पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले.
हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे. जसे उत्तर हिंदुस्तानात बासमतीची बिर्यानी, मध्य प्रदेशातला मोगऱ्याचा पुलाव, महाराष्ट्रातल्या आंबेमोहोर आणि इंद्रायणीचा साधा वरणभात तर दक्षिणेत सणासुदीला होणारा सोना मसूरी, कोलमचा गोड पोंगल किंवा इडली-डोसा अशी कितीतरी उदाहरणं मिळतील. इंद्रायणीची बिर्यानी किंवा बासमतीचा साधं-वरण-तूप-भात अशी आंतरप्रांतिय जोडपी केवढी विजोड वाटतात. पण दहीभात मात्र अशा जुलमी मर्यादा जुमानत नाही. त्यामुळेच थोड्याफार फरकाने आणि नानाविध नावांनी दहीभात आसिंधु-सिंधु पर्यंत ग्रहण केल्या जातो.
उत्तरेत दही चावल, महाराष्ट्रात दहीभात, बंगालमध्ये दोईभात, ओरीसातला पोखालो, गुजरातमधे खट्टी कंकी, कर्नाटकात मोसरन्ना तर तामिळनाडूत थाइर सादम्. तामिळनाडू आणि आंध्रामध्ये तर दहीभात देवळात प्रसाद म्हणूनही वाटला जातो. आंध्रात घरच्यासाठी केलेला पेरुगन्नम, देवाचा प्रसाद म्हणून केला तर दद्दोजनं (दध्योजनम्?) होतो. महाराष्ट्रातही संतांना दही-भाताचे फार अप्रूप. संत भानुदास म्हणतात,
अवघ्या सोडियेल्या मोटा । आजिचा दहींकाला गोमटा ॥१॥
घ्या रे घ्या रे दहींभात । आम्हा देतों पंढरीनाथ ॥२॥
कर्नाटकमध्ये मोसरन्नाशिवाय जेवणाला पूर्णविरामच लागत नाही. एखाद्या कोकणस्थानं दही भाताशिवाय आमचं पान हलत नाही असं म्हटलं तर त्याचा शब्दशः अर्थ घ्यावा कारण दही-भात वाढल्याशिवाय ते पान आणि पानावरचा दोघेही हलत नाहीत.
दहीभाताचा उगम द्राविडी प्रांतातला असला तरीही तो बनवायला मात्र द्राविडी प्राणायाम करावा लागत नाही. कुठल्याही तांदळाचा मऊसर भात, चांगलं लागलेलं घट्ट दही, फोडणीसाठी मोहरी-कढीलिंब आणि जरासं मीठ इतका आटोपशीर कारभार. कुणी फोडणीत हिंग आणि वाळलेली लाल मिरची घालतात. कधी थोडी भिजवून मग फोडणीत घातलेली उडदाची डाळही दही-भाताला आणखीनच लज्जत आणते. काही ठिकाणी डाळिंबाचे दाणे पेरून सजवलेला दहीभात पोटाआधी डोळेही सुखावून जातो. पण अमुक वेळी हे खाऊ नये, अमक्यात तमके टाकू नये अशा आयुर्वेदातल्या अनावश्यक सूचनांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करावं आणि नको तिथे विरजण पडू देऊ नये.
परिपूर्ण दहीभात कसा असावा... माझी तर बुआ अगदी साधी आणि सात्विक कल्पना आहे. तांदूळ हा आंबेमोहोर असावा. सकाळीच तापवलेल्या दुधावरची ताजी साय आणि त्याखालचं जरासं घट्ट दूध असावं, पांढऱ्या सटात लावलेलं, न मोड्लेलं कवड्यांचं दही असावं आणि चवीला थोडंसं मीठ. बस्स एवढंच! आणि हो, या पाच शुभ्रधवल घटकांचं हे पंचामृत नवीन ताटात किंवा वेगळ्या भांड्यात कालवायचं. बाकीचं जेऊन झाल्यावर त्याच ताटात दहीभात कालवणारे महाभाग बघितले की माझ्याच पोटात कालवाकालव होते.
अशा दहीभाताची तुलना करायचीच झाली तर शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या एखाद्या महात्म्याशीच करावी. सत्संगाने सर्व तामसी विचार निवळून जशी मनःशांती मिळेल त्याच पातळीची क्षुधाशांती या दहीभाताने होते.
मला तर कधी वाटतं की समुद्र-मंथनातून निघालेलं विष-प्राशन केल्यावर दाह कमी करण्यासाठी महादेवानंही पार्वतीला “अगं जरा वाडगाभर दहीभात कालवून आणतेस का” अशी फर्माईश सोडली असेल. अशा या अमृताशीही पैजा जिंकणाऱ्या दहीभाताच्या घटकांना "व्हाईट पॉयझन" म्हणणाऱ्यांना काय बोलावं?
