.
"आर यू शुअर?", मेनका म्हणाली, "जेवढं मला ठाऊक आहे त्यानुसार असं काहीही त्या इण्टरव्ह्यू मध्ये छापून आलेलं नाही."
"बट ..."
"दॅट्स इनफ. ओन्ली वन क्वेश्चन पर पर्सन.", सागरने करणच्या हातून माईक घ्यायचा प्रयत्न केला तसं मेनकाने सागरला खूण करत थांबवलं.
"लुक्स लाईक यू फेल फॉर सम पापराझ्झी स्टन्ट. नो रीग्रेट्स, ऍट ऑल. आय ऍम हॅप्पी.", मेनकानं हसून दाखवलं, "वेरी हॅप्पी"....
... अगदी खोटं हसून.
करण ने मनात स्वतःला प्रश्न केला, ‘पण तो इण्टरव्ह्यू, पूजाने सांगितल्याप्रमाणे तो कॅन्सर, गौतम अंकलशी लग्नाचा नकार, कधीही आई न होण्याची स्थिती ... एवढं असूनही नो रीग्रेट्स! इट सीम्स सो रॉन्ग!’ करणला तिच्या हसण्यातला कृत्रिमपणा आणखीनच जाणवला. तो खिन्न मनाने खाली बसला.
करणच्या हातातला माईक सागरने घेतला अन स्टेज वर येऊन "दॅट्द ऑल वी हॅव फोक्स! लेडीज ऍण्ड जेन्टलमन धिस वॉज ‘द’ मेनका फॉर यू...", सागर ने आपल्या नेहेमीच्या शैलीत इन्टरव्ह्यू संपल्याची घोषणा केली अन इन्स्ट्रक्षन टिव्ही ‘लाऊड अप्लॉज’ ची सूचना दाखवू लागला. सगळी पब्लिक उठली अन टाळ्यांच्या कडकडाटाने सगळा स्टुडियो दुमदुमून गेला. कॅमेरामननी पुन्हा मेनकाला घेरलं.
करण अन मेनकाची नजरभेट तुटली. तिच्या जीवनातलं औदासिन्य तिनं त्या डॊळ्यांत ठार लपवून ठेवलेलं करणला दिसलेलं. पण तिथेही फिल्मी स्टार मेनका त्या साध्या मेनका जोशीपेक्षा वरचढ ठरली होती. खोटेपणाचा बुरखा निघत नव्हता.
इण्टरव्ह्यू संपला अन सॅवियो आणि करणला कपिलने त्याच्या सोबत यायची खूण केली. आता मेनकाला खाजगीत भेटायची ही संधी. करण उत्साहित तर होताच. अन नवा एक्सबॉक्स ३६० घेण्यास सॅवियो दुप्पट उत्साहित. त्यामुळे कपिलचे बोलावणं येताच काहीही वेळ न दवडता दोघेही त्याच्या मागोमाग चालू लागले.
एका बंद केबिनकडे त्यांना घेऊन कपिल आला अन थांबून म्हणाला, "ही मेनकाजीची रूम आहे. आत मेनकाजी थोडा वेळ ब्रेक घेत आहेत. कधीही आतून बोलावणं येईल. पण त्याआधी काही गोष्टी क्लियर करून घ्या. एक.... मेनका नाही मेनकाजी म्हणायचं. मॅम म्हटलं तरी चालेल... दोन.... हातावर, छातीवर किंवा कपाळावर ऑटोग्राफ मागायचा नाही... तीन... गाणी गाऊन, डान्स करून किंवा वेडेवाकडे चाळे करून दाखवायचे नाहीत... चार... इंग्रजी येत असेल तरच बोला. उगीच स्वतःच्या अकलेचे दिवाळे काढायची गरज नाही... पाच... दोन मिनिटात आटपा. मी वेबसाइटसाठी गिफ्ट घेताना तुमचा एक फोटो काढेन. फोटो काढताना मेनकाजीपासून दोन फूट दूर उभं रहायचं. बिहेव प्रॉपर्ली, डोन्ट स्टेयर ऍट हर... ", इथे कपिल ओशाळला...
