एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
आपल्याकडे महाराष्ट्र आणि गोवा मध्ये जो नाग मिळतो त्याला -चष्मा नाग (spectacled cobra)किंवा लोकांच्या भाषेत 'दहाचा आकडावाला नाग" म्हणतात. पुण्यामध्ये सदाशिव पेठ्तल्या वाड्याच्या जिन्याखाली,सहकारनगरमधील बंगल्यात-अडगळीच्या खोलीत, धनकवडीला चुली मध्ये, आंबेगाव पठारावर विहिरीमध्ये, लुल्लानगर मध्ये स्वीमींग तलावामध्ये,पार्वती जनता वसाहतीत मोरीच्या बोळात, (सिंहगड रस्ता) वडगाव बुद्रुक मधील इमारतीच्या पिण्याच्या प्यायच्या टाकीत आणि शेवटी कर्वेनगर मध्ये स्कूटर च्या डिक्कीत मला हा मिळाला आहे......(भाग ५)...
माझ्या ४-५ वर्षाच्या कारकिर्दीत मी पन्नास-एक नाग पुण्यात पकडले असतील. प्रत्येक कॉल हा माझ्या साठी एक साहसी आणि नाविन्यपूर्ण अनुभव होता. पण त्यातले काही कॉल मला अगदी "काल-परवा" केल्यासारखे आठवतात.
आधीच्या भागात लिहल्याप्रमाणे विषारी साप पब्लिक मध्ये पकडणे ही खूप मोठी जवाबदारी असते. म्हणून साप पकडायला लागल्यानंतर काही महिन्याने मला राजाभाऊंनी "एक " कॉल दिला. ऑक्टोबर महिन्याची संध्याकाळ होती,थोडा अंधार पडायला लागला होता, मी आणि अजून एक सर्पमित्र (शिकाऊ) गाडीवर कात्रज-कोंढवा रस्त्यावरच्या एका भागात पोहचलो. गल्लीच्या कोपऱ्यावर असते तसे साधे किराणामालाचे दुकान होते. वाण्याने सांगितले की आतल्या कोठीच्या खोलीत साप दिसला. आम्ही खोली पहिली तर थोडी अंधारी होती, भिंतीच्या कडेला ४-५ पोती रचून ठेवली होती. आम्ही तडक सर्पोद्यान वरून आलो होतो म्हणून माझ्या बागेमध्ये टोर्च नव्हता. परिस्थितीचा अंदाज घेऊन मी त्या वाण्याला इमर्जन्सी लाईट घेऊन दरवाज्यात उभा राहायला सांगितले, आणि स्टिक घेऊन खोलीत घुसलो.(आम्ही सर्पोद्यानवाले फक्त हात आणि "?" स्टिक वापरतो.)त्याच थोड्या प्रकशात मी आणि माझा मित्र पोती हळूहळू करून हलवायला लागलो, शेवटचे पोतं हलवेपर्यंत सापाचा काही पत्ता नव्हता.
पण जेंव्हा आम्ही शेवटचे पोते थोडे सरकवले, तेंव्हा ३-४ फुटी नाग दिसला. माझा मित्र ओरडला, "अरे कोब्रा !" आणि पुढच्या क्षणी खोलीत अंधार झाला....
तो वाणी लाईट घेऊन पसार झाला होता....जिवावरचा प्रसंग असल्यामुळे कचकचीत २-४ शिव्या गेल्या...
पण क्षणार्धात परिस्थीतीची जाणीव झाली, पोते काढल्यामुळे तो नाग अस्वस्थ होऊन खोलीत सरपटत होता, थोडासा संधिप्रकाश होता, त्यामध्ये मी संधी साधली आणि नागाला पोत्यात घातले.
बाहेर आल्यावर तो वाणी 'सॉरी' म्हणला, पण माझ्या मते त्याची पण काही चूक नव्हती. त्याच्या जागी माझ्या ओळखीचा कोणी पण असता तर अंधारात "कोब्रा" हा शब्द ऐकून पळाला असता. या कॉलनंतर प्रत्येक वेळी मी स्वतःचा टोर्च घेऊन गेलो, "माझी ब्याट, फक्त मीच वापरणार !" याच चालीवर कोणाच्या हातात मी तो दिला नाही.
बिरबलाच्या "माकडणीच्या गोष्टीचे तत्व - स्वतः चा जीव फक्त !" हे मनावर कोरून ठेवले.
सर्पोद्यान चा प्रत्येक कार्यकर्ता हा "वन-म्यान आर्मी" असतो, त्यामुळे शक्यतो माझ्या बरोबर कॉलला जाताना कोणी नसायचे.त्यामुळे छोट्या कामासाठी खूप वेळा दुसऱ्या लोकांची मदत घ्यावी लागायची. खूप वेळा कोणी मदत करायला पण यायचे नाही, मग एका हाताने काम करून, दुसऱ्या हाताने साप पकडायला लागायचा.
