भाग बत्तीस
"ओके, प्लासीची लढाई बंगाल मध्ये झालेली की प्लासीमध्ये?", सॅवियोने आपल्या बुद्धिमत्तेनुसार प्रश्न केला अन पूजाने नेहेमीप्रमाणे त्याची कीव करत त्याला उत्तर सांगितलं. दोन वाजल्यापासून पूजाच्या घरी दोघे सेल्फ स्टडी करत होते. ह्यात पूजाच स्टडी करत होती. सॅवियो फक्त छापत होता.
"ए पूजा. कसला विचार करतेस?", सॅवियोने दाराबाहेर एकटक बघणाऱ्या पूजाला विचारलं.
"अं.", पूजा भानावर आली, "काही नाही रे ... गौतम अंकल बरेच अस्वस्थ दिसतायत सकाळपासून ..."
"असेल काहीतरी.", सॅवियोने म्हटले तसं त्याला काहीतरी सुचलं, "हे पूजा, आपण करणला फोन करून विचारूया पोचला का?"
"मीही हेच करणार होते.", पूजाने सॅवियोला थांबवलं, "पण अंकलनीच मला थांबवलं."
"का?", सॅवियोने आठ्या पाडल्या.
"माहित नाही. म्हणाले की फोन वापरू नकोस म्हणून."
"ओके. ऍज ही सेज. पण असे चिंतीत असायचं काय कारण?"
"तेच तर कळत नाही. सकाळी सकाळी गीताबाईंना हॉस्पिटलात मेनकाकडे पाठवलं. स्वतः गेले नाहीत. अन मोबाईल धरून बसलेत. कुणाच्यातरी फोनची वाट पाहतायत."
"कुणाच्या?"
"माहित नाही. पण कुणीतरी खास असावं."
असं म्हणून आपल्या विचारात पडलेली पूजा सॅवियो ने विचारलेल्या कुठल्यातरी शंकेने भानावर आली आणि पुन्हा अभ्यासात गुंतली.
इथे गौतम अंकलच्या फेऱ्या सेकंदागणिक वाढत होत्या ... "मनोहरने अजून फोन का नाही केला..."
हा प्रश्न त्यानी कित्येकदा स्वतःला पुसला असावा. स्वतःहून फोन करायचंही त्यांच्या मनात आलं होतं ... पण तो मोह अंकलनी टाळलाच ... ते समोरून चांगल्या बातमीच्या अपेक्षेत होते. मनोहरचा फोन करण घरी पोहोचलेला तेव्हा सकाळी अकराच्या सुमारास आलेला. पण आता वाट पाहून चार तास लोटले. एव्हाना सगळं आटपायला हवं होतं.
शेवटी धीर करून अंकलनी मोबाईल ट्राय केला पण "आऊट ऑफ रेंज"चा मेसेज येत होता.
"डॅम्न इट!", अंकल वैतागून म्हणाले.
ह्याच टेंशन मध्ये त्यानी काल बोलण्याच्या ओघात करणकडून घेतलेला ‘सावली’चा फोननंबर त्यांना आठवला. त्यानी तोही नंबर फिरवला. पण मोबाईलने रेंज मिळाली नाही. शेवटी नाईलाजाने त्याना लॅण्डलाईनन वापरवी लागली. समोर रींग वाजली.
"हॅलो?", एका पुरूषाचा आवाज आला. मनोहरचा नव्हता. समीरचाही नसावा. आवाज चिंतीत वाटत होता.
"हॅलो! मनोहर मोहिते आहेत का?", गौतम अंकलनी अजीजीनं विचारलं.
"ते इथे नाहीत.", समोरचा आवाज म्हणाला, "त्याना बरं वाटत नव्हतं. म्हणून त्यांच्या घरी नेलंय... आपण?"
‘करण ... बाळा दार उघड बाळा ... ऎक माझं ... दार उघड ...’, मागून ओरडण्याचे आवाज येत होते, ‘अरे आम्ही तुला जे सांगितलं त्यामुळे काहीच बदलत नाही रे... मी तुझीच आई आहे... तू माझाच मुलगा आहेस... समीरचा भाऊ आहेस... आमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहेस...’
ह्या करणाच्या आई सुलभाताई! गौतम अंकलनी आवाजातली विवशता जाणली ... करणच्या आईचा आक्रोश बराच तीव्र होता ... फोनवरून परिस्थिती हाताबाहेर गेलेली वाटत होती...
"हॅलो आपण कोण बोलताय?", तोच भांबावलेला आवाज पुन्हा आला.
"अं! मी त्यांचा मित्र बोलतोय. जीडी", गौतम अंकलनी आपले नाव लपवत म्हटले, "पण मनोहर कुठे आहे? काय झालंय त्याला?"
"ते त्यांना जरा स्ट्रेस्स मुळे बरं वाटत नव्हतं म्हणून ..."
... ’करण दार उघड. ऎक माझं. अरे मला आणि आईला तुला हे सगळं सांगावं लागलं म्हणून आलेला तुझा राग मी जाणतो ... पण असं स्वतःला बंद करून काय साध्य होणार... हे बघ दार उघड... करण ... प्लीज लिसन टू मी...’
मागची गडबड वाढलेली ... आता दार आपटणारा हा समीर होता ...
‘आई आई तू रडू नकोस ... हे बघ करणला काही होणार नाही ... मी आणि भूपेश हे दार तोडतो ...’, तो आवाज सुलभाताईंना धीर देत असावा ... फोनवर बोलणाऱ्या त्या व्यक्तीचंही फोनवर लक्षच नव्हतं. त्यांच्या अडखळण्यातून तिथली परिस्थिती हाताबाहेर गेलेली स्पष्ट जाणवत होती.
"आपण कोण बोलताय?", गौतम अंकलनी विचारले.
"मी त्यांचा मेव्हणा बोलतोय, भूपेश....", अचानक भूपेशचा आवाज दूर गेला "ताई तुम्ही रडू नका मी ... मी ट्राय करतो... समीर लेट्स ... "
"बट इज मनोहर ओके?"
"हे बघा जीडी मनोहर भावजींचा बीपी वाढलाय म्हणून त्यांना घरी नेलंय. पण तुम्ही त्याना आता डिस्टर्ब न केलेलं बरं. आय ऍम सॉरी... आय होप यू विल अण्डरस्टॅन्ड ... आणि इथे एक सिच्युएशन झालीय म्हणून मी तुम्हाला अजून एंटरटेन नाही करू शकत ... सॉरी ... "
"इट्स ओके! मी नंतर ... ", अंकल बोलणार तोच लाईन कट झाली. भूपेश दार उघडायला धावला होता.
सगळं फिस्कटलं होतं. ज्याची भिती होतं तेच झालं. "मनोहरला जमलं नाही" हे गौतम अंकलनी ताडलं. जी आशा परवापासून गौतम अंकलना लागून राहिलेली ती आता पूर्णपणे धुळीस मिळाली होती... मनोहर ‘सावली’त नव्हताच... काय करावे सुचत नव्हते... त्याच्यावर तर सगळं टिकलेलं होतं... तो सर्वं सांभाळून घेईल असं वाटलेलं ... उलट करणने स्वतःला खोलीत बंद केलेलं ... जर त्याने स्वतःचं काही बरं वाईट केलं तर ? … अंकल चिंताग्रस्त झाले ... काही सेकंद कोरीच गेली... ते डोकं हातात धरून बसले होते... समोर अंधार पसरलेला दिसत होता... मेनकाच्या तब्येतीस सुधारू शकणारा एकमेव करण स्वतःच मॉर्टल रीस्क मध्ये आला होता ... त्याच्याशिवाय मेनका तर पूर्णपणे नष्ट होईल ...
... ‘नो आय विल नॉट लेट हर डाय!’ अचानक कुठेतरी त्यांच्या मनात निर्धार दाटून आला ... मेनका शुद्धीवर होती ... गीताबाई तिच्या सोबत होत्या ... समीर, सुलभा, करण ‘सावलीत’ होते ... ’व्हाय डोन्ट आय’ अंकल चमकले, हाच एकमेव उपाय दिसत होता ... असं केल्याने परिस्थीतीत नक्कीच फरक पडणार होता ... सत्यासत्याच्या गोष्टी मेनकाशिवाय अजून स्पष्ट असं दूसरं कोणीही सांगू शकत नव्हतं ...
बस्स! ठरलंच!
गौतम अंकल लगबगीत तयार झाले... त्यानी गीताबाईंना फोन करून तयार रहायला सांगितलं... ते बाहेर निघाले आणि एकसारखे घुटमळले.
"पूजा! सॅवियो!! तुम्ही ..."
"कुठे चाल्ला आहात अंकल?", पूजाने प्रश्न केला.
"कुठे नाही ... अर्जन्सी आहे... विल यू एक्स्यूज मी..."
"अंकल देयर इज समथिंग अबाऊट करण ... इजन्ट इट?", पूजाने अंकलना रोखून प्रश्न केला. सॅवियोनेही त्याची नजर गौतम अंकलवरच खिळवलेली.
"नो ... नो ... व्हाय आर यू सेयिंग दॅट?", अंकल त्यांच्या नजरा चुकवून म्हणाले, "... लूक मला लवकरात लवकर जायचंय.... यू हॅव टू लेट मी गो..."
"नो वी कान्ट... अन्लेस यू टेल अस एवरीथिंग...", पूजाने हट़्ट धरला.
"सिरीयसली काहीच नाही झालंय करणला."