"... यू नो... ब्रेस्ट्स …” … ओशाळलेली त्याची अवस्था तशीच होती…
“ऍण्ड फायनली ... रूल नंबर सिक्स... नो फार्टीन्ग!"
सॅवियोला हसू फुटले. शाळेत लेडी डेप्युटी किंवा ट्रस्टींचं इन्स्पेक्शन होण्याच्या आधी हेच इन्स्ट्रक्शन्स मिळत. त्यामुळे इथेही तिच सिस्टीम पाहून थोडं नवल वाटलंच. तिघे त्या केबिनच्या बाहेर जवळजवळ पाच सहा मिनिटं मूक उभे होते. करणला ती पाच मिनिटं पाच युगं गेल्यासारखी वाटली. सॅवियोचीही तिच हालत असावी. घरी नेल्यावर एक्स्बॉक्स चालावा असं तो जिजसला मनातल्या मनात प्रे करत असावा. पाच युगांच्या त्या तपश्चर्येनंतर ती ताटी उघडली आणि मानेपर्यंत केस विखुरलेला, आयुष्यात कधीही दाढी न केलेला, केसांवर फणी न फिरवलेला एक हिमालयीन साधु शर्ट पॅन्ट मध्ये असावा असा कुणीतरी माणूस बाहेर आला. त्याचे नाव संपतभाई होते. कपिलने त्याला मेनकाविषयी विचारले. तेव्हा कळले की तो मेनकाजीचा हेयरड्रेसर होता.
"आओ मैडम अंदर बुला रहीं है।", त्याने तिघांना आत बोलावले. करणचं हृदय काम करायचं थांबलं.
आत ती कमनिय मूर्ती एका खुर्चीवर विराजमान होती. तिघांकडे बघून तिनं "हॅलो" केलं. खोलीत प्रकाश अगदी जास्त होता. हा दिव्याचा परिणाम की मेनकाच्या नितळ कातडीचा? करण स्वतःलाच प्रश्न पुसू लागला. कपिलने पुढेपुढे केले अन तिथं येण्याचं प्रयोजन सांगितलं.
"ओह! सो यू मेड माय फॅन साइट! दॅट इज रीयली स्वीट" , मेनकाने करणकडे बघून अन छानसं हसून कॉम्पिमेण्ट दिली. करण विरघळला. साक्षात मेनका त्याला ‘स्वीट’ म्हणाली होती.
"सो यू वोन द कॉम्पिटीशन?", तिचा हा प्रश्न पूर्ण होऊ न देतच करणने उत्तर दिले, "नो मॅम सेकन्ड प्राईझ...", मग करणला पूर्ण न हॊऊ देत सॅवियोने आगाऊपण केला, "सेकण्ड बिकॉज हीज हॅण्ड वॉज ब्रोकन. नाहीतर त्याला फर्स्ट प्राईझ मिळालं असतं!".
"ओह! इज इट? म्हणजे तू माझा बिगेस्ट फॅन आहेस तर?", मेनकाने विचारलेल्या ह्या प्रश्नाने करण लाजला. पण मेनकाने अप्रिशीयट केल्याने मनात कुठेतरी त्याची कॉलर ताठ झालीच. पाय जमिनीवर एक फीट वर उचलले गेले.
"दॅट्स सो नाईस ऑफ यू. लेट मी सि व्हॉट इज युअर नेम... अम्मं... करण ... करण रूपवते? रूपवते? म्हणजे मराठी?", तिनं थोडक्यात विचारलं.
तिचा आवाज करणच्या कानावर पडत होता खरा पण करणची आकलन शक्ती कुठेतरी गुल्ल झाली होती. सॅवियोने करणला भानावर आणलं... "तू मराठी आहेस का ते विचारतेय...", सॅवियो पुटपुटला.