एकदा असाच दुपारी तळजाई पठारावरच्या वस्तीतून कॉल आला. तिकडे पोहचल्यावर लोकांनी सांगितले, घराच्या बाजूला कोन्क्रीटच्या पाईप (व्यास: २ फुट) खाली साप गेला आहे. तो १५ फुटी सुट्टा-पाईप वजनदार होता, काही भाग त्याचा जमिनीत पण रुतला होता.
नशिबाने एक माणूस मदतीला आला, एका बाजूने मी आणि दुसऱ्या बाजूने तो असे आम्ही पाईप रोल करायला लागलो. अर्धा फुट वर जाताच आम्हाला दोघांना तो साप दिसला.....त्या क्षणी मी काही विचार करायच्या आत त्याने पाईप सोडून दिला. माझा पाय त्या पाईप मध्ये अडकला. मला पण तो "नाग" दिसला होता, आणि हे पण माहित होते की तो माझ्या बाजूला येणार. (पाईप च्या खाली पाणी जाऊन थोडी पोकळी होती.)
त्यावेळी मी वूडल्यांड ची सॅण्ड्ल घातली होती.(जाहिरात करत नाही, मजबुतीचे प्रमाण सांगतो आहे !) निमिषार्धात मी सांडल मधून पाय कसाबसा सोडवून घेतला. पुढच्या काही सेकंदात तो नाग माझ्या सॅण्ड्ल कडे आला आणि त्यात शिरून बसला.काही क्षणापूर्वी जीकडे माझा पाय होता आत्ता तिकडे तो चकचकीत नाग शिरून बसला होता.
अनवाणी पायानेच तो पाईप मी कसाबसा एकट्याने हलवला, तो पर्यंत नागोबा मस्त पैकी सॅण्ड्ल मध्ये बसले होते. त्यानंतर मग नेहमी प्रमाणे मी त्याला शांतपणे पोत्यात घातला. नशिबाने त्या दिवशी मी सॅण्ड्ल घातली होती, नेहमीसारखा बूट असता पाय बाहेर काढू शकलो नसतो. दुसरे म्हणजे माझ्या सॅण्ड्लला घामाचा वास येत नव्हता नाही तर नागोबा माझ्यावर चिडला असता.;)
आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे मी २४ तास ड्युटी वर असायचो,कॉलेज, घर सगळी कडून त्या-त्या भागातले कॉल करायचो. सगळ्यात जास्त कॉल करायचो ते अभियांत्रिकीच्या पी.एल. मध्ये. तो काळ फळ सुखाचा असायचा, दिवसभर अभ्यास आणि रात्री साप !
असेच एकदा, मे महिन्याच्या रात्री २ वाजता पुण्याच्या एका पेठेमधून कॉल आला. ती पेठ खरं तर माझ्या घरापासून दूर,आणि माझ्या कॉलच्या कक्षेत येत नव्हती. पण बहुतेक "बिबवेवाडीच्या" मावशी,काकू, आत्या कडून त्यांना माझा नंबर मिळाला होता. नेहमी सापाचा कॉल आला की लोकांची चेहऱ्यावरची भीती मला फोन मध्ये दिसायची, म्हणून मी जास्त करून तरी नकार द्यायचो नाही. त्यामुळे मी झोप बाजूला सारून, तडक सुटलो.
तिकडे पोहचलो तर "नाना फडणीसांच्या काळचा" वाडा होता, वाड्याच्या चौकात सगळी झोपाळलेली लोकं जमली होती. त्यांना बघून मला जरा हसूच आले, कारण झोपेतून उठलेली लोकं त्यांच्या नैसर्गिक मेकप मध्ये असतात.(नंतर तीच माणसे अंघोळ करून, शर्ट प्यान्ट मध्ये खोचतात, तेल लावून भांग पडतात, अत्तर लावतात आणि मग माणसासारखे दिसायचा प्रयत्न करतात) ;)
साप जिन्याखालच्या अडगळीमध्ये गेला होता. आत्ता ज्यांनी जुने पुण्यातले वाडे पहिले असतील त्यांना कल्पना असेल की त्या लाकडी जिन्याखाली काय काय असते.
पुरातत्त्वखात्याला तिकडे पाठवले तर प्रत्येक वाड्याचा जिना हा युनिस्को चे राष्ट्रीय हेरीटेज घोषित करतील.
तसेच खूप थंडावा आणि लपायला जागा आल्यामुळे उंदीर-घुशीच्या कित्येक पिढ्यांची बाळंतपण तिकडे होत असतात.
तश्याच जिन्याखाली मी तोंडात टोर्च आणि हातात स्टिक घेऊन घेऊन मी सरपटलो. (रांगायला पण जागा नव्हती.)
हळू हळू करून जिन्याच्या तोंडावरचे सामान बाजूला करायला लागलो, मदतीची अपेक्षा नव्हतीच, लोकं "मौत का कुवा" बघावा, तसे वरून मला बघत होते.