"यू आर लाईंग!", आता सॅवियो म्हणाला, "तुम्ही लोणावळ्याला फोन केलेलात ना? करणच्या घरी? आम्ही करणच्या आईला रडताना ऎकलं, दुसऱ्या लाईनवरून. करणने स्वतःला एका खोलीत बंद करवून घेतलंय. समीर दरवाजा उघडायचा प्रयत्न करतोय. का? इज करण हर्टींग हिमसेल्फ?", सॅवियोच्या चेहेऱ्यावरही प्रश्नांची मांदियळी पूजापेक्षा काही कमी नव्हती, "यू हॅव टू टेल अस ..."
"देयर इस नथिंग लाईक दॅट. सी आय हॅव टु गो."
"देन आय वोन्ट लेट यू गो ... मी आई बाबाना सांगेन की करण संकटात आहे म्हणून ... आणि हेही सांगेन की तुम्हाला सगळं ठाऊक आहे ते ...", पूजाने धमकी दिली तसं गौतम अंकल गांगरले.
"पूजा व्हाय डोन्ट यू अंडरस्टॅन्ड ... मला काहीच ठाऊक नाहीये."
पण पूजाने दाराशी हात धरला होता ... धीटपणे.
"अंकल यू नेवर लाय टू मी.", पूजा गौतम अंकलच्या चोरट्या नजरा भापून म्हणाली, "प्लीज टेल मी ... प्लीज."
आता पूजाच्या आर्जवापुढे अंकलना मान तुकवावी लागलीच, "ओके ओके! ... येस! मी करणलाच भेटायला चाल्लोय ..."
"देन व्हाय डिन्ट यू टेल अस? ...", पूजाने अगतिकतेने त्यांना म्हटलं, "मीही येणार तुमच्या सोबत ..."
"मी टू ...", सॅवियोने लगोलग म्हटले.
"व्हॉट!", अंकल वैतागले, "आर यू आऊट ऑफ युअर माईण्ड! ... तुम्ही काय करणार तिकडे? लूक! डोन्ट मेक थिंग्स कॉम्प्लिकेटेड फॉर मी ... तुम्हाला तिकडे नेऊन मला तमाशा अजून वाढवायचा नाही."
"अंकल पण करण आमचा मित्र आहे ... त्याला असं काही झाल्याचं ऎकून आम्ही इथे कसे राहू? आम्ही त्याला त्या संकटातून वाचवायला जायलाच हवं.", सॅवियोने आर्जवाने म्हटले.
"सॉरी ऍण्ड धिस इज रीडिक्युलस! मी तुमची काहीएक मदत करू शकत नाही.", अंकलनी जबरदस्ती दोघांना दूर ढकलून दिवाणखान्याचा रस्ता पकडला.
दोघे गौतम अंकलंच्या मागे पळाले. गौतम अंकलनी दाखवलेल्या ह्या अग्रेशनमुळे, करण वर नक्कीच काहीतरी मोठं संकट कोसळलय हे त्यानी जाणलं. तोवर ही गडबड ऎकून पूजाचे आई बाबाही दिवाणखान्यात आले.
"काय झालं गौतम? पूजा काय झालंय?", पूजाच्या आईने गोंधळून विचारलं.
"बघा ना वहिनी ... धिस सिल्ली गर्ल! माझ्यासोबत यायचं म्हणतेय ...", गौतम अंकलनी लगबगीत दिवाणखान्यात टांगलेली आपल्या कारची किल्ली उचलत त्रासिक चेहेऱ्याने पूजाच्या आई वडिलांना म्हटले, "मला अर्जण्ट जायचंय लोणावळ्याला ... एवढ्या गडबडीत हिलाही यायचंय माझ्यासोबत ..."
"काय? पण पूजा असं अचानक? झालंय तरी काय?"
"आई करणचा जीव धोक्यात आहे गं ...", पूजाने आईला कळवळून म्हटलं.
"करण! का? काय झालं त्याला?"
"आन्टी मीही ऎकलं. फोनवर. त्याची आई खूप रडत होती. करणने स्वतःला रूममध्ये बंद करू घेतलंय. त्याच्या लोणावळ्याच्या घरी.", सॅवियोने पूजाच्या बोलण्याला दुजोरा दिला, "आणि म्हणूनच गौतम अंकल लोणावळ्याला करणकडेच चाल्लेत ... पण आम्हाला घेऊन जात नाहीत ... वी वॉण्ट टू मिट करण ... ही इज इन ट्रबल ... वी वॉन्ट टू सेव्ह हिम."
"सी हाऊ रिडिक्युलस इज दॅट!", गौतम अंकलनी शूज चढवले, "बघितलंत ह्यांना. ह्यांना वाटतंय की धिस इज सम सॉर्ट ऑफ ऍडवेन्चर ट्रिप ... नो ... नो पूजा ऍण्ड सॅवियो ... यू टू कॅन्नॉट कम ..."
"गौतम!", पूजाच्या वडिलांनी विचारलं, "पूजा म्हणतेय ते खरं आहे?"
गौतम अंकल वळले आणि त्रासूनच म्हणाले, "नो ..."
पूजाचे वडिल शांतपणे गौतम अंकलकडे बघत होते. त्यांची दृष्टादृष्ट झाली अन गौतम अंकलच्या डोळ्यांतलं खोटं त्यांना दिसलंच. ते आपसूकच बोलते झाले, "आय मिन ... या ... बट दे कुड बी रॉन्ग ... करण संकटात असेल असं गरजेचं नाहीये ... त्याने स्वतःला खोलीत बंद केरून घेतलंय ... तो कुठल्यातरी गोष्टीने अपसेट झालाय ... बस्स ... इट्स नॉट अ अ बिग डील." गौतम अंकलनी स्वतःला डिफेन्ड करायचा फुका प्रयत्न केला.
"... बट शी कुड बी राईट टू. इजन्ट इट! ही कुड बी इन डेंजर?"
गौतम अंकल एक मिनिट काही बोल्लेच नाही.
"गौतम", पूजाच्या बाबांनी गौतम अंकलकडे पाहिलं, "हे बघ माझी स्मरणशक्ती कमी असली तरी ह्या तिघांची घट़्ट मैत्री मी माझ्या डोळ्यांदेखत हिलीय ... जर तो खरोखरच संकटात असेल तर त्यांनी तिथे जायचा हट़्ट धरला ह्यात गैर काय? ... कदाचित तो त्याच्या मित्रांना पाहून अपसेट होणार नाही ... बाहेर येईल ... हू नोज?"
"बट हरीश मी कुठे त्याना सांभाळत बसणार? तू ..."
"जर मी संकटात असतो तर तू मला त्यातून सोडवायला आला असतास. हो ना?"
"याह बट दॅट्स डिफरण्ट! वी आर ग्रोनप्स."
"ग्रोनप्स? मेनका तुझी जिवलग मैत्रिण आहे. शाळेपासून. तिचे बाबा त्यांना सोडून गेल्यावर तिला अभ्यासात मदत केलीस तू. का? तेही आपले पैसे तिच्या अभ्यासावर उडवून? त्यासाठी तुझ्या आई वडीलांचा ओरडाही खालास? तू ग्रोनप नव्हतास तेव्हा. कमवत नव्हतास. तरी आपल्या आईवडीलांच्या विरोधात गेलास. एक शाळकरी पोर असूनही तुला का काळजी वाटली तिची? का? मग असं असेल तर हाऊ कॅन धिस बी एनी डिफरण्ट? ..."
पूजा आणि सॅवियो आश्चर्यचकित होऊन हे सारं ऎकत होते ... गौतम अंकल आणि मेनकाच्या फ्रेण्डशिपचा हा अनैकीव किस्सा ... अगदी त्या तिघांच्या फ्रेण्डशिपसारखाच. पूजाच्या बाबांचं ऎकून स्वतः गौतम अंकलही गप्प झाले होते.
"आय थिंक यू गॉट माय पॉइण्ट...", पूजाच्या बाबांनी आपला चष्मा पुसला आणि डॊळ्यांवर चढवला.
एरवी चारचौघात धांदरट बाबांना आवरताना ओशाळणाऱ्या पूजासाठी, तेच बाबा आज मॅटर ऑफ प्राईड ठरले होते. पूजा बाबांकडे ओलाव्याने बघत होती. तिनं त्यांना कडकडून मिठी मारली.
"ओके. फाईन! यू बोथ कॅन कम.", अंकलनी नांगीच टाकली.
"आम्ही सॅवियोच्या आईवडिलांना सांगू. डोण्ट वर्री.", पूजाच्या वडिलांनी म्हटले, "आणि उज्ज्वलला सांभाळून घ्या!"
"बाबा करण!!", पूजा लटक्या रागात ओरडली पण बाबांच्या ह्या पुढच्या सगळ्या मिस्टेक्स त्याना पूजाकडून माफ होत्या.
"क्विक! आपल्याला संध्याकाळपर्यंत लोणावळ्याला पोचायचंय.", अंकल त्याना गाडीत बसवत म्हणाले, "पण त्याआधी आणखी एक गोष्ट करायचीय..."
अंकलनी असं म्हटलं अन गाडी लीलावतीकडे हाकली...
****************
भाग तेहतीस
सावलीत सूर्य केव्हाच मावळतीस गेला होता. आई धाय मोलकून दाराशी डोकं टाकून पडली होती. दुपारची संध्याकाळ झाली होती. गेल्या पाच सहा तासांत होत्याचं नव्हतं झालं होतं.
