प्रास्ताविक आणि मनोगत :-
'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले. त्यानिमित्ताने झालेल्या चर्चेत मुक्त विहारि, निशाचर, पिवळा डांबिस, प्रचेतस, वरुण मोहिते अशा चोखंदळ मिपाकरांकडून ‘बंगालच्या सांस्कृतिक अंगांविषयी, कोलकाता शहराबद्दल वाचायला आवडेल’ अशा अर्थाचे अभिप्राय प्राप्त झाले. तेच ह्या लेखमालेचे बीज आहे.
माझ्या दीर्घ संपर्कात आलेल्या भारतातील काही शहरांविषयी मराठीत लिहायचे मनात होतेच. तस्मात 'आमार कोलकाता' ही दीर्घ लेखमाला आजपासून क्रमश: प्रकाशित करीत आहे. उपलब्ध प्रवासवर्णनं आणि पर्यटकांच्या दृष्टीपलीकडल्या कोलकाता शहराची जडणघडण, तेथील लोक, समाज, त्यांचा वेगवेगळा आणि सामायिक इतिहास, स्थापत्य-कला-नाटक-सिनेमा-संगीत-भाषा-भूषा-भोजन अशी बहुअंगी ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
तुम्हां गुणिजनांचे अभिप्राय, सूचना, सल्ले आणि प्रतिसाद प्रार्थनीय आहेत.
* * *
आमार कोलकाता - भाग १
कोलकाता शहर म्हटले की तुम्हाला पटकन काय सुचतं?
माणसांची प्रचंड गर्दी, हुगळी नदीचे विस्तीर्ण पात्र अन त्यावरचा अनोखा हावडा ब्रिज, क्रिकेटचे ईडन गार्डन, फुटबॉलचे मोहन बागान आणि इस्ट बंगाल क्लब्स, ट्राम, भुयारी मेट्रो, रेल्वे, काळ्या-पिवळ्या जुनाट अँबेसेडर टॅक्सी आणि हातरिक्षा एकसाथ नांदणारे गर्दीचे रस्ते, सत्यजित रॉय - ऋत्विक घटक यांचे बंगाली चित्रपट, देशातील सर्वाधिक जुन्या शिक्षण संस्था, ब्रिटिशकालीन राजेशाही इमारती, मोठाली उद्याने, कळकट्ट झोपडपट्ट्या यापैकी काही गोष्टी डोळ्यांपुढे तरळतात ना? ह्या एका शहराच्या पोटात अनेक शहरं नांदतात. काहीजण शहराला 'सिटी ऑफ जॉय' म्हणतात तर काहींच्या मते कोलकाता हे गचाळ-गलिच्छ आणि गतवैभवावर जगणारे शहर. हे शहर काहींना विद्वानांची-विचारकांची भूमी वाटते तर काहींना निरर्थक वादविवादांमध्ये गुंग असलेल्या ‘स्युडो इंटलेच्युअल’ लोकांचे माहेरघर.
आपल्याच देशातील शहरं, आपलेच लोक ह्यामध्ये आपसात संपर्क, संवाद आणि देवाणघेवाण थोडी कमी आहे. पूर्व भारताशी तर आणखीच कमी. कोलकाता शहराबद्दल आधीच अनेक प्रवाद-पूर्वग्रह, त्यातून उर्वरित भारतीयांप्रमाणे मराठी जनतेचाही इकडे वावर-संपर्क कमी असल्यामुळे हे पूर्वग्रह अधिकच गडद आहेत.
माझं मत विचाराल तर महाराष्ट्र आणि बंगाल ही दोन्ही राज्ये काही बाबतीत अगदी भावंडं म्हणावी इतपत सारखी आहेत. समाजसुधारकांची सुदीर्घ परंपरा, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जहाल-मवाळ दोन्ही गटांचे बलिदान, विद्वानांची चिकित्सक वृत्ती, काव्य शास्त्र विनोदात रमणारे सुशिक्षित शहरी लोक, बऱ्यापैकी निष्पक्ष पत्रकारिता, स्थानिक संगीताची एक ठळक वेगळी परंपरा आणि नाटकांचे वेड. अनेक बाबीत सारखेपणा आहे, साम्यस्थळे आहेत. ह्या सर्व क्षेत्रांमध्ये होणार ऱ्हास सुद्धा दोन्हीकडे सारखाच आहे. कोलकाता आणि मुंबई शहरांच्या जडणघडणीत देखील अनेक बाबतीत समानता आहे.
इमारती, रस्ते आणि वस्त्यांच्या निर्जीव पसाऱ्या पलीकडे जिवंत शहर असतं. त्याला स्वतःचा स्वभाव असतो, त्याचे एक स्वत्व आणि सत्व असते. कोलकाता त्याला अपवाद नाही. असे जिवंत शहर एका दिवसात आकाराला येत नाही. गंगेसारखी नदी अनेक शतकांचा मैलोनमैल प्रवास करून सागराला जाऊन मिळते तेंव्हा नदीमुखाशी सुपीक गाळ साचतो. गंगेच्या खडतर प्रवासाचं संचितच जणू. ह्याची अनेक आवर्तनं होतात, गाळाच्या थरांची बेटं तयार होतात. यथावकाश निसर्गाची कृपा होऊन, दलदल, जंगल, तळी, मानवी वस्ती, शेती, कोळी-दर्यावर्दी, व्यापारी अशी कालक्रमणा होऊन हळूहळू शहर आकाराला येतं. हेच ते कोलकाता, भारतातील जुन्या महानगरांपैकी एक.
