एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
आधीच्या भागात मी नागाबद्दल माहिती दिली, नाग म्हणजे सर्पसृष्टी मधला हृतिक असेल तर मण्यार म्हणजे पिउष मिश्रा ! “अरे रुख जारे रे बंदे” म्हणत जसा पियुष मिश्रा पडद्यामागून येऊन मनात घुसतो, तशीच ही मण्यार रात्रीच्या अंधारात येऊन जहाल डसते.
मण्यार (अति बेक्कार विषारी):
महाराष्ट्रात या सापाच्या दोन जाती सापडतात, एक साधी मण्यार (common krait) आणि पट्टेवाली मण्यार (Banded krait). साधी मण्यार (४-५ फुट ) ही साधारण करून पुण्यात सापडते. तिचा चकचकीत काळ्या लेदर बुटासारखा रंग असतो, त्यावर निळ्या रंगाची छटा असते आणि अंगावर मोहक वेलबुट्टी काढावी तसे पांढरे पट्टे असतात.
दिवस मावळला की या पडद्यामागच्या कलाकाराचे काम चालू होते, सगळी शिकार ही रात्री साधली जाते.
शास्त्रीय भाषेत या सापाचे वर्णन “लाजरा –बुजरा” साप असे केले जाते. पण माझ्या मते “कधी येउनिया जावे आणि (विषारी) दात लावूनिया जावे” असे मी त्याचे वर्णन करीन. मार्केटयार्ड मधल्या धान्याच्या गोदामात तिकडच्या मजुरांबरोबर राहील, आणि उंदीर-घुशीच्या पिढ्यान्पिढ्यांची वाट लावेल पण कोणाला डसणार नाही. सगळे काम मोसाद च्या एजंट सारखे, “वन शॉट, (उंदराची) बॉडी ताठ”.
ही आहे साधी मण्यार !
पण अभियांत्रिकीच्या व्हायवा च्या परीक्षकासारखे कधी या मण्यारीचे डोके सटकेल सांगता येत नाही. “आता माझी सटकली” म्हणत ती दंश करायला लागली की संपले सगळेच, शेतकऱ्याचे पूर्ण कुटुंब जमिनीवर झोपलेले आहे, आणि मण्यार घरात आली आणि काही कारण नसताना सगळ्या कुटुंबाला दंश करून गेली, कोणाचे हा-की-चू-नाही...आणि काम तमाम.
पर्वतीच्या जनता वसाहती मधून सकाळी ६:३० वाजता एक कॉल आला, मी आपला नेहमी सारखा टेकडी ओलांडून पाण्याच्या टाकीच्या बाजूने वसाहती मध्ये घुसलो. घराच्या बाहेर बेक्कार मोठी गर्दी, त्यात ४-५ बायका छातीपिटून रडत होत्या, मला आधी वाटले कोणी तरी माझा “बकरा” बनवला. पण तरी पण धीर करून त्या गर्दीत घुसलो. समोरचे दृश्य बघून फ्ल्याशब्याक माझ्या डोळ्या समोर आला, “हा तळीराम रात्री पहिल्या धारेची लावून आला असेल, आणि खोलीत जावून नेमका मण्यारी वरच बहुतेक पडला असेल, “मिशन काश्मीर मध्ये त्या अंधाऱ्या खोलीत जश्या गोळ्या चालतात” तसाच हल्ला त्या मण्यारने केला असेल. (त्याला पोटावर, आणि पाठीवर दंश होते.) श्वास असे पर्यंत थोडी झटपट पण केली असेल, पण “बेवडाच तो -आवाज करणारच”, यामुळे शेजाऱ्यांनी पण दुर्लक्ष केले असेल.” मी त्या घरात शोधले तर कॉट खालीच घुशीचे बीळ होते, खूप उकरून पहिले पण सगळी बिळे जोडली असल्यामुळे ती मण्यार पसार झाली होती.
जरा वेगळ्या शेड मधली चकचकीत काळी मण्यार.