करणने कपिलकडे पाहिलं. रूल नं. ४ ब्रेक होत होता पण कपिल ‘बोल आता मराठीत’ म्हणून खूण करीत असावा.
"हो. मी मराठीच.", करण म्हणाला.
"कुठे राहतोस करण?", तिनं विचारलं. तिच्या तोंडून उद्गरलेला ‘करण’ अगदी पूजाच्या तोडीचा होता अन ते मराठी स्कूलमधल्या मराठीच्या जोशी मॅमसारखं अस्खलित होतं. करणला अचानक तिचं खूप कौतुक वाटू लागलं. आधी इण्टरव्ह्यूमध्ये करणने विचारलेल्या त्या सेन्टिमेन्टल प्रश्नाचा रागही मेनकाला आला नव्ह्ता. ती अगदी प्रोफेशनल होती.
"अंऽऽऽऽ .... अंधेरी.... सात बंगला..."
"घरी कोण कोण आहे?"
"मी, मोठा भाऊ आणि आई. आम्ही तिघेच."
"ओके. गुड!", तिनं करणकडे चिकित्सक नजरेनं पाहिलं. दोन मिनिटं करणही थोडा घाबरलाच. पण मग मेनका हसली. करणची शाळा अन इयत्ता विचारून झाली. करणने जमेल तितकं डोकं ताळ्यावर ठेवून उत्तरं दिली. खुद्द मेनका समोर असताना डोकं, मन, हृदय आणि जीभ यांचा ताळमेळ ठेवणं करणसाठी मुश्किलच काम…
... हे म्हणजे पूजाला डायरेक्ट ‘लग्नाची मागणी’ घातल्यासारखं होतं...
मेनकाशी एवढं बोलल्यावर करणच्या डोक्यावर साचलेलं चिंतेचं मळभ दूर झालं. प्रत्येक वाक्यासहित असणारं तिचं हसणंही करणला त्यात मदत करत होतं.
... इट वॉज सच अ प्रेशियस स्माईल...
... अगदी ‘एंजल स्माईल!’
"मॅडम!", मेनका अन करणच्या ह्या संभाषणात कपिल कबाब में हड्डी बनून आला.
"वी नीड टू डू द प्राईझ डिस्ट्रिब्युशन सेरेमनी."
"वेल ओके.", तिनं करणने पुढे केलेले ऑटोग्राफ बुक्स साईन करत म्हटले, सॅवियोनेही त्याची वही पुढे केली. मम्मी, ग्रॅनी, क्रिस्टलच्या नावाने असे ऑटोग्राफ्स साईन केल्यावर मग प्राईझ सेरेमनी आटोपला. करण अन मेनकाचा प्राईझ घेतानाचा फोटो कपिलने करणच्या मोबाईलने काढला ...
... फक्त त्या दोघांचा फोटॊ...
... हा करणच्या आयुष्यातला आणखी एक मैलाचा दगड. त्याचा अन मेनकाचा प्रायवेट फोटो. मेनकाशी बोलून, तिच्या हातून बक्षिस घेऊन अन तिच्या सोबत फोटो काढून आज करणला आकाश ठेंगणं झाल्यासारखं वाटत होतं. तो हवेत उडत होता. आज समीरने मेनकाला कितीही शिव्या दिल्या असत्या तरी करणने त्याला गालावर किस्स करून ‘लव्ह्यू’ म्हटलं असतं!
मिटींग आटोपली अन सगळे सोपस्कार निर्विघ्न पार पडले... करणला मेनका भेटली तर सॅवियोला एक्सबॉक्स… सॅवियोच्या नकळत ’लव्ह रूडॉल्फ’चा एक प्रायवेट ऑटोग्राफ करणने अंकलच्या विजिटींग कार्डावर घेतलाच.. खुद्द कपिलसाठीही मिटींग बरी झालेली होती... आत कुणी ब्रेकडांस केला नव्हता की गाणी म्हटली नव्हती... मेनकाने त्या सगळ्यांना निरोप दिला अन तिघे तिच्या केबिनच्या बाहेर पडले...
