डॉ.आनंद यादवआमच्या औरंगाबाद शहरात काल, महाबळेश्वर येथे होणार्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्याक्षाची निवड होणार होती. आम्ही धावत-पळत मसापच्या (मराठवाडा साहित्य परिषद) कार्यालयात पोहचलो. गर्दी दिसली की डोकावून पाहण्याची सवय, त्यामुळे गर्दी झालेली होती. एकाला विचारले कोण ? तर तो म्हणाला डॉ.आनंद यादव ! डॉ. आनंद यादव विजयी झाले होते आणि त्यांची मुलाखत पत्रकार घेत होते. सायंकाळी मिपावर अभिनंदनाचा प्रस्ताव टाकू म्हटलं तर डोक्यात बजबज असल्यामुळे विसरुन गेलो. बरं इकडून तिकडून तयारी केली तर, कुठेच ते अध्यक्ष झाल्याची चर्चा /बातमी दिसेना. मनात विचार आला त्यांचे विरोधक कोर्टात गेले की काय ? ( दोन वेळेस अध्यक्षपदाने हुलकावणी दिली असल्यामुळे शंकाच शंका )पण तसे काही झाले नव्हते. आजच्या दैनिकात त्यांच्या संमेलनाध्याक्षांची बातमी वाचून पुन्हा आनंद वाटला. यावेळस आम्हाला दुहेरी आनंद झाला .एक ग्रामीण साहित्यचळवळीला प्रेरणा देणारा माणूस अभासासं चा अध्यक्ष झाला तर अभाविसासं च्या अध्यक्षपदी दलित साहित्याचे भाष्यकार डॉ. पानतावणे यांची निवड झाली. ग्रामीण आणि दलित साहित्याने एकमेकांच्या हातात हात घालून साहित्य प्रवासाचा मार्ग आखलेला असल्यामुळे या योगायोगाने अतिशय आनंद झाला.
ग्रामीण साहित्य लेखन करणार्या लेखकांची नावे घेतली की, जी काही नावं डोळ्यासमोर येतात त्यातलं एक नाव म्हणजे आनंद यादव.मराठीत कसदार ग्रामीण लेखन करणारे आणि ग्रामीण साहित्य चळवळीला गती देणारे एक मोठं नाव, आनंद यादव.
खेड्यात ग्रामीण साहित्याची व्यासपीठे निर्माण झाली पाहिजेत, तिथे नव्या प्रकाशन संस्था आणि साहित्यसंस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि ती काळाची गरज आहे, असा विचार त्यांनी सतत मांडला.
आनंद यादवांनी आपल्या लेखनाची सुरुवात 'हिरवे जग' (१९६०)पासून काव्यलेखनाने केली. पुढे त्यांनी कविता, कथा, व्यक्तिचित्रे, कादंबरी, ललित लेख, वगनाट्य, समीक्षा, असे सर्वच प्रकारचे लेखन केले, त्यांच्या लेखनाची वाटचाल आजतागायत चालू आहे. साठच्या दशकात त्यांनी काव्य आणि गद्य असे दोन्ही स्वरुपाचे लेखन केले. आपला अनुभव कवितेतून उत्तम व्यक्त होत नाही असे वाटल्यामुळे ते कथा,कादंबरीकडे वळले. आपल्या लेखनात प्रामुख्याने ग्रामीण अनुभवविश्व त्यांनी मांडला. या लेखनाबरोबर त्यांनी ग्रामीण साहित्याच्या स्वरुपाविषयी त्यांनी खूप चिंतन केले. नव्याने ग्रामीण लेखन करणार्यांना नव्या लेखकांना त्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. त्यांच्या 'झोंबी' या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमीचा (१९९०) पुरस्कार मिळाला. १९७५ नंतर त्यांनी सुरु केलेल्या ग्रामीण साहित्य चळवळीमुळे ग्रामीण साहित्याने एक नवी वाट चोखाळली असे म्हणावे लागेल.
