एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
17 Sep 2013 - 11:10 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव

आधीच्या भागात मी नागाबद्दल माहिती दिली, नाग म्हणजे सर्पसृष्टी मधला हृतिक असेल तर मण्यार म्हणजे पिउष मिश्रा ! “अरे रुख जारे रे बंदे” म्हणत जसा पियुष मिश्रा पडद्यामागून येऊन मनात घुसतो, तशीच ही मण्यार रात्रीच्या अंधारात येऊन जहाल डसते.

मण्यार (अति बेक्कार विषारी):

महाराष्ट्रात या सापाच्या दोन जाती सापडतात, एक साधी मण्यार (common krait) आणि पट्टेवाली मण्यार (Banded krait). साधी मण्यार (४-५ फुट ) ही साधारण करून पुण्यात सापडते. तिचा चकचकीत काळ्या लेदर बुटासारखा रंग असतो, त्यावर निळ्या रंगाची छटा असते आणि अंगावर मोहक वेलबुट्टी काढावी तसे पांढरे पट्टे असतात.
दिवस मावळला की या पडद्यामागच्या कलाकाराचे काम चालू होते, सगळी शिकार ही रात्री साधली जाते.

शास्त्रीय भाषेत या सापाचे वर्णन “लाजरा –बुजरा” साप असे केले जाते. पण माझ्या मते “कधी येउनिया जावे आणि (विषारी) दात लावूनिया जावे” असे मी त्याचे वर्णन करीन. मार्केटयार्ड मधल्या धान्याच्या गोदामात तिकडच्या मजुरांबरोबर राहील, आणि उंदीर-घुशीच्या पिढ्यान्पिढ्यांची वाट लावेल पण कोणाला डसणार नाही. सगळे काम मोसाद च्या एजंट सारखे, “वन शॉट, (उंदराची) बॉडी ताठ”.

ही आहे साधी मण्यार !
साधी मण्यार !

पण अभियांत्रिकीच्या व्हायवा च्या परीक्षकासारखे कधी या मण्यारीचे डोके सटकेल सांगता येत नाही. “आता माझी सटकली” म्हणत ती दंश करायला लागली की संपले सगळेच, शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब जमिनीवर झोपलेले आहे, आणि मण्यार घरात आली आणि काही कारण नसताना सगळ्या कुटुंबाला दंश करून गेली, कोणाचे हा-की-चू-नाही...आणि काम तमाम.

पर्वतीच्या जनता वसाहती मधून सकाळी ६:३० वाजता एक कॉल आला, मी आपला नेहमी सारखा टेकडी ओलांडून पाण्याच्या टाकीच्या बाजूने वसाहती मध्ये घुसलो. घराच्या बाहेर बेक्कार मोठी गर्दी, त्यात ४-५ बायका छातीपिटून रडत होत्या, मला आधी वाटले कोणी तरी माझा “बकरा” बनवला. पण तरी पण धीर करून त्या गर्दीत घुसलो. समोरचे दृश्य बघून फ्ल्याशब्याक माझ्या डोळ्या समोर आला, “हा तळीराम रात्री पहिल्या धारेची लावून आला असेल, आणि खोलीत जावून नेमका मण्यारी वरच बहुतेक पडला असेल, “मिशन काश्मीर मध्ये त्या अंधाऱ्या खोलीत जश्या गोळ्या चालतात” तसाच हल्ला त्या मण्यारने केला असेल. (त्याला पोटावर, आणि पाठीवर दंश होते.) श्वास असे पर्यंत थोडी झटपट पण केली असेल, पण “बेवडाच तो -आवाज करणारच”, यामुळे शेजाऱ्यांनी पण दुर्लक्ष केले असेल.” मी त्या घरात शोधले तर कॉट खालीच घुशीचे बीळ होते, खूप उकरून पहिले पण सगळी बिळे जोडली असल्यामुळे ती मण्यार पसार झाली होती.

जरा वेगळ्या शेड मधली चकचकीत काळी मण्यार.
मण्यार !

मण्यारीचे विष हे नागाप्रमाणे मज्जासंस्थे वर हल्ला करते, म्हणजे मेंदुमधून जे आपले शरीर कार्यरत राहायला संदेशवहन चालते ते गंडवते. थोडक्यात म्हणजे जीमेल मध्ये असा व्हायरस टाकायचा की हळू हळू एक पण इमेल आपल्याला मिळणार नाही आणि शेवटी खाते बंद पडेल. मण्यार चावल्यावर, सुरवातीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, मग हळू हळू ऐक-ऐक क्रिया बंद पडत, कार्डियाक अरेस्ट होऊन माणूस दगावतो.(भाग ५)

पण हे विष नागाच्या विषापेक्षा जास्त (~८ पट) जहाल असते, म्हणजे नागाचे विष “रेड वाईन” (~२५ प्रुफ) असेल तर “मण्यारीचे विष पहिल्या धारेची मोसंबी (२०० प्रुफ) असते. निसर्गाने या विषाची जहालता वाढवली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे मण्यार रात्री शिकार करते, त्यामुळे कमीत कमी वेळात आणि तिच्या कक्षेत भक्ष टपकले पाहिजे. तसेच तिच्या खाण्यात इतर चपळ साप पण असतात, त्यामुळे “एका झटक्यात” कायमचा इलाज गरजेचा असतो. ( मण्यारीचे मुख्य भक्ष: उंदीर, पाली, सरडे, आणि साप इ.)
मण्यारीचे विष दंत छोटे असतात, त्यामुळे हे जहाल विष मोठ्या माणसाच्या शरीरात पसरायला वेळ लागतो, त्यामुळे “किडा मुंगी” चावली असेल, असे म्हणून रात्री दुर्लक्ष केले जाते, आणि जेंव्हा समजते तेंव्हा “अर्ध्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. त्यामुळे अजूनही प्रतिविष उपलब्ध असून माणूस दगावण्याचे प्रमाण ५०% आहे. व्हियेतनामच्या युद्धात अमेरिकेन सैनिक मण्यारीला “५ स्टेप स्नेक” म्हणायचे, मण्यार ने शॉट दिला की ५ पावलात मृत्यू. (वेट लॉस इन ३० डेज च्या चालीवर !)

मण्यारीची न्याहारी मोठा बेडूक.
मण्यारीची न्याहारी- एक बुल फ्रॉग.

