आत्मे गहाण टाकलेत बुध्दी टाकू नका भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
30 Sep 2010 - 10:39 pm

भाग -२
जेव्हा डॉ. कोवूरांनी बाबांची एक सामान्य हातचलाखी दाखवणारा माणूस म्हणून जगाला ओळख करुन दिली तेव्हा खळबळ उडाली. त्यापेक्षाही भारताचा वैज्ञानिक सल्लागार हा असल्या माणसाचा हस्तक म्हणून काम करतो ह्या बातमीने आपल्या देशाची बदनामी झाली. ते नुकसान कधीही न भरुन येणारे आहे. नशिबाने डॉ. नरसिंहन यांनी एक १२ शास्त्रज्ञांची समिती नेमून सर्व असल्या फालतू बाबांचे पितळ उघडे पाडण्यासाठी त्यांना जाहीर आव्हान दिले. जेव्हा ह्या समितीच्या सदस्यांनी सत्यसाईबाबांची गाठ घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा हा परमेश्वर त्याच्या बेंगलोरजवळील व्हाईटफिल्ड नावाच्या निवासस्थानी लपून बसला. तेथून त्याने फक्त ह्या समितीवर चिखलफेक केली.

रात्रीचा अवतार :
हा इज्जतीचा पंचनामा कमी होता की काय म्हणून १९७६ मधे त्यांच्यावर अजून एक बॉंब पडला. ताल ब्रुक नावाच्या एका लेखकाने त्याच्या बाबांच्या आश्रमातील १४ महिन्यांच्या वास्तव्यात काय पाहिले ह्याविषयी एक पुस्तक लिहिले. ह्या पुस्तकाच्या भारतातील सर्व प्रती एका रात्रीत खरेदी करुन नष्ट करण्यात आल्या. ह्या पुस्तकात बाबांच्या समलिंगी चंगळवादाच्या कहाण्यांचे आणि लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे वर्णन करण्यात आले आहे. पहिल्यांदा त्याचा ह्यावर विश्वास बसेना. परंतु अनेक कहाण्या समोर आल्यावर त्याचाही नाईलाज झाला. ह्या पुस्तकामुळे आणि बातमीमुळे जनतेत बाबांविषयी शंकेचे वातावरण पसरले. नाहीतर त्याचे प्रस्थ फारच पूर्वी वाढले असते. लोकांच्या मनात मग विचार यायला लागले की जर बाबा मेलेल्या माणसाला जिवंत करु शकतात तर त्यांच्या मेव्हण्याला रेबीजपासून का नाही वाचवू शकले ? ते जर परमेश्वरच असतील तर ते त्यांच्या अपेंडिसायटीससाठी आणि हाड मोडलेल्या पाया साठी इस्पितळात का दाखल झाले ? ते जर जनतेला साधेपणाचे धडे देतात तर स्वत: मर्सिडीसमधून का फिरतात ? त्यांना स्वसंरक्षणासाठी सिक्युरिटी गार्डस्‌ का लागतात ? का त्यांना जादूगार पी. सी. सरकार ह्यांच्यापासून धोका होता ? त्यांच्या आश्रमातून आलेल्या स्त्रियांच्या शवांवर अत्याचारांच्या खुणा शवविच्छेदनात सापडल्या असे डॉक्टरांनी का लिहून ठेवले आहे ? परदेशी शिष्यांपैकी अनेकजण त्यांची संपत्ती बाबांच्या संस्थानाच्या नावावर करुन अदृष्य का झाले ? बाबांचे निवासस्थान “प्रशांतीनिलयम” हे गुंडांचे आश्रयस्थान आहे का ? तसे नसेल तर आपल्या गृहमंत्र्यांच्या भेटीच्या अगोदर जेव्हा ह्या इमारतीची तपासणी करण्यात आली तेव्हा त्यात सायनाईड, आणि आर डी एक्स का सापडले ? हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

