एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
19 Nov 2013 - 10:10 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

या लेखापासून मी बिनविषारी सापांबद्दल लिहणार आहे. बिनविषारी म्हणजे " ज्या सापांच्या मध्ये विष नसते आणि ते ओपोआप(काही माणसांच्या डोक्यावर केस येतात तसे.. ) तयार पण होत नाही त्यामुळे ते चावले असता प्रतिविष घ्यावे लागत नाही."

ही व्याख्या लक्षात ठेवा कारण, काही लोकांचा प्रश्न असतो की " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते. आपणच नवीन-नवीन विष निर्माण करायला आपण विज्ञानाचा आधार घेतो, आणि मग सिरीया मध्ये सिरीन वापरला जातो.

बिनविषारी साप निसर्गतःच बिनविषारी (कम्प्लीट बेज !) असल्यामुळे त्यांना अन्न मिळवायला दुसऱ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. चपळ असलेले साप भक्षाच्या मागे लागून त्याची मुंडी पिरगाळून ढेकर देतात तर काही अवाढव्य साप (अजगर-अनाकोंडा) आर्मीतल्या स्नायपर सारखे ८-८ दिवस गवतात लपून राहून शिकार करतात. हा अनाकोंडाचा व्हिडीओ बघा-अनाकोंडाची शिकार !

मी सगळ्या पक्ष्यांचा राजा हा "कावळा" (मोर हा मिस्टर वर्ल्ड आहे, राजा नाही !) मानतो तसा माझ्यासाठी या बिनविषारी सापांचा राजा "धामण" !

धामण (बिनविषारी): हा म्हणजे आर.के. लक्ष्मणच्या कॉमन-म्यान सारखा कॉमन-साप आहे.

याचा वावर म्हणजे, माझ्या सिंहगड-कॉलेजच्या होस्टेलच्या मित्रांसारखा जिकडे खाणे (आणि पोरी) तिकडे, वडगाव-आनंदनगरच्या (चरवड, जगतापांच्या इ.) शेतजमिनी, सहकारनगरमधील बंगल्याच्या बागा, बिल्डींगच्या पार्किंगच्या जागा, येमेसिबी चे ट्रान्सफोर्मारच्या बाजूचे खड्डे, टेकडी वरच्या वस्त्यांमधली भुसभुशीत घरे, मार्केटयार्ड मधली धान्याची कोठारे इ.
सिंहगडकॉलेजच्या मुलींच्या होस्टेल मध्ये घुसलेल्या धामणीला मी एका रात्री पकडले होते, मला असे रात्री होस्टेल मध्ये बघून माझी एक मैत्रीण बेशुद्ध पडायची बाकी होती ;)

चांगला संटा ६-८ फुट वाढणारा हा साप आहे. पूर्वीच्याकाळी ४ -४ किलोचा कोबीचा गड्डा पहिला आहे, त्याच चालीवर आम्ही पूर्वी खडकवासल्याला ९-१० फुटी धामणी धरल्या आहेत, असे अनेक जुने सर्पतज्ञ म्हणतात. चकचकीत पिवळा रंग त्यावर काळे पट्टे आणि हाताएवढी जाडी असे सर्वसाधारण वर्णन. पण विष नसल्यामुळे चपळता आणि निसर्गात लपायची क्षमता यावरच सगळे अवलंबून असते. त्यामुळे या पिवळ्या रंगाच्या छटा सापाच्या वावरण्याच्या जागेप्रमाणे बदलत जातात. पुण्यात पिवळा, हिरवट-पिवळा, मातेरी, शेवाळी, राखाडी, काळपट तांबूस इ. असे अनेक रंग सापडतात. निसर्गाला रंगांच्या बाबतीत कोणीच हरवू शकत नाही, अगदी पेठ्तली साड्यांची दुकाने पण नाही ....

धामण बघा कशी ग्लॉसी फिनिश मारून बसली आहे.

धामण

धामण १

धामणीची चपळता म्हणजे "मिल्खा सिंग" सारखी, धामणीला पकडताना मी अनेक वेळा जॉनटी र्होड्स सारखी उडी मारली आहे. बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा, हे आमचे सर्पोद्यानचे तत्व. त्यामुळे धामण दिसली की "टाक हात आणि पकड" असे मी काम चालायचे पण याच्या चपळतेमुळे या सापाने मला पासपोर्ट-विसा पेक्षा जास्त पळवले आहे.

एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात. (प्रयत्न करून झाले आहेत, त्यामुळे प्रश्न नको !) त्यामुळे वेट-लॉस प्रोग्राम मध्ये धामण सामाविष्ट्य करायला हरकत नाही, मैदानातील धामण ४-५ वेळा पकडून वजन घटवा !

कॉलवरची धामण तर अजूनच वेगळी, घुशीच्या बिळात धामण असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी धामण अर्धी बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे.(भाग ४) नट मध्ये जसा बोल्ट हळू हळू घट्ट होत जातो, तशी बिळातली धामण हळू-हळू घट्ट होत जायची आणि मग पतंग काटताना जसे हळू हळू ढील देऊन मग एकदम खेचायचा असतो तोच प्रकार इकडे करायला लागायचा.

मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता.(पाणीपुरीच्या प्लेट वरून उठवून साप पकडायला घेऊन गेलो गेलो म्हणून आदुबाळ अजून शिव्या घालतो मला.) ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते, ती धामण बिळात लॉक करून बसली होती...... शेपटी पकडून, माझे खोदणे आणि ढील देणे चालूच होते,इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला.

सगळ्यात जास्त कॉलवर सापडणारा साप असे मी या सापाचे वर्णन करीन, चिमण्या जश्या मनुष्यवस्तीच्या जवळपास घरे करून राहतात तसाच हा साप मनुष्यवस्ती मधेच राहतो. बिनविषारी असला तरी या ७-८ फुटी सापाला कॉल वर पकडणे सोपे कधीच नव्हते, कारण म्हणजे त्यांची चपळता आणि अंगावर उसळण्याची क्षमता ! सापाच्या चाव्याला मी कधीच भीत नाही पण पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती. म्हणून फुकटचे सापांबरोबर खेळ करायला जायचो नाही आणि "क्षणार्धात साप पोत्यात !" विषारी सापांचा नियम इकडे पण पाळायचो.

पिवळीधम्मक धामण.

धामण ३

२००५ चा मे महिना, इंजिनियरींगची पीएल (अभ्यासासाठी सुट्टी)संपायला आली होती,आठवड्याने पहिला पेपर होता. तळजाई वरच्या वस्ती वरून सकाळी १० च्या सुमाराला कॉल आला, "घरात काळा मोठा नाग निघाला आहे." मी तडक पोहचलो, वस्तीमध्ये २० बाय २० ची टेकडीच्या उतारावरची खोली, त्यामध्ये किचन, बेडरूम, लिविंग रूम, मास्टर बेडरूम, आणि छोटी मोरी ! घराचा मालक गवंडी आणि मालकीण मजूर, त्यांची ३-४ चार चिल्लीपिल्ली असे (छोटे) सुखी कुटुंब बाहेर उभे होते.

बाजूच्या घराच्या मुलीने सकाळी या खोलीत काळा मोठा साप पहिला आणि चक्कर येऊन पडली. माझ्या डोक्यातली गणिते, निष्कर्षाची सुई नाग किंवा धामणी कडे वळवत होती. मागच्याच आठवड्या मध्ये याच वस्तीच्या वरच्या भागातला पकडलेल्या नागाची आठवण अजून डोक्यात ताजी होती.

मी हळू हळू सामान हलवायला सुरुवात केली,लोखंडी पलंग हलवला तर खाली घुशीची आख्खी अपार्टमेंट स्कीम होती. घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही. ते खोदण्यात काही उपयोग नव्हता, कारण ते बीळ वरच्या घराचे बेसमेंट होते. "साप पळून गेला असेल, दिसला तर कॉल करा” असे सांगून मी कल्टी मारली.

घरी पोचून थोडे इंजीनेरारिंग डोक्यात भरत असताना परत १२ ला कॉल आला-“ साप परत दिसला !” मग मात्र या कॉल ला मी चान्स घेतला नाही, चील्लीपिल्लींचा विचार करून हळूहळू करत सगळे समान बाहेर काढले, त्या वस्तीच्या रस्त्यावर त्यांचा संसार आला. आत्ता खोली मध्ये ते बीळ आणि नवीन बांधलेली मोरी राहिली होती. ते बीळ पण थोडे खोदले, सापाचे नख पण दिसले नाही (सापाला नखे नसतात, वाक्यप्रचार वापरला आहे !)

घर मालकाची इच्छा होती की त्या बिळात सायकल चे टायर जाळावे, त्याला विरोध करून पहिला पण काही उपयोग झाला नाही, मग शेवटी टायर जाळले. अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे, “मी रस्त्यावर बसलो आहे, माझ्या आजूबाजूला ती चिल्लीपिल्ली खेळत आहेत, आणि तो मालक आणि मालकीण स्वतःच्या घरातून उठणाऱ्या काळ्या धुराकडे बघत आहेत.....!

अर्ध्या तासाने टायर संपल्यावर घरात पहिले, माझ्या अंदाजानुसार साप काही मिळालाच नाही. मग हताश होऊन परत ३ ला घरी परतलो. दोन घास पोटात टाकले, आणि परत “कॉल”, ताट तसेच सरकवून, आईचा ओरडा खाऊन मी तळजाई पठारावर पोहचलो.

सगळे लोकं आणि समान अजून बाहेरच होते. मी पोहोचायच्या आधी त्याच बिळातूनच सापाने परत डोके काढले होते, यावरून तिथे मला “ हे बीळ पुढे संपते आहे” ही घुशीच्या मुन्सीपालटीचा बोर्ड मला दिसला. पण बीळ खोदून पण उपयोग नव्हता-घर खाली आले असते, आणि बीळ तसे सोडून पण उपयोग नव्हता ! आता, सगळ्या वस्तीचे डोळे माझ्या कडे लागले होते, शेवटची ओवर खेळताना तेंडल्यावर किती दडपण असेल हे मी अनुभवत होतो.

शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला.

पुढचा भाग धामण...क्रमशः !

सगळे फोटो हे आंतरजालावरचे आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने पण बदलले नाही.

समाजजीवनमानशिक्षणलेखअनुभव

प्रतिक्रिया

लॉरी टांगटूंगकर's picture

19 Nov 2013 - 10:15 am | लॉरी टांगटूंगकर

धामण फार सुंदर दिसते आहे!!! पुढचा भाग वेळेत टाकावा.

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 10:26 am | जॅक डनियल्स

परीक्षा असल्यामुळे हा लेख लिहायला वेळ लागला. आता पुढचे भाग वेळेत येतील.

नेहमीप्रमाणे अप्रतिम . धामण स्वत:ची शेपटी तोंडात पकडुन टायर सारखा आकार घेऊन पळते अस ऐकल आहे .खर आहे का ?

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 10:28 am | जॅक डनियल्स

धन्यवाद् ! हा खूप मोठा गैरसमज आहे. धामण हा साप सरपटणारा साप असल्यामुळे त्याचे टायर होत नाही. फक्त तो खूप बुंगाट सरपटतो.

अद्द्या's picture

19 Nov 2013 - 11:56 am | अद्द्या

पाचवी - सहावीत असताना एका शेतातून सायकल घेऊन जात असताना या बाई अडकल्या होत्या टायरमध्ये . . कशी काय माहित . गुडघ्यापर्यंत गवत होतं. एकदम सायकल जड वाटायला लागली . थोडं गवत बाजूला करून बघितलं तर हे चाकात . "नागोबा नागोबा" बोंबलत पळालो होतो तिथून . :P
तासभर तरी थरथरत होतो भीतीने . :D
नंतर कोणी तरी सायकल आणून दिलीन घरी .
सगळ्या तारा तुटल्या होत्या .
पण . दुर्दैवाने त्या लोकांनी सापाला पण मारलं होतं नाग समजून :-/ :(

लेख नेहमी प्रमाणेच जबरा .
पुढचा भाग लवकर येउदे :)

स्पंदना's picture

19 Nov 2013 - 12:16 pm | स्पंदना

:)) :))
काय काय विचार करतात लोक तरी! नुसती कल्पना करुनच पाणी आल डोळ्यात हसुन हसुन.

चाणक्य's picture

19 Nov 2013 - 10:35 am | चाणक्य

मस्त लिखाण.

निनाद's picture

19 Nov 2013 - 10:50 am | निनाद

अप्रतिम माहिती. त्यातही सगळ्याला खास विनोदाची फोडणी!
अगदी वाटच पाहत असतो जॅक डनियल्स च्या लेखनाची.

इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला.

कसले जबरी दृष्य डोळ्यासमोर उभे राहीले... :)

निनाद's picture

19 Nov 2013 - 10:51 am | निनाद

पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती.

किंवा

शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला.

कसले जबरी डोके आहे... मानले!

धामण आणि नाग ह्यातील फरक चटकन न ओळखता आल्याने बर्‍याच धामनी जिवाला मुकत असतील.
५-६ फुटी पिवळी धम्मक धामण शेताच्या बांधावरुन जाताना पाहिली आहे.
सुंदर दिसते (दुरुनच) :)

अस काही वळ्वळणार भयंकर समोर आल तर ते विषारी आहे की बिनविषारी हे समजेपर्यंत मला घेरी आलेली असेल ;)
असो लेख अन माहीती नेहमीप्रमाणे कडक :)

सुबोध खरे's picture

19 Nov 2013 - 11:10 am | सुबोध खरे

दुर्दैवाने नाग आणी धामण यातील फरक लांबून सहज ओळखता येत नाही आणी धामण हि नागाची बायको असते अशा तर्हेच्या गैरसमजुती असल्यामुळे धामणींची सर्रास कत्तल होते. खरा तर धामण हि शेतकऱ्याची खरी मित्र आहे कारण तिचे मुख्य भक्ष्य उंदीर हे आहे आणी इतर साप जी गोष्ट विषाने साधतात ते विष नसल्यामुळे धामण हि उंदरांना आपल्या चपळतेने पकडते. नागासारखी दिसणारी आणी अत्यंत चपळ असल्याने तिच्याबद्दल अजूनच गैरसमज पसरलेले आहेत. अन्यथा या खर्या शेतकऱ्यांच्या मित्राची इतकी कत्तल झाली नसती. आमच्या स्वतःच्या घरात मुंबईत (१ ९७४ ) धामण शिरली होती पण ती ओळखणे शक्य नव्हते आणी त्यावेळेस असे सर्पमित्र उपलब्ध नव्हते त्यामुळे प्रथम तिला मारण्यात आले आणी नंतर हळहळ व्यक्त करण्यापलीकडे काही करता आले नाही.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 11:29 am | शैलेन्द्र

मस्त..
धामण आणि घुबड इतके उंदीर खातात, की त्यांना त्यासाठी राष्ट्रीय संरक्षकाचा दर्जा दिला पाहिजे

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 9:56 pm | जॅक डनियल्स

त्या बद्दल मी पुढच्या भागात सविस्तरपणे लिहिणार आहे.