आज सुमारे सव्वातीनशे वर्षे वयोमान असलेल्या कोलकाताने काळाचे अनेक चढउतार बघितले आहेत. ब्रिटिश अंमलाखालील भारताची राजधानी असण्याचा प्रदीर्घ सन्मान असो की भारतीय उद्योगजगताची पंढरी असण्याचा अल्पजीवी रुबाब - कोलकाता एखाद्या स्थितप्रज्ञ योग्याप्रमाणे सर्व बदलांचा निर्लेप मनाने स्वीकार करत असल्यासारखे वाटते. मूळ शहर वसवले ब्रिटिशांनी. ब्रिटिश भारताची राजधानी म्हणून सुमारे चौदा दशकं मानाचे स्थान मिळवलेल्या ह्या शहरातून राजधानी दिल्लीला हलवली ती १९११ साली. त्यानंतर कोलकात्याच्या वैभवाची सोनेरी उन्हं उतरणीला लागली. ‘कलकत्ता’ शहर २००१ पासून 'कोलकाता' झालं, त्यालाही आता बराच काळ लोटला. 'विकास' करण्याच्या मागे कोलकाता फार उशिरा लागलं म्हणून असेल, आजही इतिहासातल्या वैभवाच्या खुणा सरसकट पुसल्या गेल्या नाहीत. एखाद्या जुन्या संस्थानिकाच्या पडक्या महालात आरसे-झुंबर, सांबराची शिंगे, पेंढा भरलेले वाघ-चित्ते ठेवले असावेत तसे ह्या शहराच्या विविध भागात गतवैभवाच्या इतिहासखुणा विखुरल्या आहेत. बहुतेक वयस्कर बंगाली भद्रलोकांना (‘जंटलमन’ला हा खास बंगाली शब्द - भद्रलोक.) स्वतःच्या इतिहासात रमायला आवडते, त्याबद्दल बोलायला, गप्पा मारायला तर खूप आवडते. स्वतःच्या जुन्या घराबद्दल, संयुक्त परिवाराच्या गोतावळ्याबद्दल, गल्लीतल्या दुर्गापूजेबद्दल, हुगळीच्या घाटाबद्दल, भोजनसंस्कृतीबद्दल, पिढीजात असलेल्या नातेसंबंधांबद्दल ठळक जाणवणारा जिव्हाळा असतो. ज्याला आपण इंग्रजीत ‘हॅविंग सेन्स ऑफ हिस्ट्री’ म्हणतो तो भाव कोलकात्याच्या भद्रलोकांत आढळतो. त्यामुळे काळ पुढे सरकला, बदलला तरी त्यांचं कोलकाता शहर त्यांना परकं होत नाही आणि माझ्यासारख्या उपऱ्यांनाही ते एका हव्याहव्याश्या आकर्षणात बांधून ठेवतं.
बंगाली भाषा-संस्कृतीचा पगडा असला तरी शहर पूर्वापार बहुआयामी आहे. कोण नाही इथं ? स्थानिकांसोबत पूर्व बंगालातून (म्हणजे आताच्या बांगलादेशातून) आलेले बंगाली आहेत, पिढ्यानपिढ्या राहणारे चिनी आहेत. पारशी, ज्यू, अर्मेनियन, अफगाणी, अँग्लो-इंडियन, नेपाळी आहेत. देशाच्या अन्य प्रांतातून आलेले मारवाडी, गुजराती, बिहारी, आसामी आहेतच. आता सर्वांनी हे शहर आपले मानले आहे आणि शहराने त्यांना सामावून घेतले आहे. कोलकात्याच्या इतिहासाने जेव्हढे समुदाय बघितले आणि रिचवले आहेत तेव्हढे अभिसरण आशियातील फार कमी शहरात झाले असेल. प्रदीर्घ ब्रिटिश अंमलाचा दृश्य परिणाम शहरावर आहे. पुलॉक स्ट्रीट, ब्रेबॉर्न रोड, कॅनिंग स्ट्रीट, सॉल्ट लेक, ईडन गार्डन स्टेडियम, बाजार स्ट्रीट, एक्सप्लेनेड, रायटर्स बिल्डिंग अश्या इंग्रजाळलेल्या नावांच्या इमारती-रस्ते म्हणजे इथल्या ब्रिटिश राजवटीच्या पाऊलखुणा.
पुण्यसलीला गंगा इथे ‘हुगळी’ आहे. तिचे विस्तीर्ण पात्र, दोन्ही काठांवर दाटीवाटीने वसलेले महानगर आणि तो प्रसिद्ध 'हावडा ब्रिज' हे कोलकात्याचे चित्र जुनेच पण नित्यनूतन आहे.
कोलकाता एक नैसर्गिक बंदर आहे. समुद्री मार्गाने व्यापारासाठी एक भरवशाचे ठिकाण असा लौकिक पूर्वापार आहे. भौगोलिक रचनेमुळे गंगा समुद्राला मिळते त्या खाडीमुखातून समुद्री जहाजे आतल्या प्रदेशात हाकारणे सोपे होते. गंगेच्या विस्तीर्ण पात्रातून देशांतर्गत जलवाहतूक परंपरागतरित्या होत असल्यामुळे बंदर अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांना फायद्याचे होते. आजचे कोलकाता शहर आहे त्या भूमीवर इंग्रज व्यापारी पार १६९० सालापासून ये-जा करीत होते. आर्मेनियन, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीझ व्यापारी त्याही आधीपासून. गंगेकाठच्या विस्तीर्ण प्रदेशात बराच व्यापार जलमार्गाने बिनबोभाट चालत होता. ह्यात तो कुप्रसिद्ध अफूचा व्यापारही आला. भारतात पिकलेली अफू विकत घेऊन ती समुद्रमार्गे चीनमध्ये आणि अन्यत्र नेण्याचा उद्योग हुगळीकाठी जोरात होता.
