एका गारुड्याची गोष्ट १२: धामण: जुन्या ओळखीचा साप !

जॅक डनियल्स's picture
जॅक डनियल्स in जनातलं, मनातलं
19 Nov 2013 - 10:10 am

एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
एका गारुड्याची गोष्ट ११: फुरसे: कोकणी धसका !

या लेखापासून मी बिनविषारी सापांबद्दल लिहणार आहे. बिनविषारी म्हणजे " ज्या सापांच्या मध्ये विष नसते आणि ते ओपोआप(काही माणसांच्या डोक्यावर केस येतात तसे.. ) तयार पण होत नाही त्यामुळे ते चावले असता प्रतिविष घ्यावे लागत नाही."

ही व्याख्या लक्षात ठेवा कारण, काही लोकांचा प्रश्न असतो की " बिनविषारी साप- वेळ आली की विषारी बनतात का ?" असे फक्त मनुष्यजाती मध्येच घडू शकते. आपणच नवीन-नवीन विष निर्माण करायला आपण विज्ञानाचा आधार घेतो, आणि मग सिरीया मध्ये सिरीन वापरला जातो.

बिनविषारी साप निसर्गतःच बिनविषारी (कम्प्लीट बेज !) असल्यामुळे त्यांना अन्न मिळवायला दुसऱ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. चपळ असलेले साप भक्षाच्या मागे लागून त्याची मुंडी पिरगाळून ढेकर देतात तर काही अवाढव्य साप (अजगर-अनाकोंडा) आर्मीतल्या स्नायपर सारखे ८-८ दिवस गवतात लपून राहून शिकार करतात. हा अनाकोंडाचा व्हिडीओ बघा-अनाकोंडाची शिकार !

मी सगळ्या पक्ष्यांचा राजा हा "कावळा" (मोर हा मिस्टर वर्ल्ड आहे, राजा नाही !) मानतो तसा माझ्यासाठी या बिनविषारी सापांचा राजा "धामण" !

धामण (बिनविषारी): हा म्हणजे आर.के. लक्ष्मणच्या कॉमन-म्यान सारखा कॉमन-साप आहे.

याचा वावर म्हणजे, माझ्या सिंहगड-कॉलेजच्या होस्टेलच्या मित्रांसारखा जिकडे खाणे (आणि पोरी) तिकडे, वडगाव-आनंदनगरच्या (चरवड, जगतापांच्या इ.) शेतजमिनी, सहकारनगरमधील बंगल्याच्या बागा, बिल्डींगच्या पार्किंगच्या जागा, येमेसिबी चे ट्रान्सफोर्मारच्या बाजूचे खड्डे, टेकडी वरच्या वस्त्यांमधली भुसभुशीत घरे, मार्केटयार्ड मधली धान्याची कोठारे इ.
सिंहगडकॉलेजच्या मुलींच्या होस्टेल मध्ये घुसलेल्या धामणीला मी एका रात्री पकडले होते, मला असे रात्री होस्टेल मध्ये बघून माझी एक मैत्रीण बेशुद्ध पडायची बाकी होती ;)

चांगला संटा ६-८ फुट वाढणारा हा साप आहे. पूर्वीच्याकाळी ४ -४ किलोचा कोबीचा गड्डा पहिला आहे, त्याच चालीवर आम्ही पूर्वी खडकवासल्याला ९-१० फुटी धामणी धरल्या आहेत, असे अनेक जुने सर्पतज्ञ म्हणतात. चकचकीत पिवळा रंग त्यावर काळे पट्टे आणि हाताएवढी जाडी असे सर्वसाधारण वर्णन. पण विष नसल्यामुळे चपळता आणि निसर्गात लपायची क्षमता यावरच सगळे अवलंबून असते. त्यामुळे या पिवळ्या रंगाच्या छटा सापाच्या वावरण्याच्या जागेप्रमाणे बदलत जातात. पुण्यात पिवळा, हिरवट-पिवळा, मातेरी, शेवाळी, राखाडी, काळपट तांबूस इ. असे अनेक रंग सापडतात. निसर्गाला रंगांच्या बाबतीत कोणीच हरवू शकत नाही, अगदी पेठ्तली साड्यांची दुकाने पण नाही ....

