और नही बस और नही…

Atul Thakur's picture
Atul Thakur in जनातलं, मनातलं
4 Dec 2013 - 10:18 am

Mahendra Kapoor

काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही. हिन्दी चित्रपट सृष्टीत महेंद्र कपूरच्या बाबतीत असंच घडलं असं मला वाटतं. एक नम्र स्वभावाचा अतिशय सभ्य माणुस यापलिकडे मी त्याच्या बद्द्ल काही वाचलेलं नाही. स्वतः महेंद्र कपूरला त्याची उपेक्षा झाली असं कधी वाटलं का याचा देखिल मला अंदाज नाही. पण माझं स्वतःचं मत या अतिशय गुणी गायकाबद्द्ल हेच आहे की गुणवत्ता झाकली गेली. कलेचं चीज पुरेसं झालं नाही. या लेखात त्याची कारणं शोधण्याचा प्रयत्न आहे. रफीसारखा प्रचंड गुणवत्तेचा गायक सर्वसाधारणपणे चार दशकं हिन्दी चित्रपट संगीताच्या सिंहासनावर विराजमान होता हे चटकन सुचणारं कारण असलं आणि त्यात तथ्य असलं तरी तेवढं पुरेसं नाही. कारण रफीमुळे मन्ना डे, मुकेश, तलत यांची गुणवत्ता झाकली गेली असं म्हणता येत नाही. या तिघांनीही रफीसमोर आपापली वेगळी साम्राज्यं उभारली आणि त्या साम्राज्यांचे ते शेवटपर्यंत सम्राट राहीले. नावाजलेल्या संगीतकारांनी रफीसमोर, रफी ऐन भरात असताना मन्ना डे, मुकेश व तलत यांना अविस्मरणीय गाणी दिलेली आहेत. खरंतर त्यांच्या स्वतःच्या साम्राज्यात रफीलाही प्रवेश नव्हता असं म्हटल्यास वावगं ठरु नये. शास्त्रीय बाज असलेल्या गाण्यात मन्ना डे, दर्दभर्‍या गीतांत मुकेश आणि गझलमध्ये तलत यांना दुसरा पर्याय नव्हताच. महेंद्र कपुरचं यातिघांप्रमाणे रफीसमोर वेगळं साम्राज्य निर्माण झालं नाही. रफी, किशोर, मुकेश हे अनुक्रमे दिलीप, देव व राज या दिग्गजांसाठी गायिले. हा योग महेंद्र कपुरच्या भाग्यात नव्हता. महेंद्र कपुरची अप्रतिम गाणी ही सुनील दत्त (गुमराह, हमराज), शशी कपुर (वक्त, प्यार किये जा), राजेंद्र कुमार (गीत, संगम), विश्वजीतसाठी (किस्मत), होती. अर्थातच ही यादी आणखि वाढवता येईल पण त्यात ते त्रिकुट नसणार. शेवटी दिलीपकुमार जेव्हा “रामचंद्र कह गये सिया से” हे महेंद्र कपुरच्या आवाजात गाऊ लागला तेव्हा उशीर झाला होता. महेंद्र कपुरवर शिक्का बसलाच असेल तर तो मनोजकुमारचा आवाज म्हणुन. “मेरे देश की धरती” हीट झाल्याने महेंद्र कपुर आणि देशभक्तीपर गाणी हे जणु समिकरणच बनलं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रामप्रहरी महेंद्र कपुरचा आवाज दुमदुमु लागला. “चलो इकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो” सारखं अजरामर गाणं देणार्‍या महेंद्र कपुरच्या वाट्याला “देशभक्तीपर” गीतांचा गायक म्हणवुन घेण्याची पाळी आली. ते ही यश निर्भेळ नव्हतंच. “जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा” हे फार पुर्वी रफी गाऊन गेला होता. शिवाय मनोज कुमारला दिलीप, राज आणि देव आनंदचं ग्लॅमर कधीही लाभलं नाही.

