लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील :
भाग १ - http://www.misalpav.com/node/45320
भाग २ - http://www.misalpav.com/node/45361
भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433
भाग ४ - https://misalpav.com/node/45481
भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533
भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569
आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू
भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांमध्ये सुमारे ३५०० किलोमीटरची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. शेकडो वर्षांपासून दोन्ही देशात बहुस्तरीय सांस्कृतिक संपर्क असला तरी नागरिकांनी एकमेकांच्या देशात स्थायिक होण्याचे प्रमाण फारच कमी आहे, अगदीच ‘सागर में बूंद’ किंवा समुद्रात खसखस! भारतात शरणार्थी म्हणून आलेले लाखभर तिबेटी बांधव सोडले तर चीनच्या मुख्य भूमीतून येऊन भारतात वसलेल्या चिनी व्यक्तींची संख्या जेमतेम काही हजार असेल. चिनी लोक भारतात सर्वप्रथम स्थायिक झाले ते कोलकात्यात, आजपासून साधारण २३० वर्षांपूर्वी. आज सुमारे दोन हजार चिनी कोलकात्यात राहतात. बहुतेकांचे पूर्वज अनेक पिढ्या कोलकात्यातच आहेत. चिनी वस्ती असलेल्या भागांना ‘चायना टाऊन’ म्हणण्याचा प्रघात आहे. चायना टाऊन म्हणता येतील अशा दोन वस्त्या आजच्या कोलकात्यात आहेत. जुने चायना टाऊन आणि नवीन. पैकी जुने चायना टाऊन रवींद्र सारिणी जवळ तिरेता बझार (Tiretta Bazar) भागात आहे. पूर्व कोलकात्याच्या तांगरा भागात दुसरे ‘न्यू चायना टाऊन’ आहे.
कोलकाता म्हणजे बजबजपुरी असे स्थानिक लोकही म्हणतात. पण कोलकात्यात खरोखरीच एक ‘बजबज’ नामक वस्ती आहे – नावाला आणि अर्थाला जागणारी! याच बजबज भागात काही चिनी व्यापाऱ्यांनी स्वतःची पहिली पेठ वसवली होती. तोंग अच्यू (Tong Achew) नामक एका यशस्वी चिनी व्यापाऱ्याने येथे सर्वप्रथम जागा विकत घेऊन साखरेचा कारखाना टाकायचे ठरवले. त्यासाठी त्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून रीतसर परवानगी मिळवली. साखर कारखान्यासाठी ६५० बिघा जमीन दीर्घमुदतीच्या करारावर देणाऱ्या परवानगीपत्रावर खुद्द गव्हर्नर जनरल वॉरेन हेस्टिंग्सची सही आहे (वर्ष १७७८). पुढे कारखान्याच्या कामासाठी चीनमधून काही जाणकार आणि मजूर लोक आले. २-३ वर्षात साखरेचे उत्पादन सुरू झाले पण तितक्यातच तोंग मरण पावला, साखर कारखाना बंद पडला. त्याच्यासोबत आलेले चिनी परत गेले नाहीत, कोलकात्यातच राहिले. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मृती, भाषा आणि धार्मिक परंपरांच्या रूपाने कोलकात्यात त्यांच्या देशाला जिवंत ठेवले. आज हा भाग तोंग अच्यूच्या नावाने अचीपूर म्हणून ओळखला जातो. अच्यूच्या नावे एक स्मृतिस्थळ तेथे आजवर आहे.