रत्नहाराची भेट –
बाबांच्या शक्ती विषयी सगळ्यात मोठी शंका जनसामान्यांच्या मनात आली ती “डेक्कन क्रॉनीकल” ह्या वर्तमानपत्रात २३ नोव्हेंबर १९९२ रोजी आलेल्या बातमीमुळे. ह्या हैद्राबादेहून प्रकाशित होणार्‍या वर्तमानपत्रात बाबांनी आपले माजी पंतप्रधान श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांना रत्नहाराची भेट देतानाच्या चित्रीकरणातील छायाचित्रे पहिल्या पानावर छापली होती. त्यात हवेतून तो रत्नहार काढताना बाबांचा सहकारी सत्यनारायण त्यांना तो गुपचुप देत असताना स्पष्ट दिसत होते. ही चित्रफीत सरकारी माध्यमांनी काढली असल्यामुळे ती नंतर दडपण्यात आली होती. पण बाबांच्या दुर्दैवाने ह्याच्या प्रती चोरुन भारतात आणि परदेशी उपलब्ध करण्यात आल्या. मला वाटते आजही ती इंटनेटवर उपलब्ध असेल. ज्या वार्ताहराने ही बातमी छापली त्याचा सत्कार करण्यासाठी मोठी सभा घेण्यात आली. त्या वार्ताहराचे नाव होते वेणू कोडीमेला. त्याच्या आईला जो कर्करोग झाला तो ह्यामुळेच असेही ह्या नराधमांनी पसरवायला कमी केले नाही. यानंतर बाबांच्या पिल्लावळींनी असे सांगायला सुरुवात केली की हे चमत्कार जनतेला बाबांच्या चांगल्या कामात सहभागी होण्यासाठी करण्यात आले असून बाबा स्वत: कधीच ह्या चमत्कारांचा दावा करत नाहीत.