"करण, बाळ. दार उघड रे माझ्या राजा!", पण तिचा आक्रोश फुका होता. करणचं हृदय पाषाणासारखं झालं होतं. दिवस संपायला आला पण सावलीतल्या परिस्थितीत काहीच फरक पडला नव्हता.
"आय हेट यू" हे करणचं बेंबीच्या देठापासून किंचाळलेलं त्यांना काही तासांआधी ऎकू आलं होतं ... पण त्यानंतर आतून सगळं सुन्न सुन्न झालं होतं.
"करण प्लीज आमचं ऎकून घे ... लूक ... तुला माझा राग आलाय का? डू यू वॉन्ट टू हिट मी? देन यू कॅन हीट मी. पण प्लीज बाहेर ये…. अरे बाहेर येऊन मला कन्फ्रन्ट तरी कर... प्लीज ... करण आय बेग यू ... प्लीज डोन्ट डू धिस टू अस ..."
समीर, भूपेश, आई सगळ्यांचे टाहो त्या निर्जीव दाराशी आपटून जणू परतत होते. आत करणने बाबांच्या जुन्या रूम मध्ये स्वतःला बंद करून घेतलं होतं. खोलीचं दारही चार इंच जाडीच्या सागाचं होतं ... मानवी शक्तीने जबर उघडण्याच्या पलिकडे ते होतं. ते दार कसं उघडायचं ह्या विवंचनेत भूपेश आणि समीर होते. त्या मनस्थितीत कुसुममामी परतलेली त्यांना कळलीच नाही.
भूपेशने तिला पाहिलं तसं "भावजींचं काय?", असा प्रश्न तिला केला.
"मी गोळ्या दिल्यात. डोकेदुखी थांबलीय आणि ब्लडप्रेशर नॉर्मल झालंय. गोळीच्या प्रभावाने आता झोपलेत.", मामी चिंतीत दिसत होती, "पण करण..."
"काहीच बोलत नाहीय ... आत काय करतोय काहीच कळत नाही, काही बरं वाईट करून बसला तर ...", भूपेशने कुजबुजत कुसुममामीला म्हटले तसे आईने हुंदका सोडला.
कुसुममामीने आईला कुशीत घेतलं ... आई अर्धग्लानीने निपचितच पडली ...
"ताई सांभाळा ... करण आहे आत. सुखरूप आहे ... करण … करण बघ आईची हालत तरी बघ रे ... का तिला असा सतावतोयस ... बाळ प्लीज ऎक माझं ... ये बाहेर ..."
कुसुममामीने सतराशे साठ वेळा हेच शब्द करणला म्हटले असतील पण करणचा काहीच मागमूस लागत नव्हता.
"पोलिसांना बोलावयचं?", भूपेशने व्यथित समीरला विचारले.
"पोलिस!", समीर थोडा चिंतीत झाला पण आता तोच एक उपाय दिसत होता ... त्यातही केवढा वेळ जाईल अन काय हे समीरला कळत नव्हतं ... जवळचं पोलिस स्टेशनही चांगलं चार मैल दूर होतं ... पण तेच शेवटचं करायचं उरलेलं ...
समीरने नाईलाजाने "हं" म्हटलं अन भूपेशने फोन उचलला. फोन डायल करणार तोच सावलीच्या अंगणात कुठलीतरी गाडी येऊन थांबल्याचं त्याना ऎकू आलं. समीर आणि भूपेश चमकले. भूपेशने फोन ठेवला अन तो दाराकडे गेला आणि त्याने दार उघडलं...
"भूपेश कोण आलंय?", समीरने मागून विचारले तसं भूपेश काही न बोलताच बाजूला झाला आणि त्याच्या आडून पूजा आणि सॅवियो दृष्यमान झाले...
"पूजा! सॅवियो!!", समीर चमकला, "तुम्ही इथे?"
"हाऊज करण? करण कुठेय", सॅवियो पूजाने एकदमच समीरला विचारले... "आम्ही ऎकलं सुलभा आन्टींना फोनवर रडताना... म्हणून लगेच आलो... कुठेय करण?", समीरने बावरलेल्या चेहेऱ्याने त्याना रूमचं दार दाखवलं.... दारा समोर कुसुममामीच्या हातात करणची आई पडलेली होती...
"आन्टी आन्टी बघा आम्ही आलोय!"
पूजा आणि सॅवियोला पाहून करणच्या आईला पटकन धीर आला, "करण करण", ती पुन्हा दारावर हात मारू लागली, "हे बघ तुझे मित्रही आलेत... सॅवियो आलाय पूजा आलीय... "
सॅवियो आणि पूजाही दार ठोठावू लागले, "करण लूक! मी सॅवियो ..."
"करण मी पूजा ... आम्ही आलोय तुझ्यासाठी ... दार ऊघड ना प्लीज ... आमच्यासाठी तरी उघड ..."
समीर अजूनही हबकलेलाच होता. सॅवियो आणि पूजा इथे कसे आले असतील हा प्रश्न पडला तसा तो मागे वळला आणि समीरने भूपेशकडे थोडक्यात आश्चर्य व्यक्त केलं. पण पाठमोरा भूपेश दोन सेकंद गोठलेल्या अवस्थेत उभा होता. तो काहीही म्हणाला नाही पण फक्त गप्पपणे बाजूला झाला अन त्याच्या आड समीरला दिसली...
तीच...
प्रथमदर्शनी त्याने तिला ओळखलंच नाही ... पण मग अचानक त्याला जाणवलं अन त्याच्या हृदयाचा ठोका चुकला ...
... हे शक्यच नव्हतं ... ती इथे ... समीर गांगरला ... खरंच ही ... नो वे ... शी कान्ट बी ...
... मेनका?
पण हा आभास नव्हता. ती मेनकाच होती. हो मेनकाच! दॅट ब्लडी ट्रेटर मेनका!
समीर पुढे सरसावला आणि मेनकाकडे बघत दोन मिनिटं थबकलाच... ही ‘ती’ मेनका नव्हती ... चित्रपटांतली... कमनिय मेनका... आज तिला शृंगाराची चौकट लाभलेली नव्हती ... उलट काळाचे आघात बसलेले होते... तिचे डॊळे आत खोल बुडालेले... डोळ्यांखालच्या काळ्या रेषांनी तर सारी अक्षखोबणी व्यापली होती... सुकलेल्या गालावर आतून हाडं उमटलेली ... एरवी त्वचेत पसरलेला गुलाबी रंग निस्तेज पिवळ्या रंगात बदललेला ... केसांची वेणी कशीबशी विखुरलेल्या बटा सांभाळत होती... शरीरात जणू जीवच उरला नव्हता... एवढाच जीव होता जो एखाद्या झॉम्बीत असावा ... आपल्या खोल शून्यात गेलेल्या डॊळ्यांनी ती समीरकडे बघत होती ... एकटक ... तिच्या मागून दृष्य झाले गौतम आणि त्याच गीताबाई ... कुसुममामी आणि भूपेशही मेनका सोबत गीताबाई आणि सोबत गौतम दोशीला बघून एकदम गोंधळून गेले.
"ही इथे काय करतेय?", समीरच्या चेहेऱ्यावरचे भाव रागात बदलले. त्यानी गौतम अंकलकडे पाहत हा प्रश्न केला. गौतम अंकलनी समीरकडे एकचित्तानं पाहिलं.
"तिच्या मुलाला भेटायला आलीय ..." ... गौतम अंकलच्या चेहेऱ्यावरची रेखही हलली नव्हती हे सांगताना...
तिथे असलेला प्रत्येक जण ह्या वाक्याने चरकला... पूजा आणि सॅवियो तर अजूनच... आईही मेनकाकडेच भेदरलेल्या नजरेनं पाहत होती.... समीर तणतणला.
"चार लोकांत स्वतःची इज्जत काढायला तुम्हाला हीच वेळ मिळालीय काय? आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. गेट लॉस्ट फ्रॉम हियर."
... गौतम अंकल उद्धटपणे हसले.
"समीर ...", त्यानी समीरकडे एक थंड कटाक्ष टाकला, "समीर सुधाकर रूपवते ... सुधाकर रूपवतेंचा ज्येष्ठ पुत्र ... रूपवते खानदानाचा थोरला वंशज ... आणि आपल्या भावाच्या सख्ख्या आईशी असं वागतोय ... वाटतं आजकल नेवीत मॅनर्स शिकवत नाहीत ..."
"यू!", समीर त्वेषात पुढे आला अन त्याने गौतम अंकलची कॉलर धरली पण प्रसंगावधान ठेवून ती तशीच सैल सोडली आणि आवाजात कशीशी अदब आणली.
"हे बघा मिस्टर दोशी. तुमच्या ह्या ‘जीवलग’ मैत्रिणीला इथून घेऊन जा. आमच्या कुटुंबाचे तिच्यामुळे झालेले हाल आधीच पुरेसे आहेत. त्याच्या आणखी चिंध्या करायची गरज नाही... इथे आमच्या घरात तमाशा करायची गरज नाही..."
