जलेबीबाई...
आम्ही स्वप्नातून दचकून उठलो आणि क्षणात बरळलो— “आम्ही जिलब्या पाडतो, तुम्ही भजी सोडा...”
तसं जिलब्या पाडणं फार काही मोठं काम नाहीये बरं का. अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायचं, कढईतलं तूप उकळू लागलं की कॉटनच्या जाडसर फडक्यात पिठाचा गोळा भरून घेऊन मधोमध किंचित छिद्र पाडून मोठ्या नजाकतीने वेटोळे काढले की झालं. त्या जिलेब्यांना डालडा चांगला आतपर्यंत पिऊ द्यायचा. झाऱ्या कडेला ठेऊन त्या लालबुंद होईतोवर तळायच्या. मग व्यवस्थित निथळून घेतल्या की एकतारी पाकात डुबू द्यायच्या. त्यांनी पाक यथोचित शोषला की झाली खाण्यायोग्य जिलेबी तय्यार!
तर अशी ही जिलेब्यांची पाककृती. म्हटलं तर सोप्पी, म्हटलं तर खूपच अवघड. काहींना एकाच झटक्यात हे जमतं तर काहीजणी आयुष्यभर ‘पीठ किती मळू गं?, पाकाची तार कशी जमवायची?, जिलेबी कडक कशी होईल गं?, घरीच जिलेब्या करू की विकतच्या आणलेल्याच परवडतील? अगं सांग ना...’ अशा प्रश्नातच जिलेब्यांचे वेढे फोडीत जातात. पीठ योग्य रितीने तयार नसेल तर तळतांनाच जिलेब्या फुटतात. ते पीठ एकजीव करतांना किती श्रम होतात हे त्या आचाऱ्यांनाच माहीत. पाक व्यवस्थित तयार करणं हे तर महाजोखामीचं काम. पाक चुकला की पदार्थ हुकला. जास्त आच दिली की पाकाची साखर व्हायला वेळ लागत नाही. फारच पात्तळ राहिला तर ते साखरेचं पाणीच वाटतं. तेव्हा पाक उत्तम झाला असेल तरच पदार्थ बनविण्याचा आनंदी परिपाक उपभोगता येतो. राहता राहिली जिलेब्या पाडण्याची पद्धत. ती वाटते तितकी सहजपणे जमतेच असे नाही. कॉटनच्या कापडाचंच घ्या. सध्या शोधून सापडेल असा घाटीव कापडाचा तुकडा मिळणं मुश्किल. सगळेच कपडे झुळझुळीत प्रकारात मोडणारे. अशा ट्रान्सपरंट कापडातून जिलेबीचे पीठ तुपात सोडण्याचा प्रयत्न केला तर पहिल्याच झटक्यात छोटेशे छिद्र अमाप मोठे होऊन वस्त्र फाटल्याने जिलेब्यांचा मोठ्ठा भजाच कढईत तयार व्हायचा!
आणि जिलेब्या सोडतांना भजी पाडणे अभिप्रेत नाही.
परंतु जिलेबी अशी फक्कड तयार व्हायला हवी की पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटावे. तिची आखीव रेखीवता कमनीयता अन् गोड मधुर चविष्टता इतकी भावावी की पटकन उचलून तोंडात टाकण्याचा मोह आवरता न यावा. आम्ही अशा जिलेब्या पाडू शकतो. तुम्हीही आम्हांला आवडणारी भजी सोडा म्हणजे झालं!
मात्र एक लक्षात ठेवा भजी अन् मोदक यात कमालीचा फरक जाणवायला हवा हं. नाहीतर भजी म्हणून तुम्ही नारळी मोदक पुढे ठेवाल. मिरचीची भजी आम्ही मिटक्या मारीत खाऊ. तुम्हीही आमची गोडसर जिलेबी चावून चावून एका दमात संपवायला हवी. तरच हे देणं घेणं पार पडेल.
असो.
मुद्दा जिलेब्या पाडण्याचा आहे. पाडणे आणि सोडणे यात महदंतर आहे हेही इथे नमूद करावेसे वाटते. पाडणे ही बळेच केलेली क्रिया तर सोडणे ही आपसूक होणारी क्रिया. पाडतांना ‘ठरवून’ आकार दिला जातो तर सोडतांना काय आणि कसे व कितपत ‘सुटेल’ याचा भरवसा नाही. सुटलेले ते कोणत्या प्रकारचे, आकाराचे किंवा चवीचे असेल याची पूर्वोक्त खात्री कोणीही देऊ शकत नाही!!!
प्रतिक्रिया
12 Aug 2011 - 4:27 pm | परिकथेतील राजकुमार
आजकाल मला मचाकन वर जावेसेच वाटत नाही :)
12 Aug 2011 - 10:03 pm | धन्या
जे तुमच्या मनी ते आमच्या दुकानी ;)
12 Aug 2011 - 10:17 pm | धन्या
योग्य प्रमाणात आच कशी दयायची याच्या काही टीप्स दयाल का?
नव्यानेच जिलेबी पाडणार्यांकडून नेहमीच उत्साहाच्या भरात तुम्ही म्हणताय तशी जास्त आच दिली जाते आणि मग पाकाचा विचका होतो.
13 Aug 2011 - 9:47 am | चिंतामणी
नावावरून वाटले होते की काहीतरी मस्त असेले.
निदान हे तरी असेल.
http://youtu.be/2bdRk_oHvwY
पण कसचे काय. फक्त "घोर निराषा"
13 Aug 2011 - 3:21 pm | डॉ.श्रीराम दिवटे
आमच्या एका धाग्यावर 'काय जिलेब्या पाडताय!' असा प्रतिसाद एका बाईँनी नोँदविल्याचे आठवले. म्हटलं बघावं जिलेब्या पाडता येताहेत का. परंतु लेखाचं भजन होऊ लागल्यावर आम्ही कणीक तिँबायचं सोडून दिलं. असो.
जलेबीबाईची जिलेबी आम्ही नक्कीच पाडू. इतके निराश होण्याचं कारण नाही!
14 Aug 2011 - 6:05 pm | सविता
भजी काय, वडे काय........... जिलब्या काय.........
पाड्ल्यावर लोकांसमोर ठेवल्या की लोक बोलणारच....सगळेच कौतुक करणार नाहीत...
लोकांचे बोलणे सहन न होणार्यांनी फक्त स्वतःच्या ब्लॉग वर लिहावे.
तिकडे आलेल्या प्रतिक्रिया प्रकाशित करणे/ न करणे ब्लॉगच्या मालका वर अवलंबून असते.
नाही का बरे?
15 Aug 2011 - 8:46 am | स्पंदना
>>अगदी सोप्पंय... बेसन हटायचं, एकजीव करायच>>>>
जिलेबी बेसनाची करतात? माझ्या मते तरी आजवर जिलेबी मैद्याची असायची? आता या आचार्याला जर मुळात काय हाटल तर जिलेबी बनते हेच माहित नसेल तर ' करायला गेला गणपती अन झाला मारुती " अस नेहमीच व्हाव यात नवल काय?
16 Aug 2011 - 3:40 pm | सविता
अ गा गा.........
म्हणजे पाकातली भजी आणि वडे जिलेबीच्या नावावर खपवले जात आहेत?
रामा शिवा गोविंदा!!!!
15 Aug 2011 - 10:37 pm | आत्मशून्य
लेखन आवडले.