मण्यारीचे विष हे नागाप्रमाणे मज्जासंस्थे वर हल्ला करते, म्हणजे मेंदुमधून जे आपले शरीर कार्यरत राहायला संदेशवहन चालते ते गंडवते. थोडक्यात म्हणजे जीमेल मध्ये असा व्हायरस टाकायचा की हळू हळू एक पण इमेल आपल्याला मिळणार नाही आणि शेवटी खाते बंद पडेल. मण्यार चावल्यावर, सुरवातीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, मग हळू हळू ऐक-ऐक क्रिया बंद पडत, कार्डियाक अरेस्ट होऊन माणूस दगावतो.(भाग ५)
पण हे विष नागाच्या विषापेक्षा जास्त (~८ पट) जहाल असते, म्हणजे नागाचे विष “रेड वाईन” (~२५ प्रुफ) असेल तर “मण्यारीचे विष पहिल्या धारेची मोसंबी (२०० प्रुफ) असते. निसर्गाने या विषाची जहालता वाढवली आहे, याचे मुख्य कारण म्हणजे मण्यार रात्री शिकार करते, त्यामुळे कमीत कमी वेळात आणि तिच्या कक्षेत भक्ष टपकले पाहिजे. तसेच तिच्या खाण्यात इतर चपळ साप पण असतात, त्यामुळे “एका झटक्यात” कायमचा इलाज गरजेचा असतो. ( मण्यारीचे मुख्य भक्ष: उंदीर, पाली, सरडे, आणि साप इ.)
मण्यारीचे विष दंत छोटे असतात, त्यामुळे हे जहाल विष मोठ्या माणसाच्या शरीरात पसरायला वेळ लागतो, त्यामुळे “किडा मुंगी” चावली असेल, असे म्हणून रात्री दुर्लक्ष केले जाते, आणि जेंव्हा समजते तेंव्हा “अर्ध्या गोवऱ्या स्मशानात गेलेल्या असतात. त्यामुळे अजूनही प्रतिविष उपलब्ध असून माणूस दगावण्याचे प्रमाण ५०% आहे. व्हियेतनामच्या युद्धात अमेरिकेन सैनिक मण्यारीला “५ स्टेप स्नेक” म्हणायचे, मण्यार ने शॉट दिला की ५ पावलात मृत्यू. (वेट लॉस इन ३० डेज च्या चालीवर !)
मण्यारीची न्याहारी मोठा बेडूक.
आधी लिहल्या प्रमाणे, हा मण्यार हा डे-नाईट म्याचचा खेळाडू आहे, त्यामुळे दिवसा तो जरा आळसावलेला असतो. पण एकदा का फ्लड लाईट लागले की क्रिस गेलच्या बापाला पण ऐकत नाही. रात्री कॉल वर साप पकडताना मला मण्यार पकडताना खूप काळजी घ्यावी लागायची. “आपण सापाला डिवचल्याशिवाय साप कधी चावत नाही! ” या सर्पनियमाला हा साप म्हणजे अपवाद आहे. शेवटी जशी “कहानी” मधली शांत-सोज्वळ विद्या बालन उसळते (आणि मिलन दामजीला ढगात पोहोचवते !), तशीच शांत बसलेली मण्यार, काही आवाज न करता झटक्यात अंगावर आलेली मी अनुभवली आहे.
ज्यांनी कोणी विकास मनोहरांचे “नेगल” वाचले आहे त्यांना पट्टेरी मण्यार माहित असेल. ती साधरण दाट गडचिरोली, गोवा, दंडेली च्या दाट जंगलात सापडते (त्यामुळे माझा कधी संबध आला नाही.) ती खूप शांत असते, त्यामुळे गारुड्या कडे पण बघायला मिळू शकते. काळ्या-पिवळ्या रंगाचे सुंदर पट्टे असलेली ही मण्यार “आर्थर कानोन डायलला ” पण भुरळ टाकून गेली. त्यांनी शेरलॉक होम्सच्या “The Adventure of the Speckled Band” या गोष्टी मधून तिला सेलीब्रिटी बनवले. ज्या नियमाने जगण्यासाठी "सेम जॉब प्रोफाईलला" न्युयोर्क सारख्या (खर्चिक) शहरात पगार जास्त मिळतो, त्याच नैसर्गिक नियमाने जंगलात राहणाऱ्या पट्टेरी मण्यारीला आकाराने मोठी आणि चपळ भक्ष मारण्यासाठी साध्या मण्यारीपेक्षा जास्त जहाल विष निसर्गाने दिले आहे. पण जंगलात राहत असल्याने यांचा संबध फक्त आदिवासी किंवा सर्प संशोधकांशी येतो.