त्यानंतर सिमा शार्दूल, व्हिजे सागर, फारश्या फेमस नसल्या तरी काही जाहिरातीत दिसलेल्या दोन तीन फिमेल मॉडेल्स, स्टार सुमीत सिन्हाची ड्युपिकेट असलेला एक स्पॉटबॉय अशा काही जणांचा मोबाईलवर फोटॊ काढून सॅवियोने शाळेत मिजास मारायला चांगलंच मटिरीयल आपल्यापाशी जमवलं. इकडचं काम आटोपल्यावर मग दोघे परतीला निघाले. सॅवियोने टॅक्सी केली नाही. उगीच हातातले पैसे का संपवायचे? त्यापेक्षा दोघे बस-ट्रेननेच शाळॆत गेले.
बस भरलेली होती अन ट्रेन लेट होती..
रस्त्यांवर खड्डे लागत होते अन ट्रेनमध्ये धक्के लागत होते...
कुठेतरी धूळ उडत होती...
कुठेतरी एखादं पोर भसाड्या आवाजात रडत होतं...
कसलातरी कुबट वास पसरला होता...
कुणाचातरी धक्का लागत होता...
कुठेतरी सॅवियो एक्सबॉक्सला त्याच्या छातीशी कवटाळून उभा होता...
अन कोणीतरी त्याचा नकळत खिसा कापत होतं...
... पण ह्या सांसारिक गोष्टींशी करणला काहीच देणघेणं नसावं...
... कारण तिथून निघाल्यापासूनच तो हवेत तरंगत होता ...
... त्याचं मन जणू मेनकाच्या चिंतनात विहरत होतं ....
... मुक्त ...
... विशुद्ध ...
... उदात्त ...
*******************
भाग सतरा
"ओह माय गॉड! इज दॅट मेनका? इज इट रीयल? आर यू सिरीयस?", सॅवियोच्या भोवती मुलांचं कोंडाळं जमलं होतं, "इज इट रीयली मेनका? द फिल्म ऍक्ट्रेस्स मेनका?"
करणच्या मोबाईलवर काढलेला तो फोटो अन त्यातली करणला प्राईझ देत असलेली मेनका, चक्क पंधरा मिनिटं करणशी गप्पा मारलेली मेनका, करणला स्वीट म्हणणारी मेनका... हे बाकी सगळ्यांसाठी खरं असणं शक्यच नव्हतं... पण स्वतः करणचा यावर जिथे विश्वास बसला नव्हता तिथं इतरांची काय कथा? करणसोबत सॅवियोलाही मुलींकडून बराच भाव मिळाला होता. त्याने त्याच्या फोटोंतला तो ड्युप्लिकेट स्पॉटबॉय खुद्द अनुज म्हणून त्या मुलींकडे खपवला असावा. आपल्या विजयश्रीने भारवलेले दोघे आज शाळेत अगदी लाईमलाईट मध्ये आले होते. स्वतः मिश्रा सर, समांथा मिस आणि खुद्द प्रिन्सिपल निलिमाही त्यांना भेटून गेल्या होत्या. शाळेच्या ऍन्युअल मॅगझिनमधल्या हॉल ऑफ द फेममध्ये मेनकाबरोबरचा करणचा हा फोटो अगदी पहिल्या पानावर पक्का होता. निलिमा सिस्टरनी तो करणकडून कॉपी करून मागितला होता.
रीसेस्समध्येही गर्दी तशीच जमलेली होती. इतर क्लासेसमधून मुलं करणला भेटायला आली होती. अगदी सिनियर स्टॅण्डर्डमधूनही. शेवटी सॅवियोने सिक्युरीटीची भूमिका घेत कसंतरी करणच्या भोवती जमलेल्या टप्पूंना पांगवले. आजच्या प्रकारात सॅवियोला सुद्धा भलतंच महत्त्वं प्राप्त झालं होतं.
