आयुर्वेद : परिभाषा-परिचय - शरीर -> १

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 11:29 am

पैसातैने लक्षात आणून दिलेलं आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का? हे श्री. ग्रेटथिन्कर यांचं काथ्याकूटातलं लिखाण आणि त्यावरचा मिपाकरांनी केलेला काथ्याकूट वाचून दिवाळी अंकात केलेलं आयुर्वेदावर लेखमाला लिहिण्याचं आश्वासन मनावर घ्यायचं ठरवलं आणि टंकायला बसलो, पण माझ्या मनातला लेखमालेचा त्यावेळचा प्रवाह उपरोल्लेखित काथ्याकूटामुळे काहीसा विस्कळीत होऊन बसल्याचं लगेचंच ध्यानात आलं. आता तो प्रवाह मार्गस्थ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आयुर्वेदाबद्दलच्या समज, गैरसमज आणि अपसमज यावर छोटीशी टिप्पणी करावी म्हणतो. कदाचित ते करत असताना प्रवाह सुरळीतही होऊन जाईल...

भारतातील जनसामान्यांमध्ये आयुर्वेदातल्या संकल्पना, परिभाषा पुरातन काळापासून रुजलेल्या आहेत. त्यातील वात, पित्त, कफ, प्रकृती, विकृती, धातु, पंचकर्म, आसवं, अरिष्ट, काढे, पथ्य, अपथ्य, आहार, विहार, औषध, निदान, उपचार, चिकित्सा अशा प्रकारचे उल्लेख अनेकदा अनेकविध संबंधाने होताना आढळतात. पण सामान्यजनांना या आयुर्वेदातल्या परिभाषांची योग्य ती शास्त्रीय माहिती असतेच असं नाही. सवयीने या शब्दांचा वापर होताना दिसतो आणि हा वापर माझ्यासारख्या या विषयातल्या विद्यार्थ्याला व्यथित करतो. आयुर्वेदाच्या परिभाषांची नावं माहित असणं म्हणजे आयुर्वेदाच्या सर्व सिद्धांतांचं ज्ञान असणं नव्हे. किंबहुना कोणतंही ज्ञान नसताना केवळ काही परिभाषांची, संकल्पनांची नावं माहित असल्याने व्यक्ती अधिकारवाणीने या विषयी बोलतात, या प्रवृत्तीबद्दल अपार खेद होतो. खूपदा असंही होताना दिसतं की परिभाषांचा, संकल्पनांचा शब्दार्थ समजतोय म्हणून आपल्याला वाटतोय तोच अर्थ खरा समजून शास्त्रावर प्रहार करण्याचा मोहही भल्याभल्यांना सोडवत नाही.

अशा प्रसंगांमध्ये एखाद्या शास्त्रातला 'श' कळत नसताना वाद घालण्याची प्रवृत्ती त्रासदायक होते. ज्ञान, विज्ञान, शास्त्र या मूळ संस्कृत शब्दांमधून नेमकं काय अभिप्रेत आहे, हे समजून घेण्याचाही कधी कुणी प्रयत्न केल्याचं दिसत नाही पण ज्ञान काय, विज्ञान काय, शास्त्रीय काय, अशास्त्रीय काय याचा कोणताही उहापोह होताना दिसत नाही. त्याऐवजी मी किती मोठा, माझं ज्ञान कसं चांगलं, माझा अनुभव किती मोठा म्हणून मग मीच कसा खरा, याबद्दलच बोललं-लिहिलं जातं आणि असं काही वाचून खूप दु:ख होतं.

मी इथे काही लिहितोय ते पूर्ण सत्य आहे असा माझा दावा नाही आणि तसं लिहिणं शक्यही नाही पण सामान्यजनांना समजेल अशाप्रकारे आयुर्वेद सांगणं हे आयुर्वेदाचा विद्यार्थी म्हणून माझं कर्तव्यच आहे असं मानून मी या विषयी काही लिहू म्हणतोय.

