शब्दप्रधान गायकी : यशवंत देव

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
21 Feb 2017 - 9:54 pm

आनंदाच्या क्षणी कुणाच्याही मनात उमटणारी पहिली गोष्ट म्हणजे गाणं. खरं तर आनंद म्हणजे मनाचं काही काळासाठी स्थिर होणं आणि मग आत चाललेल्या अविरत वार्तालापाचा एक सुरेल ध्वनी होणं. हे मनातल्या शब्दांचे सूर होणं म्हणजे गाणं.

यशवंत देवांचं `शब्दप्रधान गायकी' हे पुस्तक गाणं तयार होऊन अभिव्यक्त होणं आणि त्याचा एक माहौल तयार होणं या सकल प्रक्रियेचा एक समग्र वेध आहे. देव स्वतः जानेमाने संगीत दिग्दर्शक आहेत, कवी आहेत, गायक आहेत आणि सुगमसंगीताच्या एका प्रदीर्घ कालावधीचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. अनेक प्रतीभावंत कवी आणि नामवंत गायकांकडून त्यांनी सुरेल गाणी घडवून घेतली आहेत. त्यांच्या पुस्तकाची जमेल तितपत केलेली ही समिक्षा.

z

पुस्तकाला मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना आहे. त्यांनी लिहीलंय, `कवितेची चाल बाहेर नसतेच मुळी, ती त्या कवितेतच असते, मी फक्त ती शोधून काढतो असं देव म्हणतात'. आणि ते पुढे लिहीतात, आपल्या जीवनाभूतीतून कवी गीत निर्माण करतो, मग संगीतकार या निर्मितीशी कलात्मक इमान राखून स्वरांची बंदीश निर्माण करतो आणि त्यानंतर ही दुहेरी बंदीश एकात्म रीतीनं उमजून गायक किंवा गायिका गाणं निर्माण करते.

या पुस्तकात अशी प्रकरणं आहेत : भावगीत गायन, गेय कविता, संगीत दिग्दर्शन, गायकीचा पदविका अभ्यासक्रम, आणि सिंहावलोकन व उपसंहार. पैकी पहिली दोनंच प्रकरणं, क्वचित गायक आणि कधेमधे कवी होणार्‍या आपल्यासारख्या लोकांना उपयोगी आहेत म्हणून फक्त त्यांचाच वेध या लेखात घेतला आहे. पुढची प्रकरणं आपल्या उपयोगाची नाहीत पण ज्यांना त्यात रस असेल त्यांनी ती पुस्तकातून अभ्यासावीत.

देवांच्या मते गाण्याचा परिणाम न होण्याचं एकमेव कारण म्हणजे गायकाचं स्वतःच्या गाण्याकडे अवधान नसणं ! आपण सहज चालावं तसं गातो, सैनिक जसा प्रत्येक पाऊल जाणीवपूर्वक टाकतो आणि त्यामुळे त्याचं चालणं उठावदार होतं, तसं गाणं गातांना गायकानं ते अखंडपणे ऐकायला हवं. पुढे देव म्हणतात, अनावधानानं गाणार्‍याचा परिणाम (हवेत) विरतो आणि जाणीवपूर्वक गाणार्‍याचा परिणाम (रसिकांच्या मनात) मुरतो.

डोळे उघडे असतांना आपली नजर अनेक वस्तुंवर भिरभिरत असते आणि असे जाणीवेचे काही क्षण सलग झाल्यामुळे वस्तु दिसल्याचा भास होतो पण क्षणभरासाठी का होईना आपली जाणीव जेव्हा एखाद्या वस्तुशी निगडीत होते तेव्हा ती वस्तु आपल्याला खर्‍या अर्थानं दिसलेली असते. तद्वत, गायन चालू असतांना आपल्याला ते ऐकू येणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याची सवय करुन घ्यावी लागते. आपण गातो म्हणजे ऐकत असणारच हे गृहितक बरोबर नाही. अभावितपणे आपण म्हटलेले स्वर आपल्या कानावर पडतात खरे पण ते आपण ऐकलेले असतातच असं नाही.

