Reprinted with permission from EnlightenNext magazine,
© 2005 EnlightenNext, Inc. All rights reserved. www.enlightennext.org
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - १
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - २
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ३
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ४
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ५
परमेश्वराचे उगमस्थान तुमचा मेंदू ..........भाग - ६
संभाषण आणि समजणे या क्रियांचा जीवशास्त्रीय विचार ही फक्त एक सुरवात आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत जाईल तसतसे आपल्या मेंदूची बाकिची रहस्येपण उजेडात येतील. “Mapping of Mind” या आपल्या पुस्तकात रीटा कार्टर म्हणते “ आता काहिच वर्षांनी माणसाच्या विविध भावनांचे स्पष्टीकरण देता येईल. राग म्हणजे काय ? हिंसक म्हणजे काय ? प्रेमळ, विनोदी क्रूर, अहंकार इ. भावनांचा छडा मेंदूमधे लावणे आता शक्य होईल.”
अधुनिक तंत्रज्ञान वापरुन मेंदूच्या विविध प्रतिमा काढून त्याचा अभ्यास करून शास्त्रज्ञांना आता तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आता डोकवता येऊ शकते. कोण खोटे बोलते आहे, कोण नाटकी आहे, गुन्हा केला आहे का ? इ.इ. आणि या प्रश्नांची उत्तरे लपवता येत नाहीत कारण त्याचेही प्रतिबींब या प्रतिमांत पडते. याच मूळे बहुदा “Ethical Neuroscience” या शब्दाचा जन्म झाला असावा. एखादा माणूस वाईट वागतो किंवा चांगला वागतो असे आपण सहजच म्हणून जातो. या सगळ्या अभ्यासावरुन माणुस कसे वागायचे हे ठरवत असेल हे मानायला कठीण जाते. तो काही ठरवून करत असेल याचीच शंका आहे. जर आपल्या सर्व हालचाली, आचार विचार हे जर मेंदूमुळे होत असतील आणि मेंदूची जडणघडण ही आपले जीन्स आणि वातावरण यांच्यातील अन्योन्यक्रिया ठरवत असतील तर आपल्या इच्छेचा आणि इच्छाशक्तिचा प्रश्न येतोच कुठे? तत्वज्ञान, ज्याला हजारो वर्षांची परंपरा आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न मुर्खपणाचा असू शकेल. पण चेताशास्त्रामधे काम करणार्या शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की तुम्ही एखादा निर्णय जाणीवपूर्वक घेण्याअगोदरच मेंदूनी तो निर्णय घेतलेला असतो. त्यामुळे आपण निर्णय घेतो किंवा इच्छाशक्ती हाच एक मोठा भ्रम आहे हा एक वादग्रस्त विषय होण्याचा संभव नाकारता येणार नाही. कारण त्यापुढे हे सिध्द होण्याची शक्यता आहे की धर्माची आपल्या मनातली उत्पत्ती किंवा धार्मिकता ही मेंदूमधील भौतिक क्रियांचा परिणाम आहे.
मी त्या परिषदेहून परतीच्या प्रवासात घेतलेल्या टाईम्सचा अंक उघडला. तो “मन आणि शरीर” विशेषांक होता आणि त्याचा मुख्य विषय होता “आनंदाचे विज्ञानशास्त्र”. तो चाळताना जे पान मी उघडले त्यावर एका ध्यानस्थ बौध्दभिख्कूचे छायाचित्र छापले होते. त्याच्या डोक्याला अनेक विद्युताग्र लावलेले होते. ते लावत होते मानसशास्त्रज्ञ रीचर्ड डेव्हिडसन. त्यांच्या अभ्यासाचा विषय ध्यानधारणा करणार्याच्या मेंदूतील क्रिया हा आहे. नुकताच त्यांचा “आनंदाचे जीवशास्त्र” हा लेख छापून आला होता. त्या लेखात त्यांनी आध्यात्मिक अनुभव आणि मेंदू यांच्यातले नाते शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याच्याही अगोदर मे २००१ मधे त्यांचा एक लेख आला होता “ परमेश्वर आणि मेंदू: आपण आध्यात्मिक अनुभवासाठी या जालामधे कसे जोडले गेलेलो आहोत” या लेखामुळेच मला यांची ओळख झाली. आता मी त्यांनाच भेटायला चाललो होतो.
