(मी पुण्यात असताना, सर्पोद्यानचे सहा वर्ष काम केले, तेंव्हाचे अनुभव संघटीत करून लिहित आहे. हा लेख पूर्वी (दोन वर्ष) माझ्याच कट्ट्यावर (ब्लॉग) प्रकाशित झाला होता, त्यानेच मी या अनुभवांची सुरुवात करत आहे.)
आत्ता अमेरिकेमध्ये मला कोणी नवीन पुण्याचे भेटले की माझा त्यांना ठरलेला प्रश्न असतो "तुम्ही पुण्यात कुठे राहतात?" तुम्हाला वाटेल काय साधा प्रश्न आहे . पण तसं नाही. ते जेंव्हा उत्तर देतात तेंव्हा मी त्यांच्या शब्दांबरोबर पुण्याच्या रस्यावर फिरत असतो. ती पान टपरी,कोपऱ्यावरचे अमृततुल्य, आतला छोटा बोळ असे सगळे माझ्या डोळ्यासमोर दिसत असते."पुण्यातले पत्ते शोधणे " हा माझा छंद होता .
कॉलेज मध्ये असल्या पासून साप पकडायला लागलो तेंव्हा पासून मला हा जोड छंद लागला. सर्पोद्यानात काम करायचो तेंव्हा त्यांच्या बरोबर साप पकडायला जायचो. तेंव्हा "पत्ता शोधणे " हा प्रकार काय आहे याची कल्पना नव्हती. ते काय प्रकरण आहे हे नंतर कळले.
तुमच्या माझ्या सारखे ,आपले मित्र,नातेवाईक जास्तीतजास्त ऑफिस मधले मित्र यांच्या सोडून कुठे पत्ता शोधत नाही, किंवा आपल्याला गरज पण नसते. त्यामुळे माझी पण मजल पण सहकारनगर,पर्वती,सिंहगड रस्त्याचे काही भाग एवढ्याच ठिकाणी आणि ते पण मोठ्या सोसायट्या मध्येच होती. अश्या मोठ्या जागांचा पत्ता काय अगदी गुगल नकाशा वर पण सापडतो.
आता जरा मुद्यावर येऊयात, लोकांच्या घरातील साप पकडण्यासाठी आधी त्या "घरी" पोचणे ते पण वेळेत हे सगळ्यात महत्वाचे होते. मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो. एका हातात पेन आणि मानेत फोन आणि माझा प्रश्न असायचा "साप कशात आहे ,मी पोहचेपर्यंत कोणाला पण जवळ जाऊ देऊ नका आणि सापावर लक्ष ठेवा. आत्ता सांगा पत्ता ?"
ती वक्ती चालू व्हायची..."३२,मधुमालती बंगला,अप्पर इंदिरा नगर "..(जसं काय त्याचा बंगला शनिवारवाडा आहे!)
मी पण माझा सगळ स्कील लावायचो: "व्ही-आई-टी पासून वरती आलो सरळ...मग उजवीकडे अप्पर इंदिरा ..ते पहिल्या कोपऱ्या वर किराणा तिकडून कुठे ?,डावीकडे का त्या तिरक्या आडव्या गल्लीत,...पण तिकडे तर कचराकुंडी आहे ..ठीक आहे, त्या कचरा कुंडी वरून उजवीकडे का? हा तिकडे एक बोलाईच्या मटणाचे दुकान आहे...आलो मी त्या दुकानापर्यंत मग पुढे..तिकडे तुमचा माणूस उभा करा आणि फक्त १० मिनिटे द्या मला मी आलो!" त्यांचा फक्त फोन नंबर घेऊन मी फोन ठेवायचो. हा पत्ता विचारताना मी स्मरणशक्तीला बेक्कार ताण द्यायचो आणि महत्वाच्या खुणा विचारायचो ( अभियांत्रिकीच्या परीक्षेला पण येवढा ताण कधी दिला नाही ;))पण एकडे सगळा प्रकारच वेगळा, तिकडच्या लोकांच्या डोळ्यासमोरची भीती मला एकडे दिसत असायची. हे सगळ जास्तीत जास्त २-३ मिनिटे चालायचे. माझ्या आईला तर आधी वाटायचे "काय झाल या पोराला ?" आमच्या घरी पाहुणे आले असतील तर अजूनच मजा, त्यांना हा प्रकार नवा असायचा . नंतर जे काय कपडे वरती असतील ते घालून साप पकडायची काठी आणि पिशवी घेऊन मी पुढच्या ५ मिनिटात घर सोडलेले असायचे.