"तमाशा!", गौतम अंकलनी हसून मेनकाकडे पाहिलं. ती मात्र समीरकडेच निरर्थक नजरेनं बघत होती, "तमाशा तुमचा झालाय? इथे पाहा, ह्या बाईकडे पाहा...", अंकलनी मेनकाला दंडानिशी खेचून सगळ्यांच्या समोर आणलं, "एक बाई जी आपल्या मित्रांसाठी, सग्यांसाठी जीव टाकते तिला त्यांनीच एकमताने दोषी मानून टाकलं ... तिची बाजू लक्षात न घेता तिला वाळीत टाकलं... हा होता तमाशा... ज्या माणसाला तिनं आपलं मानलं ... त्याच्याच पापात तिला सामील व्हावं लागलं ... चुकीनं ... तो होता तमाशा ... तेच पाप पोटात घेऊन समाजाला सामोर जाण्यास ती सज्ज झालेली असतानाही केवळ त्याच माणसाच्या कुटुंबाच्या स्टेटसला तडा जातो म्हणून तिला जबरदस्ती अबॉर्शन करायला लावावं... हा झाला तमाशा... अन ते केलं नाही म्हणून तिच्यावर मानसिक अत्याचार करावेत? ... तमाशा ह्या कहाणीत आहे की तुमच्या चार भिंतीत चाललेल्या ह्या फॅमिली ड्राम्यात? टेल मी मि. रूपवते."
समीरचे रागरंग गडद झाले होते. ‘सावली’च्या छपराखाली पुन्हा एकदा उभी असलेली ही मेनका त्याला क्षणभरही सहन होत नव्हती... रागात त्याच्या मुठी आवळत होत्या.
"आमचा ड्रामा? ड्रामा तर ही रांड करतेय", समीर गरजला मेनकाला शिवी हासडत, "कधी पडद्यावर कधी प्रत्यक्षात. वयाने वीस वर्षं मोठ्या विवाहित पुरूषाकडून आपलं पोट फुगवून... हिला विचारा, तमाशा कसा करायचा ते? एक सुखी कुटूंब कसं उद्ध्वस्त करायचं ते ...", समीरने एवढा वेळ गौतम कडे बघत ठेवलेला रोख मेनकाकडे वळवला पण तिच्या डोळ्यातली भावनाहीनता त्याला खायला उठली.
"काय बघतेस हं! बघतेस काय ? माझ्या कुटुंबाचा सत्यानाश केलास ते? माझ्या वडिलांना फूस लावलीस ते? माझ्या आईला विधवा बनवलेस ते? ... की माझ्या निष्पाप भावाच्या जीवनात पंधरा वर्षांनी पुन्हा तसंलच वादळ आणलंस ते? काय?"
"मि. रूपवते, तुम्ही हा प्रश्न कुणाला विचारताय?", गौतम अंकल मध्येच आले, "हिला! ... ह्ह! ... ही काय बोलणार? पंधरा वर्ष स्वतःचं काचेचं घर तुटत चाल्लेलं पाहणारी मेनका तुमच्या आयुष्यात काय वादळ आणेल? अरे बघा हिच्याकडे ... सारासार विचार करायचीही कुवत नाहीये तिच्यात ... आत्मा केव्हाच मेलाय तिचा ... ही शरीराचं लक्तरं घेऊन मरणाची वाट बघतेय ती ... शुद्धीवर असते तेव्हा गप्प असते आणि बेशुद्ध असते तेव्हा आक्रोश करते ... आपल्या मनातल्या शिळ्या आठवणीचा, पापांचा ... चुका, प्रायश्चित्त सगळ्यांचा ... अरे अश्वत्थामाच्या पश्चातापाची परीक्षा भोगलीय हिनं ... प्रत्येक क्षण एकेका युगा सारखा आपल्या मनात सोसलाय तिनं."
"हिनं भोगलाय पश्चाताप? पंधरा वर्षं सुखासीन जीवन भोगलेली ही. कित्येक पुरूषासोबत शय्यासोबत केलीय असेल हिनं हिलाच ठाऊक ...", समीर तुच्छतेनं तिच्याकडे बघत म्हणाला, "आणि तुम्ही म्हणताय हिनं भोगलंय दुःख? ओह आय सी...", समीरने गौतम अंकलकडे एक ओंगळवाणा कटाक्ष टाकत म्हटले, " ... नाहीतरी तुम्हीही त्याच आळीतले. तिच्या बॉयफ्रेण्ड्सच्या लीस्टमधले सर्वात वरचे. नाही काय?", समीरने कुत्सितपणे आरोप गौतम अंकलवर लावला तसं गौतम अंकलच्या चेहेऱ्यावरची शीर ताणली गेली.
"माझ्या चारित्र्याचा हिशेब मांडण्याधी जरा स्वतःच्या झोळीत बघा मि. रूपवते!", गौतम अंकल गरजले.
"लूक मि. गौतम.", भूपेश पुढे आला, "इथे आमच्याशी वाद घालून तुम्हाला काहीएक मिळणार नाही. तुम्हाला भावजींना भेटायचं असेल तर तुम्ही आमच्या घरी जाऊ शकता. पण इथे हिला आणून तुम्हाला काही एक साद्ध्य होणार नाही. आम्हाला हिच्यापेक्षा करणची फिकर जास्त आहे ... सो प्लीज लीव्ह."
"हे बघ भूपेश, मी ही करण साठीच आलोय इथे. करणच्या मित्राना आणायचं माझं प्रयोजन हेच होतं. मेनका आणि हे त्याचे मित्रच करणला परत आणू शकतात." गौतम अंकलनी इतरांकडे बघत त्याना आश्वस्त करायचा यत्न केला.
"खरं काय ते कळल्यावर तुम्हाला अजूनही वाटतं दॅट धिस होर्र कॅन ब्रिंग माय करण बॅक टू अस?", समीरने पुन्हा मेनकाला शिवी दिली तसं गौतम अंकल उफाळले ...
"माईण्ड युअर लॅन्ग्वेज समीर! ...", त्यानी समीरवर हात उगारला.
"...काय चूक बोलला तो?", कुसुममामीही आता पुढे आली, "करणला सोडून गेलं कोण? त्याचा त्याग केला कुणी? हिनेच ना? मग आता त्याच्यावर आलेल्या ह्या प्रसंगासाठी जबाबदार कोण? हिच ना? तुम्ही म्हणताय ते पश्चात्ताप करतेय ते आधी पाप केलं म्हणूनच ना? ..."
"...ह्ह! मामी कुणाबद्दल सांगताय तुम्ही हे सगळं?", समीरने पुन्हा त्याचं तोंड उघडलं, "हिला आपल्या कृत्यांचा काय पश्चाताप? पुरूषांना आपल्या बोटांवर नाचवणारी ही, हिला कसला आलाय पापाचा धाक. अरे हिच्यासारख्या वेश्येला कसली आलीय लाज? ..."
"... हिच्यासारखी स्वार्थी स्त्री मी तरी कुठे पाहिली नाही", भूपेशने आपलं मत मांडायला सुरूवात केली, "सर्वांच्या भावनांशी खेळून, मैत्री आणि आपुलकीची नाती नासवून हेच तर मिळणार होतं हिला ... एकटं जीवन ... आपल्यांपासून दूर रहायची ही एकाकी शिक्षा ... शी डीजर्व्ह्स ऑल ऑफ धिस!"
"होर्र"... "स्वार्थी"... "रांड"... "पापी"... "वेश्या"... चहूबाजूंनी तिच्या चारित्र्यावर शेण फेकलं जात होतं ... ह्या चारित्र्यहननाच्या चितेवर एकटी बसली होती ती ... "चारित्र्य विकणारी" ... असहाय्य... हे सर्वं फक्त ऎकू शकणारी... "चिमुरड्या बाळाला वाऱ्यावर सोडणारी चांडळणी"... काय बोलणार ती... वचनांच्या बंधनात... शिष्टाशिष्टांच्या चौकडीत... "नगरवधूची जात" ... न केलेल्या चुकांच्या आरोपात फक्त ऎकणंच भाग होतं... तिच्या मनात आर्त किंकाळ्या उफाळू लागल्या... कानात आवाज घुमू लागला... एका बाळाचा स्वर... कर्णकर्कश्श्य!!... पोटातून बाहेर येणारा ...
"आह! गीताबाई!", मेनका कोसळली होती. गीताबाई अस्वस्थ होऊन पुढे झाल्या. "गीताबाई! खूप दुखतंय हो..."
गीताबाईंनी हात पकडला, "व्हय पोरी दुखणारच ना... बघ येक हिस्का लाव..."
..."व्हॉट द हेल्ल इज धिस?", समीर ओरडला, "हे काय नवीन नाटक... हे बघा मी पोलिसांना बोलाविन... ही तुमची नाटकं इथे चालणार नाहीत.", समीर साठी पाणी नाकापर्यंत आलं होतं... "मिस. गौतम आर यू लिसनिंग?"
गौतम अंकल समीरकडे वळले.
"नाटकं? नाटकं वाटतात ना ही तुम्हाला? आता बघा नियतीचं नाटक! तुमच्या डोळ्यांदेखत... सर्वांनी...", अंकलनी चहूकडे पाहिलं... आधीच समोर घडणाऱ्या घटनेने सगळे चक्रावलेले होते.
"सुलभाताई तुम्हीही पहा... तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं तुम्हाला आता सापडतील.", गौतम अंकलनी तेवढ्याच निर्धारानं समीरच्या आईला म्हटलं.
सुलभाबाईंनी पाहिलं... समोर जमीनीवर मेनका कळवळत होती... तिच्या कपाळावर घाम जमला...
"गीताबाऽऽऽऽईईईई आह! म्म्म्माआह! नाही जमत ... अजिबात नाही जमत.... मी मरून जाईन..."