धामण बघा कशी ग्लॉसी फिनिश मारून बसली आहे.

धामण

धामण १

धामणीची चपळता म्हणजे "मिल्खा सिंग" सारखी, धामणीला पकडताना मी अनेक वेळा जॉनटी र्होड्स सारखी उडी मारली आहे. बिनविषारी साप असल्यामुळे नुसत्या हाताने पकडायचा, हे आमचे सर्पोद्यानचे तत्व. त्यामुळे धामण दिसली की "टाक हात आणि पकड" असे मी काम चालायचे पण याच्या चपळतेमुळे या सापाने मला पासपोर्ट-विसा पेक्षा जास्त पळवले आहे.

एक वेळ कोंबडी पकडणे सोपे, कारण तिच्या वर उडी मारली तर पिसे तरी हातात येतात. (प्रयत्न करून झाले आहेत, त्यामुळे प्रश्न नको !) त्यामुळे वेट-लॉस प्रोग्राम मध्ये धामण सामाविष्ट्य करायला हरकत नाही, मैदानातील धामण ४-५ वेळा पकडून वजन घटवा !

कॉलवरची धामण तर अजूनच वेगळी, घुशीच्या बिळात धामण असेल तर उन्हातानात अंगमेहनत करून कुदळ-फावडे घेऊन ती बिळे खोदायला लागायची. घुशीची बिळे ही एकमेकाना जोडलेली असतात,त्यामुळे एक बीळ खोदून उपयोग नसतो. कधी कधी धामण अर्धी बाहेर असेल तर तिची शेपटी एका हाताने पकडून दुसऱ्या हाताने बीळ खोदायला लागायचे. पटांगणात असलेला साप लोकांनी उचकवला म्हणून खूप वेळा बिळात जाऊन बसायचा आणि मग ते १० मिनिटाचे काम लोकांच्या चुकीमुळे ३-४ तासाचे होऊन बसायचे.(भाग ४) नट मध्ये जसा बोल्ट हळू हळू घट्ट होत जातो, तशी बिळातली धामण हळू-हळू घट्ट होत जायची आणि मग पतंग काटताना जसे हळू हळू ढील देऊन मग एकदम खेचायचा असतो तोच प्रकार इकडे करायला लागायचा.

मिपाकर आदुबाळ आणि अजून एक माझा मित्र (चिन्मय) यांना घेऊन मी अशीच एक अर्धी बिळात असलेली धामण पकडली होती,साधारण पणे मी कोणाला कॉल ला घेऊन जात नसे पण त्यावेळी पर्याय नव्हता.(पाणीपुरीच्या प्लेट वरून उठवून साप पकडायला घेऊन गेलो गेलो म्हणून आदुबाळ अजून शिव्या घालतो मला.) ५०-६० लोकं जनता वसाहती मध्ये (पार्वती पायथा)त्या धामणीच्या आजूबाजूला कोंडाळ करून उभे होते, मी एका हाताने धामण पकडून दुसऱ्या हाताने खोदत होतो,हे साधारण १५-२० मिनिटे चालू होते, ती धामण बिळात लॉक करून बसली होती...... शेपटी पकडून, माझे खोदणे आणि ढील देणे चालूच होते,इतक्यात ती ७-८ फुटी धामण बाहेर निघाली,आणि कबुतरे उडून जातात तसे माझ्या बाजूचे लोकं सैरावैरा पळून गेले. मी तिला शांतपणे पोत्यात घातली आणि (पाणी पुरी खाण्यासाठी )घरचा रस्ता पकडला.