माझी सोपी खलाशी-पद्धत होती, की ज्या दिशेचा पत्ता असेल तिकडे गाडी भरदाव सोडायची. त्या साठी डोक्यात गणिते करून मी सिग्नल तोडायचो(डावी कडे वळण्यासाठी सिग्नल हि कवी कल्पना आहे ;)), गल्ल्यामधून जायचो, मामा-मामी चुकवायचो, फुटपाथ वरच्या हलत्याबोलत्या सुंदर गोष्टींकडे दुर्लक्ष करायचो इ. गाडीवर बसून ४ था गिअर पडेपर्यंत माझ्या डोक्यात एक ढोबळ नकाशा झालेला असायचा. माझा ठरलेला भाग म्हणजे एकडे बिबवेवाडी पासून स्वारगेट,लुल्लानगर-कोंढवा,निलायम पुलाखालचा सिंहगड रस्ता,सहकारनगर,पर्वतीपायथा...असा माझ्या घरापासून पासून १० किलोमीटरच्या परिघातील भाग. वरती लिहिल्या प्रमाणे स्वतःला त्या पत्याच्या दिशेला झोकून द्यायचो. कोपऱ्यावरच्या पानवाल्याला-किरणावाल्याला पत्ता विचार, कोणी क्रिकेट खेळत असेल त्यांना विचार, फेरीवाल्याला विचार, असे करून त्या सापपर्यंत मी जास्तीत जास्त १५ मिनिटात पोहोचायचो.(हे करणे लिहिले आहे तेवढे सोपे नाही ज्यांनी पुण्यात घर शोधायचा प्रयत्न केला असेल त्यांना कल्पना असेल.) आणि मग साप पकडून सर्पोद्यान गाठायचो ! (हे कसे करायचो आणि अनुभव दुसऱ्या पोस्ट मध्ये ). आपल्या इकडच्या लोकांना प्रश्न फार म्हणून मी कधीच सांगायचो नाही मी कशाला पत्ता शोधतो आहे. आजी-आजोबांना आणि सोसायटी मधल्या काकूंना कोणी नसलेच तर पत्ता विचारायचो कारण आधीच वेळ कमी असायचा आणि आजी-आजोबांना शंका फार.;)
सुरवातीला-सुरवातीला खूप लोकांनी फिरवले नंतर एक लोकांचा ठराविक अंदाज येत गेला आणि मग चुका कमी झाल्या आणि साप जास्त मिळू लागले.(सापापेर्यंत पोचायला लागणारा वेळ आणि तो मिळणे हेय व्यस्त प्रमाण आहे : वेळ = १/साप मिळणे )खूप वेळा मला जनता वसाहत, आंबेडकर वस्ती, तळजाई वस्ती अश्या डोंगरावर असलेल्या वस्त्यामधून फोन यायचा. तिकडे तर सगळाच भुलभुलैय्या! अशा वेळी मग कामी यायच्या त्या जुन्या ओळखी. आधी कधी येऊन गेलो असलो तर तिकडचे खूप लोक ओळख ठेवायचे ते मला त्या वस्ती च्या रस्त्यापासून त्या आतल्या साप असलेल्या घरापर्यंत घेऊन जायचे. काय दृश्य असायचे ते ! माझ्या मागे कोणी तरी वाटाड्या बसलेला आहे आणि माझ्या गाडीच्या मागे १०-१२ चीलीपील्ली "सापवाला सापवाला" ओरडत पळत आहेत.
असेच पत्ते शोधत आणि साप पकडत मी ३-४ वर्ष काढली नंतर एकडे आलो अमेरिकेमध्ये . आत्ता पत्ता शोधण्याची मजा राहिली नाही, काही झालं की जीपीएस निघते आणि पत्ता २ मिनिटात मिळतो.
पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी जीपीएस काही कामाचे नाही ...
कारण आत्तापण मी डोळे बंद केले तर मी पुण्याच्या रस्त्यांवर पोहोचतो आणि जुने पत्ते शोधत राहतो.