आम्ही महेंद्रकपुरच्या प्रेमात केव्हा पडलो ते नीट लक्षात नाही पण बहुधा “तुम अगर साथ देनेका वादा करो” या गाण्यापासुन. “चलो इकबार फिरसे” मनात रुजायला थोडासा वेळ लागला. “ऐ जाने चमन तेरा गोरा बदन” खुप आवडतं. विशेषतः “ऐ हुस्ने बेखबर” पासुनची सुरुवात खासच. प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रियकराची गाणी गावी ती महेंद्र कपुरनेच. “ऐ जाने चमन” आहेच. शिवाय “दिल लगाकर हम ये समझे”, “मेरा प्यार वो है के”, “किसी पत्थरकी मुरत से मुहब्बत का इरादा है”, “यारों कि तमन्ना है”, “तुम्हारा चाहनेवाला, खुदा की दुनिया में”, “जिसके सपने हमे रोज आते रहे”, “इन ह्वाओं मे इन फिजाओं में”, “झुके जो तेरे नैना”, “तेरे प्यार का आसरा चाहता हुं”, “तुम अगर साथ देनेका वादा करो”, “आ भी जा आ भी जा”, “मेरी जान तुमपे सदके एहेसान इतना करदो”, “छोडकर तेरे प्यार का आलम”, “आजकी मुलाकात बस इतनी”, “हमने जो देखे सपने”, “धडकने लगी दिलके तारों की दुनिया”, “आखोंमे कयामत के काजल”, “रफ्ता रफ्ता वो हमारे” पासुन ते अगदी अलिकडल्या “ये पहले प्यार की खुशबु” पर्यंत अशी कितीतरी अप्रतिम गाणी महेंद्र कपुर गाऊन गेला आहे. महेंद्र कपुरच्या आवाजाची जातच मुळी प्रियकराचं आर्जव, आर्तता आणि समर्पणाची भावना घेउन येते असं मला वाटतं. मात्र इतर काही गाण्यांचा वेगळ्याने विचार व्हायला हवा. काही चिंतन करायला लावणारी गाणी महेंद्र कपुरने गायिली आहेत. दोन उदाहरणं मला चटकन आठवतात. “नीले गगन के तले धरती का प्यार पले”, “संसार की हर शय का” ही अनुक्रमे “हमराज” व “धुंद” मधील गाणी. दोन्ही चित्रपट काहीश्या चाकोरीबाहेच्या “बोल्ड” विषयावरचे. दोन्ही बी. आर. चोप्राचेच. बी. आर. चोप्रा, साहीर लुधियानवी आणि महेंद्र कपुर या टीमने दिलेली गाणी ही मनोजकुमार, महेंद्र कपुर, कल्याणजी आनंदजी पेक्षा मलातरी फार उजवी वाटतात. देशभक्तीची भावना हा काही चांगल्या गाण्याचा निकष होउ शकत नाही. आणि भलत्या बाबतीत भावनावश होण्यात अर्थही नाही. बाकी बी. आर. चोप्राने महेंद्र कपुरला शेवटपर्यंत साथ दिली. मला तर “अथ श्री महाभारत कथा” फार आवडायचं. विशेषतः एपिसोड संपताना “भारत कि ये काहानी सदीयों से है पुरानी” या ओळींनी केलेली सांगता तर छानच होती. त्यानंतर “चलो इकबार फिरसे”, “आप आये तो खयाले दिले नाशाद आया” यासारख्या गाण्यांवर बोलावं लागेल. अगदी नवीन वाटेवरची ही गाणी आहेत प्रेयसी आता दुसर्‍याची झालेली आहे पण सूडाची भावना नाही. वैफल्याचा तळतळाट नाही. कुठल्याही तर्‍हेचा उरबडवेपणा तर नाहीच नाही. अतिशय समंजस, प्रौढ, प्रगल्भ भाव या गाण्यांमधुन व्यक्त होतो. “निकाह” च्या “बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी” मध्ये जुना महेंद्र कपुर पुन्हा त्याच तेजाने तळपला होता. महेंद्र कपुरच्या हिर्‍यामोत्यांचा असा हिशोब दिल्यावर मला “ठंडे ठंडे पानी से” सारख्या गाण्यांचा फारसा विचार करावासा वाटत नाही.