आयुर्वेद हे शास्त्र आहे का, ते विज्ञान आहे का, वैज्ञानिक कसोटीवर ते उतरतं का, अशा प्रश्नांची उत्तरं देणं हे आता या समयी कठीण आहे आणि अयोग्यही. मूळात विषयच नीट माहिती नसेल तर त्याबद्दलचं विवेचन हे पालथ्या घड्यावर पाणीच नाही का होणार? या अनुषंगाने आधी आयुर्वेद काय सांगतो ते समजून घेणं आवश्यक ठरेल. या प्रयत्नाची सुरूवात मी मिपाच्या दिवाळी अंकामधल्या माझ्या पहिल्या लेखाने केलेली आहेच पण आता त्या विषयाला वाहिलेल्या लेखमालेच्या या पुढल्या अंशामध्ये आयुर्वेदातल्या काही शास्त्रीय परिभाषा - संकल्पना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो.

आयुर्वेदीय संहिता ग्रंथांमध्ये एक सूत्र आहे -

दोषधातुमलामूलं सदा देहस्य....। वाग्भट (अष्टांग हृदय) सूत्रस्थान १

अथवा

दोषधातुमलामूलं हि शरीरम्। चरक सूत्रस्थान १

अर्थात, दोष, धातु आणि मल हे (तीनही), शरीर वा देहाचं मूळ आहेत.

दिवाळी अंकामध्ये आयुर्वेदाची व्याख्या समजावून घेताना पहिल्यांदा आपण आयु शब्द समजावून घेतला आणि तो समजावून घेत असताना सर्वप्रथम आपण शरीर हा शब्द ऐकला/वाचला असल्याचं तुम्हाला आठवत असेलच, म्हणून आपण प्रथमतः आयुर्वेदानुसार हे 'शरीर' म्हणजे काय? त्यापासून सुरूवात करू.

शरीर शब्दाची औपनिषदिक व्याख्या,

शीर्यते तद् शरीरम्।

अर्थात, ज्याची झीज होते ते शरीर, ही, आयुर्वेदालाही मान्य आहे. तरी यातला झीज होणारा पदार्थ कोणता हा प्रश्न बाकी राहतोच म्हणून त्याबद्दल आयुर्वेदीय संहिता सांगतात की शरीराचं मूळ किंवा शरीराचे मूलभूत घटक हे दोष, धातु आणि मल आहेत. आता इथून आपल्या आयुर्वेदिक परिभाषा समजून घेण्याच्या प्रवासाची सुरूवात होते.

आपल्या मराठीत काही शब्द मूळातूनच वाईटपणा घेऊन येतात, त्यातलाच एक शब्द म्हणजे 'दोष'. मराठीच्या अनुषंगाने दोष हे वाईटच असं आपण समजून चालतो. संस्कृत या बाबतीत फार वेगळी आहे. अपेक्षित अर्थ त्यात अगदी चपखलपणे व्यक्त होतात. 'दोष' म्हणजे -

दूषणस्वभावात् दोषः।

अर्थात, (दुसर्‍यांना) दूषित करण्याचा स्वभाव असणारे ते दोष. आयुर्वेदसंबंधाने दुसर्‍या शरीरघटकांना दूषित करण्याची क्षमता असणारे असे म्हणू. म्हणजेच धातु आणि मलांना दूषित करू शकण्याची शक्ती असणारे ते 'दोष' असा अर्थ आपण समजून घेऊ शकतो. शरीरामध्ये असे दोष नामक तीन पदार्थ आहेत -

१. वात
२. पित्त
३. कफ.

यांची ओळख यथाकाल होईलच.

आता पुढला शरीरमूल घटक आहे 'धातु'.