"न्हायी पोरी मी हाये..."
"...गीताबाई", अचानक गौतम अंकलचा आवाज घुमला, "बाजूला व्हा..."
गीताबाई गोंधळल्या, "काय? पन साहेय ति मला बोलावतीय"
"मी म्हटलं बाजूला व्हा...", गौतम अंकलनी आवाजात जरब आणली, "माझं ऎका... बाजूला व्हा..."
गीताबाईंनी थरथरत कसाबसा त्यांचा हात मेनकाच्या घट़्ट हातातून सोडवला.
"गीताबाऽऽऽई!!! नका मला सोडून जाऊ ... कुठे गेलात गीताबाई .. अहो मला खूप दुखतय ..."
गीताबाईंनी ओठांवर हात ठेवून एक असहाय्य हुंदका दिला, मेनकाला अशा अवस्थेत मदत न करता फक्त बघायचं काम त्यांच्या वर आलं होतं...
"गीताबाईऽऽऽऽ! गीताबाईऽऽ! कुठे आहात तुम्ही? परत या? ... आह!!... खूप दुखतंय... आई... मला खूप दुखतंय... प्रचंड दुखतंय ... अंगावर चरा पडतायत... मी कसा जन्म देऊ? माझा जीव जातोय हो... आआऽऽऽऽऽह.."
सगळे मेनकाला कळवळत बघत होते. सॅवियो आणि पूजातर आणखीनच घाबरले होते... मेनकाने पंधरा वर्षांपूर्वीच्या सोसलेल्या प्रसूतिवेदना आज सगळ्यासमोर आल्या होत्या... तिची करणला जन्म देतानाची घालमेल सगळे श्वास रोखून बघत होते... कुसुममामी तर भूपेशच्या खांद्यामागे डोळे लपवून हे सारं बघत होती... आईचा चेहेरा एकदम भयांकित झाला होता …
तब्बल दोन मिनिटांच्या ह्या कळा झेलून मेनका बेशुद्ध पडली. गीताबाई तिला सांभाळायला पुढे सरसावल्या पण गौतम अंकलनी त्याना थांबायची खूण केली.
"व्हॉट्स द मिनिंग ऑफ ऑल धिस?", समीरला काहीच कळत नव्हते, "तिची ही टुकार ऍक्टींग करवून काय प्रूव करायचंय तुम्हाला मि. दोशी ... लूक यू आर वेस्टींग युअर टाईम हीयर... आय ऍम लीस्ट बॉदर्ड अबाऊट हर राईट नाऊ... सो प्लीज्ज... एकतर इथून नेटानं निघून जा नाहीतर मी पोलिसाना बोलाविन ", असं म्हणून समीरनं गौतम अंकलच्या मागच्या टेबलावरचा फोन पोलिसांना लावायला उचलला...
तोच एक किरकिरा आवाज त्याच्या कानांशी थबकला...
"डॅडी!"
... सगळे गोंधळले... आणि आवाजाच्या दिशेने पाहू लागले...
"डॅऽऽऽडी!"
पुन्हा तोच आवाज आला... कुणालाच कळलं नाही तो आवाज येतोय कुठून? ... पण तो तिथूनच कुठून तरी येत होता... त्यांच्यातूनच येत होता... सगळ्यांनी आवाजची दिशा पकडली आणि वळून मागे पाहिलं... खाली बसलेल्या मेनकाकडे ... तिने डॊळे वर केले आणि गौतम अंकलकडे बघितलं ...
"डॅडी!"
गौतम अंकल बाजूला झाले आणि त्यांच्या आड दर्शित झाला फोनवर हबकलेला समीरचा चेहेरा...
"माझे डॅडी!"
.... तो आवाज ऎकून समीरच्या हातून रिसीव्हर पडला... त्या रिसीव्हरचे हेलकावे बघून मेनकाने एक हास्य मांडलं आणि ती जोरात किंचाळली ...
"डॅडी डॅडी ..." तिने समीरकडे बोट दर्शवलं ...
"व्हॉट द …", समीर गांगरला, "डॅडी? कोण डॅडी... व्हॉट्स ऑल धिस नॉन्सेन्स?"
"डॅडी डॅडी मी...", मेनकाने खोल गेलेले तिचे डोळे वटारत थेट समीरकडे बघतच प्रश्न केला, "अजून नाही ओळखत मला?"
समीर हबकलेलाच होता ...
मेनका खुदकन हसली … "डॅडी मला ओळखत नाही ... मी डॅडींचं बाळ असूनही ... ", मेनका पुन्हा खिदळली, "मीच तुमचा मुलगा... मी आहे ते ह्या वांझोटीच्या पोटात जगलेलं ते गिधाड ...
माझं नाव …
...
...
...
ब्लॅकवल्चर !!!"
****************
भाग चौतीस
"धिस इस इम्पॉसिबल!"...
’ब्लॅकवल्चर!’ ... पूजा घाबरून दोन पाऊलं मागे सरकली होती... सॅवियोला तर काय बोलावे हेच कळत नव्हते... समीर भितीने गारठला होता तर आईचा श्वास आत अडकला असावा... दूर ढगांच्या गडगडाटाशिवाय फक्त एकच आवाज ‘सावली’त ऎकू येत होता... तो किरकिरा आवाज.... मेनकाचा...
..."डॅडी मिळाले.... माझे डॅडी मिळाले..." ... मेनका उभी राहिली आणि समीरच्या समक्ष जाऊन त्याच्या डॊळ्यांत वेड्यासारखं पाहू लागली... अस्ताव्यस्त पसरलेल्या तिच्या बटांमधल्या केसांतून तिने तिरके डॊळे थेट समीरवर रोखले गेले ... ती हसू लागली...
"आता वांझोटीला चांगलीच अद्दल घडेल... मला वाऱ्यावर टाकून गेली नं ती... दुनियादारी करायची होती ना तिला... पण डॅडी आल्यावर काय करणार ती? एकदा त्यांना कळलं की तिने केलेलं वचन मोडलं की मग तिची खैर नाहीच... तिचं सडकं कुजकं चारित्र्य चव्हाट्यावर आता येणार... मग बघतो कशी सोसते मला ती... आता तिचा माझ्यावर कंट्रोल नाहीच... मी स्वतंत्र आहे... फ्री आहे... तिचा मुलगा, मी, ब्लॅकवल्चर आता मोकळा झालोय...", आणि मेनका खिदळत हसू लागली. तिच्या भयप्रद किंकाळीने सारा दिवाणखाना दुमदुमला.
"हे काय चाल्लं आहे मि. दोशी?", समीर वैतागून म्हणाला, "स्टॉप धिस नॉन्सेन्स नाऊ. हु इज धिस डॅडी शी इज टॉकींग अबाऊट ... आणि हा ब्लॅकवल्चर मध्येच कुठून आला? हे बघा आय ऍम वॉर्निंग यु ..."
पण गौतम अंकलची ओठांची तिरीप उपरोधाचे भाव देत होती. ते टस्सभरही हलले नाहीत. समीरच्या सहनशक्तीचा हा अंत होता.
"ओके. ऑलराईट देन. जर तुम्ही इथून जाणार नसाल तर मला जबरदस्ती तुम्हाला घराबाहेर काढावं ला ...", समीर बोलत असाता मेनकाने अचानक समीरच्या ओठांवरून आपली बोटं फिरवली…
"व्हॉट द हेल्ल यू आर डूईंग?", समीरने तिचा हात डिवचला, "डोन्ट टच मी यू बिच्च.... हाऊ डेयर यू टच मी... गेट लॉस्ट... आय सेड गेट लॉस्ट फ्रॉम माय हाऊस..." आणि असं म्हणून त्याने मेनकाचा हात पकडून फरफटत तिला दाराकडे खेचलं आणि घराबाहेर हाकललं ... गौतम अंकल आणि गीताबाई तिच्या पाठोपाठ धावले...
"... आज झाली तेवढी नौटंकी खूप झाली... याद राखा पुन्हा माझ्या दाराशी याल तर ...", आणि असं म्हणून समीरने दार मेनकाच्या तोंडावर आपटलं ...
...पण मेनकाने मध्येच हात घातला होता ... समीरकडे त्वेषाने बघत ...
"तर? तर काय करशील? ... काय करशील बोल?", तिच्या आवाजात थरथर आली, " ... पुन्हा वांझोटीला भोगशील? पुन्हा माझ्यासारखा कुणी जन्माला घालशील? का पुन्हा तिला अर्धवट वाटेत सोडून जाशील?..."
मेनकाच्या डोळ्यात आग उतरली. समीर धमकला.
"व्हॉट डू यू मिन? काय म्हणायचंय काय तुल.."
"... ५ जून!", मेनकाने समीरला मध्येच तोडलं, "वांझोटीचा तेवीसावा बर्थडे ... ‘सावली’तली पार्टी... आठवतेय?... सूर्य अस्ताला गेलेला आणि इथेच ओट्यावर बसलेली ती ... आत सॅमच्या कॉलेज फ्रेण्ड्सची पार्टी चाल्लेली... तिला बोअर झालं... ती पार्टीतून निघालेली ... अशा कॉलेज रेव्ह पार्ट्यांची तिला सवय कसली... पण तोच तिचा हात मागून कुणीतरी पकडला... ‘कुठे चाल्लीस?’, सॅम म्हणाला. ‘बोअर झाले रे खूप... शिवाय तुमच्या कॉलेज फ्रेण्ड्सच्या पार्टीत तुम्हीच मजा करा ना... मी काय करणार?’ ती म्हणाली ... ‘आर यू क्रेझी? तुझ्या बर्थडेची पार्टी आणि तूच जातेयस?’, सॅमने तिला सोडलंच नाही, ‘चल आत. थोडा वेळ फक्त. पार्टी एका तासात संपेल.’