सगळ्यात जास्त कॉलवर सापडणारा साप असे मी या सापाचे वर्णन करीन, चिमण्या जश्या मनुष्यवस्तीच्या जवळपास घरे करून राहतात तसाच हा साप मनुष्यवस्ती मधेच राहतो. बिनविषारी असला तरी या ७-८ फुटी सापाला कॉल वर पकडणे सोपे कधीच नव्हते, कारण म्हणजे त्यांची चपळता आणि अंगावर उसळण्याची क्षमता ! सापाच्या चाव्याला मी कधीच भीत नाही पण पब्लिक मध्ये बिनविषारी साप चावला तरी खूप जास्त अंधश्रध्दा पसरते याची मला जाणीव होती. म्हणून फुकटचे सापांबरोबर खेळ करायला जायचो नाही आणि "क्षणार्धात साप पोत्यात !" विषारी सापांचा नियम इकडे पण पाळायचो.

पिवळीधम्मक धामण.

धामण ३

२००५ चा मे महिना, इंजिनियरींगची पीएल (अभ्यासासाठी सुट्टी)संपायला आली होती,आठवड्याने पहिला पेपर होता. तळजाई वरच्या वस्ती वरून सकाळी १० च्या सुमाराला कॉल आला, "घरात काळा मोठा नाग निघाला आहे." मी तडक पोहचलो, वस्तीमध्ये २० बाय २० ची टेकडीच्या उतारावरची खोली, त्यामध्ये किचन, बेडरूम, लिविंग रूम, मास्टर बेडरूम, आणि छोटी मोरी ! घराचा मालक गवंडी आणि मालकीण मजूर, त्यांची ३-४ चार चिल्लीपिल्ली असे (छोटे) सुखी कुटुंब बाहेर उभे होते.

बाजूच्या घराच्या मुलीने सकाळी या खोलीत काळा मोठा साप पहिला आणि चक्कर येऊन पडली. माझ्या डोक्यातली गणिते, निष्कर्षाची सुई नाग किंवा धामणी कडे वळवत होती. मागच्याच आठवड्या मध्ये याच वस्तीच्या वरच्या भागातला पकडलेल्या नागाची आठवण अजून डोक्यात ताजी होती.

मी हळू हळू सामान हलवायला सुरुवात केली,लोखंडी पलंग हलवला तर खाली घुशीची आख्खी अपार्टमेंट स्कीम होती. घुशींची बिळे म्हणजे "बायकांचे मन", इथे थांगपत्ता या शब्दाला अर्थच नाही. ते खोदण्यात काही उपयोग नव्हता, कारण ते बीळ वरच्या घराचे बेसमेंट होते. "साप पळून गेला असेल, दिसला तर कॉल करा” असे सांगून मी कल्टी मारली.

घरी पोचून थोडे इंजीनेरारिंग डोक्यात भरत असताना परत १२ ला कॉल आला-“ साप परत दिसला !” मग मात्र या कॉल ला मी चान्स घेतला नाही, चील्लीपिल्लींचा विचार करून हळूहळू करत सगळे समान बाहेर काढले, त्या वस्तीच्या रस्त्यावर त्यांचा संसार आला. आत्ता खोली मध्ये ते बीळ आणि नवीन बांधलेली मोरी राहिली होती. ते बीळ पण थोडे खोदले, सापाचे नख पण दिसले नाही (सापाला नखे नसतात, वाक्यप्रचार वापरला आहे !)

घर मालकाची इच्छा होती की त्या बिळात सायकल चे टायर जाळावे, त्याला विरोध करून पहिला पण काही उपयोग झाला नाही, मग शेवटी टायर जाळले. अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे, “मी रस्त्यावर बसलो आहे, माझ्या आजूबाजूला ती चिल्लीपिल्ली खेळत आहेत, आणि तो मालक आणि मालकीण स्वतःच्या घरातून उठणाऱ्या काळ्या धुराकडे बघत आहेत.....!

अर्ध्या तासाने टायर संपल्यावर घरात पहिले, माझ्या अंदाजानुसार साप काही मिळालाच नाही. मग हताश होऊन परत ३ ला घरी परतलो. दोन घास पोटात टाकले, आणि परत “कॉल”, ताट तसेच सरकवून, आईचा ओरडा खाऊन मी तळजाई पठारावर पोहचलो.