धारणात् धातवः।

अशी 'धातु' शब्दाची व्याख्या करण्यात येते. अर्थात, शरीरधारण करणारे, शरीराला आधार देणारे म्हणजेच शरीर बनवणारे ते धातु. शरीर ज्या घटकांपासून बनलेलं आहे त्यांना 'धातु' असं म्हणतात. 'धातु' हा एक सर्वसमावेशक असा शब्द आहे, या बद्दल अधिक विवेचन होईलच पण तूर्तास इतकंच महत्त्वाचं की शरीरात धातु संख्येने सात मानलेले आहेत. त्यांची नावं -

१. रस
२. रक्त
३. मांस
४. मेद
५. अस्थि
६. मज्जा
७. शुक्र

शरीरमूलात्मक तिसरा घटक आहे, 'मल'. 'मला'ची व्याख्या,

मलिनीकरणात् मलः।

अशी करण्यात आलेली आहे. अर्थात, शरीराच्या मलिनीकरणाचा परिणाम म्हणजे 'मल'. शरीरघटकांच्या नियोजित कर्मांनंतर त्यांच्या मळण्यातून - खराब होण्यातून जे पदार्थ उत्पन्न होतात ते 'मल'. आयुर्वेदाने 'मल'देखिल तीन प्रकारचे सांगितलेले आहेत.

१. पुरीष
२. मूत्र
३. स्वेद

आयुर्वेदोक्त दोष, धातु आणि मल या शरीरघटकांची सामान्य ओळख करून घेतल्यावरही काही बाबी व्यवस्थित समजावून घेणं खूप आवश्यक आहे.

दोष हे सतत, नेहमीच इतरांना म्हणजे धातु आणि मल या उरलेल्या दोन शरीरघटकांना दूषित करत नाहीत. जोपर्यंत हे दोष आपल्या अविकृतावस्थेत असतात तेव्हा ते दुसर्‍या घटकांना दूषित न करता शरीरधारणाचंच कार्य करत असतात. म्हणजेच स्वतःच्या प्राकृतावस्थेत, विकृत बनले नसल्यास, दोष हे धातुंचंच कार्य करतात, नव्हे, ते धातुच असतात. जेव्हा ते काही कारणांमुळे विकृत बनतात तेव्हाच ते इतर घटकांना दूषित करू शकतात. प्रत्येक शरीरात त्यांचं ठराविक प्रमाण असतं. या प्रमाणामध्ये जेव्हा बदल घडतो म्हणजे ते विकृत बनतात तेव्हाच या दोषांचा दूषित करण्याचा स्वभाव जागृत होतो. (अशीच प्रक्रिया मलांच्या बाबतीतही मानावी लागते. मलांची उत्पत्ती मलिनीकरणातून होत असली तरीही आपली नियोजित कर्मं करेपर्यंत मल हे सुद्धा धातुंचे शरीरधारणाचेच कार्य करत असतात.) हा बदल दोन प्रकारे घडू शकतो, एक तर त्यांच्या मूळ प्रमाणात वाढ होऊन अथवा त्यात घट होऊन. म्हणजे दोषांच्या वृद्धी-क्षयातून इतर शरीरघटक दूषित होऊन त्यांच्यामध्ये जी खळबळ माजते त्यातून शरीर घटकांत आणि पर्यायाने शरीरात बिघाड होतो असं आपल्याला म्हणता येतं. हा बिघाड म्हणजेच व्याधि किंवा रोग होत.

दोष, धातु आणि मल या तीनही घटकांनी शरीर बनत असलं तरी या घटकांची शरीरासाठी नेमून दिलेली काही कर्म आहेत. हे घटक आपापली कर्मं व्यवस्थित, योग्य प्रकारे करतील तर शरीर साम्यावस्थेत, निरोगी अवस्थेत राहतं. जेव्हा काही कारणांमुळे हे घटक आपली नियोजित कर्मं करत नाहीत किंवा अयोग्य प्रकारे करतात तेव्हा क्रमाने हे तीनही घटक विकृत होतात आणि परिणामी शरीर बिघडतं.