यासाठी गाणं कंठस्थ करुन स्मरणात ठेवलं पाहिजे आणि नुसती चाल ढोबळमानानं लक्षात ठेवण्याऐवजी, गाण्याच्या प्रत्येक शब्दामधे नव्हे तर हरेक अक्षरात असणारा स्वर आपल्या लक्षात आला तरच ते गाणं आत्मसात होतं.

पुढे गायनाची प्रक्रिया आणखी सुबोध करतांना देव म्हणतात, गायक शब्द गातो म्हणण्यापेक्षा तो शब्दाचा `अर्थ गातो' तेव्हाच श्रोते मोहित होतात म्हणून शब्दाचा नेमका अर्थ गायकाला माहिती हवा. आणि भाव अर्थापेक्षा गहीरा आहे त्यामुळे त्या भावनेचा थांग गायकाला लागला किंवा नाही हे जाणकार श्रोते आणि रसिक लगेच जाणू शकतात.

रियाजाच्या बाबतीत देवांचं अवलोकन असंच भारी आहे. ते म्हणतात, आपण प्रथम आवडणारं म्हणायला घेतो आणि अवघड वाटणारी गाणी टाळतो. ते झाल्यावर मग सम हाऊ, अवघड गाण्याचा प्रयत्न करायला घेतो आणि त्यातल्या न जमणार्‍या जागा दोन-चार वेळा म्हणून बघतो. थोड्याफार प्रयत्नांती त्या जमल्या नाहीत तर मग एकूणातच गाण्याचा नाद सोडून देतो. अशा तर्‍हेनं कितीही गाणी म्हटली तरी मग आपण पूर्वी होतो तिथेच राहातो. काल न जमलेली गाण्यातली जागा जर आज घेता आली तरच खरा रियाज झाला बाकी फक्त टाइमपास झाला. रियाज करतांना स्पष्ट आणि भावपूर्ण गाण्याची आणि गातांना ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. मैफिलीत गातांना जसे अवधानपूर्वक गातो तसा रियाज हवा म्हणजे लोकांसमोर गातांना जीव आतून घाबरलेला राहाणार नाही.

खरं तर`आ' हाच `सा' आहे, तो एकदा नक्की आणि सर्वकाळ सारखा लावता आला की बाकीचे स्वर त्या रेफरंसनी आपोआप लावता येतात. त्याबद्दल यशवंत देव म्हणतात, घशातून नुसती हवा बाहेर फेकतांना त्यात सहज एखादा स्वर मिसळता येतो का ते पाहा. हा सूर मग हळूहळू पण विनासायास, खालचा लावता येतो का ते पाहा. यामुळे स्वर स्पष्ट आणि सहज होईल आणि गळ्यावर यत्किंचितही ताण जाणवणार नाही ! एकदा मंद्र स्वर नीट लावता येऊ लागले की तार सप्तकात शिरण्याची उर्मी आपसूक येते आणि ती उर्मीच उंच स्वर लावण्यासाठी गळा आणि श्वास यावर अवधान साधायला मदत करते.

कोणताही स्वर निर्माण होतांना स्वरयंत्राच्या पोकळीतून हवा बाहेर फेकली जात असते. या हवेचा स्पर्श गातांना सतत जाणवला पाहिजे. शुद्ध `आ' तेव्हाच उच्चारला जातो जेव्हा तोंड संपूर्ण उघडलेले असते आणि स्वरयंत्राच्या संपूर्ण परीघाचा पूर्ण उपयोग केला जातो. बाहेर जाणारी हवा स्वरयंत्राच्या संपूर्ण परीघाला स्पर्श करुन जाते. परीघाचा कोणताही भाग अस्पर्शित राहात नाही. `आ' हा संगीताचा पहिला धडा आहे आणि त्यानंच स्वतःच्या आवाजाची ओळख होते. ही ओळख पक्की असेल तर त्यावर गायनाची इमारत भक्कम उभी राहाते.