२००१ साली “जो स्लोवेन्स्क्की” नावाचा अमेरिकन सर्पसंशोधक म्यानमार मध्ये सापांवर संशोधन करत होता. एका पावसाळी रात्री, त्याला पट्टेरी मण्यारीचा दंश झाला. दाट जंगलात, वादळी हवामानात त्याला वैदकीय मदत मिळाली नाही, आणि त्याने सर्पसृष्टी साठी प्राण सोडला.
हीच ती शेरलॉक होम्स ची पट्टेरी मण्यार.
साधरणपणे मण्यारीचे कॉल माझ्या भागात कमी यायचे पण जे यायचे त्याला मी "झेड-लेव्हलची" काळजी घ्यायचो. “कमीत कमी वेळात साप पिशवीत गेला पाहिजे, सापाला दोन पिशव्यात प्याक करायचे, स्टिक शिवाय सापाला हात लावायचा नाही”. हे सगळे नियम कसोशीने पाळायचो. पुण्यासारख्या शहरात लोकं जास्ती करून वरती झोपत असल्याने, आणि हा साप जास्ती करून रात्री निघत असल्याने नागाच्या तुलनेत मण्यारीने होणारे दंशाचे प्रमाण कमी आहे.
पावसाळ्यात कोथळीगडावरच्या गुहेमध्ये आमच्या ट्रेक ग्रुप चा मुक्काम होता. साधारण करून आम्ही मेणबत्त्या घेऊन जायचो पण त्या वेळी विसरलो होतो, म्हणून बाजूच्या गुहेतून उदबत्त्या आणून त्याच्या प्रकाशात आम्ही गप्पा टाकल्या, बाहेर पाऊस “मी” म्हणत होता.
गुहा तश्या सेफ होत्या, आत मधल्या गुहेत थोडी वटवाघुळे होती, पण संध्याकाळीच ती डिनर साठी बाहेर उडून गेली होती. तसेच बाहेरच्या बाजूला दीड एक फुटाचा चौथरा होता, त्या वरतीच आम्ही आमचे बूट काढून ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी न्यायचा कचरा जमा करून (प्लास्टिक च्या पिशवीत) ठेवला होता. गुहेची बाहेरची पोकळी दगड लावून बंद केलीली होती. सगळ्यांचे डोळे मिटायला लागले तसे आम्ही पथाऱ्या टाकल्या, गारुडी असल्यामुळे बाहेरच्या बाजूला झोपलो. आमच्या एका मित्राचे आणि उंदरांचे बेक्कार वाकडे आहे, म्हणून तो झोपल्या-झोपल्या उंदराची आई-माई काढत होता, त्याच्या तालावरच मला झोप लागली.
२-३ च्या सुमाराला, एक मित्र ओरडला, “अरे साप”, मी कसाबसा चष्मा लावून पहिले, तर आमच्या पासून ३-४ फुटावर चौथऱ्यावर एक चकचकीत काळी मण्यार होती. सगळ्या मित्रांना ओरडून बाजूला केले, कोणालाच तो साप कुठला आहे हे माहित नव्हते, त्यामुळे साक्षात “काळ” समोर असूनही सगळे निवांत होते.
माझ्या कडे स्नेकस्टिक पण नव्हती, आणि शेकोटीच्या काडीने ती ४-५ फुटी संटी मण्यार पकडणे म्हणजे “राम नाम सत्य” याची मला पूर्ण पणे जाणीव होती. मी सगळ्यांना आधी दूर हालवले, आणि एका टोर्च च्या मंद प्रकाशात स्वतः चे अन्द्रेलीन काबूत ठेवत तिचे निरक्षण करू लागलो. रात्री आपण उठून जसे किचन मधले डबे झांबलतो, तशी ती निवांत दगडातल्या खोबण्या झांबलत होती. ती गुहा म्हणजे तिचे ‘अपना बाजार” होते, उंदीर आणि त्यांना खायला येणारे इतर साप, फुल दावत ! पुढचे ४ तास, उजाडे पर्यंत मी तिचे निरक्षण करत होतो, चौथऱ्यावरून ती जर खाली उतरली असती तर तिला पकडणे सोडा, मारणे पण शक्य झाले नसते. माझ्यातला गारुडी हा तिचा आदर करत असल्याचे तिला बहुतेक समजले असावे, ती आली तशी दगडात गायब झाली. नंतर मला एकट्यालाच नंतर शांत पणे झोप लागली.... ही एक माझ्या जीवनातील एक यशस्वी माघार होती.