आधी लिहल्या प्रमाणे, हा मण्यार हा डे-नाईट म्याचचा खेळाडू आहे, त्यामुळे दिवसा तो जरा आळसावलेला असतो. पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही. रात्री कॉल वर साप पकडताना मला मण्यार पकडताना खूप काळजी घ्यावी लागायची. “आपण सापाला डिवचल्याशिवाय साप कधी चावत नाही! ” या सर्पनियमाला हा साप म्हणजे अपवाद आहे. शेवटी जशी “कहानी” मधली शांत-सोज्वळ विद्या बालन उसळते (आणि मिलन दामजीला ढगात पोहोचवते !), तशीच शांत बसलेली मण्यार, काही आवाज न करता झटक्यात अंगावर आलेली मी अनुभवली आहे.

ज्यांनी कोणी विकास मनोहरांचे “नेगल” वाचले आहे त्यांना पट्टेरी मण्यार माहित असेल. ती साधरण दाट गडचिरोली, गोवा, दंडेली च्या दाट जंगलात सापडते (त्यामुळे माझा कधी संबध आला नाही.) ती खूप शांत असते, त्यामुळे गारुड्या कडे पण बघायला मिळू शकते. काळ्या-पिवळ्या रंगाचे सुंदर पट्टे असलेली ही मण्यार “आर्थर कानोन डायलला ” पण भुरळ टाकून गेली. त्यांनी शेरलॉक होम्सच्या “The Adventure of the Speckled Band” या गोष्टी मधून तिला सेलीब्रिटी बनवले. ज्या नियमाने जगण्यासाठी "सेम जॉब प्रोफाईलला" न्युयोर्क सारख्या (खर्चिक) शहरात पगार जास्त मिळतो, त्याच नैसर्गिक नियमाने जंगलात राहणाऱ्या पट्टेरी मण्यारीला आकाराने मोठी आणि चपळ भक्ष मारण्यासाठी साध्या मण्यारीपेक्षा जास्त जहाल विष निसर्गाने दिले आहे. पण जंगलात राहत असल्याने यांचा संबध फक्त आदिवासी किंवा सर्प संशोधकांशी येतो.
२००१ साली “जो स्लोवेन्स्क्की” नावाचा अमेरिकन सर्पसंशोधक म्यानमार मध्ये सापांवर संशोधन करत होता. एका पावसाळी रात्री, त्याला पट्टेरी मण्यारीचा दंश झाला. दाट जंगलात, वादळी हवामानात त्याला वैदकीय मदत मिळाली नाही, आणि त्याने सर्पसृष्टी साठी प्राण सोडला.

हीच ती शेरलॉक होम्स ची पट्टेरी मण्यार.
पट्टेरी मण्यार !

साधरणपणे मण्यारीचे कॉल माझ्या भागात कमी यायचे पण जे यायचे त्याला मी "झेड-लेव्हलची" काळजी घ्यायचो. “कमीत कमी वेळात साप पिशवीत गेला पाहिजे, सापाला दोन पिशव्यात प्याक करायचे, स्टिक शिवाय सापाला हात लावायचा नाही”. हे सगळे नियम कसोशीने पाळायचो. पुण्यासारख्या शहरात लोकं जास्ती करून वरती झोपत असल्याने, आणि हा साप जास्ती करून रात्री निघत असल्याने नागाच्या तुलनेत मण्यारीने होणारे दंशाचे प्रमाण कमी आहे.

पावसाळ्यात कोथळीगडावरच्या गुहेमध्ये आमच्या ट्रेक ग्रुप चा मुक्काम होता. साधारण करून आम्ही मेणबत्त्या घेऊन जायचो पण त्या वेळी विसरलो होतो, म्हणून बाजूच्या गुहेतून उदबत्त्या आणून त्याच्या प्रकाशात आम्ही गप्पा टाकल्या, बाहेर पाऊस “मी” म्हणत होता.
गुहा तश्या सेफ होत्या, आत मधल्या गुहेत थोडी वटवाघुळे होती, पण संध्याकाळीच ती डिनर साठी बाहेर उडून गेली होती. तसेच बाहेरच्या बाजूला दीड एक फुटाचा चौथरा होता, त्या वरतीच आम्ही आमचे बूट काढून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी न्यायचा कचरा जमा करून (प्लास्टिक च्या पिशवीत) ठेवला होता. गुहेची बाहेरची पोकळी दगड लावून बंद केलीली होती. सगळ्यांचे डोळे मिटायला लागले तसे आम्ही पथाऱ्या टाकल्या, गारुडी असल्यामुळे बाहेरच्या बाजूला झोपलो. आमच्या एका मित्राचे आणि उंदरांचे बेक्कार वाकडे आहे, म्हणून तो झोपल्या-झोपल्या उंदराची आई-माई काढत होता, त्याच्या तालावरच मला झोप लागली.
२-३ च्या सुमाराला, एक मित्र ओरडला, “अरे साप”, मी कसाबसा चष्मा लावून पहिले, तर आमच्या पासून ३-४ फुटावर चौथऱ्यावर एक चकचकीत काळी मण्यार होती. सगळ्या मित्रांना ओरडून बाजूला केले, कोणालाच तो साप कुठला आहे हे माहित नव्हते, त्यामुळे साक्षात “काळ” समोर असूनही सगळे निवांत होते.

माझ्या कडे स्नेकस्टिक पण नव्हती, आणि शेकोटीच्या काडीने ती ४-५ फुटी संटी मण्यार पकडणे म्हणजे “राम नाम सत्य” याची मला पूर्ण पणे जाणीव होती. मी सगळ्यांना आधी दूर हालवले, आणि एका टोर्च च्या मंद प्रकाशात स्वतः चे अन्द्रेलीन काबूत ठेवत तिचे निरक्षण करू लागलो. रात्री आपण उठून जसे किचन मधले डबे झांबलतो, तशी ती निवांत दगडातल्या खोबण्या झांबलत होती. ती गुहा म्हणजे तिचे ‘अपना बाजार” होते, उंदीर आणि त्यांना खायला येणारे इतर साप, फुल दावत ! पुढचे ४ तास, उजाडे पर्यंत मी तिचे निरक्षण करत होतो, चौथऱ्यावरून ती जर खाली उतरली असती तर तिला पकडणे सोडा, मारणे पण शक्य झाले नसते. माझ्यातला गारुडी हा तिचा आदर करत असल्याचे तिला बहुतेक समजले असावे, ती आली तशी दगडात गायब झाली. नंतर मला एकट्यालाच नंतर शांत पणे झोप लागली.... ही एक माझ्या जीवनातील एक यशस्वी माघार होती.