चतुरंग's picture

19 Nov 2013 - 11:30 am | चतुरंग

जॅडॅ, तुमचं लेखन म्हणजे भन्नाटच असतं. माहितीने भरपूर असूनही किंचितही थांबू न देता, वाक्यावाक्याला कोपरखळ्या मारत, चिमटे घेत लेख धामणीसारखाच सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! :)

अत्रुप्त आत्मा's picture

19 Nov 2013 - 6:55 pm | अत्रुप्त आत्मा

@सळसळत कधी संपला ते समजलंच नाही!! जियो!!! >>>++++++++++११११११११११११११११११
==============================================================

@एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात.>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-052.GIF
@ घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-060.gif
@शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला. >>> __/\__ जे.डी...तुमच्या कामातल्या आत्मीयतेला आणी जिगरबाजीला सल्लाम! __/\__ :)

अग्निकोल्हा's picture

19 Nov 2013 - 11:34 am | अग्निकोल्हा

.

गवि's picture

19 Nov 2013 - 11:36 am | गवि

उत्तम लिखाण.. माहिती पोचवण्याची शैली आकर्षक. त्यामुळे नुसतेच पुस्तकी अ.ब.क. मुद्दे न राहता वाचण्याची इच्छा जागती राहते. लगे रहो.

धामणीशी बराच परिचय आहे. नेहमी आसपास दिसणारा साप असला तरी सांगलीत मात्र अगदी घराच्या खाली असलेल्या (सिमेंटचा ढाचा आणि खालची भुसभुशीत शेतजमीन यांच्या)सापटीत कायमची वसतीला असलेली धामण नेहमी पाहिली आहे. ती कधीच घरात येत नसल्याने आणि तसा अपाय काही न दिसल्याने दुर्लक्ष करीत असे.

पाळीव कुत्रा आणि धामण यांचा नेहमी पाठलाग आणि खुन्नस चालायची पण कुत्र्याला चाहूल लागून तो पळत येईस्तोवर धामण सापटीत पसार झालेली असायची, उर्वरित शेपूट बाहेर वळवळताना दिसले तरी कुत्रा चडफडत भुंकत राही.

llपुण्याचे पेशवेll's picture

2 Dec 2013 - 7:02 pm | llपुण्याचे पेशवेll

हा पाळीव वरून आठवलं. आमची आजी कोकणातल्या घरात फार पूर्वीपासून २ घणसं आहेत असे म्हणायची. पण तिची अंधश्रद्धा अशी की त्या आपल्या घरातल्या कोणाला चावत नाहीत. तरीपण ती रात्री कधी विजेरी घेतल्याशिवाय बाहेर जात नसे. आम्ही आमच्या परसांत, लाकडांच्या ढिगार्‍यांत, झाडांवर, पातेर्‍याच्या ढिगात अनवाणी खेळलो पण कधीही सापाचे दर्शन देखील झाले नाही. आजीच्या मते घणसं जोडीनी राहतात. पण आमच्या परसात काम करणार्‍या एका बाईला चावलं होतं घणस पण ते लगेच लक्षात आले म्हणून लागलीच खारेपाटणात नेऊन तिच्यावर उपचार होऊ शकले आणि ती वाचली. त्यानंतर ती बाई आमच्या घरी केवळ सारवलेल्या जमिनीवरच चालत असे. अलिकडे आमच्या वडीलांनी घराच्या आजूबाजूची जमिन साफ करून नवीन कलमं, सागवान लावण्यासाठी सगळी जमिन बेणायचे (झाडे-झुडूपे, गवत काढून जमिन स्वच्छ ज्क्करण्याचे कॉन्ट्रॅक्ट गावातल्या एकाला दिले होते. त्याला मात्र आंब्याखालचे गवत साफ करताना एक घणस मिळाले आणि त्याच्या लोकांनी ते लागलीच मारले. आजीला कळल्यावर आजी म्हणली मला काही त्रास नव्हता त्याचा पण त्याची लोकं कामाला वावरतील तर त्यांना भिती नको म्हणून मारली अस्तील, ठीक आहे. पण म्हटली १ मिळालीये तर दुसरी पण मिळेल. त्याप्रमाणे दुसरी पण पुढील दारच्या परसवा शेजारची आंब्याची खळ साफ करताना मिळाली. ती ही मारण्यात आली.
मग आम्ही आजीला चिडवत असू, आजीने पाळलेले दोन घणस मारले म्हणून.

आनन्दिता's picture

3 Dec 2013 - 2:27 am | आनन्दिता

घणस म्हणजे?. घोणस?.?बापरे....

चिप्लुन्कर's picture

19 Nov 2013 - 11:43 am | चिप्लुन्कर

नेहमी प्रमाणेच मस्त लिखाण .

परिंदा's picture

19 Nov 2013 - 11:51 am | परिंदा

सापटी म्हणजे काय?

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 12:07 pm | शैलेन्द्र

भेग - फट, दोन गोष्टींच्या मधली चपटी, अरुंद जागा..

अर्थ सांगितल्याबद्दल धन्यवाद!