प्रतिक्रिया
17 May 2013 - 4:20 am | श्रीरंग_जोशी
मिपावर स्वागत!!
योगायोगाने लेखात वर्णिलेला बहुतांश परिसर माझ्या चांगलाच ओळखीचा असल्याने तुमची शोधाशोध सहजपणे डोळ्यासमोर आणू शकलो.
पुलेशु.
17 May 2013 - 4:36 am | जॅक डनियल्स
धन्यवाद ! हो तो परिसरच असा आहे की डोळ्यासमोर उभा राहतो.
17 May 2013 - 4:26 am | स्पंदना
पत्त्ता शोधणे! एक कौशल्य! अस काहीस नावं हव होत लेखाचं.
तरीही उगा कोणी बोलायच्या आधी आज पयल्यांदा मी बोलुन घेते.
अच्छा तुम्ही अमेरिकेत रहाता तर, त्याची झैरात!!
अच्छा साप पकडायची कला आहे तर, त्याची झैरात!!!
पुण्यातले का? त्याची झैरात!!!!!
आता तुम्ही इम्युन झाला आहात. या प्वाँईंटावर आता कोणी बोलणार नाही. बोलल तर लसीकरण झालेले आहे हे सांगा.
मुद्दा- एका वेगळ्याच फिल्डवर काहीतरी ऐकायला मिळते आहे. साप पकडण्याचे कौशल्य तर ऐकायला मजा येइलच, पण हे जे पत्ता पकडण्याचे कौशल्य आहे ते ही भारीच.
आपले पुल या बद्दल लिहुन गेले आहेतच. अन त्यंनी सुद्धा म्हातारेबुवा कसे चौकश्या करतात याच सुरेख वर्णन केले आहे.
लेखन आवडल. मिपावर स्वागत.
पु. ले. शु.
17 May 2013 - 4:45 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
झैरात तर झैरात .. झैरातिचे युग आहे , नवीन काही बोलायचे असेल तर झैरातीशिवाय लोकं ऐकत नाही...(आता बोलू नका की " झैरात" ची " झैरात" करतो म्हणून ;))
जन्मापासूनच इम्युन असल्यामुळे वेगळ्या लसीकरणाची गरज नाही.
17 May 2013 - 5:01 am | स्पंदना
आता जे काही धन्यवाद असतील ते लेखाच्या शेवटी द्या एकदम.
पण कुणी काही माहिती विचारली तर उत्तर द्या. न्हायतर परा येइल.(मिपावर, लहान मुलाला झोपवण्यासाठी कस,"बागुलबुवा येइल" म्हंटल जात तस नवसदस्यांना,"परा येइल" अस म्हंटल जात)
17 May 2013 - 4:33 am | खटपट्या
मला तर झैरात वगैरे काही वाटली नाही !!
17 May 2013 - 6:06 am | नंदन
लेख आवडला. वापरून गुळगुळीत झाले असले तरी 'खुसखुशीत' हेच विशेषण पटकन डोक्यात आलं. पुढच्या भागांची वाट पाहतो आहे.
17 May 2013 - 6:59 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
इतर वेळेला, कोणाकडे जाण्यासाठी पत्ता शोधणे आणि साप पकडण्यासाठी पत्ता शोधणे यात मुख्य फरक म्हणजे 'हाती असलेला वेळ', कारण इतरवेळी लोकांनी चुकीचा पत्ता सांगितला (पार्ल्याच्या मावशीचा पत्ता...पुलं) तरी २ तासाने का घर सापडते, आणि पत्त्याचा धनी पण सापडतो. पण साप पकडण्यासाठी वेळेवर पोहचले नाही, तर तो साप पळून जातो किंवा लपून बसतो, आणि नंतर मग कधीपण (९५% वेळा रात्री २ नंतर )बाहेर पडतो, की मग लोकं परत फोन करतात ...आणि मग येरे माझ्या मागल्या ...
17 May 2013 - 7:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जॅक, लेख मस्त झालाय. साप पकडायचं शिकवा राव आणि सोबत फोटो टाका.