वस्तूंच्या व्यापाराबरोबरच सुमारे पाच लाख भारतीय मजुरांना भारताबाहेर सूरीनाम, फिजी, गुयाना, मॉरिशस अश्या अनेक देशात मजूर म्हणून नेण्यासाठी कोलकात्याचे बंदर प्रामुख्याने वापरण्यात आले. विदेशी लोक भारतात येणे आणि भारतवंशीय लोक जगभर विखुरणे - दोन्ही अभिसरणात कोलकात्याच्या वाटा आहे तो असा. भारताच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर खुष्कीच्या मार्गाने किंवा जुन्या रेशीम मार्गाने होणाऱ्या प्राचीन व्यापाराचे आणि अनुषंगिक राजकारण, युद्धे, सामाजिक क्रियाकलापांचे जेवढे दस्तावेजीकरण झाले आहे तेवढे भारताच्या पूर्व भागातल्या व्यापार-राजकारण-समाज विषयांचे झाले नाही किंवा फारसे अभ्यासले गेले नाही. आजही परिस्थिती फार वेगळी नाही, भारतीय पूर्वभाग थोडा उपेक्षित आहे हे उघड आहे. तर ते एक असो.
* * *
आजचे कोलकाता शहर वसण्याची खरी सुरुवात झाली १६९० साली ! ब्रिटिश गोऱ्या साहेबानी सबर्ण रॉयचौधुरी ह्या स्थानिक जमीनदाराला त्याच्या ताब्यातली तीन छोटी गावे भाड्यानी मागितली. भाषेची अडचण आल्यामुळे दुभाषा म्हणून मुर्शिदाबादहून एक माणूस बोलावण्यात आला, चर्चा होऊन भाडे ठरले १३०० रुपये महिना. स्थानिक वस्तीला हात लावायचा नाही ही जमीनदाराची अट ब्रिटिशांनी मान्य केली आणि रिकाम्या जमिनीवर ब्रिटिशांना हव्या त्या इमारती बांधण्याची सूट रॉयचौधुरीनी दिली. भाडेकरार झाला.
दलदलीचा भाग जास्त, त्यामुळे चिखल, साप, डास आणि कीटकांची संख्या प्रचंड. प्यायला शुद्ध पाणी, चांगले रस्ते आणि घरे बांधण्यासाठी लागणारे सामान - सर्व बाबतीत आनंदच होता. त्यात दरवर्षी येणाऱ्या साथीच्या रोगांमध्ये अनेक माणसे दगावत. तरीही एकदा निर्णय घेतला की तो सहसा बदलायचा नाही ह्या ब्रिटिश शिरस्त्याप्रमाणे कोलकाता शहराची मुहूर्तमेढ रोवली गेली, हळू हळू वस्ती वाढू लागली. धनाची आवक दुःखाची आणि अडचणींची धग कमी करतेच. तस्मात, व्यापाराची मुळे धरू लागली तशा अडचणी कमी वाटू लागल्या. दोन पाच वर्षात एक छोटा किल्ला आणि वखार आकाराला आली.
शतक पालटले. ह्याचसुमारास अर्मेनिया ह्या देशातून आलेले काही श्रीमंत व्यापारी भारताच्या पूर्व भागात व्यापारासाठी चांगल्या बंदराच्या शोधात होते. ते हुगळीच्या दुसऱ्या काठावर जमीन विकत घेते झाले. सधन आर्मेनियन व्यापाऱ्यांना त्यांचा धर्म प्राणप्यारा होता, त्यामुळे लवकरच १७०७ साली त्यांनी हुबळीकाठी स्वतःचे 'होली चर्च ऑफ नाझरेथ' प्रार्थनास्थळ बांधले आणि त्याजवळ वस्ती केली. (हे चर्च सध्याच्या पार्क सर्कस भागात सर्वबाजूनी प्रचंड बांधकामे आणि घनदाट वस्ती असलेल्या भागात एका छोट्या गल्लीत आहे. त्याला आर्मेनियन ‘चर्च’ म्हणतात पण दुरून ही इमारत एखाद्या हिंदू मंदिरासारखी दिसते.)
१७२६ साली ब्रिटिश सम्राट जॉर्ज पहिला (हा ब्रिटिश सम्राट जर्मन होता आणि आजही जर्मनीतच चिरविश्रांती घेतोय) यानी फर्मान काढून कोलकात्याला 'मेयर्स कोर्ट' नियुक्त केले आणि अधिकृतरित्या 'कोलकाता शहर' आकारास आले. आता चिखल वाळवून रस्ते बांधण्यात आले, शौचासाठी थोड्या दूरवर वेगळ्या जागा ठरल्या, कुडाच्या झोपड्या जाऊन पक्क्या चुना-विटांच्या इमारती बांध्याची सुरवात झाली. राजनियुक्त मेयरकडे न्यायनिवाडा करण्याचे अधिकारही देण्यात आले.