जॅ.डॅ. आपन तुमच्या लेखनाचे आन त्याच्या ष्टाइलचे येक्दम ५२" फ्यान झालो पघा.
अशेच लिवित राहा द्येवा.

काय वेग असतो या धामणीचा! एकदा सायंकाळच्या उन्हात ही सळसळणारी धामण परड्यात पाहीली होती. कसली वेगात जात होती, की घाबरायच सुद्धा विसरल माझं. नुसतीच अवाक होउन पहात राहीले.तिच्या त्या प्रचंड वेगाने ती जणु तरंगत निघालीय असा भास होत होता त्या सोनेरी किरणात.
बाकी धामण नागाची बायको? अगागा!

चावटमेला's picture

19 Nov 2013 - 1:00 pm | चावटमेला

इतर लेखांप्रमाणेच खुसखुशीत लेख. बादवे, कधी विषारी साप बिनविषारी सापांना चावल्याचे ऐकीवात आहे का? जसे की नाग धामणीला चावला वगैरे..

हरवलेला's picture

19 Nov 2013 - 1:49 pm | हरवलेला

किंग कोब्रा नुसता चावत नाही, तर खातो सुद्धा !
तू नळी वर बघा !

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 9:59 pm | जॅक डनियल्स

हो, किंग कोब्रा चे स्टेपल फूड म्हणजे धामण आहे. मण्यारपण छोट्या धामणी खाते, किंग तर ७-८ फुटी धामण एकवेळेला आरामात पचवू शकतो.

नेहमीप्रमाणे उत्कृष्ठ लिखाण.
मिपावरच्या सर्वोत्तम लेखमालिकेंपकी एक.

pacificready's picture

19 Nov 2013 - 1:54 pm | pacificready

Khup chhan information.

किसन शिंदे's picture

19 Nov 2013 - 2:36 pm | किसन शिंदे

आयडी बदलला का रे प्यार्‍या? कि हा राखीव आयडी आहे?:);)

मोबिलसाठी! मराठी टायपत न्हाई. तोच प्रयत्न होता.
ड्यु आयडी आपलं काम न्हाई.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Dec 2013 - 12:21 am | विश्वनाथ मेहेंदळे

तुम्हाला कसे कळले, हा प्यारे चा आयडी आहे ते?

किसन शिंदे's picture

19 Nov 2013 - 2:06 pm | किसन शिंदे

खूप आवडला हा भाग सुध्दा(सध्या एवढंच म्हणतो, दर वेळेला तेच तेच काय म्हणायचं; ))

बाकी ठाणेकर, तुम्हाला एक व्यनि पाठवला होता. उत्तराची वाट पाहतोय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2013 - 2:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुमची माहिती सांगण्याची हातोटी विलक्षण आहे ! उपमा-उत्प्रेक्षांचा खुसखुशीत शैलितला उपयोग खास आवडला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

19 Nov 2013 - 2:18 pm | राजेंद्र मेहेंदळे

एक सर्पमित्र आहेत आमच्या सोसायटीत..त्यांच्या हातात परवाच धामण बघितली (लांबुनच)
तोंड डोक्याच्यावर (त्यांच्या) आणि शेपुट जमिनीवर (धामणीची) म्ह्णजे ७ फूट तरी लांब असेल

बिनविषारी साप म्हटलं की थोडं रिलॅक्स झालो.
कोपरखळ्या एका चढीस एक आहेत... भन्नाट.

टोपी काढली आहे बंधो!

सूड's picture

19 Nov 2013 - 3:12 pm | सूड

धामण झकास दिसतेय !!

जिन्क्स's picture

19 Nov 2013 - 6:07 pm | जिन्क्स

बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा

बिनविषारी साप चावल्यामुळे अजिबातच काही होत नाही का? माझ्या महिती प्रमाणे बिनविषारी सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात. हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात.
प्रकाश टाकावा...

परिंदा's picture

19 Nov 2013 - 7:14 pm | परिंदा

हे सडलेले कण चावता वेळी माणसाच्या शरीरात जाउन प्रसंगी जीवावर बेततात.

असे असेल तर एखादया रात्री ब्रश न करता झोपलेल्या बिनविषारी माणूसाने सकाळी उठल्यावर (ब्रश करण्याआधी) कोणाला चावले तर? :)

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 10:03 pm | जॅक डनियल्स

काही नाजूक लोकांना इन्फेक्शन झालेले मला माहित आहे. पण त्यांना ताप येतो, तो भीतीने येतो का इन्फेक्शन ने मला अजून पूर्ण माहित नाही.
पहिली गोष्ट, साप चावून भक्ष्य खात नाही (तो गिळतो !), त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही. अजगरासारखा मोठं साप चावला तर जास्त रक्त जाऊन चक्कर येऊ शकते.

अर्धवटराव's picture

19 Nov 2013 - 11:38 pm | अर्धवटराव

>> त्यामुळे आपल्या दातात जसे बडी शेप अडकते तसे काही अडकत नाही.
-- =)) उपमा द्यायच्या बाबतीत पु.लं. चा वारसा चालवणारा तुच एक दिसला आजवर.