डॉ. आनंद यादव यांची पत्रकार परिषद
ग्रामीण साहित्यात कथा,कादंबरीच्या निमित्ताने विचार मांडतांना खेडेगाव, तेथील जीवन,शेती, रीती, निसर्गाशी, मातीशी असलेला संबध. त्यांचे दु:ख,दारिद्र्य,चा सुक्ष्मरितीने अभ्यास करुन मानवी भावनांचा,भावविश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
डॉ. आनंद यादवांचे वैशिष्टे ज्याची नोंद मला महत्वाची वाटते की, त्यांच्या काळातील ग्रामीण कथा वाचतांना पात्रांचे संवाद बोलीतून व्यक्त होत होते, तर निवेदन प्रमाण मराठीतून व्यक्त होत होते, (लेखक निवेदनामधून बोलत होते) तेव्हा आनंद यादवांनी आपल्या ग्रामीण कथेत ग्रामीण माणूसच निवेदनाद्वारे बोलतांना वाचकांसमोर उभा केला.
ग्रामीण साहित्याच्या समीक्षेच्या निमित्ताने त्यांनी भारतीय खेड्यांचा आता विकास झाला आहे. तेव्हा त्याचा ग्रामीण आत्मा राहीलेला नाही. ग्रामीण भागाचे झपाट्याने झालेले शहरीकरण, नागर संस्कृती ग्रामीण माणसाच्या घरात घुसली आहे. शहरी आणि ग्रामीण दरी कदाचित उद्या उरणार नाही पण परिवर्तनाचा विचार करुनही ग्रामीण साहित्याचे मूल्य जरासेही कमी होणार नाही असे त्यांचे मत आहे.
डॉ. आनंद यादवांच्या ग्रामीण साहित्यचळवळीवर अनेकदा आक्षेपही घेण्यात आले. मराठा जातीची ही जातीयवादी चळवळ आहे, हे साहित्य क्षेत्रातले राजकारण आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी हे चालू आहे, वगैरे-वगैरे असे त्यांच्यावर आरोप करण्यात आले. या सर्व आक्षेपांना त्यांनी 'ग्रामीणता: साहित्य आणि वास्तव ' या ग्रंथातून उत्तरे दिली आहेत.
सारांश : ग्रामीण साहित्य लेखन, सामाजिक जाणिवा, आणि बदलणार्या ग्रामीण साहित्याचा विचार करणारा एक मोठा लेखक म्हणून साहित्यविश्वाला त्यांची नोंद घ्यावीच लागलेली आहे. महाबळेश्वर इथे होणार्या ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. आनंद यादव यांचे मन:पूर्वक अभिनंदन !!!
डॉ. आनंद यादवांबद्दल विविध दैनिकामधून त्यांच्या साहित्याबद्दल खूप काही छापून आलं आहे. पण साहित्याचा वाचक म्हणून त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त करण्यासाठी हा आमचा स्वतंत्र प्रपंच !!!
प्रतिक्रिया
17 Jan 2009 - 8:47 pm | प्रमोद देव
डॉ. आनंद यादव ह्यांचे अभामसासंनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
17 Jan 2009 - 9:05 pm | विकास
चांगली आणि धावती ओळख आवडली.
डॉ. आनंद यादव यांचे अभिनंदन!
17 Jan 2009 - 9:13 pm | प्राजु
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Jan 2009 - 10:38 pm | स्वामि
आनंद यादव हे अत्यंत ब्राम्हणद्वेष्टे आहेत.आजवरचे त्यांचे लिखाण हे दुय्यम दर्जाचे व टाकाउ आहे.त्यांचे अध्य़क्षपद हे शरद पवारांच्या ब्रा.विरोधी धोरणाचा भाग आहे.आठवा तो बोकड बळी,अरुण साधुंचे टिळकांबद्द्लचे वक्तव्य,निळु फुलेंचि समाजवाद्यांवर ब्रा. म्हणुन टीका.कमीत कमी ब्रा.तरी अशा लोकांचं उदोउदो करणं थांबवावं.दिपक टिळक फुलेंचा सत्कार काय करतायत,मेधा पाटकर आर.आर.चे गुण काय गातायत,म्हणे ब्रा.द्वेष 'वगेरे वगेरे'.जणु काही ब्रा.चा तिरस्कार ही एक किरकोळ गोष्ट आहे.