"काय मग मेनका भेटलीच तुला शेवटी?", पूजा म्हणाली. आज बऱ्याच दिवसांनी पूजाच्या तोंडून एक पूर्ण वाक्य बाहेर पडलं होतं, "कशी दिसते रे रीयल मध्ये? फोटॊत आहे अशीच दिसते की यू नो... ओके ओके सॉर्ट..."
"एंजल!", करणच्या तोंडून हा शब्द कसाबसा बाहेर पडला अन तो पुन्हा फोटॊ बघत हुरळून गेला....
"अल्सर्स कमी झालेत वाटतं", सॅवियोने विचारले तसे पूजा होकारार्थी चेहेऱ्याने म्हणाली, "दोन दिवसांपासून बोलायची प्रॅक्टीस करत होते. आज जमलंच."
"हम्म!", सॅवियोने थम्ब्स अप करून ‘वेलकम बॅक’चं वीश केलं.
ह्या साऱ्या संभाषणातून करण पुन्हा तुटलेलाच होता. करणकडे पाहत पूजाने सॅवियोला खुणेनेच ‘व्हॉट्स अप विथ हिम?’ असं विचारलं. त्यावर सॅवियोने ख्राईस्ट्चं ‘नो होप्स’ चं क्रॉस जेश्चर केलं.
"करण! ... कऽरऽण", पूजाने साद घातली तसं करण भानावर आला, "कुठे हरवलायस?"
"अं? काही नाही.", करणने कौतुकाने मेनकाचा फोटॊ पुन्हा पाहिला, "यू नो...", तो पूजाला म्हणाला, "मेनका मराठी किती छान बोलते. अगदी गौतम अंकल सारखं..."
"खरंच!", पूजाने विचारलं
"हो... आणि तिची स्कीन इतकी वायब्रण्ट आहे की लाईट लावायचीही गरज नाही...", करणने पुढे म्हटले.
आता टेपा मारयला सुरूवात झालीय हे पूजाने जाणलं. तिने करणला मध्येच थांबवलं...
"मेनकाला झालं ना भेटून? छान! आता पार्थिव सृष्टीत ये. रीसेस्सनंतर क्लास टेस्ट होणारेय. लक्षात आहे ना?"
"काय?", पूजाच्या ह्या वक्तव्यावर करणपेक्षा सॅवियोच जास्त बावरलेला दिसला, "हे कधी सांगितलं?", त्याने भेदरून विचारले.
"कालच. सोलंकी मॅम म्हणालेल्या.", पूजाने माहिती पुरवली तसं सोलंकी मॅमच्या लेक्चरला आपण पट़्टी खाऊन बसलेलो आणि दुखद हातांनी तिचं कार्टून काढत होतो हेच सॅवियोला आठवत होतं. टेस्ट विषयी सांगितलेलं काही आठवतंच नव्हतं.
"करण हेल्प मी!", सॅवियोने करणला बावरलेल्या स्वरात रीक्वेस्ट केली.
"ओके. डोण्ट वर्री.", टेस्टच्या विषयाने एव्हाना पूर्णपणे भानावर आलेल्या करणने सॅवियोला आश्वस्त करत म्हटले. "माझ्या सोबत बस. आय विल हेल्प यू."
सॅवियोचा जीव पुन्हा भांड्यात पडला. पण मनात कुठेतरी करणलाही टेस्टबद्दल थोडी भिती वाटत होतीच. गेल्या काही दिवसांपासून मेनकाप्रकरणात गुंतलेल्या करणने क्लासवर्क आणि होमवर्क नीट केला नव्हता. म्हणून नक्की कुठल्या टॉपिकवर टेस्ट होणार आहे हे कळलं नव्हतं. शिवाय टेस्ट मॅथ्स की सायन्सची हेही ठऊक नव्हतं. त्यामुळे भिती थोडी जास्तच होती.