सगळे लोकं आणि समान अजून बाहेरच होते. मी पोहोचायच्या आधी त्याच बिळातूनच सापाने परत डोके काढले होते, यावरून तिथे मला “ हे बीळ पुढे संपते आहे” ही घुशीच्या मुन्सीपालटीचा बोर्ड मला दिसला. पण बीळ खोदून पण उपयोग नव्हता-घर खाली आले असते, आणि बीळ तसे सोडून पण उपयोग नव्हता ! आता, सगळ्या वस्तीचे डोळे माझ्या कडे लागले होते, शेवटची ओवर खेळताना तेंडल्यावर किती दडपण असेल हे मी अनुभवत होतो.

शेवटी मग “ मी साप असतो तर बीळ जळत असताना काय केले असते ?", असे सारासार विचार मी केला. ट्यूब पेटली- खोलीतली थंड जागा म्हणजे “मोरी”, घर मालकाची परवानगी घेऊन नवीन मोरी खोदली. २ फुट बाय २ फुट फरशी खाली, ८ फुटी धामण वेटोळे मारून बसली होती. शेवटी ५ वाजता धामणीला पोत्यात घातल्यावर त्या घरमालकाने माझ्या पायावर लोळण घेतली, घर मालकीण रडायला लागली...."कुठल्या देवाने सांगावा धाडला तुला ? पांग फेडलस पोरा, काळूबाई तुझे भले करो !" अश्याच अनेक वाक्यांनी पिच्चर शेवट गोड झाला.

पुढचा भाग धामण...क्रमशः !

सगळे फोटो हे आंतरजालावरचे आहेत आणि त्यांना कुठल्याही पद्धतीने पण बदलले नाही.

समाजजीवनमानशिक्षणलेखअनुभव

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

22 Nov 2013 - 7:56 pm | कपिलमुनी

सर्वच साप कात टाकतात ?
की काही खास व्हीआयपीना ही सोय आहे?

जॅक डनियल्स's picture

23 Nov 2013 - 4:14 am | जॅक डनियल्स

सर्वच साप कात टाकतात, ती निसर्गाने दिलेली त्यांना देणगी आहे. सरपटणारे प्राणी असल्यामुळे अंगावरची कातडी मध्ये काही अडकून किंवा त्याला काही संसर्ग होऊन जीवास त्रास होऊ नये म्हणून ही देणगी दिली असावी.

सुबोध खरे's picture

5 Dec 2013 - 9:57 am | सुबोध खरे

सापाची कातडी(त्वचा) हि अतिशय लवचिक असते.साप त्वचेवरच सरपटत असल्याने या लवचिकतेची आवश्यकता असतेच . सततच्या वापरण्याने या त्वचेचा लवचिकपणा कमी होतो. त्वचेची ताणले जाण्याची क्षमता परीसीमेला पोहोचली कि त्वचा त्याहून अधिक ताणली जाऊ शकत नाही. फार ताणला गेलेला मोजा जसा ढिला किंवा लेचापेचा होतो तशीच या जुन्या त्वचेची गत होते. मानवी त्वचे सारखी ती सूक्ष्म प्रमाणात झडून जाऊन नवीन त्वचा येत नाही तर आतमध्ये संपूर्ण नवी त्वचा आलेली असते. त्यामुळे साप जुन्या त्वचेला डोक्याजवळ घासून एक भोक पाडतो आणि त्या भोकातून एखाद्या बिळातून बाहेर पडल्यासारखा बाहेर पडतो. त्यामुळे एखादे वेळेस आपल्याला डोक्यापासून शेपटी पर्यंत अक्खी कात दिसते.
तसेच सापाची वाढ झाल्याने त्याचे अंग आतमध्ये आखडले जाते.त्यामुळे पिल्लाची वाढ होत असताना त्याला जास्त वेळा कात टाकावी लागते. आणि पूर्ण वाढ झालेला साप कमी वेळा कात टाकतो.
पहा MOULTING -http://en.wikipedia.org/wiki/Moulting
जुनि त्वचा टाकून देण्याच्या अगोदर त्याची लवचिकत कमी झाल्याने साप मंदगती होतो आणी निस्तेज व अनाकर्षक दिसतो. आणी तेच कात टाकल्याने तो चपळ तजेलदार आणी चमकदार दिसतो. म्हणूनच मराठीत एखाद्या गोष्टीचा काया पालट झाला असे आपण म्हणतो किंवा त्याने कात टाकली म्हणतो.