पुढच्या लेखात घोणस आणि फुरसे...

(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)

धोरणसंस्कृतीसमाजजीवनमानविचारलेखअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

दादा कोंडके's picture

17 Sep 2013 - 11:20 am | दादा कोंडके

हा ही भाग आवडला. आधी सापाला घाबरत नव्हतो पण ही मालिका वाचून घाबराय लागलोय. :(

माझीही शॅम्पेन's picture

18 Sep 2013 - 11:40 am | माझीही शॅम्पेन

आधी सापाला घाबरत नव्हतो पण ही मालिका वाचून घाबराय लागलोय

+१०००००००

दादा कोंडके's picture

18 Sep 2013 - 11:53 am | दादा कोंडके

अर्धमेला झालेला साप, किंवा नुकताच मेलेला साप पण तेवढाच हानीकारक असतो. याचे ध्यान ठेवा !

हे वाचून तर भितीने गाळणच काय चहाची किटलीसुद्धा उडाली. :(

हा ही लेख नेहमीप्रमाणे वाचनीय..

जेडी - बिग फोर नंतर पूर्णविराम, असा काही प्लॅन आहे का..?

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 7:03 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! नाही पूर्णविराम नाही. जो पर्यंत सुचते तो पर्यंत या विषयावर लिहित जाईन.

चाणक्य's picture

17 Sep 2013 - 11:30 am | चाणक्य

ट्रेक ला नेहमी कुठल्या कुठल्या गुहांमधे झोपायचो निवांत. आता हे वाचून घाम फुटला. परत कधी गुहेत झोप लागणार नाही.

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 8:57 pm | जॅक डनियल्स

हो, या अनुभवातून आम्ही पुढच्या वेळी कोणाला तरी राखणीला बसवायला लागलो.
गावापासून ७-८ तासाच्या अंतरावरच्या गुहेत, अशी मण्यार येऊन कोणाला दात लावून गेली, तर परिस्थती ताब्यात ठेवणे अवघड होईल.

हो खरच कधीही गुहेत झोपनार नाही

स्पंदना's picture

17 Sep 2013 - 11:49 am | स्पंदना

काटा काटा आला अंगावर वाचुन. मी पाह्यलाय हा साप पण तो विषारी असतो हे माहीत नाही. वर दाखवलेला मण्यार पाह्यलाय. ह्युक!
लिखाण,अन असल्या विषारी विषयाला वापरलेल्या उपमा, हात अगदी कोपरापासुन जोडायला लावताहेत.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Sep 2013 - 11:20 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

बाकि उपमा/अलंकार वाचुन खपल्या गेलो आहे.

_/\_
अप्रतिम.

शिवोऽहम्'s picture

17 Sep 2013 - 11:59 am | शिवोऽहम्

एक लंबर लिवलंय!!

छान खुसखुशीत झालंय. सापांशी संबंध आला तो बहुदा घाबरंघुबरं होऊन घरातुन बाहेर पडणे आणि जरा वेळाने काठीवर लोंबणारा, ठेचलेला साप एवढाच होता. कधीकधी सकाळी घरामागच्या रस्त्यावर धामण दिसली की थांबुन तिला जाऊ देतो. नजर ठरत नाही अशी सळसळत जाते निघून.

हे असले ५-स्टार साप मोकळ्यात दिसले नाहीत अजुन. तुम्ही ओळख करून देताय छानशी त्यामुळे एखादवेळेस दिसले तरी चालेल, म्हणजे लांबुन हो!

मुक्त विहारि's picture

17 Sep 2013 - 12:04 pm | मुक्त विहारि

तुम्ही फार छान लिहिता

प्रचेतस's picture

17 Sep 2013 - 12:17 pm | प्रचेतस

हाही भाग जबरदस्त.
मिपावरील एक अप्रतिम लेखमाला.

पैसा's picture

17 Sep 2013 - 12:34 pm | पैसा

जबरदस्त लिहिलंय. रत्नागिरीजवळच्या एका खेड्यात लहानपण गेल्यामुळे "राखणदार" नाग, मण्यारी, फुरशी आणि आधेली अधून मधून दृष्टीला पडणे ही नवलाईची बाब नव्हती. कधीतरी कोणी गडी त्यांना मारायचे तर कधीतरी बघून शांतपणे जाऊ द्यायचे. पण आमच्या घरात एक महाभयानक शिकारी होती, ती म्हणजे आमची मांजर.

आमची मांजरी बाहेरून मण्यारी पकडून घरात आणायची. त्यांना अर्धमेल्या करून आमच्या पुढ्यात आणून टाकणे हा तिचा आवडता उद्योग होता. घरात फक्त दूधपोळी मिळत असल्याने बहुतेक ती बाहेर शिकार करून नॉन व्हेज खायची हौस भागवून घेत असावी. अशा तिने १/२ नव्हे तर आमच्या पाहण्यात एकूण ९ मण्यारी घरात आणल्या होत्या. तिचा हा उद्योग साधारण दिवसाच चालायचा. याचे कारण आता समजले की मण्यार दिवसा जरा आळसावून राहते. इतक्या वर्षांत तिला कधी साप चावला नाही हे विशेष म्हणावे की मांजरांना सहसा साप चावत नाहीत? मांजरांना विंचू चढत नाही असे म्हणतात, तसाच काही प्रकार आहे का?

बाळ सप्रे's picture

17 Sep 2013 - 6:46 pm | बाळ सप्रे

टिपिकल कोकणातील अनुभव! फक्त एक मांजर साप चावून मेलेली पाहीली आहे..

बाकी लेख नेहेमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय!!

सुधीर's picture

17 Sep 2013 - 7:54 pm | सुधीर

मनी माऊ भारी आहे. लेख नेहमी प्रमाणे आवडला.