कृष्णकृत्ये आणि कर्म : शयनगृहातील हत्याकांड
सगळ्यात भयंकर नामुष्की ओढवली ती ६ जून १९९३ रोजी “प्रशांती निलयम” च्या सहा रहिवाशांचा खून बाबांच्या शयनगृहात झाला तेव्हा. त्यातील दोन मारेकऱ्यांनी केले आणि चार पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू पावले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ह्या चार मारेकर्‍याकडे फक्त सुरे होते आणि पोलिसांकडे बंदुका. जिवाच्या भितीने आपले परमेश्वर त्या खोलीतून खिडकीतून उडी टाकून पळाले आणि त्यांनी कोणालाच माहीत नसलेला एक अलार्म वाजवला. तुम्हाला आश्चर्य वाटेल जे लोक मेले ते सर्व बाबांचे लाडके शिष्यगण होते. त्यात ज्याने तो रत्न हार बाबांना हात चलाखीने दिला तोही होता. बाबांनी नंतर राखीपौर्णिमेच्या दिवशी ह्या सगळ्या भानगडी वर भाष्य केले “जन्म आणि मृत्यू हे एकत्रच प्रवास करत असतात. मृत्यू ही एक नैसर्गिक घटना आहे आणि म्हणून त्याच्याबद्दल काळजी करणे व्यर्थ आहे. तुमच्या लक्षात आले असेल की स्वामींचा मृत्यू हा त्यांच्याच हातात आहे. मला वाटेल तेवढे मी जगू शकतो कारण परमेश्वर माझ्या इच्छेच्या विरुद्ध वागू शकत नाही. त्यामुळे काही मूर्ख लोक हा प्रश्न विचारतात की परमेश्वरानेंच हे का नाही केले, ते का नाही केले.” पोलिसांचा पंचनामा दोनदा बदलण्यात आला. पहिल्यांदा तो बाबांच्या खुनाचा प्रयत्न म्हणून करण्यात आला. नंतर तो आश्रमातील भांडणे असा करण्यात आला. सर्व राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून रहस्यमय रित्या भारताच्या राष्ट्रपतींनी असे प्रतिपादन केले की हे सगळी भानगड एका मुलीच्या संबंधातील आहे. हे राष्ट्रपती होते श्री. शंकरदयाल शर्मा. आपल्याला आठवत असेल यांनीच त्यांच्या घरातील गालिच्यासाठी ६० लाख रुपयांची मागणी केली होती. जेव्हा गृहमंत्र्यांना (श्री. शंकरराव चव्हाण ) विचारण्यात आले की ज्यांच्या शयनगृहात ह्या हत्या झाल्या त्यांचा जबाब का नोंदवला गेला नाही ? ह्याचे उत्तर आपल्या गृहमंत्र्यांनी फारच विनोदी दिले. ते म्हणाले की त्यावेळेस बाबा तेथे हजर नव्हते, एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देणे आवश्यक आहे ती म्हणजे हे प्रतिपादन करण्याअगोदर आपले गृहमंत्री दोनदा बाबांच्या भेटीस जाऊन आले होते. अशारितीने ही चौकशी दडपण्यात आली. आश्चर्य म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणानंतर आश्रमांनी कुठल्याही प्रकारची पोलिसांमधे आजपर्यंत तक्रार नोंदवली नाही. बाबांच्या दुर्दैवाने बी. प्रेमानंद यांनी हा पोलिसांचा तपास अस्विकारार्ह आहे असे सांगून सरकारवर पुरावे नष्ट केल्याचा न्यायालयात दावा लावला. ह्याच ग्रुहस्थांनी जेव्हा सोन्यावर सरकारी बंधने होती त्या काळात बाबांना न्यायालयात खेचले होते. त्यात त्यांनी बाबांवर असा अरोप केला होता की बाबा सोन्याचे दागिने तयार करुन “सुवर्ण नियंत्रण कायद्या”चा भंग करत आहेत. कारण त्यावेळेस जास्त सोने बाळगायला बंदी होती. हा आरोप फेटाळताना तव्हाचे न्यायधीश अंजनवेलू यांनी असा निर्णय दिला की दैवी शक्तीने निर्माण केलेले सोने हे तयार केले असे म्हणता येणार नाही. हे न्यायाधीश बाबांचे निकटचे शिष्य होते हे सांगायला नकोच. भारतीय न्यायसंस्थेत दैवी शक्तीला प्रथमच मान्यता मिळाली असे म्हणायला हरकत नाही. असो. ह्या हत्या कांडाच्या खटल्यात प्रेमानंदांनी उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आणि न्यायालयाला अशी विनंती केली की नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी ही चौकशी सी. बी. आय.कडे व्हावी. सरन्यायाधीश मिश्रा यांनी ही याचिका फेटाळून लावली एवढेच नव्हे तर प्रेमानंदांना धमकावले की पुढच्या वेळेस जर त्यांनी न्यायालयाचा असा बाबांच्या बदनामी साठी दुरुपयोग केला तर त्यांच्यावरच खटला चालवला जाईल. सुदैवाने जानेवारीमधे सर्वोच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाचे सर्व आक्षेप फेटाळले ज्यांनी सर्व बुध्दिनिष्ठांच्या आशा पल्लवीत झाल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीमुळे आंध्रप्रदेशच्या उच्चन्यायालयाने मे महिन्यामध्ये प्रेमानंदांची याचिका दाखल करुन घेतली. त्यावेळेस देशात वेगळीच हवा वहात होती. नरसिंहरावांचे गुरु आणि मित्र आणि शस्त्रांचा व्यापारी चंद्रास्वामींना अटक झाली होती त्यामुळे बुध्दीवाद्यांच्या न्याय मिळवण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.

मूत्र पिंडाची हकीकत .
मराठी साप्ताहिकाच्या १९ जानेवारी १९९६ च्या अंकात एक धक्कादायक बातमी छापून आली. त्यात सत्यसाईबाबा इन्स्टीट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस या संस्थेबद्दलची एक बातमी छापून आली. ही संस्था बाबांच्या कृपेने २० कोटी रुपये खर्चून उभी झाली होती आणि गरीब जनतेत ती लोकप्रिय होती कारण ह्यात सर्व उपचार फुकट केले जायचे. याच संस्थेमध्ये मराठवाड्यातील त्रिंबक करवंदे नावाच्या एका गरीब शेतकर्‍याला त्याच्या मुलाचे मूत्रपिंड बसवण्यात येणार होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर एका आठवड्यानंतर मरायला टेकलेल्या त्रिंबकला सांगण्यात आले की शस्त्रक्रिया असफल झाली आहे. त्यांना परत त्यांच्या गावी पाठवण्यात आले. महाराष्ट्रात परत आल्यावर “Maharashtra Inst. Of Medical Sc.” मधे त्याचा “CT Scan” करण्यात आला तेव्हा असे आढळून आले की बिचर्‍या त्रिंबकची मूत्रपिंडाची शस्त्रक्रियाच झाली नव्हती. पण बालाजीचे मूत्रपिंड मात्र काढण्यात आले होते. मग बालाजीचे मूत्रपिंड गेले कुठे ?