साधारण अडीच ते तीन पर्यंत मी एकटाच पुरतान समान हलवत होतो,आणि एकदम मला ३-४ फुटी नाग दिसला. चकचकीत करडा नाग, मोठ्या उंदराला खाऊन कसेबसे वेटोळे मारून बसला होता. (मला बासुंदी-पुरीच्या सुग्रास जेवणानंतर आराम खुर्ची मध्ये बसलेल्या माझ्या काकाची आठवण आली.) उंदराला खाल्ले असल्यामुळे त्याला जास्त हलता येत नव्हते, त्यामुळे तो नुसते फणा वर काढून फुत्कार टाकत होता. मी त्याला शांतपणे स्टीकने ओढत जीन्याबाहेर काढला आणि पोत्यात घातला. "मौत का खेल" बघणाऱ्यांनी टाळ्या वगैरे वाजवल्या.
माझा अक्षरशः अवतार झाला होता, पण नाग पकडल्यामुळे एक मानसिक समाधान मिळाले होते. त्यानंतर मग नेहमी सारखी ओळख परेड, नेहमीचे प्रश्न "तुम्हाला सिद्धी आहे का ? इ." चालू झाले. मी ज्यांनी फोन केला होता त्यांना पेट्रोल साठी २० रु (साल २००६)मागितले. एवढ्या रात्रीची केलेली मेहनत, त्या अंधारात धोक्यात घातलेला जीव या पुढे तर ते जास्त काही नव्हते, असो.
त्या काकांनी मला ते पैसे दिले, माझा नंबर परत लिहून घेतला. इतक्यात एक आज्जी त्या घोळक्यातून बाहेर आल्या आणि माझ्या कडे वरून खाली बघत म्हणाल्या,
"चांगल्या घरचा दिसतो, असले गारुडी धंदे कशाला करतो रे बाबा ?"
घरचे संस्कार असल्यामुळे उलट उत्तर देता आले नाही, "आवडते म्हणून करतो असेच... " असे बोलून गाडीला किक मारली, नंतर एक कटिंग टाकल्यावर डोके ताळ्यावर आले.
हा प्रसंग एवढा मनावर कोरला गेला आहे की अजून त्या आज्जींचा चेहरा मला आठवतो. या नंतर मी यावरती खूप विचार केला, शेवटी एकच उत्तर मिळाले की "समाजात बसलेली सापाची भीती आणि अंधश्रद्धा " हे जो पर्यंत कमी होत नाही तो पर्यंत आमच्या सारख्या गारुड्याना अश्या आज्ज्या, मावश्या, काका-मामा कॉल वर भेटतच राहणार.
पुढच्या भागात इतर विषारी साप आणि त्यांचे अनुभव....
प्रतिक्रिया
9 Sep 2013 - 1:11 am | चाणक्य
थरारक अनुभव आहेत मित्रा..
9 Sep 2013 - 1:24 am | बॅटमॅन
तुमच्या फण्याची आपलं पायाची प्रिंटौट काढून पाठवा राजे. दररोज पूजा केली तर तुमच्या शतांशाने का होईना डेरिंग येईल. काय ते अनुभव अन काय ती शैली!!! आपण तर बॉ फ्यान झालो तुमचे-अगदी ५ वर फिरणारे चार पात्यांचे.
निव्वळ थोर _/\_
9 Sep 2013 - 10:42 pm | अत्रुप्त आत्मा
+ २५ ब्याट सह आत्मू मॅन! ;)
9 Sep 2013 - 10:46 pm | मोदक
निव्वळ थोर __/\__
10 Sep 2013 - 5:06 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
9 Sep 2013 - 1:30 am | मोदक
वाचतोय... पुढील भागांची वाट पाहतोय!!
9 Sep 2013 - 2:03 am | बाळ सप्रे
प्रत्येक भागात नवीन नवीन अनुभव वाचायला मिळतायत.. सर्पमित्र व्हायची इच्छा होतेय वाचून..
आत्तापर्यंत साप म्हटलं की मारायचा असेच प्रसंग बघितलेत त्याचं दु:खही होतय..
9 Sep 2013 - 3:41 am | जॅक डनियल्स
सर्पमित्र नाही झाले तरी चालेल, पण साप पहिला की त्यांना कॉल देत जा, म्हणजे तेवढेच साप वाचतील. जिवावरचा खेळ असल्यामुळे दुरूनच साप बघितलेलेच बरे.
9 Sep 2013 - 10:04 pm | बाळ सप्रे
खरयं.. कोकणातल्या घरी खूप गरज आहे.. तिथल्या सर्पमित्रांची यादी मिळवली पाहिजे..
9 Sep 2013 - 2:21 am | किसन शिंदे
फारच खतरनाक अनुभव घेतलेत की राव तुम्ही.
9 Sep 2013 - 4:43 am | यशोधरा
वाचते आहे.. भन्नाट अनुभव आणि लेखनशैलीही सुरेख.