आपला आवाज किती उंच चढू शकतो ? देव म्हणतात, आपला आवाज किती उंची गाठेल याचं आपलं ज्ञान म्हणजे केवळ कल्पना असते. कधी एखाद्या डोंगराच्या मोकळ्या पठारावर जाऊन, दूरवरच्या कुणाला तरी, आवाज न फाटू देता, हाक मारुन पाहा म्हणजे तुम्हाला आपल्या आवाजाच्या ताकदीची नक्की कल्पना येईल. ते पुढे म्हणतात की रागानं किंवा दु:खानं कंठ अवरुद्ध होतो तेव्हा स्वरयंत्राला शक्ती देणारी इच्छा विकेंद्रित झालेली असते, अन्यथा प्रकटीकरणाची संभावना स्वरयंत्रात असतेच. तस्मात, स्वरयंत्र जरी कमी-अधिक ताकदीचे असेल तरी एकसंध इच्छाच स्वरनिर्मितीचं काम करते. यामुळे उत्छ्वासावर लक्ष केंद्रित करुन, लागलेला स्वर पुढे नेत राहाणं हे वरचे स्वर घशाला ताण न पडता, सहजपणे लागण्याचं रहस्य आहे. जो स्वर लावायचा त्याकडेच अवधान असू दे, इतके की आपणच तो स्वर आहोत अशी प्रचिती व्हावी, म्हणजे स्वराला सामर्थ्य लाभेल. गाणार्‍याची जाणीव हीच कोणत्याही स्वरामागची शक्ती आहे. गाणार्‍याच्या जाणीवेत पक्का उभा राहीलेला स्वर किंवा शब्दच ऐकणार्‍याला त्याची समान अनुभूती देतो.

देवांच्या अनुभवानं कविता मोठ्यानं वाचणं आणि गाणं म्हणणं यात फक्त दोनच गोष्टींचा फरक आहे. (१) गायकानं शब्दाला चिकटवलेला सूर आणि (२) दोन स्वर वेगवेगळे करुन दाखवण्यासाठी गायकानं स्वरांना दिलेलं अवधान !

मायक्रोफोनबद्दल यशवंत देवांचे विचार तितकेच अनोखे आहेत. ते म्हणतात मायक्रोफोन हा एक सुजाण श्रोता आहे. तो एक तयार कान आहे आणि आपण त्याला गाणं ऐकवतोयं असं समजा. मग उंच स्वर लावतांना आपसूकपणे तुम्ही त्या सुजाण कानापासून थोडे मागे व्हाल आणि खालचे स्वर लावतांना त्या कानाशी कुजबूज करावी इतपत जवळ जाल.

पुढे देव आणखी बारकाव्यात शिरतात. प वर्गातली अक्षरं (प, फ, ब,भ, आणि म) त्यातही फ आणि भ चे उच्चारण होतांना हवा जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा उच्चारण सुस्पष्ट ठेवून मायक्रोफोन किंचित डाव्याबाजूला करावा म्हणजे हवेचा आघात त्यावर होणार नाही. तसंच ख, घ, छ, ढ, थ, ध पैकी छ सोडता इतर सर्व शब्दांनाही तोच नियम लागू होतो.

भावदर्शन आणि अलिप्तता हा पेच देव लिलया सोडवतात. पाण्यात पोहतांना पाण्यात बुडावेच लागते, तसेच तरंगावेही लागते. तद्वत, गायकानं गाण्यात इतकंही रंगू नाही की त्याचं अवधान सुटेल. भावना जरी गायकाचं सर्व अस्तित्व वेढून असली तरी गायक स्वतः कायम निर्लेपच राह्यला हवा. तन्मयतेची किमान आणि कमाल पातळी ओळखण्या इतपत जागरुकता गायकाला असणं जरुरी आहे.

