छायागीत २ - है कली कली के लब पर, तेरे हुस्न का फसाना…
हिन्दी चित्रपट संगीतात खय्यामचा बाजच वेगळा. “आप यूं फासलोंसे”, “कहीं एक मासूम नाजुकसी लडकी” पासुन ते “दिखायी दिये यूं” पर्यंत कुठलीही गाणी घेतली तरी त्यावर खय्यामची स्वतःची अशी ठसठशीत छाप जाणवते असं म्हटल्यास वावगं होणार नाही. आकर्षक माधुर्य असलेली संथ चालीची गाणी तर खय्यामच देउ जाणे. मग ते “ऐ दिले नादां” असो की “अपने आप रातोंमे”. खय्यामच्या प्रत्येक गाण्यावर लिहीण्यासारखं खुप आहे. मात्र येथे मी “है कली कली के लबपर” ची निवड केली आहे. १९५८ सालच्या “लाला रुख” चित्रपटातील हे गाणं मी फार पूर्वी रेडीयोवर ऐकलं होतं.