9 Sep 2013 - 9:29 am | लॉरी टांगटूंगकर
सहीच!
9 Sep 2013 - 11:30 am | अद्द्या
लवकरच पुण्याला येणार आहेच .
बाकी काही होवो ना होवो .
तुमचा शिष्य जरूर होणार राव .
लोक सापाला मारतात तेव्हा खूप वाईट वाटतं . कित्येकदा त्या बिचाऱ्या जीवाला वाचवायला जाऊन शिव्या खाल्ल्यात .
जबरा अनुभव __/\__
9 Sep 2013 - 7:16 pm | जॅक डनियल्स
शिष्य वगैरे जाऊद्या, पण भेटू नक्कीच डिसेंबर मध्ये !
10 Sep 2013 - 9:35 pm | अद्द्या
जरूर जरूर .
नक्कीच भेटू . त्यादरम्यान आलो कि कळवेनच इथे :)
9 Sep 2013 - 11:35 am | आतिवास
अत्यंत माहितीपूर्ण आणि अत्यंत रोचक लेखमालिका.
सर्व भागांवर प्रतिसाद दिले नसले तरी उत्सुकतेने वाचते आहे.
9 Sep 2013 - 12:41 pm | मुक्त विहारि
+ 1000000000000000000000000000000000000
9 Sep 2013 - 3:04 pm | पिलीयन रायडर
Mi Pan...
(Maazyaach Marathi Typing la kay zalay?)
9 Sep 2013 - 4:14 pm | मुक्त विहारि
आता झालाय दुरुस्त...
9 Sep 2013 - 5:02 pm | गणपा
अगदी असेच म्हणतो.
कामाच्या रगाड्यात कधी कधी एखादा भाग वाचायचा राहुन जातो, तर कधी कधी प्रतिसाद द्यायचा.
पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा राहिलेले भाग आवर्जून वाचुन काढतो.
22 Jun 2015 - 2:14 pm | अमितसांगली
+१...
9 Sep 2013 - 6:58 pm | Pearl
+१
9 Sep 2013 - 12:42 pm | मुक्त विहारि
वाचतोय... पुढील भागांची वाट पाहतोय!!
9 Sep 2013 - 12:54 pm | डॉ सुहास म्हात्रे
जबरे अनुभव आणि मस्त लेखनशैली !
9 Sep 2013 - 1:49 pm | बिपिन कार्यकर्ते
प्रणाम!
9 Sep 2013 - 3:45 pm | प्रकाश घाटपांडे
धन्य आहे!
9 Sep 2013 - 4:51 pm | मधुरा देशपांडे
याआधीचेही सगळे भाग वाचलेत. थरारक अनुभव आणि त्यांचे रोमांचक वर्णन.
9 Sep 2013 - 5:02 pm | माझीही शॅम्पेन
बहुधा मिपा-वरील सर्वाधिक लक्ष्य-वेधक लेख-मालिका ,
अगदी जीव मुठीत घेऊन प्रत्येक भाग वाचतोय ,
स्वता:च्या दिवाण-खाण्यात बसून फक्त डिस्कवरी चॅनेल बघून पर्यावरण प्रेमी म्हणून
घेण्यापेक्षा हे जे काही वाचतोय ते भन्नाट ,
जबरदस्त अनुभव आणि लिहिण्याची भन्नाट शैली एकाच वेळी हे अशक्य आहे ,
जॅक भौ तुम्हाला साक्षात दन्डवत ____/|\_____
9 Sep 2013 - 6:31 pm | आदूबाळ
चांगल्या घरच्या बाळा, नेहेमीप्रमाणेच सिद्धहस्त लेखन!
{पुण्यातल्या भाई परिवाराच्या घरी तू साप धरायला गेला होतास तो अनुभव लिहिशील असं वाटलं होतं...}
9 Sep 2013 - 7:00 pm | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
नाही, जरी ९००० मैलावर असलो तरी थोडा सुरक्षेचा विचार करतो मी.
त्यामुळे तो अनुभव आपल्या जेडी च्या बैठकीतच बारा.:)
9 Sep 2013 - 9:28 pm | बॅटमॅन
काय हो, लिवा की त्याबद्दल. नावपत्ता झाकून आण्भव सांगता येत असेल तर बघा की. तुमीबी खुश अन आमीबी.
9 Sep 2013 - 9:37 pm | जॅक डनियल्स
जर भाई चे नाव लपवले तर स्टोरीचा जास्त उपयोग नाही, तरी मी प्रयत्न करीन कधी तरी. मी त्यांच्या कडे साप नाही घुबड पकडले होते.
9 Sep 2013 - 9:39 pm | बॅटमॅन
ओह अच्छा.
9 Sep 2013 - 6:55 pm | Pearl
खूप सूंदर, साहसी आणि वाचनीय लेखमाला. चांगली माहिती मिळते आहे.
