भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी
मागच्या प्रकरणात 'स्व' च्या मूळ स्वरूपाविषयीचे रमण महर्षींचा उपदेश थोडक्यात समजावून घेतल्यावर आता तोच धागा पकडून साधकांचे प्रकार किंवा त्यांच्या श्रेणींबद्दल महर्षींचा दृष्टीकोन या प्रकरणात बघायचा आहे.
तत्पूर्वी मराठी संत साहित्यातला एक संदर्भ आवर्जुन देतो. पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या वर-प्रार्थनेची सुरूवात 'उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर' अशी होते. त्यांनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठाची सुरूवात 'आत्मरूपा तुज, करी नमस्कार, तुझा जयजयकार, असो देवा' अशी होते. संजीवनी गाथेत स्वामीजी असे म्हणतात -