महेंद्र कपुरच्या गायकीला न्याय दिला असेल तर तो दोघांनी. एक संगीतकार रवी आणि दुसरा ओ.पीं. नैयर. बी. आर. चोप्रा, साहिर लुधियानवी, महेंद्र कपुर आणि रवी या चमुची गाणी हा एकंदर हिन्दी चित्रपट संगितातलाच वैभवशाली अध्याय आहे. ओ.पी ने दिलेल्या संगीतात “किस्मत” चित्रपटातील गाणी आजदेखिल महेंद्र कपुरच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये गणली जातात. “आखों मे कयामत के काजल” सारखं अप्रतिम गाणं ओ.पी ने या चित्रपटात दिलं. मात्र अभिनेता विश्वजीतला या गाण्यांचं चीज नाही करता आलं. दिलीपकुमार सारखे अभिनेते उत्कृष्ट गाण्याला त्याच तोडीचा अभिनय करुन गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर पोहोचवत असत. याबाबतीत महेंद्र कपुर दुर्दैवीच म्हणायला हवा. जिज्ञासुंनी “लाखों है यहां दिलवाले” सारखं गाणं जरुर पाहावं. पडद्यावर हे गाणं गाताना विश्वजीतने गिटारचा वापर एखाद्या हत्यारासारखा करत, कंबर, मान आणि तंगड्या नको तिथे हलवुन गाण्याचं पार मातेरं करुन टाकलं आहे. गाणं एकीकडे आणि विश्वजीतसाहेब भलतीकडे असा प्रकार या गाण्याच्या नशीबी आलाय. रफीलाही त्याच्या अनेक उत्कृष्ट गाण्यांसाठी भारतभुषण, प्रदिपकुमारसारख्या अभिनेत्यांसाठी गावं लागलं. हे अभिनेते अभिनयात ग्रेट नसतीलही पण रफीच्या गाण्यांचे त्यांनी असे बारा वाजवले नाहीत. कुठेतरी मला महेंद्र कपुरच्या अपयशात त्याला पडद्यावर त्याच तोडीचे कसलेले अभिनेते मिळाले नाहीत हे देखिल कारण महत्त्वाचं आहे असं वाटतं. येथे महेंद्र कपुरच्या काही मर्यादांही विचार करावा लागेल. यात दुमत होण्याची शक्यता आहे. रफीचा आवाज दिलीप, देव, धर्मेंद्र, शम्मी कपुरला फीट्ट बसला. मुकेश तर राज कपुरचा दुसरा आवाजच बनुन गेला. मन्नाडेचा सुद्धा आवाज राज कपुरला चपखल बसला. राजेश खन्ना आणि किशोर कुमारने एक नवीन युगच चित्रपट सृष्टीत आणलं. महेंद्र कपुरच्या बाबतीत आवाज चपखल बसण्याचं उदाहरण दिसुन येत नाही. मनोजकुमारचा अपवाद देखिल सणसणीत म्हणता येणार नाही. मुकेश (दिवानोंसे ये मत पुछो), रफीने (भरी दुनिया में आखिर दिल को समझाने कहां जाये) मनोजकुमारसाठी काही अजरामर गाणी गायिली आहेत. मला महेंद्र कपुरचा आवाज हा नेहेमी शुचिर्भुत, शुद्ध, सुस्नात असाच वाटला. त्यात किशोरकुमारच्या आवाजातलं सळसळतं तारुण्यं, टारगटपणा, रफीची धार येण्याचा संभव कमी त्यामुळे या आवाजाला उपजतच काही मर्यादा आहेतसं वाटत राहतं. तलत जेव्हा “जाये तो जाये कहां” म्हणु लागतो, किशोर जेव्हा “मै शायर बदनाम” म्हणत अयशस्वी कवीची वेदना बोलुन दाखवतो, रफीच्या तोंडुन जेव्हा “याद ना जाये बीते दिनों की” बाहेर पडतं तेव्हा सारं वातावरणच झाकोळुन गेल्यासारखं वाटतं. ही किमया महेंद्र कपुर कडुन फारशी घडलेली नाही. मुकेश तर या क्षेत्रातला राजाच. त्याच्याबद्दल काय बोलणार? मात्र याला महेंद्र कपुरची तीन गाणी अपवाद आहेत. एक “संबंध” चित्रपटातलं “अंधेरे में जो बैठे है”, दुसरं “संगम” चित्रपटातलं “हर दिल जो प्यार करेगा” आणि तिसरं मनोजकुमारच्या “रोटी कपडा और मकान” मधलं “और नही बस और नही” . या गाण्यातला प्रचारकी थाटाचा भाग सोडल्यास “कोई आग मचल जाये, सारा आलम जल जाये” या ओळी महेंद्र कपुरने अशा तर्‍हेने म्ह्टल्या आहेत कि जाळुन टाकणार्‍या थंडगार अ‍ॅसिडचा स्पर्श त्या ओळींना झाल्यासारखा वाटतो.