पुढच्या काही दशकांमध्ये कोलकात्याला येऊन वसणारे चिनी लोक सुतारकाम आणि चामडे कमावण्याच्या, पादत्राणे घडवण्याच्या कामात तरबेज होते. पहिल्या महायुद्धानंतर कोलकात्यात चिनी चर्मकारांचे अनेक कारखाने आणि दुकाने मोठ्या प्रमाणावर उघडली. बेंटिक स्ट्रीट – धरमतल्ला भागात ही दुकाने होती, पैकी काही आजही आहेत. ब्रिटिश सैन्याला आणि अधिकाऱ्यांना उत्तम कमावलेल्या कातड्यांपासून बनवलेल्या वस्तूंचा पुरवठा चिनी कामगार करत. ब्रिटिश रेसिडेन्सी वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठ्या चामडी पखालीतून पाणी वाहून नेणारे ‘भिश्ती’ शहरात नेमलेले असत. त्यांना मोठ्या प्रमाणात लागणाऱ्या चामडी पखाली चिनी कामगार पुरवत, त्यामुळे त्यांच्या कौशल्याला विशेष मागणी होती. (अगदी अलीकडे साठच्या दशकापर्यंत पखालीतून पाणी वाहून नेणारे भिश्ती जुन्या शहरात कार्यरत होते.) एकेकाळी सुमारे ३० हजार संख्येने असलेल्या चिनी लोकांना त्यांच्या पद्धतीचे अन्न पुरवणाऱ्या बेकरी आणि छोटी उपाहारगृहे चालवणारे चिनी बरेच होते.
कोलकात्यातील चायना टाऊन सिंगापूर, ऑस्ट्रेलिया किंवा अमेरिकेतल्या चायना टाऊन सारखी चकचकीत अजिबातच नाहीत. दोन्ही चायना टाऊनमध्ये मूळचे चिनी लोक दाटीवाटीने राहतात. पैकी जुने चायना टाऊन तेथील ‘चायनीज चर्च’ साठी ओळखल्या जाते. सहा-सात चायनीज चर्च अजूनही कोलकात्यात आहेत. प्रचंड गर्दीच्या दाटीवाटीने वसलेल्या गल्लीबोळात चिनी दैवतांची प्राचीन देवळे आहेत, स्थानिक चिनी लोक त्यांना देऊळ-टेम्पल न म्हणता चायनीज 'चर्च' का म्हणतात हे कोडेच आहे.
कोलकात्याच्या ब्लॅकबर्न रोडवरचे सी वोई चिनी चर्च (स्थापना १९०८)
हा भाग घनदाट लोकवस्तीचा आणि गलिच्छ असल्यामुळे सर्व चायनीज चर्चेसना भेट देणे शक्य नाही. काही जागी मात्र जाता येते. पैकी ट्रक टर्मिनस जवळचे क्वान यिन ह्या चिनी देवीला समर्पित रेड चर्च/सी ईप हे त्यातल्या त्यात शोधायला सोपे.
आतील मुख्य मूर्तीची दुर्गा झाली आहे, म्हणजे पूर्ण बंगालीकरण. अंगभर रेशमी शेला, भाळी कुंकुम, गळ्यात पुष्पहार. आजूबाजूची सजावट मात्र चिनी आणि प्रसाद म्हणून हक्का नूडल्स. सगळीकडे अंधार, फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाश. बाहेरच्या प्रचंड कोलाहलाचा आणि कुरुपतेचा आत गेल्यावर विसर पडतो ही त्या जागेची जादू असावी.
तांगरा भागात असलेल्या न्यू चायना टाऊन भागातही घनदाट लोकवस्ती आहे. इथे भल्या पहाटे रस्त्यावर दुकाने थाटून काही चिनी मंडळी चिनी खाद्यपदार्थ विकतात. अन्यत्र सहसा न मिळणारे, आत वेगवेगळे सारण असलेले चिनी पद्धतीचे पाव, मोमो, स्प्रिंग रोल, खास कॅण्टोनीज चवीचे पोर्क सूप अशी न्याहारी करायला काही स्थानीय लोक आणि थोडेफार विदेशी पर्यटक येतात. स्वच्छतेचा आग्रह मात्र ह्या भागात धरता येत नाही.