अफूच्या प्रचंड नफा देणाऱ्या व्यापाराबरोबरच चहा, नीळ, रेशमी वस्त्रे, मसाले, कापूस, मीठ अश्या अनेक भारतीय पदार्थांचा व्यापार कोलकात्यातून चालत असे. ब्रिटिश व्यापारी कोलकात्यातून स्थानिक माल युरोपात विकून गब्बर होऊ लागले तशी त्यांना वखारींसाठी जास्त जागेची गरज भासू लागली. म्हणून अधिकची गावे - जमिनी विकत घेण्यात आल्या. पुढे १७६५ साली ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल प्रांताचे दिवाणी हक्क मिळाले आणि खऱ्या अर्थाने कोलकात्याचे भाग्य फळफळले. व्यापाराबरोबरच आता करवसुली आणि सत्ता संचालनाचे काम ब्रिटिश साहेबाच्या हाती आले. कर घेतो म्हटल्यावर नागरिकांसाठी सोईसुविधा निर्माण करण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी आली. यथावकाश १७७३ साली कोलकात्याला ब्रिटिश-इंडियाची राजधानी करायचे ठरले आणि कोलकात्याचे सुवर्णयुग क्षितिजावर दिसू लागले.
ब्रिटिश सत्तेनी कोलकात्याला आपले ठाणे केले आणि इथे व्यापारी उलाढाल वाढली. देशोदेशीचे भारतात ये-जा असलेले व्यापारी कलकत्त्याला खास थांबा घेऊ लागले. शहर भरभराटीला आले तसे अनेक देशातून आलेल्या व्यापाऱ्यांनी वखारी स्थापन केल्या, काहींनी कोलकात्याला वास्तव्य करायला सुरवात केली. ब्रिटिश, डच, फ्रेंच, आर्मेनियन, चिनी असे देशोदेशीचे व्यापारी येऊन वसल्यामुळे बंगाली वळणाचे कोलकाता बहुभाषक आणि बहुसांस्कृतिक रंगात न्हाऊन निघाले, ‘कॉस्मोपॉलिटन’ झाले. १७०० सालापासून कोलकाता हे पाश्चात्य धाटणीचे शहर म्हणून आकारास येऊ लागले होते, तत्कालीन भारतीय शहरांपेक्षा थोडे वेगळे. (पुढे मुंबई-बॉम्बे आणि चेन्नई-मद्रास ही शहरे पण अशीच विकसित झालीत).
बंगालची फाळणी, बांगलादेशची निर्मिती, व्यापार-रोजगाराच्या संधी आणि शहरीकरणामुळे कोलकात्यात नव्याने येऊन स्थायिक होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक मोठ्या समूहासोबत त्याचा स्पष्ट-अस्पष्ट ठसा शहरावर नव्याने उमटतो आहे. शहर बहुरंगी-बहुढंगी होतेच, तो आयाम आजही कायम आहे. म्हणूनच ह्या एका शहरात अनेक शहरे दडली आहेत असे म्हणता येते. फार काही बोलले-वाचले जात नसले तरी अनेक बाबतीत प्रथमपदाचा मान कोलकाता शहराकडे आहे. भूतकाळात रमलेले, भविष्याकडे आशेने बघत आजचा दिवस आनंदाने साजरा करणारे कोलकाता शहर पुढील भागांमध्ये आपण जवळून बघणार आहोत.
(क्रमश:)
(अन्यत्र पूर्वप्रकाशित. लेखातील कोणताही भाग लेखकाच्या परवानगीशिवाय अन्यत्र वापरू नये. काही चित्रे जालावरून साभार.)
प्रतिक्रिया
18 Sep 2019 - 1:32 pm | श्वेता२४
या लेखमालेच्या निमित्ताने आम्हाला मेजवानीच मिळणार आहे. कलकत्ता व तेथील संस्कृतीबद्दल आकर्षण आहेच. त्यामुळे माहितीत भर पडणार. तुमचा हा लेख अतीशय विस्तृत माहितीसह आहे. खूप आवडला. पु.भा.प्र.
20 Sep 2019 - 1:14 pm | अनिंद्य
@ श्वेता२४,
पहिल्यावहिल्या प्रतिसादाबद्दल आभार.
25 Sep 2019 - 2:45 pm | जव्हेरगंज
26 Sep 2019 - 10:53 am | अनिंद्य
@ जव्हेरगंज,
अरे वा !
तुमच्या ह्या आगळ्यावेगळ्या प्रतिक्रियेमुळे खूप आनंद झाला.
18 Sep 2019 - 1:46 pm | टर्मीनेटर
खुब भालो....पहिला भाग आवडला.
छान सुरुवात, पुढील भागांच्या प्रतीक्षेत
18 Sep 2019 - 1:50 pm | पद्मावति
वाह...आवर्जून वाचावे असे लिहीणार्या लेखकांपैकी तुम्ही एक आहात. लेखमालेची सुंदर सुरुवात. वाचत राहीन.
20 Sep 2019 - 3:23 pm | अनिंद्य
So nice of you to say that. Thank you !
18 Sep 2019 - 2:04 pm | कुमार१
छान सुरुवात, पुढील भागांच्या प्रतीक्षेत !
