रंजीश ही सही ...
आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ".
अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.