मागील भाग ... http://www.misalpav.com/node/18891
भाग चोविस
सोमवराची शाळा.
"आज खुश तो बहुत होगे तुम!", सॅवियोने दप्तर बाकावर टाकत दिवार चा अमिताभ छाप डायलॉग ठोकला. करणने तोंडभर हसून दाखवलं, "मग काय? काल सकाळी मेनका शुद्धीवर आली आणि संध्याकाळी पोलिसांनी तिची जबानी घेतली सुद्धा. आता ब्लॅकवल्चरचं काही खरं नाही."
"हंम्मं ग्रेट...", पूजाने वहीतच डोकं घातलेलं, "मी पण सकाळी न्यूज ऎकली... छान आहे... दॅट रास्कल ब्लॅकवल्चर शुड गेट हॅन्ग्ड... पण काय रे पोलिस म्हणत होते की मेनकाला अक्युट अम्निशिया झाला होता म्हणून... सम पोस्ट ट्रॉमा शॉक ... मग सायकॅट्रिस्टनी हिप्नॉसीसनी तिच्याकडून सगळी माहिती काढली म्हणे", पूजाने गणित संपवलं अन ती थेट करणकडे बघत म्हणाली, "इट्स स्ट्रेंज, इज्न्ट इट! म्हणजे आत्तच तर ती शुद्धीवर आली मग थोडे दिवस जाऊ द्यायचे होते ना... हळूहळू आठवलं असतं तिला.... उगीच घाई केली असं वाटतं, नाही का?"
"यू मे बी राईट...", करण म्हणाला, "ऍक्च्युअली इन्स्प. काळे असते तर नीट कळलं असतं. आता तर कोण मेनकाची केस बघतंय काही माहितच नाही. शियाव मेनका इतकी मोठी स्टार आहे ... तिच्यावर फिल्म इंडस्ट्रीचा एवढा पैसा लागलाय... मग तिला कधी सर्वं आठवेल अन कधी तो माणूस पकडला जाणार... शिवाय तोवर आणखीन काही अनुचित घडलं तर? ह्या दहशतीच्या छायेखाली ती अशी किती दिवस राहणार? म्हणूनच मग टिक्कूजीनीच पुढाकार घेऊन तिच्या संमतीने असं केलं... मी पण आज दुपारच्या मिड डे मध्ये वाचलं. मला वाटतं जे काही झालं ते बऱ्यासाठीच. पोलिसांकडे माहिती लवकरात लवकर आली हे बरंच झालं. आता निदान तो क्रिमिनल सापडेल तरी. इन्स्प. काळे मात्र बिग डिसपॉण्ट्मेण्ट निघाले."
"याह ही लुक्ट लाईक अ मॅन ऑफ हीज प्रिंसिपल्स... सो मच फॉर हिज ऍटिट्युड! ह्ह्ह!", सॅवियोने तुसडेपणाने म्हटले.
"पण काहीही म्हण त्यांनी केली असती मदत... मला वाटत होतं... ब्लॅकवल्चरला शोधलं असतं त्यांनी.", करण म्हणाला.
"हो बाबा सापडू दे तो एकदाचा... सगळ्यांचा जीव भांड्यात तरी पडेल... " पूजाने गणित संपवलं आणि ती पुन्हा दुसऱ्या वहीत घुसली. करणने तिला विचारले, "काय ग? एवढं काय लिहितेयस? अजून सॅवियोचाच होमवर्क चाल्लाय वाटतं..."
करणचा प्रश्न संपायच्या आधीच सॅवियो उडालाच, "यू टोल्ड हीम?", सॅवियोने पूजाकडे थेट बघत प्रश्न केला, "वी हॅड अ पॅक्ट पूजा. हाऊ कुड यू डू धिस टू मी?", सॅवियोने नाराजीत म्हटले. पूजा शरमली. तिनं मूकपणे ‘सॉरी’ म्हटलं.
सॅवियोने करणकडे पाहिलं आणि त्याच्या चेहेऱ्यावरचा उपहास बघत तो खोट्या मोठेपणाने म्हणाला, "इट्स ओके! तू करणला सांगितलंस म्हणून ठिक. अजून कुणाला बोल्ली असतीस तर मी सरळ सोलंकी मिसना जाऊन सांगितलं असतं की पूजा प्रधान कॉपी कॅट आहे आणि बुक पीकर सुद्धा!".
करण सॅवियोचा हा फुका मोठेपणा पाहून जोरात हसला.
"हा! काय रे तू कधीपासून एवढा सिंसीयर झालास? मागल्या महिन्यात ‘सोलंकी सक्स’ असं लेडीज टॉयलेटच्या दारावर तूच कोरलेलंस ना?", करणने सॅवियोकडे बघत मिश्किलीत म्हटले.
सॅवियो बावरला. पूजाने आ वासला होता.... "यू डीड दॅट? आणि सिस्टर निलिमा माझ्या फ्रेण्डला अमिषाला विचारत होत्या कारण ती त्यांना लेडीज रूमच्या बाहेर तेव्हा दिसलेली”, पूजाला विश्वास बसत नव्हता, “... धिस इज अनबिल्हिवेबल... सॅवियो यू आर सिक्क्क!", पूजाने सॅवियोची वही त्याच्या तोंडावर फेकली, "तुझा होमवर्क गेला खड्ड्यात! मी आज सोलंकी मिसना सांगणारेय. बघच तू."
सॅवियोचा मोठेपणा त्याला नडला होता. तो घाबरला. काय करावे सुचेना. त्याने करणकडे मदतीसाठी रीकेस्ट केली. करणने हात वर केले.
"शुड वी सेटल?", सॅवियोने हळूच पूजाला विचारले, "तुझं सिक्रेट माझ्याकडे सेफ आणि माझं तुझ्याकडे! ओके?"
एवढं सांगूनही पूजाचा राग गेला नव्हता म्हणून मग, "प्लीज...", अशी विनंती सॅवियोला मुळूमुळू करावी लागलीच. बाजी तशी फिफ्टी फिफ्टी झाली होती म्हणून मग पूजानेही संगनमत केलं. करण गालातल्या गालात हसत होता. सॅवियोने खुन्नस देत करणकडे पाहिलं.
"जास्त हसू नकोस ... मी आज तुझं कार्टून काढतो बघच तू!"
"बी माय गेस्ट!", करणने ती पूजाने फेकलेली वही त्याच्या हातात देत म्हटलं. सॅवियोने ती रागात उघडून त्यावर एव्हाना रेघोट्या मारण्यास सुरूवातही केली. पूजासुद्धा काही वेळात नॉर्मल झाली.
"बाय द वे करण ...", पूजाने विचारलं, "मेनकाने सांगूनही तो ब्लॅकवल्चर सापडला नाही तर? म्हणजे मेनकावर हल्ला करणारा कुणी गुंड किंवा कॉन्ट्रॅक्ट किलर निघाला तर? पोलिसांना मूळ ब्लॅकवल्चर सापडायला हवाच."
पूजाचा हा प्रश्न ऎकून करण हिरमुसला, "तोच तर प्रॉब्लेम आहे ना गं. त्याचा ईमेल एकतर भरपूर सिक्युर्ड आहे आणि बुके सेंडरचा ऍड्रेस मिळत नाहीय... लेट्स सी काही क्लू मिळाला तर मिळेल."
"हंम्मं होप सो", पूजाने म्हटले आणि पहिल्या तासाची बेल वाजली. मुलांनी भट़्टाचार्य मिसच्या क्लाससाठीचं बॅकबेंचेससाठी एकमेकांना लाच देणं सुरू केलं. आज बॅकबेंचर दानिशला हेतनकडून गेमची सीडी मिळाली होती. हेतनला त्याच्या मोबाईल रेडियोवरून आजच्या क्रिकेट डे मॅचची कॉमेन्ट्री ऎकायची होती म्हणून मिसच्या आड मागे बसून तो ऎकणार होता. करण आणि सॅवियो आज मधल्या बेंचवर बसले होते आणि पूजाने आस्था आणि सलोनीसोबत हेतनाच्याच सोबतचा लास्ट बेंच शेयर केला होता.
लेक्चर्स मागून लेक्चर्स जात होते आणि दिवस संपत होता. करणला घरी कधी जातोय असं झालेलं. मेनकाच्या तब्येतीची आणखी काही खबरबात मिळतेय का हे टिव्हीशिवाय आणखी कुठून कळायचा मार्ग नव्हता. शेवटच्या तासालाही मन लागत नव्हतं पण ह्या तासाला लक्ष देण्याशिवाय पर्याय नव्हता. हा सोलंकी मिसचा मॅथ्सचा क्लास होता. त्यांच्या ह्याच क्लासमध्ये झालेल्या गेल्या सर्प्राईझ क्लासटेस्टच्या एकोणीस मार्कस्ना करण विसरला असला तरी सोलंकी मिसला ते पक्कं ध्यानात होतं. करणचे ते लो मार्क्स मिळाल्याच्या दिवसापासून सॅवियोला सोलंकी मिस करणपासून लांब बसवायच्या. १९ मार्क्सचं करणच्या हातून घडलेलं ते अक्षम्य पाप हे सॅवियो नावाच्या वात्रट मुलाचीच करणी आहे हे सोलंकी मिसने स्वतःच्या मनात बिंबवून घेतलं होतं आणि म्हणूनच करणचं ह्या सॅवियोपासून संरक्षण करायला हवं ह्या आवेशात सोलंकी मिसने सॅवियोवर करडं लक्ष ठेवलं होतं. सोबत सॅवियो नसल्याने करणचा तो तासही थोडा संथ जात होता. करण आपल्याच धुंदीत त्याच्या वेबसाईटविषयी विचार करत होता. ‘इधर उधर’ची रिलीज डेट जवळ येत होती. त्यामुळे त्याचे प्रोमोज, क्लिप्स, फोटोज, गाणी आपल्या वेबसाइटवर अपडेट करायचा त्याचा मानस होता. तोच त्याला पाठून कुणीतरी टॅप केलं.