अर्थात रोग हे एक स्वतंत्र प्रकरण आहे. त्याबद्दल आत्ता काही टीप्पणी करणं चुकीचं ठरेल. आपण सध्या आयुर्वेदीय संकल्पनांच्या आणि परिभाषांच्या माध्यमातून आयुर्वेदोक्त शरीररचना - शरीरक्रियाविचार समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यथावकाश याबद्दलचा आयुर्वेदीय दृष्टीकोन अधिक स्पष्ट होईल.

तूर्तास आयुर्वेदानुसार शरीर म्हणजे दोष, धातु आणि मल यांचा समुदाय.

इत्यलम्.

धोरणसमाजजीवनमानविज्ञानशिक्षणप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाप्रतिक्रियासमीक्षाअनुभवमतवाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Feb 2013 - 11:48 am | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
खूप वाट बघायला लागली या लेखमालेसाठी.

गवि's picture

19 Feb 2013 - 12:09 pm | गवि

त्या काथ्याकुटाच्या निमित्ताने प्रास पुन्हा लिहीता झाला याबद्दल त्या काथ्याकूटकर्त्याचे अनेक आभार.

संपूर्ण लेखमाला वाचून मग मत देण्यात येईल. ओघवत्या लिखाणाबद्दल प्रासभाऊचे धन्यवाद...

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Feb 2013 - 2:17 am | विश्वनाथ मेहेंदळे

+१
वाचतोय... मस्त आहे लेख !!

नि३सोलपुरकर's picture

19 Feb 2013 - 12:25 pm | नि३सोलपुरकर

ही संपूर्ण लेखमाला मिपावर एक माईलस्टोन होईल यात शंका नाही

प्रासभो धन्यवाद आणी पैसातै अनेक आभार.

पुलेशु.

पैसा's picture

19 Feb 2013 - 12:35 pm | पैसा

मस्त समजावून देतो आहेस! ही मालिका पुरी होईल तशी मिपाच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरणार यात काही शंका नाही! सध्या हा अतिशय लेख आवडला आहे आणि मालिका येणार आहे असे समजते. असंख्य वेळा धन्यवाद!

+१

सविता००१'s picture

19 Feb 2013 - 1:11 pm | सविता००१

नाहीतर परत सहा महिने कुठेतरी पळून जाशील. ;)

मिपावरच्या माझ्या वाचनखुणा आधीच ओसंडून वाहाताहेत. त्यात ह्याची भर.
problme of plenty का problem of many ह्यालाच म्हणतात का?

मृत्युन्जय's picture

19 Feb 2013 - 1:36 pm | मृत्युन्जय

प्रासभाऊ लिहित रहा. आपले ते सगळे टाकाऊ निरर्थक या वैचारिक न्यूनगंडाने पछाडलेल्या लोकांसाठी चांगली माहिती मिळेल या लेखमालेतुन.

सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. ही लेखमालिका नक्की माईलस्टोन ठरणार. पुभाप्र

सूड's picture

19 Feb 2013 - 2:24 pm | सूड

पुभाप्र. शेवटी क्रमशः लिहायचं राहून गेलंय का?

यशोधरा's picture

19 Feb 2013 - 5:29 pm | यशोधरा

छान लिहिलंय.

पिवळा डांबिस's picture

20 Feb 2013 - 11:19 pm | पिवळा डांबिस

लेखमालेचं स्वागत करतो!!

शैलेन्द्र's picture

19 Feb 2013 - 6:21 pm | शैलेन्द्र

मस्त लेख.. पुढील माहिती जाणून घ्यायला आवडेल.

पुभाप्र. आयुर्वेद फॉर डमीज ची फार दिवसांपासून वाट पहात होतो. निस्ते संस्कृत शब्दांचा मारा करणारे लोक यापलीकडे आयुर्वेदवाल्यांबद्दल चांगलेवाईट कसलेही मत नव्हते आधी आणि आत्ताही नाही. त्यामुळे ही लेखमाला चांगली उपयुक्त ठरेल यात संशय नाही.