18 Sep 2019 - 2:34 pm | जॉनविक्क
अशा चोखंदळ मिपाकरांकडून पावती मिळाली आहे म्हणता म्हणजे जुने लिखाणही वाचावेच लागेल. मी कोलकाता गेलेलो आहे आणी अतिशय गुणी अथवा अतिशय xxxx असेच वर्गीकरण करण्या इतपतच माझा अल्पानुभव आहे. शिसारी येणे आणी पूर्ण मंत्रमुग्ध होणे इतकेच. पण तुमच्या मुळे ब्लॅक ऑर व्हाईट ऐवजी ग्रे शेडही अनुभवास येईल अशी खात्री आहे. लोक कसेही असोत वाटतात फारच रंजक.
सुरुवात छान, अजून येऊदे.
18 Sep 2019 - 3:48 pm | जालिम लोशन
ऊत्तम.
18 Sep 2019 - 3:51 pm | यशोधरा
वाचत आहे.. काही वर्षांपूर्वी पाहिलेलं कोलकाता कुठे लिखाणात सापडतं का, हे हुडकीन.
20 Sep 2019 - 3:45 pm | अनिंद्य
जरूर.
कळवत राहा प्लीज !
18 Sep 2019 - 5:23 pm | नूतन
छान लेख
20 Sep 2019 - 3:41 pm | अनिंद्य
बंगाली शब्द चुकले तर तुम्हीच दुरुस्त करायचे आहेत _/\_
18 Sep 2019 - 6:43 pm | राजे १०७
छान लिहिलं आहे. पुढील भागाची उत्कंठा वाढली आहे. धन्यवाद.
18 Sep 2019 - 7:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
भालो ! अनिंद्य म्हटल्यावर सखोल माहिती आणि सुंदर चित्रांच्या मेजवानीसह कोलकात्याची ओळख होणार यात संशय नाही !
निगुतिने लिहा आणि भरपूर चित्रे टाका. पुभाप्र.
20 Sep 2019 - 10:23 am | अनिंद्य
_/\_ कौतुकाबद्दल आभार.
होय, डिट्टेलवार लिहिणार आहे !
18 Sep 2019 - 9:21 pm | नावातकायआहे
पु.भा.प्र.
18 Sep 2019 - 10:22 pm | बबन ताम्बे
ओघवत्या भाषेत सुरेख सुरुवात. पुढील लेखाची उत्सुकता.
मला वाटले प्लासीच्या लढाईनन्तर इंग्रजांनी बंगालमध्ये पाय रोवले. तुमच्याकडून कोलकोत्याची छान ओळख झाली. येऊ द्या पुढील लेख.
19 Sep 2019 - 7:22 pm | अनिंद्य
@ बबन ताम्बे,
अगदी बरोबर !
प्लासीच्या लढाईनंतर 'व्यापारी' इंग्रज 'राज्यकर्ते' झाले. येईल त्याबद्दल पुढे.
अभिप्रायाबद्दल आभार.
18 Sep 2019 - 10:56 pm | सुचिता१
छान झाली आहे सुरवात. पुभाप्र!!
19 Sep 2019 - 1:42 am | कंजूस
छान!
19 Sep 2019 - 5:38 am | बांवरे
चांगली देखणी सुरूवात.
वाचत आहे.
19 Sep 2019 - 8:28 am | प्रचेतस
अत्यंत ओघवते वर्णन. कोलकाता शहराचा इतिहास डोळ्यांसमोर उभा राहतोय. कोलकाता तुलनेने अलीकडचे (ब्रिटिशांनी) वसवलेले शहर आहे हे माहित नव्हते. माझा समज होता की कोलकाता अत्यंत जुने आहे. ब्रिटिशांनी वसवलेले असूनही आणि ब्रिटिश भारताची दिर्घकालीन राजधानी असूनही डाव्या विचारांचा प्रभाव तिकडे कसा वाढू लागला हे जाणून घेण्यास आवडेल.
19 Sep 2019 - 4:02 pm | अनिंद्य
प्रचेतस,
मराठीतील 'वाचणाऱ्या' लोकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्याशी मागच्या वर्षी झालेली चर्चा ह्या मालिकेला कारण ठरली.
सविस्तर लिहिणार आहेच,
लोभ असावा.
19 Sep 2019 - 4:46 pm | प्रचेतस
धन्यवाद अनिंद्य.
पुढच्या लेखांची वाट पाहात आहेच.
19 Sep 2019 - 9:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गाण्याच्य एखद्या मैफिलीत बसल्यसारखं वाटलं . कोलकात्याचं ओघवता परिचय अतिशय सुंदर.
क्लास.
सही.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत. ममता बेनर्जी लोकप्रिय का ? तेही समजून घ्यायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
19 Sep 2019 - 11:49 am | अनिंद्य
तोषवी ही स्तुती मजसम अज्ञाला :-)
पूर्ण लेखात मला स्वतःला सर्वाधिक आवडलेली वाक्येच तुम्ही कोट केली आहेत _/\_
...... ममता बेनर्जी लोकप्रिय का ? समजून घ्यायला आवडेल......
राजकारण बाजूला ठेवून फक्त सांस्कृतिक अंगांबद्दल लिहितो आहे म्हणून सध्यातरी माफी असावी.
19 Sep 2019 - 2:32 pm | कंजूस
अंगे गोल का असतात हे पण विषयाला सोडून.
24 Sep 2019 - 12:03 pm | अनिंद्य
.... अंगे गोल का असतात हे पण विषयाला सोडून......
हा 'विषय' काही समजला नाही.
19 Sep 2019 - 10:58 am | नि३सोलपुरकर
छान सुरुवात,
पुढील भागांच्या प्रतीक्षेत _/\_ .