-दिलीप बिरुटे
17 May 2013 - 9:22 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् ! माफ करा बिरुटे साहेब पण माझ्या कडे एक पण फोटो साप हातात धरून किंवा गळ्यात टाकून नाही. म्हणजे मी तो काढलाच नाही. सर्पोद्यान मध्ये एक वाक्य प्रचलित होते
विषारी साप चावायचे- अपघात खूप वेळा हे फोटो काढताना होतात. त्यामुळे जर तुम्हाला फोटो बघायचे असतील तर Thailand snake show असे गूगल करा खूप सारे फोटो मिळतील.
17 May 2013 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साप पकडायच्या ट्रीक्स या अपेक्षेने तसे म्हणालो होतो. साप गळ्यात घालून मिरवायची आणि फोटोत जायची इथे कोणाला हौस पडली आहे.
एक महिला मिपाकराने साप पकडण्याच्या बाबतीतले अनुभव की साप पकडायचे शिकतांना असा धागा काढल्याचे आठवते आता तो धागा सापडत नव्हता म्हटलं तुम्ही काही ट्रीक शिकवाल असे वाटले होते.
>>> त्यामुळे जर तुम्हाला फोटो बघायचे असतील तर Thailand snake show असे गूगल करा खूप सारे फोटो मिळतील.
गुगलून तर सार्या जमान्याची माहिती मिळेल हो जालावर. बाकी, Thailand snake show असे गुगलल्यावर सापाशी धोकादायक प्रकारे खेळतांनाची चित्रे दिसल्यामुळे माझा हिरमोड झाला.
असो, आभार.
-दिलीप बिरुटे
17 May 2013 - 8:09 pm | जॅक डनियल्स
साप पकडण्यासाठी ट्रिक नसते, तो एक प्रकारचा अभ्यास आहे,ज्यात शास्त्र आणि धैर्य लागते. तुम्हाला खूप गोष्टी उटूब वर सापडतील पण प्रत्येक साप पकडताना वेगळा अनुभव येतो. तसेच लोकांच्या घरचे साप पकडताना तर इतर पण गोष्टी विचारात घ्याव्या लागतात (आजूबाजूची लोकं, वेळ..) त्यामुळे ढोबळपणे पहिली पायरी ही 'साप ओळखणे ' असते. हा जिवावरचा खेळ असल्याने ९०% टक्के माहिती कामाची नसते,माझ्या पुढच्या लेखात थोडी माहिती येतच जाईल पण मी साप कसे पकडायचे ही माहिती देऊ शकणार नाही.
17 May 2013 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> साप पकडण्यासाठी ट्रिक नसते, तो एक प्रकारचा अभ्यास आहे,ज्यात शास्त्र आणि धैर्य लागते.
अवघड आहे. साहेब, आता तुम्ही साप पकडत असाल काय याबद्दलच मला शंका यायला लागली आहे.
बाकी, धैर्य लागते ही गोष्ट खरी आहे. पण, सापाच्या शेपटीला पकडावे लागते इन्ष्ट्रूमेंटने सापाच्या तोंडाजवळ उचलून घ्यावे लागते. हे आम्हा अनाडी लोकांना कळते त्यासाठी शास्त्र कशाला लागते आणि लागत असेल तर ते शास्त्र काय आहे हे सांगाल काय ?
>>> तुम्हाला खूप गोष्टी उटूब वर सापडतील
युट्यूबवर आम्हाला काय सापडते आणि काय नाही, ते आम्ही आमचं पाहून घेऊ. तुम्हाला याच्यातील काय माहिती आहे ती नीट आणि नेमकेपणाने सांगता येत असेल तर सांगा.
-दिलीप बिरुटे
(खवट)
18 May 2013 - 12:13 am | जॅक डनियल्स
तुमचे बरोबर आहे, शेपटीला पकडून हुक ने पिशवीत घालणे ही जगमान्य पद्धत आहे. पण साप सजीव असल्याने तो प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने वागतो.( दोरी असेल तर तिला एका बाजूने उचलून पिशवीत घालणे सोपे आहे.)माफ कर,, माझा शास्त्र हा शब्द चुकला असेल, मला साप ओळखायचे शास्त्र म्हणायचे होते मला.
युटूब वर snake handling शोधुन बघा. पण खरा लोकांच्या घरातला साप पकडण्याचा विडो मिळणे अवघड आहे.
