एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे मी सापांचे कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन) करायला सुरवात केली. पण कुठून यायचे हे कॉल ? कोण करायचे ? नंतर त्या सापांचे काय व्हायचे ? याचे उत्तर म्हणजे 'कात्रजचे सर्पोद्यान'!
नव्वदच्या  दशकात, ज्याकाळात 'साप' हा शब्द पण संध्याकाळी उच्चारला तर लोकं भूतबाधा झाल्यासारखे बघायचे, अश्या कठीण परीस्थित 'अण्णा'(निलीमकुमार खैरे) आणि राजाभाऊ ( राजन शिर्के) यांनी पुण्याच्या बाहेर कात्रज मध्ये ( तेंव्हा कात्रज खरोखर  पुण्याच्या वस्तीच्या बाहेर होते, आत्ता तर काही दिवसांनी लोणावळा पर्यंत पीएमटी चालू होईल ;) ) सर्पोद्यान काढले. निसर्गातील सरपटणारे प्राणी: साप, सरडे, घोरपड इ.( खूप लोकांच्या भाषेत ईईईईई किळसवाणे प्राणी )आणि वन्यप्राणी यांच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करणे हा त्यांचा निखळ हेतू होता.
नंतर पुण्याचा 'सरकारी' भाषेत 'विकास' होत गेला (लोकसंख्या वाढत गेली आणि सुखसोयी व्यस्त प्रमाणात कमी झाल्या).
त्यामध्येच बिल्डर लोकांनी टेकड्या, मोकळी मैदाने, नाले आणि शेवटी कोथरूड च्या काचारा डेपो पण पचवून ढेकर दिला. या प्रकरणामध्ये पुण्याचे आद्य रहिवासी- साप, प्राणी, आणि पक्षी यांना कोणीच विचारले नाही. त्यांना बिचाऱ्यांना कुठे जायचा हा प्रश्न निर्माण झाला.
निसर्ग म्हणजे 'झाडे आणि पाऊस' अशीच सर्वसामान्य समजूत असते.(झाडे लावा- हवा थंड करा- पाऊस पाडा- मग मातीची धूप थांबवा..या प्रकारचेच शास्त्र मी शाळेत शिकलो.) त्यामुळे साप किंवा तत्सम सरपटणारे प्राणी आणि त्यांचे संवर्धन हा विचार पुण्याची वाढ (नुसती शारीरिकदृष्ट्या !)होत असताना कोणी केली नाही.
"मग आज जोश्यांच्या  बिबेवाडीच्या घराच्या बागेत काळा मोठा साप घुसला, उद्या  पाटलांच्या सिंहगड रोडच्या निसर्गरम्य (किंवा कॉन्क्रीटरम्य !) घराच्या बेडरूम मध्ये नाग शिरला अश्या बातम्या पुण्यात सामान्य झाल्या." तेंव्हा पासून  या सापांना व वन्यप्राण्यांना लोकांच्या घरातून पकडून आणून निसर्गात (तिकडे दूर अभयारण्यात निसर्ग उरला आहे जिकडे !) सोडायचे काम सर्पोद्यान अहोरात्र करत आहे.
 जेंव्हा 'डिस्कवरी प्रेरित' सर्पमित्रांचा जन्म पण झाला नव्हता तेंव्हा पासून  कात्रज सर्पोद्यान या क्षेत्रात (२५ वर्षाहून जास्त)काम करत असल्याने पुण्यात आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात सर्पोद्यान चा फोन नंबर पोहचला आहे.
पुण्यात कुठे पण साप निघाला तर लोकं सर्पोद्यान ला फोन करतात. मला आधी प्रश्न पडायचा की हा नंबर लोकांकडे पोहोचतो कसा काय, पण आपल्याकडे सापाच्या भीतीमुळे\अंधश्रद्धामुळे का होईना लोकं सर्पोद्यान चा नंबर लिहून ठेवतात. हा कॉल (सर्पोद्यान चा रोयेल्टी शब्द!) आल्यावर सर्पोद्यान मधले राजाभाऊ (कार्यकारी अधिकारी) किंवा दुसरे कार्यकर्ते पहिल्यांदा पत्ता विचारून पुण्यातला प्रभाग निश्चीत करतात. समजा साप हा सहकारनगर मध्ये असेल तर तिकडच्या कार्यकर्त्याचा नंबर देतात, तीच पद्धत कोथरूड साठी आणि जुनाबाजारसाठी.
सर्पोद्यान ला सरकारने दिलेले एक रेस्कू वाहन (जीप) आहे की ज्यामधून पुण्यामध्ये दिवसभर सर्पोद्यांनचे कार्यकर्ते साप आणि वन्य प्राणी गोळा करत (गोळा करण्याचीच परस्थिती आहे खरच !) फिरत असतात. पण पुण्याचा पसारा येवढा वाढला आहे की एक जीप सगळी कडे वेळेत पोहोचणे अशक्यच आहे.(त्यातून पुण्याचा ट्राफिक, भाग १ मध्ये लिहल्या प्रमाणे माझ्या मोटारसायकल ला जिथे घुसायला जागा मिळायची नाही तिकडे जीप कशी काय घुसणार ?)त्यामुळे असे कॉल विभाजित केले जातात म्हणजे त्या-त्या भागातला साप लवकरात पकडला जाऊन सर्पोद्यानात आणला जातो.