पुढच्या लेखात घोणस आणि फुरसे...
(या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
प्रतिक्रिया
3 Oct 2013 - 6:36 am | निनाद मुक्काम प...
एक विचारायचे राहिले ह्या विषारी सापांचा असा असा खून करण्यासाठी वापर फक्त शेरलोक होम्स च्या कथेत झाला आहे का वास्तविक जीवनात सुद्धा असे प्रकार घडले आहेत
3 Oct 2013 - 10:52 am | पिशी अबोली
संसदेत सोडला तर????
3 Oct 2013 - 11:35 am | विश्वनाथ मेहेंदळे
मण्यार मरेल, चुकून चावली कुणाला तर
3 Oct 2013 - 1:56 pm | मुक्त विहारि
ह ह पु
4 Oct 2013 - 5:41 am | जॅक डनियल्स
२०११ मध्ये एका लखनौ च्या गारुड्याने TAX ऑफिस मध्ये त्याला लाच मागितली आणि जमिनीचे काम अडकवून ठेवले म्हणून नाग सोडून दिले होते. तिकडच्या लोकांची फार वाट लागली होती...ऑफिस मध्ये नाग सोडताना गारुडी .
आता हे किती बरोबर का चूक ते मला माहित नाही, पण बिकट परिस्थितीचा परिणाम असावा.
3 Oct 2013 - 11:21 am | सुबोध खरे
तेथील सन्माननीय सदस्यांचे वर्तन पाहून साप भीतीने आत्महत्या करण्याची शक्यता आहे
3 Oct 2013 - 12:11 pm | गवि
उत्तम.
बँडेड क्रेट असा जिचा उल्लेख आहे तिला आगीमण्यार म्हणतात असं मला वाटतं. पिवळ्या रंगाचे सुस्पष्ट पट्टे असतात.
http://thebutterflydiaries.wordpress.com/ येथून साभार संदर्भ.
कॉमन क्रेट, नेहमीची मण्यार मात्र कोंकणात असंख्य वेळा घरात आणि आवारात निघालेली आणि दोनदा घरच्यांना चावलेलीही आहे.
मांजराविषयी पैसाताईप्रमाणेच म्हणतो. मांजरांना सापाशी खेळण्याची आणि मारण्याची भयंकर हौस असावी. सापाला मारण्याच्या प्रकारात रक्त लागलेले मांजराचे तोंड पाहून काही दिवस तरी तिला मांडीवर घेऊन कुरवाळण्याची इच्छा मरत असे.
साप हा निसर्गोपयोगी प्राणी, अन्नसाखळीतला एक घटक, समतोल राहण्यासाठी आवश्यक, उंदरांचा शत्रू आणि शेतकर्यांना उपयोगी अशा सर्व कारणांनी त्याला न मारणे आणि शक्यतो वाचवणे याला माझा पाठिंबा आहे. पण अगदी अनेक साप हातात पकडून, कॉलेजात स्नेक अवेअरनेस शो करुनही, माझ्या मनात सापाविषयी इतर प्राण्यांप्रमाणे कोणताही आवडणारा, मैत्रीपूर्ण इ इ भाग तयार होऊ शकलेला नाही. याला आपल्या मनातल्या पूर्वापार धारणाच कारण आहेत याची मला पूर्ण जाणीव आहे. कदाचित एक नैसर्गिक डिफेन्सिव्ह भागही असावा.
पण तरीही, एकवेळ उंदरालाही मी गोंडस किंवा मजेशीर किंवा तत्सम काही मानायला तयार आहे, पण सापाचा स्पर्श थंडगार गिळगिळीत, त्याचा एकूण लुक आणि हालचाल हे सर्व केवळ किळसवाणं, भीतीदायक आणि शहारा आणणारंच असतं हा भाव मनातून काही केल्या घालवता आलेला नाही..