न्यू चायना टाऊन मध्ये काही चिनी रेस्तराँ आहेत. नाव वगळता तिथे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये फार काही चिनी नाही, देशभर इतरत्र मिळणारे ‘इंडो-चायनीज’ इथेही आहे, फक्त मालक मंडळी चीनवंशी आहेत. इथेच काही पडक्या घरांमध्ये ‘सॉस-मेकिंग मॉम्स’ राहतात – शहरातल्या हॉटेलांना आणि हातगाड्यांना लागणारे शेकडो लिटर चिली सॉस घरी तयार करून विकणाऱ्या कुटिरोद्योजक चिनी महिला!
‘मून केक फेस्टिवल’, चिनी नववर्ष, चिनी वर्षाच्या सातव्या महिन्यातला हिंदू पितृपक्षासारखा पूर्वजांना भोजन अर्पण करण्याचा ‘हंग्री घोस्ट फेस्टिवल’ असे काही महत्त्वाचे प्रसंग सोडल्यास फारसे काही इथे घडत नाही. या संपूर्ण भागाला अस्वच्छतेचा शाप आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे कोणाला तिथे जावेसे वाटत नाही. चीनवंशी जनताही आता फारशी तिथे राहात नाही, एकेकाळी संख्येने २० हजार असलेले चिनी आता हजार-दोन हजारच्या संख्येत असावेत.
समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात असे म्हटले जाते. कोलकात्याच्या चिनी रहिवासीयांनी स्वतःची भाषा जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याचे दाखले मिळतात. महत्त्वाचे म्हणजे ही चिनी मंडळी श्रीमंत नव्हती. पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात आलेल्या विपन्न लोकांना भाषा आणि संस्कृती टिकवणे अधिकच कठीण होते. चिनीपारा भागातली पहिली चिनी भाषा शिकवणारी शाळा सुरु झाली विसाव्या शतकाच्या सुरुवातीला. Chien Kuo Chinese school असे शाळेचे नाव. स्थानिक चिनी लोकांचा स्वभाषेशी संपर्क क्षीण झाला होता, त्यामुळे स्थानिक शिक्षक मिळवणे अवघड होते. समाजाच्या पुढाऱ्यांनी जुन्या ओळखीतून कॅण्टोनीज शिक्षक मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न फळला नाही. सरकारी मदत म्हणावी तर तत्कालीन चिनी सरकार ह्या उपद्व्यापाला अनुकूल नव्हते. त्यामुळे काही शिक्षक तैवानमधून आयात करण्यात आले. १४ शिक्षक आणि सुमारे ७०० विद्यार्थी अशी ही शाळा मुलांना कॅण्टोनीज भाषा, मँडरिन लिपीचे लेखन-वाचन, चिनी लोकसंगीत, गणित आणि समाजशास्त्रात पारंगत करत होती. पुढे १९५० सालाच्या दरम्यान शाळा बंद पडली ती परत कधीही सुरु न होण्यासाठी. शहरातील चिनी लोकांनी चालवलेल्या अन्य काही छोट्या शाळा प्राथमिक शिक्षण देत. अपुरा पैसा आणि पुरेशा पटसंख्येअभावी त्याही हळू हळू बंद पडल्या. १९६२च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर चिनी कुटुंबांना कोलकात्याच्या बाहेर नेण्यात आले. हेरगिरीच्या संशयामुळे अनेकांना कायमचे तडीपार करण्यात आले. त्यावेळी ३० हजाराच्या आसपास असलेली चिनी लोकसंख्या कोलकाता-भारत सोडून झपाट्याने अन्य देशात विखुरली. याचा परिणाम म्हणून कोलकात्यात असलेल्या जवळपास सर्वच चिनी भाषक शाळा बंद पडल्या, पुन्हा सुरू होऊ शकल्या नाहीत. एक दोन शाळांची जबाबदारी कॅथलिक चर्चने स्वीकारली आणि सुमारे पाऊणशे मुले पटावर असलेली एक शाळा आणखी काही वर्षे चालवली. दरम्यान अनेक चिनी कुटुंबीयांनी धर्मपरिवर्तन करून ख्रिस्ताच्या धर्माला जवळ केले आणि इंग्रजी त्यांची प्रमुख भाषा झाली. कमी पटसंख्या, आर्थिक मदतीचा अभाव आणि चिनी भाषा शिकण्यासाठी अनुत्सुक नवीन पिढी अशा कचाट्यात सापडून चिनी भाषेतले शिक्षण हळूहळू कोलकात्यातून हद्दपार झाले. शांघाय शहरातून आलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी स्थापन केलेले ग्रेस लिंग लियांग चायनीज चर्च स्कूल (स्थापना १९४९) आणि त्याची एक शाखा आज कोलकात्यात आहे. म्हणायला चिनी शाळा असली तरी तेथे फक्त इंग्रजी भाषेतले शिक्षण दिले जाते.
