गाण्यांच्या शोधात

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
31 Mar 2008 - 2:30 am

कधी कधी बर्‍याच गाण्यांचा विचार डोक्यात घोळत असतो. विचार घोळवावा लागतो. गाणी एकरूपच असतात, ती घोळवावी लागत नाहीत. एखाद्या गाण्याचे शब्द, लय, ताल, राग, सुरावट लक्षात राहण्यामागे कारण काय असेल? जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं.
उदाहरणं अनेक आहेत . असा बेभान हा वारा हे गाणं ऐकताना मी नेहमी मला एका चित्राचा कोपरा समजत आलो आहे. ते चित्र इतकं सजीव आहे की मला ते अगदी तसंच शब्दात बांधणं जमत नाही.

असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ ?
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ ?

ह्या दोन ओळींआधी जी सुरावट आहे ती मला अगदी वास्तवातल्या बेभान वार्‍याचा अनुभव देते. ती सुरावट आणि ह्या दोन ओळी ऐकताना मी स्वतःच ती स्त्री आहे असं वाटू लागतं. वार्‍यावर सैरभैर झालेला पदर आणि केस. हिंदकळणारी नाव. हातातं असहाय पडलेलं वल्हं. प्रत्येक क्षण नाव उलटवेल की काय असं भासवणारा.... अनं मनात एकच प्रश्न, कशी येऊ....

जटा पिंजून या लाटा विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जिवाचे पूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू ?

हे प्रत्ययकारी वर्णन एकतर अनुभवावे किंवा त्या गाण्याशी एकरूप व्हावे. अनुभवणे सगळ्यांनाच शक्य नाही. म्हणूनच हे शब्द, सूर ताल एकत्र येतात आणि मग तंद्री लागते. ती तंद्रीदेखील त्या अनुभवाजवळ घेऊन जाते. भिडे काळोख प्राणांना मधला लांबवलेला 'प्राणांना' डोळे बंद करून ऐकताना आपले प्राण एकाद्या काळेख्या पोकळीत तर नाहीत ना असं वाटतं. दिशांचे भोवरे अनेकवेळा होतात. त्यांना शब्दांत इतक्या सहजतेने पकडता येईल असं वाटलं होतं? इतक्या प्रलयकारी वर्णनानंतर अखेरच्या ओळीतला समर्पित भाव आपोआप येतो. आपोआप शब्दांत येतो. आपोआप स्वरांत येतो. हा भाव लिहिणार्‍या, संगीत देणार्‍या आणि गाणार्‍यांना गवसला आणि तो तितक्याच उत्कटतेने त्यांनी आपल्यासमोर मांडला आहे. आपल्या रसिकतेबाबत गाणं चोखंदळ असतं. अशी गाणी असतील तर आपण गाण्याबाबतील चोखंदळ असण्याची गरज उरत नाही.

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडिले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नावही मागे
दिले, हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ ?

ह्या कडव्यातला स्वरांचा बदल ऐका. तोडिले धागे ऐकेपर्यंत स्वरांची चढती कमान लागते. अन बुडाले नावही मागे म्हणे पर्यंत तेच स्वर पुन्हा शब्दांना मिंधे होऊन पायाशी येतात. दैवाचे दान शब्द आणि स्वरांच्या अगतिकतेतून येते. दान आणि दैवाने हे शब्द ऐकताना तर गातानाही आवंढा गिळावा इतकं दु:ख झाल्याचं भासतं. ह्याक्षणी मी परत स्वतःला त्या स्त्रीच्या रूपात पाहतो. मला तिची ओळख नाही. अन मी तिच्यात एकरूप झाल्याने मी स्वतःलाही ओळखू शकत नाही. कूळ, इभ्रत, गाव, नाव काहीच आठवत नाही. मूळ कवीचा अनुभव वेगळा असावा. त्याला समाजातील, रूढींच्या बंधनावर टीका करायची असावी. असेलही. पण ती भावना महत्त्वाची. तो अनुभव देण्याची ताकद हे शब्द आणि स्वर पेलतात.


जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ ?

ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित!

हे ठिकाणकलासंगीतसंस्कृतीभाषाशब्दक्रीडाक्रीडाप्रकटनविचारसद्भावनामतप्रतिसादमाध्यमवेधअनुभवमाहितीप्रतिक्रियाआस्वादप्रतिभा

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

31 Mar 2008 - 4:20 am | मुक्तसुनीत

ॐकाररावांचे मी सर्वप्रथम एका उत्तम प्रतीच्या स्फुटाच्या लिखाणाबद्दल अभिनंदन करतो.

काही गोष्टी या अनेक वर्षांच्या सहवासाने , त्यांच्या वारंवार केलेल्या श्रवणाने, आवृतीने, दर्शनाने, (अगदी गंधाने सुद्धा !) आपल्या मनावर खोल संस्कार करतात. आणि काही थोड्या गोष्टी या आपल्या अबोध मनात वास करून असतात. ॐकार यांनी अशा जातीच्या एका अनुभवाला त्यांच्या अबोध मनातून एखाद्या प्रयोगशाळेतल्या वैज्ञानिकासारखे आपल्या शब्दांच्या चिमटीमधे पकडून , आपल्या विश्लेषणादि साधनांच्या मायक्रोस्कोपखाली घालून तपासले आहे. पण हा अभ्यास, हा मागोवा निर्जीव नाही., भावनारहित शुष्क नाही. या एका गाण्याचे नि आपले नाते काय ? त्या गाण्यातल्या व्यक्त झालेल्या अनुभवाचे नि आपले नाते काय ? एका पुरुषकवीने लिहिलेल्या एका स्त्रीच्या मनातील कल्लोळाला एक संगीतकार अशी , हृदयाच्या आर्त स्वरांच्या तारा छेडणारी चाल बांधतो. त्यातील निसर्गाच्या चित्रणाचे , त्या रौद्रभीषण पावसाळी रात्रीच्या पूराचे त्या चालीशी, त्यातल्या पार्श्वसंगीताशी असे काही नाते जुळलेले असते. आणि हे गाणे गाणारा तो दिव्य स्वर ! त्याचे वर्णन पामर शब्दानी काय करायचे ? आणि हे सगळे ऐकणारे आपण.

>>>>> ह्या कडव्याचा मी अजून पत्ता शोधतो आहे. गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच. पण तोवर जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्ह्या परत हे चित्रं आणखी ताकदीनं समोर उभं राहतं. त्या दुमडलेल्या कोपर्‍यासहित!

एखादे गाणे कोट्यावधी लोक शेकडोवेळा ऐकतात. पण कुणीसे म्हण्टले आहे ना , "बडी मुष्किलसे होता है चमन में दीदावर पैदा !"
ॐकार यांच्या दीदावरीला माझा कुर्निसात.

मीनल's picture

31 Mar 2008 - 7:20 am | मीनल

सुंदर!
स्वरांबद्दल ,शब्दांबद्दल ,त्यातून तुम्हाला कळलेल्या ,न कळलेल्या अर्थाबद्दल छान लिहिले आहे.

कधी कधी ही जुनी गाणी नुसतीच ऐकतो आपण.
पण विचारच करत नाही त्या विषयाचा!
चाल आठवून गात राहिली जातात काही गाणी
त्यांचा अर्थ असा शोधावासा वाटतो तुम्ही लिहिलेल्या लेखावरून.

हे गाण म्हणजे एक चित्र.आणि तुम्ही एक कोपरा.
सर्वसाधारण पणे वाचक ,श्रोता ,प्रेक्षक स्वतःला केंद्रस्थानी मानतो आणि कथा आपल्या भोवती गुंडाळून घेतो.
इथे नेमक वेगळ आहे काहीसं! असाधारण!
आपल्या चित्रातील `दुमडलेल्या कोप-याची ` उपमा अप्रतिम आहे.

`एका पुरूषाने स्वतःला स्त्री रूपात पाहणे `हे त्या गाण्याच श्रेय.लिहिणा-याच आणि गाणा-याच.
पण तो श्रोता तितक्या प्रामाणिकपणे त्यात मिसळून जातो ही त्या श्रोत्याची रसिकता!