सत्यसाईबाबांचे साम्राज्य आणि दानधर्म ( हा लेख लिहिला तेव्हापर्यंत )
श्री. प्रेमानंदानी असा अंदाज वर्तवला आहे की ह्या साम्राज्याची संपत्ती जवळजवळ (हा लेख लिहिला त्यावेळेस) ६००० कोटी रुपये इतकी आहे. पुट्ट्पर्थीमधे आता ३००० बंगले आहेत जे परदेशी श्रीमंत शिष्यांना उपलब्ध आहेत. त्यांना सोयीचा म्हणून विमानतळही आहे. ह्या इथे १०,००० लोक जेवू शकतात. १९८२ मधे ६००० गावे दत्तक घेण्यात आली. त्या गावातील लोकांच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी हे पाऊल उचलण्यात आलेले आहे असे सांगण्यात येते. ३००० सत्यसाई केंद्रे भारतभर पसरली आहेत. ४०० परदेशी आहेत. ही सर्व केंद्रे १ लाख मुलांच्या शिक्षणासाठी देणग्या गोळा करत असतात. बाबांच्या समाजकार्याचा प्रचार हा त्याच्या कामाचा महत्वाचा घटक आहे. युनियन बॅंक बाबांना पाठवलेल्या देणग्यांमधून कुठलेही कमिशन आकारत नाही – जरी राष्ट्रीयीकृत बॅंक असली तरी.
बाबांच्या ७० व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला स्वत: पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी हजेरी लावली होती. त्यांनी सत्यसाई पाणी योजनेचे तोंड फाटेपर्यंत कौतुक केले. ह्या गावात अजून पाणी आहे का हा संशोधनाचा विषय आहे. जेथे सरकार कमी पडते किंवा काम करत नाही तेथे बाबा लोक कसे फायदे उठवतात ह्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. या मंगल प्रसंगी ज्या संस्थेचे नाव अमेरिकेमधे फार कोणाला माहीत नाही त्या संस्थेने बाबांना १६० कोटी रुपये भेट म्हणून दिले. बहुतेक हे हवाला रॅकेट असावे.

ज्या साईबाबांना आपले साधे शाळेतील शिक्षणही पूर्ण करता आले नाही त्यांचे शिक्षणाविषयीचे विचार फारच ऐकण्या सारखे आहेत. ते म्हणतात “ह्या जगाच्या मध्यभागी सर्व द्रव आहे. सगळे वितळलेले आहे. त्याला तापमान नाही. सगळे पाण्यासारखे द्रव स्वरुपात आहे. सोने, चांदी, लोखंड सर्व वितळलेल्या स्वरुपात तर असते. त्यानंतर येते ते घन रुप. मग त्यानंतर झाडे, मग मानव आणि प्राणी. पण सगळ्याच्या मध्यभागी परमेश्वरच आहे. तोच सगळ्याचा आधार आहे. पहिल्यांदा द्रव रसायनशास्त्र असते मग पदार्थविज्ञान. मग झाडे आणि वनस्पतीशास्त्र. मग मानव. पण मध्यभागी परमेश्वरच. तो नसेल तर हे सर्व कसे असणार ? हेच विद्यापीठात शिकवले पाहिजे” ज्या शिक्षणसंस्थेच्या संस्थापकांनी हे दिवे ओवाळले आहेत त्या संस्थेला श्रीमती. माधुरी शहा, ज्या University Grant Commission च्या अध्यक्षा आहेत त्यांनी विद्यापीठाचा दर्जा बहाल केला. या विदुषी बाबांच्या अत्यंत जवळच्या शिष्यांपैकी आहेत हे सांगायची गरज नाही. दुर्दैवाने आपल्यासारख्या गरीब देशात दानधर्म हा माणसाची बुद्धी नष्ट करतो. आपली आकाशवाणी दूरदर्शन हे त्यांचेच प्रचार करतात. पत्रकार हे दुर्बल असतात किंवा त्यांना विकले गेलेले असतात. न्यायसंस्थेबद्दल न बोललेले बरे ! ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे राजकारणी आपल्या पैशाने त्यांची पूजा करतात आणि त्यांना राजकीय मान्यता देतात. पण ह्या सर्व लोकांच्या, मुख्य म्हणजे सामान्य जनतेच्या लक्षात येत नाही की हा दानधर्म नसून बाबांची गुंतवणूक आहे. ज्या भारतात एवढे इंजिनीयर्स, वैज्ञानिक आहेत तेथे असले बाबा तग धरु शकतात हा एक फार मोठा विरोधाभास समजायला पाहिजे.”