काही वृद्ध मंडळी सोडली तर खुद्द चिनी स्वतःची भाषा बोलू-लिहू शकत नाहीत. कुठलीही भाषा मरणे म्हणजे एक संस्कृती नष्ट होणे. तदनुसार ‘कोलकात्यातील चीन’ म्हणजे आता फक्त चिनी खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या, चार-दोन चिनी रेस्तराँ आणि काही पडकी चिनी देवळं वागवणारा गलिच्छ भाग एवढेच.
शक्ती सामंतांच्या ‘हावडा ब्रिज’ ह्या हिंदी चित्रपटातलं प्रसिद्ध गाणं आहे – मेरा नाम चिन चिन चु. गीता दत्तच्या आवाजातले ‘बाबूजी मैं चीन से आई चीनी जैसा दिल लाई’ कोलकात्यातील चिनीजनांचे वर्णनच जणू ……. साखरेला बंगालीत ‘चीनी’ आणि चीनमधून आयात होणाऱ्या पोर्सेलीनला “चिनीमाटी’ म्हणतात. दोनही समूहात शेकडो वर्षांच्या संपर्काचा हा प्रभाव असावा.
गाण्याचा आस्वाद घ्या - मेरा नाम चिन चिन चू (जालावरून साभार)
चिनी समाजाप्रमाणेच कोलकात्याला आपले म्हणणाऱ्या आणि आता कोलकात्यातून अस्तंगत होत असलेल्या देशी-विदेशी भाषा-धर्म-वंशसमूहाबद्दल पुढे..
क्रमशः
(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)
प्रतिक्रिया
22 Oct 2019 - 1:28 pm | कुमार१
* समाज-संस्कृती आणि भाषा एकमेकांना जगवतात
>>> + १११
लेखमाला संपली की तुमच्याबरोबर कोलकाता कट्टा करावासा वाटतोय ☺️
23 Oct 2019 - 11:23 am | अनिंद्य
चला, जाऊया :-)
22 Oct 2019 - 2:18 pm | जॉनविक्क
मनस्वी आन्नद झाला.
22 Oct 2019 - 2:25 pm | जेम्स वांड
वाटच पाहत होतो! कोलकात्याच्या अतूट भाग असणाऱ्या चायना टाऊन्स बद्दल! खल्लास लिहिलेत. तुमचे कोलकात्यावर विलक्षण प्रेम दिसते अनिंद्य!
बाकी कोलकाता चायना टाऊनचा उल्लेख करताना तिथल्या पाकसंस्कृतीचा पासींग रेफरन्स थोडा खटकला, सद्यांत हवा होता म्हणजे बघा जगाला इंडो चायनीजची देणगी देणाऱ्या चायना टाऊनमध्ये नेल्सन वांग हे बल्लवरत्न निपजले होते खिशात सत्तावीस रुपये घेऊन मुंबईला आलेल्या ह्या माणसाने चिकन मंचुरीयन ही डिश तर शोधून काढलीच पण इंडो चायनीज जेवणाचा प्रसारही भरपूर केला. चायना गार्डन नावाचं त्याचं इंडोचायनीज रेस्टॉरंट तुफान प्रसिद्ध होतं म्हणतात मुंबईत.