18 May 2013 - 12:14 am | जॅक डनियल्स
तुमचे बरोबर आहे, शेपटीला पकडून हुक ने पिशवीत घालणे ही जगमान्य पद्धत आहे. पण साप सजीव असल्याने तो प्रत्येक वेळी वेगळ्या पद्धतीने वागतो.( दोरी असेल तर तिला एका बाजूने उचलून पिशवीत घालणे सोपे आहे.)माफ कर,, माझा शास्त्र हा शब्द चुकला असेल, मला साप ओळखायचे शास्त्र म्हणायचे होते मला.
युटूब वर snake handling शोधुन बघा. पण खरा लोकांच्या घरातला साप पकडण्याचा विडो मिळणे अवघड आहे.
17 May 2013 - 11:32 am | गवि
पकडलेले / हाताळलेले सर्व साप विषारी होते का?
17 May 2013 - 8:11 pm | जॅक डनियल्स
सर्व साप विषारी नव्हते, पण ढोबळपणे जर मी १० साप पकडले तर त्यातले ४ हे विषारी होते. तसेच मी पुण्यात चारी मुख्य विषारी साप (नाग, घोणस, मण्यार, फुरसे) पकडले आहेत.
17 May 2013 - 7:55 am | ५० फक्त
पण पुण्यातल्या रस्त्यांसाठी जीपीएस काही कामाचे नाही ...
एक माननीय संपादक याला +१०००००^३ देतील याची खात्री आहे,
17 May 2013 - 8:39 am | पैसा
मिपावर तुमचं स्वागत जसं व्हायला पाहिजे तसं झालं आहे आणि तुम्ही इम्युन आहात असं दिसतंय. तेव्हा मिपाकरांच्या (त्यात मी पण आले!)वाईट सवयीप्रमाणे लेखाचा पुढचा भाग पुढच्या वर्षी टाकू नये ही विनंती!
17 May 2013 - 9:26 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् ! नक्कीच प्रयत्न करीन, वेळेत पुढचा लेख लिहायचा.
17 May 2013 - 9:02 am | मुक्त विहारि
आवडला...
17 May 2013 - 9:02 am | आतिवास
लेख आवडला.
मुळात 'पत्ता शोधणं' हीच एक कला आहे आणि 'पुण्यात पत्ता शोधणं' तर साधकाची परिसीमाच असते.
पुण्यात ज्या कार्यालयात मी काम करत होते, त्या परिसरात हमखास साप दर्शन द्यायचाच दर दोनेक महिन्यांनी - त्यामुळे 'सर्पमित्रा'च्या प्रतिक्षेची एक बाजू माहिती आहे.
आता दुस-या बाजूची (म्हणजे तुमच्या लेखांची) वाट पाहते :-)
17 May 2013 - 9:06 am | प्रचेतस
भारी लेख.
पुभाप्र.
17 May 2013 - 9:15 am | आदूबाळ
ज्याक, मस्त जमलाय लेख... लिहीत रहा भौ इकडे...
17 May 2013 - 9:27 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् ! आपली कृपा राहूदे.
17 May 2013 - 9:39 am | आदूबाळ
तुम्ही ज्याक डैनियल आणत रहा. मग आमची कृपा भेटंल लागंल तेव्हडी...:)
17 May 2013 - 9:36 am | सौंदाळा
लेख आवडला.
17 May 2013 - 9:57 am | जे.पी.मॉर्गन
जे डी - मस्त जमलाय रे पहिला पेग....आपलं... लेख! येऊदे अजून !
जे.पी.
17 May 2013 - 10:14 am | प्रभाकर पेठकर
वाचतो आहे. पुढचा भाग लवकर अपेक्षित आहे.
17 May 2013 - 10:50 am | कोमल
खुप्च चान चान..
पुभाप्र..
17 May 2013 - 11:08 am | गवि
वेगळ्या विषयावरचा लेख.. पुण्यातल्या वास्तव्यात पत्ते शोधताना खालील वाक्यांचा सराव झाला आहे:
"चौकातून सरळ खाली या.."
"तिथून वर गेलात की पटवर्धन वाडा विचारा"
छान लेख. वेलकम आणि चियर्स..