अभिजा's picture

23 Nov 2013 - 10:54 am | अभिजा

नेहमीप्रमाणेच छान लेख! पुढील भागाची वाट पाहतो. धामण आणि नाग यांतील फरक कसा ओळखावा, ही माहिती अपेक्षित आहे. धन्यवाद!

पैसा's picture

23 Nov 2013 - 2:29 pm | पैसा

अगदी देखण्या सापाची तेवढीच देखणी ओळख!

मदनबाण's picture

24 Nov 2013 - 10:10 am | मदनबाण

झकास ! :)

निमविषारी साप पण असतात का?

http://www.loksatta.com/vruthanta-news/new-snake-in-sanjay-gandhi-nation...

या लेखात मांजर्‍या हा साप निमविषारी असल्याचा उल्लेख आहे म्हणून

सुबोध खरे's picture

4 Dec 2013 - 9:15 pm | सुबोध खरे

निम विषारी साप म्हणजे जे चावल्यामुळे चावलेल्या भागाला सूज वगैरे येते पण त्यामुळे माणूस मरत नाही. त्यामुळे अशा सापाच्या चावल्यानंतर त्या रुग्णाला रुग्णालयात देखरेखीसाठी चोवीस तास पर्यंत ठेवतात आणी विषबाधेची कोणतीही लक्षणे कमी झाली कि औषधोपचार करून घरी पाठवले जाते.

नॉन रेसिडेन्षियल मराठी's picture

29 Nov 2013 - 3:47 pm | नॉन रेसिडेन्षिय...

खुप सुन्दर अनि म्हत्वपुर्न लिहितओस तु मित्रा.

चिगो's picture

29 Nov 2013 - 10:26 pm | चिगो

कं लिवतंस? कं लिवतंस.. जेडि, मानलं राजा तुला..

रुस्तम's picture

30 Nov 2013 - 7:42 am | रुस्तम

पु. भा. प्र.................

एखादा विषारी साप दुसर्‍या विषारी सापाला चावल्यावर काय होईल? जसे नाग मण्यारीला चावला किंवा एक नाग दुसर्‍या नागाला?

अनन्त अवधुत's picture

5 Dec 2013 - 6:10 am | अनन्त अवधुत

मी या विषयातला तज्ञ नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक सापांवर त्यांच्या स्वत:च्या विषाचे परिणाम होत नाही. म्हणजे जर सापाने स्वत:ची जीभ चावली तर तो मरणार नाही. एक नाग दुसर्या नागाला चावला तर तो मरणार नाही
तसेच जे साप दुसर्या सापाला खातात त्यांच्या वर पण भक्ष्याच्या विषाचा परिणाम होत नाही. म्हणजे नागराजावर धामीणच्या/ मण्यारच्या विषाचा परिणाम होत नाही.
अर्थात चावणार्या सापाचे दात आणि दुसर्या सापाच्या शरीरात सोडल्या गेलेली विषाची मात्रा याचा पण विचार करावा लागेल. म्हणजे अजगर फुराशाला चावला तर फुरस जखमी होऊन मरेल. आणि फुरस्याने जर जास्त प्रमाणात विष अजगरात सोडले तर अजगर पण मरेल.
एकाच भागामध्ये राहणाऱ्या सापांवर एकमेकांच्या विषाचा परिणाम होत नाही उदा. मण्यार आणि घोणस. दोन वेगवेगळ्या भूभागात राहणाऱ्या सापांच्या विषाचा परिणाम मात्र एकमेकांवर होतो म्हणजे मंबा साप जर नागराजावर सोडला तर शक्यता आहे कि दोघेही मरतील.
परत एकवार, मी या विषयातला तज्ञ नाही.
मिपावर नवीन आहे. चुकल-माकल असेल तर धाकल म्हणून सोडून द्या.