19 Sep 2019 - 11:19 am | कंजूस
प्रचेतस,
बिहार - बंगाल भागातले श्रीमंत जमीनदार आणि पिळले जाणारे अभद्रलोक हे खूप जुने आहे. प्रेमचंद आणि इतर लेखकांनी कथेमध्ये आणलय. खरं म्हणजे लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा आहे. डाव्यांचे पुरस्कर्ते अशा ठिकाणी येणारच.
19 Sep 2019 - 3:56 pm | अनिंद्य
.... लेखकांना विषय पुरवण्यात सामाजिक असमतेचा मोठा वाटा...
यावर पुढील भागात सविस्तर लिहिण्याचा मानस आहे.
19 Sep 2019 - 4:49 pm | प्रचेतस
हा अँगलही असू शकतो, मात्र सामाजिक विषमता सार्वत्रिक होती, तरीही सर्वाधिक प्रभाव बंगालमध्ये का? नक्षलबाडी गाव, कनू सन्याल वगैरे?
20 Sep 2019 - 10:30 am | अनिंद्य
याबद्दल एका किर्तीवान 'मराठी' विद्वानाने उत्तम विवेचन केले आहे.
पुढील भागात त्याबद्दल थोडक्यात लिहितो.
19 Sep 2019 - 11:19 am | आंबट गोड
आणि आवडत्या विषयावरच लेखन!
तुम्ही "ओ कोलकता..." हे गाणं ऐकलं आहे का? प्राक्तन नावच्या बांगला सिनेमातलं....?
जरुर ऐका.
19 Sep 2019 - 3:54 pm | अनिंद्य
@ आंबट गोड,
.... गाणं ऐकलं आहे का? ...
नाही, यू ट्यूब वर असेल तर जरूर ऐकीन.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
24 Sep 2019 - 12:11 pm | आंबट गोड
यू ट्यूब वर आहे.
:-)
24 Sep 2019 - 2:58 pm | अनिंद्य
होय.
गाण्यापेक्षा व्हिडियो सरस.
26 Sep 2019 - 12:30 pm | आंबट गोड
आणि श्रेया घोषाल ने गायलंही फार सुंदर आहे! बंगाली भाषेची मिठाई तिच्या आवाजात पुरेपूर आहे!
19 Sep 2019 - 5:16 pm | सुधीर कांदळकर
नीटनेटके तरीही सुंदर आणि आकर्षक लेखन. आवडले.
प्रचि नितांतसुंदर, जबरदस्त.
तिथल्या संस्कृतीचे वर्णन मस्त जमले.
अगदी खरे.
पुलंचे वंगचित्रे आणि परिणिता सिनेमा आठवला.
धन्यवाद.
19 Sep 2019 - 6:35 pm | अनिंद्य
उत्साहवर्धक प्रतिसादाबद्दल आभार.
बिलिव्ह मी, वंगचित्रे वाचले नाहीये अजून :-(
19 Sep 2019 - 6:44 pm | सुबोध खरे
सुरुवात छानच झाली आहे.
एक प्रश्न आहे कि बंगाली लोकांमध्ये असे दुहेरी आडनाव असण्याचे कारण काय?
उदा. गुहारॉय, रॉयचौधरी, दत्तागुप्ता, सिन्हारॉय, सिन्हा रे, सेनगुप्ता
19 Sep 2019 - 7:15 pm | अनिंद्य
क्लिष्ट विषय आहे हा.... जोड-आडनावे लावण्याची पद्धत साधारण १८५० पासून सुरु झाली आहे. प्राचीन बंगाली वर्णव्यवस्था आणि जातिप्रथेच्या घनघोर भूलभुलैयात त्याचे योग्य उत्तर असावे. मला नक्की सांगता यायचे नाही.
19 Sep 2019 - 8:06 pm | मदनबाण
सुरेख लेखन !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गांधीवाद की जंग बहुत हो चुकी - मेजर जनरल जी.डी बख्शी, AVSM VSM
19 Sep 2019 - 9:00 pm | वीणा३
मस्त सुरवात मालिकेची. जमलं तर प्लिज तिथल्या खादाडी बद्दल पण माहिती द्या. खासकरून मासे.
20 Sep 2019 - 10:07 am | अनिंद्य
हे काय सांगणे झाले ? नक्कीच :-)
स्वतः शाकाहारी असलो तरी आपल्या बंगबंधूंचे मत्स्यप्रेम मी पुरे ओळखून आहे.
ठरले तर, लेखमालेचा शेवटचा भाग कोलकात्याच्या खाद्यसंस्कृतीवरच !
प्रतिसादाबद्दल आभार.
20 Sep 2019 - 1:34 pm | गड्डा झब्बू
उत्तम परिचय करून देत आहात कोलकात्याचा. मी दहा वर्षांपूर्वी तेथे गेलो होतो. बाकी संस्कृती आणि सगळ छान वाटले तरी बंगाली लोकांचा स्वैपाक मात्र अजिबात आवडला नाही. ते वापरत असलेले तेल आणि मसाल्यांचा वास फार भयंकर वाटला. पण बंगाली मिठाया बाकी आपला जीव कि प्राण आहेत.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
20 Sep 2019 - 3:20 pm | अनिंद्य
बंगाली मिठायांच्या फॅन क्लबमध्ये मी पण :-)
19 Sep 2019 - 10:30 pm | पिवळा डांबिस
सर्वप्रथम, विनंतीला मान देऊन बंगाल/ कलकत्त्याविषयी लिहायचं मनावर घेतलंत याबद्दल अनेक धन्यवाद. :)
बंगालमध्ये रहायचा कधी प्रसंग आला नाही (यापुढे येईल अशी शक्यताही आता वाटत नाही).