महेंद्र कपुरच्या मराठी चित्रपटातील योगदानाबद्दल स्वतंत्र लिहावं लागेल. त्याचे मराठी उच्चार इतके उत्कृष्ट होते कि मुळात एक अमराठी माणुस मराठी गाणं गातोय असं कधी वाटलंच नाही. “सुर तेच छेडीता”, “सांग कधी कळणार तुला”, “हे चिंचेचे झाड दिसे मज”, “रात्रीस खेळ चाले” पासुन ते ” ती येते आणिक जाते” पर्यंत कितीतरी ग्रेट गाणी महेंद्र कपुरच्या नावावर आहेत. मात्र येथे महेंद्र कपुरला गृहीत धरलं गेलं असं मला वाटतं. घरकी मुर्गी दाल बराबर या न्यायाने प्राचीन काळापासुन मराठी गात असलेला महेंद्र कपुर जणु काही विसरलाच गेला आणि “शोधीसी मानवा राऊळी मंदीरी” ने मराठीतही रफी युग आणलं. रफीची मराठी गाणी गुणगुणताना लोकांची ब्रह्मानंदी टाळी लागु लागली. पुढे “आश्विनी ये ना” ही आरोळी ठोकुन किशोर कुमारने येथे प्रवेश केला तेव्हा ” माझ्यापासुन दुर नको जाउ गंगुबाय” हे अस्सल गावरान ठेक्यात दादांच्या चित्रपटात अनेक वर्षे गाणारा महेंद्र कपुर आमच्या खिजगणतीतही नव्हता. रफी, किशोरचं अमराठी म्हणुन मराठीत जेवढं उदंड कौतुक झालं तेवढं महेंद्र कपुरचं कधीही झालं नाही असा तर माझा आरोपच आहे. या लेखाचा प्रपंच महेंद्र कपुरच्या गाण्यांची जंत्री देण्यासाठी केलेला नाही. बरीचशी चांगली गाणी राहुन गेल्याचा संभव आहे. या गुणी गायकाच्या कारकिर्दीचा एका विशिष्ठ दॄष्टीकोणातुन मागोवा घेण्याचा हा प्रयत्न आहे. महेंद्र कपुर प्रति रफी झाला नाही याचं दु:ख नाही. मात्र या अतिशय गुणी गायकात तलत, मुकेश, मन्ना डे सारखं साम्राज्य निर्माण करण्याची कुवत नक्कीच होती. महेंद्र कपुरचं असं वेगळं साम्राज्य झालं नाही याचंच फार वाईट वाटतं. मर्यादा सर्व गायकांना होत्या. पण त्यांना त्यांच्या आवाजाला सजेशी गाणी दिली गेली. महेंद्र कपुरच्या आवाजाला खुलवणारी गाणी रवी, साहीर, ओ.पी. नेच दिली. ती परंपरा पुढे चालली नाही. “और नही बस और नही, गम के प्याले और नही” हा मला महेंद्र कपुरचा आक्रोशचं वाटतो. केव्हातरी मी आठवणीने “दिल लगाकर हम ये समझे” हे माझं अत्यंत आवडतं गाणं लावतो. कानावर मोरपीस फिरवल्यासारखं होतं. पण मनात आत कुठेतरी “और नही बस और नही” म्हणणार्‍या महेंद्र कपुरचं दु:ख विसरता येत नाही.

अतुल ठाकुर

संगीतलेख

प्रतिक्रिया

अग्निकोल्हा's picture

4 Dec 2013 - 10:30 am | अग्निकोल्हा

यांची आपण ओळ्ख करून दिलेली बहुतांश गाणी संपूर्ण ओठावर आहेत, अगदी मराठी सुध्दा. पण यापुढे महेंद्र कपूर हे नावही तितकेच आदर अन प्रेमाने स्मृतित जतन करेन.

पैसा's picture

4 Dec 2013 - 10:38 am | पैसा

मिपावर स्वागत! तुला इथे बघून प्रचंड आनंद झाला आहे! एका वेगळ्या आणि दमदार आवाजाची तेवढीच दमदार ओळख! लेख नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट झाला आहे!