... ती नाईलाजाने आत गेली... पण आतला माहौल तिला गुदमरून टाकत होता. तिच्या चेहेऱ्यावर कंटाळल्याचे भाव होते. तोच सॅम समोरून आला, त्याने विचारलं ‘काय झालं एवढी चुपचूप का आहेस?’
ती म्हणाली, ‘काही नाही रे, असंच. मूड नाहीये...’
‘इज इट अबाऊट गौतम?’, त्याने विचारलं...
... ती गप्प बसली...
ते कारण जसं होतं तसं नव्हतंही... परदेशी निघून गेलेला गौतम ह्यावर्षी सुट़्टीत घरी आलाच नाही... म्हणून ती हिरमुसलेली... तिला गौतमची नितांत गरज होती त्या घडीला... आई आणि भैयाने तिची केलेली प्रतारणा तिच्या अजूनही कानी घुमत होती....
‘इथे काय घ्यायला आली आहेस? भांड व्हायचं होतं तर आमच्याकडून कर्ज घेऊन शिकलीस कशाला? तुझ्या त्या याराबरोबर पळून गेलीस ते वेगळंच... गेला न तो तुला सोडून दुसऱ्या देशात... आणि तू आलीस इकडे आमच्याकडे? ... काय विचार केलेलास तू? आम्ही तुला पुन्हा स्वीकारू म्हणून... तू मेलीस आमच्यासाठी जेव्हा पळून जाऊन तू आमचं नाक कपलंस ... निघून जा इथून .. नाहीतर धक्के मारून नाहीतर धक्के मारून तुला बाहेर काढू... चालती हो इथून’
नकार... आपल्या सख्ख्या आई भावाचा नकार ती वांझोटी झेलत होती... मनातल्या मनात... एक अश्रू तिच्या डोळ्यांतून ओघळला...
‘ए व्हॉट्स द मॅटर?’, सॅमने तिच्या गालावर बोट फिरवून तिचा अश्रू टिपला... ‘अगं वेडाबाई आपल्या वाढदिवसाच्या दिवशी कोण रडतं का? ... कमॉन... फरगेट ऑल दॅट... आय विल चियर यू अप...’, सॅमने तिला डान्स फ्लोर वर खेचलं अन डान्स सुरू केला... सॅमला ठाऊक होतं हाच डान्स तिला चियर करेल ते... सॅमचं अन तिचं फूटवर्क जुळलं अन ती पुन्हा हसू लागली होती....
... वयाने लहान असूनही सॅमने कित्येकदा तिला मदत केली होती. नेवी ट्रेनिंग म्हणा की मॉडलिंग असायन्मेन्टच्या वेळी तिला मदत करणं म्हणा... सॅम एक चांगला मित्र झाला होता तिचा... दोघांची गट़्टी छान जमली होती... पण मनाने कितीही चांगला असला तरी सॅम अल्लडच होता... प्रेमातली परिपक्वता त्यात आली नव्हती .... अठरावं वरीस त्याचं... म्हणूनच त्या अल्लडपणामुळे ती मनातलं सगळं सॅमशी शेयर करत नसे... गौतमच्या अनुपस्थितीत सॅम एकटाच मित्र होता तिचा … पण तो तेवढाच ... त्याच्याकडून ती स्वतःच्या उदासिन जीवनात मैत्रीचा आनंद मिळवत होती... तसं शौकीन सॅम ने कधीही तिला त्या नजरेनं पाहायचा प्रयत्न केला नव्हता... म्हणून ती त्याच्या विश्वासावर इथे आली होती... ", मेनकाने दिवाणखाना सभोवारी निरखला आणि भूपेशकडे एकटक पाहिलं , "पार्टी आटोपली अन बॉब त्याला म्हणाला, ‘मी मेनकाला सोडतो मुंबईला... तू सगळं आवरून उद्या ये...’ पण सॅम मानला नाही... त्याने नको म्हटलं अन सगळे एकामागे एक पांगले. उरले फक्त सॅम आणि ती ...
... सारी रात्र ती गप्प गप्प होती ... ती ओट्यावर बसलेली … शांत रात्र अनुभवत... रात्रीचा प्रहर तिला सुखावून जाई... अंधारात बुडालेलं जग तिला आवडे... कारण त्यात लोकं विरून जात ... आवाज सरून जात... जणू आपल्यासाठीच असणारी ती एकमेव वेळ असायची.... सॅम बाहेर आला अन त्याने बाईक सुरू केली ... पण ती चालू झालीच नाही... बरेच प्रयत्न झाले पण सॅमची बाईक बंद पडलेली तिनं पाहिली आणि मग तिथेच मुक्काम ठरवला ... सॅम आणि ती. दोघेच फक्त...
तिचा चेहेरा उदास होता... सॅमने जाणलं आणि म्युजिक सुरू केलं... केनीजीचा सॅक्सोफोन मंद सुरांचे जाळे विणत होता आणि ती त्यात आपणहूनच खेचली गेली... सॅमने तिला हात दिला अन तिने स्वतःला संगीताच्या तालावर झोकून दिलं... कितीतरी वेळ सुरेल स्वरांत गुंगलेली, आतल्या औदासिन्याने शिणलेली ती, आपलं तन झुलवत, कधी सॅमकडे आकृष्ट झाली ते तिला कळलेच नाही... अठरावं लागलेला असला तरी सॅम तसा तरणाबांड होता... नेवीत जावं म्हणून कसून कमावलेलं त्याचं शरीर त्याच्या कोवळ्या दिसणाऱ्या मित्रांमध्ये भलतंच उठून दिसायचं... त्याची बोटं तिच्या मानेवर फिरत होती, तिच्या केसांशी खेळत होती... तो स्पर्श तिला हवाहवासा वाटत होता... न रहावून तिने त्याच्या नरम ओठांवर तिची बोटं फिरवली... अन त्याचा उबदार श्वास तिच्या बोटांना थरारून गेला... पण ही धुंद त्यापलिकडे जाईल ह्याची कल्पना त्या दोघांपैकी कुणालाच नव्हती... शेवटी त्या मोहक्षणात ओठांनी एकमेकांचा ताबा घेतला अन ...
...
...
... अन त्यानंतरचा प्रणय …
… अगदी निसर्गानियमांनुसार घडून आलेला ..."
... मेनकाचं लक्ष करणने स्वतःला बंद करून ठेवलेल्या बेडरूमकडे लागलं होतं... तेच बंद दार जे त्या आतल्या प्रणयाला आपल्यात लपवू पाहत होतं... "सकाळ नुसती मनाची लाहीलाही करत होती", मेनका यांत्रिकपणे बोलू लागली, "रात्री घडलेल्या घटनेने ती वेडीपिशी झाली होती ... आपल्यापेक्षा वयाने सहा वर्ष लहान तरूणाशी घडलेला कालचा प्रसंग तिला शिसारी आणत होता.. ‘लोकं काय म्हणतील?’, हा प्रश्न तिचं मन पोखरू लागला... तो तर अल्लड होता पण ती तर सुज्ञ होती... तिची चूक भयंकर होती... घरी परतली पण नियतीनं पुन्हा खेळ खेळला होता... त्याच सकाळी गौतम परत आला होता... एक महिना तिच्या सोबत राहिला... त्याच्यासोबत असताना घडलेली ती काळी रात्र मात्र तिच्या मनाला सतत बोचत होती... पण समीर मात्र तिच्या संपर्कात आला नाही ... तिनं इतर गोष्टींत स्वतःला जुंपुन घेतलं... अन तो दिवस उजाडलाच ज्याची तिने आयुष्यभर वाट पाहिली होती...” … मेनका अचानक आनंदित झालेली दिसू लागली …
"ऍन्ड द बेस्ट सपोर्टींग ऍक्ट्रेस्स अवॉर्ड गोज टू... कॅप्टन आयेशा ऑफ तूफान... मिस मेनका… टाळ्यांच्या गजरात तिनं अवॉर्ड घेतलं... सिनियर आर्टीस्ट गायत्री खन्नाने अवॉर्ड देताना तिच्या अभिनयाची तारिफ केली... सारं जग तिच्या लूक्स्वर भाळलं होतं ... अभिनयावर फिदा झालं होतं ... एका जहाजाची खंबीर कॅप्टन म्हणून आयेशाच्या पात्रात पूर्ण घुसलेली मेनका प्रेक्षकांना मोहवून गेली होती... त्याच रोल साठी तिने फॅमिली फ्रेण्ड सॅमची मदत घेतलेली... त्याच्या शिपवर कसून सराव केलेला... तिथूनच तर त्यांची मैत्री वाढीस लागली... पण आता तर त्या मैत्रीच्या सीमा पार मागे पडल्या होत्या... लवकरच तिचं बीभत्स रूप जगाच्या समोर येणार होतं... एका कुमारी मातेचं... तिला सॅमला गाठायचं होतं ... तिथंच त्याच्यासमोर तिच्या पोटातलं गुपित ती उघड करणार होती... पण नियतीला तेही मंजूर नव्ह्तं ... तिच्या अवॉर्ड नाईटलाच सॅमचा फोन आला ... तो डॉकवरून बोलत होता ... त्याच्या जहाजाचा भॊंगा वाजला होता अन तो परत निघाला होता... त्याची उरलेली स्वप्न पूर्ण करायला ... पूर्ण एका वर्षासाठी... सॅमने तिला बोलायची संधी सुद्धा दिली नाही... तो त्याच्याच स्वप्नमयी भविष्यांत गुंतलेला... ‘झालेलं सगळं विसरून जावूयात’ असं सांगत... नेवी ऑफिसर व्हायचा त्याचा हुरूप तिच्या आवाजातला अपराधीपणाचा सूर ओळखू शकला नाही.... त्याची अल्लड महत्त्वाकांक्षा तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्याच्या चिमुकल्या छबीपेक्षा कित्येकपटींनी मोठी होती... जहाज निघालं ते तिचे ओठ बंद करून... ती सॅमसाठी आनंदीत होती पण त्याला काहीच सांगू शकत नव्हती, कारण परिस्थितीने तिचे ओठ शिवलेले होते... तिनं निरोप दिला अन सॅमसोबत निघून गेली गौतमसोबत रंगवलेली तिची सुखद स्वप्नं... आता तर ती गौतमच्या लायकीची ठरली नव्हती ... कशी ठरणार? पोटात हे पाप घेऊन? ... तिनं विचार केला ’पाडून टाकू... कोणाला कळणार आहे?’, पण आतून एक आवाज तिला आला... माझा आवाज, ’मी तुझा बाळ आहे गं .... मला मारू नकोस’.... माझी आर्त विनवणी तिला जशी जाणवलीच ... तिचं हृदय द्रवलं.... तिनं मला मारलं नाही... तेव्हाच मी माझ्या जन्मदात्रीवर पूर्णं विश्वास ठेवला... तिनं गौतम पासून तोंड फिरवलं ... अन दुखावलेला गौतम तिला सोडून गेला... पण मी तिच्या सोबत होतो... गौतमला नकार देऊन ती एका वेगळ्या भावनांनी शूटींगला निघाली... तशाच जहाजात ... त्या जहाजाखालच्या अथांग समुद्रात तिला सतत जीव द्यावासा वाटत होता... एकदा दोनदा कठडा ओलांडून ती जीवनमृत्यूच्या सीमेवर उभीही ठाकली होती... मी ओरडत होतो, ‘नको! नको! स्वतःला संपवू नकोस! मला तुझी गरज आहे!’... पण ती एकटी होती... तिला मदत करणारं कुणीच नव्हतं... पण तोच एका परक्याने तिचा हात पकडला... तिला सावरलं... तिला दुनियेपासून काही महिने लपवलं... त्याचा काय संबंध होता तिच्याशी, कुणास ठाऊक? पण एक जिगरी दोस्त म्हणून तिला मदत केली ...