करणने हळूच वळून बघितले. मागल्या विनोदने करणला एक छोटी चीट त्याच्या हातात सरकवली. पाठून आल्याचे तो खुणावत होता. ‘कोण?’ करणने खुणेनेच विचारले, ‘हेतनने पाठवलं’ असं विनोद म्हणाला. करणने हेतनकडे बघितले. कानात ट्रान्स्परण्ट मायक्रोफोन ने काहीतरी ऎकत हेतनने त्याला भुवयानी ती चीट उघडून वाचायला सांगितले. करणने तो दुमडलेला कागद उघडला आणि वाचला.
आतली बातमी बॉम्ब होती…
"मेनकाज अटॅकर फाऊण्ड! .... अ क्विक न्यूज ऑन रेडियो."
करणचं तोंड पाच बोटं उघडंच राहिलं.... विश्वास बसत नव्हता. त्याने त्याच भावात पुन्हा वळून हेतनकडे पाहिलं. "व्हॉट़्ट?" करणने हेतनला तडक प्रश्न केला. हेतनने मान डोलावून होकार दर्शवला पण पटकन समोर बघत पटकन आपलं डोकं लपवलं... काहीतरी अघटीत समोर घडलं होतं... करणने वळून समोर पाहिलं तर सोलंकी मिसची नजर करणवर अन चश्मा डोक्यावर गेला होता...
"मि. रूपवते. स्टॅण्ड अप!", सोलंकी मिस फर्मावल्या. करण हडबडून उठला.
"व्हाय आर यू लुकिंग बॅक ऍण्ड टॉकींग? व्हॉट इज इट सो इंटरेस्टींग ऑन द लास्ट बेंच? प्लीज टेल मी."
सोलंकी मिसच्या ह्या प्रश्नावर सगळे गोंधळून वळून मागल्या बेंचेसकडे पाहू लागले. एकीकडे हेतन अन दुसरीकडे पूजा. साहाजिकच सगळ्यांची नजर पूजावर लागून राहिली होती. पूजाला पटकन काहीच कळलं नाही पण एकदम उमगताच ती ओशाळली.
"नथिंग मॅम.", करणला काय बोलावे कळत नव्ह्ते. तो अर्धवट विचारांत ह्या नव्या न्यूजबद्दलच्या तंद्रीत होता.
"व्हॉट इज इट इन युअर हॅण्ड्स? शो मी.", सोलंकी मिसनं असं फर्मान काढताच करणची पाचावर धारण बसली. "नथिंग मॅम!", करणने ते लपवायवा निष्फळ प्रयत्न केला.
"आय सेड शो मी.", सोलंकी मिसचा आवाज जरबला आणि त्यानी करणच्या बाकाकडे येऊन ती चीट करणच्या हातातून हिसकावून घेतली. सोलंकी मिसने तो कागद वाचला अन त्यांच्या चेहेऱ्याचा नूर उग्र झाला. त्यांच्या आठ्या मावळल्या अन त्यांनी डोक्यावरचा चश्मा गळ्यात अडकवला. वर्गात कुजबूज सुरू झाली. सोलंकी मिसचा डोक्यावरचा चश्मा गळ्यात लटकणे म्हणजे सिरीयस पनिशमेण्ट असे.
"सो धिस इज व्हॉट यू आर डूईंग. प्लेयिंग फिल्मी गॉसिप!", सोलंकी मिस संतापल्या, "करण युअर अटेंशन इन द क्लास इस गेटींग फ़्रॉम बॅड टू वर्स"
"!", करणच्या मनातली भिती चेहेऱ्यावर आली.
"आय ऍम वेरी वर्रीड अबाऊट युअर बिहेवियर दीज डेज करण. यू डू नॉट पे अटेंशन इन द क्लास. यू गेट लो स्कोअर इन टेस्ट्स. आय ऍम गेटींग जेन्युअनली वर्रीड अबाऊट यू!", सोलंकी मिस रागात म्हणाल्या.
"सॉरी मॅम!", करणला खूप शरमल्यासारखे झाले होते.
"डोन्ट यू सी? यू आर स्टार्टींग टू बी लाईक युअर फ्रेण्ड्स!", आणि असं म्हणत सोलंकी मॅमनी आपली थंड नजर सॅवियोवर फिरवली, "इट्स एसेसी नेक्स्ट ईयर. यू हॅव टू पे अटॆंशन इन द क्लास. इट्स नॉट द टाईम टू गेट सो लूज ऍण्ड केयरलेस."
ह्यातला ‘केयरलेस’ हा नक्कीच सॅवियोसाठी होता. कारण त्यावेळी सोलंकी मिसच्या बोलण्यातल्या तुसडेपणाला तोड नव्हती.
"सॉरी मॅम. इट वोण्ट हॅपन अगेन.", करणने माफी मागायचा निष्फळ प्रयत्न केला.
साधारणतः एवढ्या माफीवर सोलंकी मिस करणचे पाप पोटात घालत असत. पण आज नूर वेगळाच होता. सोलंकी मिस करणला चक्क दोन मिनिटं ओरडल्या अन शेवटी त्यांनी फर्मावलं, "कॉल युअर पॅरेन्ट्स टुमॉरो. आय नीड टू स्पिक टू देम.", सोलंकी मिसने त्याच चिटवर कंप्लेन्ट लिहिली अन करणकडे देत म्हटले. मिसच्या गळ्यात अडकवलेल्या चश्म्याची इंटेसिटी आता सगळ्यांना पुरेपूर पटली होती. वर्गातली कुजबूज वाढली. कारणच तसं होतं. ह्या आधी चार मुलांच्या पॅरेण्ट्सना सोलंकी मॅमनी शाळेत बोलावलेलं, पीटर सॅम्युअल्स, यस्मिन शेख, धीरज मूलवाच्छानी आणि कमलेश कोते. तसे हे सगळे वेगवेगळ्या डिव्हीजनचे होते. फक्त त्या चौघांत एकच समानता होती आणि ती म्हणजे ते सगळे त्यानंतरच्या सेमिस्टर एक्झॅममध्ये फेल झालेले होते! करणचं अवसान गळालं आणि तो मॅमना काही सांगणार तोच बेल वाजली आणि मॅमसहीत सारा वर्ग पांगला. मुलं जाता जाता हतबल करणकडे करूणेच्या नजरेने बघत होती. सॅवियोसुद्धा चकित भावनेने, ‘सोलंकी मिसची ही कॅपिटल पनिशमेन्ट माझ्याऎवजी करणला कशी लागली?’ हेच कित्येक मिनिटं स्वतःला पुसत असावा...
"सॉरी", पूजाने मागून करणला म्हटलं, "बॅडलक."
"आपण सोलंकी मॅमना जाऊन भेटू का? त्यांच्याशी बोलून काहीतरी मार्ग निघेलच?", सॅवियोने भाबडेपणाने प्रश्न केला. पण त्याचं उत्तर "नाही" हे त्या तिघांनाही ठाऊक होतं. सोलंकी मॅम टीचर्स रूममध्ये एकाही स्टुडण्डला उभं करत नसत आणि त्यात हे लास्ट लेक्चर संपलेलं. सोलंकी मॅम एव्हाना निघूनही गेल्या असतील. हिरमुसलेला करण घरी पोहोचला. आईला आजच्या झालेल्या प्रकाराबद्दल कसं सांगू हेच करणला झालं होतं. खिन्न मनाने तो दाराशी पोहोचला.
समीरने दार उघडलं.
"टिव्हीवर न्यूज आलीय. मेनकाचा अटॅकर सापडला.", समीरने करणला अधीर होऊन सांगितलं.
"हो कळलं मला.", करणने म्हटले. समीर मेनकाचे अपडेट्स करणला देतोय हेच अजब होतं.
"पोलिस म्हणतायत एक गुंजीसिंग नावाचा गुंड हे सगळं करत होता. हा एक नवा प्रकारचा एक्स्टॉर्शन करणाऱ्या ग्रुपचा माणूस आहे आणि केवळ तूच तर नव्हे त्याने ह्याधी इतरही काही लोकांनाही तसंच ब्लॅकमेल आणि धमक्या दिल्या होत्या. स्वतः टिक्कूजींनाही त्याने तसाच बुके आणि ते धमकीचं लेटर पाठवलं होतं. बट अनलाईक यू, टिक्कूजींकडे त्याने खंडणी मागितली होती. खरं तर मेनकाकडे आधीच झेड सिक्युरीटी असल्याने टिक्कूजींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण नेमकी त्या दिवशी मेनकाने सिक्युरीटीशिवाय गाडी चालवली आणि पुढे तो अनुचित प्रकार घडला.", समीरने जणू टिव्हीवरचं वृत्त रटलं होतं.
"व्हॉट?", करण चमकला, "पण ब्लॅकवल्चरचं काय? त्या बुके पाठवणाऱ्या लेडीचं काय?", करणने विचारलं. त्याच्यामते हा गुंड ब्लॅकवल्चर असणं शक्यच नव्हतं.
"अरे तेच तर. ब्लॅक्वल्चर म्हणजे हाच गुंजी सिंग. पोलिस म्हणाले की बुके पठवणारी ती बाई त्याची बार डान्सर गर्लफ्रेण्ड आहे.", समीरने माहिती पुरवली. टिव्हीवर बरीच डीटेलवार माहिती होती असं दिसत होतं. अदरवाईस समीरला हे एवढं सगळं माहिती असणं शक्य नव्हतं.
करणला पटलं नाही, "पण जर त्याला मेनकाचं एक्स्टॉर्शन करायचं होतं तर त्याने मला का दरवेळी मेसेजेस लिहिले? मला आधीच का त्याचा प्लान सांगितला?"