टेस्टच्या आधी करणने दानिशला गाठलेच आणि त्या फिलम्फेयरमधल्या मेनकाच्या इण्टरव्ह्यू विषयी विचारलं. तेव्हा त्याला कळलं की करणला मिळालेली ती कॉपी ड्राफ्ट होती. कदाचित तो पर्सनल इण्टरव्ह्यू नंतर एडीट करण्यात आला असावा. सेलिब्रिटींना वैयक्तिक भावना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपून ठेवाव्या लागतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं होतं. त्याच विचारांत टेस्ट झाली अन वाटल्याप्रमाणे करणला थोडी जडही गेली. टेस्टच्या शेवटी सॅवियोने आपले पाणवलेले डोळे त्याच क्वेश्चन पेपरने पुसले. सोलंकीमिसने त्याला करणपासून दूर अगदी पुढ्यात बसवलेलं होतं. शाळा सुटल्यावर सगळे निमूटपणे घरी निघून गेले. आजचा शालेय दिवस करण अन सॅवियोसाठी बिझी गेला होता. सकाळचं अप्रिशियशन अन दुपारची ती टफ मॅथ्स टेस्ट. त्यामुळे इवेन्टफूल अशा आजच्या दिवसातला क्षण अन क्षण करणला थकवून गेला होता. पण ह्याने करणला विशेष फरक पडत नव्हता. कारण आज तो खुद्द मेनकाला भेटला होता... तिच्याशी बोलला होता... तिच्यासोबत राहिला होता… हा मेनकाभेटीचा युफोरीया महिनोन्महिने टिकेल असा होता.
करण घरी पोहोचला अन लॅच उघडून बघितलं तर दार आतून लॉक झाल्याचं कळलं. गोंधळून त्याने बेल वाजवली. कुणीतरी दार उघडलं.
"आई?", करण आनंदित झाला, "अगं कधी आलीस?"
"आम्ही सकाळीच आलो. तो जस्ट निघाला असशील. तुला मोबाईलवर फोन करत होतो पण तो स्विच्ड ऑफ होता वाटतं..."
"अरे हो!" करणला आठवलं की सकाळी स्टुडियोत मोबाईल ऑफ करून ठेवा म्हणून सांगितलेलं. शिवाय दुपारी तो टेस्ट पेपर. तेव्हाही शाळेत मोबाईल ऑफच राहिला. "हो गं सारा दिवस बिझी होतो ना म्हणून बंद करून ठेवला होता. बाय द वे समीर कुठंय?"
"तो गेलाय सकाळपासूनच", आई हसली, "एवढे दिवस टेन्शनमध्ये होता. मग शेविंग नाही, केसाना पाणी नाही. सलॉनमध्ये जायचं म्हणत होता. तिथून मनोहर मामांच्या ऑफिसात जाईन असंही म्हणाला. सकाळपासूनच गायब आहे."
"ओके. बाकी मामा आहेत ना बरे? कुसुम मामी, श्रिया?"
"हो.", आईने अगदी मोकळेपणाने म्हटले, "एका क्षणी तर आम्ही सर्वांनी आशाच सोडली होती. पण देवाची कृपा झाली अन सगळं ठिक झालं. डॉक्टर म्हणालेत की एक दोन दिवस अजून हॉस्पिटलात राहावं लागणार. पण सगळं ठिक आहे. ही हमी मिळाल्यावरच तर मी आणि समीर आज येऊ शकलो. ह्या विकेण्डला जायचंय पुन्हा. तू ये तेव्हा."
"हो. नक्की."
आई हसली, "बरं, तू नीट राहिलास ना? हाताचं काय?"
"हात एकदम फर्स्ट क्लास. हा बघ.", असं म्हणून करणने मिश्किलीत त्याचा रोबोट ब्रेकडांस करवून दाखवला. "रूडॉल्फ अंकलनी बरीच मदत केली. त्यांच्यामुळेच तर आम्ही आज प्राईझ सेरेमनीलाही जाऊ शकलॊ.... ओह आय फरगॉट ... ‘हो’म्हटल्याबद्दल थॅन्क्स! आय वॉज सो वर्रीड. तू मला जाऊ देशील की नाही."