इंडो चायनीज हे फक्त चिनी आणि भारतीय फ्युजन जेवण नाही तर ते एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे, हॉटेल मध्ये न खाऊ शकणारे मजूर ते कमी पैशात पोटभरीचा पर्याय शोधणारे विद्यार्थी सगळ्यांना ह्या कुझीननं जगवलं आहे, इंजिनियरिंग कॉलेज हॉस्टेल किंवा कॅम्पस पासून "चिकन/व्हेज ट्रिपल शेजवान राईस" वेगळा काढता यायचा नाही! अन ह्या अद्वैताचा निर्माता नेल्सन वांग!
22 Oct 2019 - 6:35 pm | जालिम लोशन
सुरेख
23 Oct 2019 - 11:33 am | अनिंद्य
@ जेम्स,
अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही.
.... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत.
खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-
23 Oct 2019 - 11:33 am | अनिंद्य
@ जेम्स,
अधिकच्या माहितीबद्दल आभारी आहे. पण नेल्सन वांगचे कर्मक्षेत्र मुंबई आहे, कोलकाता नाही.
.... इंडो चायनीज एक अलटरनेटिव्ह फूड कल्चर आहे... याबद्दल पूर्ण सहमत.
खाण्यापिण्यावर तर लिहावे तितके थोडे :-) कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवर एक मोठा भाग लिहिणार आहेच. (भाग ९) तोवर हे खास तुमच्यासाठी :-
22 Oct 2019 - 2:39 pm | सुमो
गाण्याची लिंक गंडलिये बहुधा....
23 Oct 2019 - 11:19 am | अनिंद्य
@ सुमो,
हो, कायतरी चुकले.
योग्य लिंकबद्दल आभारी आहे. आता संपादक मंडळी लेखात लिंक दुरुस्त करतील तर होईल.
22 Oct 2019 - 8:20 pm | सुधीर कांदळकर
कुठेतरी वाचले होते की चायना टाऊनमधले चिनी सतत काम करतात. भारतात मिळणारे सर्वोत्कृष्ट बनावटीचे बूट तिथेच मिळतात आणि तेही योग्य किंमतीत. आता कातडे कमावण्याच्या आणि शिलाईच्या आधुनिक यंत्रांमुळे कदाचित फरक पडला असेल.
पखालीबद्दल वाचून मुंबईतली एक जुनी आठवण जागी झाली. मुंबईत एके ठिकाणी बालपणी ट्राममधून फिरतांना मला आठदहा फूट लांब, तीनचार फूट रुंद आणि दोन अडीच फूट खोल अशी लोखंडी भांडी पदपथाच्या कडेला रस्त्याला लागून ठेवलेली आढळली. ती कसली याचे उत्तर तीर्थरूप देऊ शकले नव्हते. पण एका वृद्धाने सांगितले की पूर्वी घोड्यांच्या ट्राम्स होत्या. त्या लोखंडी भांड्यांत घोड्यांसाठी पाणी ठेवलेले असे.
कलकत्त्याची प्रचि पाहिली की मन नकळत मंबईशी तुलना करतेच. तशाच ब्रिटीश वास्तू. पण मुंबईत न आढळणारी गोष्ट प्रचिंमध्ये दिसते ती म्हणजे लाल रंगाचा वापर. जमले तर ट्रामचे चित्र वा व्हीडीओ पुढील लेखांकात टाका.
धन्यवाद. पुभाप्र.
23 Oct 2019 - 4:46 pm | अनिंद्य
सुधीर जी, तुमचे अभिप्राय प्रत्येक भागात काहीतरी नवीन मुद्दा लक्षात आणून देतात, उदा. इमारतींचा लाल रंग !
खूप आभार.
चिनी आणि त्यांचे परंपरागत उद्योग दोन्ही आता हद्दपारच आहेत म्हणा ना.