Atul Thakur's picture

5 Dec 2013 - 9:17 am | Atul Thakur

:)

सोत्रि's picture

5 Dec 2013 - 10:13 am | सोत्रि

सेम हियर! :)

- (आनंदी) सोकजी

विटेकर's picture

4 Dec 2013 - 10:45 am | विटेकर

आवड्ला. सगळे माहीती होतेच पण तुम्ही उत्तम मांडले आहे.
पुलेशु
-

मुक्त विहारि's picture

4 Dec 2013 - 10:49 am | मुक्त विहारि

वाचन्खूण साठवली आहे....

असेच उत्तम लिहीत रहा..ही वनंती...

आदूबाळ's picture

4 Dec 2013 - 12:26 pm | आदूबाळ

+१

Atul Thakur's picture

5 Dec 2013 - 9:18 am | Atul Thakur

नक्की प्रयत्न करेन :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2013 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम लेख !

“बीते हुए लमहों की कसक साथ तो होगी” हे गाणं नेहमीच काळजाला भिडतं !

अनिरुद्ध प's picture

4 Dec 2013 - 11:57 am | अनिरुद्ध प

+११११ सहमत

शैलेन्द्र's picture

4 Dec 2013 - 11:12 am | शैलेन्द्र

लेख आवडला.. तुमच्या विचारांशी सहमत

जेपी's picture

4 Dec 2013 - 11:49 am | जेपी

आवडला लेख .

युगन्धरा@मिसलपाव's picture

4 Dec 2013 - 11:51 am | युगन्धरा@मिसलपाव

लेख आवडला ..........

नाखु's picture

4 Dec 2013 - 12:11 pm | नाखु

मला वाटत कि कुठल्या एका अभिनेत्याचा "फिट्ट" आवाज नसणे हाच महेंद्र कपूर यांच "बलस्थान" होते पण मायनगरीत (तेव्हाही) कंपुगिरी होतीच त्यामुळे हा गुणी हिरा जणु काही विसरलाच गेला (दुय्यम फळीत टाकला गेला)

अनुप ढेरे's picture

4 Dec 2013 - 12:27 pm | अनुप ढेरे

लेख आवडला. मला कायम लक्षात राहणारी गाणी म्हणजे 'चलो इक बार' आणि महाभारताचं टायटल आणि शेवटचं गाणं.

चावटमेला's picture

4 Dec 2013 - 2:03 pm | चावटमेला

अतिशय सुंदर लेख. खूप आवडला..

अमोल मेंढे's picture

4 Dec 2013 - 2:30 pm | अमोल मेंढे

खुपच छान...फार दिवसांनी लिहणे केलेत देवा....

राजेंद्र मेहेंदळे's picture

4 Dec 2013 - 2:35 pm | राजेंद्र मेहेंदळे

अनेक उत्तम गाण्यांचे आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद..
बाकी मराठीत जयवंत कुलकर्णी यांचा आवाज मला महेंद्र कपूरसारखा वाटतो

मुक्त विहारि's picture

4 Dec 2013 - 9:36 pm | मुक्त विहारि

+ १

कानडाऊ योगेशु's picture

4 Dec 2013 - 2:55 pm | कानडाऊ योगेशु

जाळुन टाकणार्‍या थंडगार अ‍ॅसिडचा

मस्त उपमा दिली आहे.
लेख आवडला हे.वे.सा.न.ल.

का कुणास ठाऊक पण महेंद्र कपूर विशेष जमत नाहीत. मात्र गायक म्हणून आदर आहेच.

लेख आवडला. आधीदेखील वाचला होता.

प्रचेतस's picture

4 Dec 2013 - 9:33 pm | प्रचेतस

अप्रतिम लेखन.

तुमचं हे निरिक्षण :

त्यामुळे या आवाजाला उपजतच काही मर्यादा आहेतसं वाटत राहतं

योग्य आहे.