"प्राईझ सेरेमनी?"
"अगं मी तो तुला एसेमेस पाठवलेला ना? तो प्राईझ सेरेमनीचा. त्याला रीप्लाय करून हो म्हटल्याबद्दल थॅन्क्स. आज प्राईझ सेरेमनी झाला. फोटॊ पण काढलाय. हा बघ."
"फोटॊ!....", आईचं चकित होऊन फोटॊ बघणार होती तोच दारावर बेल वाजली. आईने दार उघडले. समोर सोसायटीचा वॉचमन बहाद्दर एक फुलांचा बुके हातात घेऊन ऊभा होता.
"मैडम, ओ नीजे एक छोकरा आके ये फुलका टोकरी देके गिया. नाम बोलताये करणशाब के लिये."
आई आणि करण दोघे गोंधळले.
"करणके लिये?", आईने चकित होऊन विचारलं.
"हा वोई नाम भी लिगा ए देखो.", असं म्हणून बहाद्दरने कार्ड दाखवलं. त्यावर करणचं नाव होतं. "टू करण रूपवते"!
आई गोंधळलेल्या चेहेऱ्यानेच बुके घेतला. करणही कन्फ्युज्ड होताच.
"कुणी पाठवला असेल?", करणने विचारलं तसं आईही तोच विचार करत होती.
करणने बुके चाचपडून पाहिला. एके ठिकाणी बेस्ट विशेसचं कार्ड मिळालं.
"फ्रॉम युअर ओल्ड फ्रेण्ड! ... ब्लॅकवल्चर!"
करणच्या पोटात धस्स झालं.... त्यानं मजकुर वाचला... "वांझोटीला भेटलास? दिसली तिच्यातली स्वार्थी स्त्री? काय म्हणाली.... ‘नो रीग्रेट्स! नो रीग्रेट्स ऍट ऑल!’... हह्ह! तेच म्हणणार ती... आयुष्यातलं दुःख इतरांना दाखवून काय तिला तिचं स्टेटस कमी करायचंय... आपली व्यथा लपवत असे किती दिवस घालवणारय ती... तिलाही माहितिये की तिचा काळ जवळ आलाय... तिला ह्या साऱ्या प्रपंचातून सोडवणारा फक्त एकच माणूस आहे... आणि तो आहे मी... तुझ्यासारखे तिचे बेस्ट फॅन्स माझं काही करू शकणार नाहीत ... इट्स अ लास्ट वॉर्निंग टू ऑल ऑफ यू... शेवटची सूचना तुला ...
... तिच्या आगाऊ मृत्युची... "
"ओह माय गॉड!", करणच्या तोंडून अस्फुटीत शब्द बाहेर पडला... "मेनकाचा मर्डर?" करणच्या हॄदयाची धडधड साऱ्या अंगावर काट्याने सरसरली. तो पुढचं काहीच वाचू शकला नाही. त्याच्या थरथरणाऱ्या हातांतून ते कार्ड खाली पडलं. त्याने आईकडे कसंबसं डॊळ्यांनी पाहिलं. आईला काहीच कळत नव्हते. तिने ते कार्ड उचलं अन वाचलं. ती करणकडे प्रश्नार्थक चेहेऱ्यानं पाहू लागली. करणचे डोळे भितीने पांढरे झाले होते… "आई, अगं मेनका..."
"काय? मेनकाचं काय?", आईने विचारले
"तिचा जीव धोक्यात आहे. कुणीतरी तिला मारायच्या तयारीत आहे..."
"काय?", आईला करणच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. ती गोंधळून ते कार्ड पुन्हा पुन्हा वाचत होती.
"हो हे बघ ... ", करणने विशकार्ड पुढ्यात धरलं, "इथे धमकी दिलीय. तिच्या आगाऊ मृत्यूची."