"दोण्ट नो बट आम्हीही आमच्या नेवी वॉरफेरमध्ये हे बघतोच.”, समीरने म्हटले, “शत्रूला जेव्हा आम्हाला बुचकळ्यात टाकायचं असतं तेव्हा ते अशी मोडस ओपरण्डी फॉलॊ करतात. आपल्या टारगेटला पकडण्यासाठी ते त्यांच्या आजऊबाजूच्या लोकांना अब्युज करतात आणि त्यांच्यात अशा धमक्या किंवा रुमर्स फैलावून दहशत निर्माण करतात. इथेही मेनकाच्या फॅन्सना आणि टिक्कूजींना टार्गेट केलं असावं गुंजी सिंग ने. मग असाच कुणीतरी गोंधळलेला स्टारफॅन मिडियात जातो आणि त्या धमकीस फोडतो. पण अशाने त्या सेलिब्रिटीला मानसिक ताण येतोच आणि तो सेलिब्रिटी ह्या धमकीला दुर्लक्षित करण्याएवजी सिरीयसली घेऊ लागतो... यू नो ऍज अ सायकॉलॉजिकल ऍडवाण्टेज ओवर द टार्गेट!"
"पण अशाने पोलिसांनाही ह्याचा पत्ता लागू शकतो ना?", करणचा हा प्रश्न स्वाभाविक होता.
"अरे पण मूळ सेलिब्रिटी तर कधीच स्वतःहून पोलिसांकडे जात नाही. म्हणूनच मग हे गिमिक आहे की गॉसिप आहे की खरं काहीच कळत नाही. पोलिसांतही गोंधळ पसरतो आणि ह्या साऱ्या केयॉस मध्ये एकाप्रकारे तो गुप्त धमकीदार सेफ राहतो."
करण गप्प झाला. समीरने ही युद्धात वापरली जाणारी ‘गेम’ थियरी सेन्सिबली स्पष्ट केली होती. पण तरीही करणचं मन मानत नव्हतं. ब्लॅकवल्चरची मेनकाबद्दलची ती घृणा, त्याला ठाऊक असलेली तिची पुन्हा आई न होण्याची स्थिती, त्यावर त्याचा दरवेळचा ‘वांझोटी’ बोलायचा उपहास, त्याला ठाऊक असलेले त्या एमटिव्हीच्या इण्टरव्ह्यूतले तिने म्हटलेले ते शब्द... हे सगळं एवढं फसवं निघेल ह्यातं करणला काहीच मानवत नव्हतं.
"द इविल इज गॉन!", समीरनी करणच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं. आईनेही "बरं झालं देवा ह्या जंजाळातून लवकर सोडवलंस!", असं म्हणून देवाला हात जोडले आणि किचनचा रस्ता पकडला. करण मात्र तिथेच थबकलेला होता. त्याची प्रश्नांची जंत्री संपल्याऎवजी लांबलेली होती. त्यानं बॅग टाकली आणि समीरकडे एक संशयित कटाक्ष टाकला. समीरने करणच्या कटाक्षास टाळत करणच्या बॅगेतून खाली पडलेली कसलीतरी चिट उचलली.
"व्हॉट्स धिस?"
करण गप्प होता. समीरने ती मागे पुढे वाचली अन त्याला सारी बात कळली. त्याचा चेहेऱ्यावरचे रंग पालटले. रागाची लक्षणं दिसू लागली. करण अजूनही समीरकडे थंड भावानेच बघत होता.
"हे काय आहे?", समीरने करणला तडक विचारलं.
करणने ती चिट पाहिली अन भुवया उडवत म्हटले, "इट इज व्हॉट इट सीम्स!"
समीरचा राग तीव्र झाला, "मला नीट उत्तर द्यायला तोंड जळलंय का तुझं?"
करण गप्पच होता.
आवाज वाढलेला ऎकून आई दिवाणखान्यात आली, "काय झालं?", तिनं विचारलं. "काय झालंय!", समीरने रागात ती चीट आईकडे दिली, "तूच विचार तुझ्या कुलदिपकाला... माझ्याशी बोलताना त्याची जीभ जड झालीय..." असं म्हणून तो तणतणत त्याच्या रूममध्ये निघून गेला.
आईने ती चिठ़्ठी वाचली अन नाराजीतच करणकडे पाहिलं. करणने मान लपवलेली होती....
*****************
भाग पंचविस
"आय अण्डरस्टॅण्ड मिसेस रूपवते. बट थिंग्स आर नॉट लुकींग वेल...", सोलंकी मिस आईला सांगत होत्या. करण टीचर्स रूमच्या बाहेर उभा आत काय गोष्टं चाल्लीय ह्याचा अंदाज लावत असावा.
"आय नो मिस सोलंकी.", आई म्हणत होती, "देयर आर सम फॅमिली इश्युज वी आर डीलिंग विथ दीज डेज. इव्हन पुलिस वॉज इन्व्हॉल्व्ड फॉर सम टाईम. बट थिंग्स आर फाईन नाऊ. आय अश्युअर यू ही विल बी बॅक टू हिज नॉर्मलसी.", आईने सोलंकी मिसना आश्वस्त करत म्हटले.
बाहेर मधली सुट़्टी होती पण करण चिंतीत होऊन आत काय घडत असेल हेच स्वतःला विचारत असावा. मागून सॅवियो आला.
"क्या हुआ?"
"आई अजून बाहेर नाही आलीय. २० मिनिटं झाली. आय ऍम रीयली गेटींग वर्रीड!", करणने रूमालाने घाम पुसला.
"इट विल बी फाईन.", सॅवियोने खोटा आशावाद दाखवत म्हटलं, "फक्त सेमिस्टर एक्झॅममध्ये फेल व्हायला नको, काय?"
आता एक्झॅम आणि फेलिंग विषयी करणच्या मनात अजून काहीच चालू नव्हतं पण सॅवियोने पिल्लू सोडलं अन करणची आणखीच पाचावर धारण बसली. तब्बल अर्ध्या तासाने आई बाहेर आली. तिच्या चेहेऱ्यावर नाराजीची छटा आत जाताना होती तशीच होती. तिनं करणकडे उसासा टाकत पाहिलं आणि ती करणला सोडून कॉरीडॉरमधून उतरून पायऱ्या उतरू लागली. करण गोंधळलेल्या स्थितीत तिच्या मागे मागे चालू लागला...
"आई काय झालं? काय म्हणाल्या सोलंकी मिस?", करणने लगबगीत प्रश्न केला.
"काही नाही. शी इज डिसपॉईन्टेड अबाऊट युअर प्रोग्रेस.", आई शेवटची पायरी उतरून करणकडे वळून म्हणाली.
"आणि?", करणला पनिशमेन्टविषयी जाणून घ्यायचं होतं.
"मी त्यांना रीक्वेस्ट केली की करणला एक चान्स द्या. तो पुढच्या टेस्टमध्ये पुन्हा स्कोर करेल.", आईने करणच्या फिस्कटलेल्या डोळ्य़ांत पाहत म्हटलं, "पण मी आश्वासन देऊन काय होणार? फेल व्हायचंय की नाही हे तुझ्या हातात आहे...".
हे सांगताना आईच्या डॊळ्यांतले खिन्नतेचे भाव करणला स्पष्ट दिसत होते. करण शरमला. फेलिंगविषयी काहीतरी बोलणं आत झालंय हे कळून तर अधिकच.
"मला ऊशीर होतोय बॅंकेत जायला. मी निघते.", आईने असं म्हणून बॅग खांद्यावर चढवून शाळॆच्या बाहेरचा रस्ता धरला. करणने आईला एवढं लेड-डाऊन पाहिलं नव्हतं. तोही मग निराश झाला आणि स्वतःवरच रागावला. थोड्या अंतरावर उभ्या सॅवियोनेही करण अन आईचं संभाषण अर्धंमुर्धं ऎकलं आणि ते फेल होण्याविषयी काहीतरी बोलतायत हे त्याला कळलंच. करण निराश मनाने वर्गात परतला. त्याचा मूड नंतर दिवसभरात सॅवियो अन पूजालाही अस्वस्थ करून गेला.
शाळा सुटल्यावर घरी परतताना पूजा, सॅवियो आणि करण गप्पच होते. करणचे हे वाईट दिवस सर्वांसाठी एकाप्रकारे परीक्षा घॆऊन आले असावेत. करणच्या मनातली सल त्यांनाही लागत होती. ह्या गप्प वातावरणात ते किती वेळ चालत असतील देव जाणे पण तेवढ्यात पूजाचं घर आलं. घरासमोर येताच पूजा थोडी भांबावली कारण गेटकडे एक लाल रंगाची होंडा सिविक थांबलेली तिला दिसली. ती धावतच पुढे गेली अन तिनं नंबर प्लेट वाचली आणि खुश होऊन करण अन सॅवियोला हाक मारली.
"गाईझ! गेट हियर!".
ते धावत तिच्याकडे आले.
"लूक! ही तर गौतम अंकलची कार आहे म्हणजे ते घरी आलेत."
"काय?", करणने तिला चकीत होऊन विचारलं.
"मग! तुला आठवत कसं नाही. हिच्याशीच तर तुझा ऍक्सिडण्ड झाला होता ना....", पूजाने करणला आठवण करवली.
आता त्या ऍक्सिडण्डमध्ये तुटलेल्या हाताची असह्य कळच करणला फक्त आठवत असताना गौतम अंकलची गाडी अन तिची नंबर प्लेट कशी आठवणार? तरीही करणने ‘या राईट’ असं खोटं अफर्म केलं.
"चल ना त्यांना भेटू.", पूजा करण आणि सॅवियोला म्हणाली आणि घरी घेऊन आली. आसावरी आण्टीनी दार उघडलं.
"आई, बाहेर गौतम अंकलची गाडी आहे ना? कुठे आहेत ते? कधी आले?", पूजाने आत शिरण्याधीच सवाल केला. प्रधान आण्टी हसल्या.
"अगं हो हो. जरा दम घेशील की नाही. नुकतेच आलेत. आत बसलेत. पप्पांसोबत बाता चाल्ल्यात..."