हे कॉल विभाजनाचे काम वाटते तेवढे सोपे नसते. त्या पाच मिनिटाच्या कॉलमध्ये राजाभाऊ आपला ३०-४० वर्षाचा या क्षेत्रातला अनुभव पणाला लावतात."लोकांच्या सापाबद्दल चे वर्णन ऐकून तो विषारी-बिनविषारी याचा तर्क लावतात.हे लोकांचे वर्णन बहुतांशी वेळा ठरलेले असते " काळा मोठा, चांगला ७-८ फुटी, मांडीच्या (कोणाची ?) जाडीचा नाग आहे" आत्ता या वर्णनावरून सापाच्या जातीचा अंदाज लावणे हे येरे-गबाळ्याचे काम नाही.
मी साप पकडायचे कॉल करायला लागल्यापासून काही वर्षाने, एका अनंतचतुर्थीला असेच  वर्णन कारणारा मला मोबईल वर कॉल आला, मी धडपडत-तडफडत, सातारारोड च्या मिरवणूकच्या गर्दीतून त्या जागी पोचलो आणि बघितले तर काय ? १० सेंटीमीटर चे धामणीचे (बिनविषारी साप)पिल्लू....कुठे १० सेंटीमीटर आणि कुठे १० फुट. पण बहुतांशी लोकांच्या मनावर अंधश्रद्धा आणि परंपरेचा येवढा पगडा असतो की त्यांना साप हा "काळा मोठा आणि १० फुटीच दिसतो."असो.
हा सापांच्या जातीचा अंदाज बाहेरचे तापमान, चालू असलेला महिना, आधी त्या भागात मिळालेले साप, त्या जागी असलेली झाडे (किंवा नसलेली झाड !!)असे अनेक मुद्दे लक्षात घेऊन लावला जातो. एकदा हा तर्क लावला की ऐंशी टक्के काम पूर्ण होते, त्यानंतर चालू होते ते कार्यकर्त्याचे अवलोकन, काही कार्यकर्ते नवीन असतात त्यांना विषारी सापाचे कॉल देऊन चालत नाही, तर काही लहान असल्याने त्यांना मोठ्या वस्त्यांमध्ये पाठवता येत नाही. ( भाग १ मध्ये लिहिल्या प्रमाणे तळजाई किंवा जनता वसाहती मध्ये साप निघाला तर साप सोडून २०-३० लोकांनाही शांतपणे हाताळायला लागते.) असे हे निर्णय काही सेकंदात घ्यावे लागतात. मग वर लिहिल्याप्रमाणे त्या कार्यकर्त्यांचे नंबर गरजू लोकांना दिले जातात. माझ्या साठी राजाभाउंचा कॉल हा शेवटचा शब्द होता, मी डोळे झाकून कामगिरीवर सुटायचो, 'त्यांचा सापांबद्दलचा अंदाज आत्तापर्यंत कधी चुकला' हे मी अनुभवले नाही.
मी जेंव्हा काम करयचो तेंव्हा मला पण आधी सर्पोद्यान कडून कॉल यायचे, नंतर हळू हळू माझा नंबर सगळ्या आजूबाजूच्या वस्त्या, मोठ्या सोसायट्या आणि अग्निशामक दलाकडे पोहचला, मग मी त्यांचे कॉल परस्पर घेऊन सर्पोद्यान मध्ये साप घेऊन जाऊ लागलो. माझ्या वेळी असेच सगळे कार्यकर्ते ऐकमेकांशी फोन ने जोडलेले असायचे, म्हणून रात्री कधी कोथरूड च्या भागातला कॉल आला तर मी तिकडच्या कार्यकर्त्याला द्यायचो आणि असेच सगळे पुणे सांभाळले जायचे. तुम्ही म्हणाला की, "असे पुण्यात कितीसे ते साप निघणार?", पण तुमचा विश्वास नाही बसणार की पावसाळ्यात मी आठवड्याला साधारणपणे पाच साप माझ्या भागातून वाचवले आहेत, आणि तसेच पुण्याच्या सगळ्या भागातून सर्पोद्यानचे कार्यकर्ते असंख्य साप वाचवत होते, किंवा आहेत.
सर्पोद्यानचा कॉल आल्यावर बंदुकीच्या गोळीसारखे त्या सापाच्या दिशेने सुटायचे आणि हिरोगिरी नकरता त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाचवायचे  हेच मला माहित होते.
त्याच प्रकारचे काम आणि मेहनत अजूनही कात्रजचे सर्पोद्यान आणि त्यांचे कार्यकर्ते करत आहेत आणि पुण्याचे आद्य-रहिवासी (साप आणि तत्सम वन्य प्राणीपक्षी )वाचवत आहेत.