>> सापांच्या दातांमध्ये त्यांनी खाल्लेल्या भक्श्याचे कण साठुन रहातात.
तशी शक्यता कमी आहे, कारण साप भक्ष्य आपल्याला लहापणी शिकवतात तसं बत्तीस वेळा वैगरे चावून खात नाहीत. ते सरळ गिळतात, असा आत्तापर्यंतचा तरी माझा समज आहे.

चूक बरोबर जेडिभौ सांगतीलच!!

तो शिंचा रोज दात जरी घासत असला तरी वट्टात कोणीही अगदी सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ...

(उदाहरण चुकले काय रे ?)

>>सुंदरशी परीदेखील चावणे म्हणजे दुखणार आणि ठसठसणारच की रे ...
साप चावल्याचा अनुभव नसला तरी लोकांच्या सांगण्यावरुन, वाचनातून कळतं हो. आता परी चावलेलं कोणी माहितीत नाही, स्वानुभव तर नाहीच नाही. आता सापडलीच एखादी आणि चावलीच तर सांगतो. ;)

स्वगतः चला, आता एक चावरी परी शोधणे आले. ;)

प्यारे१'s picture

19 Nov 2013 - 7:31 pm | प्यारे१

=))

मी-सौरभ's picture

19 Nov 2013 - 7:05 pm | मी-सौरभ

नाग आणि धामण यातला फरक पटकन ओळखता येईल असे काही फरक सांगाल का? फणा काढणे आणि न काढणे हा एक फरक आहे का?

मी पकडायला जाणार नाहीच पण जमल तर एखादा मुका जीव मरण्यापासुन तरी वाचवू शकेन :)

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 10:05 pm | जॅक डनियल्स

मी पुढच्या भागात सांगायचा प्रयत्न करीन.

यशोधरा's picture

19 Nov 2013 - 7:31 pm | यशोधरा

मस्त लेख.

भुजंग हा साप असतो का ? का नुसतीच दंतकथा आहे ?

या भुजंगची एक ष्टोरी हाय माझ्याकड लिहिन सावकाशीन .

कपिलमुनी's picture

19 Nov 2013 - 8:18 pm | कपिलमुनी

पूर्वीच्या मराठी चित्रपटात व्हिलनचे नाव असायचे ..

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 10:09 pm | जॅक डनियल्स

भाग ७ मध्ये मी यावरती खूप लिहिले आहे, ती अंधश्रद्धा आहे.
भाग७

प्रभो's picture

19 Nov 2013 - 8:01 pm | प्रभो

भारी!!

मुक्त विहारि's picture

19 Nov 2013 - 10:06 pm | मुक्त विहारि

तुम इधर कभी आनेवाला है....

मस्त लेख...

हे साले असले काही वाचायला मिळते म्हणून तर मिपा आहे...

जिओ...

जॅक डनियल्स's picture

19 Nov 2013 - 10:10 pm | जॅक डनियल्स

धन्यवाद् !
७ डिसेंबर ला पुण्यात, मग महिनाभर आहे.

शैलेन्द्र's picture

19 Nov 2013 - 10:23 pm | शैलेन्द्र

वा वा, मग एक सापावाला कट्टा करु, किंवा एक रात्रीचा ट्रेक, सापांसाठी..

एक रात्रीचा ट्रेक, सापांसाठी..
+१

अद्द्या's picture

21 Nov 2013 - 9:41 am | अद्द्या

त्याच दरम्यान मी हि असेन पुण्यात बहुदा . त्यामुळे . .

"ए मी पण मी पण "

इथे नागीणऐवजी धामण हा शब्द खरा शोभला असता असे माझे मत आहे. धामण आजपर्यंत कधी स्वतः पकडायच्या भानगडीत पडलो नाही. (माझ्या वजनाचे रहस्य ;) कोण एवढी धावाधाव करणार ना! :-)) ) आणि कशाला पकडायची म्हणा. बिनविषारी, सो एकदम सेफ. तिचा तो अशक्य चपळपणा आणि विशेषतः जाळीदार नक्षी असलेली शेपटी बघतच रहावीशी वाटते. काय ती अदा आणि काय तो वेग. बैठकीच्या लावणीत बाईंनी फेकलेला कटाक्ष किंवा जगजीतच्या गझलेतील कातर तान... बस. काहीकाही साप खरंच प्रचंड सुंदर असतात. धामण, तस्कर, उडता सोनसर्प, घोणस हे आपल्याकडचे साप फार आकर्षक दिसतात.

आमच्याइकडे धरणात पोहताना कित्येकदा ही अगदी जवळून सळसळत जाते तेव्हाही नवख्या माणसाची भीतीने पाण्यातच उडणारी गाळण पाहून धो धो हसायचोही. उंदरांचा काळ आहे धामण. पण माणसांना ते कळत नाही. दरवर्षी उंदीर २०% अन्नधान्याची नासाडी करतात. वर शैलेन्द्र यांनी म्हटल्याप्रमाणे खरोखरच धामण आणि घुबडांचे आभार मानावेत तेवढे कमीच. माणूस एवढा आंधळा झालाय की निसर्गातील त्याचे मित्र संपवत चाललाय आणि पर्यायाने शत्रू मात्र ढीगाने पैदा होताहेत. पण त्याला त्याची पर्वा कुठली. असो.