पूर्वी खरं तर आवाज नायकाला स्यूट न होणं हे एक महत्त्वाचं लिमीटेशन होतं.
गाणी मिळणं हे नायक हिट होण्यावर अवलंबून आहे पण गाणं हिट होणं वेगळी गोष्ट आहे.
चित्रपटांचा अभ्यास शून्य असला तरी मी गाण्यांचा तुफान व्यासंग केलायं. गाणं संस्मरणीय होण्यासाठी शायरी, चाल आणि गायकांचे आवाज हे मिश्रण जुळावं लागतं.

अमेय६३७७'s picture

4 Dec 2013 - 11:26 pm | अमेय६३७७

सुंदर लेख अतुलभाऊ.

निमिष ध.'s picture

5 Dec 2013 - 12:51 am | निमिष ध.

अत्यन्त सुन्दर लेख. 'चलो इक बार' तर बर्याच रविवारन्ची सुरुवात करते!

बहुगुणी's picture

5 Dec 2013 - 1:05 am | बहुगुणी

तुम्ही उल्लेखलेल्यांपैकी जवळजवळ प्रत्येक गाणं संग्रहणीय आणि पुनःपुन्हा ऐकण्यासारखं आहे, अनेक आठवणी जाग्या केल्यात, धन्यवाद! (Curious: हा ब्लॉग तुमचाच का? असाच खजिना आहे म्हणून विचारलं...)

धन्यवाद :) हा ब्लॉग माझा नाही.

Atul Thakur's picture

5 Dec 2013 - 9:17 am | Atul Thakur

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक आभार

प्रकाश घाटपांडे's picture

5 Dec 2013 - 9:22 am | प्रकाश घाटपांडे

अरे वा! मस्त लेख. आमच्या न्यानात तेव्ढीच भर!

काहींच्या आयुष्यात परीघावरच राहण्याचा योग असतो. केंद्राकडे त्यांना गुणवत्ता असुनही जाता येत नाही.

आवडलेच. इसकोच बोल्ते है नसीब

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Dec 2013 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. महेंद्र कपुरची खूप गाणी आवडतात. तुम अगर साथ देने का, चलो एकबार, अशी कितीतरी गाणी आणि लेखनाचा व्ह्युही आवडला. आभार. असेच उत्तमोत्तम लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

मैत्र's picture

5 Dec 2013 - 10:39 pm | मैत्र

आवडला.. हे लक्षात आलं की बरीच ओळखीची उत्तम गाणी गायली आहेत महेंद्र कपूर यांनी पण ते ऐकताना जाणवत नाही.
काही गाण्यांवर त्यांची छाप आहे आणि माहितही आहेत - हमराजची सगळी गाणी - तुम अगर साथ देने का वादा करो,
नीले गगन के तले किंवा अथ श्री महाभारत कथा, मनोज कुमारची देशभक्तीपर गीतं..
(रच्याकने मुकेशने गायलेलं - कोई जब तुम्हारा हृदय तोड दे हे कदाचित मनोज कुमारवर चित्रित सर्वोत्तम सॅड साँग असावं)

पण चलो इकबार फिरसे सारखं अप्रतिम रत्नही त्यांनी दिलं आहे हे माहित नव्हतं..
बर्‍याच आवडीच्या जुन्या गाण्यांची खूप वर्षांनी आठवण आली.. अनेक धन्यवाद!!

दिव्यश्री's picture

5 Dec 2013 - 10:52 pm | दिव्यश्री

हे चिंचेचे झाड दिसे,सूर तेच छेडीता,सजणी ग भुललो मी,मधु इथे अन्‌ चंद्र आणी
रात्रीस खेळ चाले ही त्यांनी गायलेली मराठी गाणी खूपच आवडतात ... :)

प्रदीप's picture

7 Dec 2013 - 12:02 am | प्रदीप

लेख चांगला आहे, पण महेंद्र कपूरची काही अप्रतिम गाणी निसटून गेली आहेत.

'तेरे प्यार का आसरा चाहता हूं' चा उल्लेख ओझरता आला आहे, मला वाटते हे ह्या गायकाचे एक सुंदर, विलक्षण गाणे होते. तसेच चोप्राच्या 'धर्मपुत्र'मधील 'आज की रात नहीं,शिकवे शिकायत के लिये' शिवाय मी तरी महेंद्र कपूरचा विचारच करू शकत नाही. आणि ह्याच चित्रपटातील 'तुम्हारी आँखे' ही धूंद गीतही त्याने सुंदर गायिले होते. ही त्याच्या करीयरच्या सुरूवातीची तिन्ही गीते एन. दतांनी दिलेली होती.