न्युबर्ग, पेनसिल्वानिया मेडिकल सेंटरमधे क्ष-किरण तज्ञ म्हणून ते काम करत होते आणि त्यांनी ध्यानधारणा आणि मेंदू या विषयावर नव्वद सालात दोन पुस्तके लिहीली होती. एक होते “Mystical Mind” आणि दुसरे “Why God wont go away”. या पुस्तकामुळे त्यांना चांगलीच प्रसिध्दी मिळाली होती. या पुस्तकानंतर त्यांनी या विषयावर बरीच भाषणे दिली होती. “What the Bleep do we know” या चित्रफितीतही त्यांनी हजेरी लावली आहे. या सगळ्या भाषणांनंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे जनमानसात अध्यात्माचे मूळ आपला मेंदू आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे, तसेच ते खरे ठरेल की काय याची प्रचंड भितीही आहे.
त्यांच्या खिडकी नसलेल्या क्ष किरणांच्या प्रयोगशाळेत आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांच्या टेबलावरच्या लॅपटॉपकडे बोट दाखवून ते म्हणाले “मला तुला हे दाखवायचे होते”. त्या लॅपटॉपच्या पडद्यावर दोन मेंदूची चित्रे होती. “डावीकडची प्रतिमा ही माणूस ध्यानस्थ होण्याच्या अगोदरची आहे. उजवीकडची तो ध्यानात असतानाची आहे.” ध्यान करणारा माणूस एक अमेरीकी बौध्द होता आणि तो तिबेटच्या ध्यानपध्दतीचा अभ्यासक होता.
न्युबर्ग आणि एक्विली यांनी सुरवातीच्या संशोधनात आठ अमेरीकी बौध्दांचा आणी चर्चच्या तीन नन्सचा अभ्यास केला होता. जे बौध्द होते ते मन एकाग्र करुन ध्यान लावायच्या पध्द्तीचा अवलंब करत होते तर त्या नन्स भक्तिभावाच्या मार्गाचा अवलंब करत होत्या. या दोन्ही समूहाच्या अभ्यासाचा निष्कर्ष वेगळा असला तरी एकंदरीत तो एकाच दिशेने होता. या अभ्यासात त्यांना असे आढळून आले की ध्यान आणि प्रार्थनेच्या वेळी मेंदूच्या पुढच्या भागात बरीच हालचाल होत होती. हे त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच घडत होते. पण त्यांना अजून एक महत्वाची गोष्ट समजली. न्यबर्गने एका ठळक पिवळ्या रंगाच्या ठिपक्यावर बोट ठेवून म्हटले “ या मेंदूच्या मागच्या भागाकडे जर बघितलेस तर तुला आढळेल की ध्यानाच्या वेळी या भागात नेहमीपेक्षा कमी हालचाल दिसून आली. हा मेंदूचा भाग आपल्या स्थळकाळाच्या/स्थितीज्ञानाच्या जाणिवेचे केंद्र आहे. हे केंद्र या अवकाशातील आपल्या स्थितीबद्दल सतत माहिती घेत असते आणि आपण आणि सभोवतालचे जग यांच्यातल्या रेषा आखते. म्हणजे आपण कुठे संपतो आणि इतर जग कुठे सुरु होते याची आपल्याला सतत जाणीव करुन देत असते. ध्यानाच्या वेळी ध्यानस्थ माणसाला आपल्या व्यतीरिक्त इतर जगाचा विसर पडतो किंवा इतर जगाची त्याला जाणीव
रहात नाही ही या गोष्टीचा आणि या केंद्रामधल्या कमी हालचालींचा सबंध आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे.
थोडक्यात काय, अध्यात्मिक अनुभव किंवा साक्षात्कार इ. हे मेंदूतील त्या केंद्रातील कमी हालचालींमुळे होतो हे समजल्यावर या गोष्टींना जे अवास्तव महत्व प्राप्त झाले आहे ते आपसुकच कमी होईल. हे समजल्यावर मी त्यांना सरळच प्रश्न केला “ तुमच्या संशोधनावरुन तुम्हाला असे म्हणायचे आहे का, की आपला सगळा धार्मिक अनुभव हा मेंदूच्या एका कोपर्यातील हालचालीवर अवलंबून असतो ? हे सगळे साक्षात्कार इ. आपल्याच डोक्यात तयार होतात असे म्हणायचे आहे का तुम्हाला ?