यात साप विषारी आहे की बिनविषारी याचाही संबंध नाही. काही लोकांना आवडीने साप पाळताना पाहिलं आहे. सापाचा विचार एक पाळीव किंवा मित्रवत प्राणी म्हणून निदान मलातरी करता येत नाही.
शक्यतो सापाला मरु न देण्याकडे माझाही कल आहे, पण घरात साप निघाला आणि सर्पमित्राची सहज / जलद उपलब्धता नसेल तर कोणतीही जोखीम न घेता सापाला जिवे मारायला आजही मी मागेपुढे पाहणार नाही.
अर्थात.. लेखमालेच्या उत्तमतेशी या मतप्रदर्शनाचा काही संबंध नाही.
4 Oct 2013 - 1:45 am | जॅक डनियल्स
हो, तिला आग्या मण्यार पण म्हणतात. मी फक्त कॉमन नाव सांगितले, सापांची भाग बदलला की नावे बदलतात. तुम्ही जे मत व्यक्त केले आहे ते अगदी बरोबर आहे.
4 Oct 2013 - 8:16 pm | सँम
मी तर असे ऐकलय कि मण्यार चावल्यावर माणूस बेशूद्ध पडतो. समोरच्या व्यक्तीला तो मृत दिसतो. कधी कधी डाँक्टरपण पेशंटला मृत घोषित करतात. पण ती व्यक्ती म्हणे जिवंत असते. आणि त्याचा अंत्यविधीपण उरकण्याच्या घटना घडतात. हे खरे आहे का?
4 Oct 2013 - 8:32 pm | जॅक डनियल्स
मण्यारीचे विष मज्जासंस्थेवर हल्ला करत असल्याने माणूस कोमात जातो हे नक्की...पण पुढच्या गोष्टीबद्दल माहिती नाही.
5 Oct 2013 - 8:18 pm | सुबोध खरे
मण्यारीचे विष हे माणसाच्या मेंदूच्या संदेशवहनात अडथळा आणते त्यामुळे मेंदुचे संदेश इकडून तिकडे जाणे बंद होते. यामुळे माणसाला मूर्च्छा(बेशुद्धी) येते. मेन्दुच्या तळाशी असणारी श्वसन आणि हृदय यांचे नियंत्रण करणारी केंद्रे असतात. त्यांचे काम यामुळे अनियमित होते आणि माणसाचे श्वसन केंद्र बंद पडते आणि त्यामुळे माणूस दगावतो. एखादे वेळेस असे होते कि श्वसनबरोबर हृदयाचे नियंत्रण करणारे केंद्र अनियमित काम केल्याने नाडीचे ठोके हळू आणि मंद होतात. यामुळे डॉक्टरने एखाद्या व्यक्तीला मृत घोषित केले असावे आणि यातून हि अफवा पसरली असावी. काळजीपूर्वक तपासले असता नाडी मंदपणे चालू असते हे कळून येते, अशा रुग्णाला विषाचा प्रभाव उतरेपर्यंत कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवले तर तो जगतो आणि पूर्ण बरा होऊ शकतो.
या उलट घोणस किंवा फुरशाचे विष तुमच्या शरीराचे मास विरघळवतात त्यामुळे माणूस जिवंत राहिला तरी त्याला पुढचे उपचार फार दिवस घ्यावे लागतात.
5 Oct 2013 - 9:01 pm | जॅक डनियल्स
+११११
4 Oct 2013 - 8:29 pm | रेवती
मागल्यावेळी फक्त नागपंचमी चा लेख वाचला होता. आत्ता सगळी मालिका वाचली. मस्त झालेत लेख!
काही फोटू दिसले नाहीत. तक्रार नाही उलट बरे वाटले.
6 Oct 2013 - 12:48 pm | डॉ सुहास म्हात्रे
काही फोटू दिसले नाहीत. तक्रार नाही उलट बरे वाटले.
:)10 Aug 2016 - 2:27 am | निओ
आजपर्यंत नागच जास्त विषारी असे समजत होतो.
10 Aug 2016 - 3:59 pm | वेदांत
उत्तम माहीती मिळाली.. पुभाप्र..