तुमच्या सर्पमैत्रीचे आणि धाडसाचे खूप कौतूक वाटते.
>>तश्याच जिन्याखाली मी तोंडात टोर्च आणि हातात स्टिक घेऊन घेऊन मी सरपटलो. (रांगायला पण जागा नव्हती.)>>
http://www.amazon.com/Energizer-Indstrial-Headlamp-Batteries-Included/dp/B00352O79U
अशा प्रकारचा एखादा लाइट भारतात मिळतो का ते पहा किंवा मागवून घेता येतो का.
याचा साप पकडताना अंधारात उपयोग होईल असं वाटतं.
9 Sep 2013 - 7:04 pm | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
आत्ता मी भारतात नाही, २००६ च्या शेवटी मला तसा लाईट ड्यूटी फ्री मध्ये मिळाला होता. नंतर मी काही कॉल ला तो वापरला पण. त्याच्या तकलादू पणामुळे मी टोर्च तोंडात घेऊन साप पकडणे योग्य मानायचो.
१००० रु पुढचा लाईट घ्यायची,माझी परिस्थिती नव्हती.
9 Sep 2013 - 7:10 pm | अग्निकोल्हा
.
9 Sep 2013 - 8:27 pm | संदीप चित्रे
>> "चांगल्या घरचा दिसतो, असले गारुडी धंदे कशाला करतो रे बाबा ?"
अत्यंत वाचनीय लेखमाला आहे!
ह्या सगळ्या अनुभवांचे / लेखांचे एक खूप चांगले पुस्तक छाप रे बाबा!
9 Sep 2013 - 9:12 pm | सौ.मुवि
तुम्ही फार छान लिहित आहात.
तुमचे अनुभव वाचून मला पण साप पकडणे शिकावेसे वाटत आहे.
एखाद्या स्त्री ला हे शक्य आहे का?
9 Sep 2013 - 9:36 pm | जॅक डनियल्स
हो, माझ्या खूप मैत्रिणी हे काम करतात. पण मी आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे पब्लिक मध्ये जाऊन साप पकडणे खूप जिकरीचे काम आहे, कारण सगळी कडे खूप लोकांना सांभाळावे लागते. म्हणून माझ्या ज्या मैत्रिणी हे काम करतात त्या जास्त करून कोणाला तरी बरोबर घेऊन जातात.
तुम्हाला सापांवर संशोधन करायचे असेल, किंवा जंगलात त्यांना बघायचे असेल तर तुम्ही ते करू शकता.
9 Sep 2013 - 9:38 pm | मी-सौरभ
ही तुझी लेखमाला बर्याच अर्थाने मस्त आहे...
पु.ले.शु.
9 Sep 2013 - 9:54 pm | चिगो
अगदी जीवावर बेतले असते असे अनुभव, कुठेही 'मी पहा कसा तोप' हा अभीनिवेश न आणता, अत्यंत खुमासदार शैलीत लिहण्याची हातोटी जबरी आहे दोस्ता.. तुझ्या साहसाला आणि धैर्याला सलाम.. आणखी येऊ देत..:-)
9 Sep 2013 - 11:39 pm | अर्धवटराव
मला तसंही सर्पसृष्टीबद्दल एक प्रकारची भिती वाटते. तुमचे हे असले जीवावर बेतणारे अनुभव वाचुन तर मी आणखी चार पाऊले लांब राहणार.
मला आश्चर्य वाटतं कि खरेच असे लोक असतात कि जे सापाचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात?? ते ही कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसताना किंवा स्वतःची काहि गरज नसताना?? आणि वर इतक्या सहजतेने आपले अनुभव शेअर करतात... आपल्या शौर्याची टिमकी न वाजवता... कमाल आहे राव.
9 Sep 2013 - 11:57 pm | संजय क्षीरसागर
दोन प्रश्न आहेत. एक, तुमची भीती कशानं गेली? आणि दुसरं, साप किंवा नाग हल्ला का करतो?
10 Sep 2013 - 8:59 am | जॅक डनियल्स
खरे सांगायचे म्हणजे मला भीती कधी वाटली नाही, म्हणजे डोक्यात पहिल्या पासून साफ होते की, विषारी साप चावला तर ससून ला जायचे,आणि औषध घ्यायचे. म्हणून तो पकडताना मी जास्तीत जास्त काळजी घायचो. हे कसे काय जमले, याचे श्रेय मी पूर्ण पणे सर्पोद्यान ला देईन.(भाग २-३) सर्पोद्यान मधल्या अतिशय कुशल माणसांबरोबर काम काम केल्यामुळे आपसूकच शिकत गेलो.
पण मी कधी कधी द्चकायचो, कारण कॉल ला साप पकडताना खूप माणसे आजूबाजूला असतात, प्रत्येक जागा नवीन असते , त्यामुळे जर अनपेक्षित जागेतून तो साप बाहेर आला तर थोडे दचकायला व्हायचे पण काही सेकंदातच परिस्थिती काबूत यायची.