त्यांना माझ्या या प्रश्नाची बहुतेक अपेक्षा होतीच. ते म्हणाले “असे वाटण्याचा संभव नाकारता येणार नाही. पण संशोधन आज तरी तसे म्हणते असे मी तरी म्हणणार नाही. ते एवढे सोपे नाही. हे एका सोप्या उदाहरणाने सांगायचा प्रयत्न करतो. समजा एखाद्याच्या मेंदूच्या सफरचंदाकडे बघताना प्रतिमा घेतल्या तर त्या सफरचंद पहाण्याच्या अनुभवातून जाताना मेंदूत त्या वेळेस काय घडते आहे हे मी सांगू शकतो. पण ते सफरचंद तेथे अस्तित्वात आहे किंवा नाही हे मी त्या प्रतिमांकडे बघून नाही सांगू शकत. त्याचप्रमाणे जेव्हा एखादा माणूस तो देवाच्या सानिध्यात आहे असे म्हणतो त्यावेळी त्याच्या मेंदूत कुठे काय चाललंय हे मी सांगू शकतो. पण त्या प्रतिमेकडे बघून मी तेथे खरोखर काय होतं हे मी काही सांगू शकत नाही. तो अनुभव होता, पण ज्याचा होता ते तेथे खरच होते का नाही अशा प्रश्नांची उत्तरे चेताशास्त्र देऊ शकत नाही, सध्यातरी !”
“समजा आपण पूर्णपणे भौतिक दृष्टीकोन स्विकारला आणि हे मान्य केले की आपल्याला कुठलिही जाणीव ही मेंदूमुळेच होते, म्हणजे त्याचा अर्थ, एखाद्या वस्तूचे अस्तित्व हे मेंदूच ठरवतो. पण असे गृहीत धरण्यात एक छोटाशी अडचण आहे, तो म्हणजे ज्या सर्व लोकांना गूढ अनुभव आलेले आहेत ते ठामपणे हेच सांगतात की त्यांनी जे अनुभवलेले आहे ते नेहमीच्या भौतिक सत्याएवढेच सत्य आहे. त्यांच्यावर विश्वास ठेऊन जर त्यांचे म्हणणे खरे मानले तर आपण वरती जे गृहीत धरले आहे त्याचे काय होईल?
या संभाषणाच्या ओघात न्युबर्गने हे मान्य केले की या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही असे देता येत नाही. पण त्यांनी हेही सांगितले की त्यांनी ज्या आभ्यासाचा प्रारंभ त्यांच्या तारूण्यात केला, त्या आभ्यासातच या प्रश्नाचे उत्तर दडलेले आहे. जरी त्यांच्या संशोधनातून हे सिध्द झाले की अध्यात्मिक अनुभव हा मेंदूमुळे होतो, या सिध्दांतामुळे झाली तर अध्यात्म्वाद्यांना झाली तर मदतच होईल. कारण या शोधामुळे विज्ञानाचा अध्यात्माकडे आणि तत्सम शास्त्रांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. कदाचित असेही घडेल की अध्यात्म विज्ञालाला काही न उलगडलेली कोडी उलगडायला मदत करेल. नाहीतरी विज्ञानाच्या आत्ताच्या ज्या काही सीमा आहेत त्यात “काल्पनिक जाणीव” म्हणजे काय हा एक अनुत्तरीत प्रश्न आहेच. आपण आजही मेंदूच्या बाहेर पडून त्या पलिकडे काय आहे हे सांगू शकत नाही. अध्यात्म किंवा तत्सम शास्त्रांचे मला त्यामुळे मला अप्रूप वाटते की ते निदान त्यांच्या गूढ अनुभवातून त्याचे वर्णन करु शकतात. “त्याचे” म्हणजे चित्ताला भेदून अंतीम सत्य काय आहे या विषयी चर्चा करु शकतात. म्हणून शास्त्रज्ञांना याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण सध्यातरी आपल्यापुढे हाच एक मार्ग आहे.”
“जर आपण असे समजले की सगळ्या मुळाशी वस्तू (मॅटर) आहे तर आपल्याला भौतिक जगातल्या बर्याच गोष्टींचा उलगडा होतो. पण आपले चित्त कुठून येते याचे पूर्ण उत्तर हा सिध्दांत देऊ शकत नाही. याच्या उलट आपले चित्त हेच सगळ्याच्या मुळाशी आहे ही संकल्पना स्विकारली तर मॅटरचे स्पष्टीकरण देता येणे फार कठीण आहे. मला वाटते हे दोन्ही एकाच गोष्टीकडे बघण्याचे दोन दृष्टीकोन आहेत. पण खरं सांगायचे तर आपल्याला ते अजून नीटसे माहित नाहीत.”