शेवटी यशवंतजी म्हणतात की गायन हा एक योग आहे. जेव्हा तो जमतो तेव्हा श्रोता आणि गायक हे द्वंद्व संपलेलं असतं. गायक स्वतःच श्रोता झालेला असतो आणि श्रोत्यांच्या मनात गाणं सुरु झालेलं असतं.

संगीतसमीक्षा

प्रतिक्रिया

अरे वा. यशवंत देव यांनी केलेला गायनाच्या अंगांचा सूक्ष्म विचार आवडला. पुस्तक मिळाल्यास वाचण्यात येईल.

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2017 - 1:18 am | संजय क्षीरसागर

Phone: 022 2273 0679 वर संपर्क केला तर मिळू शकेल.

पद्मावति's picture

22 Feb 2017 - 1:50 am | पद्मावति

छान लिहिलेय. आवडले.

चौकटराजा's picture

22 Feb 2017 - 5:32 pm | चौकटराजा

जे मोजके संगीतकार गीतकाराच्या प्रतिभेला अनन्य महत्व देतात त्यात यशवंत देव व ओ पी नय्यर हे दोन दिग्गज येतात. कविताच चाल सुचविते असे देव म्हणतात तर नय्यर म्हणतात "इतर कुणाला पटो न पटो.. माझा तरी अनुभव असा आहे की मला काव्यच चाल सांगते , नियति काव्य घेऊन येते अन "मालिककी देन "माझ्याकडून चाल वदवून घेते सबब मी ५० टक्के महत्व शब्दाना. २५ टक्के गायक व वाद्यवृन्दाला व २५ टक्के मला घेतो!"
असो.
शब्द प्रधान गायकी हे खरे तर गायकांसाठी लिहिलेले पुस्तक आहे. श्रोत्यांसाठी फारसे नाही. पण फार नाही तरी " आपले हसे होऊ नये इतपत तरी गायचे असेल तर हौशी गायकाने देखील हे पुस्तक वाचले पाहिजे. रसिकराज मायक्रोफोन हा आपला आवाज जसा उच्च प्रतीला नेवून पोहोचवतो तद्वत तो आपले शब्दफेकीचा पंचनामा देखील यथार्थ करतो याचा अनुभव सर्व हवशे नवशे गायकानी घ्यावा. त्यांचे या पुस्तकातील एक वाक्य मला फार आवडले ते असे की आपण प्रयत्न पूर्वक गात असतो तरी ते ऐकणार्‍याला मात्र प्रयत्न पूर्वक प्रयत्न न वाटता "सहज" वाटले पाहिजे. गायक दॉ. वसंतराव देशपांडे यांचा सल्ला असाच असे की जसे बोलता तसे गा .

संजय क्षीरसागर's picture

22 Feb 2017 - 9:31 pm | संजय क्षीरसागर

इंटेलीजन्स इज टू सिंप्लीफाय . गाण्याची प्रोसेस देवांनी इतकी सुरेख मांडलीये की कुणालाही प्रयत्न करून पाहावासं वाटेल. लोकांसमोर गाण्याची ही बाजू यावी म्हणूनच ही पोस्ट लिहीलीये

मराठी_माणूस's picture

23 Feb 2017 - 10:54 am | मराठी_माणूस

मी ५० टक्के महत्व शब्दाना. २५ टक्के गायक व वाद्यवृन्दाला व २५ टक्के मला घेतो!"

ह्यात अरेंजर वर अन्याय होतोय असे वाटते. ओपी च्या बाबतीत तर जी एस कोह्लीला विसरणे अशक्य आहे.

ओपींना आधी ट्यून सुचायची आणि मग ओपी त्यावर गाणं लिहून घ्यायचे. म्हणजे ओपींना सुरातून जे सांगायचं असायचं त्या बरहुकूम शायर शब्द लिहायचा.