मागून करण अन सॅवियो दिसताच प्रधान आण्टी थोड्या उजळल्याच, "अरे करण आणि सॅवियो तुम्हीही आहात का? छान! गौतम तुमच्याविषयीच विचारत होता. खास करून करणविषयी. तुला भेटायचं म्हणतोय.", पूजाची आई करणला म्हणाली. करण उसनं हसला. त्याचा आजचा मूड काही कुणाला भेटण्याचा नव्हता म्हणून असेल. तसं करणला गौतम अंकलना भेटायची इच्छा होतीच. मेनकाच्या तब्येतीबद्दल जास्त चांगलं बद्दल कळलं असतं त्यांच्याकडून म्हणूनच. पूजा आत दिवाणखान्यात गेली आणि तिनं समोरच गौतम अंकलना तिच्या पप्पांसोबत बसलेलं पाहिलं.
"हाय अंकल!", पूजाने किंचाळून हाक मारली तसं गौतम अंकल उठले.
"हाय स्वीट हार्ट! कशी आहेस?", अंकलनी हसत तिला ग्रीट केलं.
"आय ऍम ग्रेट! पण तुम्ही सांगा तुम्ही इथे कसे? असे अचानक! आय मिन इट्स अ प्लेजन्ट सरप्राइझ बट इट्स टोटली अनएक्स्पेक्टेड! इज एवरीथींग ओके?", पूजाच्या आनंदी चेहेऱ्यावर अजूनही विश्वासाचा भाव आला नव्हता. प्रश्न ऊफाळून येत होते.
"अगं ऍक्च्युअली तिथे मेनकाची...", अंकल वाक्य संपवणार तोच त्यांना पूजाच्या मागून करण येताना दिसला. अंकलनी वाक्य मध्येच तोडलं. ते करणकडे बघू लागले.
"व्हॉट?? अंकल काय झालं?", पूजाने गौतम अंकलचं वाक्य संपायची वाट पाहत विचारलं. पण काही वेळ त्यांच्याकडून रीप्लाय न आल्याने ते बघत असलेल्या दिशेने तिनं पाहिलं आणि करण दिसला.
"ओह अंकल! तुम्ही ओळखताच ना करणला. यू रिमेंबर?", पूजाने ओळख करवून दिली.
"याह या! आय नो हिम.", अंकल भानावर येन म्हणाले, "हाऊ आर यू करण?", त्यांनी करणकडे हात पुढे केला. करणनी हात मिळवला अन हॅण्डशेक केलं पण तेवढ्यावर अंकलच्या हाताची पकड सुटत नव्हती. ते पुन्हा करणकडे बघत हरवले. हॅन्डशेक चालूच होता.
"अंकल!", पूजाने विचारलं. अंकलच्या चेहेऱ्यावरील गुंतीत भाव तिला अन करणला काहीतरी वेगळंच सांगत होते.
"हो? फाईन!", अंकल हडबडले आणि त्यांनी करणचा हात सोडला, "येस येस! आय नो हिम... नाऊ आय नो हिम... वेल... वेरी वेल!" अंकल असं म्हणून करणकडे डोळे फिरवत म्हणाले, "करण रूपवते, करण सुधाकर रूपवते, राईट!"
करण थोडा गोंधळला. करणचं वडिलांसहित पूर्ण नाव घेऊन अंकलनी प्रथमच करणला संबोधलं होतं.
"लास्ट टाईम माझ्या गाडी खाली येता येता राहिलास तू. इट वॉल अ क्लोज कॉल.", अंकल हसले, "ह्ह! आपली ओळख कशी वियर्ड सर्कमस्टन्सेस मध्ये झाली. वी शूड हॅव हॅड अ बेटर रॉन्देवु... डोन्ट यू थिंक सो?"
अंकलच्या ह्या अजीब प्रश्नावर करण पुन्हा प्रश्नांकित झाला. ‘हा’ बोलावं की ‘नाही’ काय तेच कळत नव्हते. पूजा अन सॅवियोही एकमेकांचे चेहेरे बघू लागले. गौतम अंकलचं काल्म आणि कंपोज्ड वागणं आज कुठेतरी गायब झालेलं वाटत होतं. ते करणशी थोडे विचित्रच वागत होते.
पूजाचे वडिल एकदम मध्येच म्हणाले, "व्हॉट! तो करण होता?", त्यांनी चष्मा ऍडजस्ट केला, "मला वाटलेलं की तॊ उज्ज्वल होता म्हणून..."
"अहो तो करणच होता...", पूजाची आई मागून स्नॅक्स घेऊन येत म्हणाली.
"अगं पण मागल्या खेपेस तू म्हणालेलीस की तो उज्ज्वल होता म्हणून.", पूजाच्या वडिलांनी आपली स्मृती चाळवली.
"काय करू मी ह्यांचं? अहो बाईकवरून दारू पियून पडला तो उज्ज्वल आणि गौतमच्या गाडीखाली येता येता राहिला तो करण.. हा करण.. पूजाचा मित्र.", पूजाच्या आईने एवढं स्पष्टीकरण द्यायची तसदी घेतलीच आणि तो स्नॅक टीटेबलवर ठेवला. सॅवियोचं लक्ष ट्रे मधल्या चिप्स, समोसे आणि कॉफीकडे लागलं. आंटींच्या ह्या उत्तरावर अनुत्तरीत झालेले पूजाचे वडिल डोकं खाजवत पूजाच्या आईकडे बघत खाली बसले. पुढचे काही क्षण पूजाची आई आणि वडिल एकमेकांकडे बघत होते.... करण आणि अंकलचं लक्ष एकत्र लागलं होतं ... आणि सॅवियो आणि ट्रे मधल्या समोश्यांची दृष्टादृष्ट झाली... पूजा कन्फ्युस्ड होऊन एकदा करण, एकदा अंकल कडे बघत होती...
"एनिवेज", पूजाच्या ह्या उद्गारांनी सगळे भानावर आले, "अंकल पण तुम्ही असे अचानक आलात कसे?". पूजाने तिचा पहिला प्रश्न आळवला. अंकलनी कॉफीचा कप हातात घेतला अन छॊटी सिप घेतली.
"अगं मेनकावर अटॅक झाला मग मला यावंच लागलं", अंकल म्हणाले, "आय मिन तिच्यावर एवढा भयानक प्रसंग गुदरल्यावर तिच्या सोबत हॉस्पिटलात तिचं ‘आपलं’ असं कुणीतरी हवंच ना. म्हणूनच मग तातडीने आलो.", ह्यातला ‘आपलं’ हा शब्द अंकलनी थोडा करणला उद्देशून केलेला करणला वाटला.
"हाऊ इज शी?", करणने विचारलं.
"शी इज फाईन. स्टील टेरीफाईड! पण आता शुद्धीवर आलीय. काल तिचा हल्लेखोर पकडला गेला. तुम्हाला कळलंच असेल. गुंजीसिंग!", अंकलनी असं म्हणताच करणने अधीरतेने म्हटलं.
"हो दॅट गुंजी सिंग ए.के.ए. ब्लॅकवल्चर!"
गौतम अंकलची कॉफी त्या सिपमध्येच घुटमळली.
"ब्लॅकवल्चर?", अंकल थोडे अलर्ट झाले, "सो यू नो अबाऊट हिम?", अंकलनी थेट करणला विचारलं.
त्या प्रश्नावर करणने पूजाकडे पाहिलं. आता ती ब्लॅकवल्चरची हिस्टरी त्या वेळी सांगायची ताकद ना करणकडे होती ना पूजाकडे.
"इट्स अ लॉन्ग स्टोरी. सांगेन मी तुम्हाला आरामात. करण इज वन ऑफ द विक्टीम्स ऑफ ब्लॅकवल्चर!", पूजानेच म्हटलं तसं अंकल थोडे अस्वस्थ झालेच. ब्लॅकवल्चरविषयी करण आणि पूजाला काय काय ठाऊक आहे हे त्यांना जाणून घ्यायचं होतंच. त्यांनी "ओके." म्हटलं आणि ते पुन्हा गप्प झाले.
"आता त्याचं करणार काय? तिच्या हल्लेखोराचं?", करणनी पुढे प्रश्न केला.
"लेट्स सी! तो आणि त्याच्या गर्लफ्रेन्डचं इण्टरॉगेशन पुलिस करतायत. कळेल सगळं तिथून आणि मग अटेम्प्ट टू मर्डर प्रूव झालं की नेसेसरी शिक्षा होईल त्या दोघांना.", अंकल म्हणाले आणि त्यांनी पुन्हा पूजाकडून करणकडे पाहिलं.
"बरोबर आहे!", पूजाचे वडील एकदम ऎटित म्हणाले, "इकडची पोलिस म्हणजे स्कॉटलण्ड यार्ड! गुन्ह्याचा वास गुन्हा होण्याच्या आधीच ओळखते. परवाच कुठल्यातरी अभिनेत्रिच्या मारेकऱ्याला पकडलं त्यांनी. अगदी एका आठवड्यात!"
पूजाच्या वडिलांची ऎट पोलिसांचं कौतुक करण्यात वाढली तशी पूजाच्या आईने त्याची बाही खेचली.
"अहो मेनकाच ती. तिच्याच गोष्टी चाल्ल्यात.", प्रधान आण्टी ओशाळून म्हणाल्या.
"ओह सॉरी सॉरी. संदर्भ विसरलो मी", असं म्हणून प्रधान अंकलनी सगळ्यांकडे अपराधीपणे हसून बघितलं अन शेवटी सॅवियोकडे पाहून गप्प झाले. सॅवियोने पटकन आपलं लक्ष समोश्यांवरून संभाषणावर वळवलं. ह्या करमणुकीने थोडा वेळ ताण हलका झाला तसं आता करणनी गौतम अंकलकडे पाहिलं.
"मेनका कशी आहे आता. जास्त लागलंय का तिला? किती टाके पडले?", करणची मेनकाविषयी काळजी त्याच्या प्रश्नांतून ओथंबली तसं अंकलनी मंद स्मित केलं, "पाच टाके पडलेत. हल्लेखोराने पूर्ण गळा नाही कापला पण कार्टिलिजेस जखमी झालीच. हा आठवडा जाईल बरं होण्यात."