... ‘देखना... चांद का टुकडा होगा ... बिलकुल तुम्हारी तऱ्हा!’, तो तिला आश्वस्त करत म्हणालेला, ‘अगर तुम चाहो तो मै इसे अपना नाम दे सकता हूं। जासिम खान का नाम!’ तो म्हणाला... त्याचे हे शब्द तिला खूप आधार देऊन गेले... पण मी ज्याचा होतो त्यालाच ती मला परत करणार होती... माझ्यावर इतर कुणाचा हक्क नव्हता ... तिचा तर अजिबातच नव्हता... माझ्यावर हक्क होता तो सॅमचा ... त्याच्या आईचा... त्याच्या वडिलांचा... तिनं भोळ्यासारखं सॅमच्या वडीलांना गाठलं ..."
... एवढं सांगून मेनकाचं लक्ष गेलं सुधाकर रावांच्या तस्बीरीकडे आणि अचानक तिच्या शब्दांत निखारे फुलू लागले ... "कुल्टे! माझ्या मुलावर असा नीच आरोप? ... दुसऱ्या कुणाचं पाप तू आमच्या गळी मारतेयस? ... काय केलं नाही मी तुझ्यासाठी? ... मॉडलिंग मध्ये तुला नावारूपास आणवलं ... जासिम खानशी ओळख करवून दिली... तुला आमच्या घरात स्थान दिलं ... आमच्या माणसांत स्थान दिलं.... आणि त्याच्याबदल्यात तू काय केलंस? .... एका पोरकट मुलासोबत असे चाळे करून... आणि हे चाळे करताना तुला लाज नाही वाटली... अगं समाजाची नाही तरी स्वतःच्या मनाची तरी लाज ठेवली असतीस... आणि असेल माझ्या मुलाचंच ते पाप तर पाडून टाक ... मला काही फरक पडणार नाही...", तिने वळून समीरकडे पाहिलं.
"नकार ... नकार आणि केवळ नकार... वांझोटीच्या फुगलेल्या पोटाचा नकार, स्वतःच्या इज्जतीच्या होणाऱ्या वाटोळ्याचा नकार, तिच्या आत फुलणाऱ्या आपल्याच वंशाचा नकार, माझा नकार... काय करेल ती वांझ मग? त्या बाळाला, मला, माझं घर मिळणं आवश्यक होतं अन ती वांझ स्ववचनांच्या फेऱ्यात अडकलेली होती... कुणाला खरं सांगू शकत नव्हती... काही बोलू शकत नव्हती... शेवटी मी जन्मलो अन जन्मल्याच्या दिवशीच तिने माझा त्याग केला... मला न स्वीकारणाऱ्या लोकांकडे सोपवलं... तिने माझ्याकडून स्वतःची सुटका करवून घेतली पण मी मात्र चवताळलो होतो... मलाही ‘माझी आई’ असण्याचा हक्क होता.. पण तो हक्क ह्या वांझोटीने माझ्यापासून दुरावला... तिने मला नाकारणाऱ्या माणसांच्याच स्वाधीन मला केलं... मी तडफडलो, किंचाळलो पण तिने तिचं मन घट़्ट केलेलं ... एका भ्याडासारखं तिच्या दाईच्या हाताकरवी मला सॅमच्या कुटुंबाला देऊन टाकलं ... पण मी... मी तिला कधीच सोडलं नाही... मी तिच्याच पोटातच राहलो... त्याच गर्भात ... जिवंत... कॅन्सर बनून तिला आतून पोखरून काढण्यासाठी...", मेनका वेड्यासारखं गरजली, "मला स्वच्छंदी व्हायचं होतं, मनमौजी व्हायचं होतं... म्हणून मी मोकळा झालो... तिच्या सडक्या पापांचे लचके तोडून त्यावर पोसललं एक काळं गिधाड म्हणून जन्मलो मी... आय बिकेम अ वल्चर! अ ब्लॅक वल्चर..."
एवढंच बोलून मेनका गप्प झाली... तिच्यातला ब्लॅकवल्चर अचानक शांत झालेला वाटू लागला .... ती त्याच भारावलेल्या स्थितीत सोफ्यावर बसली ... रागात स्वतःचा ऊर धपापत ...