देवांना गेय कविता समोर असल्याशिवाय चालच सुचत नाही. देव कवितेचं गाणं कसं होतं यावर बोलतायंत आणि ओपींची गाणी लोकप्रिय झाली कारण त्यांच्या गाण्यात कविता लपलेली असायची.

चौकटराजा's picture

23 Feb 2017 - 10:53 pm | चौकटराजा

उलट ओ पी नी असे ही सांगितले आहे की मी धुन केली व गीत नंतर लिहिले गेले हे मला पटतच नाही. " पहला मुर्दा बादमे कपडा " अशीच पद्धत बरोबर असे ओ पी चे म्हणणे असे. ( हे मुर्दा वगरे उदाहरण त्यांचेच ). तू नळीवर उजाले उनके यादोन्के असा एक कार्यक्रम उपलब्ध आहे त्यात नय्यरनी ती ५० टक्के श्रेयाची माहिती दिली आहेच व हे माझे म्हणणे इतराना नाही असे ही नमूद केलेय.

बाकी वर म्ह्टल्या प्रमाणे ओ पी च्या गीतांचे श्रेय त्यानी जी एस कोहलीना देण्याचा मोठेपणा कधी दाखविला नाही हे सत्य आहे. ओपींच्या सुवर्ण काळात जी एस कोहलीच त्यांचे सहाय्यक होते सबॅस्टीयन नव्हेत. यावर मी पुण्यातच एका कार्यक्रमात जी एस कोहलीचे नाव घेऊन ओ पी ना प्रशन केला असता " वो सब टीम वर्क होता है " असे गुळमुळीत उत्तर त्यानी देऊन कोहलीचे कौतुक करायचे टाळलेच ! जी एस हे जग सोडून गेल्यानंतर ही ओ पी ना काही सिनेमे मिळाले पण त्यात ओपीची जादू हरवली होती. कारण मला अजूनही वाटते जी एस वाज अ मास्टर !

संजय क्षीरसागर's picture

23 Feb 2017 - 10:59 pm | संजय क्षीरसागर

धन्यवाद ! पण ओपी स्वतःला हवा तसा शब्द शायरकडून मिळाल्याशिवाय गाणं बनवायचेच नाहीत. तुम्ही याविषयीची विडिओ क्लीप पाहिली असेल. योग्य आणि खटकेबाज शब्द हेच तर ओपींची गाणी अजरामर होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे.

चौकटराजा's picture

24 Feb 2017 - 8:03 am | चौकटराजा

हवा तो शब्द अशा साठी की मीटर , खटका जुळावा यासाठी . पण मूळ गीत अगोदरच तयार असले पाहिजे अशी पद्धत असे ओ पी ची. याउलट शंकर जय व हसरत जयपुरी यांची पद्धत होती . कितीतरी गीते हसरत यानी धुनींवर लिहिली आहेत.

मराठी_माणूस's picture

24 Feb 2017 - 12:51 pm | मराठी_माणूस

अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
एकंदरीत आपल्याकडे अरेंजर्/वादक ही जमात दुर्लक्षीत राहीली. त्यांचे श्रेय त्यांना पुरेसे मिळाले नाही. त्यांच्या बद्दलची माहीती सहजा सहजी मिळत नाही.
गेल्या शनीवारी , मदन मोहन यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. त्यातही त्यांच्या सहाय्यकांची काहीही माहीती मिळाली नाही. फक्त एक ओझरता उल्लेख , ग्यान वर्मांच्या चिरंजीवांचा होता, जे व्हायोलिन सेक्शन मधे वाजवत होते.