ह्या सगळ्या प्रसिद्धीला कारणीभूत आहे एक परदेशी लेखक हॅरॉल्डसन. यांनी बाबांचे चमत्कार हे खरे आहेत हे पटवण्याचा हास्यास्पद प्रयत्न त्यांच्या पुस्तकात केला आहे. पण ह्या पुस्तकाने लोकांना फसवले ते फसवलेच ! त्याबाबतीत पुढे कधीतरी !
मुद्दा हा आहे आपण महाराष्ट्रात अशा भोंदू बाबांना आसरा देणार आहोत का ? मूठभर राजकारण्यांच्या आणि तथाकथित उद्योगपतींच्या फायद्यासाठी आपण आपली पुढची पिढी पांगळी करुन ठेवणार आहोत का ? नसेल तर आत्ताच ठासून सांगण्याची वेळ आहे. पंतप्रधानांचे जोडे उचललेत. खुशाल उचला पण आम्हाला आमची बुद्धी गहाण टाकायला सांगू नका ! हे सांगण्याचे धैर्य मला वाटते आता महाराष्ट्रात कोणात नाही, आहे हे आपले दुर्दैव दुसरे काय !

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीधर्मइतिहासविज्ञानअर्थव्यवहारफलज्योतिषराजकारणलेखबातमीअनुभवमतसल्लामाहिती

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

30 Sep 2010 - 11:00 pm | चिरोटा

डोळे उघडणारा लेख.
पण सर्वच सरकारे,मंत्री,अधिकारी,रुग्ण यापैकीच कोणीच काही बोलायला का तयार होत नाही सत्य साईबाबांविरुद्ध बोलायला?नक्की कोण अडवत आहे त्यांना? नरसिंह राव्/चव्हाण तर आता नाहीत्.त्यांच्या चमत्कारांवर कोणी खरोखरच विश्वास ठेवत असेल वाटत नाही.त्यांच्याबद्दल जी गरीब/मध्यम वर्गात आत्मियता आहे ती बहुतेक त्यांच्या संस्थेने केलेल्या कार्यामुळे असावी.
अवांतर- बाबा झालेत ८४ वर्षांचे.द्या सोडून आता त्यांना.!!

प्रियाली's picture

30 Sep 2010 - 11:29 pm | प्रियाली

अंधेरीला महाकाली गुंफेजवळ सत्यसाईबाबांचे मंदिर आहे. मी लहानपणी इथे गेले होते. का तर आमच्या मातोश्रींना खुमखुमी होती इथे जाण्याची. ;) (भक्त म्हणून नाही पण चिकित्सक म्हणून) या मंदिराचा आकार उमललेल्या कमळाप्रमाणे आहे. अतिशय सुंदर जागी, वृक्षांच्या छायेत हे मंदिर वसले आहे. आतमध्ये बाबांची भलीमोठी तस्वीर आहे. हसर्‍या चेहर्‍याने बाबा त्यांच्या सर्व भक्तांकडे आणि पाहुण्यांकडे बघत मंद हसत असतात. (बाकी सर्व सोडा पण ही जागा अतिशय सुरेख होती [आता आहे का माहित नाही])

मागे बाबांची खोली आहे. बाबा येथे आले की या खोलीत आराम करत. आम्ही ती खोली पाहण्याची परवानगी मागितली. अर्थातच ती नाकारण्यात आली. म्हणून बाहेरून मंदिरासभोवती फिरता फिरता त्या खोलीच्या खिडकीशी डोकावलो. खिडकीवर ए.सी. लावलेला होता. (माझ्या लहानपणी ए.सी. ही चंगळ समजली जाई.) खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून पलंगावरली भगवी सॅटिनची चादर दिसत होती.

