लोकलट्रेन प्रवाशाच्या रोजनिशीतील एक पान.
लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं.