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 9:03 pm | जॅक डनियल्स

अर्धमेला झालेला साप, किंवा नुकताच मेलेला साप पण तेवढाच हानीकारक असतो. याचे ध्यान ठेवा !
मांजर ही खूप चपळ असते आणि तिच्या अंगावर केस पण असतात, त्यामुळे मण्यारीचे छोटे दात शरीराला घासून जायचे प्रमाण कमी असेल. तीच गोष्ट विंचवाची, मांजरीच्या चपळते पुढे विंचू काही करू शकत नाही. पण जर का मांजर झोपली असेल आणि तिला मण्यार चावली तर ती वाचायची शक्यता कमी असते.

अट्टल शिकारी पण तेव्हडचे मायाळु जनावर्, घरात मांजर असेल तर शक्यतो साप़ किटकांचे भय राहत नाही.त्यामुले एक वेळ घरात एक नाही पाच पाच मांजरी होत्या,सहावी मांजर आमची बायको लय खतरनाक प्राणी.....

नि३सोलपुरकर's picture

17 Sep 2013 - 12:42 pm | नि३सोलपुरकर

जे.डी,
आपल्याला तर आवडला बाबा हा "पिउष मिश्रा".
बाकी तुमच्या लिखाणाला __/\__.

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 9:04 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
तुमचे पिउष मिश्रा वरचे लेख वाचल्यामुळेच ही उपमा सुचली.
:)

आदूबाळ's picture

17 Sep 2013 - 12:51 pm | आदूबाळ

काय जबरदस्त लेख!

साध्या मण्यारीच्या अंगावरसुद्धा मला पट्टे दिसताहेत (पट्टेवाल्या मण्यारीपेक्षा पातळ, पण पट्टेच). ते खरे आहेत का फोटो काढताना आलेलं रिफलेक्शन?

"अ‍ॅडवेंचर ऑफ द स्पेकल्ड बँड" मधला साप "स्वँप अ‍ॅडर" आहे असं त्या गोष्टीत खुद्द शेरलॉक म्हणतो. विकीपानावर तर वेगळीच माहिती आहे!

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 9:15 pm | जॅक डनियल्स

मी वरती लिहिले आहे, की अंगावर पंढरी वेलबुट्टी काढल्या सारखे पट्टे असतात, तेच ते पांढरे पट्टे आहेत.

शेरलॉक ची गोष्ट मी लहानपणी " पट्टेरी सापाची गोष्ट" म्हणून वाचली होती आणि त्या गोष्टीमधला कर्नल भारतातून इंग्लंड मध्ये माकड, मण्यार इ. घेऊन जातो, असे वर्णन आहे.

"स्वँप अ‍ॅडर" हा आफ्रिकेत राहणारा viper जातीचा साप आहे, त्या गोष्टीतल्या वर्णनानुसार तो एका खोलीतून दुसऱ्या खोलीत दोरीवरून चढून जाणे अशक्य आहे. (viper मोठ्या झाडावर चढू शकत नाही.)त्यामुळे ती पट्टेरी मण्यारच होती असे मला वाटते.

पिशी अबोली's picture

2 Oct 2013 - 10:49 pm | पिशी अबोली

'अ पेक्युलिअर येलो बँड विथ ब्राऊनिश स्पेकल्स' असे वर्णन आहे. स्पेकल्स म्हणजे तर ठिपके. असा कुणी दुसरा साप असतो का?

जॅक डनियल्स's picture

3 Oct 2013 - 12:18 am | जॅक डनियल्स

पट्टेरी मण्यार च्या डोक्याकडे हे पट्टे विरळ होत जातात, किंवा जर मण्यार तरुण असेल तर पट्टे विरळ असतात आणि ते ठिपक्या सारखे दिसू शकतात.
पिवळे पट्टे आणि ब्राऊन ठिपके असलेला विषारी साप (भारतीय कटिबंधीय) मला माहित नाही.

पिशी अबोली's picture

3 Oct 2013 - 11:00 am | पिशी अबोली

ओक्के.. मग काय प्रश्नच संपला.. त्या ज्युलियाने डोक्याकडचाच भाग बघितला असल्याची शक्यता जास्त आहे.. :)

की लगेच वाचतो.
मस्तच लिहितोयस रे!
गुहेतला अनुभव तर थरारकच!

गणपा's picture

17 Sep 2013 - 6:45 pm | गणपा

वाचतोय........

आतिवास's picture

17 Sep 2013 - 7:05 pm | आतिवास

आणखी एक जबरदस्त लेख.
हा जास्तच विशेष झालाय; त्या यशस्वी माघारीमुळे बहुधा :-)

बिचार बेडकांच जोडप - काय करत होते आन काय हॉउन बसल !

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 11:03 pm | जॅक डनियल्स

ओह्ह्ह, फोटो टाकताना मुद्दामून निट पहिला नाही, म्हणलं उगाचच कशाला मोठ्या लोकांचे पिच्चर बघा....

ब़जरबट्टू's picture

18 Sep 2013 - 11:53 am | ब़जरबट्टू

=)) =)) =))

काय हे... ओशोच आठवला असेल बेडकांना...सं...से समाधी तक.... :)

चिगो's picture

18 Sep 2013 - 9:29 pm | चिगो

जबरा, बजरबट्टू.. :-D
अवांतर : 'बजरबट्टू' मिळेल का कुठे नेटवर?

इष्टुर फाकडा's picture

17 Sep 2013 - 8:06 pm | इष्टुर फाकडा

हि मण्यार अतिशय अनरोमेंटिक प्रकार दिसतोय… सवयीच बघा ना… रात्री खाटां कुचकुचुन लोकं चळवळू लागली म्हणून जरा खाली येउन हळूच झोपलं कि आली हि मुका घ्यायला नतद्रष्ट मेली. हा साप बहुदा संजय गांधीचा पुढचा जन्म असावा किंवा संजय गांधी तेव्हा इच्छाधारी पावर संपली म्हणून या सापात अडकून पडला असावा. बेडकांच्या हाणीमुण ची तर आय माय साय करून टाकली पार हिने.
बाकी इतर लेखांप्रमाणेच हाही खतरनाक!

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2013 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त !

पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही. या लेखातले चौके छक्के पाहून हा लेखही रात्रीच्या पार्टीनंतर आलेल्या मूडाच्या फ्लड लाईटमध्ये लिहिलेला आहे असा अंदाज आहे ;).... लिखाणाचा अंदाज भयंकर आवडला !