बाकी तुमचा लेख कसा झालाय हे सांगणे बंदच करत आहे कारण माझ्याकडील शब्दसंग्रह संपुष्टात आला आहे. पण जेडी, तुम्ही एकतरी लेख माझ्या सर्वात आवडत्या सापावर, सापांमधल्या तेंडल्यावर म्हणजे नागराजावर लिहा अशी आग्रहाची विनंती.

जॅक डनियल्स's picture

20 Nov 2013 - 12:13 am | जॅक डनियल्स

हो नक्की लिहीन, मला स्वतःला त्याचा अनुभव नसल्यामुळे लिहायचे टाळत होतो. पण माझा पण आवडता साप असल्यामुळे नक्की टाकीन लेख.

एस's picture

20 Nov 2013 - 12:19 am | एस

धन्यवाद. द्या टाळी!

सुबोध खरे's picture

20 Nov 2013 - 9:41 am | सुबोध खरे

साप बिनविषारी म्हणून बिनधास्तपणे पकडायला जाऊ नये. कारण बिनविषारी साप सुद्धा चावतात आणि ते स्वसंरक्षणासाठी करकचून चावतात. बिनविषारी सापांना दात असतात ते चावण्यासाठी नव्हे तर भक्ष्य तोंडात घट्ट धरता यावे, पळून जाऊ नये यासाठी. शिवाय नाग आणि धामण यातील गल्लत जीवावर बेतू शकते.
मुळात आपण उंदीर तरी हातात पकडतो का? कारण तो पण करकचून चावतो.
मी परत हेच म्हणेन कि साप म्हणू नये धाकला.

एस's picture

20 Nov 2013 - 11:24 pm | एस

सेफ म्हणजे नाही पकडला तरी तिथल्या लोकांना त्यापासून काही धोका नाही अशा अर्थाने म्हणायचे होते मला. बाकी उगाच परिस्थितीची गरज नसताना निसर्गात हस्तक्षेप करू नये हे खरंच आहे.

बाप्पू's picture

20 Nov 2013 - 12:10 am | बाप्पू

नेहमी प्रमाणेच लेख एकदम सुरेख.....पण ही टायर जाळण्यमागचे कारण काय ते नीट
सजले नाही...

जॅक डनियल्स's picture

20 Nov 2013 - 12:14 am | जॅक डनियल्स

लोकांच्या मते, टायर जाळल्यावर धूर होऊन साप गुदमरून बाहेर येतो. पण माझा अनुभव आहे की तो आत अजून बसतो.

खटपट्या's picture

20 Nov 2013 - 2:37 am | खटपट्या

नेहमीप्रमाणे ज-ब-रा

शिल्पा ब's picture

20 Nov 2013 - 5:00 am | शिल्पा ब

लै भारी.

झकास, जेड्स! आणि डोसक्यावर न बसता आपणहून लेख टाकल्याबद्दल आभार!

जॅक डनियल्स's picture

20 Nov 2013 - 5:54 am | जॅक डनियल्स

लेख टाकायचा होता, पण अगदी "जिंकू किंवा मरू" अशी परीक्षा होती. त्यामुळे जरा वेळ झाला.

माहितीपुर्ण लेख. नेहमीसारखाच.

शिद's picture

20 Nov 2013 - 8:02 pm | शिद

असेच म्हणतो. :)

प्रतिविष हा काय प्रकार असतो? म्हणजे जो साप चावलाय त्याच सापच विष असत का?

