रैना
ईश्वरानं तसं काही सूचित केलेलं नसतानाही काही शब्दांच्या माथी अकारण काळिमा आलेला आहे. त्यातला एक शब्द काळा रंग. तिच्या काळ्या रंगाशिवाय रात्रीचं रात्रपण अपूर्ण आहे. निरपराध असताना देखील रात्रीनं, आपल्या सख्याचा दोषापराध, काळ्या रंगाचा तो कलंक,अल्पांशानं आपल्या अंगावर घेतला आहे. आपण नाही का म्हणत - दिवसाढवळ्या अमका अमका अत्याचार झाला. म्हणजे जणू काही रात्री हलकी फुलकी पापं चालून जावीत. भरबाजारात, भररस्त्यात, दिवसाच्या लख्ख उजेडात, चारचौघांसमोर कोणी डोळाही ओलावू नये; मात्र रात्रीच्या अंधारात, घराच्या कोण्या कोपर्यात, जीव दाटून आलेलं विशेष काही नसावं.