        
  
प्रतिक्रिया
2 Jun 2013 - 1:48 pm | आदूबाळ
लय भारी रे जेडी! आमच्यासारख्या पुस्तकपांडू येरूंना तू झकास सफर घडवून आणतो आहेस!
2 Jun 2013 - 1:55 pm | तर्री
सलाम....आपल्या कामाला आणि लेखणीला !
2 Jun 2013 - 2:09 pm | ज्ञानोबाचे पैजार
थरारक तरीही उपयुक्त माहिती आणि थरारक अनुभव.
लिहीते रहो.
2 Jun 2013 - 2:18 pm | कंजूस
इनफ्रारेड कैमेरातून थंड रक्ताचा साप दिसतो का ?
2 Jun 2013 - 2:24 pm | जेपी
पुण्यात येवढे साप निघतात !! आमच्या इकड दिसतपण नाय .
खेड असुनही
2 Jun 2013 - 2:40 pm | मुक्त विहारि
अजून लिहा,,
2 Jun 2013 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
एका वेगळ्याच अनुभवाची, कार्याची आणि जगाची सफर.
2 Jun 2013 - 5:44 pm | प्रचेतस
प्रत्येक भाग अधिकाधिक उत्कंठावर्धक बनत चालला आहे.
2 Jun 2013 - 4:13 pm | स्पंदना
पण मग तुमचे राजाभाऊ कसे काय ठरवायचे तो साप कोणता आहे ते?
बाकि काळा म्हणजे लय भारी विषारी ही कल्पना आम्हीही लहाणपणी बाळगुन होतो.
पण एकदा पिवळी धम्मक धामण अशी जणु तरंगत जाताना पाहिली अन मन हरखुन गेल.
फार व्यवस्थीत अन मनोरंजक माहीती.
पु. ले. शु.
2 Jun 2013 - 4:24 pm | खेडूत
छान- वाचतोय.
पहिला भाग तुमच्या ब्लोगावर पूर्वी वाचला होता.
पु. भा. प्र.
20 Jun 2013 - 8:23 pm | पैसा
फार छान लिहिताय अनुभव!
22 Jun 2013 - 7:00 am | सन्जोप राव
माहितीपूर्ण अनुभव. तुमची लिहिण्याची शैलीही रसाळ आहे. आणखी लिहा.
शुभेच्छा.
30 Jun 2013 - 3:32 pm | अप्पा जोगळेकर
तुमचे अनुभव खरोखरंच थरारक आहेत.
संजय लोकरे नावाचे एक परिचित आणि स्वघोषित सर्पमित्र डोंबिवलीत राहतात. त्यांनी पकडलेला आणि पोत्यात भरलेला साप (बहुधा मण्यार) त्यांना पोत्यातून चावला. पुढचे ३-४ महिने ते भयंकर आजारी होते. अनेक दिवस ते रुग्णालयात होते.
डोंगरात जर झोपण्याच्या जागेच्या आजूबाजूला जर साप, विंचू दिसला तर सरळ धोंडा घालून त्याला ठार करायचे असा नियम स्वतःशीच करुन ठेवला आहे.
बाकी साप,विंचू,झुरळे,पाली,भटके कुत्रे नष्ट झाले तर काय नुकसान होणार आहे हा प्रश्न नेहमीच पडतो.
30 Jun 2013 - 5:47 pm | एस
साप नष्ट झाले तर फार काही होणार नाही. फक्त मनुष्यजात उपासमारीने आणि कदाचित प्लेगने मरेन..
30 Jun 2013 - 7:33 pm | जॅक डनियल्स
एकदम बरोबर स्वॅप्स !
निसर्गात कोणाला कमी लेखायचे नाही, अगदी डोक्यावरच्या 'ऊ' चे पण महत्व आहे ;) तर सापांचे तर विचारूच नका, शेतकरी कधीच बांधावरची बीळ उध्वस्त करत नाहीत कारण त्यांना माहित असते की धामण आणि नागच आपल्या शेताला संरक्षण देणार आहेत. उंदीर 'tom and jerry ' मध्ये दाखवतात तसा चांगला कधीच नसतो, रोगराई आणि पिकांचे नुकसान हे करण्यात त्याचा पहिला नंबर असतो. त्यांच्या कडे कुटुंबनियोजनाची काही योजना नसल्यामुळे त्यांची संख्या अमाप प्रमाणात वाढत असते, आणि ती नियंत्रण करायचे काम साप करतो.
तुम्हाला सापाची किंवा ज्यांची माहिती नाही त्यांच्या पासून दूर जा, मारू नका ! ..परीक्षेत एखादा प्रश्न माहित नसला तर आपण तो ऑप्शन ला टाकतो, पेपर फाडत नाही...;)
9 Aug 2013 - 11:49 pm | मोहनराव
एकदम भारी!!
10 Aug 2013 - 10:09 am | सुबोध खरे
+१११