दरवर्षी आपल्याकडे बाप्पाचे स्वागत मोदकांनी होत असले तरी गौरी विसर्जनाच्या वेळी निरोप मात्र दहीभाताने द्यायची बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे. त्याला कारणही तसेच असावे. कदाचित म्हणूनच तुकोबा म्हणतात…
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥
वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥
म्हणजेच, हा दहीभात खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्म घेऊ कारण असा हा मधुर दहीभात स्वर्गातही मिळत नाही.
प्रतिक्रिया
12 Nov 2024 - 11:52 am | कर्नलतपस्वी
पण सर्वांच्या आवडीचा.
चांगला सजवला आहे. अजूनही आमच्या शिणेची लोकं दही भाता शिवाय पानावरून उठत नाही.
12 Nov 2024 - 12:46 pm | Bhakti
सुंदर लिहिलंय! लहानपणी मोठ्यांच्या पंगती
बसायच्या तीनदा भात वाढायचे असतं एवढ सांगितले जायचे.शेवटचा भात दहीभात घेण्याचा आग्रह व्हायचा.
12 Nov 2024 - 4:20 pm | टर्मीनेटर
लेख वाचायला सुरुवात केल्यावर आलेल्या ह्या दुसऱ्याच वाक्याला जाम हसलो 😀
मी भातप्रेमी नाही आणि नुसता ताक भात किंवा दही भात अजिबात आवडत नाही. पण दाक्षिणात्य पद्धतीची दही-बुत्ती खायला आवडते, विशेषतः उडदाच्या डाळीमुळे आणि लाल मिरचीमुळे तीला जो स्वाद प्राप्त होतो तो फार आवडतो!
12 Nov 2024 - 4:45 pm | सरनौबत
माझा देखील अतिशय आवडता पदार्थ आहे. दहीपोह्यात मला दाण्याचा कूट आणि किंचित साखर आवडते. ज्ञानोबांनी देखील
दहिभाताची उंडी लाविन तुझिये तोंडी ।
जीवा पढिये त्याची गोडी सांगे वेगी ॥
म्हणलं आहे. खूप छान माहितीपूर्ण लेख.
12 Nov 2024 - 6:48 pm | कंजूस
सहमत.
तळणीची भरलेली मिरची यासोबत हवीच.
12 Nov 2024 - 7:06 pm | Bhakti
हे घ्या मोरमिलगाई मिरची,केरळी खाद्य पदार्थ दुकानातून घेतलेली.मी तर रोज कोशिंबीरला याच मिरचीची फोडणी देते.
https://www.misalpav.com/node/52379
12 Nov 2024 - 7:57 pm | अथांग आकाश
लेख आणि चित्रे आवडली!
13 Nov 2024 - 11:02 pm | किल्लेदार
कर्नलतपस्वी, Bhakti, कंजूस, अथांग आकाश - प्रतिक्रियांबद्दल आभार
टर्मीनेटर - पोळ्या करायचा कंटाळा आणि पचायला हलका असल्यामुळे मी भातप्रेमी झालो आहे. विशेषतः दर वेळी वेगवेगळा तांदूळ अजमावून बघायला मजा येते. एखादी लेखमाला तांदळावरही लिहून काढा.
सरनौबत - मास्तरांच्या बासनातले दही पोहे खाल्लेत कि काय ?
14 Nov 2024 - 11:43 am | नचिकेत जवखेडकर
मस्स्स्त लेख. दहीभात अत्यंत आवडता प्रकार.
जपानात शिकायला असताना एकदा बरोबरीच्या जपानी मुलांना सांगितलं दहिभाताबद्दल. तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. एकानी विचारलं की मळमळत नाही का हे कॉम्बिनेशन बघूनच. म्हटलं की अरे बाबा, आम्ही पहिल्यापासून खातोय ते आणि मुळात सगळं जेवण झालं की छान शांत होतं पोट. तरीदेखील दहीभाताला दोष देणं थांबवलं नाही. तेव्हा मी देखील त्यांना म्हटलं की तुम्हीसुद्धा ऑक्टॉपस खाताना दिसलात की मला मळमळतं! तेव्हा थांबले.
21 Nov 2024 - 6:31 am | किल्लेदार
:)
24 Nov 2024 - 6:19 am | किल्लेदार
बाय द वे ऑक्टोपस पण छानच लागतो :)
21 Nov 2024 - 11:34 am | सस्नेह
दहीभातासारखाच चुरचुरीत लेख !
दहीभाताची पंखी,
स्नेहा
24 Nov 2024 - 6:18 am | किल्लेदार
:)
29 Nov 2024 - 12:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दहीभाताची कहानी आवडली. लै भारी.
-दिलीप बिरुटे
9 Dec 2024 - 3:41 am | मुक्त विहारि
माझ्या जेवणाचा शेवट, ताकभात किंवा दहीभात खाल्या शिवाय, होत नाही....