बाबा पाटील's picture

19 Feb 2013 - 11:57 pm | बाबा पाटील

धन्यवाद प्रास ,तुम्ही लिहिते झालात नाहीतर काही लोकांचे आयुर्वेद विषयी अफाट विचार एकुन मी झीट येउन पडायचा बाकी होतो......

अग्निकोल्हा's picture

20 Feb 2013 - 1:00 am | अग्निकोल्हा

संपुर्ण लेखमाला अशीच झळकत राहो व विशेष्तः गैरसमजांचा निचरा व्हावा हीच इछ्चा.

जाताजाता- उपयोग किती या बरोबरच, आयुर्वेद ही आज एक अतिशय खर्चीक उपचार पध्दती झाली आहे अशीही टिका असते, मला स्वतःला अल्प अनुभवानुसार त्यात तथ्यही वाटते. यावर काहि उपाय आहे काय ज्यामुळे या शास्त्राचा जनाधार किमान भारतासारख्या विकसनशील देशात वाढेल ?

रेवती's picture

20 Feb 2013 - 1:11 am | रेवती

वाचतीये हो डॉक्टर!

प्रासबुवा, सुरुवात तर छान झाली आहे. माहितीमध्ये अमूल्य भर पडत आहे.

- पिंगू

अत्रुप्त आत्मा's picture

22 Feb 2013 - 1:37 pm | अत्रुप्त आत्मा

+++१११

ऋषिकेश's picture

22 Feb 2013 - 1:46 pm | ऋषिकेश

छानच!
आता हे विसरायच्या आत पुढला भाग येऊ दे! ;)

स्मिता.'s picture

22 Feb 2013 - 5:30 pm | स्मिता.

दिवाळी अंकातला लेखही आवडला होता.
आता एक छान लेखमाला येवू द्यात. पुभाप्र.

किसन शिंदे's picture

22 Feb 2013 - 6:08 pm | किसन शिंदे

नुकतंच या विषयावरचं बालाजी तांबेचं आयुर्वेद उवाच भाग २ हे वाचलंय. चांगली माहिती मिळतेय.

पुढचा भाग लवकर टाकाच.

राघव's picture

22 Feb 2013 - 6:33 pm | राघव

वाचतोय. खूप महत्त्वाचं लेखन होईल हे शक्य तेवढे खोलात जाऊन लिहावे ही विनंती. :)

राघव

विलासराव's picture

22 Feb 2013 - 10:02 pm | विलासराव

पण सामान्यजनांना या आयुर्वेदातल्या परिभाषांची योग्य ती शास्त्रीय माहिती असतेच असं नाही. सवयीने या शब्दांचा वापर होताना दिसतो आणि हा वापर माझ्यासारख्या या विषयातल्या विद्यार्थ्याला व्यथित करतो. आयुर्वेदाच्या परिभाषांची नावं माहित असणं म्हणजे आयुर्वेदाच्या सर्व सिद्धांतांचं ज्ञान असणं नव्हे. किंबहुना कोणतंही ज्ञान नसताना केवळ काही परिभाषांची, संकल्पनांची नावं माहित असल्याने व्यक्ती अधिकारवाणीने या विषयी बोलतात, या प्रवृत्तीबद्दल अपार खेद होतो. खूपदा असंही होताना दिसतं की परिभाषांचा, संकल्पनांचा शब्दार्थ समजतोय म्हणून आपल्याला वाटतोय तोच अर्थ खरा समजून शास्त्रावर प्रहार करण्याचा मोहही भल्याभल्यांना सोडवत नाही.

हेच आपण जेंव्हा चर्चा करतो तेव्हा होते माझ्या विषयावर.
भेटु तेव्हा पुन्हा चर्चा करुच.
पण मला हे तुम्हाला या शब्दात सांगता आले नसते.
असो.

लेख आवडला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Feb 2013 - 5:39 am | निनाद मुक्काम प...

सही
लिहित रहा , माहिती चा उपयोग नक्की होईल

आनन्दिता's picture

23 Feb 2013 - 10:49 am | आनन्दिता

पुढचा भाग लवकर येउद्या!!