17 May 2013 - 11:12 am | नीलकांत
पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे कसब आहे हे नक्की ! :)
17 May 2013 - 11:18 am | ऋषिकेश
लेखमालेचा रोचक विषय आहे.
लक्ष ठेऊन आहेच.. हा भाग आवल्डा!
17 May 2013 - 12:30 pm | अनिरुद्ध प
बाकि पत्ते शोधुन काढणे हे एक कसब आहे,आणि पुण्यात तर तुम्हाला Hatsoff कारण दहा वर्श मी Fieldwork केले आहे त्यामुळे लोकान्च्या पत्ता सान्गण्याच्या तर्हा मला अवगत आहेत.
17 May 2013 - 12:44 pm | बॅटमॅन
मस्त खुसखुशीत झालाय लेख!!! धूम पिच्चरमधल्या जॉन अभ्रामसारखे तुम्ही गाडीवरून जाताना डॉळ्यासमोर आला एकदम :) बाकी साप पकडणे म्हंजे धैर्याची परिसीमाच. आपल्याला तर अशा गारुड्यांचं लै कौतुक वाटतं.
17 May 2013 - 12:44 pm | प्रकाश घाटपांडे
मस्त खुसखुशीत लेख.सापांवर वैज्ञानिक माहिती पण द्या हो. साप आणि अंधश्रद्धा पण चांगला विषय आहे.
17 May 2013 - 8:15 pm | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
हो नक्कीच शास्त्रीय माहिती देईन आणि अंधश्रध्दा दूर करायचा प्रयत्न करीन.
17 May 2013 - 1:44 pm | सुधीर
मस्त लेख, वेगळा विषय. पुढील भागाची प्रतीक्षा.
17 May 2013 - 2:08 pm | मोदक
मस्त लेख. पुढील भागांच्या प्रतिक्षेत!!!!
17 May 2013 - 2:13 pm | मन१
पुभाप्र
17 May 2013 - 2:14 pm | प्यारे१
खुसखुशीत!
पुभाप्र
17 May 2013 - 2:40 pm | तिरकीट
पुण्यातील एका कार्यालयाचा पत्ता शोधताना खूण म्ह्णून एकाने 'बाजीराव रोडची मागची बाजू' असे सांगीतले होते....
पण लग्न सासूरवाडीकडचे होते म्ह्णून पत्ता शोधायलाच लागला....
17 May 2013 - 3:48 pm | निल्सन
मस्त झालाय हा भाग. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
जो सापांबरोबर फोटो काढतो, तो लवकर फोटो मध्ये जातो. >> हे खर आहे असं वाटू लागलय. कारण याच महिन्यात माझ्या वहिनीचा भाऊ (वय-२२ वर्षे) एका अपघातात गेला तोही सर्पमित्र होता आणि त्याने सापांसोबत बरेच फोटो काढले आहेत. हो पण त्याच्या अपघाताचे कारण मात्र साप नव्ह्ता तर बाईक चालवताना मोबाईलवर बोलणे हे होते.
17 May 2013 - 3:55 pm | बापु देवकर
छान आहे...एक एक नमुने भेटतात अश्यावेळी
17 May 2013 - 4:25 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्त लेख, पुभाप्र
17 May 2013 - 4:40 pm | लाल टोपी
चांगला लेख. पुढिल भागासाठी शुभेच्छा!!
17 May 2013 - 5:03 pm | पिशी अबोली
मस्त.. पुण्यात परत-बिरत आलात तर इथे तुमचा पत्ता आधी टाका.. आमच्याकडे पुण्यात एक घोणस निघाला तर सर्पमित्र शोधताना नाकी-नऊ आले.. आणि सर्पमित्र सापडेपर्यंत घोणस गेला पळून..
17 May 2013 - 8:18 pm | जॅक डनियल्स
परत साप निघाला तर लगेच सर्पोद्यान ला फोन करा. त्यांच्या कडे महाराष्ट्रातले सर्पमित्रांचे फोन नंबर असतात.
सर्पोद्यान:०२०-२४३७३७४७
17 May 2013 - 8:52 pm | पिशी अबोली
हो... सर्पोद्यानला फोन केला होता पण दुर्दैवाने फोनवर बोलणारी व्यक्ती तुम्हाला भेटणार्या आजी-आजोबांपेक्षा वेळ-खाऊ निघाली. आता हे माझंच भाग्य होतं का नेहमीच असं होतं कुणास ठाऊक!