मराठी_माणूस's picture

24 Feb 2017 - 12:51 pm | मराठी_माणूस

अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
एकंदरीत आपल्याकडे अरेंजर्/वादक ही जमात दुर्लक्षीत राहीली. त्यांचे श्रेय त्यांना पुरेसे मिळाले नाही. त्यांच्या बद्दलची माहीती सहजा सहजी मिळत नाही.
गेल्या शनीवारी , मदन मोहन यांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. त्यातही त्यांच्या सहाय्यकांची काहीही माहीती मिळाली नाही. फक्त एक ओझरता उल्लेख , ग्यान वर्मांच्या चिरंजीवांचा होता, जे व्हायोलिन सेक्शन मधे वाजवत होते.

यशोधरा's picture

24 Feb 2017 - 5:48 pm | यशोधरा

सुरेल(ख) ओळख. धन्यवाद!

संदीप डांगे's picture

24 Feb 2017 - 8:02 pm | संदीप डांगे

वा! मस्त आणि आवश्यक ओळख, धन्यवाद!

एकदा कोण्या गाणं शिकणाऱ्याने मला सांगितलं होतं, जेव्हा तू गातोस आणि बराच वेळ गात राहतोस तेव्हा शरीराच्या कोणत्या अवयवावर ताण येतो ते बघ... थोड्या वेळाने गळा दुखत असेल, छाती भरून आली असेल, काहीही, तर तू गात नाहीस असं समज, तू मेहनत करत आहेस, खोटं गातो, अभिनय करत आहेस असं समज. श्वास आपण दिवसभर घेत असतो तसं गाणं हवं, त्यात आत्मा हवा, तर ते गाणं, नाहीतर फक्त बजावणे होऊन राहतं...

संजय क्षीरसागर's picture

24 Feb 2017 - 8:32 pm | संजय क्षीरसागर

श्वास आपण दिवसभर घेत असतो तसं गाणं हवं, त्यात आत्मा हवा, तर ते गाणं, नाहीतर फक्त बजावणे होऊन राहतं...

हे विदेह होऊन कृत्य करणं हाच कृत्यातला आनंद आहे.

व्वा.. मिपावरच्या संगीत विषयक लेखांमधील छान असा आणखीन एक लेखा आहे हा.
रियाजा बद्दलच देवांच मत आवडलं. असं रियाज करून करून मग एका क्षणी एखादी जागा किंवा हरकत जी पुर्वी तितकीशी जमली नसेल ती अचानक घेता आली कि मग गाण शिकण्याचा आणि सतत रियाज करण्याचा आनंद काही वेगळाच होतो.

पण हे सगळं ज्याला मुळात गाणारा गळा मिळाला आहे त्याच्यासाठी लिहिलं आहे देवांनी. त्यानी त्यातली प्रक्रिया कितीही सुलभ करून सांगितली तरी गाण्याचा आवाज नसताना किंवा गाण्याचे एखादे अंगच गळ्यात नसताना (जसे की फिरता गळा) हे सगळं करण शक्य नाही. आत्मानंदासाठी मात्र कोणीही गाण म्हणावे. पण त्याला खूप नियम वगैरेची गरज नाही.

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 1:20 am | संदीप डांगे

पण हे सगळं ज्याला मुळात गाणारा गळा मिळाला आहे त्याच्यासाठी लिहिलं आहे देवांनी. त्यानी त्यातली प्रक्रिया कितीही सुलभ करून सांगितली तरी गाण्याचा आवाज नसताना किंवा गाण्याचे एखादे अंगच गळ्यात नसताना (जसे की फिरता गळा) हे सगळं करण शक्य नाही. आत्मानंदासाठी मात्र कोणीही गाण म्हणावे. पण त्याला खूप नियम वगैरेची गरज नाही.