सूड's picture

17 Sep 2013 - 8:43 pm | सूड

ह्याच्याच पिल्लावर नकळत पाय पडणार होता, लेख वाचून कळलं की नावापुढे कै. लागायचं थोडक्यात वाचलं.

जॅक डनियल्स's picture

17 Sep 2013 - 11:07 pm | जॅक डनियल्स

हो, मागे एकदा तुम्ही प्रतिसादामध्ये याचे वर्णन केले होते. तेंव्हाच मला डोळ्यासमोर चित्र उभे राहिले होते.;)

खुप छान आहे लेख.. मला सुद्धा सापाची खुप भिती वाटते. सापच काय पण मला सगळ्याच सरपटणार्‍या प्राण्यांची भिती वाटते.

आनन्दिता's picture

17 Sep 2013 - 9:22 pm | आनन्दिता

नाग म्हणजे सर्पसृष्टी मधला हृतिक असेल तर मण्यार म्हणजे पिउष मिश्रा

लै बेक्कर उपमा.. =)) सगळे नाग हृतिक ची सिग्नेचर स्टेप करतायत असं चित्र डोळ्यासमोर आलं... बाकी नाग चावल्यावर " एक पल का जीना , फिर तो है जाना" हे शब्दशः खरं करणार लेकाचे...!!!

दशानन's picture

17 Sep 2013 - 10:20 pm | दशानन

जबरदस्त लेख!

आमच्या पण नावा पुढे कै. लागणार होते याच्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून अजून टिकून आहे. मला तर या सरपटणार्‍या प्रजातीची प्रचंड भिती वाटते, अगदी वाईटात वाईट म्हणजे हे सगळे सरपटते जीव माझ्या पाचवीला पुजले आहेत.... :(

पाच पाच नाग ( तेच दहा आकड्यावाले) एका जागी जंगलात पाहून दातखीळी देखील बसून झाली आहे.

शिल्पा ब's picture

17 Sep 2013 - 10:24 pm | शिल्पा ब

एकदा हायकिंग करत असताना २ -३ फुटांवर कोणतातरी ६ फुटी साप आडवा आला अन मी मोठ्याने " आ ~~" ओरडून एका जागी उभी रहिले. तो साप पण दोन एक सेकंद त्याचं डोकं वर करून थांबला अन काहीच हालचाल नाही पाहून निघून गेला. असो. लेख नेहमीप्रमाणेच वाचनीय आहे.

चिगो's picture

17 Sep 2013 - 10:34 pm | चिगो

तू ग्रेट आहेस, भाऊ.. लै भारी..

अर्धवटराव's picture

17 Sep 2013 - 11:03 pm | अर्धवटराव

तु राजकारणात उतरायला हवं आता. सर्व प्रकारच्या विषारी सापांना पिशवीत कोंबुन योग्य ठिकाणि पोचवायची गरज आहेच आज.

पुढे कधी विषारी आणि बिनविषारी सापांमधील साम्य व त्यामुळे होणारी फसगत ह्यावरही लिहा. उदा. मण्यार आणि कवड्या.

एस's picture

18 Sep 2013 - 12:24 am | एस

एकदा हरणटोळ समजून झाडावरच्या ज्याचे अगदी जवळून व वेगवेगळ्या कोनातून मनसोक्त फोटो काढले तो बांबू पिट वायपर होता हे ते फोटो घरी येऊन स्क्रीनवर नीट पाहिल्यावरच कळाले होते. तेव्हापासून सर्पछायाचित्रणाचा नाद आवरता घेतला.

मोदक's picture

18 Sep 2013 - 12:35 am | मोदक

__/\__

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 3:27 am | जॅक डनियल्स

:) अनुभव मस्त आहे.
हो, मी एक लेख नक्की लिहिणार आहे- सापांची गफलत आणि अपघात.

किलमाऊस्की's picture

18 Sep 2013 - 12:24 am | किलमाऊस्की

मागच्या आठवड्यात झू पाहयला गेलेलो. तिथल्या रेप्टाईल सेक्शनमधे बरेच साप पाहिले. या लेखमालेची प्रर्कषाने आठवण झाली. जाड काचेच्या आत असली तरी ती शेरलॉक खतरनाक वाटली. काचेपलिकडे असूनही माझी चांगलीच तंतरलेली. तुम्ही प्रत्यक्षात हे असले खतरनाक साप हाताळ्ले आहेत. खरंच सलाम !

सुबोध खरे's picture

18 Sep 2013 - 1:11 am | सुबोध खरे

“आता माझी सटकली” म्हणत ती दंश करायला लागली की संपले सगळेच, शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब जमिनीवर झोपलेले आहे, आणि मण्यार घरात आली आणि काही कारण नसताना सगळ्या कुटुंबाला दंश करून गेली, कोणाचे हा-की-चू-नाही...आणि काम तमाम