सुबोध खरे's picture

4 Dec 2013 - 7:46 pm | सुबोध खरे

सापाचे विष हे एक प्रथिनांचे मिश्रण असते. घोणस आणि फुरसे या जातीच्या सापाच्या विषात एक तर्हेची विकरे(enzymes) असतात जी आपल्या उतीच्या मधील संयोजक/बांधक (सिमेंट)ला अक्षरशः वितळवून टाकतात.त्यामुळे आपले स्नायू, रक्तवाहिन्या, सांधे इ ला भोके पडून अंतर्गत रक्तस्त्राव होतो. तसेच नाग आणि मण्यार यांची विषे सुद्धा एक तर्हेची प्रथिने असतात जी आपल्या मेंदूकडे आणि मेंदूकडून येणाऱ्या संदेशवहनात अडथळा आणतात. त्यामुळे शरीराच्या अवयवातून मेंदूकडे संदेश जात नाही आणि मेंदूकडून श्वसन आणि हृदयाला जाणारे संदेश बंद झाल्याने माणूस श्वास घेऊ शकत नाही आणि बेशुद्ध पडून मृत्यू मुखी पडतो. हि प्रथिने अगदी थोड्या प्रमाणात( ज्याने घोड्याला फारशी इजा होणार नाही) घोड्याला टोचतात. घोड्याचे शरीर या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य/ प्रतिपिंड(ANTIBODY) तयार करतात. हळू हळू त्या विषाचे प्रमाण वाढवत नेतात म्हणजे घोड्याच्या शरीरात(रक्तात या प्रतिद्रव्य/ प्रतिपिंड चे प्रमाण वाढू लागते. या नंतर घोड्याचे रक्त काढून त्यातील लाल आणी पांढर्या पेशी रक्तद्रवापासून(प्लास्मा) वेगळ्या काढतात आणी घोड्याला परत करतात. उरलेल्या रक्तद्रवाचे बाष्पीभवन करून तयार झालेले चूर्ण/पूड हि प्रतिविष म्हणून बाटल्यात भरून पाठवले जाते.
जेंव्हा एखाद्या घोड्याला केवळ एकाच तर्हेच्या सापाचे( उ. फक्त नागाचे) विष टोचून प्रतिपिंड तयार करतात त्याला monovalent (एकसंयुजी) प्रतिविष म्हणतात. हे केवळ त्याच जातीच्या सापाच्या विषबाधेवर वापरता येते.
पण जर घोड्याला वेगवेगळ्या जातीच्या सापांची विशे थोड्या थोड्या अंतराने टोचली तर घोडा त्या सर्व सापन्विरुद्ध प्रतिविष तयार करतो. आणी अशा घोड्य़ापासून तयार केलेले प्रतिविष तेवढ्या जातीच्या सापांच्या विषबाधेवर उपयुक्त ठरते.याला polyvalent (बहु संयुजी) प्रतिविष म्हणतात. भारतात नाग, मण्यार, फुरसे आणी घोणस हे चार विषारी साप बहुतेक सर्पविष बाधेस जबाबदार असल्याने भारतात मिळणारी बहु संयुजी सर्प विष प्रतीबंधके हि या चार सापावर उपयुक्त ठरतील अशी असतात.
जेंव्हा रुग्णाला कोणता साप चावला आहे ते माहित नसते किंवा डॉक्टर ला त्याच्या माहितीबद्दल संशय असतो तेंव्हा असे बहु संयुजी प्रतिबंधक वापरले जाते.

प्यारे१'s picture

4 Dec 2013 - 8:06 pm | प्यारे१

>>>भारतात नाग, मण्यार, फुरसे आणी घोणस हे चार विषारी साप बहुतेक सर्पविष बाधेस जबाबदार असल्याने

पकपकपकाक नावाच्या चित्रपटात नाना पाटेकर भारतात सापडणार्‍या विषारी जाती पाच म्हणतो.
टीपिकल नाना स्टाईल.... नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि माणूस!

जॅक डनियल्स's picture

5 Dec 2013 - 12:32 am | जॅक डनियल्स

धन्यवाद् डॉ.!
खूप मस्त आणि सोप्या शब्दात माहिती दिली आहे, मला स्वतःला जास्त प्रतिविष विषयी जास्त शास्त्रीय माहिती नाही, त्यामुळे तुमची माहिती खूप उपयोगी पडते आहे.

धन्यवाद डॉक्टर… ज्ञानात भर पडली आणि मी धाग्याची शंभरी पूर्ण केली. :)

अतिशय सुरेख माहिती. हे थोडफार माहित होतं, पण अस सव्विस्तर सांगितल्याबद्दल धन्यवाद.

मिनेश's picture

20 Nov 2013 - 4:32 pm | मिनेश

>>>> " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते.
हे भारीच.....

विटेकर's picture

20 Nov 2013 - 4:51 pm | विटेकर

दंड्वत स्वीकारावा ..

सुहास झेले's picture

21 Nov 2013 - 12:05 pm | सुहास झेले

भारीच !!!

आता पुढचा भाग वेळेत येऊ दे रे :) :)

राजमुद्रा२१'s picture

21 Nov 2013 - 3:02 pm | राजमुद्रा२१

आईशप्पथ! १ नंबर लेख.

सुकामेवा's picture

21 Nov 2013 - 3:37 pm | सुकामेवा

जॅक,
ति साप पकडायची काठी विकत कठे मिळेल , माझ्या भावाच्या घरी खुप साप निघतात, एक प्राथमिक गरज मह्णुन घ्यायची आहे.

जॅक डनियल्स's picture

21 Nov 2013 - 10:00 pm | जॅक डनियल्स

मला भारतात कुठे मिळेल माहित नाही. माझ्या मते, साप पकडायच्या फंदात पडू नका, बाकी तुमची मर्जी.

आतापर्यंत तीन साप निघाले आहेत, ते पण सर्पमित्रानीच पकडले.

जिन्क्स's picture

21 Nov 2013 - 10:27 pm | जिन्क्स

पुण्यात कोथरुड मध्ये (मॅक डी च्या मागे, करिष्मा) Adventure World नावाचं दुकान आहे. तिथे मिळते तसली काठी.

भटक्य आणि उनाड's picture

21 Nov 2013 - 5:11 pm | भटक्य आणि उनाड

snake skin

भटक्य आणि उनाड's picture

21 Nov 2013 - 5:12 pm | भटक्य आणि उनाड

close up

जॅक डनियल्स's picture

21 Nov 2013 - 9:58 pm | जॅक डनियल्स

सुंदर ! कात आहे.

देखणी आहे धामीण ! चित्तथरारक लेख.