आपले अजून असेच लेख वाचायला मिळावेत अशी इच्छा आहे.

विसोबा खेचर's picture

31 Mar 2008 - 7:42 am | विसोबा खेचर

क्या बात है ॐकारशेठ!

या गाण्याचं तू अतिशय सुरेख रसग्रहण केलं आहेस!

काही गाणी ही सहजसोपी असतात व तेवढीच सुंदर असतात, तर काही गाणी सुंदर असतात परंतु तेवढी सहज सोपी नसतात, कठीण असतात. हृदयनाथ मंगेशकरांची बरीचशी गाणी ही या दुसर्‍या प्रकारात मोडतात. म्हणजे सुरेख परंतु तेवढीच कठीण!

मला विचारशील तर हे 'असा बेभान...' हे गाणंही सर्वच दृष्टीने (म्हणजे शब्द,चाल, म्हणणे) अतिशय कठीण गाणं आहे तरीही फार सुरेख आहे! आणि या कठीण परंतु अत्यंत सुरेख गाण्याचं तू तेवढंच सुरेख रसग्रहणही केलं आहेस हे मला विशेष वाटतं! मनापासून अभिनंदन...!

गाणं ऐकताना कधी मी या भावनेपर्यंत पोहोचलोच नाही. तेवढी कुवत माझ्या गाठीशी नसावी. चित्राचा हाच एक कोपरा. दुमडलेला. आज उद्या ठाव लागेलच.

नक्कीच लागेल! गाण्याची श्रवणभक्ति, गाण्याची साधना नेहमीच फलदायी होते! मात्र वारंवार डुबक्या मारून खोल समुद्राच्या तळाशी सतत जात राहिलं पाहिजे, त्यातली रत्न, माणिकमोती शोधण्यासाठी!

एका सुंदर रसग्रहणाबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन! खूप सुंदररित्या तू या गाण्याकडे बघितलं आहेस! अजूनही अश्याच काही तुझ्या मनाचा ठाव घेतलेल्या गाण्यांबद्दल इथे लिही, ही विनंती...

आपला,
(गानप्रेमी!) तात्या.

मदनबाण's picture

31 Mar 2008 - 8:07 am | मदनबाण

ॐकार सर आपल गाण्याच भाव विष्लेषण अगदी जबरदस्त आहे.
आपले अजुन असेच लेख वाचण्याचा आनंद सर्व मि.पा करांना सदैव मिळो.....

(एक-दोन तोडके मोडके शब्द सुद्धा सरळ न लिहु शकणारा)
मदनबाण

सहज's picture

31 Mar 2008 - 8:36 am | सहज

ॐकार, अतिशय सुंदर रसास्वाद!!

मुक्तसुनित यांचा प्रतिसाद देखील नेहमीप्रमाणेच सुबोध.

प्राजु's picture

31 Mar 2008 - 8:45 am | प्राजु

ॐकार, अतिशय सुंदर..

आपण इतके सुंदर रसग्रहण केले आहे की आता लगेच हे गाणे ऐकण्याची इच्छा होते आहे. कितिदा ऐकले तरी समाधान होत नाही.
आपले अभिनंदन या सुंदर गाण्याच्या सुरेख रसग्रहणाबद्दल.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com

प्रमोद देव's picture

31 Mar 2008 - 8:54 am | प्रमोद देव

ॐकार अतिशय उत्तम असे रसग्रहण सादर केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
गाण्यातला भाव,त्या भावांना पोषक असे संगीत आणि रसिक श्रोत्याला त्यातून जाणवणारी अभिव्यक्ती , अशा तिन्ही अंगांचे अतिशय समर्पक शब्दात केलेले वर्णन आवडले.

आनंदयात्री's picture

31 Mar 2008 - 10:38 am | आनंदयात्री

हा बेभान ... हे गाणे तुम्ही म्हणता तसे खरोखरच चित्रदर्शी आहे. बाकी गाणे एकतांनाच्या रसग्रहणाचे, आपल्या मनातल्या भावभावनांचे तुम्ही अत्यंत सुंदर तरल पदर उलगडुन दाखवले आहेत, धन्यवाद.