असाच आपला प्रत्यक्ष अनुभव आठवला.

अवांतरः व्हिलिंग, पेनेसिल्वेनियाला तर स्वामी प्रभुपादांच्या भक्तांनी त्यांच्यासाठी सोन्याची खोली बांधली आहे. (त्यातले टॉयलेट/ कमोडही सोन्याचे आहे का ते मला बघायचे होते. असे सांगितल्यावर तिथला गाईड वैतागला होता पण मी जाऊन बघून आले ;) सोन्याचे नव्हते.)

असो.

बाकी लेख आवडले.

वाटाड्या...'s picture

30 Sep 2010 - 11:45 pm | वाटाड्या...

भे.बा शी सहमत आहे.

माझी काही मते...ही मते अश्या (ह्या नाही) एका परिवाराबरोबर सतत राहुन, काम करुन त्यांची काम करण्याच्या पद्धतीचा डोळे उघडे ठेऊन बारकाईने (त्यांना न समजता) केलेल्या गुप्त अभ्यासामुळे झाली आहेत.

साधारणपणे हे परिवार हे एक चालतं बोलती सिस्टीमच असते. फक्त एक सुत्र नेहेमी पाळलं जात आणि ते म्हण्जे ह्या कानाचे खबर त्या कानाला लागु न देणे. म्हणजे काय की ह्या परिवारात सुद्धा पात्रतेप्रमाणे गट असतात. ह्या गटांचा एकमेकांशी संबंध असतो पण तो फक्त त्या परिवारीक कार्यापुरता. शिवाय ह्या कार्यामधे 'भावनेला' इतकं महत्व असतं की त्याविषयी वाच्यता करणं हे सुद्धा सिस्टीमच्या विरोधात जाणं समजलं जात. जशी भ्रष्टाचाराची सुद्धा एक सिस्टीम असते तशीच कमी अधीक प्रमाणात इथेही. आता हे झालं समुह पातळीवर ...

वैयक्तिक पातळीवर जर एखाद्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला/समुहाला (जिथे २ घास सुखानं खायचे वांधे असतात) त्यांना अचानक एकदम सुख सोई मिळाल्या तर काय होईल? इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे, जन्मतः धार्मिक असलेल्यापेक्षा अचानक धर्मांतर केलेला जास्त धर्मांध असतो कारण त्यालाही आपलं अस्तित्व व महत्व वाढवुन हवं असतं. असं पहा, काही गावांमधे गावकरी श्रमदानाने रस्ता तयार करतात तर बर्‍याच ठिकाणी राजकारण्यांना बोलावुन त्याच्या हस्ते अनावरण वगैरे का होतं? शेवटी काय की जसा भ्रष्टाचार हा काही फक्त नेता करतो असं नाही तर त्याची पाळंमुळं खोलवर रुजलेली असतात तसच ह्या सिस्टीममधे पद्धतेशीर मार्गाने समुहाच्या भावनेला, खिशाला आणि कुठल्यातरी नरम गोष्टीला हात घालुन खालची सिस्टीम हे त्यांना मिळणारं यश वरपर्यंत पोहोचतं करते. जो ह्या सिस्टीमलाच हात घालायचा प्रयत्न करतो त्याला बाजुला करण्यात येतं. नाहीतर मला सांगा की त्या आसाराम बापु ह्या तथाकथीत बाबाला १ कोटी रुपयाच्या बदल्यात कशाला सोडलं असतं? त्या माणसावर म्हणे २ खुनाचा आरोप होता.