"ओके. होप सो शी गेट्स वेल."
"या होप सो. शी मस्ट गेट रीयली वेल." गौतम अंकलनी करणचंच वाक्य रीपिट केलं.
थोडा वेळ सगळे शांतच होते. करण, पूजा आणि गौतम अंकल मेनकाच्या चिंतनात, प्रधान आन्टी पूजाच्या पप्पांकडे ते पुढे काय बोलणार हे पाहत, पूजाचे पप्पा प्रधान आन्टींच्या ‘पुढे काही बोललात तर याद राखा’ अशा सक्त ताकदीत आणि सॅवियो ‘मोठ्यांच्या पंगतीत समोसा आपण प्रथम उचलावा की नाही’ ह्या शिष्टाचाराच्या द्वंद्वात. मग गप्पपणेच सगळे उठले. समोश्यांना कुणीही मोठ्याने हात लावला नसल्याने सॅवियो हिरमुसला. आज सकाळच्या त्याच्या हॉरोर्स्कोप मध्ये "समोर ताट भरून समोसे असूनही ते खाण्याचा योग नाही" असं काहीतरी आलं असावं.
"ओके अंकल निघतो आम्ही", करण म्हणाला. सॅवियोला समोसे सोडवत नव्हते.
"अं... करण एक मिनिट!", अंकल उठले आणि त्यांनी करणला थांबवलं, "तुझ्या घरी कोण आहे?"
करण भांबावलाच, "म्हणजे फॅमिली विषयी विचारताय का तुम्ही? मला वाटलेलं की तुम्ही माझ्या आई आणि मोठ्या भावाला म्हणजे समीरला आधीच भेटला आहात म्हणून? हॉस्पिटलमध्ये."
"नाही नाही तसं नाही", अंकलनी काहीतरी उमगून आपली चूक सुधारली, "मला विचारायचं होतं की आता कोण कोण असेल तुझ्या घरी?"
"आई आणि समीर असतील.", करण म्हणाला. थोडा प्रश्नांकितच झालच तो. "का? तुम्हाला भेटायचं होतं का त्यांना?"
करणच्या "का?" वर अंकल थोडे सावध झाले, "तसं नाही. म्हणजे गेल्या खेपेस त्यांच्याशी जाताना नीट बोलणं झालं नव्हतं म्हणून म्हणतोय मी."
"ओके.", करण म्हणाला, "तुम्हाला यायचंय तर या माझ्या सोबत घरी.", करणने आमंत्रण दिलं तसं अंकल भांबावले.
"नको. मी भेटीन त्यांना कधीतरी. आता काही दिवस इथे आहेच मी. पूजाकडेच राहणार आहे.", अंकलनी स्मित आणून करणला म्हटलं. पूजा आधीच आनंदित होती. करणही थोडा हर्षभरीत झाला होता कारण गौतम अंकल जवळच असल्याने टिव्ही चॅनलपेक्षा थेट त्यांच्याकडूनच मेनकाच्या तब्येतीची माहिती मिळणार होती.
करण आणि सॅवियो गेले तसे अंकल आपल्या रूममध्ये परतून ऊशीवर पाठ टेकून विचार करू लागले...
*****************
भाग सव्वीस
दोन दिवसांपूर्वीचीच गोष्ट...
सकाळचे दहा वाजलेले. इंटेसिव केयर युनिट मधून आज सकाळीच मेनकाला स्पेशल ऑब्सेर्वेशन रूम मध्ये ठेवलेलं. मेनकाजीचा ड्राईव्हर गंगाधर आणि सेक्रेटरी प्रकाश भाटीया ऊर्फ टिक्कू तिथेच मेनकाच्या सोबत होते. मेनका केव्हाच शुद्धीवर आलेली होती आणि हातातलं टाईम्स वाचत होती. हळूहळू तिच्या सुधारणाऱ्या प्रकृतीच्या बातम्या इतर फ्रेश अन महत्त्वाच्या न्यूजच्या मागे सरकत होत्या. गेल्या आठवड्यात प्रन्ट पेज धारण करणारी मेनका आज सातव्या पानावर सहा बाय दोन इंचाच्या बातमीत "मेनका गेटींग वेल" ह्या फुटकळ मजकूरात भरलेली होती.
"मॅडम वो फारूख दारूवालाजी का फोन आया है।", टिक्कूने मेनकाला फोनच्या माऊथपीसवर हात ठेवून हळूच सांगितलं, "उन्होने आपका इस हफ्ते का हॉरॊस्कोप निकाला है। कह रहे हैं की आपसे पर्सनली बात करके आपहीको बतायेंगे।", मेनकाने अनैच्छेत तो फोन घेतला. "हॅलो", मेनका हळूच म्हणाली. गळ्याच्या स्नायूंना ताण देत नीट बोलणं जमत नसलं तरी थोडं थोडकं बोलायची ताकद तिच्यात एवढ्या दिवसात आली होतीच.
"हॅलो मेनकाजी मै फारूख बात कर रहा हूं।"
"कहीये।"
"मैने आपका हॉरोस्कोप निकाला है। अगर आप सुनने को तयार हों तो मैन आपको बता सकता हूं। ..."
आजकल आपल्या जीवनात चाललेल्या गोष्टींच्या मागे चांगले ग्रह असण्याची शक्यता किती धूसर आहे हे मेनकाला आधीच ठाऊक होतंच. त्यामुळे हे हॉरोस्कोप किती वेगळं असेल ह्याविषयी मेनका स्केप्टीकलच होती. पण फारूख दारूवाला हे सेलिब्रिटी ज्योतिषी, टॅरोकार्डरीडर अन एक उत्तम कन्सलटण्टही होते. समस्या सांगून त्यांच्या निराकरणासाठी कर्मकांड किंवा यज्ञथोतांडांऎवजी एखादा मानवी ऊपाय सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. सायकॉलॉजीकली त्यांचे उपाय बरेच मदत करत. त्यामुळेच एरवी पेज थ्री म्हणून स्वतःला मिरवणरे सेलिब्रिटीजही त्यांचाच सल्ला घ्यायचे. म्हणूनच स्वतः मेनका दर आठवड्याचं हॉरोस्कोप दारूवालांकडूनच काढून घ्यायची.
"ऎसी कोई बात नही है दारूवालाजी...", मेनकाने कसंबसं एक वाक्य म्हटलं, "मै जानना चाहती हूं। ... आप बताईये।"
"तो सुनिये। इस हफ्ते बारवहे स्थान मे मंगल और अष्टम में राहू आपकी जिंगदीमे तूफान ला सकता है। रवी-हर्षल केंद्रयोग आनेवाली मुसिबतोंको और बढाकर आपको मुश्किलोंमे डालेगा। पुरानी गलतिया सुधारनेसे परे है। पर पश्चाताप किया जाये तो ये परिणाम कम हो सकते है। आपको मैने पिछले हफ्तेही बताया था अपनी सिक्युरीटी के अलावा किसी और पे विश्वास न रखें, पर आपने मेरी बात सुनी नही।..."
मेनकाने टिक्कूकडे डॊळे वेधले.
"फिर भी अभी वक्त गुजरा नही है। अपने सगोंपे विश्वास करीये। वोह आपको ऎसी मुश्किल घडी में मदत कर सकते है। क्यूंकी पराक्रमी शुक्र और पंचममें गुरू आपको सही राह बता रहे है। अपनों की सुनिये। अपनी गलतिया स्वीकार करके पश्चाताप करेंगी तोही इस तूफान से तर जायेंगी। ... याद रखिये अपनेही मदत करेंगे। और किसीसे अपेक्षा मत किजीये। नसीबके तारे कभी झूट नही कहते... स्टार्स नेवर लाय!..."
असं म्हणून फारूखजींनी फोनवर निरोप घेतला.
मेनका व्यथित झाली. आता हे भविष्य ऎकून, आजकल घडणाऱ्या घटनांनी मेनकाचं वर्तमान आणि भविष्य ‘गुडलक’च्या बाजूने जाणारं नाही हे शेंबड्या पोरलाही सांगता आलं असतं. पण फारुखजींनी जुन्या चुका सुधारण्यापेक्षा मानून पश्चाताप करण्यास सांगितले होते. आपल्या लोकांवर विश्वास ठेवायला सांगितलं...
... पण त्यावर मेनकाचं विचारचक्र वेगात सुरू झालं... ‘इथे आपलं कोण आहे?’ मेनका आठवून दुःखी झाली. तिच्या आई अन धाकट्या भावानी केव्हाच मेनकाशी नातं तोडलं होतं. कारण त्यांच्यामते तिच्या हातून झालेल्या चुका अक्षम्य होत्या. हॉस्पिटलात असताना तिच्या एकाही नातलगाने तिला फोन करायचा प्रयत्न केला नाही. मेनकाने आपल्या आईच्या अन भावाच्या नावावर दोन फ्लॅट्स आणि बराच बॅन्कबॅलेन्स ठेवला होता. पण एवढं असूनही आई आणि भाऊ तिच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते.
...सगे सोयरे केव्हाच पारखे झाले होते... मग चुकांची माफी मागायची कोणाकडून... ‘त्या’ चुकांचं परिमार्जन कसं करावं हेच मेनकाला कळत नव्हतं... १२ जुलै नुकताच गेला होता... पण त्याची आठवण पंधरा वर्षं तशीच बोचत होती... मेनकाचं डोकं पुन्हा भणाणू लागलं... मेंदूत कुणीतरी ठोके हाणावेत असं शीर ठणकू लागलं... मेनकाच्या कानात आवाज घुमत होता.... कुणितरी रडतंय... कर्णकर्कश्य...