>>जास्त विचार केला तर अनेक शास्त्रीय कसोट्या सांगता येतील. त्या कसोट्यांची रसिकतेला मात्र काही गरज नाही. अंतर्बाह्य असतं ते गाणं. त्यात शब्द , ताल , सूर , लय काहीच वेगळं नसतं. सगळं एकजीव असतं.

१००% सहमत. अशाच रितीने गाण्याचा निखळ आनंद घ्यायला आवडतो.

नंदन's picture

31 Mar 2008 - 10:40 am | नंदन

सुंदर रसग्रहण.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

31 Mar 2008 - 12:06 pm | स्वाती दिनेश

असेच म्हणते, अप्रतिम!
स्वाती

नीलकांत's picture

31 Mar 2008 - 12:50 pm | नीलकांत

वाह ! ओंकार खुप छान लिहीलं आहेस. गाणं माझ्या आवडीचं आहेच आता ते अधीक गहीरं झालं असं मी म्हणू शकतो.

उत्तम रसग्रहणाबद्दल धन्यवाद.

नीलकांत

स्वाती राजेश's picture

31 Mar 2008 - 3:25 pm | स्वाती राजेश

प्रथम अभिनंदन कारण इतके सुंदर आणि सोपे रसग्रहण केले आहे म्हणून.
आता विनंती अशाच सुंदर गाण्यांचे रसग्रहण आम्हाला वाचायला मिळू दे...

चतुरंग's picture

31 Mar 2008 - 4:52 pm | चतुरंग

पाडगावकरांच्या ह्या शब्दांमागे काय भावना असतील ह्याचा शोध घेण्याचा अतिशय मर्मज्ञ प्रयत्न तुम्ही केलेला आहे त्याबद्दल तुमचे अभिनंदन!
हृदयनाथांनी गाणे सुरू होतानाच्या वापरलेल्या व्हायोलिनच्या सूरलाटा एका क्षणात घोंघावणारे वारे आणि लाटांचा प्रत्ययकारी आसमंत उभा करतात आणि तीच लाट दीदी त्यांच्या स्वर्गीय आवाजाने कुठल्याकुठे घेऊन जातात, आताही माझ्या कानात ते गाणं घुमू लागलं आहे!
चराचरातल्या अमरत्वाचा स्पर्श घेऊन आलेल्या अशा काही मोजक्याच कलाकृती असतात ज्या आपल्या दृश्य अस्तित्वापलीकडचा असा दिव्य अनुभव देऊन जातात जो ओंजळीत घेता येत नाही.
तुमच्या रसग्रहणातून तुम्ही त्या मागच्या तुमच्या अनुभूती पोचवल्या आहेत की तुम्हाला आणि आम्हाला जोडून जातात!

चतुरंग

सुवर्णमयी's picture

31 Mar 2008 - 6:27 pm | सुवर्णमयी

रसग्रहण आवडले.
सोनाली

केशवराव's picture

31 Mar 2008 - 8:10 pm | केशवराव

रसग्रहणाचा उत्तम नमुना पेश केल्याबद्दल खरच कौतूक. मनापासून कौतुक !
आपण गाणे कितीतरी वेळा ऐकतो. माझे अत्यंत आवडते गाणे. माझ्याच भावनांना आपण साकारल्या सारखे वाटले. हे श्रेय त्या गाण्याचे. अनेक जणांच्या मनांत एक सारखेच्य्ह चित्र साकारणे ,एकच परीणाम करणे, हे त्या गाण्याचेच श्रेय होय.
ह्या गाण्याचे गीतकार, गायिका याचबरोबर संगितकार हा ही श्रेष्ठच होय . स्वरांतून चित्र उभे करणे निश्चीतच दाद देण्याजोगी गोष्ट आहे.
पण या सर्वापेक्षा आपले रसग्रहण फारच उतम . त्रिवार कौतुक.
- - - - - - - केशवराव.