भाग पाच मध्ये लिहिले आहे की नाग हल्ला का करतो,
"एखाद्याला कोपच्यात घेतल्या वर तो जसा आधी बॉडी फुगवत आये-माई काढतो तसा नाग फणा काढून फुत्कार टाकतो, त्यामधून त्याला फक्त समोरच्याला सांगायचे असते- "आपण लई डेंजर ए, पुढे आला तर बघ"...जर समोरच्याने वाट दिली तर तो लगेच कल्टी मारतो(दुनियादारी मधल्या साईनाथ सारखी ;)). शेवटचा पर्याय म्हणून चावतो, नागाला पण त्याच्या विषाची पूर्ण किंमत माहिती असते त्यामुळे जेंव्हा चावतो तेंव्हा तो मोजून-मापून चावतो.(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !)."
10 Sep 2013 - 10:21 am | संजय क्षीरसागर
येस! म्हणजे त्याला सरळ जाऊ दिलं तर नो प्रॉब्लम, असंच ना?
10 Sep 2013 - 9:25 pm | जॅक डनियल्स
हो,म्हणजे मैदानात समजा समोर साप आला, तर जास्त करून पळूनच जाईल. पण एखाद्या मोरीत असला तर त्याला बाहेर जायची वाट सापडे पर्यंत तो फिरत राहील. आणि कोणी समोर गेले तर फणा काढेल.
10 Sep 2013 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा
(दुसऱ्याचे डोके विनाकारण चावणाऱ्यानी हे लक्षात ठेवले पाहिजे !).">>> =)) त्या भागा इतकच अत्ता पण हसू येत आहे! =))
10 Sep 2013 - 3:22 am | निनाद मुक्काम प...
सादर प्रणाम
हा भाग सगळ्यात थरारक होता.
काहीवेळा जीवावर बेतू शकत होते. पण नशिबी नागांचे प्राण वाचवणे होते म्हणूनच अघटीत काही घडले नाही.
हि लेखमाला मिपावर वाचलेल्या काही उत्कृष्ट लेखमालेपैकी एक आहे.
10 Sep 2013 - 3:33 am | रामपुरी
लै भारी खतर्नाक अनुभव
10 Sep 2013 - 3:34 am | प्यारे१
खूप मस्त शैलीत प्रबोधन करताय. और भी आन दो!
10 Sep 2013 - 8:42 am | मदनबाण
मस्त लिहतो आहेस. :)
10 Sep 2013 - 9:41 am | पैसा
साधा सरळ वाटणारा प्रसंग जिवावर बेतू शकतो असं हे काम. पण कोणीतरी असले गारुडी व्हायलाच पाहिजे. नाहीतर माणसाच्या जातीने सगळ्या सापांना मारून टाकले असते.
10 Sep 2013 - 11:58 am | झकासराव
ड्यान्जर अनुभव आहेत की.
:)
10 Sep 2013 - 3:06 pm | अभिज्ञ
ह्या लेख मालिकेतील सर्वच भाग आवडले.
हा भाग तर कहरच आहे.
साप पकडणे वा हाताळणे हा जीवावरचा खेळ असल्याने जराशी दिरंगाई,चुक,फाजील धाडस वा फाजील आत्मविश्वास फार महागात पडू शकतो.
साप वाचवणे हे जरी महत्वाचे असले तरी आपल्यावर आपल्या बायकापोरांची, पालकांची असलेली जबाबदारी जास्त महत्वाची असते हे भान सोडू नये.
हि बातमी वाचून खरच सुन्न झालो होतो.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/--/articleshow...?
सर्पमित्र सुनील रानडे ह्यांच्या विषयी हि बातमी आहे.
हे देखील वाचा.
http://maharashtratimes.indiatimes.com/edit/manasa/-/articleshow/5182176...?
जे कोणी ह्या उपक्रमात कार्यरत असतील त्यांनी योग्य ती काळजी घेणे एवढेच सांगावेसे वाटते.
थोडक्यात सांगायचे झाले तर, नुसते सापच नाहीत तर सर्पमित्र वाचणे देखील महत्वाचे आहे.
अभिज्ञ.
10 Sep 2013 - 8:37 pm | जॅक डनियल्स
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. सर्पोद्यान मध्ये या सगळ्याची पूर्णपणे जाणीव करून दिली जाते. तसेच मी काही वेळा सर्पदंशच्या रुग्णाना ससून मधल्या स्नेकबाईटच्या भागात जाऊन भेटलो आहे आणि मदत मदत केली आहे. त्यामुळे "जर चूक" झाली तर ...काय होऊ शकते याची मला पूर्ण जाणीव होती. (ज्याने घोणस चावलेला हात पहिला आहे, तो घोणस या सापाशी कधीच खेळणार नाही.)