वरील बाबतीत माझे मत थोडेसे वेगळे आहे. हि मते लष्करी प्रशिक्षण, वाचन आणि सर्पविष उपचार यातील अनुभव यावर आधारित आहेत. यात काही चूक असेल तर मला त्याबद्दल माहिती अद्ययावत करायला आवडेल.
मण्यार हि जरी रात्री जास्त उत्साहात येत असली तरी ती उगाच कुणाला चावत नाही. अक्खे कुटुंब तिला बळी पडले हि फारच दुर्मिळ घटना असावी. साधारणपणे मण्यार हि पावसाळ्यात बिळात पाणी शिरले तर कोरड्या जागेच्या शोधात घरी घुसते वा उंदीर आणि दुसरा साप (होय दुसरे साप हे पण तिचे अन्न आहेत)यांच्या मागे ती घरात येते. एखादे वेळी फार थंडी असेल तर जमिनीवर झोपलेल्या माणसाच्या पांघरुणात उबेसाठी शिरते. त्यावेळी जर माणसाचा हात व पाय तिच्या अंगावर पडला तर ती प्रतिकारासाठी चावते. दुर्दैवाने मण्यारीच्या विषात फक्त मज्जासंस्था बधिर करणारी द्रव्ये असल्याने (रक्त किंवा उती विघटन करणारी(hemolytic ) द्रव्ये नसतात. त्यामुळे चावल्या जागी आग किंवा दुखणे होत नाही आणि डास किंवा किडा चावला आहे असे समजून माणूस गप्प झोपतो. त्यानंतर सकाळी एकतर तो सरळ स्वर्गात उठतो किंवा उठल्यावर सरळ बोलणे अशक्य झाल्याने लोकांना त्याचे बोलणे समजत नाही आणि ते समजेपर्यंत फार उशीर झालेला असतो. कोकणातील मुसलमान लोक खाटेवर झोपतात त्यामुळे त्यांच्यात मण्यार किंवा कांडार ) चावून मृत्यू होण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे असे डॉक्टर हिम्मतराव बावस्करांचे (महाड आणि बिरवाडी येथील) अनुभव आहेत.
मण्यार चावल्यावर इलाज न केल्यास मृत्युचे प्रमाण पन्नास ते सत्तर टक्के असते.हेच प्रमाण नागाच्या बाबतीत फक्त ६ ते १५ % आहे (सर्प दंश आणि सर्प विषबाधा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक दन्शात विषबाधा होईलच असे नाही आणि प्रत्येक विषबाधा हि जीवघेणी असेलच असे नाही). कारण मण्यारीचे विष वजनाच्या मानाने नागाच्या पेक्षा बरेच जास्त शक्तीचे असते आणि मण्यार जेंव्हा चावते तेंव्हा बर्याच वेळेस चावा पूर्ण करून बरेच विष आत उतरवते. शिवाय नंतर जखमेची फारशी आग न झाल्याने त्यावर उपचार केला जात नाही.
मांजर किंवा मार्जार कुळातील इतर प्राणी यांची चपलता सापांपेक्षा जास्त असल्याने आणि त्यांची प्रीतीक्शिप्त क्रिया(reflexes) जास्त तीक्ष्ण असल्याने साप सहजासहजी मांजराना चावू शकत नाही.शिवाय मांजराना रात्री जास्त स्वच्छ दिसते आणि ऐकू येते. कोंकणात याचमुळे घरात मांजर पाळण्याची पद्धत आहे
खालील दुवा पहा
https://www.youtube.com/watch?vI379HHdy7ak=
थंडी किंवा पावसात ट्रेकला जाताना शेकोटी पेटवण्यापेक्षा झोपेची पिशवी घेऊन जाणे जास्त सुरक्षित आहे कारण एकतर आपले सामान/ कपडे पेटण्याची शक्यता नाही आणि दुसरे त्या उबेसाठी साप किंवा उंदीर आणि त्यामागे साप हि शक्यता नाही. आपल्या झोपेच्या पिशवीमुळे आपले केवळ थंडीच नव्हे तर आग, किडे, विंचू आणि साप या सर्वांपासून संरक्षण होते

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 3:38 am | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
मस्त माहिती दिली आहे, आणि तूनळी ची लिंक पण सही आहे.
मण्यार हा खूप बेभरवशाची असते, हे मी अनुभवातून आणि ऐकलेल्या अनुभवातून बोलतो आहे. नेपाळ मध्ये जेंव्हा पूर येतो तेंव्हा या सापांनी धुमाकूळ घातलेला मी वाचले आहे.(कुटुंब चे कुटुंब जाते.) सगळे या सापाच्या मनावर असते, म्हणजे तो कधी पाय पडला तरी चावणार नाही तर कधी चावू पण शकेल.
कुठल्या पण सर्पोद्यान मध्ये जिकडे सगळे विषारी साप एकत्र ठेवता, घोणस, नाग इ. त्यामध्ये तुम्हाला मण्यार कधीच आढळणार नाही. तसेच जी लोक सापांचे विषारी खेळ करतात (थाई, किंवा अमेरिकन इ.)ती लोकं मण्यार कधीच वापरत नाही. अगदी घोणस पण हातावर गुंडाळी करून उचलतील पण मण्यार नाही.

पण त्या झोपेच्या पिशवीच्या आत उबेसाठी एखादा साप घुसला तर?

सुबोध खरे's picture

18 Sep 2013 - 1:16 am | सुबोध खरे

https://www.youtube.com/watch?v=I379HHdy7ak
leopard cub v /s king cobra

प्यारे१'s picture

18 Sep 2013 - 2:30 am | प्यारे१

सुंदर लिहीताय. एकदा किमान मिपावर तरी पूर्णदर्शन द्या. देव्हार्‍यात ठेवीन म्हणतो. :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Sep 2013 - 6:40 am | निनाद मुक्काम प...

आता माझी फाटली

बेक्कार फाटली
Afraid
तुम्हाला मिपा कट्याला बोलावतांना पब्लिक दहा वेळ इचार करेल ,
कुठल्याश्या कॉल करून येत असला व पिशवीत मण्यार घेऊन उपहार गृहात आला तर
लपडा होईल
Scared Smiley

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 7:32 am | जॅक डनियल्स

त्याची चिंता नसावी, मागच्या ४ वर्षात एक पण कॉल केला नाही मी.
आणि आधी पण जेंव्हा करायचो तेंव्हा विषारी साप असेल तर तडक सर्पोद्यान (रात्री पाहते, कधी पण) हा नियम होता.

सहज's picture

18 Sep 2013 - 10:57 am | सहज

किती जणांच्या अंगावर काटा आला हा लेख वाचताना?

हा लेख वाचून, मला आत्ताच्या आत्ता डझनभर मुंगूस व हनी बॅजर पाळावेसे वाटू लागले आहे.

टवाळ कार्टा's picture

18 Sep 2013 - 11:35 am | टवाळ कार्टा

चायला...ट्रेकला जाउ कि नको असा प्रश्न पडणार आता दर वेळी...कारण दिसले पाणी कि घाला पाय असा प्रकार असतो

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 8:08 pm | जॅक डनियल्स

ट्रेक ला जायला काहीच हरकत नाही...
पण आपण जेंव्हा दुसऱ्या माणसाच्या घरी जातो तेंव्हा जसे सभ्य पणे वागतो तसे वागले पाहिजे, म्हणजे आपण काही न विचारता त्यांच्या बाथरूम मध्ये घुसत नाही.
ट्रेक करताना.. या लेखात मिपाकर 'मोदकांनी' ट्रेक कसा करावा याची मस्त माहिती दिली आहे.

