लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं. आता नवीन नवीन कॉम्प्लेक्स उभे रहाताना दिसताहेत. डोंबिवली गेलं. आज गाडी धावताना जरा जास्तच झोल मारतेय. असंच एकदा एक मुलगी मोबाईलवर काहीतरी करत गाडीच्या दरवाजात उभी होती. आणि अचानक गाडीने जोरात झोल मारल्याबरोबर तिच्या हातातील मोबाईल निसटून गाडीच्या बाहेर फेकला गेला होता. नशीब ती नाही फेकल्या गेली. डोंबिवली सोडल्यावर पुढे मुंब्र्यापर्यंत ट्रॅकच्या दोन्ही बाजूला आसमंतात खाडीचा एक घाण उग्र वास भरून राहिलेला असतो. बाजूच्या ट्रॅकवरून जाणाऱ्या एक्सप्रेसचा खडखडाट घुमतोय. नीट निरखून पाहिले असता डब्याचे एक चाक जरा जास्तच खड्खड् करतेय. मुंब्रा कळवा लाईनच्या बाजूने समांतर हायवे जातो. त्याच्यावर कायम ट्राफिक जाम असते. कळवा स्टेशन आलेय. बाजूच्या खिडकीतून कोवळं ऊन आत यायला लागलंय. संध्याकाळी परत येताना मी उन्हाच्या बाजूच्या रांगेत बसत नाही. तिथून कडक ऊन आत येतं. आणि ती बाजू दिवसभर उन्हात तापून निघालेली असते. फार गरम होते त्याबाजूला. कितीतरी स्टेशनवर पंखे बिनकामाचे फिरत असतात. त्यांच्याखाली ते बंद करायला बटनं हवी होती. सकाळी सकाळी ट्रेनने प्रवास करणाऱ्या तृतीयपंथीयांचा बऱ्याच स्टेशनवर घोळका दिसतो. कुठून कुठे आणि कसल्या कामावर जातात, कोण जाणे! ठाणे स्टेशनवर एक माणूस कामावर बॅग घेऊन जाताना पाहिला. रिटायर व्हायला आला असेल, पण जरा जास्तच म्हातारा झालेला वाटतोय. अंध आणि अपंगांचा डबा प्लॅटफॉर्मवर जिथे येतो, तिथे वर छताला अंधांना कळण्यासाठी एक सतत 'पीक पीक' आवाज करणारे छोटे स्पीकर लावलेत. त्याचा चोवीस तास येणारा आवाज इतरांची छळवणूक करणारा आहे. त्या स्पीकरजवळच जे कॅन्टीनवाले आहेत, त्यांना त्याचा किती त्रास होत असेल. मुलुंड स्टेशनवर बूट पॉलिशवाला पॉलिशचे सामान काढून जमिनीवर व्यवस्थित रचून ठेवतोय. काही स्टेशनच्या भोवतालच्या जागेत छान बगीचे केलेत. तिथे सुंदर फुले उमलेली दिसताहेत. बऱ्याच स्टेशनवरच्या भिंती शाळा कॉलेजच्या मुलांनी छान छान चित्रे काढून सुशोभित केल्या आहेत. मी बऱ्याचदा ही चित्रे निरखून पहात असतो. पुष्कळशा चित्रांमध्ये सामाजिक संदेश दिलेला दिसतो. काही चित्रांमध्ये त्या त्या स्टेशनच्या परिसरात असलेल्या प्रसिद्ध स्थळांची माहिती दिलेली आढळते. फारच छान उपक्रम आहे हा! भांडुप गेले. माझ्या समोरच्या बाकावरील तिघाजणांची मस्तपैकी ब्रह्मानंदी टाळी लागलीय. त्यापैकी एकाचा घोरल्याचा आवाज येतोय. माझ्या बाजूला बसलेला एकजण जोरजोऱ्यात मद्रासीत कसले तरी मंत्र पुटपुटतोय. एक कॉलेजचा विद्यार्थी पुस्तकावर पिवळ्या मार्करने रेघोट्या ओढतोय. अरे! अरे! रेघोट्या ओढून ओढून सर्वच पुस्तक रंगवतोय की काय? बाकीचे जे जागे आहेत, ते आपल्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेत. काही वर्षांपूर्वी हीच लोकं पुस्तक नाहीतर पेपरमध्ये डोकं खुपसलेली दिसायची. चला! थोड्यावेळाने माझे उतरायचे स्टेशन येईल. उतरायच्या तयारीत रहायला पाहिजे. नाहीतर लिहिताना मी एवढा गुंग होऊन जातो, की बऱ्याच वेळा दोन तीन स्टेशन पुढे जाऊन पोहोचतो. अहो, एकदा तर अशावेळी रिटर्न येताना पुन्हा दोन स्टेशन पुढे (की मागे?) गेलो होतो. हा! हा! हा! बाय! उद्या भेटा! नवीन वाचायला!