न्युबर्गबरोबरच्या माझ्या या मुलाखतीनंतर माझे डोळे चांगलेच उघडले. मी त्यांच्याकडे गेलो होतो ते मेंदू हाच आपल्या अनुभवांच्या मागे आहे याचे पुरावे गोळा करायला. पण झाले भलतेच. माझ्या विचारांमधे अजून एका दृष्टिकोनाची भर पडली. न्युबर्गचा या क्षेत्रातला अनुभव फार दांडगा होता. माझ्याकडे जी माहिती होती ती त्यांच्याकडे तर निश्चितच असणार, किंबहुना जास्तच असणार त्यामुळे त्यांनी जे मत व्यक्त केले त्याचा मान तर राखवाच लागणार होता. ज्याअर्थी त्यांना अध्यात्माबद्दल अजून विश्वास वाटत होता, याचाच अर्थ चेताशास्त्र म्हणते त्यापेक्षा अजून काहितरी या विश्लेषणात दडलेले आहे.
मन ही मेंदूचीच उत्पत्ती आहे हे सिध्द करण्यासाठी चेताशास्त्राने कितीही पुरावे दिले तरीही न्युबर्ग म्हणतात त्या प्रमाणे त्या शास्त्राने मेंदू ही उत्पत्ती कशी करतो याची कल्पनासुध्दा मांडलेली नाही, उत्तर तर दूरच राहिले. मन आणि शरीर यांचा प्रश्न अजून रहस्यच आहे. या क्षेत्रातल्या उर्ध्वर्यूंनी जीवशास्त्र आणि मेंदूचा अभ्यास यांच्यातल्या रिडक्शनिस्ट वृत्तीच्या विरोधात आता काम चालू केले आहे. रिडक्शनिस्ट हे एखाद्या अवघड प्रश्नाचे उत्तर शोधताना त्याचा भाग असणार्या सोप्या प्रश्नांची उत्तरे अगोदर शोधतात आणि त्याचा आधार घेत त्या अवघड प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करतात. सोप्या केलेल्या प्रश्नांना जी तत्वे लागू पडतात ती अवघड म्हणजे मुळ प्रश्नाला लागू पडतातच असे नाही. या लोकांचे असे म्हणणे आहे की चेतनेकडे किंवा चित्ताकडे आपण ज्या नजरेने बघतो त्याचाच खरा प्रश्न आहे. या दृष्टिकोनातच मुलभूत फरक पडला तरच आपल्याला अंतीम सत्याच्या जवळपास जाता येईल. काही विचारवंत हाती असलेल्या माहितीचा उपयोग करून वेगवेगळे सिध्दांत मांडू पहात आहेत. याच वैज्ञानिक माहितीचा उपयोग करून ते प्रयोगानेच हे सिध्द करण्याच्या प्रयत्नात आहेत की वैज्ञानिकांनीच गोळा केलेल्या माहितीने हे सिध्द होत आहे की भौतिकवादाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. या सगळ्या शास्त्रज्ञांमधे एक समान विचार आहे तो म्हणजे या सगळ्या यंत्रवत प्रयोगामधे आणि या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरामधे मानवाला उपयोगी असे काहितरी पाहिजे आणि दुसरे म्हणजे विज्ञानाच्या हटवादीपणाला विरोध करणे, त्यांच्यातला कर्मठपणा संपवला पाहिजे याबद्दल एक मत.
चेताशास्त्रज्ञांना सगळ्यात जास्त सकारात्मक विरोध होतो आहे तो मरणाप्रत पोहोचलेल्या अनुभवांचा अभ्यास करणार्यांकडून. इंग्रजीमधे त्याला “Near Death Experiences” असे म्हणतात. (NDE). आपणही त्याला एन्. डी. ई. असेच म्हणूया.