एक बाळ रडतंय .. तिथे त्या कोपऱ्यात... अंधारात ... ‘गीताबाई! मला नाही जमत!" ... आह! .... मेनका कळवळू लागली... तो आवाज मला खायला उठलाय... तिच्या पोटात कळ येऊ लागली... गीताबाई म्हणत होत्या, "जोर लाव... पोरी आणखी जोर लाव... बस एकदाच... अजून एकदा..." पण तो आवाज माझ्या जीवावर उठलाय... मला नाही जमत... नाही!", आह! मेनका कळवळत होती...
"मॅडम! मॅडम! क्या हुआ?", अचानक टिक्कू आणि गंगाधर मेनकाच्या बेडकडे धावले.
"मॅडम! मॅडम! ...", टिक्कू आणि गंगाधरचा आवाज हल्केच कानावर येत होता पण मुख्य ध्वनी तोच रडण्याचा... बाळ अजूनही रडत होतं... गीताबाई ओरडत होत्या, "पोरी तुला करायलाच पाहिजे... जोर लाव... तुझ्या आयुष्याचा सवाल आहे... बघ तोंड उघडलंय... एक वीत... येतंय ते बाहेर... "
"जल्दी डॉ. सहानी को बुलाओ... नर्स ... डॉक्टर...", टिक्कू आणि गंगाधर हडबडलेले मेनकाच्या दिशेने बघत होते पण मेनका पंधरा वर्षांपूर्वीच्या कळा सोसत होती.
शेवटी डोक्यातली आणि पोटातली कळ थांबली... रडण्याचा आवाज दूर जाऊ लागला.... गीताबाईंनी तो चिमुकला जीव दूर नेला तसा तो आवाजही दूरावला... पण दूर जातानाही ते रडणं काळीज हेलावून जात होतं.... एक गोंडस पोर गीताबाईंच्या हातात अस्पष्ट दिसत होतं ... पण ते पहायचा उसंतही मेनकाला मिळाला नाही.... तिला ग्लानी आली होती... टिक्कू आणि गंगाधरचे चेहेरे फिस्कटले.... पण अंधुक नजरेत दाराशी एक ओळखीचा चेहेरा भरला ... गौतमचा ... तोही ही दशा पाहून गांगरून गेला होता... मेनकाकडे धावला होता ... पण मेनकाची शुद्ध केव्हाच हरपली होती...
दोन तास लोटले. गौतम अंकल रूमबाहेर होते... व्यथित... चिंतीत... डॉ. साहनींना आत जाऊन बराच वेळ झाला होता. त्यांची ट्रिटमेन्ट ह्याधी कधीच एवढा वेळ घेत नसे... आज असं काय झालं असावं? गौतम अंकल नर्व्हस होते...
थोड्या वेळात डॉ. बाहेर आले.
"शी इज ओके नाऊ. पुन्हा तोच अटॅक. अ फ्यू मोअर ऑफ दीज ऍण्ड वी मे एंकाऊण्टर नर्व्हस ब्रेकडाऊन!", डॉ. नी अगदी गंभीर मूडमध्ये म्हटले. गौतम अंकल चिंतीत झाले, "बट डॉ. तुम्ही म्हणालेलात की तिचं हे अटॅक कमी व्हायला हवेत म्हणून. ती सायकोथेरेपी..."
"हो. त्याच थेरेपीने अटलीस्ट आज रूट कॉज तरी कळलाय.", डॉ.नी चश्मा काढत म्हटलं.
"काय? काय रूट कॉज?"
"इट्स हर सन! शी लेफ्ट हिम टू समवन एल्स."
"ओह!", अंकल एक क्षण सुन्नच झाले, " लॉस्ट सन! यू मिन शी हॅड अ सन! पण ... पण हे कसं शक्य आहे... मी तिचा इतका जवळचा मित्र आहे. मला माहित असायला हवं होतं.", अंकल गांगरले, "डॉ. आर यू श्युर?"
"येस आय ऍम श्युर. माझ्यावर विश्वास नसेल तर टिक्कूजी सांगतील तपशिलात. कदाचित त्यांना जास्त ठाऊक असेल...", डॉ. बाहेर येणाऱ्या टिक्कूजींकडे बघत म्हणाले, "आत सगळं घडत असताना टिक्कूजींचा चेहेरा बिंग फुटल्यासारखा घाबरेलला... क्यूं टिक्कूजी?"
डॉ. सहानी आणि गौतम अंकलच्या नजरा टिक्कू कडे लागून राहिल्या होत्या... टिक्कूने पीक गिळली... डॉ. आणि अंकलनी त्याला एका बंद केबिन मध्ये नेलं आणि विचारायला सुरूवात केली.... सुरूवातीस टिक्कू ‘नाही नाही’ करत असावा पण शेवटी गौतम अंकलनी कसलातरी धाक दाखवला अन टिक्कू वरमला... त्याच्याकडून सारी खरी बात शेवटी अंकलना कळली... टिक्कू सगळं ओकला होता... सत्य ऎकून गौतम अंकलाच्या पायाखालची जमिन सरकली होती... ते गप्पच झाले.
डॉ. ही सुन्न होते पण काहीतरी आठवून चमकले, "दॅट्स व्हाय. मला वाटतं धिस इस द रेमेडी टू हर मिजरी. तिच्या मुलाविषयी काहीही खबरबात आपण काढायला हवी. त्याने तिला भेटणं गरजेचं आहे. अशा अवस्थेत ह्या साऱ्या गोष्टींविषयी खुलासा व्हायलाच हवा. तिच्या मुलाच्या समक्ष. तिच्या आप्तलोकांकडूनच."
गौतम अंकल खरंच चिंतीत झाले… सुन्न.
दोन मिनिटं सगळ्यांचीच मती गुंग झालेली. हे सगळं कसं जमेल? काय करावं... अंकल पूर्णपणे बधिर झाले होते... पण अचानक कुठूनतरी एक धागा सापडला... "गीताबाई! ... ह्या गीताबाई कुठे राहतात?", गौतम अंकलनी थेट टिक्कूला प्रश्न केला... टिक्कूने सुरूवातीस आढेवेढे घेतले पण शेवटी अंकलनी पत्ता काढून घेतलाच... आणि क्षणाचीही उसंत न घेता काही मिनिटात त्यांनी गाडी नाशिकच्या दिशेने हाकली होती… थेट नाशिकवरून गीताबाईंना भेटून ते पूजाकडे येऊन ठेपले होते...
... "करण सुधाकर रूपवते! मेनकाचा मुलगा?", गौतम अंकलना विश्वास बसणे शक्यच नव्हते. "तोच जो माझ्या गाडीपुढे आदळलेला... पूजाचा फ्रेण्ड करण! ज्याला मी हॉस्पिटलात भेटलो... हाऊ इज दॅट पॉसिबल...", त्यांचं मन मानत नव्हतं... पण सत्य कितीही अविश्वसनिय असलं तरी सूर्यप्रकाशासारखं लपवता येत नाही हेच खरं... सुरूवातीस हसू येत होतं... स्वतःवर... मेनकावर... पण हा नियतीचाच विनोद होता... पुढ्यात सगळे सूत्रधार असूनही त्यांच्यात एवढं मोठं गुपित बांधलं गेलंय ह्याचा विचारही गौतम अंकलना शिवलेला नव्हता... अंकलना बराच वेळ लागला ... ह्या सत्यातून सावरायला... पण शेवटी त्यांनी मन खंबीर केलंच.
ते नुकतेच करणला भेटले होते... हाच करण मेनकाचं आयुष्य वाचवणार होता... पण समीर आणि सुलभा ह्यांचं काय?... गीताबाईंनी सांगितल्याप्रमाणे सुधाकररावांनी तर साम दाम दंड सगळं मेनकावर अवलंबिलं होतं... पण सत्य प्रकाशात आलं अन त्यांचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला ... वाटत होतं करणच्या कुटुंबियांना ह्याबद्दल सांगावं ... पण ते मानतील?... आपल्या कुटूंबाच्या कर्त्या पुरूषाच्या ऱ्हासाला कारणीभूत असलेल्या बाईला मदत करतील? ... मागल्या खेपेस करणच्या ऍक्सिडन्टच्या वेळी समीरशी बोलताना त्याने मेनकाविषयी दाखवलेली घृणा अंकलना आताही अस्वस्थ करून जात होती... समीर कदापी करणला मेनकाच्या पुढ्यात हजर करणार नाही... त्याची आईही नवऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मेनकाकडे करणला फिरकू देणार नाही... आयुष्यभर मेनका हिच करणची खरी आई असण्याचं गुपित लपवलेली ही लोकं आता खुद्द मेनकाला मदत का करतील? ...
... शक्यता, अशक्यतांचा खेळ बरीच मिनिटं चालू होता ... ह्या सगळ्यांत फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती ... करणच मेनकाला बरं करू शकत होता ... हे लवकरात लवकर करणं गरजेचं होतं ... कारण ब्लॅकवल्चरचा बंदोबस्त तात्पुरता होता.... मेनकावरचं खरं संकट अजून टळलेलं नव्हतं ... गौतम अंकल विमनस्क झाले होते ... विषण्णतेत पुढे मागे येऱ्याझाऱ्या घालत होते ... ही सारं कोडं म्हणजे पुढ्यात संजिवनी असूनही ती हाती येत नव्हती एवढं क्लिष्ट झालेलं होतं ... नशिबाने गौतम अंकलचे हात जणू बांधून ठेवले होते ...
... तरी अशात कुठेतरी निर्णय घेणं क्रमप्राप्त होतं.... अंकलनी धीर केला आणि आपल्या मोबाईलवर एक नंबर दाबला ....
"हॅलॊ! मी गौतम बोलतोय. मला तुला भेटांयचं होतं."
... फोनवर वेळ ठरली. उद्याची.
*****************
भाग सत्तावीस
आज घाटात पाऊस धोधो कोसळत होता. पण त्याची तमा न बाळगता गौतम अंकल लोणावळ्याला आले होते. त्यांची ही मिटींग पूर्ण करणे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे होते. आज गौतम अंकलचा जुना मित्र कित्येक दिवसांनी त्यांना भेटला होता.