पण आजवर वाचलेल्या लिखाणामुळे बंगाली समाजाबद्दल/ संस्कृतीबद्दल एक विलक्षण कुतुहल आहे.
त्यातून लिखाण वाचनीय करायची हातोटी तुम्हाला लाभलेली आहे त्यामुळे वाचनाचा आनंद द्विगुणित होतो.
सुरवात छानच झाली आहे, पुढल्या भागांची उत्सुकतेने वाट पहात आहे..
आ.
पिवळा डांबिस
20 Sep 2019 - 10:57 am | अनिंद्य
@ पिवळा डांबिस,
लेखनास प्रवृत्त केल्याबद्दल तुमचे आभार !
या विषयावर पूर्णावतारी पुस्तक करण्याबद्दलची तुमची सूचना लक्षात आहे. मराठीत तरी या विषयावर फार काही लेखन उपलब्ध नाही. बघूया कसे जमते ते.
विस्तारभयामुळे सध्या संपूर्ण बंगालवर न लिहिता 'कोलकाता शहरावर' फोकस करत आहे.
आणि हो, एक सांगायचं होत :- तुमच्या प्रोफाइलमधली 'वैयक्तिक माहिती' वाचली तेव्हापासून भुताखेतांची भीती गेली आहे :-)
20 Sep 2019 - 11:16 pm | पिवळा डांबिस
खरडवहीत फोटोही आहे..
:)
23 Sep 2019 - 10:57 am | अनिंद्य
खरडवहीत फोटोही आहे
आता बघितला.
दारुण छोबी दादा :-)))
20 Sep 2019 - 10:41 am | रातराणी
वाह!! अतिशय सुरेख चित्रदर्शी लेखन! पुभाप्र..
20 Sep 2019 - 11:07 am | अनिंद्य
@ रातराणी,
कौतुकाबद्दल आभारी आहे.
पण तुम्ही 'राजयोग' अर्ध्यावर सोडल्यामुळे जे दुःख झाले आहे त्याचे निवारण करायचे मनावर घ्या :-)
20 Sep 2019 - 3:37 pm | अनिंद्य
@ टर्मीनेटर
@ कुमार१
@ जॉनविक्क
@ जालिम लोशन
@ राजे १०७
@ नावातकायआहे
@ सुचिता१
@ कंजूस
@ बांवरे
@ नि३सोलपुरकर
@ मदनबाण
@ गड्डा झब्बू
अभिप्रायाबद्दल आपणा सर्वांचे अनेक आभार ! लवकरच पुढील भाग टंकतो !
20 Sep 2019 - 5:02 pm | चांदणे संदीप
पण कोलकाता किंवा एकूणच बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा मनात तयार होते. यानिमित्ताने वाचून काहीतरी वेगळी भर ज्ञानात पडेल याची खात्री आहे. लेखमाला सुंदर होणार यात संशय नाही.
सं - दी - प
20 Sep 2019 - 8:29 pm | अनिंद्य
@ चांदणे संदीप,
.....बंगाल म्हटले की इंग्रजांना पाय रोवू देणारे लोक अशीच प्रतिमा.....
तुमचा काहीच दोष नाही, लेखात लिहिल्याप्रमाणे पूर्व भारताबद्दल आपले सर्वांचेच पूर्वग्रह भरपूर आहेत :-)
वाचायला कंटाळला नाहीत तर लेखमालिकेच्या शेवटी तुमचे मत थोडे बदलेल असे वाटते.
आभार !
28 Sep 2019 - 9:04 pm | चांदणे संदीप
नक्कीच वाचत राहणार. एकवेळचं जेवण सोडीन पण मिपावरचे चांगले लेख, कविता वाचणे सोडणार नाही.
सं - दी - प
21 Sep 2019 - 2:30 pm | राजे १०७
याची बोचणी बंगवासीयांना आहेच. रविंद्रनाथांच्या जयतु शिवाजी या कवितेत अशीच बोचणी व्यक्त केली आहे.
23 Sep 2019 - 11:09 am | अनिंद्य
रवींद्रनाथांच्या कविता वाचणारे कुणी इथे आहे हे फार आवडले.
28 Sep 2019 - 10:33 pm | चांदणे संदीप
कविता इथे दिलीत तर बरे होईल. आंतरजालावर शोधली पण नाही सापडली.
सं - दी - प
29 Sep 2019 - 6:25 am | सुमो
चेपु वर इथे सापडली
श्री.नरेंद्र जाधव यांनी तूनळी वर मराठीत सादर केली आहे
20 Sep 2019 - 8:31 pm | कोमल
आवडला.
बंग बद्दल फार जाणुन घ्यायचे आहे.
वाखु साठवली आहेच.
पुभाप्र
21 Sep 2019 - 8:05 am | अनिंद्य
आभार !
21 Sep 2019 - 12:35 pm | पलाश
अतिशय छान सुरवात. पुढील लेखनाच्या प्रतिक्षेत.