"अरे पण तुला कसं ...", आईला काहीच कळत नव्हतं, "... हे मेनकाबद्दल लिहिलंय़ असं तुला कसं समजलं? मेनकाचा उल्ले़ख कुठेच नाहीये ह्यात ..."
"हे काय त्याने तिने म्हटलेले शब्द ‘नो रीग्रेट्स...’ रीपिट केलेत.", पटकन करणला काहीतरी उमगलं, "... ओह माय गॉड!....", करणचं तोंड उघडंच राहिलं होतं, "... ती मुलाखत अजून ब्रॉडकास्ट झाली नाहीय... ह्याचा अर्थ तो तिथंच त्या ऑडियन्समध्ये होता?... त्याच स्टुडियोत... माझ्या सोबत! ... जस्ट नियर मी ... वॉचिंग मेनका! ...धिस इज अनबिल्हिवेबल... "
"करण अरे काय म्हणतोयस तू?" आईला काहीच कळत नव्हतं....
"हो आई अगं मी होतो ना तिकडे मेनकाच्या लाईव्ह इण्टरव्ह्यूत, तिथेच ब्लॅक्वल्चरही होता. मी नंतर तिच्या हातून प्राईझ पण घेतलेलं.... पण त्याधी स्टुडियोतली ऑडियन्स पांगली होती... त्या इण्टरव्ह्यूतच तर तिनं हे ‘नो रीग्रेट्स!’ शब्द म्हटलेले... म्हणजे ब्लॅकवल्चर पण त्या ऑडियन्स्मध्येच असावा.", करणने आपल्या तंद्रीतच स्पष्टीकरण केलं... आईने आ वासला होता....
"धिस इस नॉट डन! आय रीयली हॅव टू डू समथिंग...", करण चवताळून म्हणाला, "त्या ब्लॅकवल्चरला मी असं काहीही करू देणार नाही. त्याने आधीच खूप त्रास दिलाय मेनकाला... मीही खूप सहन केलं त्याचं अब्युज... नाऊ इट्स इनफ ... ही हॅस टू पे...." , करणचे डॊळे रागाने लाल झाले होते. ह्या ब्लॅकवल्चरला धडा शिकवायचा असा दृढनिश्चय करून करण घराबाहेर पडला....
"अरे पण करण...."
... आई काही विचारणार त्याच्या आधीच करणने सायकल सॅवियोच्या घराकडे हाकली होती...
********************
(पुढील भाग ... http://www.misalpav.com/node/18887)
प्रतिक्रिया
19 Aug 2011 - 3:05 pm | गणेशा
अप्रतिम कथा आहे ही..
एकदम खिळवुन ठेवणारे शब्द ...
वातावरण निर्मिती एकदम छान ...
मस्त वातावारण निर्मिती,..
असेच लिहित रहा... वाचत आहे...
19 Aug 2011 - 3:07 pm | धनुअमिता
अप्रतिम हा ही भाग .
अप्रतिम वाटते आहे वाचायला.
पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन.
19 Aug 2011 - 3:08 pm | धनुअमिता
अप्रतिम हा ही भाग .
अप्रतिम वाटते आहे वाचायला.
पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन.
19 Aug 2011 - 3:08 pm | धनुअमिता
अप्रतिम हा ही भाग .
अप्रतिम वाटते आहे वाचायला.
पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन.
19 Aug 2011 - 3:12 pm | धनुअमिता
अप्रतिम हा ही भाग .
अप्रतिम वाटते आहे वाचायला.
पुढचे भाग तयार असतील तर येवूद्यात पटकन.
19 Aug 2011 - 4:57 pm | किसन शिंदे
हु, हळूहळू कथा जोर पकडतेय तर...
मला तर तो सॅविओच ब्लॅकव्हल्चर वाटतोय..
19 Aug 2011 - 5:11 pm | धनुअमिता
किसनराव ब्लॅकव्हल्चर सॅविओ नसून समीर हाच आहे.
असं समीरची तिच्याविषयीची नफरतच सांगते आहे.