अद्द्या's picture

18 Sep 2013 - 12:17 pm | अद्द्या

सरळ आणि सोप्प्या शब्दात .
"फाटली" .

फक्त एक प्रश्न .

हि मण्यार . बेळगाव (उत्तर कर्नाटक) च्या आसपास पण सापडते का?

असाच काहीसा साप पहिल्या सारखा (मारल्या सारखा :( ) आठवतो .

कि या सापासारखी दुसरी हि एक बिनविषारी प्रजाती आहे?

कुठे तरी वाचल्या सारखं वाटतंय .

काळा साप होता . साधारण ४ साडेचार फुट . पट्टे होते कि नाही हे नाही लक्षात

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 8:13 pm | जॅक डनियल्स

एक विचारू का म्हणून "दोन" प्रश्न विचारले आहेत...;)
हो, मण्यार ही अख्या भारतात सापडते,(फक्त हिमालयात नाही.)त्यामुळे बेळगाव मध्ये तुम्हाला दिसली असायची शक्याता आहे.
मण्यार जाती सारखा " कवड्या" (वूल्फ स्नेक ) दिसतो, पण त्याची लांबी ४.५ फुट नसते. या बद्दल एक सविस्तर मी पुढे एक लेख लिहीन.

अद्द्या's picture

19 Sep 2013 - 10:42 am | अद्द्या

आयला .
माण्यारच मेली म्हणजे . . :(
एकाच्या शेतात मळणी ला गेलो होतो .
रात्री शेतातच असलेल्या झोपडीत झोपायची तयारी करताना दिसली होती .

काही कळायच्या आत मित्राच्या हातात असलेली कुदळ तिच्या डोक्यात मारली होती त्याने . .

तेव्हा त्याला जबरदस्त शिव्या घातल्या होत्या . पण नंतर . .

"अबे रात्री झोपेत चावली असती तर काय करणार होतास ? "
या प्रश्नाला उत्तर नवतं . .

वाट पाहतो आहे या लेखाची.
चवीने वाचणार त्याला जॅक-डी आवडणार

अनिरुद्ध प's picture

18 Sep 2013 - 1:21 pm | अनिरुद्ध प

लेख/माहिती पु भा प्र.

विटेकर's picture

18 Sep 2013 - 5:13 pm | विटेकर

त्या गुहेतील प्रसंग ऐकून तर अंगावर काटा आला...!
तंतरली आहे पुरती !
आता सुद्धा टेबलाखालून काही येईल से वाटते .. पाय वर उचलून घ्यावे म्हणतोय !

विटेकर's picture

18 Sep 2013 - 5:16 pm | विटेकर

ते किती किती बरे आहे !!! तुमचे लेख म्हणजे नारायण धारपांच्या पुस्तका सारखे आहेत . धड वाचवत नहीत आणि वाचल्याशिवाय रहावत नाही !

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 8:16 pm | जॅक डनियल्स

सगळ्या मिपाकरांना माझे धन्यवाद् !
हा लेखाचा उद्देश तुमच्या मध्ये सापां विषयी भीती पसरवायचा नसून त्याबद्दल माहिती देणे आहे. ही माहिती वाचून कोणी सापाशी खेळ करायला जाणार नाही. अख्ख्या आयुष्यात तुम्हाला हा साप कधी दिसणार पण नाही, त्यामुळे घाबरू नका.

अख्ख्या आयुष्यात तुम्हाला हा साप कधी दिसणार पण नाही

ऑ..??

जेडी - या वाक्याशी थोडासा असहमत.

मण्यारीने आतापर्यंत शहरातच तीन चारदा दर्शन दिले आहे. वरती सूडने उल्लेखलेला प्रसंग बालगंधर्व जवळच झाला होता. (मी आणि अत्रुप्त आत्मा त्या सापाचे फटू काढायला येड्यासारखे त्याच्या मागे पळत होतो - मोबाईलचा कॅमेरा ऑन करून. त्यावेळी हा लेख आणि मण्यारीच्या विषाची दाहकता माहिती नव्हती!!)

मण्यार वारंवार दिसण्यावरून पण काही अंधश्रद्धा / समज आहेत का..? ;-)

जॅक डनियल्स's picture

18 Sep 2013 - 9:44 pm | जॅक डनियल्स

तुमचे भाग्य चांगले आहे की तुम्हाला दिसला. पण माझ्या अनुभवावरून साधरण पणे लोकांना साप दिसायचे प्रमाण कमी असते. शहरात त्याचा संबध येऊ शकतो कारण आपण त्यांच्या जागे वरच राज्य करतो. पण जसे शहाराबाहेर जाऊ तश्या सापांच्या लपायच्या जागा पण वाढतात, आणि मग ते आपल्या आजुबजुला असून पण आपल्याला दिसत नाही.

माझीही शॅम्पेन's picture

19 Sep 2013 - 9:59 am | माझीही शॅम्पेन

मण्यार सारखा साप चावल्या नंतर जखम साधारण पणे कशी दिसते ? हे महत्वाच आहे ?
कारण झोपेत साप चावला हेच कळत नसेल तर प्रकर्ण फारच गंभीर आहे ,

परवाच वर्तमान पत्रात वाचल आदिवासी भागात अनेक लहान मुलांचे मृत्यू होत आहेत (लेखकानी असही सुचवले होते की लहान मुलांच्या हात किवा पाय आपल भक्ष्य समजून हे हल्ला करतात), त्यामुळे त्यानी शक्यतो मच्छरदाणीत झोपावणे किवा उंचावर अगदी खाट नसेल तर पाटावर असे काही उपाय सांगितले होते

जॅक डनियल्स's picture

19 Sep 2013 - 11:07 pm | जॅक डनियल्स

मण्यार सारखा साप चावल्या नंतर जखम साधारण पणे कशी दिसते ? हे महत्वाच आहे ?

हे सांगणे खूप अवघड आहे, कारण जरी पुस्तकामध्ये जरी विषारी साप "असे दात लावतो !" असे दिले असेल तरी, तो प्रत्येक वेळी पूर्ण चावेलच असेल नाही, मृत्यू व्हायला घासून गेलेला दात पण पुरतो.
उंचावर झोपणे, घराच्या बाजूला स्नेक त्रेन्चेस (एक खड्डा की ज्यातून साप आत येऊ शकणार नाही) आणि घराच्या आसपासचा परिसर खूप स्वच्छ ठेवणे हे काही उपाय आहेत.