सत्यजित राय यांच्या व इतरही अनेक चित्रपटातून, शांतिनिकेतनविषयीच्या लेखांतून व अशाच कितीतरी माध्यमांतून ह्या प्रदेशाविषयी न पाहताही आत्मियता वाटते. कोलकाता व तिकडचा भाग निवांत सवडीने पहायचा आहे. सध्या वेळ असतो व प्रवासही करू शकतो. स्वतः प्लॅन न करता ट्रॅव्हल कंपनीच्या ग्रूपबरोबर जाण्याचा सल्ला मिळतो. अशा ग्रूपबरोबर "तिकडेही आपलं मराठी जेवण मिळत!!" टाईपच्या गोष्टींचं जादाच कौतूक असतं आणि त्यामानानं पहाणं, अनुभवणं कमी मिळतं.
तिकडे आपलेआपण जाऊ शकतो का? आणि रहाण्यासाठी सोयीची, सुरक्षित, बरी ठिकाणं/एरिया अशा प्रकारची पहिलटकर प्रर्यटकांना उपयुक्त अशी काहीही माहिती देता येईल का? माहितीबद्दलच्या उत्तरदायित्वास आपल्याला जबाबदार धरले जाणार नाही. :) धन्यवाद मात्र आतापासूनच देते आहे. इतक्या सुंदर लेखामुळे या भागात जाण्याचा प्लॅन करावा वाटतो आहे.
23 Sep 2019 - 11:15 am | अनिंद्य
@ पलाश,
आपल्याच देशात फिरायला कसली भीती ?
दिल्ली-आग्रा-मथुरेसम उत्तरेतल्या कोणत्याही शहरात बाळगतो तेव्हढी सावधगिरी पुरेशी ठरावी.
23 Sep 2019 - 12:37 pm | पलाश
दिल्लीसारख्या उत्तरेतल्या भागात फिरण्याचा अनुभव चांगला आहे. तितपत सावधगिरी घेण्याची सवय आहे. माहिती ट्रीपची आखणी करण्यासाठी मोलाची आहे. धन्यवाद.
21 Sep 2019 - 2:01 pm | गवि
उत्तम सिरीज. पुभाप्र.
आहा तुमि शुंदोरी कॉतो, कोलकाता.. हे उषा उथप यांचं गाणं फार आवडतं.
23 Sep 2019 - 11:19 am | अनिंद्य
उषा ऊथुप आणि त्यांच्या बहिणींचे गायनातले करियर कोलकात्याच्या नाईटक्लब्समध्ये सुरु झाले आणि बहरले. त्यामुळे त्या कोलकात्याबद्दल नेहेमी आपुलकीने बोलतात.
प्रतिसादाबद्दल आभार.
21 Sep 2019 - 8:44 pm | Rajesh188
आताचे कोलकत्ता हे मृत शहर आहे
कायदा सुव्यवस्थेच्या पूर्ण बोजवारा उडाला आहे .
व्यापारी लोकांनी कोलकत्ता सोडले आहे .
बांगलादेशी घुसखोरांची भरमसाठ संख्या ह्या शहरात आहे ..विसा साठी बंगाल हे नाव ऐकून कसून चोकशी केली जाते ..
जे लेखात सांगितलं आहे तो इतिहास आहे वर्तमान विपरीत आहे
22 Sep 2019 - 9:40 pm | चामुंडराय
आमार कोलकाता सोनार कोलकाता
एकाचवेळी रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, रबिन्द्रोनाथ टागोर इत्यादी थोर विभूतींमुळे आदर आणि त्याच बरोबरीने केवळ "टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स" स्वतःचे नाव देखील बदलणारी लोकं अश्या संमिश्र भावना आहेत बंग बंधूंबद्दल !!
23 Sep 2019 - 11:56 am | अनिंद्य
@ Rajesh188
मृत शहर आहे म्हणता ?
मग लेखमालेत पुढे वाचण्यासारखे काहीच नाही तुमच्यासाठी.
@ चामुंडराय,
सगळेच लोक सारखे कसे असतील ? त्यामुळेच संमिश्र भावना असणे नॉर्मल आहे :-)
23 Sep 2019 - 12:42 pm | आजी
विषय छान आहे. पुढे वाचण्याची उत्सुकता आहे. शुभेच्छा.
24 Sep 2019 - 11:47 am | अनिंद्य
@ आजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
पुढील भाग आज प्रकाशित केला आहे, इथे वाचता येईल : -
http://www.misalpav.com/node/45361
7 Oct 2019 - 6:27 pm | चौथा कोनाडा
वाह, कोलकात्याची अतिशय सुंदर ओळख ! जुना इतिहास देखिल रोचक पद्धतीने मांडलाय ! लेखनसशैली, अप्रतिम !
अनिंद्य _/\_
आता हे सर्वभाग आमार कोलकाता चवीचावी ने वाचणार !
7 Oct 2019 - 7:11 pm | अनिंद्य
जय हो _/\_
7 Oct 2019 - 6:30 pm | चौथा कोनाडा
*चवीचवीने
3 Jun 2020 - 10:00 am | रुपी
सुरेख!
छान सुरुवात. खूप दिवसांपासून ही लेखमाला वाचायची राहिली होती. आता वाचते पुढचेही भाग.
तुम्ही अजून एखाद्या शेजार्यावर लिहायचा विचार नक्की करा.
3 Jun 2020 - 6:02 pm | अनिंद्य
@ रुपी,
आभार. जरुर वाचा. प्रतिक्रिया अवश्य द्या, त्यांची मला पुढील लेखनात सुधारणेसाठी मदत होते.
... शेजारी ? ... शायद थोडे समय के बाद :-)