18 Jan 2009 - 8:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आजवरचे त्यांचे लिखाण हे दुय्यम दर्जाचे व टाकाउ आहे.
डॉ. आनंद यादवांचे सर्वच साहित्य आम्ही काय वाचलेले नाही. जे काही वाचले आहे, ते बरेच समिक्षात्मक स्वरुपाचे वाचलेले आहे. पण त्यांचे लेखन दुय्यम दर्जाचे आहे, हा शोध आपण कशावरुन लावला. आणि समजा तसे असलेच तर ते त्यांच्या साहित्य लेखनातील कोणत्या पुस्तकात दुय्यम / टाकाऊ लेखनाचा अनुभव येतो, ते संदर्भासहीत पटवून द्यावे ! उगाच विरोध करायचा म्हणून काहीही लिहू नये असे वाटते.
( असे लिहिण्यामागे आपल्याशी संवाद व्हावा, याच भूमिकेतून लिहिले आहे. हेही नम्रपणे नमूद करतो.)
स्वतःच्या मालकीची शेती नाही. दुसर्याच्या शेतावर कूळ म्हणून राबणार्या कुटूंबात जन्मलेल्या आनंद यादव यांना शिक्षणाचे कोणतेच वातावरण नव्हते. गुरा-ढोरांमागे, शेतीकामेकरुन शिक्षणाची आवड जोपासली. आपला मुलगा शिक्षणाच्या नादी लागला तर आपले पोटाचे हाल होतील असे वाटून शिक्षणाच्या आड येणार्या वडिलांची मर्जी सांभाळली. शेतीची कामे सांभाळून अभ्यास करत राहिले. अशा वेगवेगळ्या अडी-अडचणीतून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी गाव सोडले. थोरामोठ्यांच्या मदतीने एम. ए झाले. पुढे प्राध्यापकही झाले पण शहरात बसून खेडेगावाचे चित्रण करुन शहरी वाचकाला त्याकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. जे जे अस्सल ग्रामीण होते, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखनामधून व्यक्त केले. त्यामुळे ग्रामीण साहित्यासाठी वाहून घेतलेल्या (या पूर्वी निवडणूकीत पराभव झाल्यामुळे त्यांनी काही कडवट भाष्य केल्याचे वाचनात आले, पण ती एक सहज प्रतिक्रिया असते असे वाटते) माणसाचा हा एक मोठा गौरव आहे, असे आम्हाला तरी वाटते !!!
-दिलीप बिरुटे
18 Jan 2009 - 11:36 am | प्रदीप
स्वतःच्या मालकीची शेती नाही. दुसर्याच्या शेतावर कूळ म्हणून राबणार्या कुटूंबात जन्मलेल्या आनंद यादव यांना शिक्षणाचे कोणतेच वातावरण नव्हते. गुरा-ढोरांमागे, शेतीकामेकरुन शिक्षणाची आवड जोपासली. आपला मुलगा शिक्षणाच्या नादी लागला तर आपले पोटाचे हाल होतील असे वाटून शिक्षणाच्या आड येणार्या वडिलांची मर्जी सांभाळली. शेतीची कामे सांभाळून अभ्यास करत राहिले. अशा वेगवेगळ्या अडी-अडचणीतून आपले शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षणासाठी गाव सोडले. थोरामोठ्यांच्या मदतीने एम. ए झाले
हे सर्व 'झोंबी'त आलेले आहे. ह्या प्रसंगानिमीत्त 'झोंबी' चे पुनर्वाचन करून त्यातील अस्सल धगीचा 'आनंद' मी परत एकदा घेईन म्हणतो.
डॉ. यादव व डॉ. पानतवणे ह्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच ह्या निमीत्ताने इथे डॉ. यादवांवर एक छोटेखानी परंतु माहितीपूर्ण लेख लिहील्याबद्दल डॉ. बिरूटेंना धन्यवाद.
18 Jan 2009 - 1:19 pm | सहज
>तसेच ह्या निमीत्ताने इथे डॉ. यादवांवर एक छोटेखानी परंतु माहितीपूर्ण लेख लिहील्याबद्दल डॉ. बिरूटेंना धन्यवाद.
असेच म्हणतो.
18 Jan 2009 - 9:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रदिपराव आपण डॉ. आनंद यादवांचे 'झोंबी' आत्मचरित्र वाचलंय तेव्हा डॉ. आनंद यादव यांना वाचणारा माणूस भेटल्याचा आनंद झाला .