हे सगळं बघितलं की ज्ञानोबांची आठवण नक्की येते. ज्ञानेश्वरी लिहुन झाल्यावर ज्ञानोबा म्हणाले आता माझ्या पाया पडण्यापेक्षा त्या ज्ञानेश्वरीकडे जा आणि वाचा.

ह्याचं एक बोलकं चित्रण मधुर भांडारकरच्या 'कॉर्पोरेट' चित्रपटात आहे. जोपर्यंत आपले भारतीय लोक पुढे येऊन धर्माच्या , देवाच्या नावाचा हा बाजार मांडणार्‍यांचा विरोध करत नाहीत आणि जनतेला शासकीय मार्गाने सुखसोई देऊ करत नाहीत तोपर्यंत हे चालणारच. खरं आध्यात्म करणारे कधीच समोर येणार नाहीत. शेवटी आपली लोकशाही हे ही दुधारी शस्त्र आहेच, चालवता आलं तर जय आपलाच आहे पण नाही आलं तर माकडाच्या हाती कोलीत आहे. दुर्दैवानं सध्या आपल्याला दुसरीच बाजु जास्त दिसतीय.

- असत्यवाटीबुवा

सत्यसाईबाबांबद्दल खूप वादप्रवाद ऐकले होते. कधी विचार नाही केला. कारण त्यांच्यावर श्रद्धा नव्हती त्यामुळे उलट अथवा सुलट विचार करण्याची वेळच आली नाही.
पण एक मत मात्र आहे - कोणाच्या अथवा कशाच्याही आहारी जाऊ नये - मग ते धूम्रपान असो मद्यपान असो वा बुवाबाजी.
हां जर श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या.

चित्रा's picture

1 Oct 2010 - 12:52 am | चित्रा

श्रद्धेने वाचायच असेल तर या मंडळींचे साहीत्य वाचा त्यातून बोध घ्या.

मुळात साहित्य (याबाबतीत फक्त धार्मिक किंवा आत्मिक साहित्य म्हणते आहे) ते अनुभवातून आलेले नसले तर ते साहित्यच नसावे. नुसते शब्दांचे बुडबुडे ठरतील की.

शुचि's picture

1 Oct 2010 - 2:01 am | शुचि

सुंदर आणि चपखल

मूकवाचक's picture

1 Oct 2010 - 8:51 pm | मूकवाचक

नाथ सम्प्रदाय, दत्त सम्प्रदाय वगैरे आणि यात झालेले असन्ख्य (खरेखुरे) सत्पुरूष/ सन्त (उदा. आर्वीकर महाराज, गुळवणी महाराज, मोरया गोसावी) इ. बद्दल येथील सदस्यान्चे काय मत आहे?

एखादे रोपटे वाढवायचे, तर कीटकनाशकाचा फवारा मारावा लागतो आणि खतही घालावे लागते. हा निसर्ग आहे. आज वैदिक धर्माची जी स्थिती आहे ती बघता रोपटे मरूनच जावे इतका फवारा मारणे चालू आहे. खत घालण्याची मात्र कुणाला फारशी पर्वा दिसत नाही. बुवाबाजीवर हल्लाबोल वगैरे सगळे ठीकच आहे. त्या जोडीला सन्तधर्माचा उत्कर्ष व्हावा या साठी कुणी काही विधायक कार्य करत असेल तर ते ही वाचायला आवडेल.

प्राजु's picture

1 Oct 2010 - 9:22 pm | प्राजु

जळजळीत लेख..
खूप आवडला.
मी कोणत्याही बाबांची/ महाराजांची/ स्वामींची कधीच फॅन नव्हते.. त्यामुळे कधी या गोष्टी(मूठीतून राख, चमत्कार वगैरे) जवळून पाहण्याची वेळ आलीच नाही कधी. पण जे लोक असल्या बुवाबाजीचे फॅन आहेत त्यांची कीव नेहमीच वाटली.
लेख आवडला.

राजेश घासकडवी's picture

2 Oct 2010 - 12:27 am | राजेश घासकडवी

असंच पितळ उघडं पाडणारा एक लेख (दुसऱ्या कोणा बाबांबाबत, नाव आठवत नाही) अत्र्यांनी लिहिला होता, त्याची आठवण झाली.