17 May 2013 - 6:37 pm | डॉ सुहास म्हात्रे
एका वेगळ्या विषयावरचे तुमचे अनुभव वाचायला मजा आली.
पुभाप्र.
17 May 2013 - 6:55 pm | मी-सौरभ
आता मिपावरील जालीय साप कसे हाताळायचे याचे प्रशिक्षण घ्या बरं का.... :)
17 May 2013 - 11:12 pm | आदूबाळ
+१
हे एक बाकी बरोबर!
17 May 2013 - 7:03 pm | कंजूस
जैक डैनिअल्स यांनी दोन अवघड गोष्टी आत्मसात केल्या आहेत पुणेकरांच्या पत्त्यावर वेळेत पोहोचणे आणि सापाला पकडून आणणे . कितीही दूरचा प्रवास करून धडपड करून तुम्ही त्यांच्या दारात उभे राहाता तेंव्हा शेजारी ताक मागायला आल्यासारखे त्याचे थंडे स्वागत होते आणि पाचेक मिनीटात "पुढच्या वेळी वेळ काढून या हं" अशी प्रेमळ सुचना मिळते . मुळात पुणेकर एवढे प्रसिध्द असतात की जवळच्या 'चौकातला' इस्त्रिवालासुध्दा त्यांना नावाने ओळखत असतो ,त्यामुळे त्यांचा पत्ता विचारणे हा शुध्द अपमान आहे .
17 May 2013 - 8:22 pm | जॅक डनियल्स
माझ्या कामासाठी मला 'साग्रसंगीत' आमंत्रण देऊन बोलावल्यामुळे जास्त अवघड प्रसंग माझ्या वर आले नाहीत. पण हे काही आले त्याचे वर्णन पुढच्या लेखांमध्ये येईलच ;)
17 May 2013 - 7:15 pm | अत्रुप्त आत्मा
जबार लिवलय. :)
=============================================================
पत्ते शोधणार्याचा पत्ता कट करणं हे आपण पुणेकर असल्याचं लक्षण आहे. ;)
17 May 2013 - 9:40 pm | कंजूस
चिमट्याने साप पकडण्याचे आणि फक्त पंचवीस हजार किमिवरून लेख लिहिण्याचे धाडस कौतुकास्पद आहे .केवळ दोन चार विषारी सापांमुळे बाकीच्या सातशे पन्नासांना विनाकारण धोँडे खावे लागतात नाहितर टोपलीची हवा खावी लागते .बिचारे सापु .
17 May 2013 - 9:49 pm | किलमाऊस्की
पुभाप्र.
17 May 2013 - 11:12 pm | तर्री
आवडला.
18 May 2013 - 12:11 pm | अधिराज
मस्त आहे लेख!
20 May 2013 - 6:59 pm | मालोजीराव
हि कवी कल्पना नाही असं ट्राफिकवाल्या मामा नि पावती फाडता फाडता सांगितल :P
( स्थळ : मार्केटयार्डपासून सिटीप्राईड कडे वळताना )
20 May 2013 - 7:13 pm | उपास
साप पकडण्याचे अनुभव वाचण्यास उत्सुक. वरचा लेख 'पुण्यातील पत्ताशोधन' ह्या विषयावर असल्याने (आणि हा विषयाचा चोथा झाला असल्याने), पुढील साप पकडण्याच्या अनुभवांबद्दल उत्सुकतेने वाट बघत आहे.. चिअर्स!
19 Aug 2013 - 6:29 pm | भ ट क्या खे ड वा ला
लेखन आवडले लिहित रहा
2 Jun 2017 - 12:25 am | रुपी
ही मालिका पूर्ण झाल्यामुळे आता वाचायला सुरुवात केली :)
सापांबद्दल वाचायला खरं तर मी टाळत होते. पण आमच्या ऑफिसच्या आजूबाजूला फिरायला जाताना कधीकधी साप दिसलेत लोकांना. एकदा तर सकळी चक्क क्युबिकल्समध्येसुद्धा एक साप होता. त्यामुळे माहिती असलेली बरी ;)
11 Jun 2017 - 2:55 pm | इज्या
+१