माझा ब्लॉग :
http://sachinkale763.blogspot.in
प्रतिक्रिया
7 May 2017 - 5:31 pm | राघवेंद्र
मस्त सचिन भाऊ.
मुलुंड ला बहुतेक गणपतीचे मंदिर आहे ना. लोकल तेथून चालली की 'गणपती बाप्पा मोरया' म्हणायचे.
विठ्ठलवाडी ऊन बदलते म्हणजे म्हणजे दुसऱ्या बाजूला जाते त्यामुळे अंबरनाथ ते विठ्ठलवाडी उन्हात आणि पुढे सावलीत प्रवास करायचो .
7 May 2017 - 5:59 pm | पैसा
कुठे गेले आमचे ठाकुर्लीवाले!
7 May 2017 - 6:16 pm | वरुण मोहिते
गणपतीचे मंदिर आहे राघवेंद्र सर . बऱ्याच ट्रेन सकाळच्या असतात त्या घोषणा देत जातात .आर पी एफ च मैदान आहे तिकडे आमचे क्रीडामहोत्सव पण व्हायचे आमचे . अर्थात मी लोकल मध्ये बसून खूप वर्ष झाली . पण अजूनही गणपती बाप्पा मोरया घोषणा असतात . ठाण्याच्या कॅन्टीन मध्ये स्टेशन च्या त्या प्लॅटफॉर्म ला वडे आधीच तयार असतात .ओळखीच्या लोकांसाठी .ट्रेन येण्या आधी मुंबईच्या दिशेच्या . असं बरंच काही . हि वेळ गेली चाकरमान्यांची कि मार्केट चे ग्रुप . आता पत्ते अलौड नाहीत पण चिठ्या पडून जुगार वैग्रे वैग्रे . भरपूर आहेत गमती जमती .
9 May 2017 - 12:17 am | राघवेंद्र
एकदम मस्त !!!
सगळे चित्र डोळ्यसमोर सर .
7 May 2017 - 9:34 pm | सचिन काळे
@ राघवेंद्र, पैसा, वरुण, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!
9 May 2017 - 12:18 am | राघवेंद्र
अजून काही लोकलच्या गोष्टी येऊ देत..
काही नव्या .. काही जुन्या ...
9 May 2017 - 12:36 am | रुपी
मस्त लिहिलंय.
आमच्यासारख्या मुंबईला क्वचितच जाण्याचा योग आलेल्या लोकांना लोकलमध्ये बसल्यापासून उतरेपर्यंत गोंधळल्यासारखीच स्थिती असते. त्यामुळे असं निरीक्षण कधी केलंच जात नाही.
9 May 2017 - 9:28 am | कवितानागेश
आवडलं....
9 May 2017 - 11:33 am | सूड
माझे लोकलचे प्रवास आठवले. त्यामानाने इथे फारच सुखात आहे.
9 May 2017 - 11:52 am | सतिश गावडे
मी ही दोन वर्षे लोकलने प्रवास केला आहे. एक वर्ष गोरेगाव ते चर्चगेट आणि एक वर्ष भांडुप ते सीएसटी (व्हाया ठाणे ;) )
आजही तो प्रवास आठवला की अंगावर शहारे येतात.
ते माजोरडे भजनवाले अजूनही असतात का? की व्हाट्सअप क्रान्तीमुळे ते बंद झालेले?
9 May 2017 - 8:52 pm | सचिन काळे
@ रुपी, कविता, सूड, सतिश, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले आभार!!!
@ राघवेंद्र, मी गेली २८ वर्षे लोकलने प्रवास करतोय. बरे, वाईट अनुभव बरेच साठलेत. आणि मुंबईकरांकरिता 'लोकलट्रेन'चा प्रवास हा तर अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे.
9 May 2017 - 9:32 pm | मार्मिक गोडसे
रोजच्या रोज नवीन अनुभव तेही अगदी स्वस्त दरात मुंबईच्या लोकलशिवाय कोणीही देऊ शकत नाही. लोकल प्रवासाचा कंटाळा? अशक्य.
9 May 2017 - 9:33 pm | मार्मिक गोडसे
आणि हो लेख आवडला हे सांगायचे राहून गेले.
9 May 2017 - 10:49 pm | दशानन
लोकल ट्रेन म्हणाल्यावर अंगावर काटा येतो, का माहीत नाही पण मी मुंबई की पुणे या निवडीत याचा भाग नक्कीच होता व मी पुणे निवडले कायम स्वरूपी राहण्यासाठी.
असो, पुण्याने आपला हिसक्का पहिल्याच महिन्यात दिला होता ही गोष्ट वेगळी =))
10 May 2017 - 3:56 pm | सचिन काळे
@ मार्मिक, दशानन, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले फार आभार!!!
10 May 2017 - 3:57 pm | सचिन काळे
@ मार्मिक, दशानन, लेख वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले फार आभार!!!