अजून असंच डोळे उघडे ठेवायला भाग पाडणारं लेखन येऊ द्यात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

25 Apr 2011 - 12:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

केडगावचे नारायणबुवा ना हो? अत्र्यांनी सॉलिड काढली होती त्याची. पण जनतेला तर्कशास्त्रापेक्षा चमत्कार जास्त आवडतात.

नगरीनिरंजन's picture

28 Apr 2011 - 12:58 pm | नगरीनिरंजन

त्या लेखात नारायणबुवांची सेवा त्यांच्या भक्तिणी कोणकोणत्या प्रकारे करायच्या हे लिहीले होते आणि ते वाचून झिणझिण्या आलेल्या अजूनही आठवताहेत.
इतरवेळी अगदी सोवळ्यातल्या आहोत असं वागणार्‍या या तथाकथित चांगल्या घरच्या स्त्रिया या बाबा-बुवांपुढे इतक्या कशा निर्लज्ज होऊ शकतात असा प्रश्न पडला होता.

अप्पा जोगळेकर's picture

28 Apr 2011 - 8:28 pm | अप्पा जोगळेकर

सदर लेख ('महाराष्ट्राचा भयानक बुवा') वाचला तेंव्हा शाळेत होतो त्यामुळे अगदी मिटक्या मारत वाचला होता. त्याच्यावर 'बुवा तेथे बाया' असे नाटकसुद्धा अत्र्यांनी काढले होते.
'ब्रम्ह तेथे माया, वॄक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया' अशी त्या नाटकाची जाहिरात व्हायची असे ऐकले आहे.

सुनील's picture

2 Oct 2010 - 12:53 am | सुनील

अंनिसला महाराष्ट्रात तरी बर्‍यापैकी लोकांचा पाठिंबा आहे. तो अधिक वाढला पाहिजे. तरीही हे प्रकार पूर्णपणे थांबणार नाहीत पण निदान सार्वजनिक जीवनात वावरणारे लोक असल्या बुवाबाजीचे समर्थन करताना दहादा विचार करतील.

लेखाच्या दुसर्‍या भागाच्या सुरुवातीस पहिल्या भागाचा दुवा हवा होता.

प्रकाश घाटपांडे's picture

2 Oct 2010 - 9:42 am | प्रकाश घाटपांडे

मूत्र पिंडाची हकीकत मी अंनिसत लातुर भागातील त्या मुलाच्या तोंडातुन प्रत्यक्ष ऐकली होती. अक्षरशः अंगावर काटा आला होता. चित्रलेखाने ती छापली होती. त्या मुलाने कोर्टात लढाई केली पण दुर्दैवाने न्यायाधिशच सत्यसाईबाबाचे भक्त होते. निकाल त्या मुला विरुद्ध लागला.
अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वेब साईटवर हा सत्य साईबाबाच्या चमत्काराचा भंडाफोड पहा

लेख पुन्हा वाचला. लाखो करोडो लोक अश्या चमत्कारांवर सहजी विश्वास कसे ठेवतात? जगात इतके (शत)मुर्ख लोक कसे असतात ह्याची गंमत वाटते.

आदरणीय "इश आपटे" सरांची आठवण झाली.

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2011 - 12:46 pm | पिलीयन रायडर

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत...
जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

पिलीयन रायडर's picture

27 Apr 2011 - 12:46 pm | पिलीयन रायडर

हा लेख श्री. सचिन तेंडूलकर ह्यांना पाठवता येइल काय? त्या मुर्खाचे रड्तानाचे फोटो आले काल पेपर मध्ये... त्याला कळत कस नाही की तो जे करेल त्याला फॉलो करणारे लोक सुद्धा आहेत...
जिथे सचिन असा वागतो तिथे सामन्य, गरीब लोक तर सहज आहारी जाउ शकतात...

५० फक्त's picture

28 Apr 2011 - 3:51 pm | ५० फक्त

+१ तो पिरा, जेंव्हा तुम्ही सेलिब्रिटी बनता तेंव्हा तुमचं वैयक्तिक असं आयुष्य उरतच नाही हे समजुन घेतलं पाहिजे सचिननं.