देणाऱ्याचे हात घ्यावे
लोकलच्या फूटबोर्डाच्या सांडव्यावरून
फलाटावर धो धो कोसळणाऱ्या
बेफाम गर्दीचा बेहाल
थेंब बनायची सवय करतानाच्या काळातली गोष्ट...
...एक दिवस दोन उघडीवाघडी भिकाऱ्याची लेकरं
गर्दीबरोबर फलाटावर सांडताक्षणी
चट्दिशी उठून
वाहत्या गर्दीच्या
काठावर गेली
एक नेहमीसारखा खाली बसला
अन् दुसरा ऐटीत उभा राहून
स्वतःच्या भिकेतले नाणे
बसलेल्याच्या ओंजळीत टाकून
निर्व्याज हसू लागला
मग आनंदाच्या फेर वाटपासाठी भूमिकांची अदलाबदल..