"काय घेणार?"
"काही नको."
"अरे दोस्तीचा कायदा असा कसा मोडतोस... थोडी व्हिस्की तर घेशीलच... सॅडली मला अलाऊड नाहीये."
नको नको करतानाही दोस्तीखातर गौतम अंकलनी एक पॅग घेतलाच.
"चियर्स...", गौतम अंकलनी वेळ न दवडता थेट मुद्द्यालाच हात घातला, “खरं तर मला मेनकाविषयी बोलायचंय.”
मेनकाचं नाव ऎकताच गौतम अंकलचे जिगरी दोस्त, मनोहर मोहिते कोचवर ताठ बसले.
"कळलं मला मेनकाबद्दल. आता कशी आहे ती?", त्यांनी विचारलं.
"ठिक आहे. पण एमपीडीने तिची परिस्थिती पार खालावलीय. सतत अटॅक्स येतात.", गौतम अंकल म्हणत होते.
"पण परिस्थिती एवढी चिघळायचं कारण?"
"ह्ह!", गौतम अंकलनी उपहासिकपणे उसासा टाकला, "... कित्येक कारणं आहेत... बरीचसे किस्से... कुठकुठले सांगू?”, त्यांनी मामांकडे चिकित्सकरित्या पाहिलं, “त्याच कारणांचं निराकरण करण्यासाठी मी तुझ्याकडे आलो होतो."
"माझ्याकडे?", मनोहर मामा गोंधळले, "म्हणजे मला कळलं नाही..."
गौतम अंकलनी ग्लास टेबलावर ठेवला, "मेनका इस नॉट वेल.... दवादारूने सुधारण्याच्या पलिकडे गेलीय ती ... अशा परिस्थितीत तिला एकच मनुष्य ठिक करू शकतो...."
"कोण?"
"तिचा दुरावलेला मुलगा!"
अचानक मनोहरनी अविश्वासात गौतमकडे पाहिलं, "मुलगा?? ... सॉरी आय मस्ट हॅव हर्ड इट रॉन्ग... डिड यू से हर सन?"
"येस. य़ू हर्ड इट राईट... हर सन... तिचा मुलगा..."
"व्हॉट तिचा मुलगा? तिला मुलगा होता?"
"होता नाही आहे... मुंबईतच आहे.... आपल्यासोबत... तुझ्या सोबत..."
"काय म्हणतोयस तू गौतम? माझ्यासोबत?"
"हो ... तू तर त्याला अगदी चांगला ओळखतोच”
“कोण? काय ते नीट सांग.”
“ ... तुझाच भाचा ... करण!"
"व्हॉट़्ट! आर यू क्रेझी? करण आणि मेनकाचा मुलगा? ... काहीतरी बरळू नकोस ... दॅट इज अटर नॉनसेन्स.", मनोहर मामा गरजले. त्यांनी रागात आपली मूठ टेबलावर आपटली.
"मनोहर ‘नोनसेन्स’ म्हणण्याएवढं ह्यात वावगं काहीच नाही.", गौतम अंकलनी शांतपणे आपले वाक्य आणि ग्लासातली व्हिस्की संपवली, "तुला काय काय जाणून घ्यायचंय? मेनकाच्या प्रेगनन्सीविषयी, सुधाकररावांविषयी, गीताबाईंविषयी, पंधरावर्षांपूर्वी सावलीमध्ये घडलेल्या त्या प्रसंगाविषयी जेव्हा करणला गीताबाई...", गौतम अंकल अर्धवट बोलून थांबले... "आय नो एवरीथींग."
"यू डोण्ट नो एनिथींग" मनोहर मामा चवताळले, "ती बाई करणची आई असूच शकत नाही. सुलभाच त्याची खरी आई आहे. तुला कुणीतरी खोटी बातमी दिलीय." मामांनी पाण्याचा ग्लास भरला आणि ते घटाघटा प्यायले, "मला वाटतं तू इथून निघून जावंस गौतम! मी तुझी काहीही मदत करू शकत नाही."
"मनोहर प्लीज. मैत्रीच्या नात्याने तरी माझं ऎकून घे...."
"काय ऎकून घेऊ? करण माझ्या कुटूंबाचा हिस्सा आहे. मी त्याला पुन्हा त्या बाईला परत देणार नाहीये."
"अरे पण मी कुठे परत मागतोय करणला? मी कधी म्हटलं की मी त्याला तुमच्यापासून दूर करायला आलोय ते. मी एवढंच म्हणतोय की करणच एकमेव मनुष्य आहे इथे ह्याच्या हातून मेनका बरी होऊ शकते, आणि म्हणूनच करणला सगळं खरं सांगून."
"खरं?? काय आलंय खरं? कसलं आलंय खरं? जन्म घातलेल्या मुलाला वैरिणीसारखी उघड्यावर सोडणारी ती बाई. तिला पुन्हा करणची गरज कसली? हे बघ तू माझा उगीच वेळ खातोयस. तशीही माझी तब्येत ठिक नाहीये. तू इथून गेलास तर बरं होईल. मला हा त्रास डोक्यावर नकोय."
दोन मिनिटं कुणीच काही बोललं नाही. मनोहर एकायच्या मनस्थितीत नाही हे सरळच होतं. गौतम अंकल विवशतेत उठले.
"ठिक आहे मी जातो.", अंकल म्हणाले, "पण जर तू मला मदत करणार नसशील तर मला नाईलाजाने लीगल ऍक्शन घ्यावी लागेल."
गौतम अंकलचं हे वाक्य मनोहर मामांना चाचरून गेलं.
"हो लीगल ऍक्शन. गीताबाई आणि इतर लोकांच्या साक्षीने मी हे सिद्ध करू सकतो की करणच मेनकाचा मुलगा आहे. कारण तोच एक उपाय आता उरलाय करणला खरं काय ते सांगायचा. मेनकाची मदत करण्यासाठी त्याला मनवायचा हाच एक मार्ग मला दिसतोय... आणि एकदा कोर्टाची पायरी चढली की सर्वांना किती त्रास होईल हे तू जाणतोसच आणि त्या त्रासाचं पातक असेल तुझ्या माथी ... बट आय थिंक यू वुडन्ट बॉदर. वुन्ट यू!"
असं म्हणून गौतम अंकल दाराकडे पोचले पण त्यांनी दाराचा ओटा मुद्दामून ओलांडला नाही.
"गौतम प्लीज!", हळव्या स्वरात मनोहर मामांचा आवाज त्याना ऎकू आला, "अरे एवढी वर्षं छान चाललेलं आमचं कुटुंब... का ह्यावर घाला घालतोयस? काय मिळणार तुला ह्याने?"
"मी घाव घालतोय?", गौतम अंकल वळून म्हणाले, "अरे मनोहर तू तिथे हॉस्पिटलात मेनकाची हालत पाहायला हवी होतीस. आपल्या आयुष्यातल्या केवळ एका चुकीचं इतकं मोठं फळ भोगायला लागतंय तिला... आपल्या जीवानिशी जातेय ती... आता तूच सांग कोण जास्त दुःखी आहे? मी की तू?"
"अरे पण करण..."
"मनोहर अरे करणला आज ना उद्या हे कळणारच ... सत्य कधी लपून राहतं का? ... पण जर मेनकाचं काही बरं वाईट झालं आणि नंतर करणला तिच्याविषयी कळलं तर आपल्या जन्मदात्या आईला कधीही न भेटू शकण्याची सल आयुष्यभर त्याला लागून राहील आणि ती असेल केवळ तुझ्यामुळे... कारण माहित असूनही तू काहीही न केल्याचं पातक तुझ्या माथी लागून राहिल. जस्ट थिंक! डू यू वॉन्ट दॅट बर्डन ऑन युअर हेड?"
"पण...", मामा अजूनही आश्वस्त नव्हते, "...पण असं अचानक... मी कसं... करण मानणार नाही रे... म्हणजे करणला सगळं खरं सांगायचं? अरे तो काय, स्वतः सुलभा आणि समीर ह्याला तयार होणार नाहीत. मी करणचा मामा आहे रे. माझ्या बहिणीच्या कुटुंबाशी अशी प्रतारणा ..."
"हे बघ मनोहर, मी तुझं बधुत्त्व पणाला लावलेलं नाही. पण मेनका माझीही काहीतरी लागतेच आणि तुलाही ते ठाऊक आहे."
"ते ठिक आहे. बट धिस इज टू मच. इथे मी काय करू शकतो?"
"तूच तर करू शकतोस.", गौतम अंकल चटकन मनोहर मामांच्या बाजूस येऊन बसले, "करणचं मेनकाला भेटणं आवश्यक आहे आणि तेही तो तिचा मुलगा म्हणून... हे त्याने मान्य करायला हवं आणि मग मेनकाला माफही करायला हवं... ही भेट फक्त एकदा करवून दे ... त्याच्या आई आणि भावाच्या संमतीने केलंस तर दुधात साखरच ... त्यांनीही मेनकाला माफ करणं गरजेचं आहे."
"व्हॉट? आर यू आउट ऑफ युअर माईण्ड? सुलभा आणि समीर मेनकाला अजिबात माफ करणार? सात जन्मात हे शक्य नाही."
"सात जन्मात जे शक्य झालं नाही तेच करायचंय.", गौतम अंकल अगतिक झाले, "मनोहर माझ्या मैत्रीपायी कर. करण, सुलभाताईं आणि समीरला समजवणं तूच करू शकतोस. तुझं ऎकतील ते. प्लीज! आय बेग यू."
"पण ते मानणार नाहीत...", मनोहर मामा चिंतीत झाले, "शिवाय स्वतःच्या पापांचं परिमार्जन मेनकाने स्वतःच करायला हवं. चूक तिचीच होती.", मामानी लगेच तक्रारीचा सूर पकडला. ह्यावर गौतम अंकल एकदम नाराज झाले.