माझ्या काही मित्रांचे अपघात पण झाले आहेत. मी कशी परिस्थिती सांभाळायचो आणि साप कसे पकडायचो हे मी लेखात कधीच दिले नाही, "साप पोत्यात घातला " या एका वाक्यात मी ते नेहमी संपवले आहे. माझ्या बाबतीत म्हणयचे तर मी विषारी सापासाठी खूप जास्त काळजी घ्यायचो. ज्यांना कोणाला मी भेटतो त्यांना हेच सांगतो की "निसर्गाशी खेळू नका!"
10 Sep 2013 - 3:21 pm | विटेकर
मूळात घटनाच इतक्या नाट्यमय आहेत की लेखनात ओढून - ताणून नाट्य आणावे लागत नाही !
सलाम तुमच्या जिगरिला ! ____/\___
तसेच अभिज्ञ यांचे सांगणेही ध्यानात घ्यावे. { कदाचित जे. डी. तशी पुरेशी काळजी घेत ही असावेत .. त्यांच्या लेखनशैलीमुळे आपल्याला त्यांचा अप्रोच कॅज्युल वाटत असावा }
10 Sep 2013 - 5:26 pm | अनुप कुलकर्णी
वूडल्यांड वरून लक्षात आलं… सापाचे दात बुटातून इजा करू शकतात काय? म्हणजे साप बुटावर चावला तर कितपत अवघड परिस्थिती होईल?
आणि हाच प्रश्न जीनच्या कापडाबद्दलही…
11 Sep 2013 - 11:00 pm | जॅक डनियल्स
मला याचे उत्तर माहित नाही, पण जर इंजेक्शन ची सुई बुटामधून आणि जीन्स मधून आत जाऊ शकत असेल तर सापाचे दात पण जाऊ शकतात. ते इंजेक्शन च्या सुईप्रमाणेच काम करतात.
दुसरी गोष्ट साप बरोबर बुटावरच चावेल याची शक्यता पण कमी आहे. म्हणून वूडल्यांड चे शूज घातले की विषारी सापापासून धोका नाही हा समाज चुकीचा आहे.(काही सर्पमित्रांचा तो असतो.)
धन्यवाद् !
11 Sep 2013 - 11:36 pm | मोदक
"आपल्याला काही कळत नसताना सापापासून शक्य तितके लांब राहणे" उत्तम हा धडा या लेखमालेतून शिकलो आहे.
या इजेच्या मुद्द्यावरून.. डिस्कवरी / नॅट जिओ वरच्या एका सापांच्या डॉक्युमेंट्रीमध्ये सापाने कॅमेराच्या लेन्सवर विषाची एक पिचकारी मारली होती व त्या नॅरेटरने सांगीतले की या इतक्या विषानेही कॅमेरामनला विषाचा त्रास झाला होता. (कसा झाला होता ते सांगीतले नव्हते.)
जेडी - तुम्ही पोत्यात साप भरून जाताना तो पोत्यातून माणसाला(उदा. पोते धरून उभे असाल तर पायाची पोटरी, किंवा पोत्याजवळ येणारा कोणताही मानवी अवयव जो सापाला पोत्याच्या आतून जाणवू शकतो) चावत नाही का..?
येथेच एकदा आदूबाळांनी "बाईक चालवताना सापाचा पाठीला स्पर्श होत होता" असे काहीसे विधान केले आहे. त्या अनुषंगाने..
11 Sep 2013 - 11:57 pm | जॅक डनियल्स
धन्यवाद् ! तुम्ही जे शिकला तेच मी सांगायचे प्रयत्न करत आहे.
तो नॅट जिओ वरचा किंग cobra चा विडीयो मी पहिला आहे, त्यामध्ये त्या थाई- किंग कोब्राचे विष लेन्स वर लागते. बहुतेक त्या क्यामेरामन च्या हाताला थोडा कट असेल, त्यातून त्याला जळजळ झाली असेल.पण माझ्या मते विषाचे प्रमाण कमी असल्याने आणि ते आधीच घट्ट असल्याने थोडेच (न्यानो मिली )विष जखमेत गेले असेल.
नक्कीच चावतो, असे अपघात पण खूप झाले आहेत, म्हणून विषारी साप साठी मी २-३ पिशव्या वापरायचो.म्हणजे एका कापडी पिशवीत त्याला टाकून, वरती एक अजून सुट्टी कापडी पिशवी वापरायचो. घोणस जातीच्या सापाचा दात (दीड-२ इंच ) आरामात बाहेर येऊ शकतो. अश्या दोन पिशव्या वापरून मी त्याला मानवी शरीरापासून दूर ठेवायचो.
(म्हणजे डिक्कीत, किंवा बाईक च्या हान्डेल ला)
त्यावेळी तो साप "धामण" हा बिनविषारी साप होता, म्हणून एकाच पोत्यात होता, म्हणून त्याला वळवळ जाणवत होती.
या अश्या छोट्या-छोट्या खूप महत्वाच्या गोष्टी मी सर्पोद्यानात शिकलो.