सुबोध खरे's picture

19 Sep 2013 - 10:44 am | सुबोध खरे

(लेखकानी असही सुचवले होते की लहान मुलांच्या हात किवा पाय आपल भक्ष्य समजून हे हल्ला करतात)
साप इतके निर्बुद्ध असतील असे लेखक महाशयांना वाटले कसे याचे आश्चर्य वाटते. सापाला चांगले दिसत नसले तरी त्यांची दृष्टी इतकी कमी नसते. शिवाय त्यांच्या वासाची शक्ती नक्कीच तीव्र असते कि उंदीर कोणता आणि बालकाचा हात कोणता यात फरक सहज करता येतो. त्यामुळे हे पटले नाही. आदिवासी भागात कुपोषणाने सर्पदंशापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू होतात. आणि सर्पदंशाने होणारे मृत्यू हे जास्त करून मांत्रिकाच्या कृपेने होतात( एकतर सरकारी रुग्णालय जवळ नसतेच शिवाय मांत्रिक लोक छातीठोकपणे सांगतात कि मी याला बरा करतो या दोहोंमुळे तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे)
मुळात आदिवासी लोक जंगलात राहत असल्याने सापाशी भेट रोजच होते.

जॅक डनियल्स's picture

19 Sep 2013 - 11:02 pm | जॅक डनियल्स

खरे साहेबांशी १००% सहमत.

मी तर घोणसला सगळ्यात ड्यान्जर समजायचो.
ही तिचा बाप आहे की..

लेख नेहमीप्रमाणेच भारी...

टिल्लू's picture

22 Sep 2013 - 10:46 pm | टिल्लू

जॅक डनियल्स's picture

22 Sep 2013 - 10:52 pm | जॅक डनियल्स

हो मी पहिला काल हा फोटो.
तो जो बेडूक आहे, तो बुल फ्रॉग आहे. त्याच्या समोर जे येते तो ते खातो, पक्षी, सरडे, साप, विंचू...असे काही पण.. तुनळी वर खूप विडीयो आहेत त्याचे.
आत्ता हिवाळ्याच्या आधी त्यांना खाऊन घ्यावे लागते नंतर ते बेडूक, जमिनीखाली जातात (Hibernation).
यावेळी फक्त हा बेडूक क्यामेरा मध्ये पकडला गेला.

मदनबाण's picture

30 Sep 2013 - 10:55 am | मदनबाण

वा... पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

वा... पुढच्या भागाची वाट पाहतो.

मालोजीराव's picture

1 Oct 2013 - 12:46 pm | मालोजीराव

मागच्याच महिन्यात केंजळगडावर साधी मण्यार आडवी गेली…छोटा साप दिसतोय म्हणून २-३ मित्र धतींग करायला गेलेले त्यांना वेळीच हटकलं…ती 'मण्यार' आहे म्हणून सागितलं,
मग काय त्यांचा उत्साहाचा पार मनमोहनसिंग झाला !

मग काय त्यांचा उत्साहाचा पार मनमोहनसिंग झाला !

हे वाचून हसताहसता माझा नवज्योतसिंग सिद्धू झाला =)) =)) =)) =))

जॅक डनियल्स's picture

1 Oct 2013 - 7:13 pm | जॅक डनियल्स

+१११११११

जॅक डनियल्स's picture

1 Oct 2013 - 7:14 pm | जॅक डनियल्स

छोटा साप..म्हणत म्हणत ढगात कधी पोहचले असते समजले नसते....;)

एक नंबर्,याच्या पेक्षा खतरनाक उपमाच नाही....

पिशी अबोली's picture

1 Oct 2013 - 3:29 pm | पिशी अबोली

तुमचे लेख कौलारु खोलीत खाली बसून वाचणार नाही अशी शपथ घेत आहे. =O
त्या भयानक मण्यारला किती गोड शब्दांत आणि उपमांमधे घोळवता हो...

साधी मण्यार (४-५ फुट ) ही साधारण करून पुण्यात सापडते
हे वाक्य "पुण्यात साधारण करून साधी मण्यार (४-५ फुट )सापडते "अस असायला हवं होतं का?

बाकी लेख उत्तमचं ...

जॅक डनियल्स's picture

1 Oct 2013 - 7:18 pm | जॅक डनियल्स

"पुण्यात साधारण करून साधी मण्यार (४-५ फुट )सापडते "

हो तसेच हवे होते...लिहिण्याच्या ओघात चूक झाली..

आमच्याकडे हाच मण्यार एका लहान मुलाला चावला. त्याला कळलेच नाही कि त्याला साप चावलाय. 1 घंट्याने तो चक्कर येवून पडला. त्याला दवाखान्यात नेल्यावर कळले कि त्याला साप चावलाय. त्याची प्राणज्योत अगोदरच मालावली होती. नंतर आंम्ही घरात शोधल्यावर हा साप सापडला.

उपाशी बोका's picture

3 Oct 2013 - 7:19 am | उपाशी बोका

अशा भितीमुळेच घराजवळ कुठेही साप दिसला तर मी त्याला कधी जिवंत सोडणार नाही.
To err is human, to forgive is not company policy.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Oct 2013 - 11:34 am | विश्वनाथ मेहेंदळे

याला म्हणतात, सगळेच मुसळ केरात !!!

आदूबाळ's picture

6 Oct 2013 - 1:36 pm | आदूबाळ

नाही - पाऊण मुसळ केरात.

जेडीच्या लेखमालेचा संदेश आहे की साप सापडला की तज्ज्ञ सर्पमित्राला ताबडतोब बोलवा - तोपर्यंत मारू नका.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Oct 2013 - 6:30 am | निनाद मुक्काम प...

च्यायला नशीब ह्या मण्यार चा भाडोत्री मारेकरू अजून वापर करत नाही
एखाद्याला टेकडीवर भरपूर पाजायची व मण्यार असलेल्या पिशिवीत त्याचा हात किंवा पाय न्यायाचा , काहीतरी टोचल्याचा भास व मग चिरनिद्रा
आणि सरकार दप्तरी नोंद
साप चावल्याने मृत्यू