मात्र मी काही 'झोंबी' आत्मचरित्र वाचलं नाही. माझ्यावर संस्कार आहे ते डॉ.रवींद्र ठाकुर यांच्या 'आनंद यादव व्यक्ती आणि वाड;मय' या पूस्तकाचे !!!
-दिलीप बिरुटे
18 Jan 2009 - 10:25 am | कोलबेर
शरद पवारांचे ब्रा विरोधी धोरण म्हणजे काय?
18 Jan 2009 - 10:51 am | घाटावरचे भट
=))
असेच विचारतो.
18 Jan 2009 - 11:20 am | विनायक प्रभू
श्.प. ब्रा. विरोधी आहेत काय?
18 Jan 2009 - 11:29 am | कोलबेर
त्यांना काय जातय ब्रा. विरोधी व्हायला..त्यांची जात पुरुषाचीच :)
18 Jan 2009 - 12:17 pm | विनायक पाचलग
असो या ब्राह्मण विवादात आपण पडायलाच नको
पण एक वाचक म्हणून त्यांचे अभिनंदन
बाकी त्यांचे लिखाण ,काय आम्ही वाचलेले नाही
असो वाचल्यवर चर्चा करु
आपला
(चुकुन माकुन पुस्तके वाचणारा) विनायक
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
18 Jan 2009 - 9:10 pm | सखाराम_गटणे™
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3991200.cms
मातीतला माणूस
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
18 Jan 2009 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गटणेसेठ 'मातीतला माणूस' मटाचा चांगला दुवा दिला !
आभारी आहे !
-दिलीप बिरुटे
18 Jan 2009 - 9:29 pm | लिखाळ
आनंद यादवांची छान ओळख करुन दिलीत.
यादवांचे अभिनंदन.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
19 Jan 2009 - 8:10 am | गणा मास्तर
शृंगारावर 'स्पर्शकमळे' सारखे पुस्तक लिहुन हा नाजुक विषय लीलया हाताळणार्या डॉ. आनंद यादवांचे अभिनंदन.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
19 Jan 2009 - 9:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मराठी ललित लेखनात शृंगाराच्या बाबतीत जरा सोवळेपणाच असावा असे वाटते ! त्यामुळे मिळाले तर डॉ. आनंद यादवांचे 'स्पर्शकमळे' वाचावे असे वाटत आहे. त्यांच्या ललित लेखनाबद्दल अधिक माहिती टाकता आली तर टाका राव !
स्त्री-पुरुष आणि त्यांच्या शृंगारिक भावना ललित लेखनाद्वारे कशा व्यक्त केल्या असतील याची अंमळ उत्सुकता लागून राहिली आहे !
-दिलीप बिरुटे
19 Jan 2009 - 8:52 am | अभिरत भिरभि-या
डॉ. आनंद यादवांचे मन:पूर्वक अभिनंदन.
यादवांच्या साहित्याची चांगली ओळख करून दिल्याबद्दल बिरुटे सरांनाही धन्यवाद.
19 Jan 2009 - 9:42 am | अवलिया
असेच म्हणतो
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
8 Mar 2013 - 7:51 pm | आशु जोग
फारच संमिश्र प्रतिसाद !
आणि यादव यांच्याबद्दल दोन्हीप्रकारची टोकाची मते आहेत लोकांची असे दिसते मिपावर
8 Mar 2013 - 9:46 pm | मैत्र
झोंबी, घरभिंती, नांगरणी, काचवेल.. ही पुस्तकं वाचली आणि आवडली आहेत.
आत्मचरित्रपर लेखनाचे हे वेगवेगळे भाग आहेत.
उत्तम आणि वाचनीय साहित्यकृती आहेत. नुकतंच डवरणी वाचलं पण ते तितकं विशेष वाटलं नाही.
10 Mar 2013 - 1:37 am | आशु जोग
आणि नटरंग
11 Mar 2013 - 10:33 am | अनुप ढेरे
झोंबी आणि घरभिंती वाचली आहेत मी. ती वाचल्यावर असं वाटतं की आपण त्यांच्या तुलनेत फारच सोपं आयुष्य जगतोय. लिहिण्यची शैली पण छान आणि त्यांचे अनुभव तर केवळ सुन्न करणारे...