12 Sep 2013 - 12:20 am | खटपट्या
सद्या मी बेकर्सफील्ड कैलीफोर्नीया येथे एका तेल विहीरी वर काम करत आहे. इकडे सापान्चा सुळ्सुळाट आहे. आम्ही फिल्ड्वर स्टील कैप असलेले बूट वापरतो. पायासाठी स्नेक कैप वापरतो ज्यामूळे गुड्घ्यापर्यन्त सरक्षण मीळते.
भारतात उपलब्ध आहे का पहावे लागेल.
12 Sep 2013 - 12:34 am | मोदक
असे काही आहे का..?
12 Sep 2013 - 3:11 am | जॅक डनियल्स
धन्यवाद् !
हे लेग गार्ड आहे, याची किंमत साधारण पणे $५०-६० मध्ये असते. माझे जे मित्र जंगलात राहून संशोधन करतात, ते हे वापरतात. तसेच वरती उल्लेख आल्या प्रमाणे स्टील टो चा बूट पण वापरू शकतात. पण हे सगळा घालून कॉल ला जाणे अशक्य आहे.तसेच त्याच्या किमती पण खूप असतात, त्यामुळे जास्त करून कोणी भारतात वापरात नाही. पण एकडे मियामी स्नेक रेस्कू वाले (त्यांचे कामच स्नेक रेस्कू करणे आहे.)आणि डिस्कवरी वरचे लोकं हे वापरतात.
12 Sep 2013 - 3:37 am | खटपट्या
हो बरोबर, आणखी एक फोटो
http://www.amazon.com/Guardz-Protection-Leggins-Orange-Conceal/dp/B0064R...
मल अजूनही फोटो डकवता येत नाही.
12 Sep 2013 - 3:17 am | जॅक डनियल्स
तुमचे एकदम बरोबर आहे, तुमच्या भागात खूप जास्त प्रमाणात rattle स्नेक सापडतो. त्यामुळे हे घालून काम करणेच योग्य, तो गुढघ्याच्या उंची पर्यंत आरामात उडी मारून चावू शकतो.
हे बघा, हे सगळे साप सापडत असतील,कॅलिफोर्नियातले साप !
त्यामुळे काळजी घेत राहा.
12 Sep 2013 - 3:46 am | खटपट्या
हो बरोबर, असेच साप दीसतात कधी कधी. साप दीसताच आम्हाला ताबड्तोब काम थाम्बवून तो साप निघुन जाण्याची वाट पाहाण्याची आज्ञा आहे. साप मारण्यास सक्त मनाई आहे. तसेच कैट फोक्स (छोटा कोल्हा) दीसल्यास तो भाग त्वरीत सोड्ण्याच्या आज्ञा आहेत. एकदा तर एक मादी कैट फोक्स दीसली होती पीलान्बरोबर तर त्याना प्राईव्हसी मिळावी म्हणून त्या भागातील काम दोन आठवडे बन्द ठेवण्यात आले होते..
वन्य प्राण्याबद्द्ल एवढी जागरुकता आपल्याकडे केव्हा येणार..
12 Sep 2013 - 12:46 pm | बॅटमॅन
आयला इतका रिस्पेक्ट?? कळायचं बंद.
11 Sep 2013 - 12:23 pm | नि३सोलपुरकर
सलाम तुमच्या जिगरिला ! ____/\___.
पुलेशु.
12 Sep 2013 - 12:43 pm | अमोल केळकर
एकदम खतरनाक .
सलाम तुमच्या कामगिरीला
अमोल केळकर
12 Sep 2013 - 7:36 pm | साधामाणूस
तुमची अनुभव सांगण्याची हातोटी विलक्षण आहे. धन्यवाद!
12 Sep 2013 - 7:54 pm | arunjoshi123
१. आपण ज्या विनोदबुद्धीने लिहिता, २. ज्या तत्परतेने समाधानकारक उपप्रतिसाद देता हे मला फार हेवा करावा असे वाटले.
15 Sep 2013 - 4:56 pm | सुधीर
तुमच्या या लेखमालेतल्या गोष्टी ह्या थरारक आणि साहसी आहेत. माझ्यासाठीतरी तुमचे अनुभव खरच मौत का कुवा आहेत. पण तुमच्या विनोदी शैलीमुळे त्यातला थरार आणि साहस सहज दिसून येत नाही.
15 Sep 2013 - 10:22 pm | एस
मिपावरील हे गारूड अजून 'दखल'पात्र का बरं नसावं याचं मात्र अंमळ आश्चर्य वाटत आहे. असो. किप इट अप्...
16 Sep 2013 - 9:55 am | आदूबाळ
+१
16 Sep 2013 - 10:48 am | दादा कोंडके
सहमत. मस्त लेखमाला.
22 Jun 2015 - 1:38 pm | पाटील हो
पुढचा भाग लिहिला असेल तर त्याची लिंक द्या .