जॅक डनियल्स's picture

5 Dec 2013 - 9:48 am | जॅक डनियल्स

परत एकवार, मी या विषयातला तज्ञ नाही.

माझी तुम्हाला एकच विनंती आहे की जर १००% खात्री नसेल तर चुकीची माहिती देऊ नका, हा असा विषय आहे की अंधश्रध्दा पसरायला वेळ लागत नाही.

सापाच्या त्याच्या विषाचा परिणाम या वरती मी आधीच्या लेखांच्या प्रतिसादामध्ये सखोल माहिती दिली होती, म्हणून परत उत्तर देणे टाळत होतो.
पण एक "विषारी" साप जर दुसऱ्या कुठल्या पण सापाला चावला तर त्याचा परिणाम होतो.
फक्त तो परिणाम विषाची मात्रा, जहालता, चाव्याची जागा इ. वरती अवलंबून असतो. म्हणजे जर मण्यार(विषारी) जर नागाला(विषारी ) चावली तर नाग मारतो. खूप वेळा मण्यार नागाला खाते पण, सोपे खाद्य म्हणून मण्यार जास्त करून बिनविषारी सापांना (धामण, पाण साप इ.) यांना खाते. मंबा हा साप "नागाच्या" कुटुंबातील आहे (Elapidae), त्यामुळे मी एका लेखात लिहिल्याप्रमाणे त्यांच्या विषामध्ये साधारण सारखेच घटक असतात, त्या वर भूभागाचा काही संबध नाही.

सुबोध खरे's picture

5 Dec 2013 - 10:11 am | सुबोध खरे

सापाच्या विषाचा स्वजातीय सापावर परिणाम होतोच. नागराज हा त्याच्या क्षेत्रात राहणाऱ्या मादीने जर दुसर्या नागराजाशी संबंध ठेवला आणी गरोदर झाली तर तिला चावून तिचा जीव घेतो आणी काही वेळा खाऊन सुद्धा टाकतो.
सापाचे विष हे पाचक रस असते आणी कोणताही पाचक रस हा त्याच्या संपर्कात येणाऱ्या अवयवाचे पचन करणारच
त्यामुळे मानवी स्वादुपिंडाला जर सूज आली(ACUTE PANCREATITIS) तर आपल्या स्वादुपिंडातील पाचक रस स्वादुपिंड फुटून बाहेर पडतात आपल्याच पोटातील अवयव अक्षरशः विरघळवून टाकतात. हा आजार अतिशय गंभीर आहे आणी प्राणघातक पण ठरणारा आहे हा प्रकार दारू पिणार्यात किंवा पित्ताशयात खडे असणार्या लोकात जास्त आढळतो.
या नात्याने सापाला स्वतःचे विष सुद्धा बाधते. एवढेच आहे कि साप चुकून स्वतःला चावला तर तो विष सोडत नाही. विष सोडणे हि एक क्रियाशील (ACTIVE) प्रक्रिया आहे. विष आपोआप सुटत नाही.
साप आत्महत्या करत नसावेत( स्वतःच स्वतःला चावून) असे मला वाटते.

जे. डी. आणि डॉ. साहेब माहिती साठी खुप आभार!

अनन्त अवधुत's picture

6 Dec 2013 - 4:32 am | अनन्त अवधुत

डॉ. साहेब माहिती साठी खुप आभार.

अनन्त अवधुत's picture

6 Dec 2013 - 4:31 am | अनन्त अवधुत

जे. डी. साहेब माहिती साठी खुप आभार! माझ्याकडे जी माहिती होती ती मी दिली,त्या विषयातला तज्ञ नसल्याने मी तसे सुद्धा सांगितले. यापुढे मी अधिक काळजी घेईल.

अगदी हाच प्रश्न मला सारखा पडतो...