या क्षेत्रात काम करणार एक ख्यातनाम शास्त्रज्ञ आहेत श्री. मुडी रेमंड. पौराणीक काळापासून ते आत्तापर्यंत, आणि सर्व संस्कृतींमधे मरणाच्या वेळेस आलेल्या गूढ अनुभवांबद्दल लोक बोलत आलेले आहेत. काही ठिकाणी तर असे अनुभव लिहूनही ठेवले आहेत. माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते याच्या अभ्यासात आधुनिक वैद्यकशास्त्राची फार मदत झाली आहे. कारण त्यामुळे मरणाच्या दाढेतून ओढून आणल्या गेलेल्या माणसांची संख्या वाढून अभ्यासाला ती उपलब्ध झाली. मुडी आणी त्यांच्या चमूने या क्षेत्रात ७० सालात मुहूर्तमेढ रोवली त्यानंतर बर्याच शास्त्रज्ञांनी या विषयाला वाहून घेतले आहे. सध्याच्या काळात दुरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांमुळे आपल्याला त्यांच्या मुलाखती ऐकायला मिळून त्यांच्या अनुभवांची ओळख झाली आहेच. जेव्हा जेव्हा ही माणसे मेली आहेत असे जाहीर केले जाते त्यानंतर ही माणसे असा दावा करतात की त्यांच्या शरीराच्या बाहेर पडून ते त्यांचे शरीर किंवा ती अपघाताची जागा, शस्त्रक्रियेच्या टेबलावरून बघू शकले. ज्या इतर गोष्टी ते सांगतात त्यात त्यानंतर त्यांचा प्रवास एका अंधार्या बोगद्यातून चालू झाला. त्या बोगद्याच्या शेवटी मग त्यांना त्यांचे आधीच मृत्यू पावलेले मित्र, आप्त दिसले. त्यानंतर एक दिव्य प्रकाश त्यांना त्यांच्या पूर्वायुष्याचा आढावा घ्यायला सांगतो. जवळपास सगळ्याच लोकांनी हा दिव्य प्रकाश भेटल्याचे सांगितले आहे. हा प्रकाश भेटल्यावर त्यांना आनंदाच्या, प्रेमाच्या उर्मी वर उर्मी आल्या आणि तरी सुध्दा त्यांचे मन शांत होते. त्यानंतर त्यांना शोध लागतो किंवा त्यांना त्यांच्या कानात कोणीतरी सांगते की तुमच्या मृत्यूची वेळ अजून आलेली नाही तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरात परत जा. सर्वच लोकांना असा अनुभव येतो असे नाही. काही लोकांना या स्वर्गिय आनंदाऐवजी दु:खद अनुभवपण आलेले त्यांनी नमूद केलेले आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यांना या अनुभवातून जावे लागले होते त्यांच्या व्यक्तिमत्वात फारच मुलभूत फरक पडला आणि त्यांची मृत्यूची भिती नष्ट झाली. हा फरक का पडला हे समजायला काही अवघड नाही. या असल्या अनुभवांनंतर आपल्या शरीर आणि या वास्तव जगाच्या पलिकडे आत्म्याच्या अस्तित्वाची शंका घ्यायचे काही कारण नाही असे त्यांन खात्रीपूर्वक वाटत असते. अर्थात NDEचा अभ्यास करणारे आणखी एक संशोधक श्री. फेनवीक म्हणतात “हे असले अनुभव काहीही संगत असले तरी आत्म्याचे मेंदूबाहेरील अस्तित्व त्याने सिध्द होत नाही. काय सांगावे हाही एक मेंदूचाच खेळ असू शकेल. त्याने तयार केलेला एखादा भास !” मृत्यू पावत असलेल्या मेंदूवर अभ्यास करणार्या मानसशास्त्रज्ञ श्रीमती. सुसान ब्लॅकमोर यांच्या मते हे सगळे अनुभव हे मेंदूची, तीव्र बौध्दिक ताण, टोकाची भिती आणि मेंदूला होणार्या प्राणवायूची कमतरता, यावरची प्रतिक्रिया आहे आणि प्रत्येक माणूस मरताना यातून जात असतोच."
प्राणवायूची कमतरता हे मेंदूमधे काय खेळ करू शकतात हे आपल्याला माहिती आहेच.
जयंत कुलकर्णी.
भाग ७ समाप्त.
पुढे चालू.
प्रतिक्रिया
4 Jul 2010 - 5:07 pm | Manoj Katwe
खुप अवघड आहे हो हे सर्व समजुन घ्यायला.
सोप्या भाषेत माहिती देत आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद !!
मी खरंच ह्या सगळ्या बाबतींत खुप अज्ञानी आहे.
फक्त एकच छोटी शंका,
मेंदू कोण तयार करतो ?
एक मेंदुच जर का दूसरा मेंदू तयार करत असेल (गर्भावस्थेत) तर मग पहिला मेंदू कोणी तयार केला ?