>> मला तरी असे नाही वाटले! हे 'गाण्याची इच्छा असणार्‍यां'साठीच आहे. गाता येणार्‍यांसाठी नाही. मला तर वाटतं देवांनी सगळे पापुद्रे दूर सारुन मूळ गाभा पुढे काढून दाखवलाय. कितीही फिरता गळा असला आणि गाणार्‍याने त्यात आत्माच ओतला नसेल तर ते निर्जीव होतं... मग त्याचा शून्य उपयोग. गाता गळा किंवा न-गाता गळा ह्याने गाण्याच्या आत्म्यावर परिणाम होत नसतो. माझ्या आत्याचं गाणं ऐकलं का तुम्ही? तिला अजिबात रुढार्थाने गाता येत नाही, गळाही नाही, आवाजही नाही पण 'केवळ आत्मा' ओतते ती गाण्यात म्हणून जीवाला भिडते... गाणे असेच असावे.

देवांनी भरकटणार्‍या तयार गायकांनाही उपदेश दिला आहे. पण तयार नसाल तर काय करायचं ह्यासाठी उशा उथप ने सांगितले होते एका कार्यक्रमात, "तुम्ही संगिताचे प्रशिक्षण घेतले नाही, तुमचा आवाज गोड नाही, तुम्हाला संगित माहित नाही, रागदारी माहित नाही, ठिक आहे. हे काही आवश्यक नसतं गाणं यायला.. तुम्हाला फक्त गायची इच्छा हवी..." तिच्याकडे बघून अजुन जास्तीच्या सल्ल्याची तशी खरंच गरज नाही... ती एक मूर्तीमंत प्रेरणा आहे...

सही रे सई's picture

25 Feb 2017 - 1:56 am | सही रे सई

पण हे सगळं ज्याला मुळात गाणारा गळा मिळाला आहे त्याच्यासाठी लिहिलं आहे देवांनी. त्यानी त्यातली प्रक्रिया कितीही सुलभ करून सांगितली तरी गाण्याचा आवाज नसताना किंवा गाण्याचे एखादे अंगच गळ्यात नसताना (जसे की फिरता गळा) हे सगळं करण शक्य नाही.

तुम्ही माझ हे वाक्य मनाला लावून घेतलेल दिसतयं. पण ते नकारात्मक अर्थानं नाही लिहलेलं हे सांगू इच्छीते. कारण त्या पुढे मी हे लिहिलं आहे.

आत्मानंदासाठी मात्र कोणीही गाण म्हणावे. पण त्याला खूप नियम वगैरेची गरज नाही.

त्यामुळे जेव्हा आत्मानंदासाठी गाऊ तेव्हा त्यात आत्मा ओतला जाणारच आहे. उलट मी म्हणत्ये कि नियम वगैरे ची तशी आवश्यकता नाहीच.

संदीप डांगे's picture

25 Feb 2017 - 2:01 am | संदीप डांगे

मनाला नै लावून घेतलं तै! देवांच्या मांडणीबद्दल तुमचा गैरसमज झाला असे वाटले म्हणून लिहले.. तसे नसेल तर माझ्या गैरसमजातून झालेल्या आगावूपनासाठी माफी!

मुळात गाण्याची इच्छा असणार्‍याला गाणं परिणामकारक व्हावं यासाठी काय करावं लागतं हे कळण्यासाठी पोस्ट टाकलीये.

कोणत्याही आवडत्या गाण्याचे ४/५ कराओके यू ट्यूबवरुन डाऊनलोड करा आणि लेखात दिलेल्या हींटस वापरुन म्हणून बघा, नक्की फरक पडेल आणि हमखास मजा येईल.

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 7:52 pm | संजय क्षीरसागर

तर माझ्याकडे ती प्रोसेस याही पेक्षा आणखी सोपी करण्याची मेथड आहे.

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 7:53 pm | संजय क्षीरसागर

असं वाचावं.

प्रदीप's picture

25 Feb 2017 - 9:41 am | प्रदीप

आवडले. जमेल तसे हे पुस्तक घेईन.

संजय क्षीरसागर's picture

26 Feb 2017 - 7:55 pm | संजय क्षीरसागर

दर्दी लोकांना समिक्षा आवडली हे छान झालं.