आणि नंतर असेच उल्लेख राहिलेले गीत, चित्रगुप्तचे लताबरोबरील 'आ जा रे, मेरे प्यार के राही'.. ह्यातील काही जागा कपूरने सुंदर घेतल्या आहेत. तसेच रविचे 'आप आयीं, तो ख़याले दिले नाशाद आया' हे अप्रतिम गीत!

रफी, मुकेश, तलत ह्यांच्या शैली, त्यांच्या आवाजाच्या पोती अगदी विभिन्न होत्या. त्यामुळे, मुकेश व तलत ह्यांचे नीश तयार झाले. रफीच्या आवाजाची रेंज, तसेच विभीन्न प्रकारच्यी गाणी लीलया गाण्ञाच्या त्याची हातोटी अप्रतिम होती, त्यामुळे तो, गुरू दत्त व दिलीपकुमार ह्याजपासून थेट जॉनी वॉकर, व मेहमूद ह्यांची गाणी तितक्याच सहजतेने गात होता. महेंद्र कपूरच्या आवाजाचा व गाण्याच्या स्टाईलचा बाज रफीसारखा असल्याने तो अर्थात रफीसमोर राहू शकला नाही. 'बी. आर. चोप्रांनी त्याला साथ दिली' म्हणण्यापेक्षा चोप्रांनी त्याला आपल्या संस्थानात सामावून घेतला, असे म्हणणे उचित ठरावे. ह्यामागे अनेक कारणे असू शकतील-- कमर्शियल कारण प्रकर्षाने माझ्यातरी (कदाचित उगाच!) मनात येत रहाते. ह्या चोप्रांनी प्रमुख संगीतकारांना बाजूस ठेवून, एन. दत्ता, आणि नंतर तर चक्क रवी ह्यांनाच हाताशी धरले, ह्यात त्यांची बिझीनेस रिस्क होती, व ती बर्‍यापैकी यशस्वी झाली.

तेव्हा 'प्रतिरफी' असल्याने महेंद्र कपूर रफीपुढे झाकोळून गेला. चोप्रांसारखी गायक गायिकांच्याही बाबतीतील रिस्क इतर निर्माते घेण्यास तयार नसावेत बहुधा. पुढेपुढे तर, त्याच्या व आमच्या दुर्दैवाने त्याची अनेकानेक बोअर गाणी रवी व आपणच दर्शवल्याप्रमाणे, कल्याणजी- आनंदजींनी गाऊन घेतली.

प्रदीप's picture

7 Dec 2013 - 12:06 am | प्रदीप

महेंद्र कपूरचे उत्कृष्ट गीत, वसंत प्रभूंचे 'अबोल झालीस का, साजणे?' हे होय.

बाय द वे, 'हे चिंचेचे झाड' मधील हिंदी उच्चार [चिंचेचे']आजच्या पिढीला खटकेनासे झालेत काय?

त्यांनी गाईले होते.

अनिता ठाकूर's picture

8 Dec 2013 - 11:32 am | अनिता ठाकूर

कोणत्याहि गायकाची 'कोणाचातरी आवाज' अशी ओळख असायलाच हवी असे मला वाटत नाही. कोणाकोणाचे आवाज म्हणून का ओळखलं जावं? महेंद्र कपूर हे कोणाचा आवाज म्हणून ओळखले गेले नाहीत ही तर त्यांची जमेची बाजू! रफी, मुकेश, किशोरकुमार ह्यांचे आवाज अद्वितीय असुनही संबधित नायकाचे नाव त्यांच्या आवाजाशी जोडले गेले. ह्यामुळे त्या त्या गायकाला थोडा उणेपणा आला. असे व्हायला नको होते.

प्रदीप's picture

8 Dec 2013 - 12:09 pm | प्रदीप

रफी, मुकेश, किशोरकुमार ह्यांचे आवाज अद्वितीय असुनही संबधित नायकाचे नाव त्यांच्या आवाजाशी जोडले गेले. ह्यामुळे त्या त्या गायकाला थोडा उणेपणा आला. असे व्हायला नको होते.

अनिता ठाकूर's picture

8 Dec 2013 - 12:47 pm | अनिता ठाकूर

आपण म्हणता ते खरं आहे.