ट्रामचे फोटो ?
हा घ्या एक जुना - कोलकात्यातील घोड्यांच्या ट्रामचा. आमच्या पिढीला नाही बघायला मिळाली ही ट्राम.
23 Oct 2019 - 4:47 pm | अनिंद्य
आणि हा घ्या नवीन, आतून.
ह्यात मात्र आजही प्रवास करता येतो. छोटा का होईना.
24 Oct 2019 - 11:21 am | अनिंद्य
तुमचा मुबईतील ट्राम्सबद्दलचा लेख वाचून तुमचे ट्राम प्रेम लक्षात आले !
23 Oct 2019 - 8:40 am | प्रचेतस
जबरदस्त.
चायना टाऊनबद्द्ल तुम्ही लिहाल असं वाटलंच होतं.
कोलकत्याची विभिन्न अंगांनी उत्त्म माहिती मिळत आहे.
23 Oct 2019 - 9:40 am | यशोधरा
मध्यंतरी एक कार्यक्रम पाहिला होता एका चॅनेलवर, त्यात दाखवले होते की कलकत्त्याची चिनी वंशाची तरुणाई आता इतर देशांत स्थायिक होत असल्याने - कॅनडा, ऑस्ट्रेलिया वगैरे - कलकत्त्यात आता चायना टाऊनमध्येही चिनी मंडळी खूप कमी दिसतात. पूर्वी चायना टाऊन मध्ये जी चिनी मंडळी रस्त्यावर मोमो, सूप इत्यादी विकायला घेऊन बसत असत, तो बाजारही आता बऱ्यापैकी स्थानिकांच्या हातात गेला आहे म्हणे. कार्यक्रमात रेड चर्चचा सुद्धा उल्लेख होता.
चायना टाऊनवर अजून लिहिलेलेही चालले असते.
23 Oct 2019 - 11:38 am | अनिंद्य
बरोबर.
आता फार कमी राहिलेत चिनी कोलकात्यात, २००० च्या आतबाहेर असतील. इंग्रजी आणि बंगाली बोलतात, स्वतःची भाषा येत नाही. म्हणूनच त्यांच्याबद्दल थोडक्यात लिहावेसे वाटले.
23 Oct 2019 - 9:44 am | कंजूस
मजेदार. हे असे काही भाग आम्ही जाऊ शकत नाही. लेखांतूनच वाचतो.
23 Oct 2019 - 11:50 am | सरनौबत
अप्रतिम लेख! पूर्वीचे भाग वाचायचं राहून गेलं, आता ह्या निमित्ताने नक्की वाचेन. कोलकत्याच्या अस्वच्छतेला वैतागून शिंपी आणि चांभार मुंबईत स्थायिक झाले असण्याची शक्यता आहे. ज्यांनी पुलंच्या अपूर्वाई मध्ये त्यांचे बूट आणि कोट बनवला ;-)
23 Oct 2019 - 1:17 pm | अनिंद्य
थँक्यू.
कानपुर आणि कोलकाता - गंगाकाठची ही दोन शहरं घाऊक चर्मोद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. दोन्हीकडे स्वच्छतेचा आनंदच आहे.
पूर्वीचे भागही अवश्य वाचा, , मत कळवत रहा.
24 Oct 2019 - 10:56 am | अनिंद्य
@ जॉनविक्क,
@ जालिम लोशन,
@ प्रचेतस,
@ कंजूस,
@ यशोधरा,
आपण वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनपर अभिप्रायाबद्दल आभारी आहे.
पुढील भाग आता दिवाळी अंकाचे 'रसग्रहण' झाल्यानंतर !
सर्वांना दीपावलीच्या खूप-खूप शुभेच्छा.
1 Nov 2019 - 1:32 pm | अनिंद्य
मालिकेचा पुढील भाग "आमार कोलकाता – भाग ८ – भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर" येथे आहे :-
https://misalpav.com/node/45615