"चूक मेनकाचीच होती हे तू म्हणू शकत नाहीस मनोहर. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. मेनकाने मूल जन्माला घातलं ते काही स्वतःहून नाही. करण रूपवते खानदानाचाच वारस आहे. गीताबाईंचं वाक्य तू विसरलास?"
"हे बघ गीताबाई काहीही म्हणोत, माझ्या भावजींनी हे आरोप नाकारलेले.", मनोहर ठामपणे म्हणाले, "खरं खोटं काय ते फक्त गीताबाईना आणि मेनकाला ठाऊक होतं. त्यांनी भावजींना गोवलंय ह्यात."
"हाऊ कॅन यू बी सो नाईव्ह?", गौतम म्हणाले, "सुरूवातीला करण आपला मुलगा नाही हे नाकरणाऱ्या तुझ्या भावजींनी शेवटी करणचा सांभाळ सुलभाने आपल्या मुलासारखा करावा हे वचन तुलाच मरता मरता मागितलेलंच ना? सुलभाबाई आणि समीर तर करणला त्यांचाच वंश समजतात. तूही त्याला तुझा भाचाच समजतोस ना?"
"ते केवळ सुधाकरभावजींच्या शेवटच्या इच्छेखातर. शिवाय करणचा ह्यात काहीही दोष नाही मग त्याने हे सारं का सोसावं. त्याचा त्याग मेनकानेच केला. सुधाकररावांनी त्याऊलट करणला सांभाळलं ...", मनोहर मामा ईरेला पेटले होते. त्यांच्या मते मेनकाचा दोष हा सुधाकररावांपेक्षा जास्त होता, "मेनकाशी माझं काही देणघेणं नाही. इथे तू तुझाच स्वार्थ बघतोयस गौतम."
"मी स्वार्थी?", मनोहर मामांच्या ह्या वाक्यावर गौतम अंकल चरफडले, "मला स्वार्थी म्हणतोयस तू मनोहर? हे विसरू नकोस की ती माझीच कंपनी होती जिने तुझ्या कन्सलटन्सीत सर्वप्रथम पैसा लावला होता. तुझे ३० टक्के शेयर्स घेतले होते. का? मी स्वार्थी आहे म्हणून? का तुझा मित्र होतो म्हणून? … आणि जेव्हा तुझा बाजार भाव वधारला आणि तुला इतर चांगले क्लायण्ट्स मिळू लागले तेव्हा तेच ३० टक्के शेयर्स मी व्याजाविना तुझ्याकडून परत घेतले… तोही माझाच स्वार्थ? ... माझं जाऊदे पण तू तुला मेनकाशी काहीही देणघेणं नाही असं कसं म्हणतोयस तू? … अरे विसरलास? … पंधरा वर्षांपूर्वी मेनकाला पहिली मॉडलींग असायन्मेण्ट कुणी आणि कुठली मिळवून दिली होती?... तूच दिलेलीस, रूपवते टेक्स्टाईल्सची … नाही का? … मी माझी मैत्रिण म्हणून मेनकाच्या मॉडलिंग कॉन्ट्रॅक्ट्ससाठी तुझ्याकडे मदत मागितली होती अन तूच तिला रूपवते टेक्स्टाईल मध्ये घेऊन गेलेलास... तिथे सुधाकररावांशी तिची ओळख करून दिलेलीस... आणि म्हणतोस मेनकाशी तुझं काहीच देणंघेणं नाहीये?", गौतम अंकल तावतावाने म्हणत होते.
मनोहर मामांच्या चेहेऱ्यावर हतबलतेचा अन रागाचा सूर उमटला. त्यांनी गौतमच्या ह्या वाक्यावर खरडावून सुनावलं असतं त्याला पण ऑपरेशनमधून नुकतेच उठल्याने त्यांना कुठलाही स्ट्रेस घ्यायची मनाई होती. ऑपरेशन नीट पार पडलं आणि मनोहर आजारपणातून उठले म्हणून कुसुममामी आणि भूपेश श्रियासहित आज वणीला देवदर्शनाला गेलेले. गौतम अंकल मनोहर मामांचे खास जुने दोस्त होते. काल ह्या खास मित्राचा मामांना फोन आला. भेटणं ठरलं आणि मामांनी त्याला घरी बोलावले. पण गौतमची ही विझीट ज्या कारणासाठी होती ते मात्र असं निघेल ह्याची मामाना सुतरामही कल्पना नव्हती. गौतम अंकलनी पकडलेला हट़्टाचा सूर सुरूवातीपासूनच तसा होता. मामांच्या चेहेऱ्यावर चिंतेची रेषा आता विगुणीत झाली होती.
"मला वाटतंय तू अजूनही कन्विन्स्ड झालेला नाहीयस.... ", गौतम अंकल विवशतेत पुन्हा उठले, "ठिक आहे. मी निघतो..."
"थांब!", मनोहर मामानी गौतम अंकलचा हात पकडला आणि त्याना बसायला सांगितले. "आर यू श्यूर यू वॉन्ट टू डू धिस?"
"मी कधीही एवढा अश्युर्ड नव्हतो, मनोहर.", गौतम अंकल म्हणाले.
मामांनी उसासा टाकला, "गौतम... यू वोन्ट बिलीव्ह की फेट कसं गेम खेळतं तुमच्या सोबत...", मामांनी नाईलाजाने गौतम अंकलकडे बघून म्हटलं, "यू विल बी ग्लॅड टू नो की समीर आणि सुलभाने करणला खरं काय ते सांगायचं हे आधीच ठरवून टाकलंय. ते ह्या शनिवारी लोणावळ्याला त्यांच्या बंगल्यात येतायेत, करणसोबत आणि इथेच करणला सगळं सांगून टाकणारेत... समीरने मलाही तिथे बोलावलय. तिथे त्याना माझी गरज लागेल... लूक्स लाईक थिंग आर हॅपनिंग फॉर युअर बेनेफिट...". मामांनी खांदे पाडले.
मनोहरच्या ह्या टिप्पणीवर गौतम अंकल गप्पच झाले.
मनोहर मामांनी एक उसासा घेतला, "गौतम तुझं नशीब चांगलंय की आधीच समीरनेच मला त्यांच्या विजिट आणि प्लान विषयी सांगितलंय. ह्या शनिवारी ‘सावली’त जर सगळं नीट पार पडलं आणि करणने सत्य स्वीकारलं तर ठीक. मेनकाला भेटाण्याविषयी सुलभा आणि समीरला मनवण्याचा प्रयत्न मी करेन."
गौतम अंकल पटकन आनंदित झालेले मनोहर मामाना दिसले.
"पण!", मामांनी पुन्हा हतबलतेचा स्वर पकडला, " ... पण जर करण मानला नाही, ज्याची शक्यता जास्त आहे, तर मात्र हे सगळं व्यर्थ होईल. तेव्हा मलाही काही करणं शक्य होणार नाही.
पण गौतम अंकलचा नूर तर वेगळाच झाला होता. ते केवढेतरी आनंदीत झालेले वाटत होते, "म्हणजे तू खरंच असं करशील मनोहर? नक्की?"
मनोहर मामांनी गौतमच्या खांद्यावर हात ठेवला, "हो! मी प्रयत्न करीन... पण तू जास्त होप्स ठेऊ नकोस... कारण करणला कळल्यावर पुढे काय होणार ह्याची शाश्वती मी देऊ शकत नाही. सगळं ईश्वराच्या हाती आहे."
तसं पाहता गौतम अंकल मनोहरकडे निराशाच घेऊन आलेले. पण असा आशेचा थोटका किरण दिसायला मिळेल ह्याची त्यांनी दूरदूर कुठेच कल्पना केली नव्हती.
"इट्स ग्रेट! मनोहर, मी हमी देतो की मेनका किंवा मी करणला त्याच्या कुटुंबापासून दुरावणार नाही. करण हा रूपवते कुटूंबाचाच हिस्सा होता आणि पुढेही राहील. मेनकाच्या वतीने मी ही ग्यारण्टी घेतो.", गौतम अंकल हर्षभरीत स्वरात म्हणाले.
मनोहर मामा उसनं हसले. शनिवार बरा जाईल असं चेहेऱ्यावर भासवूनच. पण त्यांचं मन मानत नव्हतंच. शक्याशक्य सारखं काहीच सांगता येत नव्हतं. मनोहर मामा, सुलभा आणि समीर ह्या तिकडीला एक मोठं आव्हान पेलायचं होतं....
... ह्या शनिवारी काय होणार होतं ह्याचं भाकित खुद्द ब्रह्मदेवानेही क्लिष्ट करून ठेवलं होतं.
*****************
(क्रमशः)
प्रतिक्रिया
20 Aug 2011 - 6:17 am | प्राजु
आज मी सगळे भाग वाचले.
कथा नक्कीच वेगवान आहे. खिळवून ठेवणारी आहे.
अंदाजही बरेचसे खरे ठरले माझे.
शेवट मला जसा अपेक्षित आहे की हेच आता पहायचं आहे.
20 Aug 2011 - 10:27 am | प्रीत-मोहर
अस्सच म्हणते
20 Aug 2011 - 8:12 am | पिंगू
वेगवान कथा आहे. पुढचा भाग वाचण्यास उत्सुक..
- पिंगू
20 Aug 2011 - 11:32 am | जाई.
+१
20 Aug 2011 - 12:50 pm | धनुअमिता
हा ही भाग अपेक्षेप्रमाणे उत्तम.
20 Aug 2011 - 3:40 pm | गणेशा
हा भाग ही उत्तम.. पुढचा भाग येथे आहे.. पण काम खुप असल्याने ( काल तुमची कथा वाचत होतो आणि काम केले नाहिच म्हणु नाज यावे लागले [;)] ) पुढचा भाग नंतर वाचतो.
20 Aug 2011 - 3:57 pm | विनीत संखे
पुढ्चा भाग http://www.misalpav.com/node/18902
20 Aug 2011 - 4:03 pm | प्रीत-मोहर
मस्त पुभाप्र