5 Jul 2010 - 4:44 pm | राजेश घासकडवी
या प्रश्नाचं उत्तर देणं तितकंसं कठीण नाही. आपण समजा सध्याच्या एखाद्या व्यक्तीच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या मेंदूचा फोटो घेतला, तिच्या आईच्या... असं करत कोट्यवधी पिढ्या मागे गेलं तर आपल्याला मेंदूची क्लिष्टता कमी कमी होत जाताना दिसेल. एक वेळी फक्त काही संदेशवाहक पेशी दिसतील... तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'मेंदू' म्हणायचं थांबवाल. त्याहीपाठी गेलं तर बिनमेंदूचे, व त्याही पाठी बिनपेशींचे 'जीव' दिसतील. पण मेंदूप्रमाणेच तिथपर्यंत पोचायच्या किती तरी आधी तुम्ही त्याला 'जीव' म्हणायचं थांबवाल.
हे उत्क्रांतीने दिलेलं उत्तर आहे.
5 Jul 2010 - 1:23 pm | तिमा
हा लेख वाचल्यावर मला माझा एक अनुभव आठवला. मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की त्यात कसलीही अतिशयोक्ति नाही.
शिक्षणासाठी पुण्यात असताना मी जवळच्या सपा कॉलेजच्या तलावावर पोहण्यास जात असे. एक दिवस मी पोहत असताना एका नवशिक्या मुलाने एकदम खोल भागात उडी मारली. त्याला पोहता नीट येत नसावे, कारण तो गटांगळ्या खाऊ लागला. त्याला वाचवण्यासाठी मी त्याच्या जवळ गेलो. तर त्याने मला पुढून गच्च मिठी मारली. मला हातपाय हलवता येईना. मगरमिठी म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. आम्ही दोघेही तळाला पोचलो. मी जीवाच्या आकांताने पायाने तळाला लाथ मारुन वर आलो व तसे करताना दोन्ही हातानी त्या मुलाची मिठी सोडवली. वर येताक्षणीच कोणीतरी त्या मुलाला हात दिला आणि मरणाच्या दाढेतून सुटलो.
तर सांगायचा मुद्दा हा की, जेंव्हा आपण मरणार असे मला वाटले तेंव्हा मला लहानपणापासून ते त्या वयापर्यंतचा प्रवास, एखादा सिनेमा पहावा तसा अत्यंत फास्ट स्पीडने दिसला. हा एक अदभूत अनुभव होता. तो इतका हादरवून टाकणारा होता की इतक्या वर्षांनंतरही जसाच्या तसा लक्षांत आहे.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
5 Jul 2010 - 4:28 pm | जयंत कुलकर्णी
आपल्या अनुभवावर विश्वास ठेवावाच लागेल. या अपघातात प्राणवायूची कमतरता तर सिध्द्च आहे. जेव्हा मेंदूचा प्राणवायूचा पुरवठा बंद होत आला, तेव्हा त्याने सर्व मेमरी स्कॅन केली, या वर काही मार्ग सापडतोय का, किंवा अशी घटना किंवा अशा घटनेबद्दल काही माहीती सापडतेय का हे बघायला. पण खरा प्रश्न आहे, जर मेंदू ही मेमरी असेल तर स्कॅन कोनी केली ? तेच चित्त का ? तसे असेल तर अनेक प्रश्न निर्माण होतात......
हा माझा अंदाज आहे. तो बहुदा चुकिचा असण्याची शक्यताच जास्त असणार.
माझ्या या लेखनप्रपंचाचा उद्देश सफल होतो आहे असेच म्हणावे लागेल.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
8 Apr 2016 - 12:46 am | गामा पैलवान
तिमा,
तुमचा अनुभव निश्चितच भीतीदायक आहे. मी जेव्हा मारायला टेकलो होतो तेव्हा मात्र तुमच्यासारखा अनुभव आला नाही. हृदयविकाराचा जोरदार झटका आला होता. आपण हा देह सोडून दुसरीकडे जाणार असं वाटंत होतं. त्यामुळे प्राण देहात धरून ठेवायची म्हणजेच जीव वाचवायची धडपड चालली होती. पण सगळी आंतरिक होती. बाह्य लक्षणं फारशी नव्हती. फक्त चेहरा फिक्का पडला होता. शेवटी सगळे प्रयत्न सोडून द्यायचं ठरवलं. पण तशी वेळ आलीच नाही.
आ.न.,
-गा.पै.
8 Apr 2016 - 12:48 am | गामा पैलवान
मारायला नव्हे मरायला !
(साली हितं बी मिष्टीक झाली की. थ्या टायमाला झालीवती तशी.)
-गा.पै.