"पण त्या बाळाला त्याच्या कुटूंबाकडे सोपवूनही तिचं दुष्टचक्र फिरायचं थांबलं नव्हतं ...", आता गौतम अंकलचा आवाज घुमला आणि त्यानी संभाषणाचा ताबा घेतला... "सॅमचे वडील स्वतःच्या पोरकट मुलाच्या ह्या चुकीकडे बघत मनातल्या मनात सलत होते.... आठ महिन्यांनी सॅम परत आला होता... ती सॅमला भेटायचा प्रयत्न करीत होती... पण सॅमच्या वडिलांनी तिला त्याला भेटू दिलं नाही... त्यांनी गुंडांकरवी तिला धमकावलं... ती प्रसूत होण्याच्या अगदी अगोदरच... पण तरीही ती खंबीर होती ... शेवटी सॅमचे वडिल हतबल झाले जेव्हा तिनं बाळाला सॅमच्या कुटूंबाकडे सोपवलं... त्यानंतर इमोशनल ब्लॅकमेल करणंच त्यांच्या हाती राहिलं होतं... त्यांनी तिच्याकडे हे गुपित वेळ येईस्तोवर कुणाला सांगू नाये असं वचन मागितलेलं आणि ह्या वेडीनं त्यांच्यावर विश्वास ठेऊन ते वचन दिलं... पण त्या दिवसाची वाट पाहणं तिनं सुरूच केलं नसेल अन अघटीत घडून गेलं... सॅमचे वडिल हार्ट अटॅकने वारले ... अन त्यांचं वचन अपूर्ण राहिलं... ज्या कुटूंबाकडे तिनं तिचं बाळ सोपवलं ते आजही तिच्याच नावाने बोटं मोडून तिच्या बाळाची नजर काढत होतं ... तिला ते ठाऊक होतं... ती आपल्या बाळासाठी आनंदित होती... कारण ते सुखरूप होतं... निरोगी होतं... भरभरून आपलं आयुष्य जगत होतं... त्याच समाधानावर ती आपलं आयुष्य रेटत होती... एकाकी... इथे तिला आपलं असं कुणीच उरलं नव्हतं... गौतम गेला ... तिचे आप्तस्वकीय अर्ध्यावाटेत सोडून गेले... ", गौतम अंकल थोडे थांबले आणि हळव्या स्वरांत पुढे म्हणाले, "‘आज माझं पोर पंधरा वर्षांचं असेल!’ ती आतल्या आत तिच्या बाळाच्या आठवणींत कढलेल्या प्रत्येक क्षणांचा हिशेब मांडत होती... पंधरा वर्षं सहस्त्र युगांसारखी लोटलेली जणू आपल्या पोटच्या बाळाचं स्मरण करीत... ना तनाची चिंता ना मनाची... यशाने हपापलेल्या लोकांच्या गराड्यात... तिला झोप येत नसे ... शांतता मिळत नसे... त्याच लोकांनी तिला अफूची सवय लावली... तिला क्षणिक आनंदाच्या मृगजळात अडकवलं... तरीही ती काम करत होती... स्वतःचं मन मारत... आपल्या फॅन्ससाठी... शेवटी नियतिला तिचं यश, तिचा स्वानंद मंजूर झाला नाही... ह्या आनंदावर विरजण पडलंच जेव्हा तिला बातमी कळली, तिच्या गर्भाशयाच्या कॅन्सरची… तिचं दुरावलेलं मातृत्व पुन्हा उफाळून आलं अन त्याच अपराधीपणातून जन्म झाला ब्लॅकवल्चरचा... मेनकाच्या मनातल्या काळोख्या खोलीत... एक असा मनोविकार जो तिला त्याच प्रसूतिच्या वेदना सतत करवून देऊन तिच्या पोटातून जन्म घेऊन बाहेर येई... बाहेर येताच आपल्या भोगांची दूषणं आपल्या तिला देई... कधी तिच्याविषयी भडक बातम्या पसरवून तर कधी तिच्या आई न होण्याच्या कमतरते वर हसून ... तिची निंदा करून... ह्या ब्लॅकवल्चर ने तिला एमपीडीक बनवले ... मल्टिपल पर्सनालिटी डिसॉर्डरची शिकार केले... सुरूवातीस तो आजार नियंत्रणात होता... पण तो स्वैर झाला जेव्हा मेनकाची आपल्या खऱ्या मुलाशी, करणशी, भेट झाली ... अगदी दुर्दैवाने ... अन त्या दिवशी तिचं भावनिक नियंत्रण सुटलं ... तिला करण हवा होता आपल्या बाहुत ... पण तिच्या नशीबी होता तो चवताळलेला ब्लॅल्कवल्चर... त्यानंतर तो आपल्या जन्मदात्या आईवरच उलटला ... तिला शिव्या देत, तिच्यावर दातओठ खात त्याने तिच्या आयुष्यावरच घाला घातला... त्याच वेडाच्या भरात ब्लॅकवल्चरने मेनकाकडून आत्महत्या करवायचे ठरवले... पण स्वतःचं आयुष्य स्वतःच संपवायला न धिजवणारी मेनका मग भाड्याच्या गुंडानी मारून टाकायचे त्या ब्लॅकवल्चरने ठरवले.... त्या गुंडाला हल्ला करण्यासाठी पैसे पोचवून त्याने त्याचे ईप्सित साध्य करवले... पण प्लान सक्सेसफूल झाला नाही अन मेनका त्या हल्ल्यातून वाचली. तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तिथूनच तिच्या मनाचे खेळ सगळ्यांना कळले… तिच्या हल्ल्यामागे खरा कुणाचा हात होता हे कळलं... आम्ही इन्स्प. काळेंना पाचारण केले... त्यानी स्वतःच सगळं आटोपलं. तिच्या भाड्याच्या हल्लेखोराला, गुंजी सिंगला, कमीत कमी शिक्षेची हमी देऊन गप्प बसायला लावलं.... मी थोडे पैसे देववून त्याला ब्लॅकवल्चरचं नावही आपल्या डोक्यावर घ्यायला सांगितलं... ह्या आगीत मिडियाने तेलाचे काम केले असते हे आम्हाला ठाऊक होतं म्हणून इन्स्प. काळेंनी मिडिया अटेन्शन डायव्हर्ट केलं... इथे मेनकाची स्थिती प्रकाशात येऊ नये म्हणून आम्ही प्रयत्न करत असताना ह्या हल्ल्याने बावरलेली, गोंधळलेली मेनका सायकॉलॉजिकली मात्र पूर्णपणे उध्वस्त झाली... ती एवढी कोलमडली की तिला आम्ही अजूनही पूर्णपणे तिला सावरू शकलेलो नाही ..."
... गौतम अंकलनी ब्लॅकवल्चर मध्ये हरवलेल्या मेनकाकडे विवशतेनं पाहिलं आणि त्यांची नजर ओलावली ...
" ... पण मेनका वाचल्याने तिच्या मनातला ब्लॅकवल्चर रागाने अस्वस्थ झाला... त्याने आता वारंवार आपलं रूप दाखवायला सुरू केलं... आम्ही सगळे तिच्या मनातल्या ह्या व्याधीपासून तिची कशी सुटका होईल ह्या विवंचनेत असताना आम्हाला आशेचा एक किरण दिसला... गीताबाई आल्या अन त्यांच्या सहवासात मेनकाला आपुलकी मिळाली ... एमपीडीचा अटॅक येऊनही ब्लॅक्वल्चर बाहेर येणं कमी झालं.... अन मग त्यातूनच ह्या ब्लॅकवल्चरचा बिमोड करायचा मार्ग आम्हाला दिसला ... आणि तो म्हणजे तिच्या मुलाशी भेट... तिच्या मुलाची माफी... करणची माफी... त्याचसोबत तिला माफी हवी होती... सॅमच्या कुटूंबियाकडून... सॅमकडूनही सांत्वनाचे शब्द तिला ऎकायचे होते... शी जस्ट वॉन्टेड ऍन अश्युरन्स... दे होल्ड नो ग्रड्जेस... दे हॅव नथिंग अगेन्स्ट हर... दे आर फर्गिव्हींग... "
... अंकल भावनाविवश झाले होते ...
"म्हणूनच मी तिच्या वतीने तुला ... तुम्हा सर्वाना विचारतो की प्लीज ... कॅन यू ऑल फर्गीव्ह हर?
प्लीज... आय ऍम बेगिंग यू... फॉर मेनका ... प्लीज फर्गिव्ह हर
... प्लीज सॅम!",
गौतम अंकलनी ओल्या डोळ्यांनी हात जोडले त्याच सॅमला...
... पण ‘सॅम’तर काहीच बोलू शकत नव्हता...
... कारण काही बोलणं ऎकण्याच्या तो केव्हाच पलिकडे गेला होता...
*****************
(क्रमशः)
प्रतिक्रिया
20 Aug 2011 - 5:42 pm | धनुअमिता
हा ही भाग अपेक्षेप्रमाणे उत्तम.
पु. भा. ल.ये.द्या.
20 Aug 2011 - 8:28 pm | गणेशा
काय बोलु .. येव्हडी वळणे .. मनाच्या अपेक्षेपलिकडचे लिखान .. अप्रतिम ..
माझे सगळे अंदाज खोटे ठरले...
मेनकातील आई.. तिची कहानी .. तिचे रुप खरेच अंगावर शहारे आणणारी..
हा भाग खुप आत जावुन भिडला .. खुपच कलाटनी देणारा ... एक अनपेक्षित उत्तुंग झेप ...
अवांतर : ब्लॅकवल्चर हा 'समिर' वाटलेला मला, पण तो तर करणचा बाप निघाला ... हे कोणीच कदाचीत अपेक्षिलेले नसेन बहुतेक.. खुद्द समिर ने सुद्धा नसेन [:)]
20 Aug 2011 - 11:48 pm | विनीत संखे
पुढील भाग ... http://www.misalpav.com/node/18909
24 Aug 2011 - 3:21 pm | धनुअमिता
तुम्ही दिलेल्या लिंक वर हि कथा पुर्ण वाचली. खुप अप्रतिम लिखाण आहे. कल्पनाशक्ति तर खुपच अप्रतिम. संवाद त्याला तर तोडच नाहि. असे वाटत होते कि पिक्चर बघत होते. आणि पुढचे भाग कधी येतायेत त्याची वाट बघत असायचे.
खुप दिवसांनी छान कथा वाचायला मिळाली.
खरे तर प्रतिक्रिया द्यायला शब्दच सुचत नाहि आहेत.
पण
.
.
.
.
.
.
.
.
खुप सुंदर लिखाण आहे.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
24 Aug 2011 - 8:08 pm | विनीत संखे
धन्यवाद :)
25 Aug 2011 - 10:58 pm | साती
सुरेख कादंबरी,तुम्ही दिलेल्या लिंकवर जाऊन वाचली.
पुढचे भाग इथेच अपलोड करत नाही?
इतकं फाल्तू लिखाण इथे एवढेजण करत असतात त्यात तुमची एक कादंबरी जड होऊ नये.
बाय द वे कादंबरीतली सगळी कोडी सोडवलीत पण ब्लॅकवल्चरला तो सिक्युअरड अँड एक्स्लुजिव आय पी अॅड्रेस कसा मिळाला ते लिहिलं नाहीत.
26 Aug 2011 - 11:18 am | विनीत संखे
सातीताई, मी करणच्या भाग २१-२३ मध्ये सांगितलेलं...
खाजगी नेटवर्क म्हणजे विपीएन बेस्ड ईमेल. मोठ्ठे फिल्मस्टार्स असे ईमेल वापरतात. मेनका त्यानेच इंटरनेट वापरत होती.
26 Aug 2011 - 2:04 pm | साती
हो,धन्यवाद.
हे कथेच्या ओघात पुढे कुठेतरी यायला हवं होतं.
पुढचे भाग इथेही टाका ना.मस्त आहेत.